साक्षीदार - 6 Abhay Bapat द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

साक्षीदार - 6



साक्षीदार
प्रकरण ६
हृषीकेश बक्षी उंचापुरा आणि रूबाबदार माणूस होता त्याने स्वतःचा एक वेगळेपणा जपला होता. पक्षांमध्ये तर त्याचं स्थान चांगलं होतच पण सर्वसामान्य लोकांना तो स्वतःचा मित्र वाटत असे. लवकरच होणाऱ्या निवडणुकांच नियोजन करण्यात तो सध्या व्यस्त होता
“सागरिका हॉटेल मध्ये झालेल्या होल्ड अप आणि गोळी बारा बद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे” हृषीकेश बक्षी ला पाणिनी म्हणाला. पण हृषीकेश ने त्यावर काही प्रतिसाद दिला नाही तेव्हा पाणिनी म्हणाला,
“त्यावेळेला एका विवाहित स्त्री बरोबर तुम्ही तिथे उपस्थित होतात”
आपल्या पोटात एखादा गुद्दा बसल्यावर माणसाला कसं होईल तसा हृषीकेश चा चेहरा झाला. त्याने आवंढा गिळला. मोठ्या प्रयत्नपूर्वक आपल्या चेहऱ्यावर कुठलेही भाव न आणता तो पाणिनीला म्हणाला, “मिस्टर पटवर्धन, मला वाटतं तुम्हाला चुकीची माहिती मिळाल्ये आणि खरं म्हणजे आत्ता दुपारी मला खूप अपॉइंटमेंट आहेत. माफ करा पण मला आता बोलता नाही येणार तुमच्याशी”
पाणिनी पटवर्धन ला हे अपेक्षित होतेच. “हे बघा हृषीकेश, तुम्ही खूप मोठ्या अडचणीत आलाय”. पाणिनी म्हणाला “गोलमाल बोलत तुम्ही जेवढा वेळ काढाल तेवढ्या तुमच्या अडचणीत वाढ होणार आहे हे लक्षात घ्या.”
“ पण मला तर तुमच्या बद्दल काहीच माहित नाहीये तुमची ओळख पण मला तुम्ही करून दिलेली नाही” हृषीकेश बक्षी म्हणाला
या प्रकरणात तुम्हाला माझी ओळख काय आहे हे महत्त्वाचं नाहीये माझं ज्ञान किती आहे हे तुमच्या दृष्टीने महत्त्वाच आहे. मी एका स्त्रीचे वकीलपत्र घेतल आहे. तुमच्याबरोबर त्या रात्री गोळीबार आणि होल्ड अप झाला त्यावेळी ती उपस्थित होती. मिर्च मसाला ही तुमची संपूर्ण हकीगत छापून आणणार आहे. आणि ते अशीही मागणी करणार आहेत की तुम्हाला न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात यावं आणि तुमच्या बरोबर कोण होतं आणि तुम्हाला काय काय माहिती आहे हे तुम्हाला सांगणं भाग पाडावं.” पाणिनी म्हणाला
हृषीकेश आता मात्र हबकून गेला त्याने आपल्या दोन्ही हातांनी समोरचे टेबल घट्ट धरलं.
“ काय हवय तुम्हाला?” त्याने विचारलं
“तुम्ही यापूर्वी ऐकलंय” पाणिनी म्हणाला
“तिने मला हे कधीच सांगितलं नाही. असं कसं झालं की ही बातमी मी तुमच्याकडून ऐकतोय” बक्षी ने विचारलं.
