ते चार दिवस
भाग1-- 25 डिसेंबर 2020 स्थळ- चौकुळ सावंतवाडी
चंद्रिका,रिमा व उषा बंगल्याच्या गच्चीवर गप्पा गोष्टी करत होत्या.वेळ रात्रीची अकरा वाजताची होती.आकाशातल्या चांदण्या .. गार वारा व रातकिड्यांचा आवाज याशिवाय सारा परिसर शांत होता.
"चंद्रिके ; अग ते गाण म्हण ना जे तू 'लिटल चॅम्पस्' च्या फ़ायनलला गायली होतीस. " उषा म्हणाली.
"अग आत्ता या वेळी?"
"ये , गा ना..."रिमाने विनवणी केली.
" गाते ग..."
चंद्रिकेने गाणे सुरू केले.
' सांज ये गोकुळी..सावळी-सावळी '
तिचा सुरेल आवाज वातावरण सजीव करून गेला.तिघिही गच्चीच्या कठड्यावर टेकून उभ्या होत्या.चंद्रिका गाण्यात समरस झाली होती.अचानक चंद्रिकेला मानेवर थंडगार वस्तूचा स्पर्श जाणवला...तिच गाण थांबलं.काय झाल ते बघण्यासाठी उषा व रिमाने मान वळवली. चंद्रिकेच्या मानेवर रिवाॅल्व्हर टेकलेले त्याना ओझरतं दिसल.
"अश्याच उभ्या रहा...आवाज केलात तर चंद्रिका जीवंत राहणार नाही. " एक दबका थंडगार आवाज कानावर आला. तिघिही मुली भयाने गारठल्या. त्यांचा आवाज घश्यातच गोठला.
" हे बघा मी फक्त चंद्रिकेला घेवून जातोय....मी खाली जाईपर्यंत आवाज केलात तर ती जीवंत राहणार नाही. " त्याच थंडगार घोगर्या आवाजात त्याने धमकी दिली.त्याने चंद्रिकेच्या तोंडावर आपला रूंद पंजा ठेवला. जवळपास बेशुध्द पडलेल्या चंद्रिकेला खांद्यावर उचलून घेवून तो दबक्या पावलांनी जिना उतरला.
खाली गाडी सुरू झाल्याचा आवाज आला तस पुतळ्यसारख्या गप्प उभ्या असलेल्या उषा व रिमा एकाच वेळी किंचाळल्या. दोन दिर्घ किंचाळ्या आसमंतात घुमल्या.
------*---------*--------*----------*--------*---------
त्या बंगल्यापासून थोड दूर ..एका घरात ..समीर ,प्रशांत व संजना बॅगा भरत होते.त्याना उद्या सकाळी मुंबईला निघायचं होत.चौकुळचा निसर्ग..जंगल..इथले पशु,पक्षी व मोकळ प्रदूषणरहित वातावरण अनुभवण्यासाठी ते चार दिवसांपूर्वी आले होते.समीर मुळचा चौकुळचा .तो या दोघांना आपल गाव दाखवण्यासाठी घेवून आला होता. तिघेही पक्के दोस्त होते. संजना मानसशास्राची गोल्ड मेडॅलिस्ट होती. प्रशांत जे.जे.आर्टसस्कूलचा विद्यार्थी तर समीर सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. बॅग बंद करत असलेल्या संजनाच्या कानी दोन किंकाळ्या पडल्या.
" कुणीतरी ओरडतय..."
" हा आवाज शरद गावडेंच्या बंगल्यातून येतोय..इथून शंभर मीटरवर आहे." समीर म्हणाला.
" काहितरी घडलंय चला बघूया." संजना झटकन उठत म्हणाली.
प्रशांतने जवळची बॅटरी उचलली.तिघेही घावतच घरातून बाहेर पडले.काही वेळातच ते शरद गावडेच्या बंगल्यावर पोहचले. गच्चीवर रडण्याचा व ओरडण्याचा आवाज येत होता.गच्चीवर जाण्यासाठी जीना बाहेरून होता.तिघेही झटकन जीना चढून गच्चीवर पोहचले.
समोर बारा- तेरा वर्षांच्या दोन मुली भेदरलेल्या अवस्थेत हुंदके देत होत्या.त्यांच्या बाजूलाच एक बाई कपाळावर हात मारत ओरडत होती.तर धोतर घातलेला एक प्रौढ कपाळाला हात लावून बसला होता. समीरने त्याला ओळखले तो घनश्याम होता...नेने वाडीतला....व ..रडणारी बाई त्याची बायको सावित्री होती. ती दोघं बंगल्याची व्यवस्था बघायचे.
"काका काय झाल?...मी समीर ..! ..दत्तू गावडेंचा मुलगा..रडता कश्याला?"
