ॲ लि बी (प्रकरण ७) Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ॲ लि बी (प्रकरण ७)

अॅलिबी

भाग ७.

ऑफिस मधे सौम्या त्याची वाटच बघत होती. “ कशी झाली मिटींग?” तिने पाणिनी आत येताच विचारले.

“ त्या ब्रोकर ना मी चांगलंच काळजीत टाकलंय. आता तेच इन्स्पे.होळकर वर दबाव टाकतील टोपे च्या मृत्युची पूर्ण चौकशी करायला. आणि त्वरित करायला.”-पाणिनी

“ मस्त झालं. बर कनक चा फोन येऊन गेला, तुम्हाला फोन करायला सांगितलाय त्याने. लाऊन देऊ का?”

“ हो, दे जोडून.”

“ पाणिनी, तू मला एक काम दिले होतेस. तुझ्या जाहिरातीला उत्तर द्यायला वर्तमान पत्राच्या ऑफिस मधे एक मुलगी गेली होती. तिथे एक पाकीट देऊन पुढे एका ब्युटी पार्लर मधे गेली आहे. माझा हेर तिच्या मागावर तिथेच बाहेर थांबलाय. तुला तिच्याशी बोलायचं असेल तर आपल्या हातात बऱ्यापैकी वेळ आहे कारण ती अत्ताच गेल्ये पार्लर मधे, माझी गाडी खालीच आहे आपण लगेच निघू शकतो.” ओजस ने फोन वरून सांगितले.

“ सौम्या मी कनक बरोबर जातोय बाहेर, एका मुलीला भेटायला.”

“ त्या नोटेचा तुकडा तिच्या कडे असेल असा तुमचा अंदाज आहे की काय?” –सौम्या

“ ही मुलगी गेयता बाब्रस असेल तर तासाभरात कळेलच .”

पुढच्या काही मिनिटातच पाणिनी ओजस च्या गाडीत बसला होता. ,” पाणिनी, मला एक सांग, तू तिला जेव्हा बघशील तेव्हा ओळखशील का?”

“ मला भीती वाटत्ये की ओळखीन “

“ भीती वाटत्ये? कोण असणार आहे ती ?”

“ माझी अशील.”

“ तुला तुझे स्वतःचे अशील माहीत नाहीत की काय नावाने?”

“ माझी अशिलांची संख्या मोठी आहे.”

“ तुझ्या स्वत:च्याच अशीलावर नजर ठेवायला मला का नेमलं आहेस तू ,पाणिनी?”

“ तुला धंदा मिळावा म्हणून., तुला मी नेहेमी अवघडच कामे देतो, म्हणून म्हंटल की येळी जरा सोपे काम देऊन पाहू.”

बोलता बोलता ते पार्लर जवळ आले .” तिच वर्णन व्यवस्थित आहे ना तुझ्याकडे?”

“माझ्या माणसाने जे दिलय ते आहे.अठठावीस च्या आसपास वय,एकदम देखणी, गडद डोळे,”

“ माझ्या मनातल्या तरुणीचे डोळे असेच आहेत.”

त्यांची गाडी ओजस च्या हेराच्या गाडी जवळ आल्यावर हेराने त्यांच्या गाडीला जागा दिली.

“ तुला बोलायचय का त्याच्याशी? “ -ओजस

“ हो बोलायचं आहे.”

दोघे खाली उतरून ओजस च्या हेरा जवळ गेले.” तू तिचा पाठलाग पेपर वाल्यांच्या ऑफिस पासून केलंस?” –पाणिनी

“ हो जवळच आहे , इथून ते.”

“ तू गाडीतच बसून रहा, ती बाहेर आली की मी तिचा पाठलाग करीन, तिने मला गुंगारा द्यायचा प्रयत्न केला तर,तू पाठलाग चालू ठवू शकशील.”

हेर स्वत;च्या गाडीत बसून नजर ठेऊ लागला तर पाणिनी आणि ओजस , त्यांच्या गाडीत बसले.

“ टोपे च्या मृत्यू च्या वेळे बद्दल तुझा काय अंदाज आहे पाणिनी?”

“ त्या आधी इन्स्पे.होळकर चा अंदाज सांगतो. त्याच्या पहिल्या अंदाज प्रमाणे,त्याला बंगल्यातच मारण्यात आलंय आणि दुसऱ्या अंदाजानुसार,त्याला गाडीत मारलं गेलं आणि मग त्याचं प्रेत बंगल्यात आणल गेलं.”