“ याचं कारण असं कि जी स्त्री तुमच्या बरोबर होती तिला तुमच्या बरोबर असल्याचं दाखवायचं नव्हतं. तिला स्वतःची ही काळजी घ्यायची होती. मी तुमच्या दोघांच्याही हिताचे आहे ते करणार आहे पण त्यासाठी पैसा लागणार आहे.त्या बाईकडे तेवढा पैसा नाहीये आणि त्या बाईचा स्वभाव बघता ती तुमच्याकडून यासाठी पैसे घेईल असं मला वाटत नाही म्हणून मी आत्ता तुम्हाला भेटायला आलोय” पाणिनी म्हणाला
“अच्छा म्हणजे तुम्हाला पैसे हवेत माझ्याकडून ?” हृषीकेश बक्षी ने विचारलं
“ अर्थातच ! आणखीन काय हवे असणार मला तुमच्याकडून?” पाणिनीने त्याला प्रतिप्रश्न केला
हृषीकेश पुढची काही मिनिटं अतिशय शांत बसला डोळे मिटून. बहुधा तो पाणिनी पटवर्धन ने सांगितलेल्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत असावा.
“ देवा रे! तसं झालं तर मी पुरता बुडूनच जाईन. माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल” तो एकदम उदगारला.
पाणिनी काहीच बोलला नाही
“ पण मिर्च मसाला ला पैसे देऊन थांबवता येईल.” तो म्हणाला. “मला माहित नाही ते कशा पद्धतीचे काम करतात पण काहीतरी जुगाड जमवून काही तरी करार करून तुम्ही ते प्रकरण हाताळा शेवटी तुम्ही वकील आहात तुम्हाला माहिती आहे कसं करायचं”
“ आत्ताच्या घडीला परिस्थिती अशी आहे की मिर्च मसालाला पैसे देऊन गप्प बसवता येईल अशी स्थिती नाही. सुरुवातीला त्यांनी पैशाच्या गोष्टी केल्या माझ्याशी पण ते फार म्हणजे फारच रक्कम मागत होते पण नंतरच्या काळात अशा काही घटना आणि घडामोडी घडलेत की पैसे देऊन गप्प बसण्याचा विषय मी करू शकत नाही आता आम्ही समोरासमोर लढायलाच उभे आहो असे समजा” पाणिनी म्हणाला
“मिस्टर पटवर्धन मला वाटतं तुम्ही फार मोठी चूक करत आहेत पैसे देऊ केले तरीसुद्धा ते आपल्याला हवं तसं करणार नाहीत असं तुम्हाला का वाटतं हेच मला समजत नाही”. हृषीकेश म्हणाला.
“ तुम्हाला लक्षात येत नाही कारण ? “पाणिनी न विचारलं
“ नाही बिलकुल लक्षात येत नाही”
“तुम्हाला मी आता आतली बातमी सांगतो. मिर्च मसाला चा मागचा मुख्य सूत्रधार हा दधिची अरोरा आहे आणि तुम्ही त्या दिवशी ज्या स्त्रीच्या बरोबर होतात ती दधिची अरोरा ची बायको आहे आणि ती आता दधिची बिल्डरला घटस्पोट देण्याच्या तयारीत आहे तेव्हा मिस्टर बक्षी, या सगळ्याचा नीट विचार करा आणि तुमचा निर्णय द्या मला.”
बक्षी चा चेहरा एकदम निस्तेज झाला. “अशक्य आहे तो म्हणाला अरोरा असल्या काही भानगडीत पडेल असं मला अजिबात वाटत नाही. तो अत्यंत सभ्य गृहस्थ आहे.”
“ असेल तो पण तो मिर्च मसाला चा मालक आहे ही वस्तुस्थिती आहे “ पाणिनी पटवर्धन म्हणाला
“पण तो असू शकत नाही. तुम्हाला तसं वाटत असल तरी तो असल्या भानगडीत पडेल असे वाटत नाही.”
“ मी तुम्हाला मला असलेली माहिती सांगितली, आता ती स्वीकारायची की नाही खरी मानायची की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. झालं तर नुकसान तुमचं होणारे माझं नाही. तुमचा होकार असेल आणि तुम्ही पैशाची व्यवस्था करणार असाल तर मी माझा सल्ला तुम्हाला देऊ शकतो” पाणिनी पटवर्धन म्हणाला “ठीक आहे तुम्हाला नक्की काय हवंय?”बक्षी म्हणाला.