समोर तिघांना बघताच घनश्यामला धीर आला.
"अरे , शरदाच्या मुलीक ..चंद्रिकेला कुणीतरी पळवल्यान...आता आम्ही ...जगाक तोंड कसा दाखवायचा?"t
"काय! अपहरण ...?"संजना आश्चर्याने म्हणाली.
" काका...नेमकं काय झाल..?" प्रशांतने विचारले.
" चंद्रिका व तिच्या ह्या मैत्रिणी आजच मुंबईहून आंबोली फिरण्यासाठी आल्यात. थोड्या वेळापूर्वी जेवण झाल्यावर
गच्चीवर गेल्या व आम्ही दोघ खाली आवराआवर करत होतो. तेवढ्यात यांच्या किंकाळ्या ऐकल्या वर आलो तेव्हा कळल की चंद्रिकेक कुणी तरी पळवल्यान ."
" अगो बाय ,आता शरद ...आमका काय म्हणतोलो..." सावित्री रडत म्हणाली.
"संजना, मुलींना गप्प कर ..काय घडल ते फक्त त्यानांच माहित आहे....काका पोलिसांना फोन करूया..किडनॅपर लांब गेला नसेल."
समीरने पोलिसांना फोन केला.आंबोली आऊटपोस्टला फोन लागला.समीरने त्यांना घडलेल्या घटनेची कल्पना दिली. तोपर्यंत प्रशांतने घनश्याम कडून शरद गावडेंचा फोन नंबर घेतला. समीरने शरदला फोनवरून चंद्रिकेच्या किडनॅपीगंची माहिती दिली.संजनाने काही वेळातच मुलींना शांत केल.
"तुमच्यापैकी कुणी त्याचा चेहरा बघितलाय?" समीरने विचारले.
" मी..मी ..त्याला ओझरतं पाहिलं...त्याला पूर्णं दाढी होती.डोळे...बारीक होते....आवाज करडा होता. " रिमा म्हणाली.
" अजून काही वेगळ अस..ज्यामुळे ...त्याला ओळखताना फायदा होईल." प्रशांतने विचारले.
दोघी गप्प राहिल्या.
"बर हे घडल त्यापूर्वी तूम्ही काय करत होता?" समीरने विचारले.
" चंद्रिका गाण म्हणत होती. ..व मी ते गाण रेकॉर्ड करण्यासाठी व्हॉईस रेकॉर्डवर चालू केला होता."उषा म्हणाली.
" मोबाईल कुठे आहे...?"
उषाने गच्चीच्या कठड्याकडे बोट दाखवले. समीरने गच्चीवरचा फोन उचलला व झालेले रेकॉर्डींग सर्व ऐकू लागले.एव्हाना वाडीतले आणखी काहीजण गडबड ऐकून तिथे आले.सारेच आवाक झाले.गावात अस पहिल्यांदाच विपरीत घडल होत.सारेच चिडले होते.
" त्याने चंद्रिकेचे नाव घेतलंय. तो कुणीतरी परीचित आहे. तुमच्यापैकी कुणी हा आवाज पूर्वी ऐकलाय का?" समीरने सर्वांकडे बघून विचारले. पण तो आवाज कुणाच्याच परिचयाचा नव्हता.
" प्रशांत; तू रिमाने केलेल्या वर्णानावरून व ह्या आवाजावरून त्या अपहरणकर्त्याचे स्केच काढशिल?"
समीरने प्रशांतला विचारले. वर्णावरून व्यक्तीचा चेहरा रेखाटन्यात तो पारंगत होता.मुंबईत सुध्दा पोलिस त्याची काही वेळा मदत घेत.समीरने घनश्याम कडून कोरा कागद घेतला.
"ह्या इसमाला अब्राहम लिंकन सारखी दाढी असावी... गाल आत गेलेले...व त्याचा खालचा ओठ प्रमाणापेक्षा जास्त जाड असावा. त्या जाड ओठामुळे काही अक्षर उच्चारताना तो गडबडतो." बोलता- बोलता प्रशांतने आपलं काम सुरू केल.
तोपर्यंत समीरने च॔द्रिकेचा फोटो मिळवला. तिथे असलेल्या सर्वांकडे बघून तो म्हणाला..
" हा फोटो ..सर्वांनी आपआपल्या व्हॉटस्अॅपवर व फेसबुकवर टाका.कुणाला ही मुलगी दिसल्यास त्वरीत कळवा अस खाली लिहा. मी आंबोली व सावंतवाडी पोलिसांना हा फोटो पाठवतो."
सर्वांनी झपझप चंद्रिकेचा फोटो सोशील मीडीयावर अपलोड केला. एव्हाना प्रशांतच स्केच तयार झाल होत.चेहर्यावरून तो इसम पन्नाशीच्या जवळपासचा वाटत होता. समीरने ते स्केच सर्वाना दाखवले.हा चेहरा कुणाच्याही परिचयाचा नव्हता .
" हे स्केच पण मीडीयावर टाकूया." कुणी तरी सुचवले.
" नको सध्या नको...तो बिथरेल ...त्यामुळे चंद्रिकेला धोका निर्माण होईल." समीर विचार करत म्हणाला.
"हे बघा सर्वांनी घरी चला आम्ही तिघ इथे थांबतो.ऊद्या पोलीस व शरददादा आल्यावर बघूया काय करायच ते." कोणत्याहि परिस्थितीत चंद्रिकेला शोधून काढायचे हे सार्यांनी ठरवले.त्यासाठी कुठेही धाव घ्यायला व वाटेल ते करायला सारा गाव तयार होता.
------*-------*--------*-----------*---------*-----------*
25 डिसेंबर 2020 वेळ रात्री 11.40
मोबाईलची रिंग झाली. रेवतीने हात लांब करत वैतागून फोन घेतला.एवड्या रात्री कुणी फोन केला.आपल्या अंगावरचा दर्शिलचा बलिष्ट हात तिने बाजूला केला.
"हॅलो..कोण बोलतय?"
" मी शरद ...फोन ठेवू नकोस..मी काय सांगतोय ते ऐक...चंद्रिकेला कुणीतरी किडनॅप केलय.."
"काय..?..कधी..कुठून...?ती झटकन ऊठून बसली.
" ती आजच गावी गेली होती. नेमकं काय झाल ते मलाही माहित नाही..मी आता तिकडे जाण्यासाठी बाहेर पडतोय...तुला कल्पना द्यावी म्हणून फोन केला."
" ओ..गाॅड..हे कस शक्य आहे.? .हे बघ तू इथ ये ..मी ....मी पंधरा मिनिटात तयार होते."
" तू...तू येतेयस?" शरदने चकित होवून विचारले.
" हे बघ ती माझीही मुलगी आहे..तू इथ येत नसशील तर मी माझ्या कारने येते."
अंगावरचा अस्ताव्यस्त गाऊन सरळ करत तिने बेडवर झोपलेल्या दर्शिलच्या अंगावरचे चादर ओढली.
"चल ..ऊठ..."
" बेबी...काय झाला?..आता का उठवलस..पुन्हा मूड..आला काय?"
" यू बास्टर्ड...तूझे कपडे घाल अन काही न बोलता इथून बाहेर पड."
" बेबी...आता रात्री...!"
" हे बघ..मी बाहेर चाललेय... मी बाथरूम मधून बाहेर येईपर्यंत तू गेला नाहिस तर लाथा घालून हाकलेन समजल !" रेवती जहरी सूरात म्हणाली.
ती त्याच्याकडे न बघता बाथरूममध्ये दिशेने निघून गेली.
" साली...! बघून घेईन...माझा वापर करते."
त्याने झटकन कपडे चढवले व तणतणत बंगल्यातून बाहेर पडला.
बरोबर पंधराव्या मिनिटाला शरदची कार बंगल्याच्या आवारात पोहचली. याच बंगल्यात तो रेवती व छोट्या चंद्रिकेसोबत दहा वर्षे राहिला होता.पण घटस्फ़ोट झाल्यावर त्याने बंगला सोडला होता.चंद्रिकेसोबत तो गेली चार वर्षे घाटकोपरला फ्लॅटमध्ये राहत होता. शरद कारमध्ये बसून राहिला.
रेवती छोटी बॅग घेवून बाहेर आली.
" कॉफी घेणार...?"
" नको..मी थर्मास घेतलाय...वाटेत काही मिळणार नाही आणि थांबायला वेळीही नाही. लवकरात लवकर चौकुळचा पोहचायच."
"मी कार चालवू..?"
" सध्या नको.. तू बस...मी ड्राईव्ह करतो."
रेवती मागच्या सीटवर बसली. शरदने कार सुरू केली. वेगाने कार पळू लागली.
शरदच्याही मनात गतकाळ जागा झाला. मॅकेनिकल इंजिनिअर झाल्यावर त्याला मुंबईत एका कारचे पार्ट बनवणार्या एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली.कंपनीचे मालक गजानन शिर्के यांनी शरदची योग्यता ओळखली.हळूहळू शरद शिर्केच्या जवळ येत गेला. कंपनीच्या मॅनेजमेंटमधे त्याचा समावेश झाला.
रेवती शिर्केंची एकुलती एक मुलगी होती. आईविना लाडात वाढलेली. हाय सोसायटीत रमणारी ...मैत्रिणी..बॉयफ्रेंड यात गुंग असणारी.तिचे बॉयफ्रेंड सतत बदलत असतं.मी एका ठिकाणी कधीच अडकणार नाही अस ती म्हणे. शरद कधीतरी कामानिमित्त त्यांच्या बंगल्यावर यायचा..त्यावेळी रेवती त्याला दिसायची.एक लाडवलेली श्रीमंत मुलगी..या नजरेतून तो तिच्याकडे बघायच.मुलीचे रंग ढंग ओळखून शिर्केनी तिला लगाम घालण्यासाठी शरदला लग्नाविषयी विचारले.गजानन शिर्केंच्या उपकाराच्या ओझ्याखली अडकलेल्या शरदने होकार दिला. लग्नानंतर ती बदलेल असच त्याला वाटल. रेवती शरदकडे आपल्या कंपनीचा एक नोकर या नजरेतून बघायची.पण वडिलांच्या हट्टापुढे ती नेमली.एकविसाव्या वर्षी..रेवती शिर्के...रेवती गावडे बनली. शरद शिर्केंच्या बंगल्यावर राहायला आला.वर्षभरानंतर चंद्रिकेच्या जन्म झाला.लग्नानंतर नऊ वर्षे सार व्यवस्थित चाललं.पण गजानन शिर्के अचानक हार्टअॅटकने वारले.रेवतीच्या जुन्या प्रवृत्तीने पुन्हा उचल घेतली.मुक्त होण्याचे ....आयुष्य मनासारखे जगण्याचे वेध तिला लागले. रोज पार्ट्या....ड्रिंक्स घेणं...नव्या मित्रांसोबत पिकनिकला जाणे..सुरू झाले. रोज भांडण होवू लागल. रेवतीने घटस्फ़ोट मागितला.शरदने त्याला होकार दिला.कंपनी तिच्या स्वाधीन करून...तो घाटकोपरला फ्लॅटवर मुलीसोबत राहू लागला. ती कधीतरी चंद्रिकेला भेटायची.त्याने स्वतः नवी कंपनी सुरू केली.गेली चार वर्षे त्या दोघात फारसा संवाद नव्हता. शरदने आपल्या गावी छोटा बंगला बांधला होता.कधीतरी तो तिथे जाऊन राहायचा...आपल बालपण अनुभवायचा.आजच चंद्रिकेला व तिच्या मैत्रिणींना त्याचा ड्रायव्हर गावी सोडून आला होता.
आज चंद्रिकेचे अपहरण झाल आणि त्यामुळे पुन्हा हा एकत्र प्रवास करावा लागत होता.शरदने मागे नजर टाकली..रेवती...सीटवर डोक टेकून अंगाभोवती ओढणी लपेटूनझोपली होती.एसी सुरू होता तरीही तिला थंडी वाजत असावी.शरदने कार थांबवली..सूटकेसमधून शाॅल काढली व रेवतीच्या अंगावर पांघरली. चाहूल लागल्याने तिने डोळे उघडले...आपल्या अंगावरची शाल बघून तिचे डोळे पाणावले.एवड्यात शरदने कॉफीचा धर्मास तिच्यासमोर केला.ती कॉफी पिता पिता विचार करत होती. तो आपल्यावर चिडत का नाही...ओरडत का नाही. मी ना चांगली पत्नी बनले ना चांगली आई...वेड्यासारखी खोट्या सुखाच्या मागे धावत होती. मला घगघगत जीवन जगायचं होत..पुरूषांना आपल्या तालावर नाचवायच होत....मला नर्म शृंगार नको होता..सुखाच्या बेधुंद लाटा निर्माण होतील असा झंझावाती शृंगार हवा होता.पण नंतर कळल हे सगळं मृगजळ होत पण मी ते नाकारत होते.तिने मान झटकली.
"चंद्रिकेला कोणी किडनॅप केल ...व का?"रेवतीने प्रश्न केला.
" नाही सांगता येणार.."
"गावातला कुणी?"
" नाही. ते शक्य नाही. आपल्याला लवकर पोहचायला हव...पोलीस काय करतात ते बघूया."
" पैश्यासाठी ...कुणी फोन वैगेरे केला? कितिही पैसा द्यावा लागला तरी चालेल...पण चंद्रिका सुखरूप आली पाहिजे. "
" अजूनतरी तसा ..फोन नाही आलाय."
"तू आराम कर मी कार ड्राईव्ह करते. मी आता ओके आहे."
रेवती कार ड्राईव्ह करायला बसली.शरद बाजूच्या सीटवर बसला.कार वेगाने हायवेवरून पळू लागली.
-----*------*-------*--------*--------*-------*-----------