नव्या.. Hrucha Nilima द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नव्या..

*नव्या*

"केतकी...! नव्या आता out of danger आहे. काळजी घ्या तिची. रक्त जास्त गेल्याने अशक्तपणा आला आहे तिला. तिची काळजी घे. ती ना पोलिसांशी धड बोलत आहे की काउन्सेलरशी. झोपली आहे आता. तिला मानसिक आधाराची खूप गरज आहे.तू सावर तिला" असे बोलून केतकीची मैत्रिण डाॅ. सना बेग तिथून निघून गेली. "हिने तिची काळजी घेतली असती तर पोरीने स्वतःहून मरणाचा घोट नसता घेतला. हिला काय करायचं पोरीशी... शेवटी वांझोटीच ना...!" जोरातच केतकीच्या सासूबाई बोलल्या. सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्या नव्याकडे गेल्या. अवघ्या एकोणीस वर्षांची नव्या मृत्यूशी झगडून परत आली होती. तिच्या हाताला लागलेली ओली जखम बघून केतकीच्या काळजात चर्र झालं. आणि सकाळचा तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला.

" नव्या.. नव्या.. नवू बेटा दार उघड लवकर. आज रविवार नाही बुधवार आहे गं. झोपू नकोस काॅलेजला जायचे आहे ना तुला...? उठ ना सोने..!" केतकी म्हणजे नव्याची काकू तिच्या खोलीचं दार वाजवत होती. एकीकडे तिची खाष्ट सासू नातीकडे बघण्याची तसदी न घेता नेहमीप्रमाणे मोठ्या आवाजात देवाचे अभंग गात होती. केतकीचे पती विभाकर कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. नेहमी प्रमाणे सकाळी पाच वाजता उठून अभ्यास किंवा कत्थकचा रियाज करणारी नव्या दार उघडत नाही म्हणून तिच्या काकूचा म्हणजे केतकी पाठारे हिचा जीव कासावीस झाला होता. सध्याचं नव्याचं वागणं बघून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. क्षणाचाही विलंब न लावता तिने शेजारच्या नाना भाऊ सावर्डे आणि त्यांच्या पत्नी सौ. मालती यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांच्या घरापाशी जाऊन जोरजोरात दार वाजवू लागल्या..

नाना भाऊ (दार उघडून) :- अरे ताई . बोला की काय झालंय..

केतकी(रडवेल्या आवाजात) :- अहो भाऊ. नवू दार उघडत नाहीये खोलीचं. काल जराशी कणकण होती तिच्या अंगात... या ना जरा.

केतकीचा नूर बघून नाना, मालती ताई आणि त्यांचा मुलगाही धावतच केतकीच्या घरी येतात. खूप जोर लावून दार उघडले तर नव्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि बाजूला दुधाचा ग्लास फुटलेला अर्धा टेबलावर आणि अर्धा जमिनीवर होता, जो केतकीने रात्री नव्याला दिला होता. नव्याला बघून केतकीला रडूच कोसळले. ती कसलाही विचार न करता नाना भाऊंच्या मदतीने स्वतःच्या कारने नवूला दवाखान्यात घेऊन आली होती.

"काकू ही घ्या औषधं.. आणि हे उरलेले एकशे तीस रूपये..!" मोहितच्या म्हणजे नाना भाऊंच्या मुलाच्या आवाजाने त्यांची तंद्री भंगली. स्वतःला सावरत त्यांनी डोळ्यातले अश्रू पुसले तोच मोहित पुन्हा बोलला, "काकू..! टेन्शन नका घेऊ.. नवू ताई बरी होईल लवकर. काकांचा फोन आला मला ते एका तासात पोचतील दवाखान्यात." इतके बोलून मोहीत निघून गेला. केतकी कितीतरी वेळ निपचित पडून राहिलेल्या नव्याच्या माथ्यावर हात फिरवत होती.
मागून कोणीतरी हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिने मागे वळून पाहिले तर विभाकर उभे होते. केतकीचा सकाळपासून दाबून ठेवलेला हुंदका बाहेर आला आणि ती विभाकरला बिलगून ढसाढसा रडायला लागली.

विभाकर (तिच्या डोक्यावर हात ठेवत) :- आईकडे दुर्लक्ष कर. ती काहीही बरळत असते.

