तांडव- भाग-1
मी चहाचा घोट घेता- घेता वर्तमानपत्र वाचत होतो.वाफाळणारा चहा व सकाळच प्रसन्न वातावरण यामुळे मी मूडमध्ये होतो. अचानक एका बातमीने माझे लक्ष वेधले...बातमी अशी होती.
सलग तिसरी रहस्यमय हत्या
तळगांव- दि.५/२/२०२१
आज पहाटे तळगाव घाटीतील शेवटच्या वळणार एक मृतदेह आढळून आलाय.दूध घेवून येणार्या टेम्पोचालकाने घाटात भररस्त्यात पडलेला हा मृतदेह पाहिला व पोलीसांना खबर दिली. मृतदेह तरूणाचा असून मृतदेहाचा चेहरा अत्यंत क्रूरपणे विद्रूप केलेला आहे.त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले आहे. गेल्या महिनाभरात तळगांव परीसरात झालेली ही तिसरी हत्या असून आधिच्या दोन हत्यांप्रमाणेच याही वेळा पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे.
या घटनांमुळे तळगाव परीसरात भितीच वातावरण पसरलं असून लोकांनी रात्री घराबाहेर पडणे बंद केले आहे. सदर खुनांचा तपास सी.आय.डी कडे द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
ही बातमी वाचल्यावर मी थोडा अस्वस्थ झालो. हत्या करणारे गुन्हेगार असे मोकाट सुटले तर समाजाची सुरक्षितता धोक्यात येवू शकते.बातमीवरुन तर अस वाटत होत की खूनी अतिशय क्रूर व निर्दयी आहे.तो कोणताही पुरावा मागे ठेवत नव्हता. म्हणजे तो हुषारही आहे.
राग,लोभ,मद,मत्सर,द्वेष हे मानवी मनाचे कप्पे जोपर्यंत उघडे आहेत तोवर अश्या घटना घडतच राहणार आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस खाते तयार केले.पण या घटनांचा छढा लावण्यासाठी जी बुध्दी लागते तीचा अभाव पोलीसखात्यात दिसतो.तर्कशुद्ध विचार, कार्यकरणभाव....लपलेले दुवे शोधणे यातून तपासायची मालिका गुंफावी लागते पण तस घडत नाही. नंतर फाईल बंद केली जाते.
डोक झटकत.मी विचारांची मालिका थांबवली.
"मी ..मी आत येवू का ?"
मी बाहेर पाहिले.एक दाढी वाढलेला किरकोळ शरीराचा इसम बाहेर उभा होता.प्रथमदर्शनी मला तो इसम आवडला नाही.
" या...!काय काम आहे?" मी त्या अनोळखी इसमाला विचारले.
"तुमचे पुरातन वस्तूंचे संग्रहालय आहे ना?"
"बाजूलाच आहे. बघायला आलात काय?"
" नाही.पण माझ्याकडे दोन जुन्या वस्तू आहेत...."
त्याने आपल्या पिशवीतून दोन वस्तू काढल्या व माझ्या हातात दिल्या .त्यात एक वसुदेव पेला असतो तस खेळणं होत.एका तांब्याच्या चौकटीवर एक काचेचा उभा पेला बसवला होता .त्या पेल्यात एक माणूस वाकून पाणी पिताना दाखवला होता.पेल्यातला पाणी ओतल्यास पाणी त्या माणसाच्या ओठापर्यंत येत व नंतर कमी कमी होत.तो माणूस तहानलेला राहतो. त्या खेळण्यावर तारीख होती....२२/२/१९३२.