“या सगळ्या भानगडी मिटवायच्या असतील तर त्याला एकच उपाय आहे, ते ब्लॅकमेल करणार आहेत आता मी सुद्धा त्यांना ब्लॅकमेल करणार आहे. माझ्याकडे अशी काही माहिती आहे की त्यांना मी गुडघे टेकायला लावू शकतो पण त्यासाठी खर्च येणार आहे आणि तुमच्या बरोबर असलेल्या त्या स्त्रीकडे पैसे नाहीयेत आणि मी काही स्वतः पदरचे पैसे खर्च करून तुम्हाला वाचवणार नाहीये.” पाणिनी म्हणाला
हृषीकेश ने आपली जीभ बाहेर काढून आपले शुष्क पडलेले ओठ ओलसर करायचा प्रयत्न केला “यासाठी साधारण किती खर्च येणार आहे?” त्याने पाणिनी ला विचारलं
“ आत्ता तरी मला सुरुवातीला तुमच्याकडून लाखभर तरी लागतील आणि एकदा का मी तुम्हाला त्यातून , बाहेर काढलं की मग तुम्हाला आणखी थोडा खर्च करावा लागेल” पाणिनी त्याला म्हणाला
“ मला एवढ्या रकमेची उभारणी करायची असेल तर मला जरा विचार करावा लागेल” हृषीकेश म्हणाला
“ मी तुम्हाला उद्या सकाळी संपर्क करतो आणि काय ते सांगतो”
“ ठीक आहे ,पण एक लक्षात घ्या घटना खूप वेगवान पद्धतीने घडत आहेत आत्ता पासून उद्या पर्यंत म्हणजे तुमचा निर्णय तुम्ही देईपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेले असेल” पाणिनी त्याला म्हणाला
“ठीक आहे दोन तासानंतर परत मला भेटा.” हृषीकेश बक्षी म्हणाला
“ ठीक आहे मला वाटतंय या दोन तासात तुमचं राजकीय वजन वापरून तुम्ही माझ्या बद्दल माहिती काढणार आहात तर त्याऐवजी मी च तुम्हाला आधीच माझी माहिती देतो. मी एक वकील आहे आणि फौजदारी वकील आहे. प्रत्येक वकील कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रात तरबेज असतो तसा मी लोकांना अडचणीतून बाहेर काढण्यात वाकबगार आहे. माझ्या कडे आलेली बरीच शी प्रकरण ही कोर्टा बाहेरच मिटतात. एखाद्या कंपनीच्या कायदेशीर सल्लागार असलेल्या वकिलाकडून किंवा कौटुंबिक निवाडे चालवणार्‍या वकिलाकडून माझी माहिती काढायचा प्रयत्न केलात तर ते माझ्याबद्दल सांगतील की मी नैतिक किंवा अनैतिक या गोष्टीत फरक न करणारा असा वकील आहे तुम्ही सरकारी वकिलामार्फत किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडून माझी माहिती काढायचा प्रयत्न केला तर ते सांगतील की मी एक अत्यंत घातकी आणि धोकादायक असा माणूस आहे. माझ्या बँकेकडून तुम्ही माझी माहिती काढायचा प्रयत्न केला तर तुम्हाला काहीही मिळणार नाही.” पाणिनी ने त्याला स्पष्ट कल्पना दिली काहीतरी बोलण्यासाठी हृषीकेश ने आपलं तोंड उघडलं पण आपला विचार बदलला आणि पुन्हा गप्प बसला.
