Gift of your Krishna among us books and stories free download online pdf in Marathi

भेट तुमच्या आमच्यातल्या कृष्णाची

गर्दीतुन वाट काढत ती कशीबशी आत शिरली. एरवी मजेनं प्रवास करणारी ती आज शांतच होती. खरंतर तिची आतल्या आत घुसमट होत होती. एकीकडे आईबाबांना द्याव्या लागणाऱ्या कारणांची जुळवाजुळव करणं चालू होत. सामोसा.... वडा... इडली... असे आवाज आणि निरनिराळे वास तिच्या नाकात शिरत होते. एरवी हवेहवेसे वास आज नकोसे झाले होते. त्याला भेटल्यापासूनच्या सगळ्या घटना आठवतं होत्या. त्याचा चेहराही डोळ्यासमोर नको होता पण.... सारखा तोच आठवतं होता त्याचे ते शब्द पुन्हा पुन्हा घाव घालत होते. का? काय? कशासाठी? कसलाच विचार तिला नको होता. पाल झटकावी तसे विचार तिने झटकले आणि डोळे मिटले कितीतरी वेळ डोळ्यातले गरम अश्रू गालावरून ओघळत तिला मायेची उब देण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. कोणाच्यातरी रडण्याच्या आवाजाने तिला जाग आली समोरच्या सीटवर तिशीचा तरुण एका मुलीला शांत करायचा प्रयत्न करत होता पण काही केल्या ती शांत होत नव्हती.शेवटी त्याने वेडावून दाखवल थोडे डोळे तिरपे करत उगाच वेडेवाकडे चेहरे करूनं दाखवले तशी ती मुलगी खुदकन हसली ते बघून ती ही हसली अगदी मनमोकळेपणाने. सगळ दु:ख जणू गायब झालं होत.त्या तरुणाने दचकून पाहिलं तशी तिला स्वतःचीच लाज वाटली. अ..हं...सॉरी... ते... मी.. हसले.. अगदीच अवघडल्यासारखं झालं बिचारीला. नाही...नाही... असुदे त्यात काय इतकं. काहीवेळ असाच गेला, हळूहळू ती त्या छोटया मुलीशी बोलायला लागली, खेळायला लागली. त्या छोट्या मुलीच्या सहवासात ती अगदी रमून गेली होती. तिचा हसरा चेहरा तिला सुखावत होता. "बराच वेळ झाला हिची आई दिसत नाहीये? असो! मला काय आली असेल तिच्या बाबांबरोबर." तिच्या मनात विचार आला. ती मुलगी झोपली आणि परत हिच्या चेहऱ्यावर परत उदासीनता पसरली. मगाचपासून अप्रत्यक्षपणे ती छोटी परी आपल्या हास्य नावाच्या जादूच्या कांडीने तीच दुःख, नैराश्य गायब करत होती. ती खिडकीतून बाहेर बघू लागली तस तिला सगळ्या हिरवळीत एकच वठलेलं झाड शांतपणे उभ राहिलेलं दिसलं. खरंतर गाडीच्या वेगामुळे ते झाड पाठी पडलं असलं तरी हिच्या विचारांची गाडी मात्र वेगाने धावत होती. ह्याच वठलेल्या झाडासारखं आहे आपल आयुष्य! काय राहिलय आता? कान्हा तूच सांग कशी जगू मी त्याच्याशिवाय? आजच्या भेटीनंतर मी आमच्याबद्दल घरी सांगणार होते. मग लग्न, सुखी संसार अशी सारी स्वप्न मनात अगदी पिंगा घालत होती. नात्याचे रेशीमबंध जोडायची घाई अनावर झाली होती रे अगदी! पण... "तुझ्यावर माझं प्रेम नाहीये तुझ्यात आता काही इंटरेस्ट नाहीये माझं नताशा वर प्रेम आहे आम्ही लग्न करतोय प्लिज वाईट नको वाटून घेऊ मूव्ह ऑन कर". असं म्हणून वळून न बघताही तो निघून गेला. 'मूव्ह ऑन कर' किती सहजपणे सांगून टाकलं अन माझ्या अस्तित्वाचा एका झटक्यात चुराडा करून निघूनही गेला. रेशीमबंध जोडण्याआधीच तुटले रे! त्याचं बोलण कमी झालं होत तेव्हाच समजायला हवं होत प्रेमाचे धागे विरलेत. पण मी वेडी अगदी तुझ्या राधेसारखी ते धागे उगाच बळकट करायचा एकतर्फी प्रयत्न करत होते.