चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 4 बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 4

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर ४
४. नवा दोस्त

त्या रात्री चंद्राला निवांत झोप लागली. सकाळी बऱ्याच उशिराने तो उठला. त्याला अगदी ताजेतवाने वाटू लागले. इथे उभे राहून सभोवार बघताना त्याच्या लक्षात आले की हे बेट बरेच मोठे आहे. बेटावर मध्ये मध्ये छोट्या टेकड्याही दिसत होत्या. एक गोष्ट सर्वत्र सारखी होती. झाडांच्या शेंड्याजवळची पाने निळसर होती. चंद्राच्या मनात असा विचार आला की हे निळे बेट तर नसावे ना! तसे असेल तर तो त्या रहस्यमयी बेटावर व त्या संदेश पाठवणाऱ्या अज्ञात माणसाजवळ पोहोचला होता.
- सध्या त्याला तातडीने दोन-तीन गोष्टी कराव्या लागणार होत्या. एक म्हणजे तीर-कमठा तयार करणे, दुसरी गोष्ट म्हणजे होडी किंवा एखादा तराफा तयार करणे. या बेटावरून बाहेर पडताना त्याचा उपयोग होणार होता. दोर सुद्धा तयार करणे गरजेचे होते. होडीसाठी व दगडावर चढण्याउतरण्यासाठी त्याचा उपयोग होणार होता. आणखी एक गोष्ट त्याच्या लक्षात आली, ती म्हणजे ह्या दगडांपासून जवळच एक नदी होती. निश्चितच ही नदी सरळ समुद्राच्या दिशेने जात असणार. शिवाय तिचा प्रवाह संथ वाटत होता.

त्यानंतरचे दोन-तीन दिवस चंद्रा वेलींपासून दोर वळण्याच्या कामाला लागला. सकाळी दोर वळणे व सायंकाळी शिकारीसाठी रानात भटकणे. वाघ्या शिकार करण्यासाठी केव्हाही तयार असायचा. या मधल्या काळात पाण्यासाठी नदीवर येणाऱ्या प्राण्यांचे व पक्ष्यांचे निरीक्षण करायला त्याला मिळाले. पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांच्या वेळाही त्याला माहीत झाल्या होत्या. सकाळी भल्या पहाटे कोल्ह्यांचा कळप सावधगिरीने यायचा, कानोसा घेत पाण्यात उतरायचा. झपाझपा पाणी पिऊन तो कळप रानात गडप व्हायचा. त्यानंतर तरसे यायची... त्यानंतर वाघांची जोडी यायची.... संथपणे सरकत.. बेदरकारपणे पाणी पिऊन.. डरकाळ्या फोडत रानात परतायचे.

सूर्य चांगला वर आल्यावर रानडुकरं यायची. दहा-बारा रानडुकरं पाण्यात उतरून मस्ती करायचे. पण चंद्राचे लक्ष वेधून घेतले ते साळिंदराने. शरीरावर टोकदार काटे घेऊन जगणाऱ्या ह्या प्राण्याला इतर प्राणी घाबरतात. कोणी त्याला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास तो सारे शरीर फुलवतो व झटक्यात अंग हलवतो. त्यामुळे शरीराचे काटे बाणांप्रमाणे वेगाने शत्रूच्या शरीरात घुसतात व अंगात खोलवर जाऊन रुततात. पण ह्या काट्यांचा -त्याला आणखीही एक उपयोग होतो हे त्याला अनपेक्षितपणे समजले. साळिंदर आपले काटे फुलवून ते पोकळ करतो व त्या काट्यात पाणी भरून घेऊन आपल्या पिलांना पाजतो, हे दृश्य त्याने पाहिले.

दुपारनंतर पाण्यासाठी पक्ष्यांचे आगमन व्हायचे. पिवळ्याजर्द शरीराचा हळदुळा, रानमैना, पायांना पडदे असलेली रानबदके, पांढरे शुभ्र बगळे पाणी पिण्यासाठी यायचे. करड्या रंगाच्या, मण्यांसारख्या तांबड्या डोळ्यांची चिमणा-चिमणींची जोडी भर दुपारी अंघोळीसाठी यायची. उथळ उभे राहून अंगावर तुषार उडवून घेत अंघोळ करायची. शिकारी ससाणा नेमाने संध्याकाळच्या वेळी यायचा. नदीकाठच्या झाडावरून सरळ पाण्यात सूर मारायचा व डोके नंतर पंख पसरायचा. सारे शरीर पाण्याने भिजल्यावर पुन्हा सूर मारून फांदीवर यायचा. अंग सुकवीत असायचा. पाण्यातून वर येताना पाण्याचे तुषार उडायचे व त्याचे संपूर्ण शरीर धुतले जायचे.

सायंकाळच्या वेळी शिकारीसाठी फिरताना त्याने अनेक माहितीतले तर अनेक नवे पक्षीही बघितले. लांडोरीसमोर सुंदर नाच करणारे मोर, राखाडी रंगाची कबुतरे, धनेश, चंडोल, गाणारा बुलबुल. इतर पक्ष्यांना धोक्याची जाणीव करून देणारा, करवतीसारखी शेपटी असलेला कोतवाल पक्षी त्याने पाहिला. आकाशात कसरतीचे खेळ करणारा एक नवा पक्षी त्याने पाहिला. त्याच्या मानेजवळ दोन सफेद डौलदार तुरे होते. हा पक्षी आकाशात उंच जायचा आणि स्वत:भोवती गिरक्या घेत खाली यायचा. मध्येच उजव्या किंवा डाव्या बाजूला गडाबडा लोळत जायचा, पुन्हा उलट झेप घेत वर जायचा व पुन्हा पंख बंद करून सूर मारून सरळ खाली यायचा. चंद्राने या पक्षाला नाव दिले 'गिरक्यापक्षी'. .

तोंडात कापसाचे बोळे घेऊन आपले घरटे रंगविणार्
पक्षीही त्याने पाहिला.



माणसांप्रमाणे आपल्या घरट्याला पक्षी रंगवतात हे बघून तो थक्क झाला. तो पक्षी उडून गेल्यावर त्याने त्या घरट्याचे निरीक्षण केले. पक्ष्याने घरट्याशी वापरलेल्या काड्या फळांच्या रंगाने रंगविलेल्या होत्या. रंगीत काड्या क्रमाने लावलेल्या होत्या. शिवाय घरट्याच्या बाहेर सभोवताली रंगीत कवडे व शिंपले सुद्धा होते. ते सुद्धा विशिष्ट क्रमाने ठेवलेले होते. आपल्या घरट्याची एवढी काळजी घेणारा हा कलावंत पक्षी त्याने प्रथमच पाहिला होता. चंद्राने त्या पक्ष्याला 'कुंजपक्षी' असे नाव दिले. ह्या अगोदर त्याने माडांच्या झावळांना लटकणारी बया पक्षांची घरटी बघितली होती. काही पाने एकत्र शिवून घरटे तयार करणारा 'शिंपी' पक्षीही त्याने पाहिला होता. पण स्वत:चे घरटे आपल्याला पाहिजे त्या रंगाने रंगवणारा कुंजपक्षी

त्याला खूपच आवडला.

निळ्या बेटावरचे विविध पक्षी व प्राणी बघून तो हरखला. हरखला. खरोखरच हे निळे बेट अद्भुत होते. पण निळ्या बेटावर वावरताना त्याला एक गोष्ट सतत जाणवत होती. ती म्हणजे, कुणीतरी त्याच्यावर सतत नजर ठेवून आहे. एक-दोन वेळा त्याला पाठीमागे हालचाल जाणवल्यामुळे त्याने वळून पाहिले होते. त्या वेळी त्याला झाडीतून धावत जाणारे पावलांचे आवाज ऐकू आले होते. कदाचित ते शिंगाडे असतील. त्यामुळे चंद्रा सतत सावध असायचा. शिवाय तो फारसा दूरवर जायचा नाही. पण या रहस्याचा उलगडा झाला तो राक्षसी सरड्यांमुळे.