मी दुसर खेळणं हातात घेतलं व बारकाईने निरीक्षण सुरू केल. मी ते खेळणं बघून दचकलो. एक पंख असलेल्या देवतेसारखी मूर्ती होती.त्या मूर्तीच्या एका हातात लांब दांड्याला पंचशूल होता तर दुसर्या हातात सात पानांची सातविण वृक्षाची डहाळी होती .मूर्तीच्या डाव्या खांद्यावर एक बहिरा ससाणा बसलेला होता. ती मूर्ती देवतेची होती की यक्ष,गंधर्व की अन्य कोणाची होती ते कळत नव्हत.कदाचित एखाद्या तंत्र साधनेत ती मूर्ती वापरली जात असावी. त्यावरही तीच तारीख होती. म्हणजे ती दोन्ही खेळणी एकाच वेळी खरेदी केलेली होती.
" दोन्ही खेळणी आहेत. विसाव्या शतकातील आहेत. पण ही तुम्हाला कुठे सापडली?" मी विचारले
तो इसम काही क्षण गप्प राहिला. सांगू की- नको असे भाव त्याच्या डोळ्यात दिसले.पण थोड्या वेळाने तो म्हणाला...
" तळगांवत एक नवीन बांधकाम चालू आहे तेथे सापडल्या या वस्तू. "
मी प्रचंड दचकलो.काही क्षणापूर्वी मी तळगावतल्या हत्यांसंदर्भात बातमी वाचली होती आणी आता त्याच गावातला एक इसम माझ्या समोर बसला होता.हा योगायोग होता की आणखी काही ते लक्षात येत नव्हत.
" तळगांवत नेमकं कुठे?"
" दोन महिन्यांपूर्वी एक घर जळून खाक झाल...ती जागा मालकाने विकली आता तिथे एक रिसॉर्ट बांधताहेत.मी तिथे सेंटरिंगच्या कामाला जातो. खोदकाम करताना मला ही खेळणी सापडली."
मी त्याला आणखी काही विचारल नाही. इतिहास संशोधनाच्या दृष्टीने त्या दोन्ही वस्तूंना फारसं महत्व नव्हत.तरीही मी त्याला पाच हजार रूपये दिले.मी ह्या वस्तू स्वखुशीने देत आहे अस मी त्याच्याकडून लिहून घेतल.त्याचा पत्ता लिहून घेतला.बाहेर पडताना तो मला थोडा विचलित वाटला.तो दरवाजा बाहेर पडला व पुन्हा परतला.
" मला तुम्हाला अजून काही सांगायचय...ही .. ही...खेळणी माझ्या घरात असताना काही विचित्र घटना घडत होत्या म्हणजे रात्री विचित्र आवाज येणे....कुणी चालत असल्यासारख वाटणे...वस्तूंची जागा बदलणे...यासारखे प्रकार होत होते."
. मी फक्त हसलो.खर म्हणजे इतिहास संशोधन करत असताना बर्याच वेळा मला गूढ व अतर्क्य प्रसंगाना सामोरे जावे लागले होत.त्यावेळी सापडलेल्या वस्तू माझ्या संग्रही आहेत.(संदर्भ -कथा- गूढ आणि लालसा) पण त्या इसमाच्या दाव्यावर माझा विश्वास बसला नाही. मी त्या वस्तू व्यवस्थित साफ केल्या व माझ्या वस्तूसंग्रहालयात काचेच्या पेटीत ठेवल्या .त्यावर त्या वस्तूचं वय लिहिलं.