“तुझा अंदाज काय?” –ओजस

“ त्याला गाडीत मारण्यात आलं पण स्वतःच्या प्रयत्नाने तो कसाबसा कोणाचीतरी मदत घेऊन तो बंगल्यात आला असावा.ज्या क्षणी तो अंथरुणावर आडवा पडला तेव्हा लगेचच तो गेला असावा. मला त्याच्या बुटा बद्दल उत्सुकता आहे. त्याच्या पायात बूट नव्हते, तो मेला तेव्हा.”

“ अरे, अंथरुणावर झोपताना कोणी बूट घालून झोपते का?” –ओजस

“ मरायला टेकलेला माणूस आडवा झोपताना बूट काढत बसणार नाही .त्याच्या मदतीला कोणी आले असेल बरोबर तरी त्याला झोपवल्यावर बूट काढायचे सुचणार नाही त्याला. अपवाद फक्त त्याच्या बरोबर आलेली व्यक्ती ही स्त्री असेल तर.”

“पण कोणी त्याच्या पायातले बूट का काढेल?” -ओजस

“ डॉक्टर म्हणतात की टोपे मंगळवारी सकाळी दहा नंतर नक्कीच जीवंत नव्हता. याचा अर्थ तो मंगळवारी सकाळी दहा च्या आधी कधीही गेलेला असू शकतो.”

“ त्या खोलीत गॅस हिटर चालू होता आणि खिडक्या बंद होत्या.” पाणिनी पुढे सांगू लागला.

“ प्रेत लौकर गार पडू नये आणि मृत्यूची वेळ ठरवण्यात पोलिसांचा गोंधळ व्हावा हा त्या मागचा हेतू असेल असे मला वाटत नाही. थंड पडलेली खोली गरम व्हावी म्हणून हिटर लावला असावा. खोली गार कधी पडते तर रात्री . म्हणजे जी कोणी व्यक्ती त्याच्या बरोबर आली ती रात्री आली होती.”

“ मंगळवारी रात्री?” ओजस

“ नाही , सोमवारची रात्र.”

“ ते अशक्य आहे.” –ओजस

“ टोपे आत आला तेव्हा जीवंत होता, फरशी वर पडलेले रक्ताचे डाग ते सिध्द करतात.अंथरुणावर पडलेले डाग दाखवतात ही खूप मोठा रक्त स्त्राव झाला होता.”

“ अरे पण पाणिनी, तू त्याच्याशी मंगळवारी बोलला होतास फोन वर.” –ओजस

“ मला काय कळायला मार्ग होता की मी टोपे शी बोललो म्हणून? सेक्रेटरी म्हणाला मी टोपे ला जोडून देतो आणि मी तो टोपे च आहे असे समजून बोललो.”

“म्हणजे ! सेक्रेटरी खोटे बोलत होता की काय?” -ओजस

“सेक्रेटरी नक्कीच खोटे बोलत असला पाहिजे , याला साधे तर्क शास्त्र लावायचा प्रयत्न कर. टोपे ला घरात आणले गेले तेव्हा तो जीवंत होता असे समजण्यात आपला फायदा आहे.तो प्रचंड जखमी झाला होता हे नक्की.त्याला अंथरुणावर ठेवण्यात आल्या नंतर तो थोड्या वेळातच गेला.ज्या कोणी त्याला घरात आणले जखमी अवस्थेत,आणि अंथरुणावर निजवले,त्यानेच खोलीत उष्णता यावी म्हणून गॅस हिटर चालू केला, तीच व्यक्ती बाथरूम मधे टॉवेल आणायला गेली, रक्ताचा प्रवाह पुसण्यासाठी म्हणून.किंवा कदाचित डॉक्टर ला बोलावण्यासाठी म्हणून फोन करायला धावली असावी, त्याचं वेळी टोपे गेला असावा. मग ती व्यक्ती घाबरून गेली असावी आणि तिने पळून जायचा निर्णय घेतला असावा. त्या व्यक्तीने विचार केला असावा की प्रेत सापडायला बरंच वेळ लागेल परंतू सापडल्यावर सुध्दा मृत्यूची वेळ नक्की करणे अवघडच जाईल. म्हणूनच त्याचे बूट पायातून काढले गेले असावेत.” –पाणिनी

“ का ?”

“ लक्षात नाही आलं तुझ्या? मृत्यूची वेळ ठरवण्य साठी ते बूट फार महत्वाचा पुरावा होते.”

“ कसे काय? “

“ टोपे गेल्या नंतर बूट काढण्यात आले. आणि ज्या व्यक्तीने ते काढले ती स्त्री होती.”

