जव्हार डायरीज - पार्ट २ Dr.Swati More द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जव्हार डायरीज - पार्ट २



कार पार्क करून आम्ही समोरच असलेल्या रिसेप्शन कडे निघालो. रुपेश ने आमचे टेंपरेचर चेक करून आमची रूम उघडुन दिली.मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जव्हार सारख्या ठिकाणी खूप लक्सरी नाही मिळणार पण आमची जी रूम होती ती स्वच्छ आणि आरामदायी होती. आम्ही आमचे सामान ठेवून रिलॅक्स झालो. दुपारच्या जेवणाची वेळ अजून झाली नव्हती . त्यामुळे आम्ही या फार्म हाऊस चा एक फेरफटका मारायला बाहेर पडलो. इथे राहण्यासाठी ज्या रूम्स आहेत त्या दोन ठिकाणी आहेत. काही रूम्स रिसेप्शनच्या बाजूलाच आहेत. काही रूम्स रिसेप्शन समोरच्या एक मजली बिल्डिंग मध्ये तळ मजला आणि पहिला मजला वरती विभागलेल्या आहेत. डायनिंग हॉल उजव्या हाताला आहे.. हॉलच्या आतमध्ये बसून नाहीतर बाहेर लॉन वरती खुर्च्या टेबल मांडून तुम्ही तिथे पण आरामात जेवणाचा आस्वाद घेवू शकता. डायनिंग हॉलच्या वरती काही रूम्स आहेत तिथे ड्रायव्हर लोकांची राहण्याची सोय केली जाते.
रुपेश ने जेवण तयार असल्याचे सांगितले. आम्ही बाहेर लॉन वरतीच खुर्च्या टेबल मांडून , निसर्गाच्या सानिध्यात जेवणाचा आनंद घेतला. जेवण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही होते. आम्ही व्हेजच खाल्ले.. जेवणाची चव अप्रतिम होती. भेंडी फ्राय हा प्रकार खूपच आवडला. आम्ही अगोदर पण भेंडी फ्राय खाल्ल होत पण आज जे भेंडी फ्राय खाल्ल ते वेगळंच होतं.. चला पोटपूजा तर छान झाली आता थोडा वेळ वामकुक्षी घेण्याच्या तयारीला लागलो. सकाळी लवकर उठल्यामुळे डोळे पण पेंगुळले होते.
रुपेश ने संध्याकाळचा साइट्सींगचा सगळा प्लॅन तयार करून दिला.. त्याप्रमाणे आम्ही एक छान झोप काढून साडेतीन चारच्या सुमारास बाहेर पडलो. यावेळी गाडी ड्रायव्हर ने हातात घेतली कारण एका ठराविक वेळेत सगळी साइट्सींग संपवायची होती आणि काही ठिकाणी रस्ता चांगला नाही याची कल्पना रुपेशने दिली असल्यामुळे मी ड्रायव्हर सीटचा ताबा घेतला नाही.
सगळ्यात अगोदर आम्ही खडखड डॅम कडे रवाना झालो. हॉटेल पासून साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांच ड्राईव्ह होत . हॉटेल मधून बाहेर पडलो हातात मॅप होता त्याची मदत घेत मध्येच स्थानिकांना विचारात आम्ही डॅम कडे निघालो. जव्हार शहर सोडलं की अगदीच सूनसान रस्त्यावरून प्रवास चालू होता. एकही गाडी नाही की माणूस नाही रस्त्यावर फक्त निसर्ग तुमच्या सोबतीला असतो.या भागाला देवाने भरभरून निसर्ग सौंदर्य दिले आहे. हिरवीगार भात शेती, त्यातून जाणारा रस्ता, रस्त्यावर धावणारी आमची गाडी, गाडीत लावलेली छान रोमँटिक गाणी... सुहाना सफर और ये मौसम हंसी हमे डर हैं हम खो ना जाये कहीं !!