“ आत्ता तुम्हाला मी जी माझी स्वतःची माहिती दिली आहे त्यामुळे तुम्ही मला दिलेली दोन तासाची मुदत कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. आता तुम्ही ईशा ला जर फोन केलात तर मी तुमच्याकडे आल्याबद्दल तिला वाईटच वाटेल कारण तिला हे प्रकरण तिच्या एकटीच्या जीवावर हाताळायचं आहे किंवा कदाचित तिने फक्त स्वतःचा सुरक्षित राहण्याबद्दल विचार केला असेल. तुमच्याबद्दल विचारच केला नसेल. त्यातुनही तुम्ही तिला फोन केलात तर ती स्वतः फोन घेणार नाही तिची नोकराणी फोन घेईल. तिच्याकडे तुम्हाला काही तरी अगम्य भाषेत ला निरोप ठेवावा लागेल उदाहरणार्थ मालकीण बाईंचा पोशाख तयार आहे म्हणून सांग वगैरे वगैरे. आणि मग तुम्हाला ती उलट फोन करेल” पाणिनी म्हणाला
त्या चे डोळे आश्चर्याने मोठे झाले “अरे बापरे हे तुम्हाला सगळं कसं माहिती?”
“अशाच पद्धतीने तिला आलेले फोनवरून निरोप मिळतात. मी तिला फोन केला तर मी पोषाखा बद्दल बोलायचं कदाचित तुम्ही फोन केलात तर तुम्हाला दुसऱ्या वस्तूबद्दल बोलायचं असेल”
“ हो बरोबर मी तिला बुटाची डिलीवरी देण्याबद्दल बोलत असतो.” हृषीकेश एकदम बोलून गेला “पद्धत म्हणून ही चांगली आहे पण तरीसुद्धा मला तिच्या नोकराणी वर फारसा विश्वास नाही.” पाणिनी म्हणाला
हृषीकेश चा पाणिनी पटवर्धन बद्दल असलेला विरोध किंवा सावधपणा आता थोडा कमी झालेला दिसत होता
“तिच्या नोकराणी ला फारसं काही कळत असेल असं वाटत नाही” हृषीकेश म्हणाला. “ती फक्त फोनवरून निरोप घेण्याचं आणि ईशा ला निरोप देण्याचे काम करते आणि पोशाख आणि बूट याव्यतिरिक्त आणखीन दुसऱ्या कोणाला वेगळी वस्तू सांगितली गेली असेल असं मला वाटत नाही !” हृषीकेश हसून म्हणाला
पाणिनी पटवर्धन खूप जोराने हसला
“आता तुम्हाला खरं सांगायचं तर ईशा अरोरा ने मला एक तासापूर्वी फोन केला होता.” हृषीकेश म्हणाला. “ती मला म्हणाली कि ती खूप मोठ्या अडचणीत आहे आणि तिला काही रकमेची गरज आहे मी तिला मदत करावी अशी तिची इच्छा होती पण ते पैसे कशासाठी हवेत ते तिने मला सांगितलं नव्हतं” हृषीकेश म्हणाला
पाणिनी ने एकदम शीळ वाजवली. “अरे हे तसं असेल तर चांगलं झालं. मला भीती वाटत होती की याबद्दल ती तुम्हाला काही सांगणार नाही की काय. तुम्ही दोघे एकमेकांना कसे भेटला त्याच्याशी मला खरं तर काही कर्तव्य नाही पण मला असं वाटतं की तुम्ही तिला मदत करावी मी तिच्यासाठी जशी वकिली घेतल्ये तसेच ती तुमच्यासाठी ही आहे हे लक्षात ठेवा पण हा जो लढा आपल्याला लढायचा आहे त्यासाठी पैशाची आवश्यकता लागणारच आहे” पाणिनी ने त्याला स्पष्ट कल्पना दिली हृषीकेश ने माने ने होकार दिला
“ ठीक आहे मिस्टर पटवर्धन. अर्ध्या तासात या. तुम्हाला मी सांगतो”. तो त्याला म्हणाला
पाणिनी बाहेर जाण्यासाठी दारापाशी गेला “ठीक आहे अर्ध्या तासात तुम्ही पैसे तयार ठेवा रोख. चेक वगैरे नको कारण ते तुमच्या खात्यातून गेलेलं तुमच्या राजकीय दृष्टीने बरोबर नाही .”