“ त्याच्याशी बुटांचा काय संबंध पाणिनी ?” –ओजस

“ बुटाला थोडासा चिखल लागला होता. फार नाही पण बाहेर पाऊस पडून गेल्यावर आणि चिखल झाल्यावर ज्या प्रमाणे पातळ थर बसेल तसा. प्रेताच्या अंगाखाली पलंगपोस नव्हता, म्हणजे तो ओढून बाहेर काढला होता कारण त्यावरही बुटाच्या चिखलाचे आणि अंगातल्या ओल्या कोट मुळे पडलेले डाग होते. कोणीतरी ते बूट काढले,कोट काढला, पलंगपोस ही अंगा खालून ओढून काढला. मोठंच बोचकं झालं असेल ते. त्या पैकी कोट, टोपे च्या गाडी मधे मागील भागात खाली टाकून दिला गेला.नंतर टोपे ची गाडी अशा ठिकाणी लावण्यात आली की पोलिसांना ती दुसऱ्या दिवशी सापडावी. पण त्या आधी सापडू नये. “

“ कनक, आणि आता आपण सर्वात मोठया पुराव्याकडे वळतोय, उंबरठ्याच्या पलीकडे एक दोन इंचावर रक्ताचे डाग पडायचे थांबले होते. सोमवारी रात्री मरणाचा पाऊस पडत होता. त्यामुळे ते डाग पुसले गेले कारण बाहेर च्या बाजूला सिमेंटचा रस्ता आहे. काही डाग टिकून राहिले कारण दर बाहेर वरील बाजूस जे छोटे छत बाहेर आलंय त्या मुळे त्या खाली तुलनेने पाऊस पडला नाही. या सर्वातून खून सोमवारी रात्रीच झाला या गोष्टीला पुष्टी मिळते.”

“ एकदम मान्य आहे पाणिनी. जिंकलास तू ! मानल की टोपे सोमवारी रात्रीच मारला गेला. आता पुढे काय? त्या सेक्रेटरी ला गाठून त्याच्या कडून कबुली जबाब घ्यायची कल्पना कशी वाटते?“

“ माझी नेमकी भूमिका काय आहे आणि मी या सर्वात कुठे बसतो हे मला कळलं असतं तर सेक्रेटरी ला भेटणे ही अत्यंत तर्क शुद्ध गोष्ट ठरली असती.”

“म्हणायचय तरी काय तुला?”

“ मला माझं अशील कोण हेच अजून सांगता येत नाहीये. म्हणजे एका स्त्री ला संरक्षण द्यायचं आहे या कारणास्तव मला वकील म्हणून नेमल गेलं., मला तिच नाव पण अजून माहीत नाहीये. आता मला वाटायला लागलंय की टोपे च्या खुनाचा आरोप तिच्यावर येणार आहे म्हणून तिचा बचाव करण्यासाठी मला नेमलं गेलंय”-पाणिनी

“ तुला नेमताना हे कारण सांगितलं गेलं नव्हत?”

“ नाही ना. तेच तर सांगतोय.” अस म्हणून पाणिनी ने त्याला त्या रात्री फोन आल्या पासून ते त्या बुरखाधारी स्त्री ला घेऊन पळशीकरआला ही सर्व हकीगत सांगितली.

“ कनक, हे सर्व घडलं ते सोमवारी रात्री , टोपे चा खून मंगळवारी झाला असे प्रथम दर्शनी जरी वाटले , तरी मी मगाशी सांगितलेल्या तर्का नुसार तो सोमवार च्याच रात्री झालाय आणि त्याच रात्री, मध्यरात्री १२ नंतर मला काम देण्यात आलं ! म्हणजे खून सोमवारी रात्री बारा च्या आधीच झाला असला पाहिजे.! “ –पाणिनी

“ आता तू जर म्हणतो आहेस हे सर्व आणि तुझी अशील स्त्री आहे तर त्या सेक्रेटरी ला भेटून त्याच्या कडून कबुली जबाब का नाही घेत तू? -ओजस

“” कारण मला वाटत की त्याने खून केला असावा.”

“ अरे असं काय करतोस पाणिनी? तो जर टोपे ऑफिसात असल्याचे धादांत खोट बोलतोय आणि त्याच्या आवाजात तुझ्याशी टोपे आहोत असे भासून बोलतोय,.....”

“ त्यातून फार काही सिध्द नाही होणार. तो अस म्हणू शकतो की टोपे ऑफिस मधेच होता पण दुसऱ्या महत्वाच्या कामात होता,त्यानेच मला सांगितलं होत की कोणाचा फोन आला तरी तूच बोल माझ्या नावाने आणि त्याची बोळवण कर.हे ऐकल्यावर पोलिसांना ते पटेल आणि ते सरळ त्याला सोडून माझ्या अशिलाला पकडतील खुनी म्हणून. खून करण्यासाठी मी त्यावेळी तिथे नव्हतेच असे सिध्द करण्याची संधी माझे अशील गमावून बसेल.”