केतकी :- आईंच्या बोलण्याचा त्रास होत नाहीये विभाकर मला. नव्या बघा ना. कसं निपचित पडून आहे लेकरू. प्रभाकर भाऊजी आणि वंदना ताईंनी फारकत घेतली आठ वर्षांपूर्वी. मोठा विपुल मुलगा म्हणून त्याला चांगल्या ठिकाणी काॅलेजला घातले. होस्टेल पण चांगले. आणि माझी नवू.. तिचा नेहमी तिरस्कार केला सगळ्यांनी. आईंनीपण. वांझोटी म्हणून मला नेहमी दूषणे दिलीत, नव्यात आणि माझ्यात जवळीक येऊ दिली नाही. हट्टाने मी तिला माझ्याकडे घेऊन आले पण तिला दत्तकही घेऊ शकलो नाही आपण. आणि आता हे सगळं. मी नाही सहन करू शकत आता. माझं लेकरू बघा.

विभाकर :- केतकी आईपुढे मी पण हतबल आहे.. आणि तू मला शपथ दिली आहे. आई तुला...

केतकी :- शूऽऽ नवू झोपली आहे. उठेल ती. चला डिस्चार्ज कधी मिळेल बघू. आणि तिला ओरडू नका तुम्ही. तिच्या मताप्रमाणे बघूया..

विभाकर :- ठिक आहे तू म्हणशील तसं..

विभाकर रावांनी नव्याच्या डोक्यावर हात ठेवून तिच्या कपाळाचा मुका घेतला आणि तिच्या अंगावरचं पांघरून नीट करून दोघेही वाॅर्डबाहेर आले. विभाकरची आई अजुनही बडबड करत होती. आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून दोघेही डाॅक्टरांकडे गेले.

दोन दिवसांत डिस्चार्ज मिळाल्यावर विभाकर आणि केतकी तिला घरी घेऊन जाण्यासाठी खूप खुष असतात. तिघेही अबोल आणि शांत होते. कार मध्ये कोणीच कोणाशी बोलय नव्हतं. घरापुढे गाडी थांबताच केतकी पटकन उतरली आणि घरात शिरली. नव्याला केतकीचं हे रूप जरा विचित्र वाटलं. तिने प्रश्नार्थक नजरेने काकाकडे पाहिले पण काकाने डोळ्यांनी तिला शांत बसण्याची खूण केली. ते दोघेही दाराजवळ जाताच केतकी ओवाळणीचं ताट घेऊन उभी होती.

केतकी :- माझ्या लेकीला कोणाची नजर लागू नये देवा आता...

आजी :- हम्म. जसं काही लढाई जिंकली आहे. आईबापाच्या संसाराला दृष्ट लावली आधी आणि आता आमच्या जीवाला घोर...बरं झालं असतं मेली असती तर..

विभाकर :- बस झालं आई. तू माझा आणि केतकीचा तिरस्कार करते तोपर्यंत ठीक होतं पण नवूला एक शब्द बोललेला मी खपवून घेणार नाही.

आजी :- हो रे बाबा.. हे तुझंच घर आहे. मी काय आश्रित ना तुझ्याकडे आणि तुझ्या बायकोकडे...

विभाकरचा संताप केतकी ओळखून होती. वाद आणखी होऊ नये म्हणून ती विभाकरला अडवत बोलली.

केतकी :- विभाकर... नवूला तिच्या खोलीत नेता का वर.. फार अशक्तपणा आला आहे तिला. मला नेणं जरा जड पडेल. मी तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते.

विभाकर :- ठिक आहे. आणशील तर आम्हा दोघांसाठी आणशील. मला खूप भुक लागली आहे. चलो नवू प्रिन्सेस..

विभाकर नव्याला तिच्या खोलीत घेऊन येतो. जेव्हा सहा वर्षांपूर्वी नव्या त्यांच्या घरात आली तेव्हा हट्टाने "काका तू आणि काकू खालच्या खोलीत झोपा. ही आजपासून माझी खोली." असं बोलून हट्टाने खोली स्वतः बळकावली होती. तिच्या बेडवर बेडशीट टाकताना त्याने पाहिले ते पिंक टेडी... जे घेऊन ती काका काकूच्या खोलीत झोपायला यायची. आणि साईड टेबलवर विपुल दादा आणि आई बाबांसोबतच्या फोटो फोटो फ्रेमच्या जागी त्या तिघांचा फोटो होता. जेव्हा केतकीला दिल्लीत कत्थकच्या स्पर्धेत दुसरे बक्षिस मिळाले होते. सगळे सुरळीत चालू असताना अचानक काय झालं हेच विभाकरला समजेना. त्याने नव्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि काही विचारणार इतक्यात केतकी खायला घेऊन आली होती.

केतकी :- नवू... हे बघ तुझे आवडते इडली सांभर..अहो खा आता दोघं काका पुतणी इथे बसून. मी आईंसोबत खाली जाऊन खाते.

विभाकर :- भारी.. म्हणजे तू इडली खाणार आणि आई तुझा जीव खाणार... ऑल दी बेस्ट...