थोड पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक कार पार्क दिसली. एक फॅमिली तिथेच बाजूला असलेल्या छोट्याश्या धबधब्याचा आनंद घेत होती. आम्ही पण माणसे बघून तिथे थांबायचे ठरवले. खाली उतरून भाताच्या शेतातून वाट काढत त्या नितळ पाण्याच्या धबधब्याजवळ गेलो. ती दुसरी फॅमिली पाण्याच्या आनंद घेवून परत जाण्याच्या तयारीत होती. त्यांच्याशी बोलल्यावर समजले की ते पण खडखड डॅम कडे चालले आहेत. चला! एक सोबत तरी मिळाली. आम्ही थोडा वेळ खडकावर पाण्यात पाय सोडून शांतपणे बसलो. झुळझुळ वाहणारे पाणी पायाला गुदगुल्या करत होते. पाणी आणि पक्ष्यांचा मधून कानावर येणारा किलबिलाट याशिवाय कसलाही गोंगाट तिथे नव्हता. तिथून उठूच वाटतं नव्हते पण अंधार पडायच्या आत खडखडला पोहचायचे होते. त्यात आदिवासी भाग, त्यामुळे नाईलाजने उठलो. येथून पुढे पण रस्ता बऱ्यापैकी निर्मनुष्यच होता.पण आता सवय झाल्यामुळे आम्हाला काही वाटतं नव्हते. काही अंतर पुढे गेल्यावर परत तीच कार दिसली. आजूबाजूला बघितलं तर ते लोकं शेतात फोटोशूट करत होते. आम्ही त्यांना डॅम कडे जावून आलात का विचारलं. तर ते काका बोलले ," आम्ही थोड पुढे जावून परत आलो. पुढे छोटा आदिवासी पाडा आहे. तिथल्या स्थानिकाने सांगितले की डॅम अजून खूप लांब आहे " मग यांनी पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. फोटोशूट झाल्यावर ती फॅमिली परत जव्हार जाणार होती. पण आम्हाला मात्र डॅम बघायचा होता कारण रुपेश ने वर्णन केल्याप्रमाणे Khadkhad is the place worth to visit ! आम्ही पुढे जायला निघणार तेवढ्यात एक गृहस्थ बाईक वरून आले. आम्ही त्यांना थांबवून डॅम विषयी चौकशी केली. ते गृहस्थ आरोग्य अधिकारी होते आणि ते डॅम जवळ असलेल्या पाड्याकडे निघाले होते. त्यांनी आम्हाला त्यांच्या पाठी पाठी यायला सांगितलं. ते जर भेटले नसते तर कदाचित आम्ही रस्ता विसरलो असतो किंवा माघारी वळलो असतो. म्हणतात ना, नशिबात असतं ते आपल्याला मिळत.
पंधरा मिनिटांच्या प्रवासानंतर त्यांनी त्यांची बाईक थांबवली. आम्हाला सांगितले की,' थोडे पुढे गेल्यावर गाडी रस्त्याच्या बाजूला लावा. पांच ते सात मिनिटे चालत गेलात की डॅम येईल' . आम्ही त्यांच्या सूचनांचे पालन करत गाडी पार्क केली, ड्रायव्हर ला गाडीजवळ थांबायला सांगून डॅम कडे निघालो. डॅम कडे जायला दोन रस्ते आहेत . एका रस्त्याने गेलो की डॅम च्या बॅकवॉटर चा नजारा दिसतो आणि दुसऱ्या वाटेने खाली उतरून गेलो की डॅम च्या भिंतीवरून ओव्हरफ्लो होवून खाली पडणार पाणी दिसतं. आम्ही अगोदर टेकडी चढून गेलो. अथांग निळसर पाणी समोर पसरलेल होतं. नुकताच पावसाळा संपल्यामुळे डॅम ओसंडून वाहत होता. तो नजारा बघितला आणि तिथपर्यंत आल्याचं सार्थक झालं. थोडा वेळ तिथे थांबलो आणि खाली उतरून गेलो.. समोरून डॅम अजून सुंदर वाटत होता. आम्ही आता पर्यंत बरेच डॅम बघितले आहेत आणि प्रत्येक डॅम आपापल्या परीने सुंदर होते. खडखड डॅम पण आपल्या सौंदर्याचं वेगळेपण दाखवत होता. निळसर रंगाच्या त्या पाण्याला वेगळाच लय आणि नाद होता. खूप मोठा नाही आहे हा डॅम पण त्याच सौंदर्य आपल्या डोळ्याचं पारणं फेडणार आहे. हा डॅम ओसंडून वाहत असताना जर भेट दिलीत तर ' cherry on the cake'. खडखड डॅम सुचवल्या बद्दल आम्ही मनोमन रुपेश चे आभार मानले. परत येताना ते आरोग्य अधिकारी दिसले. त्यांचे पण आभार मानून आम्ही नॉनस्टॉप जव्हार कडे निघालो.