“तिच्या कडे तशी संधी आहे असे का वाटतंय तुला?”

“ पलंगपोस आणि बूट काढून घेतले जाण्याचे एकमेव कारण होत की टोपे जेव्हा घरात आला तेव्हा पाऊस पडत होता ही वस्तुस्थिती दडवणे.याचा अर्थ असा की त्या व्यक्तीला हे माहीत होत की टोपे त्या ठिकाणी आहे याचा विचार सुध्दा कोणी करणार नाही. याचा असाही अर्थ निघतो की या व्यक्तीला हे ही माहीत असावं की टोपे ची बायको बाहेरगावी आहे आणि ती पुढचे काही दिवस परत यायची शक्यता नाही. म्हणजेच तर्काने विचार केला तर असे दिसते की ही व्यक्ती सोमवारी रात्री माझ्या ऑफिस मधून बाहेर पडल्या नंतर स्वतः ची अनुपस्थिती म्हणजे आपण खुनाच्या दिवशी इथे नसल्याचे दाखवणे,ही गोष्ट सिध्द करण्याच्या प्रयत्नाला लागली........अरे आपल्याला हवी असलेली तरुणी बाहेर पडत्ये पार्लर मधून.”

दोघांनी पण तिच्या कडे पाहिले. साक्षात रती म्हणता येईल अशी तरुणी होती ती. “ मला कोणी अनोळखी स्त्री दिसेल अशी अपेक्षाच नव्हती. मी पैजेवर सांगतो हिला मी आधी बघितल आहे.” पाणिनी म्हणाला.

“ आपल्याला हव्ये तीच आहे ही. माझ्या माणसाने गाडीतून मला इशारा केलाय अत्ता.

“ ती काय करत्ये अत्ता मला सांग कनक, मी तिच्याकडे बघत नाहीये कारण ती मला ओळखेल.” –पाणिनी

“ बाहेर पडत्ये, एक नजर माझ्या हेराच्या गाडीकडे टाकली , आपल्याला बघितलेलं नाहीये तिने. मी जाऊ का आता?”

“ जा, त्या सेक्रेटरी मंदार ची सर्व माहिती काढ.त्याचं आणि वेस्टर्न माईन च्या बोरगीकर चा एकमेकांशी काही संधान आहे का शोधून काढ.”

एवड्या सूचना देई पर्यंत ती लगबगीने बाहेर पडली होती. कुठेतरी निश्चित पणे जायचे ठरवून चालल्या सारखी वाटत होती.एका औषधाच्या दुकानात शिरून बरंच वेळ फोन करण्यात घालवला.फोन चे पैसे देऊन बाहेर पडणार तेव्हा पाणिनी पटवर्धन त्याचं दुकानात ब्रश खरेदी करत होता. ती त्याच्या कडे न बघता बाहेर पडून रस्त्यावर आली तेव्हा ओजस चा हेर गाडी तून तिच्यावर नजर ठेवत होता त्याच्याकडे एक ओझरता कटाक्ष टाकून ती पुढे गेली. आता ती जरा आरामात आणि निवांत चालत होती. दोन वेळा तिने बाजूच्या एका डिपार्टमेंटल स्टोअर कडे नजर टाकली. एका काळ्या रंगाच्या पोशाखा ने तिला आकर्षित केल्याचे दिसत होते. तो बघत बघत ती पुढे गेली आणि अचानक परत फिरून तो पोषाख बघायला परत आली त्याचं वेळी पाणिनी आणि ती अचानक समोर समोर आले.पण तिची नजर फक्त पोशाखावरच होती.

ती आत जाईल या अपेक्षेने पाणिनी पटवर्धन स्टोअर च्या दारात उभा राहिला तेवढ्यात ती बाहेरच्या गर्दीत मिसळली, पाणिनी पुन्हा तिच्या मागे रस्त्यावर आला आणि अचानक ती थांबली.पाणिनी पुढे दोनच पर्याय होते आपणही थांबायचे किंवा तिच्याकडे न बघता पुढे सरकायचे. त्याने दुसरा पर्याय निवडला. तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज आला ,” मला काही सांगू इच्छिता का पटवर्धन? “

पाणिनी ने तिच्या काळ्याभोर डोळ्यात बघत म्हंटले, “ मला नाही वाटत मी ओळखतो तुम्हाला.”

तिच्या डोळ्यात मिश्कील भाव होते. “ पटवर्धन, का माझा पाठलाग करताय?”

“ सौंदर्या चा शोध घेण्यासाठी”

“ मग तुम्हाला जर माझ्या बरोबर यायचे असेल तर मागे मागे का फिरताय माझ्या?”

असे म्हणून तिने पाणिनीच्या कमरेभोवती हात टाकले.

“ माझा पाठलाग करणाऱ्या दोन गाड्या तुम्हालाही दिसल्या असतील ना?”

“ दोन गाड्या ? “

“ हो, त्यातल्या एका बद्दल मला खात्री आहे आणि दुसऱ्या बद्दल मला शक्यता वाटत्ये.”

“ तुम्ही फार लोकप्रिय दिसता ! “

“ सकृत दर्शनी आहे मी “

“ मला खरंच आठवत नाही तुम्हाला भेटल्याचे.”

ती मनापासून हसली.” अहो तुमचे फोटो मी कित्येक वेळा पेपरात पाहिले आहेत.तुम्ही एखाद्या सेलिब्रेटी पेक्षाही लोकप्रिय आहात पटवर्धन”

त्याच्या देहयष्टीकडे तिने निरखून पाहिले. पटवर्धन, तुमच्याकडून माझी उलट तपासणी घेण्याची वेळ कधीच येऊ नये अशी इच्छा आहे माझी.”

“ मलाही तशी वेळ आलेली आवडणार नाही , तुम्ही काय किंवा कोणीही, जो प्रश्नांची उत्तरे टाळतो तो साक्षीदार म्हणून वाईटच असतो.” –पाणिनी.

“ मी कोणते प्रश्न टाळले तुमचे?”

“तुम्ही अजून तुमचे नाव सांगितले नाही.”

“ मी नाही सांगितले खरंच ! आणि मी सांगेन की नाही हे पण माझे नक्की नाही. फारच हुशार हेर आहेत नाहीत ते? त्यातला एक मी जिथे गेले होते तिथे दाराजवळ होता, दुसरा या चौकात घिरट्या मारतोय. हा पहा आलाच तो इकडे. त्याला गुंगारा द्यायचा की फिरवत बसायचं?

”सापडून देऊ त्याला. त्यांना रोज च्या रोज पैसे दिले जातात. मला वाटत मी यात तुझ्या बरोबर असल्याने काही कटकटी नाहीना निर्माण होणार?” –पाणिनी

“ कशाला होतील कटकटी?”

“ तुला माहीत नाहीये ही ते कोणासाठी काम करताहेत आणि त्यांना माहीत नाही की मी तुझ्या मागे का आहे ! ते त्यांच्या मालकाला अशा प्रकारचा अहवाल पाठवतील माहित्ये? : ब्युटी पार्लर मधून आपली व्यक्ती बाहेर पडल्यावर पाणिनी पटवर्धन ने पाठलाग केला नंतर ते दोघे एकमेकांच्या कंबरे भोवती हात टाकून निघून गेले.”

“ अशा प्रकारचा अहवाल सादर झाला तर कटकटीचे ठरेल.”

“ पण हेर नेहेमी अशाच पद्धतीने त्यांचा अहवाल देतात”

“ तुम्ही माझा ब्युटी पार्लर पासून पाठलाग करत होतात पण औषधाच्या दुकानात येई पर्यंत मला ते जाणवले नाही.तुम्हाला काय हवय ?”

“ तू कोण आहेस ते हवाय”

“ समजा मी नाही सांगितलं तर?’

“ मला पूर्ण अर्धा तास घालवावा लागेल ते शोधून काढायला.”

“ वेडे पण करू नका पटवर्धन, तुम्हाला गुंगारा द्यायला माझ्याकडे अनेक मार्ग आहेत.”

“ लेडीज रूम मधे जाऊन गुंगारा द्यायची कल्पना का?”

“ नक्कीच नाही, तुम्ही त्या युक्तीला बळी पडणाऱ्यातले नाही हे मला माहीत आहे.”

“ मग मला खिलाडू वृत्तीने सांगून का नाही टाकत?” –पाणिनी

“ अजून ते तुम्हाला सांगण्या साठी माझी तयारी झाली नाहीये. मला एकटीलाच रहायचय ,आपण हस्तांदोलन करू आणि अलग होवू मी इथेच थांबते आणि तुम्ही एक दोन चौक पुढे गेल्यावर मी मला जे खरेदी करायचं आहे ते करीन.”

पाणिनी ने मानेने नकार दिला. “ तुला शोधायचे एवढे कष्ट घेतल्यानंतर तुला सहज जाऊ देणार नाही मी.”

