. नव्या साहसावर
दुसऱ्या दिवशी चंद्रा सकाळी थोडा उशिरानेच उठला. तोंड वगैरे धुवून ताजातवाना झाल्यावर डुंगाने त्याच्यासमोर फळे, पाणी व झाडांच्या फळांपासून बनविलेले पेय ठेवले. डुंगाच्या पाहुणचाराचा आस्वाद घेतल्यावर त्याने डुंगाच्या बाबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. डुंगाने हसतच मानेने होकार देत त्याला आपल्या झोपडीत नेलं. तिथं डुगाचा बाबा ‘मंगा' मातीने तयार केलेल्या एका उंचवट्यावर बसला होता. चंद्राने मंगाला हात जोडून नमस्कार केला. मुला तुला आमचा उत्सव आवडला?'' मंगाने चंद्राला हसून विचारले
"होय बाबा.. ते नृत्य व गाणी छान होती." चंद्राने ते
उत्तर दिले. 'तुला त्या.. अनोळखी माणसाविषयी विचारायचं होतं ना?', “होय. मी त्याच्याच शोधात इथं आलोय. कुठं दिसला तो तुम्हाला?”
"तो नदीच्या उताराच्या दिशेने शिंगाड्यांच्या रानाजवळ मला दिसला. गोरापान
उंच धिप्पाड होता तो. माझी चाहूल लागताच तो गर्द
झाडीत दिसेनासा झाला... मी त्याच्या मागे गेलो सुद्धा... पण पुढे शिंगाड्यांची वस्ती असल्याने एकट्याने जाणे धोक्याचे वाटले म्हणून मी परतलो."
“अरे देवा! आता कुठे असेल तो?' चंद्रा निराशेने उद्गारला. "मला शिंगाड्यांची भीती वाटते. तो इसम.. त्यांच्या हाती लागला तर त्याचं काही खरं नाही." मंगा काळजीने म्हणाला. अचानक त्यांचे डोळे लकाकले. काही तरी त्यांना आठवले असावे. ते उठले व झोपडीच्या एका कोपऱ्याजवळ गेले. तिथे झापाखाली ठेवलेली एक वस्तू त्यांनी आणली.
“तो माणूस पळत असताना हे त्याच्या अंगावरून पडलं. ते मी घेऊन आलोय.
त्यांनी ती वस्तू चंद्राला दाखवली. तो एक मोत्याचा कंठा होता. थोडी गुलाबी झाक असलेल्या उंची मोत्यापासून तो कंठा बनविलेला होता. यावरून तो इसम कुणी मोठा सरदार किंवा मंत्री असावा असे त्याला वाटले. 'देव करो व हा इसम शिंगाड्यांच्या हाती न लागो,' अशी चंद्राने मनोमन प्रार्थना केली. त्याने तो कंठा आपल्याजवळ घेतला. आतच त्या माणसाच्या शोधात जाण्याचा निश्चय त्याने व्यक्त केला. डुंगाही त्याच्याबरोबर यायला तयार झाला. मंगाने त्यांना सावधगिरीचा इशारा दिला.
लगेचच चंद्रा, डुंगा व वाघ्या नदीच्या काठाने चंद्राने बनविलेल्या तराफ्यापर्यंत आले. आज तराफ्याचा उपयोग होणार होता. चंद्राने एकवार तराफ्याच्या मजबूतपणाची खात्री केली. कमरेला खोवलेल्या खंजीराच्या थंडगार पात्यावरून हात फिरवला. डुंगा आपला तीरकमठा घेऊन आला होता. दोघे एका नव्या साहसाला निघाले होते. चंद्रा तर खूपच रोमांचित झाला होता. त्या अनोळखी इसमाचा शोध घेऊन सारे गूढ जाणून घेण्याची त्याला तीव्र इच्छा झाली होती. त्याने तराफा पाण्यात लोटला. चंद्रा, डुंगा व वाघ्या त्यावर चढले. एका बांबूच्या काठीने तराफ्याला दिशा देत त्याला वेग दिला. पाण्याच्या उताराच्या दिशेने जायचे असल्याने फारसा त्रास होणार नव्हता. फक्त प्रवाहातील मोठे खडक व पाण्यातील मगरींपसून होडीला व स्वत:ला वाचविणे यावर लक्ष द्यावे लागणार होते.
