चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 11 बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 11

११. निळ्या बेटावरून प्रयाण

दुसऱ्या दिवशी चंद्रा, दंतवर्मा व डुंगाने परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली. चंद्रा व दंतवर्मा जात आहेत, हे ऐकून साऱ्या मयुरांना वाईट वाटले. काही मयूर चक्क रडू लागले. गेल्या काही दिवसांत चंद्रा, वाघ्या व दंतवर्मा हे मयुरांमध्ये मिसळून गेले होते. त्यांच्यातीलच एक होऊन गेले होते. त्यामुळे साऱ्यांना वाईट वाटणे साहजिकच होते. चंद्राला एकीकडे इथून आपण आपल्या घरी जाणार म्हणून आनंद झाला होता, तर दुसरीकडे हे अद्भुत निळे बेट, इथले पशुपक्षी, विलक्षण झाडे, डंगासारखा मित्र, इथे केलेली साहसे... हे पुन्हा मिळणार नाही म्हणून वाईटही वाटत होते. मंगाने साऱ्यांना समजावले. चंद्राला आपण आनंदाने निरोप देऊ या. त्यासाठी रात्री खास मेजवानी व मयूर नृत्याचे आयोजन करू या असे सुचविले. साऱ्यांनी त्याला आनंदाने मान्यता दिली व झटपट उठून सारे तयारीला लागले.

इकडे चंद्रा व डुंगा तराफा मजबूत करण्यासाठी वेलींनी बांधत होते. दंतवर्मा समुद्र सफरीवर लागणाऱ्या छोट्या-मोठ्या वस्तू गोळा करत होते. कमीत कमी चार-पाच दिवसांचा प्रवास त्यांना करावा लागणार होता. प्रवासा दरम्यान एखादं प्रवासी जहाज किंवा त्यांच्या राज्याचं एखादं जहाज मिळाल्यास त्यांचा प्रवास सुखाचा व लवकर होणार होता. पाण्याचे बुधले, टिकणारी फळे, तीर-कमठा, त्यांची तलवार शिवाय सर्वांत मोठी व महत्त्वाची वस्तू देवीच्या दागिन्यांच्या खजिन्याची पेटी हे सारे तराफ्यावर घेणे आवश्यक होते. चंद्रा व डुंगाने तराफ्याला मागे-पुढे उभ्या काठ्या बांधून थोडा होडीसारखा आकार दिला होता. त्यामुळे तराफ्यावर सामान ठेवणे सोपे जाणार होते. ह्या तराफ्यावर चंद्रा, दंतवर्मा व वाघ्या यासह थोडं सामान राहण्याएवढा हा तराफा मजबूत होण्यासाठी चंद्रा व डुंगा प्रयत्न करत होते. त्याचवेळी सारे मयूर रात्रीच्या वेळी होणाऱ्या मेजवानी व नृत्याची तयारी करत होते. वस्तीच्या मधोमध असलेल्या मोकळ्या जागेभोवताली त्यांनी विविध पाने-फुले लावून सुशोभित करणे सुरू केले होते. काही मयूर रानात विविध कंदमुळे आणण्यासाठी गेले होते. सारे जण कामात व्यग्र होते.

संध्याकाळपर्यंत जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली होती. सावल्या रुंदावल्या होत्या. घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांचे आवाज व त्यांची लगबग चंद्रा अंगणात बसून बघत होता. आकाशात लाल-गुलाबी रंग धारण केलेल्या छोट्या-छोट्या ढगांचे पुंजके दिसत होते. आज चंद्राला घराकडची खूपच आठवण येत होती. तो असाच आपल्या घराच्या अंगणात झोपून संध्याकाळचं आकाश न्याहाळत बसायचा. तरं रात्रीच्या वेळी लुकलुकणाऱ्याया
तारका व ढगांशी लपाछपीचा खेळ खेळणारा चांदोबा निरखत राहायचा. काही वेळा त्याच्यासोबत त्याची बहीण गौरी व त्याचा बाबा सरजू असायचा. सरजू त्याला आकाशातल्या विविध नक्षत्रांची माहिती द्यायचा. व्याध, ज्येष्ठा, ध्रुव तारा कोणता ?... नक्षत्रातील तारे कल्पनेने जोडल्यास कोणते आकार होतात ?... तराफ्यावरून दिशा कशा ओळखायच्या? याची माहिती द्यायचा. रात्री दर्यावर असताना वर चमकणारे तारे आपल्यासोबत असतात.. ते आपल्याला दिशा दाखवतात, हे सारे सरजूने त्याला मनोरंजक रीतीने समजावले होते. सायंकाळी व भल्या पहाटे तेजाने चमकणारी शुक्राची चांदणी चंद्राला विलक्षण आवडायची. समुद्राप्रमाणे आकाशाशी त्याची दोस्ती जमली होती. कधी कधी तर त्याला वाटायचं की समुद्रात आपण ज्या सहजतेने भटकतो तसं आकाशात भटकायला .. उडायला मिळालं तर.. किती मजा येईल ?'

"चंद्रा कसला विचार करतोस ?" दंतवर्मा त्याच्या शेजारी बसत म्हणाले.

“शुक्राची चांदणी बघतोय.... किती छान दिसतेय नाही ?" “होय. आणि तो बघ झाडांआडून डोकावतोय चंद्र. अगदी आकाशीच्या मध्यावर आहे. आणखी सहा-सात दिवसांनी पौर्णिमा असेल. त्यापूर्वी आपल्याला मद्र देशाच्या राजधानीत परतायचं आहे." दंतवर्मा काळजीच्या सुरात म्हणाले.

