१०. मंगाची सुटका आणि शिंगाड्यांची वाताहत
चंद्रा, दंतवर्मा व इतर सारे शिंगाड्यांच्या नरबळी देण्याच्या जागी पोहोचले. तिथे सारे शिंगाडे जमले होते. भयाण किंकाळ्या मारत सारे नाचत होते. त्यांच्या त्या विचित्र देवाच्या शेजारीच असलेल्या लाकडी खांबावर मंगाला बांधलेले होते. समोर मोठा जाळ पेटत ठेवलेला होता व त्यात तो पुजारी ती माती फेकत होता व त्यामुळे पिवळसर-नारिंगी रंगाच्या ज्वाळा वर उसळत होत्या. आज सारे शिंगाडे खुशीत होते, कारण मयुरांच्या जमातीचा प्रमुख ‘मंगा’ त्यांच्या तावडीत सापडला होता.
त्याचा बळी देऊन नरमांस भक्षण करण्यास ते अधिकच उत्तेजित होऊन नाचत होते. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरची शिंगे गदागदा हलत होती. विविध प्राण्यांची पोकळ हाडे फुंकून ते भयावह आवाज निर्माण करत होते. समोर मंगा असहाय्य व भेदरलेल्या नजरेने हा प्रकार पाहात होता.
हे दृश्य पाहताच चंद्रा व डुंगाचे डोळे आवेशाने चमकले. त्यांचे बाहू स्फुरण पावू लागले. पण दंतवर्मांनी त्यांच्या खांद्यावर थोपटून त्यांना शांत केले. या क्षणी एखाद्या चुकीच्या निर्णयाने गोंधळ होण्याची शक्यता होती. दंतवर्मांनी खुणेनेच कुणी कुठची जागा पकडायची ते सांगितले. जराही आवाज न करता साऱ्यांनी चोरपावलांनी आपापली जागा पकडली. ती गोलाकार जागा आपल्या तीरांच्या आवाक्यात राहील अशा पद्धतीने साऱ्यांनी जागा पकडली होती. सारेजण काळोखात मिसळून गेले होते. पहिला हल्ला सारेजण एकाचवेळी करणार होते. झाडांवरचे नजर ठेवणारे शिंगाडे यापूर्वीच खाली उतरले होते. सारे शिंगाडे गाफीलपणे नाचत होते. शिंगाड्यांचा पुजारी देवाचा कौल घेण्यासाठी खाली वाकला. ज्वालांच्या प्रकाशात त्यांचे ते बाहेर आलेले पिवळे दात, लालसर डोळे चमकत होते. त्याचवेळी दंतवर्मांनी विशिष्ट शीळ देत सर्वांना इशारा दिला. ही शीळ रात्रीच्या वेळी जंगली पक्षी घालायचे तशीच होती. त्यामुळे कुणालाच संशय येणे शक्य नव्हते.