आता पुढचे सगळे पॉईंट जव्हार जवळचं होते त्यामुळे अंधार झाला तरी टेन्शन नव्हते. आम्ही आमचा मोर्चा आता जयसागर डॅम कडे वळवला. या ठिकाणी जायला रस्ता चांगला आहे आणि इथे माणसांची वर्दळ बऱ्यापैकी असते. आम्ही तिथे पोहचलो तेंव्हा त्याचे रिनोवेशन आणि डॅम च्या बाजूला गार्डन बनवण्याचे काम चालू होते. हा डॅम बऱ्यापैकी मोठा आहे. तिथून जव्हार शहराला पाणीपुरवठा केला जातो.आम्ही तिथे जास्त वेळ न घालवता सनसेट पॉईंट कडे जायला निघालो. सनसेट पॉईंट शहराच्या मध्यभागीच आहे. तुम्ही मॅपच्या साहाय्याने आरामात पोहचू शकता. आम्ही पोहचलो तर तिथे स्थानिक बायका मुलांची गर्दी होती. बहुतेक शनिवार रविवार इथले स्थानिक फॅमिली पिकनिक साठी या ठिकाणी येत असावेत. सनसेट शांतपणे बसून बघता यावा म्हणून सिमेंट काँक्रिट चे छोटे छोटे डोम बनवून बसण्याची व्यवस्था केली आहे. या पॉईंट वरून सह्याद्रीच्या रांगांचा विहंगम नजारा दिसतो. खाली खोल दरी आहे तिचा आकार धनुष्यासारखा आहे म्हणून तिला अगोदर 'धनुकमल' असं म्हणायचे. समोर असलेल्या सह्याद्रीच्या रांगामध्ये सूर्यास्त होतो. सूर्यास्त व्ह्यायला अजून अर्धा पाऊण तास होता, तिथे गर्दी वाढू लागली होती त्यामुळे आम्ही शिरपामाळ या ठिकाणी जावून सनसेट बघण्याचे ठरवले.
शिरपामाळ सुद्धा शहराच्या जवळचं आहे. आम्ही तिथून बाहेर पडून राईट घेतला आणि गुगल मॅपवर शिरपा माळ सर्च केलं. आणि तिथेच आमचं चुकलं. हे आम्हाला आम्ही गोल फिरून जेंव्हा त्याच ठिकाणी आलो तेंव्हा समजले. ॲक्च्युअली आम्ही राईट च्या ऐवजी लेफ्ट घ्यायला हवा होता. सनसेट पॉईंट वरून बाहेर पडून लेफ्ट मारला की सरळ सरळ रस्ता शिरपामाळला जातो. असूद्या, माणूस शेवटी चुका करूनच शिकतो. शिरपामाळ या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेले स्थान आहे. सुरतेसाठी स्वारीसाठी जाताना महाराज इथे थांबले होते. त्यावेळी जव्हार चे राजे पहिले विक्रमशहा यांनी राजांना मानाचा शिरपेच देवून इथे त्यांचे स्वागत केले होते. या ठिकाणी या घटनेची साक्ष म्हणून एक स्मारक उभारले आहे. आम्ही त्या ऐतिहासिक स्मारकाला वंदन करून आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागलो. इथून सुर्यास्ताचा नजारा अप्रतिम दिसतो. निवांत बसून सूर्यास्त बघता यावा म्हणून इथे बसायला बेंच आहेत. आम्हाला यानंतर सरळ हॉटेल गाठायचे असल्याने आम्ही निवांत बसून सुर्यास्ताचा आनंद घेतला. हळू हळू अंधार वाढू लागला तसा आम्ही हॉटेल कडे कूच केली.
साधारतः सातच्या सुमारास आम्ही हॉटेल मध्ये पोहचलो. जेवणासाठी बराच वेळ बाकी होता. आर्या मॅडम ना भूक लागली होती. तशी सगळ्यांना भूक लागली होती मग आम्ही मस्त कांदाभजी आणि चहाची ऑर्डर दिली. रुपेश आणि त्याचा स्टाफ खूप तत्पर आहेत. थोड्या वेळातच भजी आणि चहा आलाच , तसे सगळे त्यावर तुटून पडले. बघता बघता प्लेट साफ झाली . मग आर्या मॅडमनी टी.व्ही.ताबा घेतला .मी आणि अनिल आज काढलेले फोटो बघण्यात आम्ही दंग झालो.