प्रश्नचिन्ह Shivani Vakil द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रश्नचिन्ह


✍️©सौ. शिवानी श्री वकील©

सूर्य उगवला की आन्हीकं आवरुन बबई न बांधलेला भाकर तुकडा घेऊन पडीक जमिनीवर नांगरायला जायचा कुशाबाचा दिनक्रम काही महिन्यांपासून सुरु होता.

तसं म्हटलं तर चांगले चार भाऊ, दोन बहिणी यांचे संसार, जमिन जुमला भरपुर, पण व्यवहार कधीच कुशाबाला कळला नाही. त्यामुळे भावंड त्याला वेडाच समजत. लिहीता वाचताही कितपत येत होतं हेही त्याचं त्यालाच माहीत, त्यामुळे नंतर ही जबाबदारी आपल्यावर नको म्हणून भावंड त्याच्यापासून दूर रहात.

आई-बाप होते तोवर त्याच वरकाम करुन निभावलं, पण त्यांच्या पश्चात भावंडांनी वाटण्या करुन चांगली बागायती जमिन स्वतःला घेतली. ह्याला दिला एक पडिक जमिनीचा तुकडा कसायला.......असं का केलत म्हणुन तो कधीही भावंडांशी भांडायला गेला नाही.

घराची वाटणी वडीलांनी असतानाच करुन दिलेली त्यामुळे हक्काचे तिन खोल्यांच छप्पर तरी त्याच्या डोक्यावर होतं.

त्याची बबईही अगदी साधी. मनलाऊन संसार करणारी जे आहे त्यात निभावणारी, त्याला दोन मुलेच. एक दहावीत आणि एक सातवीत.

बबई नणंदा-जावांशी प्रेमाने वागे. पण त्या हिला बावळट समजत. त्यांच्या दागिन्यांच्या तोऱ्यात त्यांना ही नेहमीच साधी वाटे. त्या तिच्यासमोर खुप भाव खात. तीच्या सर्व गोष्टी वरपासून खालपर्यंत न्याहाळून बघत. पण तिच्याशी काही बोलत नसतं.

बबईला संसाराची, मुलांची काळजी होती. कुशाबा कधी थोडेथोडके पैसे देत असे ते ती जपुन ठेवी. काळजीपूर्वक खर्च करीत असे. हिशोब तीला व्यवस्थीत कळत असे त्यामुळे सर्व नीट चालले होते. दोघं मुलही परीस्थितीमुळे शहाणी झाली होती. कुशाबाच्या साध्या स्वभावामुळे मोठा मुलगा घरात लक्ष घालत असे. आपल्याला कोणी फसवू नये हीच त्यामागची भावना होती.

चांगलं म्हणायला कुशाबाला कोणतही व्यसन नव्हतं आणि कोणतेही छंदही. बबई आणि मुलांबरोबर तो खुष असे.

कुशाबाच्या वडीलांना मात्र ते असताना त्याची काळजी वाटे. ते आजारी असताना तोच त्यांची जास्त सेवा करीत असे. हे ते जाणून होते. त्याला एकटा असताना नेहेमी ते विचारत.....

" आरं कुशा, माह्या माघारी तुज कसं होणार रं, ही भावंड काय कामाची नाहीती. आपलं आपलं वाटं घेऊनशान पळतील. तुह्या माथी पडीक जिमिन मारणार हे नकीच ! "

आवं आबा, नका फिकीर करु, व्हईल तसं व्हईल. तो म्हणत असे व वेळ निभावून नेत असे.

वडील गेल्यानंतर ते म्हणाले होते तसंच झालं. दिवसभर पडीक जमिनीवर राबायचं. हाताशी माणसं नाही. नांगरायला बैल नाही. पहिले पाण्याची सोय बघायला हवी त्यासाठीच तो जमिन खणत होता.

आज मात्र आश्चर्य झालं. खणता खणता टण्ण् कीनी आवाज आला तसं त्यानं भराभर माती उकरुन पाहिलं तर एक हंडा हाताला लागला. तसंतर त्या जमीनीवर त्यांच्या शिवाय कोणीच येत नसे. त्यांच घरही तिथुन जवळच होतं. धावत जाऊन त्याने बबईला बोलावलं. त्यांनी दोघांनी तो हंडा काढला. घरी नेला. तो वरुन बंद होता.

कुशाबाने व त्याच्या मोठ्या मुलाने तो उघडला त्यात भरपूर पैसे भरलेले तर होतेच पण एक चिठ्ठीही होती.

कुशाबाचा मुलगा वाचू लागला.

बेटा कुशा,

तु आणि बबईने माजी लई सेवा केली. पण जीतेपणी मी ईच्छा असुनही तुका काही देऊ शकलो न्हाही. तुजा साधा सरळ स्वभावामुळे लोक तुजा गैरफायदा घेतात. पण माझ्या पश्चात तुजा कुटुंबाची गैरसोय होऊ नये म्हणून मी तुम्हा चौघांसाठी चार हंडे पडिक जिमीनीत ठेवले हाईत. ते फक्त आणि फक्त तुमचाच साठी हायेत. हे कोणालाच कळता कामा नयेत.
माह्या नातवंडांनी मोप शिकावं व आपलं नावं करावं यासाठी या पैशाचा तुम्हाला ऊपयोग होईलच.

काळजीपूर्वक पैसा वापरा व खुप मोठ्ठ व्हा.

माह्या तुम्हा सर्वांना आशिर्वाद.

तुमचा
आबा

मुलगा पत्र वाचत असताना कुशाबाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. बापाच काळीज काय असतं हे आत्ता त्याला समजल होतं. बबईनं त्याची समजुत घातली.

बबईनं काळजीपुर्वक सर्व पैसे जपुन ठेवले. त्यातुन घरातली काही काम करवून घेतली. शेतीची औजारं, बैलजोडी, ऊपयोगी सामग्री विकत घेतली.

काही मजुर लावून खणल्यावर नशिबाने पाणीही लागलं, सुरुवातीला त्यांनी फुलझाडं लावली बघता बघता नापीक जमिन फुलांनी फुलून गेली. दोघेही शेतात राबत असतं. मुलेही जशी जमेल तशी मदत करत.

तालुक्याच्या गावी फुलांना चांगली किंमत मिळे. त्यामुळे बघता बघता कुशाबा चांगलाच श्रीमंत झाला. मुलही चांगली शिकली सवरली.

त्याची बदललेली परीस्थिती बघुन भावंडही त्याच्याशी तोंडावर गोड वागू लागली.

एवढा छळ करुन पडिक जमीन वाट्याला देऊनही हा एवढा समृद्ध कसा याचं प्रश्नचिन्ह मात्र त्यांना कधीच सुटलं नाही.

✍️©सौ. शिवानी श्री वकील©
----------------------