दोन दिवस निघून गेले.तिसर्या दिवशी मी काही माणसं वस्तू संग्रहालय पहायला आली म्हणून त्याना वस्तू दाखवत व माहिती देत होत होतो.मी त्या दोन खेळण्यांच्या जवळ गेलो तेव्हा का कोण जाणे मला अस वाटल की त्यातल्या पंचशूलधारण केलेल्या मूर्तीची जागा बदललीय. म्हणजे मी ज्या स्थितीत ती मूर्ती ठेवली होती त्या स्थितीत ती नव्हती अस मला वाटल. मी त्याकडे दुर्लक्ष केल. आलेल्या त्या व्यक्तींना संपूर्ण संग्रहालय दाखवलं.ती माणस निघून गेल्यावर मी पुन्हा ती खेळणी ठेवलेल्या पेटीकडे गेलो.ती पंचशूलधारण केलेली मूर्ती मी बाहेर काढली.सुमारे सहा इंच लांबीची ती मूर्ती पुन्हा काळजीपूर्वक पहायला सुरुवात केली. बारकाईने बघता-बघता माझ्या लक्षात आल की बहिर्या ससाण्याच्या चोचीवर सूक्ष्म असा लालसर ठिपका आहे. निश्चितच ही मूर्ती मी तिथे ठेवली त्यावेळी तो नव्हता. मूर्ती काचेच्या पेटीत होती. मी बह्रिगोल भिंग घेवून निरीक्षण केल.आता तो ठिपका अधिक स्पष्ट दिसत होता. ते काय होते? ...रक्त...की रंग ? पण मुळात ते चोचीवर आले कसे? मी तो डाग सूईने काढून काचपट्टीवर घेतला व सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. माझी खात्री झाली की तो मानवी रक्ताचा डाग आहे.
मी अस्वस्थ झालो. मनावर एक अनामिक ताण आल्यासारखा वाटला. मी पुन्हा मूर्तीच निरीक्षण केल. मला मूर्तीच्या पाठीमागे कमरेच्या मध्यावर एक छोटा गोलाकार उंचवटा दिसला.ती एखादी कळ असावी अस वाटल्याने मी तो उंचवटा दाबला.घरघर...असा आवाज झाला व ती मूर्ती हलू लागली व पूढे सरकू लागली...तिचे पंख हलू लागले...
त्याचबरोबर खांद्यावरचा ससाणा वर खाली होवू लागला.खरच कारागीरान अतिशय छान अस खेळणं तयार केल होत.कदाचित काल रात्री कळ हलल्यामुळे खेळण्याची जागा बदलली असेल ...पण.....पण.....तो रक्ताचा थेंब..त्याच काय?
मला राहून -राहून वाटत होत की तळगांवातल्या घटनांचा या मूर्तीशी काहीतरी संबध असावा. पण नेमकं काय ते मला कळत नव्हत. त्यासाठी तळगांवात जाव लागणार होत.मी घरात आलो...अजून मी आजचे वर्तमानपत्र वाचले नव्हते. मी वर्तमानपत्र हातात घेतले फ्रंट पेजवरून नजर फिरवली व हैरान झालो.तळगांवत चौथा खून झाल्याची बातमी होती.नव्या बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या समोरच्या शेतात ही हत्या काल झाली होती.ही हत्याही आधीच्या तीन हत्यांप्रमाणेच झाली होती.मी त्वरीत तळगांवात जाण्याचे ठरवलं.मी ती दोन्ही खेळणी बॅगेत भरली.ती खेळणी घेवून येणार्या पंढरी रंगसूर यांचा पत्ता लिहून घेतला. माझ्या नेहमीच्या वस्तूही बॅगेत भरल्या.तळगांव इथून सत्तर किलोमीटरवर असल्याने मी माझी मोटरसायकल घेवून बाहेर पडलो.
दोन तासात मी तळगांवात पोहचलो.मी प्रथम तंळगांवच्या पोलीसस्टेशनमध्ये गेलो. ते एक छोटस पोलीस स्टेशन होत. तिथे भगवंत वारंग नावाचे इन्स्पेक्टर होते.मी त्यांना खून झालेल्या स्थळाचे फोटो दाखवण्याची विनंती केली.सुरूवातीला त्यांनी सरळ नाकार दिला.शिवाय केस आता सी.आय.डी. कडे गेली असून पोलीसस्टेशनमध्ये आता फाईल्स उपलब्ध नसल्याचे सांगितले. पण मी जिद्द सोडली नाही. मी इतिहास संशोधन करतो व एका मासिकासाठी लिखाण करतो हे सांगितलं व ओळखपत्रही दाखवल.अखेर वारंगांनी हवालदारांना फोटोंच्या प्रती आणायला सांगितले. मी ते फोटो क्रमवार लावून घेतले व एकएक फोटो काळजीपूर्वक बघायला सुरूवात केली. ज्यांची हत्या झाली ते सर्व तरूण होते.शरीरयष्टीवरून ते चौघेही तिशीच्या आतले वाटत होते.तिसरा फोटो बघत असताना मृतदेहाच्या बाजूला पानं पडलेली मला दिसली. मी चमकलो ..चार पानांची एकत्र डहाळी होती.निश्चितच ती सातविणाची डहाळी होती .मग उरलेली तीन पान कुठे गेली? मी आधीचे दोन फोटो पुन्हा उचलले.त्या फोटोतही सातविणाची डहाळी असली पाहिजे अस मला वाटल.माझा अंदाज बरोबर होता मृतदेहापासून बर्याच दूर फोटोच्या कोपर्यात मला डहाळी दिसली.निरखून बघितल तरच ती दिसत होती.पहिल्या फोटोतही सहा तर दुसर्या फोटोतही पाच पाने दिसत होती. मी झटकन चौथा फोटो उचलला....त्यातही सातविणाची डहाळी होती व त्यात फक्त तिन पाने शिल्लक होती.
"अरे देवा...."मी उद्गारलो.
एवडा वेळ माझ्याकडे बारकाईने बघणार्या वारंगांच्या भुवया उंचावल्या .
"काय...काय..दिसल तुम्हाला."
" सगळे तरूण आहेत व एकाच पध्दतीने सगळ्यांचे खून झालेत. "
"यात नविन काय आहे?"
" आहे , नविन आहे , कदाचित आणखी तीन हत्या होवू शकतात."
इन्स्पेक्टर वारंग धडपडून उभे राहिले. जणू मीच हे सगळे खून करतोय की काय अश्या नजरेने माझ्याकडे पाहू लागले.
" आणखी तीन खून ...कोणाचे? आणि कश्यावरून?"
" तुम्ही हे फोटो पुन्हा एकवार बघा ..समजेल तुम्हाला. प्रत्येक फोटोत एक -एक पान कमी झालेली सातविणाची डहाळी दिसतेय.अजून तीन पान शिल्लक आहेत." मी म्हणालो.
वारंगानी माझ्याकडून फोटो जवळ -जवळ ओढून घेतले.
" ओ..गाॅड खरच ..पण ...कुणाच्याच कस लक्षात आल नाही. पण हे तीघे कोण असतील? त्यांना वाचवता येईल का? खूनांच कारण काय?"
" नाही हे मी सांगू शकत नाही. यातल्या कुणाची ओळख पटली काय.?"
" अजून तरी नाही. हरवलेल्या....गायब झालेल्या व्यक्तीं ची पडताळणी चालू आहे." वारंग म्हणाले.
मी पोलीसस्टेशनाला बाहेर पडलो.वारंगानी माझा फोन नंबर घेतला. नंबर लिहून घेताना ते माझ्याकडे अजब नजरेने बघत होते.
खर म्हणजे ते फोटो बघून माझ्या घश्याला कोरड पडली होती.बाहेर येताच मी रुमालाने घामेजलेला चेहरा पुसला. माझ्या बॅगेत असलेल्या मूर्तीच्या डाव्या हातात सातविणाची सात पानांची पितळीची डहाळी होती...हे आठवून मी थरारलो होतो. ही गोष्ट पोलीसांनी कळली तर माझ्यावर संशयाची सूई फिरणार होती.त्या मूर्तीच या हत्यांशी काय संबध आहे हे शोधणे गरजेचं होत.या मूर्तीतच काहीतरी रहस्य दडलेले आहे अस मला वाटत होत.
आता मला पंढरी रंगसूर व त्या जळालेल्या घराचा मूळ
मालक यांची भेट घ्यायची होती.त्या घरात ही खेळणी सापडली होती.सध्या घडत असलेल्या घटना त्या घराशी निगडीत असाव्यात अस मला वाटत होत.
--------*----------*-------------*-------------*---------
भाग-1 समाप्त