Diwana dil kho gaya - 15 books and stories free download online pdf in Marathi

दिवाना दिल खो गया (भाग १५) (पर्व १ समाप्त)

(हे सर्व ऐकून खरे तर मुग्धाला काय बोलावे तेच कळत नव्हते. पण तिच्या अश्रूंचा बांध तुटला आणि ती अम्माला मिठी मारून रडू लागली. अम्माने तिला शांत केले आणि ती मुग्धाच्या आई वडिलांना म्हणाली, “तुमची मुलगी फार गुणी आणि संस्कारी आहे. मी शोधून पण इतकी चांगली बायको सिलूसाठी शोधू शकले नसते. आमच्याकडून ह्या नात्याला होकार आहे. मी आशा करेन की, तुम्ही या दोघांच्या प्रेमाला समजून घेऊन योग्य तो निर्णय घ्याल. मी सकारात्मक उत्तराची वाट पाहीन. धन्यवाद”, असे बोलून अम्मा, सिलू आणि आप्पांना घेऊन तिथून निघाली. आता पुढे...)

सिलूची फॅमिली निघून गेल्यावर मुग्धा मान खाली घालून खुर्चीवर बसली. तिला वाटले की, आई बाबा आता तिला ओरडतील. पण आजचा दिवस मुग्धासाठी आश्चर्याने भरलेला होता हे तिला कुठे माहीत होते.

मुग्धाचे बाबा मुग्धाला म्हणाले, “मुग्धा मला नव्हते वाटले की, तुझी पसंद इतकी चांगली असेल. सिलू आणि त्याची फॅमिली खूपच चांगली आहे. मला विश्वास आहे तू त्या घरात खूप खुश राहशील. बरे झाले की, तू आम्हाला सिलूबद्दल आधी नाही सांगितलस ते. कदाचित आम्ही दोघांनी तुला होकार दिला नसता. पण सिलूची कास्ट सोडली तर त्याला नकार द्यायचे कोणतेही कारण मला दिसत नाही. जर तुझा आनंद सिलूबरोबर लग्न करण्यात असेल तर आम्ही दोघेही तुझ्या निर्णयाने नक्कीच आनंदी होऊ. बेटा तुझा होकार असेल तर मग आपण पुढची बोलणी नक्की करू. पण या आधी आपल्या घरी सर्वाना ह्याची कल्पना देणे जरूरी आहे. पुढची बोलणी त्यानुसार होतील.” असे बोलून त्यांनी मुग्धाच्या डोक्यावर हात ठेवला. मुग्धाच्या आईने मुग्धाला मिठी मारली. मुग्धा आईला भेटून पुन्हा रडू लागली. पण ह्यावेळा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

सिलूला घरी आल्यावर खूप रीलॅक्स वाटत होते. तरीही मुग्धाचे घरातले कसे आणि काय रीअॅक्ट करतील हा विचार त्याला राहुन राहुन येत होता. सिलूने मुग्धाला कॉल करायला फोन हातात घेतला पण नंतर त्याने तो ठेवून दिला. त्याने मुग्धाच्या फोनची वाट बघायचे ठरविले.

मुग्धाचा होकार मिळताच मुग्धाच्या वडिलांनी घरातल्या सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. सर्वांचे मुग्धावर फार प्रेम होते. म्हणून सगळे ह्या लग्नासाठी तयार झाले. मग मुग्धाच्या बाबांनी अम्माला फोन करून मुग्धाचा सिलूसाठी होकार सांगितला. दोन्ही घरात आनंदाचे वातावरण होते. सगळे घरात एकमेकांचे तोंड गोड करत होते.

सिलू आणि मुग्धाच्या आनंदाला तर पारावार नव्हता. सिलूला तर कधी एकदा मुग्धाला भेटतोय आणि तिला मिठीत घेतोय असे झाले होते. सिलूने मुग्धाला फोन केला. पण मुग्धाने तो कट केला. तिला का कोणास ठाऊक पण आज सिलूशी फोनवर बोलायला सुद्धा खूप लाजायला होत होते.

सिलूला कळत नव्हते की, मुग्धा का फोन कट करतेय ते. मग सिलूने मुग्धाला मेसेज केला त्यामध्ये लिहिले होते की, “हॅलो, माय डिअर वूड बी वाईफ. हाऊ आर यू? मिस यू मुग्धा. कधी तुला भेटतोय असे झालंय. प्लीज मला भेट. आपल्या नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये. संध्याकाळी ५ वाजता. मी तुझी वाट पाहीन. लव यू माय लव.” मुग्धा मेसेज वाचून पुनः लाजली आणि तिने “मी येईन” असा रीप्लाय केला.

आज सिलू कधी ५ वाजतायेत याची वाट पाहू लागला. आज त्याने मुग्धाला सरप्राइज करायचे ठरविले. म्हणून त्याने त्या कॉफी शॉपवाल्याशी बोलून मुग्धासाठी एक सरप्राइज प्लान केले आणि तो मुग्धाची वाट पाहू लागला. इथे मुग्धा सुद्धा खूप एक्ससाइटेड झाली होती सिलूला भेटण्यासाठी. तिने आज बेबी पिंक कलरचा चुडीदार घातला होता. सिम्पल लाइट मेकअप केला होता. तिने आईला सांगितले आणि ती निघाली.