मयुरांनी आपले तीरकमठे सज्ज केले. चंद्राने आपल्या तीराच्या टोकाला दारूगोळ्याची बनवलेली गुंडाळी टोचली. डुंगाने पुजाऱ्यावर नेम धरला तर दंतवर्मांनी एका दणकट गलेलठ्ठ शिंगाड्याच्या मानेचा वेध घेण्यासाठी तीर सज्ज केला. क्षणार्धात एकाच वेळी सारे तीर हवा कापत सरसरत •झेपावले. डुंगाच्या तीराने पुजाऱ्याच्या मानेचा अचूक वेध घेतला होता तर चंद्राचा बाण अचूक आगीच्या ज्वालांमध्ये पडला
होता. त्यामुळे प्रचंडस्फोट झाला. तो आवाज व चमकलेला प्रकाश पाहून सारे शिंगाडे सैरावैरा पळू लागले. पहिला हल्ला एवढा अचूक होता की अनेक किंकाळ्या सगळीकडे घुमल्या. पुजारी, तो गलेलठ्ठ माणूस व आणखी काही शिंगाडे घायाळ होऊन पडले होते. चंद्राने वाघ्याला थोपटून खुणावले व मंगाकडे बोट दाखवले. वाघ्या त्वरित लपत-छपत मंगाला जिथे बांधून ठेवले होते तिथे पोहोचला. मंगाची बंधने तोडणे वाघ्यासाठी अगदी सोपे काम होते. त्याने आपल्या अणकुचीदार दातांनी साऱ्या वेली तोडल्या. मंगा मोकळा झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जाळातले एक पेटते लाकूड घेऊन त्याने धावून येणाऱ्या एका शिंगाड्यावर हल्ला केला. मंगाचा आवेश बघून तो शिंगाडा गलितगात्र झाला व दूर पळून गेला. वाघ्याने मंगाला ओढून आपल्या मागे येण्याची खूण केली. मंगाही मग वेळ न दवडता वाघ्यापाठोपाठ चंद्रा व डुंगा जिथे होते त्या ठिकाणी पोहोचला. आपल्या बापाला सुखरूप परत आलेला बघून डुंगाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. दोघे बाप-लेक एकमेकांना कडकडून भेटले. एका जीवावरच्या संकटातून मंगा परतला होता. चंद्रा त्या दोघांकडे बघून प्रसन्नपणे हसला. त्याने आपला हल्ला पुन्हा सुरू केला. त्याचा तीर अचूकपणे त्या आगीच्या जाळात पडत होता. प्रचंड कानठळ्या बसविणारा आवाज यायचा व त्या पाठोपाठ आगीचा लोट व धूर उसळायचा. त्या बरोबरच दंतवर्मा, डुंगा व इतर मयूर आवेशाने शिंगाड्यांवर हल्ले चढवत होते. बरेच शिंगाडे जायबंदी झाले होते. त्यांनी प्रतिकार करणे सोडून दिले व जमिनीवर गुडघे टेकत वर हातवारे करीत ते रडू लागले. शिंगाड्यांच्या स्त्रियाही विलाप करू लागल्या.
दंतवर्मांनी सर्वांना सुरुवातीलाच सक्त सूचना दिली होती की, कोणत्याही परिस्थितीत स्त्रियांवर हल्ला करू नये. त्यामुळे सार्या स्त्रिया सुखरूप होत्या. दंतवर्मांनी विशिष्ट शीळ घालून सर्व मयुरांना हल्ला
थांबवण्याची सूचना केली. त्यांनी डुंगाला आपल्याजवळ बोलाविले व त्याला सूचना दिल्या. शिंगाड्यांना त्यांच्या भाषेत दंतवर्मांना काहीतरी सांगायचे होते व त्यासाठी ते डुंगाचा वापर दुभाषी म्हणून करणार होते. दंतवर्मांनी चंद्राच्या मदतीने डुंगाला सारे समजावले. सारे मयूर तीरकमठा सज्ज करून सावधगिरीने उभे होते. दंतवर्मांनी चकमकीने मशाल पेटविली व हातात मशाल घेऊन पुढे सरकले. मशालीच्या नारिंगी प्रकाशात गोरेपान दंतवर्मा एखाद्या आकाशातून अवतरलेल्या देवदूतासारखे दिसत होते. रुंद कपाळपट्टी, खांद्यापर्यंत रुळणारे थोडीफार रुपेरी छटा असलेले केस, रुंद खांदे... गुडघ्यापर्यंत पोहोचतील असे लांब हात, उंच व धष्टपुष्ट देहयष्टी यामुळे दंतवर्मा तेजस्वी दिसत होते. त्यांनी डुंगाला खूण केली तसा डुंगा शिंगाड्यांच्या भाषेत बोलायला लागला.