एका संध्याकाळी असाच भटकत असताना चंद्रा वाट चुकला व दाट जंगलात शिरला. एका उंच चढणीपाशी येऊन तो पोहोचला. आजूबाजूची गर्द झाडी... उंच झाडे... कपारीसारखी चढण.. त्यापुढे वाट नव्हती. चंद्रा चिंताग्रस्त होऊन घाम पुसत राहिला. बरोबर वाघ्या होताच.

"वाघ्या, काळोख पडायला आला. आता या भयानक जागेतून बाहेर कसे पडायचे?"

एवढ्यात वाघ्या जोरजोराने भुंकू लागला. त्या वेळी समोरचा झाडाची फांदी गदागदा हलली. चंद्राने दचकून पाहिले आणि त्याचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. सुमारे सहा ते सात हात लांब, दोन हात रुंद. पाठीवर काटेरी तुरा असलेला भयावह प्राणी त्याच्याकडे रोखून बघत होता. त्याचे लालभडक डोळे अधाशीपणाने फुललेले होते. कोणत्याही क्षणी तो प्राणी उडी घेऊन हल्ला करण्याच्या तयारीत होता. ते अवजड धूड अंगावर कोसळल्यास जगण्याची आशाच धरायला नको होती. श्वास रोखत चंद्राने तीरकमठा सज्ज केला. पण त्या प्राण्याच्या जाड कातडीत वेळूचा तासून टोकदार केलेला तीर घुसेल याची खात्री नव्हती. शिवाय एका तीरामुळे तो मरणार नव्हता. पण प्रतिकार करावा लागणारच होता. नाहीतर मृत्यू अटळ होता.

चंद्राने त्या प्राण्याच्या दोन डोळ्यांमध्ये नेम धरला. मनात देवाचा धावा करत त्याने दोरी ओढली. तो प्राणी उडी मारणार एवढ्यात चंद्राची तीर बरोबर त्याच्या दोन डोळ्यांच्या मधल्या भागात बसला. त्यामुळे झाडावरची त्या प्राण्याची पकड ढिली झाली अन् तो झपकन खाली पडला. त्याचवेळी पाठीमागे किंकाळी ऐकू आली व धप्पकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. या सर्व गोष्टी घडत असताना वाघ्या सुद्धा कर्कश आवाजात भुंकत हाता. चंद्राने पाठीमागे बघितले. एक काळाकभिन्न, त्याच्याच वयाचा मुलगा तीरकमठा घेऊन उभा होता. व त्याच्या पुढ्यात तसलाच एक राक्षसी प्राणी पडून तडफडत होता. अचानक त्या मुलाने चपळाईने तीरकमठा सज्ज केला. तसा चंद्रा गडबडला. तो आपल्यावर तीर सोडतोय असे त्याला वाटले. बेसावध असलेल्या चंद्राने दोरीवर तीर चढवायचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात त्या मुलाने तीर सोडला. चंद्राने पाहिले तर मघाशी पडलेला तो राक्षसी प्राणी चंद्रावर झेप घेण्याच्या तयारीत होता. त्याला तो तीर बसला. तो अजब प्राणी खाली आदळला व तडफडू लागला.

त्या मुलाने आपले प्राण वाचविले, हे चंद्राच्या लक्षात आले. एक नव्हे, दोन प्राणी त्याच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. एक पाठीमागे व दुसरा पुढे. तो मुलगा ऐनवेळी आला नसता तर चंद्राला व वाघ्याला त्यांनी ता फाडून खाल्ले असते. त्या प्राण्यांना तिथले आदिवासी उडते राक्षसी सरडे' म्हणतात, हे त्याला नंतर डुंगाकडून समजले. त्या मुलाचे नाव डुंगा होते व चंद्रावर गेले चार दिवस नजर ठेवणारा तो होता..... हे चंद्राला समजले. पण हा आदिवासी मुलगा आपला शत्रू नाही, हेही त्याच्या लक्षात आले होते.

----------------भाग ४ समाप्त----------------