डुंगाला खूच मजा वाटत होती. सुरुवातीला संथ गतीने जाणारा तराफा आता थोडा वेगाने जात होता. दोन्ही बाजूंना गर्द झाडी-हिरवटनिळसर पानांच्या वेली... त्यावर फुललेली विविध रंगांची फुले... सारा परिसर मन प्रसन्न करणारा होता. मध्येच झाडांवर विश्रांती घेणारे बगळे चाहूल लागताच ओळीने आकाशात झोपावत होते. सूर्य डोक्यावर येईपर्यंत त्यांचा प्रवास चालला होता. चंद्राची शोधक नजर नदीच्या दोन्ही काठांवर भिरभिरत होती. डुंगा तीर कमठा सज्ज ठेवून तयारीत बसला होता. लांब व उंच बांबूने चंद्रा तराफा पाण्याच्या मधोमध राहील याची काळजी घेत होता. वाटेत एखादा जीवघेणा धबधबा मिळू नये याची तो प्रार्थना करत होता. वाघ्या मात्र तराफ्यावर पाय ताणून बिनधास्तपणे झोपला होता.
अचानक चंद्राच्या नजरेने काही तरी टिपले. बांबू पाण्यात रोवत त्याने तराफा उजव्या दिशेने फिरवला. नदीच्या उजव्या काठावर भगव्या रंगाच्या कापडाचा तुकडा वेलीत अडकला होता. अशा प्रकारचं कापड या बेटावरचं असणं शक्यच नव्हतं. निश्चितच ते कापड त्या संदेश पाठविणाऱ्या
माणसाशी संबंधित असलं पाहिजे, हे त्याच्या लक्षात आलं.
"तो इसम इथंच कुठंतरी असला पाहिजे." चंद्रा उत्तेजित होत डुंगाला म्हणाला.
"होय, मलाही तसंच वाटतं... पण आपल्याला सावध राहिले पाहिजे... हा शिंगाड्यांचा
प्रदेश आहे." डुंगा इशारा देत म्हणाला. "तू... बांबू रोवून धर, मी तराफा काठावरच्या झाडाला बांधतो.' चंद्राने काठ जवळ येताच पाण्यात उडी मारली. वेलीच्या दोराने तराफ्याच्या पुढच्या बाजूला बांधून...दोर हातात धरून तो कंबरेएवढ्या पाण्यातून पुढे सरकू लागला. एवढ्यात पाण्यात झपकन कुणीतरी उडी घेतली. चंद्रा दचकला. एक भली मोठी मगर पाण्यावर तोंड काढून चंद्राच्या बाजूलाच आली. क्षणभर चंद्राच्या अंगावर काटा उभा राहिला. काय करावे तेच त्याला कळेना! पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या हातात कमरेचा खंजीर आला होता. झेपावणाऱ्या मगरीच्या मानेला विळखा घालत त्याने खंजीर मगरीच्या पोटात घुसवण्याचा प्रयत्न सुरू केला. पण मगरीची ताकद अफाट होती. त्यात पाण्यात मगर असल्याने तिच्याशी टक्कर देणे अवघड होते. डुंगाही गडबडून गेला. तराफा हेलकावे खात होता. बांबूने तो जागेवर ठेवण्याचा डुंगा प्रयत्न करत होता. वाघ्याही जागा झाला होता व जोरजोराने भुंकत होता. . .