" “प्रधानजी... मला हे बेट सोडून जाताना खूप वाईट वाटतंय. या बेटावर मी बरंच काही शिकलो... शिवाय डुंगासारखा मित्रही भेटला इथे.' चंद्रा उसासा टाकून म्हणाला.

“चंद्रा... मलाही हे बेट दीर्घकाळ आठवेल... पण एकाच जागी थांबणं म्हणजे प्रगतीतला मोठा अडसर ठरेल तो. "
एवढ्यात मंगा, डुंगा व इतर मयूर आले. आपल्या पारंपरिक वेशभूषेवर त्यांनी फुलांच्या माळा.. सुगंधी गवतांचे कुंचले यांचे आभूषण चढवले होते. डोक्यावर दोन्यासारख्या हिरव्या गवताचा व फुलांचा टोप चढवला होता. त्यावर मोरपिसे खोवली होती. सारे मयूर त्यामुळे खुलून दिसत होते. या जंगलचे रहिवासी राजे असल्यासारखे वाटत होते.

“प्रधानजी चला.. काळोख पडलाय... आज तुम्हा दोघांना आमच्या वेषात सजवायचंय.. सारी तयारी करून ठेवलीय. चला.” मंगाने बोलता बोलताच मयुरांना खुणावले. त्या मयुरांनी चंद्रा व दंतवर्मांना हाताला धरून झोपडीत नेले व त्यांना सजवायला सुरुवात केली. कंबरेभोवती सुशोभित पानांचे वस्त्र, त्यावर मोरपिसे... गळ्यात हातात फुलांच्या माळा, कानात फुले, डोक्यावर टोप व त्यावर मोरपिसे असा साज दोघांच्या शरीरावर चढला. चंद्रा तर वनवासी राजकुमारासारखा दिसू लागला. -

"चंद्रा.. .. तू तर राजबिंडा दिसतोयस." दंतवर्मा हसून म्हणाले. सारेजण जाळासमोरच्या मोकळ्या जागेत बसले. स्त्रिया, मुले, पुरुष, चंद्रा, दंतवर्मा व वाघ्यासुद्धा. मयुरांनी आणलेल्या स्वादिष्ट कंदमुळांचा व फळांचा पाहुणचार चंद्रा व दंतवर्मांनी घेतला. त्यानंतर सारे मयूर गोलाकार रचनेत उभे राहिले. बांबू फुंकून विविध स्वर काही मयूर काढू लागले. संगीताच्या तालावर स्त्री-पुरुषांचं नृत्य सुरू झालं. चंद्रा डोळे भरून ते अनोखे दृश्य पाहू लागला. आकाशात चंद्र मध्यावर आला होता. त्याच्या शांत व शीतल प्रकाशात लयीत नाचणाऱ्या मयुरांची मोरपिसे चमचमत होती. बघता बघता नृत्याची लय वाढू लागली. स्वत:भोवती गिरक्या घेत व एका सुरात मंजूळ ध्वनी निर्माण करत सारे नाचू लागले. अचानक डुंगा नाचत नाचत चंद्राजवळ आला व त्याचा हात धरून त्याला ओढत नृत्यस्थळी घेऊन गेला. चंद्रा थोडा भांबावला. पण त्यानेही मयुरांचं अनुकरण करत.. लय पकडत नाचायला सुरुवात केली. सारे खूश झाले. वाघ्याही दोनपायांवर उभा राहात नाचू लागला. चंद्राच्या आयुष्यभर आठवणीत राहील असा तो क्षण होता.

बराच काळ भान हरपून सारे नृत्यात मग्न झाले होते. अखेर काही वेळाने वाद्यांचा आवाज मंद होऊ लागला. नृत्याची लय कमी कमी होत गेली. नृत्य संपल्यावर काही कसरतीचे खेळ मयुरांनी केले. दंतवर्मांनी आपल्या रुंद व लखलखत्या पात्याच्या तलवारीच्या साहाय्याने तलवारबाजीचे प्रात्यक्षिक दाखवले. सारे भान हरपून व धडधडत्या हृदयाने तलवारबाजीचे प्रात्यक्षिक पाहात होते. दंतवर्मांचे तलवार चालविण्याचे कौशल्य वादातीत होते. त्यांची चपळाई.. कुशल हालचाली बघून सारे भारावले. चंद्राने तर मनोमन ठरवून टाकले की दंतवर्मांकडून तलवारबाजी शिकून घ्यायचीच. दंतवर्मांनी स्वसंरक्षण कसे करायचे... प्रतिहल्ला कसा करायचा याची सुंदर प्रात्यक्षिके दाखविली. बराच काळ चाललेल्या या कार्यक्रमामुळे सारे दमले होते. चंद्राला उद्या हे बेट सोडायचे होते. त्यामुळे रात्री पूर्ण झोप घेणे आवश्यक होते. सारे झोपण्यापूर्वी मंगाने चंद्रा व दंतवर्मांचे आभार मानले. तो म्हणाला,

“तुम्ही सारे पुन्हा या. आम्ही सदैव तुमचे ऋणी आहोत. आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांनाही तुमच्याबद्दल सांगत राहू. तुम्ही आम्हासाठी देवदूतच आहात. वाघ्यानेही आमच्यासाठी खूप काम केलंय. तुमची सर्वांना " सतत आठवण येत राहील.

अखेर चंद्रा व डुंगा एकमेकांना कडकडून भेटले. दोघांच्याही डोळ्यांत आसवं होती. त्याचबरोबर इतरांचेही डोळे पाणावले होते. या दोन मित्रांची गळाभेट बघून सारे गहिवरले. यानंतर पुन्हा हे दोघे कधी भेटतील की नाही कुणास ठाऊक, अस सर्वांच्या मनात होतं.
-------------भाग११ समाप्त------------------
भाग१२- पुन्हा समुद्रावर व नवी आव्हाने