“ म्हणजे ते हेर तुमचे होते.?” पाणिनी ने काही उत्तर दिले नाही.

“ ठीक आहे तुम्ही हे स्वतः हूनच ओढवून घेतले आहे.” ती म्हणाली.”

“आपण आपल्यात आता युद्धच पुकारायचे का” –पाणिनी

“ हो, तुम्ही जर परतणार नसाल तर.”

“ मला चार ,पाच प्रश्नांची उत्तरे दे, मग मी तह करतो.”-पाणिनी

“ नाही”

“ ठीक आहे मग युद्ध अटळ आहे मग ! “ –पाणिनी

त्यांच्या बोलण्यात कटुता होती पण वरकरणी पाहणाऱ्याला ते एखादे जोडपे प्रेमाच्या गोष्टी करत फुटपाथ वरून चालत असल्या सारखे वाटत होते.अगदी जवळून बघणाऱ्यालाच पाणिनी पटवर्धन च्या चेहेऱ्या वरचे ठाम भाव आणि त्या मुलीच्या मनातील नैराश्य जाणवले असते. रस्त्यावरच वाहतुकीचा दिवा बदलला. तिथला चालणाऱ्या माणसांकडे नजर ठेवत पोलीस त्याच्या साठी उभारलेल्या राहुटीत गेला. तिथून कोणतेही वाहन डाव्या बाजुला बंदी असलेल्या रस्त्याला वळत नाहीना या कडे लक्ष ठेवत होता. तेवढ्यात पाणिनीला ढकलून देत , त्या पोलिसाचे लक्ष वेधून घेत ती ओरडली,” हा माणूस मला त्रास देतोय.”

पोलिसाचे त्यांच्या कडे लक्ष जायच्या आत पाणिनी ने विजेच्या चपळाईने तिच्या हातातील पर्स खेचून घेतली.अतीव क्रोधाने तिने त्याच्या कडे पाहिले.

” मी तुमची पर्स तुम्हाला परत करत होतो. “ पाणिनी पटवर्धन उत्तरला.

पोलीस त्यांचा आवाज ऐकताच खाली उतरला “ ए ! काय चाललंय इथे ?”

“ या माणसाने माझी पर्स....’’ तिने बोलायचा प्रयत्न केला.

“एका तरुणीची पर्स केमिस्ट च्या दुकानात काउन्टर वर विसरली होती. मला वाटतंय की ती तिची आहे पण जो पर्यंत ती ओळख पटवत नाही तो पर्यंत मी तिला देणार नाही. हे बरोबच आहे की नाही माझे म्हणणे?” पाणिनी भाबडे पणाने म्हणाला. “ ही बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला हवी असेल तर”

तिने पाणिनी पटवर्धन च्या दिशेने तिरसट ल्या सारखी उडी मारून, ती पर्स धरायचा प्रयत्न केला.पण पाणिनी ने आपला खांदा मधे घालून पर्स मधले चामड्याचे एक पाकीट बाहेर ओढले आणि त्यातल्या ड्रायव्हिंग लायसेन्स वर ओझरती नजर टाकली. आणि पोलिसाला म्हणाला, “ हे बघून घ्या तिचे ड्रायव्हिंग लायसेन्स. त्यावर तिचा पत्ता आणि नाव आहे. तिने मला फक्त तिचे नाव सांगावे ,मी तिची पर्स तिला परत करीन.”

अचानक तिच्या डोळ्यातून रागाने आणि असहाय्यते मुळे अश्रू वाहू लागले.

पोलीस पाणिनी ला म्हणाला, “ ए बाबा, तुझं वागणं मला वेगळंच वाटतंय.”

“यात वेगळे पण काय मला नाही कळला.” पाणिनी म्हणाला.” मी माझी ओळख करून देतो , मी या शहरातला, फौजदारी वकील आहे. पाणिनी पटवर्धन , माझं नाव आहे.”

“ अरे हो खरंच की , मी तुम्हाला अत्ता नीट पाहिलं तेव्हा ओळखलं. मी कोर्टात तुम्हाला पाहतो कधीतरी पण पेपरात मात्र कित्येक वेळा तुमचे फोटो आणि माहिती वाचल्ये.” नंतर त्या तरुणी कडे वळून म्हणाला, ” माझ्या भूमिकेतून विचार करा. मला वाटतंय की ही तुमची पर्स आहे पण जो पर्यंत तुम्ही ओळख पटवत नाही तो पर्यंत मी तुम्हाला देऊ शकत नाही.”

