Te Chaar Divas - 4 books and stories free download online pdf in Marathi

ते चार दिवस - भाग 4

ते चार दिवस
28 डिसेंबर 2020 वेळ-सकाळी 4.30 स्थळ- अलिबाग
इन्स्पेक्टर खान सगळ्यांना चंद्रिकेच्या सुटकेचा प्लान समजावून सांगत होता.त्याने यापूर्वी दोन वेळा समीरने ड्रोनद्वारे तयार केलेले फार्महाऊसचे शूटिंग बघितले होते. तसेच प्रशांतने गुगलमॅपवरून तयार केलेले ड्राॅइंग त्याने अभ्यासाले होते.त्याच्या डोक्यात प्लान तयार होता. बंगला साधारण मध्यावर होता.बंगल्याच्या उजव्या बाजूला राजमानेची औषधाची छोटी फॅक्टरी होती. बंगल्याच्या पुढच्या बाजूला गेट होते व ते सतत बंद असायचे.पुढच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला डॉबरमॅन कुत्रे बसलेले असत. चंद्रिका पहिल्या मजल्यावरच्या किनार्यालगतच्या खोलीत होती.त्यावर गच्ची होती. सभोवताली माड व पोफळींची दाटी होती. सभोवतालच्या दगडी कुंपणावर दोन फुट उंचीचे तारेचे कुंपण होते. त्यातून इलेक्ट्रिक करंट सोडलेला होता. बंगल्याच्या डाव्या बाजूच्या कठड्याला लागून जे लॉज होते त्यात ही मंडळी उतरली होती.बंगल्यात यावेळी चंद्रिका सोडून दोन माणसं होती.एक राजमानेचा विश्वासू नोकर जीवबा तो थोडा प्रतिकार करणार होता हे निश्चित पण त्याला काबूत करणे कठीण जाणार नव्हते. प्रश्न होता राजमानेंचा ;तो माथेफिरु ऐनवेळी कोणती परिस्थिती निर्माण करेल सांगता येणार नाही.

"हे बघा, हवालदार परब कुंपणाला जोडलेला इलेक्ट्रिक करंट बंद करतील. हवालदार सावंत समोरच्या कुत्र्यांचा बंदोबस्त करतील. गेट ते कुत्रे असलेली जागा यात शंभर मिटरच्या आसपास अंतर आहे. सावंतजवळ असलेली गन दोनशे मीटरवरूनही वेध घेवू शकते.त्यात प्राण्यांना बेशुद्ध करायच्या गोळ्या आहेत. त्यानंतर परब कुंपणावरून नजिकच्या सुपारीच्या झाडावर चढतील व नंतर एका सुपारीच्या झाडावरून दुसर्यावर अस करत ते सरळ गच्चीवर उतरतील.त्यांची गावात पोफळीची बाग असल्याने ते यात प्रविण आहेत ते हे काम साधारण पाच मिनिटात करतील. या दरम्यान आपण सर्व आत घुसू. परब गच्चीवरून दोरी सोडतील आपण सर्व गच्चीवर जाऊ. परब जीवबाला ताब्यात घेतील.मी चंद्रिका असलेल्या रूमकडे जाईन. प्रशांत बंगल्याच्या पुढच दार उघडेल व सावंत आत येतील.समीर व संजना मला कव्हर करतील. समजल..? मी सूचना दिल्याशिवाय ऐनवेळी कोणतीही कृती करायची नाही. आणि हो हे सर्व आॅपरेशन शरद व रेवती प्रत्यक्ष इथे बसून बघितल; समीरने तशी तयारी केलीय."
सर्वांनी मान डोलावली.
" सर, संजनाला इथंच थांबू दे?" समीरने सूचना केली.
" नाही, मी येणारच, यातला रोमांच मला अनुभवायचा आहे."
खान हसला.
"मी संजनाला नेतोय...कदाचित तिची गरज लागेल.?चला, पाचला दहा मिनीटे आहेत....पाचला आपल्याला आत घुसायच आहे."
सारे तयारच होते. सर्वांच्या पायात रबरीबूट होते.चालताना आवाज होणार नाही. अशी त्यांची रचना होती.सर्वांनी बाहेर पडताना...शरद व रेवतीला धीर दिला. चंद्रिकेला आम्ही घेवून येवू अस मूक आश्वासन दिल.
सारे बाहेर पडले.सावंत फार्महाऊच्या पुढील दिशेने गेले.इतर सारे मागील बाजूने गेले.हवालदार परबनी सामानाची पेटी बाहेर काढली.... कटर व टेस्टर काढला.एवड्यात कुत्र्यांचा बंदोबस्त झाल्याचा मेसेज आला.ताबडतोब परबांनी कुंपणाच्या तारा कट केल्या. झेप घेत ते कठड्यावर चढले. तेथूनच त्यांनी पोफळीच्या खोडावरून झेप घेतली. खारीच्या चपॢळाइने त्यांनी झरझर वर चढायला सुरूवात केली.शेंड्याजवळ पोचल्यावर त्यांनी तो पुढच्या दिशेला झुकवला दुसर्या पोफळीच खोड समोर येताच त्यानी ते पकडले.हा सारा थरार खालून सारे धडधडत्या ह्रदयाने बघत होते.बघता बघता ते एका पोफळी वरून दुसर्या पोफळीवर पोहचले. शेवटी त्यांनी गच्चीवर झेप घेतली.खान, संजना,समीर व प्रशांत कठड्यावरून आत शिरले.धावतच त्यांनी बंगल्याची भिंत गाठली.परबांनी वरून खाली दोरखंड सोडला. प्रथम
खान वर चढला. त्यानंतर संजना,प्रशांत व समीर चढले .खानने रिवाॅल्हर लोड करत चंद्रिकेच्या रूमकडे मोर्चा वळवला.त्यांना बाकी फॉलो करत होते.जीना उतरताच परब जीवबाला ताब्यात घेण्यासाठी तळमजल्यावर गेले. प्रशांतही बंगल्याच दार उघडण्यासाठी खाली गेला.सारे प्लान प्रमाणे चाललं होत.खान चंद्रिकेच्या रूमच्या दाराजवळ पोहचला..हलकेच दार ढकलून तो आत शिरला..दरवाजा नुसता ढकलेला होता.समोर चंद्रिका बेडवर झोपली होती.अंगावर निळ्या रंगाचा रग होता.तिचा चेहरा मलूल वाटत होता.गेले तिन दिवस तिने भयावह परिस्थितीत काढले होते. बेडच्या बाजूलाच आरामखुर्चीवर रणजित राजमाने झोपला होता.काल रात्री चंद्रिकेने खूपच गोधंळ घातला होता म्हणून ते स्वतः तिथे झोपले होते.सावध झोप असलेले राजमाने चाहुलीने जागे झाले.बाजूला ठेवलेले पिस्तुल उचलत त्यांनी ते चंद्रिकेच्या डोक्यावर टेकवले
" पूढे सरकलात तर...हिला गोळी घालीन." तो क्रूर हसत बोलला. खानने रिवाॅल्हर राजमानेंवर रोखले.
" ती ..ती बया ईशिताला घेवून गेली आणि आता हिलाही घेवून जाणार ऑ.ऑ...हो ही माझी मुलगी नसेल तर ती कुणाचीच होणार नाही." तो एका हाताने आपल डोक ठोकत म्हणाला."
स्क्रीनवर हे सारे पाहत असलेले शरद व रेवती थरारले. रेवतीने हुंदका देत शरदच्या खांद्यावर डोक ठेवले.शरदने तिला हलकेच थोपटले .त्याचा खान व त्याच्या टिमवर पूरा विश्वास होता.
" तूम्ही तिला कसे माराल? ती तुमची लाडकी ईशिता आहे ना." अचानक संजना पूढे होत म्हणाली.तिचा आवाज अतिशय कमांडिग होता.
" सर, रिलॅक्स ...इकडे बघा...आपण मार्ग काढूया."
संजना आश्वासक आवाजात बोलली. पण राजमानेंनी पवित्रा अचानक बदलला. त्याने पिस्तुल चंद्रिकेच्या डोक्यावरून हलवलं व स्वतःच्या कानपटीवर ठेवलं.
" मी..मी वेडा आहे..मला..जगण्याचा अधिकार नाही. सारेच माझा द्वेष करतात..माझी बायको ...मुलगी मला सोडून गेली..मी ..मी अपयशी आहे..जगायला लायक नाही. आता फक्त बदनामी माझ्या वाट्याला येईल."
राजमानेचा आवाज अतिशय केविलवाणा व रडवा झाला होता.हसता हसता तो मध्येच रडू लागला.त्याचा हात ट्रिगरवर होता.
" नाही सर, तुम्ही वेडे नाही....तुम्ही अतिशय हुषार आहात...संशोधक आहात... सर्वांहून वेगळे आहात...तूम्ही जिद्दीने पुन्हा ऊभे रहा नव्याने सुरूवात करा...तुमची मुलगी..बायको सारे..तुमच्यावर प्रेम करतात." संजना मृदू आवाजात म्हणाली.
एव्हाना सारेच तिथे आले होते.सावंत व परबनी जीवबाला प्रतिकार करण्याची संधी न देता ताब्यात घेतले होते. खान राजमानेच्या प्रत्येक हालचालींवर बारकाइने लक्ष ठेवून होता.कोणत्याही क्षणी गरज भासल्यास गोळी झाडण्याची त्याची तयारी होती. जीवबाच्या डोळ्यातून आपल्या मालकाची अवस्था बधून अश्रू ओघळू लागले.
तेवढ्यात राजमाने गुडघ्यावर बसले व दोन्ही हातांनी डोक धरून ढसाढसा रडू लागले.इन्स्पेक्टर खानने झटकन पुढे होत त्यांचे पिस्तुल ताब्यात घेतले.
गडबड ऐकून जागी झालेली चंद्रिका भेदरून सारा प्रकार पाहत होती.संजनाने पूढे होत तिला जवळ घेतले.एवडा डोळे फाडून बघणारी चंद्रिका स्फुंदत-स्फुंदत रडू लागली.संजना तिची समजूत काढू लागली.तिने तिला सांगितले की तिचे मम्मी-पप्पां थोड्याच वेळात तिला भेटणार आहेत.
"मला पप्पां- मम्मींना भेटायच आहे..म..मला घेवून चला त्यांच्याकडे.." चंद्रिका हरखून म्हणाली.
इन्स्पेक्टर खान राजमानेंच्या जवळ जात म्हणाले--
" राजमाने खरच...तुमच्यावर अन्याय झाला...काहीतरी चुकलय...दोष तुमचा नाहिय..मी या प्रकरणाचा कुठेही उल्लेख करणार नाही.सारी रेकॉर्ड काढून टाकीन...समाजाने तुमच्यावर केलेल्या अन्यायाची ही परतफेड समजा.संजनाने सांगितले त्या प्रमाणे नव्याने सार सुरू करण्याची संधी मी तुम्हाला देतोय....लवकरच तुमची फॅमिली तुमच्या जवळ असेल..तुम्हाला यांतून बाहेर पडण्यासाठी संजना मदत करेल ..जमेल ना संजना?" त्याने संजनाकडे बघत विचारले.
" जमेल सर...मला आनंद वाटेल हे करताना."
सारेच खानच्या सूचनेवर खूष झाले.जीवबा तर चक्क रडत- रडत हसू लागला.
तिकडे शरद व रेवतीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

-----*-------*----*-----------*---'-----*--------*------
वेळ-सकाळी 6-30 स्थळ- अलिबाग लॉज
परतीच्या प्रवासाठी पुन्हा दोन गाड्या तयार होत्या. खान व त्याचे सहकारी दोन दिवस थांबणार होते.लाॅजच्या आवारात सारे जमले होते. शरदने गावी फोन करून
चंद्रिका सापडल्याचे कळवले होते.गावात एकच जल्लोष झाला होता. सर्वांच्या स्वागताची गावांने तयारी सुरू केली होती.
शरद चंद्रिकेला कारकडे नेताना रेवतीला म्हणाला..
" हे बघ तूला मुंबईला जायचं असेल तर टॅक्सी करून देतोय.मी चंद्रिकेला
चौकुळला- गावी घेवून जातोय. तिथे सारे वाट बघत असतील."
रेवती थबकली. तिच्या डोळ्यातून टचकन आसवे ओघळली.
" कसा आहे हा? किती हा त्रयस्थपणा.....मान्य आहे मी बेधुंद वागले. पण आजच्या आनंदात मी सोबत नको ..?..मला..तुमच्या सोबत यायचय...आज पहिल्यांदाच खर्या प्रेमाची ओळख झालीय.. मी ते व्यक्तीही करू शकत नाही..." रेवती मनात पुटपुटली. तिथेच थांबली. शरद चंद्रिकेला कारमध्ये बसवून वळला...रेवतीकडे परत आला.
" येतेस ? अर्धवट राहिलेला आपला प्रवास नव्याने सुरू करण्यासाठी..."
रेवती सार विसरून तिथेच शरदच्या बाहुपाश्यात शिरली. सार्यांनी टाळ्या पिटल्या...रेवती लाजून लालबुंद झाली.
आभाळ निवळल होत....!
समाप्त
---------*---------------*-----------*-----------*-----
बाळकृष्ण सखाराम राणे
सावंतवाडी.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED