चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 8 बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 8

८. दंतवर्मांची कहाणी

खरं म्हणजे परतीचा प्रवास खूपच कठीण होता. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचे होते. तराफ्यावर दोघांऐवजी आता तिघेजण होते. चंद्राला जादा शक्तीचा वापर तराफा वल्हवायला करावा लागत होता. त्याने तराफा थोडा उजव्या कडेने हाकायला सुरुवात केली. मध्यभागापेक्षा कडेला पाण्याचा वेग कमी होता. आणखी काही वेळाने काळोख पडणार होता. त्यापूर्वी जास्तीतजास्त अंतर पार करणे गरजेचे होते. झाडांचे निळसर शेंडे तांबूस सूर्यकिरणांनी चमकत होते. पश्चिमेला नारिंगी-गुलाबी रंगाची उधळण सुरू झाली

होती. पक्षी घरट्याकडे परतत होते. एकेठिकाणी तर नदीकाठचं झाड लांबून पांढरेशुभ्र दिसत होतं. चंद्राला कळेना, या झाडाला कशा प्रकारची पांढरी फळं धरली आहेत? पण थोडं पुढं येताच त्यांच्या डोक्यावरून बगळ्यांचा कळप उडत गेला व त्या झाडावर जाऊन स्थिरावला व त्या पांढऱ्या रंगात सामावून गेला. त्या वेळी चंद्राच्या लक्षात आलं की बगळ्यांचं रात्रीच्या वेळचं ते वसतीस्थान होतं. त्यानं मान वळवून दंतवर्मांकडे पाहिलं. ते त्याच्याकडे पाहात कसल्यातरी गहन विचारात पहुडले होते. डुंगा नेहमीप्रमाणे तीरकमठा सज्ज ठेवत सावधपणे चारी बाजूला नजर फिरवत उभा होता.

अचानक हवा चिरत जाणारी एक आरोळी नदीच्या डाव्या किनाऱ्यावरील जंगलातून ऐकू आली.

“चंद्रा, लवकर उजव्या बाजूच्या किनाऱ्याला तराफा घे. शिंगाड्यांनी आपल्याला पाहिलंय. आपल्याला जंगलात शिरावं लागेल. डुंगा गडबडीने म्हणाला. "

चंद्राने ताकदीने तराफा किनाऱ्याच्या दिशेने वळवला. दंतवर्मासुद्धा तलवार उपसून उभे राहिले. .

"त्यांच्याजवळ बेडकांचं विष लावलेले विषारी तीर आहेत... शक्यतो उभे राहू नको.” डुंगा बोलला. त्याने तराफ्याच्या टोकाला बांधलेला वेलीचा दोर हातात घेतला व त्याने पाण्यात उडी मारली. पोहता पोहता तो तराफा ओढत किनाऱ्याला नेत होता. या वेळी नदीचे पात्र खूपच रुंद असल्यासारखे वाटू लागले. चंद्राही जोर लावत तराफा किनाऱ्याकडे रेटत होता. आता आरोळ्यांचे आवाज वाढू लागले. शिंगाडे किनाऱ्याच्या जवळ येत होते.

"प्रधानजी... तुम्ही पालथे पडा, मी आणि वाघ्या पाण्यात उतरतो. " . तराफा ओढायला सोपे पडेल.'

. क्षणार्धात वाघ्याने व चंद्राने पाण्यात सूर मारला व तराफा खेचत किनाऱ्याकडे पोहत जाऊ लागले. डुंगा व चंद्राने मिळून तराफा अखेर काठावर आणला. डुंगाने तराफा झटकन झाडाला बांधला तर चंद्राने दंतवर्मांना खाली उतरून घेतले. तोपर्यंत दहा-पंधरा शिंगाडे पलीकडच्या किनाऱ्यावर जमा झाले होते. आरोळ्या देत त्यांनी कामठ्यांवर तीर चढवले.

"झटकन... झाडांचा आडोसा घ्या." चंद्रा ओरडला.

एवढ्यात एक तीर ज्या झाडाआड चंद्रा राहिला होता त्या झाडात येऊन रुतला. दोन शिंगाडे पाण्यात उतरण्याच्या प्रयत्नात होते. डुंगाने नेम धरून तीर सोडला. पाण्यात उतरलेल्या एका शिंगाड्याच्या खांद्यात तीर घुसला. कर्कश किंकाळी फोडत तो पाठीमागं फिरला. चंद्राने सहज म्हणून वेलीच्या दोराची गोफण केली व त्यात दगड अडकवून गोफण गरागरा फिरवत दगड सोडला. दगड किनाऱ्यावरील एका शिंगाड्याच्या डोक्यावर बसला. तो शिंगाडा डोकं दाबत खाली कोसळला. सारे शिंगाडे दचकून मागे सरकले. डुंगाने दुसरा तीर पाण्यातून पुढे सरकणाऱ्या शिंगाड्यावर सोडला. पण त्याने तो शिताफीने चुकवला. पण जरा पुढे येताच तो शिंगाडा वेड्यासारखा किंचाळत अंग आखडल्यासारखा अंगाला झटके देऊ लागला. . . .

“पाण्यात झटके देणारे मासे आलेत. देवच आपल्या बाजूने आहे.' डुंगा आनंदाने म्हणाला. "

"चला.. आपण लवकरच इथून निघू या. शिंगाडे पाण्यातून येऊ शकणार नाहीत." चंद्रा दंतवर्मांकडे बघत म्हणाला.

सावधगिरी बाळगत सारेजण हळूहळू पाठीमागे सरकले. शिंगाड्यांनी सोडलेले तीर अजूनही पाण्यात येऊन पडत होते. पण आता चंद्रा व त्याचे सोबती सुरक्षित होते. डुंगाने विशिष्ट आवाजात हाळी दिली. काही क्षणातच अगदी तशीच हाळी दूरवरून ऐकू आली. जंगलात मध, कंदमुळे गोळा करण्यासाठी आलेल्या मयुरांनी डुंगाच्या हाळीला उत्तर दिलं होतं. "चला लवकर, आपले लोक थोड्याच अंतरावर आपल्याला



भेटतील. आपल्याला सोबत मिळेल." डुंगा म्हणाला.

एव्हाना जंगलावर काळोखाची चादर पसरायला सुरुवात झज्ञली

होती.

अखेर त्यांना पाच-सहा मयूर भेटले. दंतवर्मांकडे बघून ते सारे दचकले. डुंगाने त्यांना सारा प्रकार सांगितला. त्यानंतर मात्र ते सारे दंतवर्मांकडे आदराने पाहू लगले. सारेजण जवळच्या वाटेने मयुरांच्या वस्तीकडे परतले. दंतवर्मांना थोडा थकवा वाटत होता. चंद्राने त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले. डुंगाने काही कंदमुळे व मक्यासारखी दिसणारी कणसे आणली. चंद्राने त्यातली काही कंद व कणसे तिथल्या सतत पेटत ठेवलेल्या जाळावर बऱ्यापैकी भाजली. डुंगा व इतर मयूर कुतूहलाने चंद्रा काय करतो ते पाहत होते. भाजलेला एक कंद सोलून चंद्राने प्रथम स्वत: खाल्ला व त्यानंतर त्याने डुंगा व इतर मयुरांना उरलेले कंद व कणसे खाण्यास दिली. प्रथम भीतभीत व तोंड वेडेवाकडे करत त्यांनी ती खाल्ली, पण भाजलेल्या अन्नाची चव जाणवताच आनंदाने चित्कारत त्यांनी कंदमुळे खाल्ली. अन्न भाजून खाण्याची नवी शिकवण चंद्राने त्यांना करून दिली. त्यानंतर काही वेळ गप्पा-गोष्टी साऱ्यांनी केल्या. तोपर्यंत दंतवर्मा विश्रांती घेऊन मंगाच्या झोपडीतून बाहेर पडले. आता ते खूपच प्रसन्न दिसत होते. चंद्राने त्यांना कणसे व कंदमुळे दिली. बऱ्याच दिवसांनी भाजलेले व उकडलेले अन्न . दिसताच ते जणू त्यावर तुटून पडले. चांगले अन्न मिळाल्यामुळे त्यांना खूपच उत्साह वाटला.

चंद्रा व डुंगा अंगणात झोपण्याची तयारी करू लागले तेव्हा दंतवर्मासुद्धा त्यांच्यासोबत झोपतो म्हणाले. मंगा त्यांना झोपडीत गवताच्या गादीवर झोपण्याचा आग्रह करीत होता. पण दंतवर्मांना ह्या साहसी मुलांसोबत मोकळ्या आभाळाखाली झोपायचं होतं. काही दिवस एकाकीपणे या गूढ बेटावर त्यांनी घालवले होते, त्यामुळे पुन्हा माणसात आल्यावर त्यांना खूप बोलावंसं वाटत होतं. त्यात त्यांची भाषा समजणाऱ्या चंद्राशी बोलायचं होतं. त्यामुळे गवताच्या मऊ, ऊबदार शय्येवर पडल्यावर त्यांनी स्वत: बोलण्यास सुरुवात केली.

"चंद्रा, तुला माझी हकिकत ऐकणे आवडेल?"

"होय प्रधानजी. मला खूप उत्सुकता आहे." दंतवर्मांनी त्यांना आपली कहाणी सांगण्यास सुरुवात केली. मद्र देशाचा राजा भद्रसेन हा खूप शूर, दयाळू व प्रजावत्सल राजा असल्याने सारी प्रजा सुखी होती. सारी प्रजा राजाला देवासमान मानत असे. रेवतीनगर' ही साम्राज्याची राजधानी होती. अत्यंत सुंदर व प्रगत असं शहर असलेल्या देश-विदेशातील व्यापारी, फिरस्ते, कलाकार या नगरीला सतत भेट देत असत. अनेक उत्सव, महोत्सव या नगरीत सतत होत असत. वेगवेगळ्या स्पर्धा, नाटक, संगीत यांची सतत रेलचेल असायची. दरवर्षीच्या वसंत महोत्सवात विविध मर्दानी खेळांच्या स्पर्धा असत. त्यात कुस्ती, तलवारबाजी, भालेफेक, द्वंद्वयुद्धे अशा स्पर्धा असत. जिंकणाऱ्यांना भरघोस बक्षीस व दरबारी चांगल्या हुद्याची चाकरी मिळत असे. वसंतोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सैन्याच्या विविध कवायती व संचलन होत असे. सैन्याचा
सलाम स्वीकारण्यासाठी स्वत: सम्राट व राजपरिवार उपस्थित राहात असे व हा सोहळा अतिशय नेत्रदीपक असायचा. सारी राजधानी हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असायची.

असं सारं सुरळीत चालू असताना कुठेतरी माशी शिंकली. राजा भद्रसेनाचा भाऊ रुद्रसेन ह्याला राज्य बळकावण्याची ईर्षा निर्माण झाली. त्याने अनेक कट-कारस्थाने सुरू केली. पण त्याची डाळ शिजली नाही. अखेर त्याने एक घाणेरडी चाल खेळली. रेवतीनगरच्या मध्यावर देवी रेवतीचं एक डौलदार मंदिर होतं. ही देवी रेवतीनगरची व सम्राटांची कुलदेवी होती. मंदिरात देवीची भव्य मूर्ती होती. ही मूर्ती भरजडित दागिन्यांनी सजलेली होती व तिच्या डोक्यावर हिरेजडित सोनेरी मुकूट होता. ह्या मुकुटाच्या मध्यावर एक गुलाबी रंगाचा हिरा होता. रेवतीनगरातील प्रजेमध्ये अशी धारणा होती की ह्या दिव्य हिऱ्यातून बाहेर पडणाऱ्या अदृश्य किरणांनी समोरच्या पुष्करणीतील पाणी दैवी बनते व त्यामुळे रेवतीनगरचं आरोग्य, सुख व शांती अबाधित राहते. ह्या पुष्करणीतील पाणी साऱ्या रेवतीनगरमध्ये पिण्यासाठी पुरविले जायचे. पुष्करणीतील जलसाठा कितीही पाणी वापरले तरी कमी होत नव्हता. रुद्रसेनने देवीच्या मुकुटातील हा अनमोल हिरा निखळून काढला व तो घेऊन पळून गेला. हिरा काढत असताना देवीचा अलौकिक सुवर्ण मुकूट विद्रूप झाला. ज्या क्षणी मुकुटातील हिरा काढला गेला त्या क्षणापासून रेवतीनगरमध्ये संकटांची परंपरा सुरू झाली. पुष्करणीतील जलसाठा बघता बघता संपून गेला. पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले. प्रजेमध्ये चित्रविचित्र आजार निर्माण झाले. धुळीची प्रचंड वादळं राजधानीत सतत उठू लागली. राजकन्या चंद्रकला मुकी झाली. तिचं हसणं-खेळणं बंद झालं..

सारी प्रजा हवालदिल झाली. राजज्योतिषांनी राजाला सांगितलं की तीन महिन्यांच्या आत पुन्हा नवा मुकूट व तोच परंपरागत दैवी हिरा देवीच्या डोक्यावर झळकणे आवश्यक आहे. अन्यथा याहीपेक्षा भीषण व गंभीर प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. साऱ्या रेवतीनगरला दैवी कोपाला सामोरे जावे लागेल. हे ऐकून राजा बेचैन बनला. त्याला अन्न गोड लागेना. मुकी झालेली राजकन्या व त्रस्त झालेली प्रजा बघून त्याला अश्रू आवरेनासे झाले. त्याने रुद्रसेनाला शोधण्यासाठी आकाशपाताळ एक केलं. पण रुद्रसेनाचा कुठेच थांगपत्ता लागेना. तो कुठे गडप झाला तेच कळत नव्हतं. नवा मुकूट बनविणे आवश्यक होतं. त्यासाठी दंतवर्मा भरपूर धन घेऊन अलकनंदा नगरीतील एका प्रसिद्ध सुवर्णकाराकडे रवाना झाले होते. त्यासाठी एक जहाज, सोबत दहा माणसे घेऊन ते अलकनंदा नगरीस पोहोचले. तो सुवर्ण मुकूट व देवीचे अन्य दागिने कशा प्रकारचे पाहिजेत, त्यावर कोणती शुभचिन्हे असावीत, नक्षीकाम कसे असावे याची सारी माहिती दंतवर्मांनी विविध चित्रांद्वारे त्या सुवर्णकाराला दिली. त्या सुवर्णकाराने रात्रंदिवस एक करून प्रधान दंतवर्मांना पाहिजे तसा मुकूट व इतर अलंकार बनविले. तो मुकूट एवढा अप्रतिम बनला होता की आता यापुढे असा मुकूट कुणी बनवू शकेल की नाही ते सांगता येणे कठीण होते. फक्त उणीव होती ती मुकुटाच्या मध्यावर हिऱ्यासाठी मोकळ्या ठेवलेल्या खोबणीतील हिऱ्याची! दंतवर्मांनी खूष होत सुवर्णकाराला त्याच्या अपेक्षेपेक्षा भरपूर धन दिलं.

मुकूट व अलंकार असलेली पेटी घेऊन दंतवर्मा पुन्हा मद्र देशाकडे येण्यास निघाले. वाटेत वादळामुळे त्यांचं जहाज भरकटलं व अखेर एक प्रचंड देवमाशाच्या शेपटीच्या तडाख्यानं फुटलं. दंतवर्मांनी मुकूट व अलंकारांची पेटी म्हणजेच तो अनमोल खजिना घेऊन भर समुद्रात उडी घेतली. त्यांच्या .सुदैवाने त्या लाकडी पेटीवर तरंगत तरंगत दंतवर्मा दिवसभरानंतर निळ्या बेटावर पोहोचले. पण आगीतून फुफाट्यात पडल्याचा प्रकार त्यांच्या बाबतीत झाला. या भयावह बेटावरून बाहेर कसं पडावं तेच त्यांना समजेना. दोनतीन वेळा ते शिंगाड्यांच्या तावडीतून कसेबसे निसटले. अखेर हताश होत रेवतीनगरला जिवंत परतण्याची आशाच त्यांनी सोडली. पण एके दिवशी किनाऱ्यावर कुठे जहाज दिसते का हे पाहण्यासाठी आलेले असताना त्यांना एक काचेची बाटली दिसली. कदाचित एखाद्या फुटलेल्या जहाजातील माणसांकडील ती बाटली असावी. याच बाटलीतून त्यांनी एका पानावर संदेश लिहून फारशी अपेक्षा न ठेवता बाटली समुद्रात भिरकावली. हीच बाटली चंद्राला सापडली व तो त्यांचा शोध घेत इथपर्यंत पोहोचला होता. दंतवर्मांची कहाणी ऐकून चंद्रा थक्क झाला. .

---------भाग ८ समाप्त------------------
पुढच्या भागात.. 'शिंगाड्यांशी पुन्हा सामना '