“चंद्रा, मगरीच्या जबड्याला पकड... दोन्ही जबडे एकदम पकडून ठेव. ते अतिशय कमजोर असतात. मी येतोच....” डुंगा ओरडत म्हणाला. चंद्राने खंजीर खुपसण्याचा प्रयत्न सोडून खंजीर काठावर फेकला व दोन्ही हातांनी मगरीचे जबडे...एकत्र पकडून ठेवले. खरंच मगरीची ताकद कमी झाल्याप्रमाणे ती सुटण्याची धडपड करू लागली. डुंगाने पाण्यात उडी मारली- वेलीचा दोर हातात धरून वेगाने पोहत किनाऱ्यालागेला. झटपट झाडाच्या बुंध्याला दोराचा एक फेरा त्याने मारला व तिथेच पडलेला चंद्राचा खंजीर उचलून तो त्वरेने पाण्यात झेपावला. एव्हाना वाघ्याही पाण्यात उतरला होता व मगरीच्या शेपटीकडच्या बाजूने भुंकत भुंकत शेपटी पकडण्याचा प्रयत्न करीत होता. चंद्रा घामेघूम झाला होता. मोठ्या ताकदीने त्याने मगरीचे दोन्ही जबडे एकत्र पकडून ठेवले होते. ही झटापट झाडांवरून बघणारी माकडे चित्कारत इकडून तिकडे उड्या मारत होती. डुंगा वेगाने पाण्याखाली गेला व मगरीच्या पोटाकडील नरम भागावर त्याने सपासप खंजीराने वार करायला सुरुवात केली. मगरीने सुटण्याची जोरदार धडपड सुरू केली. पण चंद्रा, डुंगा व वाघ्याच्या ईर्थेपुढे मगरीची मात्रा चालली नाही. सारे पाणी लालभडक झाले... हळूहळू मगरीची धडपड कमी होत गेली. अखेर चंद्रा व डुंगाचा विजय झाला होता. मगर मेली होती. तिघेजण धापा टाकत काठावर आले. चंद्राला तर शक्तिपात झाल्यासारखं वाटलं. तो किनाऱ्यावरील गवतात डोळे बंद करून तसाच काही काळ झोपला. आता खूप बरं वाटत होतं.
काही वेळाने चंद्रा उठून बसला. त्याला एका मोठ्या संकटातून सुटल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
"चल डुंगा, ते कापड काढू या!” चंद्रा उभा राहात म्हणाला. एका काटेरी झाडाला ते कापड अडकलं होतं. चंद्राने हात उंचावत तो कापडाचा तुकडा खाली ओढला. तो कापडाचा तुकडा एका उंची रेशमी वस्त्राचा होता व तो अंगावरच्या उपरण्याचा किंवा शेल्याचा होता. यावरून हे वस्त्र वापरणारा इसम कुणीतरी अधिकारी व्यक्ती होता हे निश्चित.
“तो इथंच कुठंतरी असणार... आपल्याला ताबडतोब शोध घ्यायला हवा.” चंद्रा उत्साहाने म्हणाला. चंद्रा व डुंगा गर्द झाडीतून वाट काढत झपाझपा पुढे चालू लागले. पाठोपाठ वाघ्याही उड्या मारत झाडीतून वाट काढू लागला. चंद्रा हातातील खंजीराच्या साहाय्याने वाटेतील वेली... उंच गवत कापत वाट तयार करत होता. घनदाट झाडीमुळे वाट काढायला वेळ लागत होता. झाडांवरचे पक्षी कर्कश आवाजात ओरडत होते. कदाचित ते एकमेकांना जंगलात घुसलेल्या या मानवी प्राण्यांची सूचना देत होते. एके ठिकाणी तर झाडीतून पाच-सहा भल्यामोठ्या डुकरांचा कळप बाहेर आला व सुसाट पळत गेला. त्यांचे ते पिंजारलेले राठ केस, तीक्ष्ण, दणकट सुळे व त्यांच्या सामर्थ्याची साक्ष देणारा हुंकार ऐकून चंद्रा काही क्षण तिथेच थबकला. सकाळपासून ते भर उन्हात फिरत होते. तहानेची जाणीव तीव्रतेने चंद्राला जाणवू लागली. घशाला कोरड पडल्यासारखी वाटत होती. मिळेल?'
