प्रतिस्पर्धा पूर्णा गंधर्व द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रतिस्पर्धा

ससा आणि कासवाची कहाणी ही रूपकात्मक बालकथा सर्वश्रुत आहे. संथ परंतु अविरत परिश्रम केल्याने यशप्राप्ती होते , या तिच्या मुळच्या बोधास धक्का लावण्याचा माझा मानस नाही. परंतु ,या विजोड शर्यतीमधून ,स्पर्धा व परीक्षा या संकल्पनेवर मी भाष्य करणार आहे.

आपल्या क्षमतेहून कमी असणाऱ्या ,संथ कासवाची चपळ सशाने शर्यतीसाठी निवड ही त्याला relax -चिंतामुक्त होण्यासाठी आणि आराम करण्यासाठी प्रवृत्त करते. तुल्यबळ स्पर्धा नसल्याने जिंकूनही त्याच्या प्रतिष्ठेत भर पडली नसती. या व्यतिरिक्त ,अविरत ,अखंड परिश्रम -hard work सोबत, smart work चा काळ आहे.

बाल्यावस्थेपासून स्पर्धा ,परीक्षा आपल्या जीवनाचा भाग होतात . यांना पार न करता आपण पुढे जाऊ शकत नाही , इतक्या त्या अनिवार्य झाल्या आहेत. कधी त्या औपचारिक असतात कधी अनौपचारिक.

व्यक्तिमत्त्व जडणघडण आणि समाजीकरणाच्या प्रक्रियेत समवयस्कांच्या गटाचे (peer group), मोठे योगदान, प्रभाव असतो. सहकार्य , प्रतिस्पर्धा, पोशाख, ध्येय, अभिवृत्ती , अभिरुची, सवयी यावर त्यांचा पगडा दिसून येतो. अनेकदा काही गोष्टींना अंतर्मन विरोध करत असूनही केवळ peer group pressure सम वयस्कांचा दबाव अथवा आकर्षण , ,चढाओढ , अघोषित स्पर्धेत मागे राहण्याची भीती, update राहण्याचा चुकीचा अर्थ यांमुळे त्या सवयी आत्मसात केल्या जातात ,कृत्य केले जाते. ज्याचे तात्काळ वा दूरगामी परिणाम घातक असतात. या अनावश्यक ,अपप्रवृत्ती चे दुष्परिणाम भावी जीवनात अडचणी उभ्या करतात. म्हणून बाल्यावस्थेतच , अनैतिक वर्तन, अपप्रवृत्ती यांचे बहिष्करण ठामपणे करण्याचा आत्मविश्वास त्याचे ठायी रुजवावा. अप सामान्य वर्तन ओळखून उपाय योजना करावी. निकोप व पोषक स्पर्धा ,चढाओढ टाळणे, योग्य प्रतिस्पर्धी यांचे आदर्श पालकांनीच घालावेत. त्यांच्या अनुकरण प्रिय वृत्तीचे भान ठेवून , पती - पत्नी ,सासू -सून- जावई कलह, भाऊबंदकी, शेजारील भांडणे, नातेवाईकांमधील हेवेदावे मुलांसमोर टाळावेत.

स्पर्धा ,परीक्षा ही प्रगतीसाठी ,स्व - मूल्यमापनासाठी ,शिकण्यासाठी असते. दुसऱ्याला हरविण्यासाठी ,चिडविण्यासाठी, श्रेष्ठत्त्व सिद्ध करणयासाठी नाही. केवळ त्यातून मिळणारी शिकवण ही पुढील वाटचालीसाठी प्रबलन ,प्रोत्साहन देणारी असावी. त्याचे चांगले ,वाईट परिणाम , प्राप्ती दीर्घकाळ स्मरणात ठेवणे योग्य नाही . आई वडील, समाजकडून त्या अनुषंगाने मिळण्यारी शिक्षा ,अवहेलना यांमुळे मूल भित्रे किंवा आक्रमक ,उद्धट बनते. अथवा जिंकल्यावर मिळण्याऱ्या प्रशंसा, बक्षीस ,यश याची चटक लागते, प्रलोभनांची आवड निर्माण होते, मूल प्रत्येक ठिकाणी स्पर्धा पाहते.

पालकांनी आणि स्वतः स्पर्धकांनी या स्पर्धा , परीक्षांना आणि त्यांच्या परिणामांना स्थायी वा अंतिम उपलब्धी मानू नये. कोणतीही स्पर्धा ,परीक्षा ही शेवटची संधी असू शकत नाही. सर्वच स्पर्धा व्यक्तीचे कार्यमान दृष्य व प्रगट करू शकत नाहीत. अंगी असणाऱ्या विविधांगी कार्यक्षमता, ज्ञान ,कला कौशल्ये याना वाव देणारी सर्व समावेशक स्पर्धा/परीक्षा नसू शकते, म्हणून इतरही विकल्प अवलंबवावेत.

आपल्या ज्ञान ,कलेला वाव व न्याय मिळेल अशी स्पर्धा आणि असा स्पर्धक आणि मूल्य मापक निवडणे किंवा मिळणे आवश्यक अन्यथा याच्या अभावी अपयशासोबत निराशा ,नुकसान आणि लोकनिंदा पदरी पडते. याशिवाय ,नेहमी अग्रगणी ,प्रथम राहणे आवश्यक नाही. अपयश, नकार पचविणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे. अतिलोभ ,महत्वकांक्षा ही जीवघेणी व इतरांसाठी घातक ठरते. व्यक्ती गत प्राप्तीची ,सर्वोत्तम बनण्याची ,सर्वोच्च स्थानी जाण्याची इर्षा सत्ता प्राप्ती ,अधिकार यांद्वारे समाज व्यापी झाली तर त्याचे भीषण परिणाम काय होतात यंपासून जग अनभिज्ञ नाही.

समतुल्य /तुल्यबळ असणारा प्रतिस्पर्धी, निकोप स्पर्धा नसेल,कार्यक्षमतेहून मोठी स्पर्धा, ध्येय तर जिकण्यासाठी वा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अवैध मार्ग निवडण्याची भीती असते. जिंकूनही अपल्याठायी असणारा विवेक आणि नीतिमत्ता हरते . आणि असे विजय , उपलब्धी ,प्राप्त स्थान दीर्घ काळ टिकत नाही हे वास्तव आहे.

निकोप स्पर्धा आणि स्पर्धकाचा आणि सुयश प्राप्तीचा वाचकांना जलद लाभ व्हावा ,अशी प्रार्थना करून मी संथमती पूर्णा हा लेख पूर्णत्वास नेते.

© पूर्णा गंधर्व