“ ठीक आहे “ ती हताश होऊन म्हणाली.” माझे नाव आदिती हुबळीकर आहे आणि त्या ड्रायव्हिंग लायसेन्स वर माझ्या बोटाचा ठसा ही आहे.”

“ बरोबर आहे मिस हुबळीकर, माझं समाधान झालंय, तुमचीच आहे ही पर्स.” –पाणिनी

हा सगळा प्रकार बघायला आजुबाजूला बघ्यांची गर्दी जमली होती. “ ए पळा सगळे, काय तमाशा बघायला आलाय का?” त्यांना हटवताना पोलीस म्हणाला.

“ मिस हुबळीकर, तुम्ही माझ्या बाजूला येणार आहात का? “ पाणिनीने नाटकी पणाने विचारले.

तिने पापण्यांची फडफड करून अश्रू झटकले. आणि पाणिनी च्या प्रश्नातील गर्भित अर्थ लक्षात घेऊन म्हणाली, ” हो आता येईन मी तुमच्या बाजुला. ”

“ माफ करा पण मला तुमच्या पर्स ची जास्त तपासणी नाही करता आली.” –पाणिनी

“ त्यात काय सापडायला हवं होत ?”

“ त्या नोटेचा तुकडा.”

“ तुम्ही काय आणि कशा बद्दल बोलताय मला काहीच कळत नाहीये.”

“ त्याची चर्चा आपण नंतर करू. तू कोण आहेस याची कल्पना तू मला का देऊ इच्छित नव्हतीस? “

“ बरीच करणे आहेत त्याला.”

‘ मला सांगू शकशील का ती ?’’

“ शकेन पण सांगणार नाही.”

“ माझ्याशी मोकळे पणाने बोलणे तुझ्यासाठी फायद्याचेच आहे असे तुला वाटत नाही का ? “

“ नाही वाटत.’’

“ हॉस्पिटल च्या ट्रस्ट च्या फंडात झालेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी याचा तूच आग्रह धरला होतास ना?” –पाणिनी

“ हो.”

“ टोपे हा गैरव्यवहार करतोय हे तुला कसे समजले ?”

“ मी फक्त चौकशीची मागणी केली, आरोप नाही केले कोणावरच.”

“ माझा प्रश्न तसाच आहे अजून.” -पाणिनी

“ माझं उत्तर ही तेच आहे.”

“ आपण दुसऱ्या बाजूने विचार करू.” पाणिनी म्हणाला.” एका आर्किटेक्ट शी बोलण्यात मी फार उत्सुक आहे.अर्थात उद्याच्या पेपरात माझ्या जाहिरातीला काय उत्तर येणार आहे याची मी वाट पाहू शकतो उद्या पर्यंत, पण तू मला आज सांगितलस की पळशीकरला काय म्हणायचं आहे, तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.”

ती एकदम स्तब्ध झाली.पाणिनी पटवर्धन ने तिच्याकडे पाहिले तेव्हा तिच्या तोंडावरचा रंग उडाल्यासारखा झाला होता.तिचे ओठ थरथरले,डोळ्यात भीती साचली.दोनदा तिने बोलण्याचा निष्फळ प्रयत्न केला शेवटी अर्धवट हुंदका बाहेर पडताना ती उद्गारली, “ अरे देवा ! “

“ एवढे उध्वस्त होण्याची गरज नाही.शांत हो आणि मला सांग ,पळशीकर तुला काय म्हणाला.”

तिने घाबरून त्याचे मनगट एवढया जोरात पकडले की तिची बोटे त्याच्या हातात खोल रुतली.” नाही ! ते मी कधीच कोणाला सांगता कामा नये.माझ्या लक्षात यायला हवं होत की तुम्ही मला सापळ्यात अडकवताय”

पाणिनी ने तिच्या खांद्यावर थोपटल्यासारखे केले.” इथे आसपास रस्त्यावरचे लोक आहेत त्यामुळे आपण जवळच्या हॉटेल मधे बसू.”

तिने त्याला विरोध दर्शवला नाही. दोघे हॉटेलात बसल्यावर वेटर ला कॉफीची ऑर्डर दिली . पाणिनी म्हणाला, ” आता उंच टोलवाटोलवी न करता, सांग मला, माझ्या ऑफिस मधल्या तुझ्या पहिल्या भेटी बद्दल.”

तिने उत्तर टळल तेव्हा त्याने विचारलं “ माझ्या जाहिरातीला पळशीकरने काय उत्तर दिलंय?”

