साक्षीदार - 5 Abhay Bapat द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

साक्षीदार - 5



साक्षीदार
प्रकरण ५
ईशा अरोरा पाणिनी च्या ऑफिसात बसून मुसमुसत होती. पाणिनी तिच्या कडे कोणतीही सहानुभूती न दाखवता बघत होता.
“ तुम्ही हे करायला नको होत.” ईशा म्हणाली.
“ काय?” पाणिनी म्हणाला.
“ त्याला भेटायला नको होत तुम्ही.अत्यंत निर्दयी आहे तो.”
“ त्याच्या पेक्षा मी जास्त आहे.”
“ तुम्ही त्यांच्या म्हणण्या प्रमाणे पेपरात जाहिरात का नाही दिली?” –ईशा
“ फार पैसे मागत होते ते.त्यांना वाटलं आपण नमवू शकू ” पाणिनी म्हणाला
“ तुम्ही घरी येऊन अरोराला धमकी द्यायला नको होती.धमकी ने घाबरणारा माणूस नाहीये तो.मांजराला जसं कोपऱ्यात घेरलं तर ते उलटून हल्ला करतं ना ,तसा तो आहे. ”-ईशा
“ काय करेल तो करून करून?”
“ तो तुम्हाला बरबाद करेल.त्याच्या कडे वकीलांचा ताफा आहे.जगातल्या प्रत्येक कायद्यातल्या तरतुदी नुसार तो तुम्हाला कशात तरी अडकवेल.तो न्यायाधीशांना सुद्धा लाच देऊन तुमच्या विरुद्ध निकाल द्यायला लावेल.तुम्ही कुठेही गेलात तरी तो तुम्हाला शोधून काढेल ” ईशा म्हणाली.
“ ज्या क्षणी तो पेपरात माझं नाव आणायचा प्रयत्न करेल त्या क्षणी मी त्याच्यावर अब्रू नुकसानी चा दावा लावीन.” पाणिनी म्हणाला
“ तुम्ही आलातच का आमच्या घरी? फार चूक केलीत तुम्ही. ”
“ तू पहिल्यांदा इथे आलीस तेव्हाच जर मला तू मोकळेपणाने सगळ खरं सांगितलं असतंस तर ही वेळ आलीच नसती.”
“ पण मी तर तुम्हाला सगळ सांगितलंय ”
“ ठीक आहे मला काय माहित आहे हे तू मला पुन्हा सांग म्हणजे मला तपासता येईल.” पाणिनी म्हणाला
“ दधिची अरोरा आणि मिर्चमसाला चा संबंध कोणालाही कधीही शोधून काढता आलेला नाही अजून पर्यंत.त्याने स्वतःला त्यापासून अत्यंत हुशारीने लांब ठेवले. मिर्च मसाला च्या ऑफिस मध्ये सुद्धा दधिची मालक असल्याचं कोणाला माहिती नाही.अपवाद फक्त फिरोज लोकवाला. आणि तो दधिची च्या जवळचा आणि पूर्ण नियंत्रणा खालचा माणूस आहे.”
“ फिरोजवर अरोराचा एवढा वचक कसा? ” पाणिनी म्हणाला.
“ मला सविस्तर माहिती नाही पण बहुतेक खुनाची काहीतरी भानगड आहे जी दधिची ला माहिती आहे.”
“ तू आणि अरोरा नवरा बायको आहात हे मला माहीत नव्हत.”
“ आमचं सात महिन्यापूर्वी लग्न झालं.मी त्याची दुसरी बायको आहे.खरं सांगायचं तर मी त्याच्या पैशाकडे बघून लग्न केलंय.आमच्यात पती पत्नी म्हणून संबंध नाहीत.मागच्या दोन महिन्यात तर ते अधिकच फाटलेत.मी त्याच्या पासून घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज करणार होते.”
तिने पाणिनी कडे, तो काही बोलेल या अपेक्षेने पाहिले.त्याचा चेहेरा मक्ख होता.
“ दोन महिन्या पूर्वी माझी हृषीकेश बक्षी शी ओळख झाली. मैत्री झाली. एकमेकांना आम्ही भेटायला लागलो आणि नेमका तो होल्ड अप चा आणि खुनाचा प्रसंग उद्भवला.बक्षी बरोबर मी होते हे त्याला उघड करावं लागलं असतं त्याचे राजकीय जीवन उध्वस्त झालं असतं कारण दधिची ने माझ्यावर दावा लावला असता आणि माझा सहकारी म्हणून हृषीकेश चं नाव गोवल असतं.त्यामुळे मला ते सर्व पटकन मिटवून टाकायचं होत.”ईशा म्हणाली.