काकाच्या विनोदावर नव्याला हसूच आले. विभाकर आणि केतकी दोघेही तिला हसताना बघून सुखावले. असेच दिवस सरत होते. नव्यासाठी काका काकू खूप काही करत होते. तिला आवडतं तसं खाणं, बाहेर फिरणं सगळं काही...! इतक्या दिवसांत तिच्या आई वडिलांनी काय तिच्या भावानेही तिची चौकशी केली नाही. एके दिवशी रात्री साडे नऊ वाजता नव्या काका काकूकडे जाते.

नव्या :- काका - काकू आज तुमच्याजवळ झोपू मी..? तुमच्या दोघांच्या मध्ये.. थोडा वेळ गप्पा मारू हवं तर.. मी नंतर निघून जाते. (आणि तिच्या हातात तिचा पिंक कलरचा टेडी पण होता.)

इतके दिवस अबोल असणारी नव्या स्वतःहून गप्पा मारायला आली म्हणून तिची काकू खूप खुष होते आणि तिला घट्ट मिठी मारते. दोघांना नव्याच्या मनातील चलबिचल कळत होती पण नव्या जोपर्यंत बोलत नाही तोवर आपण शांत राहू दोघांनी ठरवले होते...

नव्या (मोठा दिर्घ श्वास घेऊन) :- आरव.. आरव नाव आहे त्याचं... एकाच काॅलेजमध्ये आहोत. तो माझ्याहून सिनिअर आहे दोन वर्षे... रॅपर आहे. कत्थक डान्सर आहे आणि दिसायलाही छान.. कविता करतो. माझा डान्स बघून त्याने पहिल्यांदा माझ्यावर कविता केली आणि गिफ्ट म्हणून ग्रिटींग कार्ड वर लिहून दिली. आई बाबांचा डिव्होर्स झाला आणि आई घरातून निघून गेली. माझ्याकडे वळून बघितलं नाही. दादा पुण्याला होस्टेलवर.. आई सारखी त्याचं कौतुक करायची. बाबांचा बिझनेस बुडाला हा माझाच पायगुण आहे असे दोघांना वाटायचे... मग दादापण मला तुसड्यासारखं वागवायचा. आजी आली की मला मारायची कधीकधी.. तुमच्याकडे आले तेव्हा छान झालं सगळं असं वाटायचं.. पण बाबा येऊन भांडण करायचे काकाशी.. मला घरात ठेवली म्हणून.. आजी काकूला खूप टाॅर्चर करते. सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत शेअर केल्या मी.. तो माझा घट्ट मित्र झाला होता. आमचं नातं कालांतराने मैत्रिच्या पलिकडे गेले. पण मी त्याला कधीच माझं स्वत्व बहाल केले नाही. मर्यादा ठेऊन मी वागले. याचाच परिणाम त्याला कविता करण्यासाठी कुणी दुसरी मैत्रिण मिळाली. ती माझ्याहून दिसायला किंचित उजवी आहे म्हणून त्याने माझ्याशी असलेलं नातं तोडलं..पण आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो.. पण तिला माझ्याविषयी खूप गैरसमज झाला आणि त्याने माझ्याशी असलेली मैत्री तोडली...

इतके बोलून नव्याने डोळे पुसले. काकूने तिला जवळ घेतले आणि बोलली, "काही हरकत नाही. जे झालं ते चुकच आहे. पण बेटा तू आमचा तरी विचार करायचा ना.. आम्ही दोघं तुला बघूनच जगतोय. तुला काही झालं तर मला तर मरणाशिवाय पर्यायच नाही गं.." दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून मनसोक्त रडत होत्या. काका पण खिडकीपाशी उभा राहून आसवे गाळत होता. थोडा वेळ गेला आणि तिघेही शांत झाले.

विभाकर :- नवू चला आता आपण आईस्क्रीम खाऊ आणि झोपूया. उद्या काॅलेजला जायचं आहे ना. माझं पण ऑफिस आहे आणि काकूच्या मागे आजीची भुणभुण..

नव्या :- पण काका...

विभाकर :- हे बघ बेटा.. परिस्थिती टाळणे हे समाधान नाही. परिस्थितीशी झगडणे हा खरा सच्चेपणा आहे. केतू नवूसाठी मी नवीन डेनिमचा वन पीस आणला आहे तो इस्त्री करून ठेव. माझी पिल्लू उद्या तोच घालून जाईल काॅलेजला...

काकाचं आणि काकूचं तिच्यावर असलेलं प्रेम बघून नव्याला भरून येतं. आईस्क्रीम पार्टी करून तिघेही एकमेकांना घट्ट बिलगून झोपी जातात. सकाळी जेव्हा तयारी करून नव्या खाली येते तेव्हा काका गाडीची चावी घेऊन सोफ्यावर बसला होता.

विभाकर :- अरे वा.. माझी प्रिन्सेस किती गोड दिसतेय.. चला काका ड्रायव्हर आज प्रिन्सेसला काॅलेजला सोडून ऑफिसला जाईल.

नव्या :- काका.. जाईल मी एकटी उगाच तुला त्रास..

विभाकर :- कम ऑन बेटा.. येतो मी. आज तसंही उशिरा जायचे आहे आणि तुझ्या काकूने बोरिंग उपमा केला. त्या निमित्ताने काॅलेजची मिसळ खाऊ दोघेही..

केतकी :- सगळं ऐकतेय मी... तुम्ही तर सुधारणार नाहीत. माझ्या लेकीला बिघडवत आहात..

काकूचा निरोप घेऊन दोघेही काॅलेजमध्ये जातात. काॅलेजला गेल्यावर बघताच फेस्ट सुरू असल्याचे दोघांना कळते.

नव्या :- काका जाऊदे.. फेस्ट आहे. आपण घरी जाऊयात. काही काम नाही. मला कशातच सहभागी व्हायचे नाही.

विभाकर :- बेबी. जाऊन तर बघ. मी थांबलोय कॅन्टीनमध्ये. मिसळ खाऊनच जाऊ.

काकाचं ऐकून ती हाॅल मध्ये जाते. सगळ्या जणांच्या नजरा तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होते. समोर जाऊन बघते तर तो समोरच होता. आरव... तिला बघत तुच्छतेने हसला आणि त्याच्या मित्रांना बोलला,"हे बघा..! हीच ती माझ्यासाठी मरत होती." "मी तुझ्यासाठी मरत नव्हते आरव..." ती चाचपडत बोलली. "हो का..? मग ही हातावरची जखम कशासाठी होती?" असे म्हणून हसत होता. नव्याला त्याचा प्रचंड राग आला पण तिने स्वतःच्या भावनांना आवर घातला. स्टेजवर ओपन माईकसाठी सगळे श्रोते होते पण सहभागी सदस्य कमी होते. स्टेजवर सादरीकरण करण्यासाठी निवेदक आवाहन करत होती. पुढचा मागचा कसलाही विचार न करता नव्या स्टेजवर येते. ती बोलायला सुरूवात करणार इतक्यात आरव बोलला, "मिस. नव्या पाठारे तुमचा ओपन माईकचा विषय आहे.. प्रेमभंग...!"
आणि पूर्ण ऑडिटोरिअममध्ये हशा पिकला.
पुढचा मागचा विचार न करता नव्याने बोलायला सुरुवात केली,
" हो...
पडली होती मी प्रेमात..
एका पामराच्या.. तो पामरच होता
म्हणून कदाचित एका फुलावरून दुसरीकडे विसावला...
मी वेडी मात्र त्याला माझ्या भावनांच्या पाकळीचं देठ समजून खुप आनंदी होत होते...
पण तो पामर सोडून गेला मला..
तेव्हा खूप दुःख झाले..
पण आज समजले मला तो त्या प्रेमाच्या लायकीचाच नाही जे मी त्याच्यावर केले..
आणि मी समजावू इच्छिते त्या दुसऱ्या फुलाला..
तो पामर नाही भ्रमरच आहे...
कधी उडून जाईल ठाऊक नाही...
तू तुझा विसावा, तुझं प्रेम तरी टिकणारं आहे ना..
जरा पडताळून घे..."

इतके बघून ती स्टेजवरून खाली आली. आरवकडे बघते तर तो मान खाली घालून बसला होता. त्याची ती नवी मैत्रिण जरा अनभिज्ञ, जरा प्रश्नार्थक नजरेने, आरव आणि नव्याकडे बघत होती. जे मित्र मैत्रिणी तिला तिरस्काराने बघत होते ते तिला इतकी कॉन्फिडन्ट बघून टाळ्या वाजवत होते, पण तिची नजर खिळली त्या डोळ्यात, जे आनंदाने तिच्याकडे बघत होते. सगळ्यात शेवटी उभा राहून तिचा काका कौतुकाने तिला बघत होता. तिने धावतच जाऊन काकाला मिठी मारली आणि बोलली, " चल काका.. पाचशे रुपये काढ. क्लासिकल डान्सच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...मी या वेळी पहिला नंबर काढेल.. आणि ट्राॅफी तुमच्या खोलीत ठेवेन.." "आम्हाला आमची प्रिन्सेस मिळाली. आता आम्हाला काही नको." विभाकर बोलला.
आणि दोघेही मिसळ खाण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेले...

~ऋचा निलिमा