अचानक तिच्या देह बोलीत बदल झालेला त्याला जाणवला, आत्मविश्वासाने हसून ती म्हणाली.”पळशीकर म्हणताहेत की ते तुम्हाला इथून पुढे भेटू शकणार नाहीत. पण ते म्हणताहेत की पटवर्धन खूप चांगल्या प्रकारे हाताळताहेत सर्व ”

“त्याच्याशी बोलल्येस का तू?”

“ असे समजा की मी त्याच्याशी संपर्कात आहे.” –ती म्हणाली

“ फोन वरून ? “ –पाणिनी

“ मला पुन्हा पुन्हा तुमचा प्रश्न टाळायला लागेल ,पटवर्धन.”

“ तुझ्या सोमवार च्या रात्रीची खबरबात काय? कुठे होतीस तू नेमकी? “

“ मी काय करीत होते सोमवारी रात्री , याचा या प्रकरणाशी संबंध नाही.वर्तमान पत्रात आलंय की मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास तुम्ही टोपे शी बोलला आहात. आणि तुम्ही त्या बाब्रस आडनावाच्या मुलीचे वकील म्हणून प्रतिनिधित्व करताय. तुम्हाला त्या बद्दल शुभेच्छा.”

“ तू विषय बदलायचा प्रयत्न करते आहेस.”

“ नाही , बिलकुल नाही.”

“ बाब्रस ला तू ओळखतेस?” –पाणिनी

‘ मी भेटली आहे तिला अधून मधून वेगळ्या वेगळ्या सामाजिक कार्यक्रमात. ती जरा भोचक पण करते , असेल तिचा बाप मोठा म्हणून काय.....”

“ काही वैयक्तिक दुष्मनी?” –पाणिनी

“ हे बघा पटवर्धन, मी आणि कुसुमाकर गिरम खास मित्र आहोत.त्याने कोणाशी लग्न करावं या गोष्टीची मी नाही पर्वा करीत. पण तो तिच्या सापळ्यात अडकला तर त्या गोष्टीचा मी धिक्कार करीन.”

“ आणि तो अडकतोय त्यात?”

“ हे खूप झालं पटवर्धन. मला याची जास्त चर्चा करायची नाहीये. कुसुमाकर ला आपण यातून बाहेर ठेऊ.”

“ हरकत नाही त्याला बाहेर ठेवायला, जर सोमवारी रात्री तू कुठे होतीस हे तू सांगितलस तर.” –पाणिनी

“ तुम्ही मला आणखी जाळ्यात अडकावता आहात नाही का पटवर्धन?”

“ तू त्या ट्रस्ट च्या फंडाची चौकशी ची मागणी केलीस हा काही अंधारात मारलेला तीर नव्हता.तू पळशीकरच्या मागे ठाम राहिलीस.तू त्याच्याशी संपर्क ठेऊन होतीस.त्याच्यावर तुझा गाढ विश्वास होता. मला काय म्हणायचं तुझ्या बरोबर लक्षात येतंय” –पाणिनी

“ काय अर्थ आहे तुमच्या म्हणण्याचा?”

तू तुझ्या तोंडावर अभिनयाचा बुरखा कितीही परिधान केलंस तरी तुझ्या भावना तुला लपवता येत नाहीत.” –पाणिनी

तेवढ्यात वेटर ने त्यांना पेय आणून दिले, आपल्या हाताने ग्लास फिरवत फिरवत ती सावकाश ते पीत बसली, तेवढया काळात पाणिनी चे नजर जेवढी चुकवता येईल तेवढी टाळत होती. “ मला वाटत नाही पटवर्धन मी याच काही उत्तर देऊ शकेन “

पाणिनी पटवर्धन ने चिडून एका घोटात आपले पेय संपवले.” हे बघ माझ्या आईचं पत्र हरवलं हा खेळ आता बास झाला. एक तर अत्ताच्या अत्ता मला उत्तर दे आणि खरं आणि मोकळेपणाने दे. नाहीतर मी उठून निघून जातो मग बस माझ्या मागे फिरत मला शोधत”

“ पण मी का तुमच्या मागे येऊ? उलटी स्थिती आहे, तुम्हीच माझ्या मागे लागला होता.पटवर्धन.”

“ सोडून दे, मी बाहेर जावं का निघून ?” –पाणिनी

“ पटवर्धन तुम्ही खरंच निघून गेलात आणि पुन्हा पुन्हा जाऊ का ? जाऊ का? असे न विचारता दृष्टी आड झालात तर ती माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाची आणि ज्याची मी वाट बघत होते अशी घटना ठरेल ! “

पाणिनी एकदम उठला ,” माझं ऑफिस तुला माहिती आहे.” एवढ बोलून निघून गेला.

प्रकरण-7 समाप्त