“ अशीही शक्यता होती की तुझ्या नवऱ्याला ते समजलं नसतं,कारण कमिशनर खूप चांगला आहे आणि हृषीकेश ने जर त्याला सर्व नीट सांगितलं असतं तर तुला त्याने विनाकारण साक्षीला बोलावलं नसतं. ” पाणिनी म्हणाला
“ मिर्च मसाला कसं काम करतात तुम्ही ओळखलं नाही अजून.जेव्हा एखादी मोठी व्यक्ती लफड्यात अडकते तेव्हा त्या गोष्टीची ते खूप बारीक सारीक माहिती काढतात.त्यासाठी त्यांना कितीही श्रम पडोत.हृषीकेश हा राजकारणातला उगवता तारा आहे.आणि त्याचं आणि मिर्च मसाला चं पहिल्यापासूनच जमत नाही. माझा नवरा आणि लोकवाला यांचं फोन वरील संभाषण मी ऐकलंय.म्हणून तर मी तुमच्या कडे आले,आम्ही दोघे एकत्र होतो हे समजा समोर जाऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करावेत यासाठी. ”
“जर तुझी आणि हृषीकेश ची मैत्री एवढी निर्मळ आहे तर तू तुझ्या नवऱ्याला स्पष्टपणे सांगत का नाहीस वस्तुस्थिती काय आहे ती? कारण असे आहे की त्याच्या बरोबर तुझं नाव येणे हे त्याचीही इज्जत गमावण्यासारखं आहे ” पाणिनी म्हणाला
“तुम्हाला त्याच्या बद्दल काहीच माहित नाहीये. तो अत्यंत क्रूर आणि निर्दयी माणूस आहे. त्याला माहिती आहे की मी जर त्याच्यावर घटस्फोटासाठी दावा लावला तर मला खूप मोठी पोटगी द्यावी लागेल त्याला, त्यामुळे तो माझ्याविरुद्ध काही सापडतोय का हे बघायला टपलेलाच आहे. जर हृषीकेश बरोबर मी होते हे त्याला कळलं तर मला नमवण्यासाठी त्याला अक्षरशः आयतं कुरण मिळेल” ईशा म्हणाली.
“ त्यांनी माझ्याकडे जेवढ्या किमतीची मागणी केली आहे ती फार मोठी आहे. मला संशय आहे की हृषीकेश तुझ्या बरोबर होता याचा त्यांना संशय आलाय.” पाणिनी म्हणाला
“नाही तशी शक्यता नाही ” ईशा म्हणाली
पाणिनी पटवर्धन थोडा वेळ गप्प बसला.
“काय करायचं आपण? त्यांनी सांगितलेली किंमत द्यायची?”
“आता किंमत वगैरे काही नसणार. दधिचीला हे कळलय, त्यामुळे तो कुठल्याही प्रकारची तडजोड करायला आता तयार होणार नाही.
याचं कारण असं की या प्रकरणात तुम्ही आहात हे त्याला कळलं त्यामुळे त्याला हे .ही कळलं की तुम्ही त्याला या प्रकरणात पूर्ण पोहोचवू शकता त्यामुळे आता तो कुठलीही तडजोड न करता शेवटपर्यंत लढणार”
“ठीक आहे” पाणिनी पटवर्धन म्हणाला “त्याला लढायचं असेल तर मी ही शेवटपर्यंत लढायला तयार आहे माझं नाव त्यांनी मिर्च मसाला मध्ये टाकलं की मी त्याच्या विरुद्ध दावा ठोकलाच म्हणून समज. मी फिरोज लोकवाला ला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं करून मान्य करायला लावेन की मिर्च मसाला चा खरा मालक कोण आहे. नाहीतर मी त्याला खोटी साक्ष दिल्याबद्दल शिक्षा करायला लावीन. असे बरेच लोकवाला आहेत की ज्यांना मिर्च मसाला ला धडा शिकवायची इच्छा आहे” पाणिनी म्हणाला
“अहो तुम्हाला समजत नाहीये का असं झालं तर तुम्ही आणि दधिची मधलं भांडण कोर्टात चालू राहील आणि मी तुमच्याकडे ज्याच्यासाठी आले तो विषय दूरच राहील.
पाणिनी पटवर्धन आपली बोट तबला वाजवल्या सारखी टेबलवर आपटली हे बघ तू मला एक हिंट दिलीस थोड्यावेळापूर्वी की तुझ्या नवऱ्याचा फिरोज लोकवाला वर कसला तरी वचक आहे. मला आता असं वाटतंय की तुला नेमकं काय आहे हे पूर्ण माहिती आहे. समज तू ती माहिती मला दिलीस तर मला वाटतं मी फिरोज लोकवाला ला या मुद्द्यावरून गुडघे टेकायला लावू शकतो.”
हे वाक्य ऐकल्यावर तिचा चेहरा एकदम पांढरा पडला.
“ तुम्ही काय बोलतोय तुम्हाला कळतय कळतय का? यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत अनेक गुंड आणि खुनी यांच्याशी त्यांची मैत्री आहे” ईशा म्हणाली
पाणिनी पटवर्धन वर तिच्या बोलण्याचा काही परिणाम झाला नाही.
“ फिरोज लोकवाला बद्दल तुला काय माहिती आहे? ” त्याने पूर्वीच्याच थंडपणे पुन्हा विचारलं. तिने आपली नजर खाली केली आणि थोड्या वेळाने ती म्हणाली, “ काही नाही.”
“ हे बघ, प्रत्येक वेळेला तू इथे येतेस आणि माझ्याशी काहीतरी खोटं बोलून जातेस अत्यंत खोटारडी आहेस तू.तुला वाटतं की आपण दिसायला सुंदर आहोत म्हणून आपण समोरच्याला फसवू शकू. आत्तापर्यंत तुझ्या सौंदर्याच्या जोरावर तुझ्या प्रेमात पडलेल्या प्रत्येक माणसाला तू फसवल असशील आणि आता तू अडचणीत आहेस तरी मला फसवते आहेस. पाणिनी म्हणाला
एकदम आश्चर्यानं आपला चेहरा लांबुळका करून तिने त्याच्याकडे बघितलं
“असं काहीही मला बोलायचा तुम्हाला अधिकार नाहीये.” ती किंचाळून म्हणाली.
“मसणात गेले अधिकार.” पाणिनी ने तिला उत्तर दिलं.
दोघांनी एकमेकांच्या नजरेला नजर नजर दिली शेवटी तिने पराभूत होऊन आपली मान खाली घातली.
“ आहे. त्याच्या आयुष्यात काही तरी घडलय. नेमकं कुठे आणि कधी मला माहीत नाही पण काहीतरी बाईची भानगड आहे कदाचित काहीतरी खुनाची भानगड असावी आणि ती दधिची ला माहिती आहे दधिची ची दुसऱ्याशी व्यवहार करायची हीच पद्धत आहे. तो आधी दुसऱ्या ची पूर्ण माहिती काढतो आणि मग त्याला असा काही वेठीस धरतो की दधिची म्हणेल ते त्याला ऐकावच लागतं”. ईशा म्हणाली.
“अच्छा आणि तुलाही तो याच पद्धतीने हाताळतो तर !” पाणिनी म्हणाला
“ हो म्हणजे तसा प्रयत्न करतो तो.” ईशा म्हणाली.
“ आणि याच पद्धतीने त्याने तुला त्याच्याशी लग्न करायला लावलं का?” पाणिनी म्हणाला.
“मला माहित नाही. म्हणजे नसेल” ईशा म्हणाली. “पण त्याने काय फरक पडतोय?”
“ पडेल किंवा पडणार ही नाही.” पाणिनी म्हणाला. “बर मला थोडे पैसे लागणारेत खर्च करायला” त्याचं बोलणं ऐकून तिने आपली पर्स उघडली.
“आता माझ्याकडे फार नाहीयेत. तीस हजार आत्ता देते.”
पाणिनी ने नकारार्थी मान हलवली.
“ नाही तेवढे नाही पुरणार. तुझं बँकेत खाते असेल की. मला जास्त पैसे लागतील कारण आता मला तुझ्या बरोबर माझ्या स्वतःसाठी सुद्धा लढायचंय तू तुझ्या खात्यातला चेक मला दिलास तरी चालेल.” तो तिला म्हणाला.
“ नाही मी चेक नाही देऊ शकणार. खरं म्हणजे माझ्या खात्याला मी चेकबुक घेतले नाहीये म्हणजे दधिची ने मला ते घेऊच दिलं नाही. अशीच त्याची पद्धत असते. दुसऱ्यावर कुरघोडी करायची माझे पैसे असले तरी मला तो सहजी काढून देत नाही मला त्याच्याकडं रोख रक्कम घ्यावी लागते दरवेळेस एक तर रोख किंवा दुसर्‍या कुठल्या तरी मार्गाने.” ती म्हणाली
“ दुसऱ्या मार्गाने म्हणजे?” पाणिनी न विचारलं
ती काही बोलली नाही तिने तिच्या पर्समधून नोटांची भेंडोळी काढली
“हे घ्या. अगदी माझ्या पर्समध्ये होते तेवढे सगळे तुम्हाला दिलेत” ती म्हणाली
“ ठीक आहे असं असं कर, शंभर दोनशे तुझ्याकडे ठेव खर्चासाठी. आणि बाकीचे मला दे” पाणिनी म्हणाला
त्याने बेल वाजवली ऐकून बाहेरून सौम्या सोहोनी आत आली. “,एक पावती तयार कर या बाईला देण्यासाठी. आधी जशी केली ती त्याच पद्धतीने कर म्हणजे आपल्या खात्यात या रकमेची एन्ट्री कर आणि त्याचा स्क्रीन शॉट हिला दे” पाणिनी म्हणाला
ईशा ने पाणिनी पटवर्धन कडे पैसे दिले त्याने ते घेऊन सौम्या कडे दिले ईशा आणि सौम्या दोघी एकमेकांकडे दोन मांजरी एकमेकांकडे बघतील कशा पद्धतीने बघत होत्या. पैसे ताब्यात घेऊन सौम्या फणकार्‍याने बाहेर गेली.
“ ती तुला याची पावती देईल.” पाणिनी म्हणाला “तुझ्याशी आता संपर्क करायचा असेल तर कसा करायचा मी? त्याने तिला विचारलं
“घरी फोन करा, मी मोबाईल वापरत नाही,म्हणजे दधिची मला वापरू देत नाही.मला तो घरी आलेला फोन पण घेऊ देत नाही. तुम्ही माझ्या नोकराणी ला बोलून घ्या,फोन केल्यावर. तिला सांगायचं की तुम्ही टेलर म्हणजे ईशाचे शिंपी बोलत आहात. आणि तिला सांगा की मला म्हणजे ईशा ला हवा असलेला ड्रेस मिळालेला नाही.”
“असा काय विचित्र मेसेज?” पाणिनी न विचारलं.
“ ते विचारू नका तुम्ही. त्याचा अर्थ काय होतो ते मी तिला समजून सांगेन. तिचं काम एवढेच आहे की तिला जो मेसेज मिळाले तो तिने जसाच्या तसा माझ्यापर्यंत पोचवायचा.” ईशा म्हणाली
पाणिनी ला हसू आलं. “ ही तुझी नेहमीची पद्धत दिसते एकमेकांचे निरोप पोचवायची” पाणिनी तिला म्हणाला
तो काय बोलतो आहे हे न समजल्या सारखा तिचा चेहरा निष्पाप होता. पाणिनी आपल्या जागेवरून उठला टेबलाला वळसा घालून तिच्याजवळ आला आणि म्हणाला “असा हा निष्पाप आणि निर्व्याज्य चेहरा करण्याचा जो अभिनय आहे ना तो तू माझ्यासमोर दाखवू नकोस दुसऱ्या कोणासाठी तरी राखून ठेव. तू मला आणि मी तुला पूर्ण ओळखल आहे एव्हाना. तू चांगलीच लटकली आहेस आणि मीच तुला यातून सोडवीन याची जाणीव ठेव” पाणिनी म्हणाला
ती खुर्चीतून उठली आणि एकदम तिने आपले हात त्याच्या खांद्यावर ठेवले
“मिस्टर पटवर्धन तुम्ही माझा आत्मविश्वास खूप वाढवलाय. माझ्या नवऱ्याला पुरून उरेल असं जर कोणी असेल तर ते तुम्ही आहात असा मला विश्वास वाटतो. मला खात्री वाटते की तुम्ही मला नक्कीच वाचवाल.” बोलता बोलता ती पाणिनी च्या एकदम जवळ आली आणि आपले ओठ त्याच्या ओठा जवळ नेले. पाणिनीने तिचे मनगट धरून तिला दूर केलं.
“ सुरुवातीला तरी, जोपर्यंत तू मला रोख रक्कम देतेस तोपर्यंत मी तुला वाचवीन.” तो तिला म्हणाला
“ तुम्हाला पैशा शिवाय दुसरं काही सुचत नाही का हो?” तिने त्याला विचारलं.
“ नाही या खेळात तरी नाही” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही एकमेव असे आहात की ज्याच्यावर मी अवलंबून राहू शकते” ती म्हणाली
“ माझा तो व्यवसाय आहे आणि त्यासाठीच मी इथे आहे” पाणिनी म्हणाला
तेवढ्यात बाहेरच्या ऑफिस दरवाजा उघडला आणि ती झपाट्याने बाहेर निघून गेली.
“ थँक्यू ” जाताना ती म्हणाली आणि तिने दार बंद करून घेतलं पाणिनी त्याच्या टेबलावर येऊन बसला.
“ सौम्या, मला कनक ओजसचा नंबर लावून दे ” इंटर कॉम वर सौम्या ला सूचना देत पाणिनी म्हणाला कनक फोन वर आला तेव्हा पाणिनी त्याला म्हणाला, “नीट ऐक, तुझ्यासाठी एक काम आहे माझ्याकडे आणि ते काम एकदम पटकन करायचे.मिर्च मसाला या मासिकाचा फिरोज लोकवाला हा एकदम स्त्रीलंपट माणूस आहे. त्याची एक कोणतरी मैत्रीण आहे हॉटेलमध्ये तो तिच्याबरोबर मौज मस्ती करत असतो .ती तिथे राहते जेव्हा तो तिला फिरायला बाहेर घेऊन जातो. तेव्हा स्वतः ही सलूनमध्ये जाऊन मस्तपैकी फेशियल वगैरे करून येतो. तो कुठेतरी दक्षिण भारतात पूर्वी राहायचा. नक्की कुठे ते माहीत नाही आणि जेव्हा तो तिथं ल सगळ सोडून इकडे आला तेव्हा तिथे काहीतरी एका भानगडीत अडकला होता. तू तुझी माणसं त्याच्यामागे लाव आणि त्याची सगळी इत्यंभूत माहिती काढून मला दे.”
“ करतो.”कनक म्हणाला.
“ या सगळ्याला किती खर्चात टाकणार तू मला?” पाणिनी म्हणाला.
“ सुरुवातीला पंधरा हजार. नंतरच्या आठवड्यात आणखी पाच हजार.”
“ मला नाही वाटत मी एवढी रकम माझ्या अशिला कडून घेऊ शकेन.” पाणिनी म्हणाला
“ जेवढी होईल तेवढी घे बाकीचे तुझ्या नफा तोटा खात्याला टाक” कनक म्हणाला.
“ठीक आहे कर सुरुवात” पाणिनी म्हणाला
“ अरे हो तुला एक सांगायचं राहिलंच तुला मी फोन करणार होतो खाली एक मोठी शेव्हर्ले गाडी आपल्या बिल्डिंगच्या समोरच लावलेली दिसली मला मगाशी. आत शोफर सुद्धा बसला होता. मला शंका आहे की तुझ्याकडे आलेली ती रहस्यमय स्त्री आहे ना , तिनेच ती गाडी आणलेली असावी. त्या गाडीचा नंबर मी लिहून घेतलाय त्याचा पाठलाग करू का?” कनक ने विचारलं
“ नको तिच्याशी कसा संपर्क करायचा मला कळलंय. ते विसरून जा आणि मी सांगितलेलं फिरोज लोकवाला ची माहिती काढायचं काम कर” पाणिनी म्हणाला
“ ठीक आहे” कनक म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला.
सौम्या दारात उभी होती.
“ गेली का तुझी लाडकी?” पाणिनी म्हणाला.
तिने होकारार्थी मान हलवली. “मी तुम्हाला सांगते सर, ती बाई तुम्हाला अडचणीत आणणारे” सौम्या म्हणाली.
“ हो तू यापूर्वी पण सांगितलं आहेस मला.” पाणिनी म्हणाला.
“ हो माहितीये मला, पण तरी मी पुन्हा सांगते तुम्हाला” सौम्या म्हणाली “ म्हणजे ती नाही आवडत मला, ज्या पद्धतीने ती वागते, ज्या पद्धतीने तिने कपडे घातलेत ते सगळंच मला विचित्र वाटतं आणि आमच्यासारख्या नोकरी करणाऱ्या मुलींसमोर ती ज्या पद्धतीने वागते ते मला नाही आवडलं”
“आपली खूप अशील अशी आहेत.” पाणिनी म्हणाला
“ते माहिती मला पण ही वेगळी आहे माझा असा अंदाज आहे की तिला दुसऱ्याला फसवायला आवडतं आणि माझं खात्री आहे की तिच्या फायद्यात असेल तर स्वार्थासाठी ती तुमचाही बळी द्यायला कमी करणार नाही.”
“ मला सावध केलंस बर झाल सौम्या.” विचारात पडून पाणिनी म्हणाला आणि गप्प राहिला. “पण त्यात तिचा फायदा नाहीये काही.” तो स्वतःही फुटल्यासारखं पुटपुटला . सौम्या ने त्याच्याकडे क्षणभर बघितलं आणि ती दार बंद करून निघून गेली.
प्रकरण-५ समाप्त