पण कान्हा तो कृष्ण नव्हता त्याची योग्यताच नव्हती ती. त्याच तंद्रित ती उठली आणि समोरच्या रॅकवरून बॅगेतून खाण्याचं सामान काढू लागली. पण विचाराच्या तंद्रित डब्याच सैल झालेलं झाकण तिच्या हातात राहील आणि डबा मात्र त्याच्या अंगावर पडला. डब्याच्या आवाजाने ती भानावर आली आणि आपण केलेला पराक्रम तिच्या लक्षात आला ती घाबरली पण तो मात्र शांतपणे ते पुसत होता. ती गडबडीने म्हणाली सॉरी सॉरी ते चुकून झालं मला असं... म्हणजे... ते... तिला अगदीच कसतरी झालं. तो हसून म्हणाला," नाही नाही साऱ्या देशाचा भार तुमच्यावर आहे ना! येणारच विचार असे. बर मी धुवून येतो हे." ती वेड्यासारखी त्याच्याकडेच बघत राहिली "मस्करी केली तुमची आता ह्या गोष्टीचा विचार नका करू." अस म्हणत हसला आणि अचानक तिची नजर त्याच्या गालावर स्थिरावली.ती खळी.... अगदी सोहम सारखी.... "नाही नाही आतां सोहम चा विचार करायचा नाही" असं म्हणत तोंडातल्या तोंडात पुटपुटू लागली "मॅडम तुम्ही असच बघत राहिलात तर हे डाग कसे जातील?" अ.. ते... ती ओशाळाली आणि पटकन बाजूला सरकली. तो उठला आणि वॉशरूम कडे जाऊ लागला, त्याच 'लंगडणं' तिच्या आत्ता लक्षात आल. तो आला तेव्हा ती झोपेत असल्याने तिला कळलं नव्हतं पण आता मात्र तिला त्या छोटीची काळजी वाटू लागली आणि त्याचीही. तिची आई अशी कशी? आपला नवरा लंगडतोय तर सोबत नको का? तो एकटा कस सांभाळेल सगळं? तिला थोडा रागच आला, नाही आता तो आला कि विचारायचंच. तिच्यातल्या ममत्वामुळे तिला त्या छोट्या मुलीची काळजी अन जिज्ञासू वृत्तीमुळे तिच्या वडिलांबद्दल उत्सुकता वाटत होती. तो परत आला आणि पुन्हा तिच्या नजरेत त्याच लंगडणं आलं. थोडं स्थिरस्थावर झाल्यावर तिने गप्पा मारायला सुरुवात केली. हळूहळू दोघांची छान मैत्री झाली. इकडच तिकडच बोलून झाल्यावर शेवटी न राहवून तिने विचारलंच, "अ... एक विचारू?" "हो...विचारा ना!" "तुम्ही असे चालताय म्हणजे लंगडताय का? काही लागलं का? त्यातून माझ्यामुळे उठाव लागलं तुम्हाला..." तिला खरंच खूप वाईट वाटलं आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होत. "नाही हो आता होतेय हळू हळू सवय." "अहो पण झाल काय?" दुखत असेल म्हणून विचारलं. तो हसून म्हणाला, "मी आर्मीत होतो.लढाईच्या दरम्यान पायाच हाड तुटलं ते जुळवायला रॉड घातलाय ते मगाशी ट्रेनमध्ये चढताना कुठेतरी आपटलं असावं कारण पाय दुखतोय माझा . असो होईल हळूहळू सवय." पण मग हिची आई? म्हणजे तुम्हाला मदत झाली असती म्हणून... विचारलं..." शेवटी तिने विचारलंच तसंही तिच्या शंका कुशंकांच निरसन झाल्याशिवाय ती काही शांत बसली नसती. "अहो ही माझी मुलगी नाही म्हणजे सहसा मी नाही सांगत कोणाला मला नाही आवडत रडगाण गायला पण का माहीत नाही तुमच्याशी बोलावं वाटलं आपले जुने संबंध असावे असं वाटतंय." तिला मनोमन बर वाटल जरी त्याला नको असले तरी कोणालातरी हवी आहे बस्स हेच खूप आहे. तिच्या चेहऱ्यावरचं कुतूहल आणि आश्चर्य लपत नव्हतं. तिची उत्सुकता आणखी न ताणता तो म्हणाला, "ही माझी पुतणी , माझ्या सख्ख्या भावाची मुलगी." "ओह मग तुमचे भाऊ ते दिसत नाहीत?" तो खिन्नपणे हसून म्हणाला, "खरतर माझा दादा आणि वहिनी अपघातात गेले आत्ताशी वर्ष झालं. मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा पण मुक्तासाठी मला उभ राहवंच लागलं. तिला तरी कोण आहे माझ्याशिवाय?"" मग तुमचे आई बाबा?" "आई लहानपणीच गेली 'दुसरी' आई आम्हाला प्रेम देऊ शकेल का नाही दिल तर काय? शिवाय तेव्हा परिस्थिती थोडी बिकट होती आमची , फार वादळ घोंगावत होती आम्हा तिघांच्या आयुष्यात. बाबांनी दुसऱ्या लग्नाचा विचार सोडून दिला. बिझनेस पुन्हा चालू केला.दादानेही शिक्षण घेत त्यांना मदत केली. मला मात्र आर्मी ची आवड सैन्यात भरती होण्याचं स्वप्न उरी घेऊन भराऱ्या मारू लागलो शिवाय बाबांचा बिझनेस ही चांगला चालला होता. लक्ष्मीच्या पावलांनी माझी वहिनी जणू आईच्या रुपात परतली. सगळंच किती दृष्ट लागण्यासारखं! आणि शेवटी दृष्ट लागलीच.