“शिंगाड्यांनो, आपल्या माना वर करा... मी दूरच्या देवांच्या प्रदेशातून तुमच्यासाठी आदेश घेऊन आलोय. जर तुम्ही मानवी म्हणजेच आपल्यासारख्याच दिसणाऱ्या प्राण्याचे मांस खाणे सोडून दिले नाही तर तुमचा नायनाट ठरलेलाच आहे. या बेटावर राहणाऱ्या अन्य जमातींना त्रास देणे सोडून द्या. इथल्या झाडांवर - पशु-पक्षी यावर प्रेम करा. त्यांचं रक्षण करा. हा निसर्गच तुमचा खरा देव आहे. तो तुमच्या अन्नाची सोय करेल... तो तुमचे रक्षण करेल... पण लक्षात ठेवा, तुम्ही पुन्हा असा अघोरीपणा केला तर मी पुन्हा तुम्हाला शासन करण्यासाठी येईन.”
एवढे बोलून डुंगा थांबला. डुंगा बोलत असताना दंतवर्मा हातवारे करत होते. चंद्राला दंतवर्मांची युक्ती आवडली. शिंगाड्यांना धाक दाखविण्यासाठी व सुधारण्यासाठी असे करणे गरजेचे होते. त्यांना बदलण्यासाठी एक संधी देणे सुद्धा बरोबरच होते. दंतवर्मा काळजीपूर्वक शिंगाड्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष देऊन होते. सारे शिंगाडे आपल्या छातीवर
हात आपटत, “आम्हाला क्षमा करा... हे देवदूता.. आम्ही तू सांगशील तसेच वागू!” असे दीनवाणेपणे सांगू लागले. दंतवर्मांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यांनी हात उंचावून शिंगाड्यांना आपण समाधानी असल्याची खूण केली. त्याच बरोबर सभोवार पसरलेल्या मयुरांनाही मागे परतण्याची सूचना केली.
सारे मयूर, मंगा, दंतवर्मा व चंद्रासह परत फिरले. वाघ्याही त्यांच्या पाठोपाठ धावत होता. सारेजण आनंदी झाले होते. कारण त्यांनी आपल्या जमातीच्या प्रमुखाला सुरक्षितपणे सोडविले होतेच व पहिल्यांदाच यशस्वीपणे शिंगाड्यांचा सहजपणे पराभव केला होता. यात एकाही मयुराचा बळी गेला नव्हता किंवा जायबंदी झाला नव्हता. अर्थात, हे सारे दंतवर्मांच्या कुशल नेतृत्वामुळे व चंद्राच्या प्रसंगावधानाने शक्य झाले होते. मयुरांना सुद्धा दंतवर्मा व चंद्रा देवदूतासारखेच वाटत होते. मध्यरात्रीनंतर सारे मयुरांच्या वस्तीकडे परतले. तिथे वस्तीवरही सर्वांचे आनंदाने स्वागत करण्यात आले. डुंगाच्या आईचा व बहिणीचा आनंद गगनात मावेनासा झाला. सारेजण थकले होते व सर्वांना विश्रांतीची गरज होती. मंगाने सर्वांना विश्रांती घेण्याची केली. दंतवर्मा, चंद्रा व डुंगा अंगणात पसरलेल्या मऊशार गवतावर सूचना पहुडले.
चंद्राने दंतवर्मांना आता आपल्याला या बेटावरून निघाले पाहिजे, असे सुचविले. दंतवर्मांनी सुद्धा त्याला होकार दिला. एका दिवसानंतर आपण निघू या... उद्या जाण्याची तयारी करू या असे सुचविले. हे ऐकून डुंगाला खूपच वाईट वाटले. पण चंद्रा व दंतवर्मांचे इथून लवकर निघणे गरजेचे आहे हेही त्याला माहीत होते. बोलता बोलता सारे कधी झोपले ते त्यांनाच कळले नाही.
-----------भाग१०------समाप्त-----
पुढचा भाग-निळ्या बेटावरून प्रयाण
(परतीच्या प्रवासातली साहसे)