, फार तहान लागलीय... पाणी कुठे
“डुंगा डुंगाने थोडं आजूबाजूला पाहिले. त्याचे लक्ष पोपटी रंगाची फुले फुललेल्या एका जाडजूड वेलीकडे गेले.
"जरा खंजीर दे माझ्याकडे..." डुंगाने चंद्राकडून खंजीर घेतला. त्याने बाजूच्याच एका झाडाचं भलंमोठं पान काढलं व त्याचा छानपैकी खोलगट द्रोण बनवला. तो समोरच्या वेलीकडे गेला व खंजीराने त्या वेलीला तिरका छेद देत कापले. कापलेल्या वरच्या भागातून पाण्याची पिचकारी खालच्या पानाच्या द्रोणात पडू लागली. बघता बघता पुरा द्रोण भरून गेला. चंद्राला आश्चर्य वाटलं. वेलीतून आलेला हा रस पाणी म्हणून प्यायचं का? याचे त्याला कोडे पडले.
"हे घे पाणी... आम्ही जंगलात असताना हेच पाणी पितो.” डुंगा म्हणाला.
चंद्राने भीतभीतच तो द्रोण ओठांना लावला. पण पहिल्या थेंबाबरोबरच त्याला त्या पाण्याची गोड चव जाणवली व त्याने घटाघटा सारे पाणी पिऊन टाकलं. त्याला खूपच ताजंतवानं वाटू लागलं. त्या गर्द झाडीतते अजून पुढे सरकले. अचानक चंद्राच्या लक्षात आलं की वाघ्याचा उपयोग करून आपण त्या इसमाचा शोध घेऊ शकतो. त्याने त्या रेशमी वस्त्राचा वास वाघ्याला दिला व म्हणाला,
"चल वाघ्या! आपल्याला हे कापड वापरणाऱ्या माणसाचा ठावठिकाणा शोधायचा आहे."
मग काय, वाघ्या झपाझप उड्या मारत झाडीतून धावू लागला. त्याच्या पाठीमागून धावताना चंद्रा व डुंगाची तारांबळ उडू लागली. एका ठिकाणी वाघ्या थांबला. तो जोरजोराने भुंकू लागला. त्या ठिकाणी वेलींची घनदाट जाळी होती. चंद्राला समजेना की वाघ्या या ठिकाणी थांबून का भुंकतोय ते! त्याने तिथल्या गवताचे निरीक्षण केले. तिथले गवत मानवाचे पाय लागल्याने दबलेले दिसत होते. वाघ्या तर तिथून हलत नव्हता. तो जाळीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता. चंद्राला वाटलं, त्या जाळीपलीकडे काहीतरी असावं. त्याने त्या भरगच्च वेलींचा पडदा हाताने अलगद बाजूला केला. डुंगा तीरकमठा सरसावून तयार होता. कदाचित त्या जाळीतून एखादं क्रूर श्वापद बाहेर येईल, तर सावधगिरी बाळगलेली बरी हाच विचार त्याच्या डोक्यात होता. चंद्राही उजव्या हातात खंजीर पकडून सावधगिरीने त्या जाळीत डोकावून पाहू लागला. तो थक्क झाला. एका मोठ्या खडकावर त्या वेली पडद्यासारख्या पसरून खाली जमिनीपर्यंत लोंबकळत होत्या. त्या खडकाखाली मोठा पोकळ खोलगट भाग होता. ती एक नैसर्गिक गुहाच होती. तिचं तोंड वेलींनी झाकल्यामुळे तिथे गुहा असल्याचा साधा संशयही येत नव्हता. चंद्रा अलगदपणे वेली बाजूला सारत वाकून आत शिरला. त्या पाठोपाठ डुंगापण आत गेला. वाघ्या बाहेर आपणहून थांबला. जणू बाहेर पहारा देण्यसाठी तो थांबला होता. आत थोडा अंधार होता. पण लवकरच डोळे अंधाराला सरसावले. चंद्राने गुहेत नजर फिरवली. बरीच रुंद गुहा होती .ती! त्या गुहेत कुणाचं तरी वास्तव्य असाव असं त्याला राहून राहून वाटत होतं. अचानक त्याला एका अंधाऱ्या कोपऱ्यातून विव्हळण्याचा आवाज ऐकू आला. आवाज अत्यंत क्षीण व खोल होता. चंद्रा त्वरेने तिथे पोहोचला. एक पन्नाशीचा उंच, धिप्पाड इसम तिथे झोपला होता. चंद्राने त्याला हात लावून पाहिले. त्याचे अंग तापाने फणफणले होते व तो ग्लानीत विव्हळत होता. त्याच्या अंगात रेशमी अंगरखा व पायजमा होता. .
“डुंगा, त्याला जोरदार ताप आलाय... शिवाय याला पाण्याचीही गरज आहे."
डुंगा चंद्राचा खंजीर घेऊन बाहेर गेला. बाहेर जाताना त्याने काही वेली तोडून गुहेच्या तोंडावरचा काही भाग मोकळा केला. त्यामुळे बऱ्यापैकी प्रकाश आत शिरला. चंद्राने त्या माणसाला थोडं हलवून पालथं झोपवलं. तो इसम गौरवर्णी होता. त्याची छाती रुंद व भरदार होती. मनगट जाड व शक्तिशाली होते. रुंद कपाळपट्टी त्या माणसाच्या बुद्धिमत्तेची साक्ष देत होती. एकूणच हा इसम कुणीतरी मोठा अधिकारी असावा यात शंका नव्हती.
"चंद्रा... हे पाणी यांना थोडं थोडं पाजायला हवं. तोपर्यंत हा पाला मी त्याच्या अंगावर लावतो.” डुंगा गुहेत शिरत म्हणाला. त्याच्या हातात द्रोण भरून पाणी व कसलातरी निळसर पाला घेऊन आला होता. चंद्राने द्रोणातील पाण्याची धार त्या व्यक्तीच्या तोंडात हळूहळू सोडायला सुरुवात केली. ओठांना झालेल्या पाण्याच्या स्पर्शाने ग्लानीतही तो इसम सुखावल्यासारखा वाटला. त्याने हातपाय ताणल्यासारखे केले. डुंगाने तोपर्यंत आणलेला पाला चुरगळून त्या इसमाच्या कपाळपट्टीवर... घशाखाली व पायाच्या तळव्यांना लेप दिला.
“थोड्याच वेळात ताप उतरेल.” डुंगा आत्मविश्वासाने म्हणाला.
. . चंद्राने गुहेत नजर फिरवली. तिथे अर्धवट खाल्लेली व सुकलेली फळं दिसत होती. तसेच म्यानात बंद असलेली तलवार त्याला दिसली. चंद्राने तलवार उचलली. ती चांगलीच जड होती. त्याने तलवार म्यानातून बाहेर काढली. रुंद पात्याची... लखलखणारी ती तलवार पाहून चंद्राचे डोळे लकाकले. डुंगाही ह्या नव्या शस्त्राकडे आ वासून पाहात होता. चंद्राने तलवार पुन्हा म्यानात सरकवली व व्यवस्थित ठेवली. तो पुन्हा त्या इसमाकडे गेला व त्याच्या अंगाला हात लावून पाहिलं. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. ताप पूर्णपणे उतरला होता. डुंगाच्या पाल्याच्या औषधाने कमाल केली होती. चंद्राने कौतुकाने डुंगाकडे पाहात हसून दाद त्याला दिली. चंद्राने पुन्हा त्या इसमाला पाणी पाजले. त्या इसमाने डोळे उघडले. क्षणभर त्याचे डोळे इकडून तिकडे भिरभिरत राहिले. जाणिवेत येण्याची त्याची धडपड चालली होती. समोर दोन अनोळखी मुलं बघून तो धडपडून उठण्याचा प्रयत्न करू लागला. पण अशक्तपणामुळे त्याला ते जमेना. चंद्रा त्यांना थांबवत म्हणाला,
"तुम्ही तसेच राहा...थोडी फळं देतो ती खा." ह्या भयावह बेटावर ते इसम प्रथमच ओळखीची भाषा ऐकत होता. त्याला खूपच आनंद झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते. चंद्राने त्याला स्वत:जवळची फळे दिली. सावकाशपणे तो एक एक फोड खात होता. फळं खाल्ल्यावर त्याला खूपच बरं वाटलं. चंद्राकडे बघत तो म्हणाला, "मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे... गेले काही दिवस मी बोललोच नाही.."