एवढे बोलून पाणिनी पटवर्धन तिथून बाहेर पडला आणि आपल्या गाडीत येऊन बसला गाडी सुरू करणार तेवढ्यात त्याच्या काचेवर कुणीतरी बाहेरून टकटक केलं बाहेर पाहिलं एक भेदक डोळ्याचा जाडजूड असा माणूस बाहेर उभा होता.
“ मला तुमची मुलाखत घ्यायच्ये मिस्टर” तो म्हणाला.
“ मुलाखत ?”पाणिनी पटवर्धन ने आश्चर्यानं विचारलं “तू कोण आहेस?”
मी शिरोडे. मिर्च मसाला वर्तमानपत्राचा मी पत्रकार आहे समाजातल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवन चर्येवर आम्हाला रस असतो. आत्ताच तुम्ही हृषीकेश बक्षी यांना जाऊन भेटून आलेत ते राजकारणातलं एक उदयोन्मुख नाव आहे. तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्यात रस आहे आम्हाला विचारायचं होतं की तुमची आणि हृषीकेश बक्षी यांच्यामध्ये काय चर्चा झाली?”
पाणिनी पटवर्धन सावकाश आपल्या गाडीचं दार उघडून बाहेर आला “अच्छा म्हणजे अशा प्रकारच तुम्ही कारस्थान करता तर!” तो म्हणाला.
शिरोडे त्याच्याकडे पहात बसला “आमच्याशी असं फटकून वागू नका त्याचा तुम्हाला काही फायदा मिळणार नाही” तो पाणिनी ला म्हणाला
“ मसणात गेला फायदा आणि तोटा पाणिनी त्याला म्हणाला. त्याने दोघांमध्ये किती अंतर आहे याचा अंदाज घेतला आणि शिरोडे च्या तोंडावर एक जोरदार ठोसा लगावला.त्याचं डोक मागे आपटलं. तो दोन तीन पावलं धडपडत मागे गेला. रस्त्यावरून चालत जाणारी माणसं या दृश्याने एकदम अवाक होऊन बघायला लागली लगेच तिथे पाच-सहा बघ्यांची गर्दी जमली पाणिनी पटवर्धन ने त्यांच्याकडे बघितलं पण नाही. सावकाश गाडीचं दार उघडून तो आत बसला दार लावलं आणि गाडी सुरू करून निघून गेला वाटेतच एका ठिकाणी हृषीकेश च्या ऑफिसमध्ये फोन लावला “मी पाणिनी पटवर्धन बोलतोय” तो म्हणाला. “तुला एक सावधगिरीची सूचना देतो बाहेर पडू नको. आणि तुझा कोणतरी अंगरक्षक तुझ्याबरोबर कायम ठेव आपण ज्या वर्तमान पत्रा बद्दल मगाशी बोललो त्याने माझ्यावर हल्ला करण्यासाठी एक माणूस पाठवला होता आणि आपल्यात काय चर्चा झाली हे ऐकण्यात त्याला रस होता. तुझी पैशाची व्यवस्था झाली की तुझ्या नोकरा बरोबर माझ्या ऑफिस मध्ये पैसे पाठव तुझ्या अगदी विश्वासातला असला पाहिजे तो. आणि त्या पाकिटात पैसे आहेत त्याबद्दल त्या माणसाला काही बोलू नको. सील केलेलं पाकीट वापर म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की काही कागदपत्र आहेत. हृषीकेश काहीतरी बोलणार होता याचा पाणिनी ला अंदाज आला पण पटकन त्याने फोन बंद केला.
(प्रकरण-६ समाप्त)