बाबा अटॅक येऊन गेले माझे. साधा उपचार करायला वेळ मिळाला नाही. त्यानंतर काही वर्षांनी माझ्या पायाच दुखणं आणि आता दादा वहिनी मुक्ताला माझ्याकडे सोपवून कायमचे आई बाबांजवळ गेले. शेवटी मी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि आता मुक्ताला सांभाळत बिझनेस बघतोय. मुक्तासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. माझ्या दादावहिनीची ही शेवटची आठवण.पैसा चिक्कार आहे. पण आपल्या माणसांची कमी आहे. असो मी मुक्ताला आणि मुक्ता मला बास बाकी कोणाची गरज नाही." त्याने अगदी प्रेमाने मुक्ताच्या डोक्यावरून हात फिरवला. "मुक्ताला मोठं करणं हेच माझं ध्येय. आता मुक्ताच माझं जीवन!" काही क्षण असेच शांततेत गेले. गाडीचा भोंगा वाजला अन आपलं 'स्टेशन ' आल्याची जाणीव दोघांना झाली. त्याने प्रेमाने मुक्ताला उठवलं.तीने मुक्ताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिला खाऊ दिला. तिने सामान घ्यायला आणि मुक्ताला खाली उतरवायला मदत केली आणि ते स्टेशन वर उभे राहिले . एक सांगू मॅडम? हो सांगा ना! ती अधीरतेने म्हणाली. "आयुष्य ना या ट्रेन सारखच असत कधी वेगाने कधी मंद गतीने ते चालूच असत. संकटरूपी स्टॉप अडवतील कदाचित काही काळासाठी पण ते कधीच कायमच नाही थांबवू शकत आपल्याला आणि आयुष्य कस जगाव हे आपल्या हातात असत. बरेचदा मलाही वाटलं आत्महत्या करावी.इतका मनाला त्रास व्हायचा आई बाबांना शोधणारा माझ्या मुक्ताचा केविलवाणा चेहरा पाहिला अन मी लढायचं ठरवलं आणि मग माझ्या लक्षात आलं आपण आर्मीच तत्व विसरलो. आपण भ्याड नाही योद्धा आहोत. हजारो लोकं सुखात राहावीत म्हणून शीर तळहातावर ठेवून लढणारे आपण इतके कमजोर ? नाही...कधीच नाही. सॉरी जरा जास्त बोललो असेन तर पण तुमच्यात मला मैत्रीण दिसली.... मला समजून घेणारी.... बहीण दिसली... मला सावरणारी..... बर येतो मी बाय."असं म्हणत मुक्ताला घेऊन तो निघाला. तो पुढे गेला पण ती मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत कितीतरी वेळ तशीच उभी होती. तिला ते वठलेलं झाड आठवल पण ते आता ते धुसर दिसत होत आणि धूसरशी दिसणारी हिरवळ मात्र स्पष्ट दिसू लागली होती. आपण एका घटनेमुळे आपलं आयुष्य उध्वस्त झालं असं समजून हार मानली आपल्या आईबाबांचा विचार न करता! प्रेम जरी महत्वाच असलं तरी ते प्रत्येकवेळी प्रियकर प्रेयसी याच रूपात असेल असं नाही ना! सोहमपुढे गेली २५ वर्ष अगदी त्याही आधी माझ्यावर प्रेम करणारे माझे आई बाबा मला कसे दिसलें नाहीत ? मनात आत्महत्येचे विचार चालू होते पण आईबाबांना भेटाव शेवटचं म्हणून तू थांबलीस ना ग? मग नंतर काय होईल त्याचा नाही विचार केलास? ती स्वतःशीच बोलत होती. आपण हे एकचं संकट झेलतो तरी रडतो आणि लोक मात्र एकाचवेळी २- २ संकटांशी एकटेच झुंजत असतात.नाही नाही आता आपण रडायचं नाही लढायचं. तिच्या डोळ्यासमोर नकळत कृष्ण आणि अर्जुन उभे राहिले. प्रत्येकवेळी ते दोघ दिसलें कि तात्विक चर्चा आणि सखोल भाष्यच आठवतं आपल्याला. पण आज अर्जुनाच्या सख्याने त्याला अगदी सोप्या भाषेत उपदेश केला होता तोही अप्रत्यक्षपणे. का जगू? कशी जगू? या प्रश्नाच उत्तर त्या कान्हाने दिल होत.क्षणभर तिला आपण अर्जुन असल्याचा भास झाला अन भेटलेला 'तो' कृष्ण. हो, तिला आज 'कृष्ण' भेटला होता तोही एका वेगळ्याच रूपात.....

इतर रसदार पर्याय