चंद्रा हसला. त्याने कमरेला खोवलेला पानावरचा संदेश दाखवला. “म्हणजे हा संदेश वाचून तू इथपर्यंत आलास तर?"
"हो! पण हे सारं काय आहे? तुम्ही कोण आहात? आणि" कसला अनमोल खजिना तुमच्याजवळ आहे?' चंद्राने कुतुहलाने विचारले. तो इसम हलकेच हसला. चंद्राची उत्सुकता त्याच्या लक्षात आली. त्याने द्रोणातील उरलेले पाणी स्वत:च्या हाताने पिऊन घेतले. डुंगाकडे बोट दाखवत त्याने विचारले, "हा कोण आहे?"
"इथल्याच एका जमातीच्या प्रमुखाचा मुलगा आहे व माझा मित्र आहे. याच्याच वडिलांनी काही दिवसांपूर्वी तुम्हाला या परिसरात पाहिलं होत. "
"ठीक आहे, इथं एक शिंगंवाली जमात आहे. ती तर माझ्या मागे हात धुवून लागली होती. कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटलो. पळता पळता मला या गुहेचा शोध लागला पण अतिश्रमाने व ताणाने मी आजारी . पडलो."
"मला वाटतं, आपण प्रथम इथून बाहेर पडू या.” डुंगा दोघांना . थांबवत म्हणाला.
. "पण यांना जमेल काय?” चंद्रा त्या इसमाकडे बघत म्हणाला.
मला आता खूप बरं वाटतंय." डुंगा व चंद्राने त्यांना आधार देत उभं केलं. काही क्षण ते तसेच उभे राहिले. चंद्राने त्यांची तलवार त्यांच्याजवळ दिली.
"नाही... तसा प्रश्न नाही.
'मी कोण आहे याची उत्सुकता तुम्हाला असेल नाही?"
“होय..” चंद्रानं मान हलवत उत्तर दिलं. "
“मी मद्र देशाचा राजा भद्रसेन यांचा प्रधान दंतवर्मा आहे आणि मी एका महत्त्वाच्या कामगिरीवर गेलो होतो. कामगिरी आटोपून येताना दंतवर्मा म्हणाला. योगायोगाने मी या बेटावर पोहोचलो.' "
एका मोठ्या साम्राज्याच्या प्रधानांबरोबर आपण बोलत आहोत हेलक्षात येताच चंद्रा दचकला. तो अदबीने त्यांच्यासमोर उभा राहिला. ज्या अर्थी स्वतः प्रधानजी कामगिरीवर बाहेर पडलेत म्हणजे ती कामगिरी अतिमहत्त्वाची असणार यात शंकाच नव्हती.
तिघेही हळूहळू नदीच्या दिशेने चालू लागले. चंद्राने येताना तयार केलेल्या वाटेचा आता फायदा झाला होता. वाघ्या सर्वांच्या पुढे धावत होता. दंतवर्मांनी वाघ्याबद्दल चंद्राला विचारलं. तेव्हा चंद्राने त्यांना वाघ्याची माहिती दिली. तेव्हा दंतवर्मा कौतुकाने हसले. तराफ्याजवळ येताच चंद्राने दंतवर्मांना तराफ्यावर चढवले. वाघ्या व डुंगा तराफ्यावर चढताच चंद्राने दोर सोडला. चंद्राही तराफ्यावर चढला. बांबूने तराफा पाण्यात लोटत त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. या वेळी सूर्य पार पश्चिमेला पोहोचला होता.
भाग 7 समाप्त---------------------------------