आज रस्त्यावर खूप ट्रॅफिक जाम होते त्यामुळे तिला कॉफी शॉपमध्ये पोहाचायला आधीच उशीर झाला होता. तिने सिलूला फोन केला आणि लवकरच पोहोचेन असे सांगितले. पण १५ मिनिट झाली तरी गाडी काही पुढे सरकत नव्हती. मग मुग्धाने विचार केला की, इथून वीस मिनिटांवर तर कॉफी शॉप आहे. आपण इथेच उतरू आणि चालत जाऊ. असा विचार मनात आणून ती गाडीतून उतरून चालू लागली. तिने रस्त्यावरच्या गाड्या बघून ती रस्ता क्रॉस करीत होती. इतक्यात एक भरधाव गाडी तिच्या दिशेने येऊ लागली. त्या गाडीला येताना पाहून रस्ता क्रॉस करणारे काही लोक मागे फिरले आणि मुग्धाला ही हाका मारू लागले. पण मुग्धा आज स्वत:च्या विचारात होती. तिला कोणाचा आवाज ऐकू आला नाही आणि त्याच वेळेला त्या गाडीच्या धक्याने मुग्धा दूर फेकली गेली. त्या गाडीवाल्याने ब्रेक मारला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

गाडी थांबताच त्यातून एक तरुण खाली उतरला आणि त्याला पाहताच तिथे जमलेली लोकं त्याला मारायला धावली. पण त्याच्या बरोबर असलेल्या बॉडीगार्डनी त्या तरुणाचे संरक्षण केले. त्या तरुणाने मुग्धा पडलेल्या ठिकाणी धाव घेतली आणि तिला उचलून गाडीत ठेवले आणि ती गाडी हॉस्पिटलच्या दिशेने भरधाव निघाली.

डोक्याला मार लागल्यामुळे मुग्धा बेशुद्ध झाली होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिला खूप रक्तस्राव सुद्धा झाला होता. पण वेळीच हॉस्पिटल मध्ये आणल्यामुळे तिच्यावर योग्य वेळी उपचार शक्य झाला.

इथे सिलू मुग्धाची वाट पाहत होता. तिला इतक्यात १० वेळा फोन करून झाला होता. पण तिचा फोन सारखा आउट ऑफ रीच येत होता. सिलूला फार टेंशन आलेले. नक्की मुग्धा राहिली कुठे?

इथे मुग्धावर उपचार सुरू होते. काही तासांनंतर डॉक्टर ऑपरेशन रूम मधून बाहेर आले. तो तरुण अजूनही तिथेच बसला होता डॉक्टर काकांची वाट बघत. डॉक्टरांनी त्या तरुणाला सांगितले की, “शी इज आउट ऑफ डेंजर नाऊ. पण तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे कदाचित तिची स्मृति गेली असावी अशी शक्यता आहे. म्हणून आपल्याला ती शुद्धीवर येईपर्यंत वाट पाहावी लागेल. मगच नक्की काय ते सांगता येईल.” असे बोलून डॉक्टर निघून गेले.

इथे आता सिलूला काही चैन पडत नव्हते. मुग्धाशी बोलून अर्धा अधिक तास झाला होता. त्याने पुन्हा मुग्धाचा फोन डायल केला पण आता तर तो स्विच ऑफ येत होता. सिलूने कॉफी शॉपच्या मॅनेजरला त्याचा नंबर दिला आणि त्याला म्हणाला, “जर कोणी मुलगी मला शोधत ह्या कॉफी शॉप मध्ये आली तर तिला या नंबरवर फोन लावून द्या.”

असे बोलून त्याने अम्माला फोन केला कदाचित मुग्धा त्याच्या घरी गेली असेल अशी त्याला शंका आली पण मुग्धा तर सिलूच्या घरी नव्हती. मग त्याने अम्माला मुग्धाच्या आईला फोन करायला सांगितले आणि स्वत: त्याने पुन्हा मुग्धाचा नंबर डायल केला. पण तो स्विच ऑफच होता.

तेवढ्यात सिलूला साहीलचा फोन आला. सिलूने आतापर्यंत घडलेले सर्व काही त्याला सांगितले आणि तो रडू लागला. त्याला आता मुग्धाची काळजी वाटत होती.

इथे मुग्धा शुद्धीवर आली. आल्यावर तिला कळतच नव्हते ती हॉस्पिटलमध्ये कशी आली. तिने तिथे असलेल्या नर्सला हाक मारली. नर्सने लागलीच डॉक्टरांना बोलावले. तो तरुण बाहेरूनच सर्व काही बघत होता.

डॉक्टरांनी तिला तिचे नाव विचारले. पण मुग्धाला काहीच आठवत नव्हते. तिने खूप आठवण्याचा खूप प्रयत्न केला पण डोक्यावर ताण पडल्यामुळे पुन्हा तिची शुद्ध हरपली.

डॉक्टर बाहेर आले आणि त्या तरुणाला म्हणाले, “माझी शंका खरी ठरली. ह्या मुलीची स्मृति गेली आहे. पण किती आणि केवढी हे काही टेस्ट केल्यावर कळेल.”

“डॉक्टरकाका ह्या मुलीसाठी द्यायला माझ्याकडे अजून बिलकुल वेळ नाही. मला आजच लंडनला निघायचे आहे. पण.. माझ्यामुळे ही मुलगी ह्या अवस्थेत आहे. त्यामुळे मी हिला एकटी सोडू शकत नाही. म्हणून मी हिला माझ्याबरोबर लंडनला घेऊन जाऊ इच्छितो. एकदा का ही बरी झाली की, हिच्या घरच्यांचा शोध घेता येईल. कारण आता मला कशातही अडकायचे नाही.” असे तो तरुण डॉक्टरांना म्हणाला.

त्याने लगेच त्याच्या मॅनेजरला फोन केला आणि जाण्याची सर्व व्यवस्था करायला सांगितली व तो तिथून निघून गेला.

~पर्व १ समाप्त~

(ह्या कथामालिकेचे पहिले पर्व कसे वाटले हे नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.)

@preetisawantdalvi

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED