आकाशी झेप घे रे पाखरा !! - भाग १ Dr.Swati More द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आकाशी झेप घे रे पाखरा !! - भाग १



आज ऊन जरा जास्तच वाटत होतं. केंव्हा एकदा घरी पोहचते असं झालं होतं.बिल्डिंगच्या जवळ आले तर समोरूनच लता येत होती. लता म्हणजे आमच्या बिल्डिंगचं बीबीसी चॅनल....
हिला सगळ्यांच्या घरी काय चाललंय , हे जाणून घ्यायची खूप इच्छा असते..

'अरे बापरे ! कसं टाळू हिला आता ? मला लवकर जायचं आहे घरी..'

आलीच हिची हाक..

आता काय ! आलिया भोगासी असावे सादर ....

"काय मग कशी आहेस, आज माझ्याकडे काय काम काढलसं ," मी हसत हसत विचारलं..

"हो बाई.. तुम्ही काय एकदम बिझी माणसं. माझ्या मनात आलं की आपणच तुला एक बातमी द्यावी.. तीही तूझ्या जवळच्या माणसांबद्दलची.."

एव्हाना माझ्या लक्षात आलं हिला काय सांगायचंय..पण मी वेड पांघरूण पेडगावला जाणं जास्त पसंत केलं.. मला काही समजलंच नाही असा आविर्भाव दाखवला..

"काय झालं? आणि कोणाला?"

" अगं , राधाने म्हणे श्रीकांतला घटस्फोटाची नोटीस पाठवलीय. तुझ्या कानावर आली का ही गोष्ट ?'

"मला क्लिनिकमधून वेळचं मिळत नाही अगं, मला नाही माहित याविषयी आणि ऐक ना, घरी पाहुणे आलेत मी जरा घाईत आहे. आपण निवांत बोलूया या विषयावर " असं सांगून मी तिथून काढता पाय घेतला..



खरं तर मला या बातमीची कुणकुण लागली होती.. राधा, श्रीकांत आणि त्यांच्या कुटुंबियांशी आमचे घरगुती संबंध आहेत . त्यांच्या घरी डॉक्टर या नात्याने जाणं व्हायचं , तेंव्हा एकदा श्रीकांतच्या आईने मला याविषयी सूतोवाच्य केलं होतं.पण मी तेवढं काही मनावर घेतलं नव्हतं. असतात प्रत्येकाच्या घरात छोट्या मोठ्या कुरबुरी , पण एवढ्या टोकापर्यंत गोष्टी जातील असं वाटलं नव्हतं..

अगदी रस्त्याने चालतानाही राधाचाच विचार डोक्यात घोळत होता. तिला बघून ती असं पाऊल उचलेल असं कधी मनात आल नाही.

आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या नात्यातचं अशी अनेक उदाहरणं बघतो की त्यात आपल्याला खूप सुखी, समाधानी दिसणाऱ्या स्त्रिया अचानक घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोचतात.

दोन तीन दिवसांनी राधा मला कांदिवली स्टेशनवर दिसली. मला बघून कसंनुसं हसली, तिचा चेहरा पाहूनचं असं वाटल की हा निर्णय तिच्यासाठी बराच कष्टप्रद असावा. बहुतेक तिला खूप जणांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असेल.. आम्ही एकमेकींना चांगलं ओळखत असल्यामुळे बहुदा तिनं मला टाळलं नसावं..

" कशी आहेस ? "

" मी ... बरीच आहे म्हणायचं.."

"काय करतेस सध्या आणि कुठं राहतेस ?"

"तुमच्या कानावर तर आलचं असेल की मी श्रीकांतला घटस्फोटाची नोटीस दिली आहे , ही बातमी"

"आपण शेजारच्या हॉटेल मध्ये जाऊन निवांत बोलूया का?.." मी तिला सुचवलं

तिनेही आढेवेढे घेतले नाहीत..

"मी आता भाड्याने फ्लॅट घेऊन राहते , कांदिवली पूर्व इथे..अर्णव सध्या श्रीकांत कडे आहे,पण आता मला चांगली नोकरी लागली आहे , त्यामुळे अर्णवच्या कस्टडी साठी मी अर्ज केला आहे. तो लहान असल्याने आणि आता मी कमावती असल्याने त्याची कस्टडी मला मिळण्यास काही अडचण येईल असं वाटत नाही.."

एका झटक्यात तिने सगळीच कथा माझ्यासमोर मांडली..

आणि ती जरा शांत झाली...

" हो राधा, ही बातमी आलीय माझ्या कानावर, पण खरं सांगू, आधी विश्वास नाही बसला.... नंतर माझ्या मनात विचार आला , प्रत्येकाच्या वैवाहिक जीवनात चहाच्या कपातली वादळं उठतातच, तुमचं ही थोडं फार असच असावं असं वाटलं
तुमच्या आयुष्यात असं काहीचं नसेल हे ठरवणारी मी कोण ?..
पण मला इतरांसारखे तुला एकटीलाच दोष न देता , त्यामागचं खरं कारण जाणून घ्यायचंय .. कारण अगदी काल परवापर्यंत तू जगत असलेल्या आयुष्याचा बाकीच्या स्त्रियांना नेहमी हेवा वाटत होता आणि हे मी कित्येक वेळा त्या बायकांच्या तोंडून ऐकलंय..
अचानक तुझ्या घटस्फोटाची बातमी समजते. याचा अर्थ नक्कीच या निर्णयापाठीमागचं कारणही तसंच असणार."

माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू तरळले..
तिलाही बहुधा मन मोकळं करायचं होतं.. ती सांगू लागली.

क्रमशः