अकल्पित - भाग १ Dilip Bhide द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अकल्पित - भाग १

अकल्पित भाग १

रविवार ची सकाळ होती, सगळं कसं आरामात चाललेलं होतं. सचिन आणि रामभाऊ म्हणजे सचिन चे बाबा, पेपर वाचत होते. दोन्ही मुलं सायली वय वर्षे १० आणि शेखर वय वर्षे ६ आणि साधना बाई म्हणजे सचिन ची आई, ही मंडळी कार्टून नेटवर्क बघत होती. सचिन ची बायको, वर्षा स्वयंपाकघरात रविवारचा नाश्ता बनवत होती. बाहेर सोसायटी च्या छोट्या मैदानात पोरं क्रिकेट खेळत होती.

अशातच एक काही तरी जड वस्तु पडल्याचा धडाम असा आवाज आला. सचिन ने मान वर करून इकडे तिकडे पाहिलं. रामभाऊ नव्हते पण त्यात काही विशेष नाही असं समजून त्याने पुन्हा पेपर मध्ये डोक घातलं. आणि शेजारच्या सुतारकाकांची हाक आली.

“सचिन खाली ये रामभाऊ गच्चीतून पडले. धाव रे”

सचिनला क्षणभर काहीच कळेना पण तो लागलीच खाली धावला. चार चार पायऱ्या उतरून खाली पोचला. रामभाऊ खाली पडले होते आणि भोवती मुलांचा घोळका जमला होता. कोणीतरी त्यांना पाठीवर झोपवून पाणी मारत होतं. रामभाऊ बेशुद्ध होते आणि पाणी मारण्याचा काही उपयोग होत नव्हता. अरे अॅम्ब्युलेन्स बोलवा, कोणीतरी ओरडलं. सचिन जवळ मोबाइल नव्हता, त्यानी सभोवार नजर फिरवली, दीक्षितांच्याकडे मोबाइल होता. त्यांच्या पण लक्षात आलं त्यांनी झटकन फोन लावला. “दहा मिनिटांत येतेय” ते बोलले.

सुतार काका म्हणाले “सचिन वर जा आणि कपडे बदलून घे आणि पैसे, कार्ड पण बरोबर घे. अॅम्ब्युलेन्स यायला १० मिनिटे आहेत. तोवर आम्ही रामभाऊंकडे बघतो.” सचिनने मान डोलावली आणि तो वरती गेला. सुतार काका त्यांच्या मुलाकडे वळून म्हणाले की “शशी गाडी काढ आणि पाठोपाठ जा सचिनला तुझी जरूर लागेल.” दीक्षितांचा मयंक पण म्हणाला की “शशी मी पण येतो.”

हॉस्पिटल मध्ये पोचल्यावर डॉक्टर कपूरनी तपासलं. म्हणाले, “वरकरणी पाहता काहीही डॅमेज नाहीये. हा एक चमत्कारच आहे दुसऱ्या मजल्यावरून पडले तरी काही झालेलं नाही, साध खरचटलं सुद्धा नाही. मात्र internal injuries आहेत का, ते पाहावं लागेल. त्यासाठी आम्ही त्यांना MRI करायला घेऊन जातो आहोत.”

अर्ध्या तासांनी डॉक्टर पुन्हा आले म्हणाले की “MRI मध्ये सगळं ठीक आहे. आता फक्त त्यांच्या शुद्धीवर येण्याची वाट आहे. येत्या २४ तासात ते शुद्धीवर येतील. नाही आले तर बघू काय करायचं ते. पण तुम्ही निश्चिंत रहा. त्यांना ICU मध्ये शिफ्ट करायची गरज वाटत नाहीये म्हणून त्यांना प्रायवेट रूम मध्ये हलवायला सांगितलं आहे. कोणी एक जण त्यांच्याबरोबर राहू शकता.”

सचिनला राहवेना, तो म्हणाला “डॉक्टर, कोमा ची शक्यता ....”

“नही नही We checked it. His reflexes are quite ok. He is only unconscious. Nothing to worry. Be relaxed.”

संगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. आता काहीच करण्यासारख नव्हत. म्हणून सर्वजण संध्याकाळी येऊ अस म्हणून निघाले. सचिन थांबला. थोड्या वेळाने वर्षा आणि साधना बाई आल्या. मग सचिन घरी जायला निघाला. आंघोळ, जेवण आटोपून सचिन परत हॉस्पिटलला पोचला. साधना बाई घरी जायला तयार नव्हत्या त्या तिथेच थांबल्या आणि वर्षा एकटीच घरी गेली.

संध्याकाळी साताच्या सुमारास नर्स B.P.चेक करत होती तेंव्हाच रामभाऊंना शुद्ध आली. डोळे उघडल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते हॉस्पिटल मध्ये आहेत म्हणून, नर्स कडे बघून ते हसले. मान वळवल्यावर सचिन आणि साधनाबाई दिसल्या. ते दोघंही लगबगीने बेड जवळ आले. नर्स ने विचारलं

“आजोबा कसं वाटतंय आता ?”

“एकदम छान.” – रामभाऊ.

“Good , मी आता डॉक्टरांना सांगून येते.” – नर्स.

ती अस बोलतच होती तेंव्हाच डॉक्टर कपूर, आणि दोन पोलिस आत आलेत. खोलीतले सगळेच प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिले. पोलिस कशाला आलेत हे कोणालाच समजेना.

“नमस्कार मी PSI धनशेखर, आजोबा तुम्हालाच भेटायला आलो. तुम्ही बाल्कनी मधून पडलात अस कळलं. कसे काय पडलात तुम्ही ?”

“अहो खाली मुलं क्रिकेट खेळत होती, त्यांचा बॉल बाल्कनीत आला. तो त्यांच्याकडे फेकायला मी गेलो आणि माहीत नाही माझा कसा तोल गेला ते, आणि मी पडलो. नंतरचं काही आठवत नाही. तुम्ही यायच्या दोन मिनिट आधी शुद्धीवर आलो बघा.” – रामभाऊ म्हणाले.

“तुम्ही बाल्कनीत कशाला गेला होता ?” – धनशेखर.

“गरम व्हायला लागलं म्हणून स्वेटर काढून खोलीत ठेवायला गेलो होत, तर मुलांचा बॉल आला, म्हणून बाल्कनीत गेलो.” – रामभाऊ.

“कोणी तुम्हाला ढकललं तर नाही न ?” – धनशेखर.

“छे छे अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही.” – रामभाऊ.

“ठीक आहे. आता तुम्हीच म्हणताय तर आम्ही आता अपघात म्हणून शेरा मारून टाकतो. बरय लवकर बरे व्हा.” धनशेखर साहेबांनी विषय संपवला.

पोलिस गेल्यावर डॉक्टर कपूरनी तपासायला घेतलं.

“वा: आजोबा तुम्ही तर एकदम फिट दिसताहात. घरी जायला हरकत नाही. पण तरी मला अस वाटत की आजची रात्र यांना इथे राहू द्या. उद्या सकाळी डिस्चार्ज देऊ.” – डॉक्टर कपूर म्हणाले.

“ठीक आहे डॉक्टर.” – रामभाऊ.

दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी तपासून डिस्चार्ज दिला. घरी यायला दुपारचा एक वाजला. रामभाऊ एकदम फिट होते. जणू काही कालचा प्रसंग घडलाच नव्हता. रामभाऊंना काहीही झालेलं नाही हे बघून सर्वांनाच आनंद झाला होता. तरी

सचिन थोडा अस्वस्थच होता. चुळबुळत होता. रामभाऊंच्या ते लक्षात आलं.

“काय रे काही तरी बोलायचय तुला खरं ना ?” – रामभाऊ.

“हो बाबा, तुम्ही चार फूटी कठडयावरुन पडलेच कसे हे समजतच नाहीये. बाकी सगळ्यांनी माना डोलावल्या.” – सचिनने आपली शंका बोलून दाखवली.

“अरे माघाशीच नाही का सांगितलं की मला सुद्धा कळलं नाही.” रामभाऊ म्हणाले, “अजूनही कळत नाहीये. आणि एवढ्या उंचावरून पडूनही काही लागलं नाही ही देवांचीच कृपा.”

साधनाबाई म्हणाल्या, “झालं गेलं गंगेला मिळालं. यावर आपण आता बोलूया नको. नुसतं आठवून सुद्धा जीवाचा थरकांप होतो.”

संगळ्यांनीच मग तो विषय थांबवला.

दुसऱ्या दिवशी सकाळी सचिन रामभाऊंना म्हणाला

“बाबा ऑफिसला जाऊ ना ? का आजच्या दिवस घरी थांबू ?”

“नको नको जा तू ऑफिसला.” रामभाऊ म्हणाले. “अरे मला काहीही झालेलं नाहीये. तू निश्चिंत मनाने ऑफिसला जा. साधनाबाई पण म्हणाल्या जा तू. काळजी नको करू.”

साधारण महिना झाला असेल, सचिन ऑफिस मधून घरी आला तेंव्हा त्याचा चेहरा जरा उतरला होता. साधनाबाईंनी त्यांच्याकडे बघून काळजीच्या सुरात विचारलं

“काय रे काय झालं ? तुझा चेहरा असा का दिसतो आहे?” त्यांचं बोलणं ऐकून वर्षा पण बाहेर आली तीही प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्या कडे बघत होती.

“सांगतो, सर्व सांगतो” सचिन म्हणाला, मुद्रा गंभीरच होती. “पण आधी जरा वॉश घेऊन येतो. तो पर्यन्त चहाचं बघ.” वर्षांनी मान डोलावली आणि ती किचन मध्ये गेली.

वॉश घेऊन आला तर चहा आणि बिस्किटं तयार होती आणि सर्वजण उत्सुकतेने त्याच्याकडेच बघत होते.

सचिनने सगळ्यांच्या कडे बघितलं आणि सांगायला सुरवात केली.

“बाबा, शेजारच्या राजरंग सोसायटी मध्ये त्रिलोक मेहता राहतात माहीत आहे न ? त्यांचं सोन्या चांदीचं दुकान आहे.”

“हो, हो त्रिलोक चे वडील सोमनाथ भाई माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. पण त्यांचं काय ? परवाच तर भेटलो होतो ,चांगले धडधाकट होते की.” रामभाऊ आश्चर्याने म्हणाले.

“त्यांचं काही नाही ते बरे आहेत.” सचिन सांगत होता. “त्यांचा नातू म्हणजे त्रिलोक चा मुलगा परेश, तो हरवला आहे. तीन दिवस झालेत. सुरवातीला त्यांना पळवा पळवी चा संशय आला. पण अजून पर्यन्त खंडणीचा कोणताही फोन आला नाही. त्यांनी तर पैश्यांची जुळवा जुळव पण सुरू केली होती. पण आता पोलिस म्हणतात की हा मानव तस्करीचा प्रकार असावा म्हणून. पोलिस शोध मोहीम राबवताहेत पण अजून यश आलं नाही.”

“तुला केंव्हा कळलं?” – रामभाऊ.

“आजच संध्याकाळी त्यांच्याच सोसायटी मध्ये पाचव्या मजल्यावर राहणारे सामंत भेटले होते, त्यांनी सांगितलं. बाबा, आपण त्यांच्या कडे जायला हवं अस मला वाटत.” सचिन म्हणाला.

“अरे नक्कीच जायला हवं. आत्ता जावूया?” – रामभाऊ.

“चला, जावूया. पण अश्या वेळी काय बोलायचं ते कळत नाही हो. आत्ता पर्यन्त बरेच जण येऊन सांत्वनपर बोलून गेले असतील. आपणही तेच तेच बोलायचं?” सचिनने आपली अडचण बोलून दाखवली.

“गोष्ट खरी आहे पण त्यांच्याकडची परिस्थितीच अशी असेल की आपण हास्य विनोद करू शकत नाही. गंभीर प्रसंग आहे आणि त्यानुरूपच बोलावं लागणार आहे.” – रामभाऊ समजावणीच्या स्वरात बोलले.

“ठीक आहे चला. आई आम्ही जाऊन येतो.” – सचिन.

त्रिलोक च्या घरी शांतता होती. सोमनाथभाई, त्रिलोक, त्रिलोक ची आई, त्रिलोक ची बहीण कृतिका आणि तिचा नवरा रितेश सर्व बसले होते पण कोणीच कोणाशी बोलत नव्हते. टेबलावर परेश चा फोटो होता. त्रिलोक ची बायको नर्मदा फोटो वरुन हात फिरवत होती आणि तिला अश्रु अनावर होत होते. गेले तीन दिवस तिचे अश्रु थांबत नव्हते. साहजिकच होतं ते. कृतिका तिच्या शेजारी बसून तिला धीर देण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होती.

या दोघांकडे बघून त्रिलोकने आणि सोमनाथभाईनी मान हलवली. बोललं कोणीच नाही. रामभाऊ सोमनाथ भाईंच्या जवळ बसले. त्यांचा हात हातात घेऊन थोपटल्यांसारख केलं आणि गप्प बसले.

रामभाऊ इकडे तिकडे बघत होते आणि त्यांची परेश च्या फोटोवर नजर पडली. त्यांचं डोक गरम झालं, डोक्यात काहीतरी हालचाल सुरू झाली, मन सैरभैर झालं आणि पुन्हा सर्व शांत झालं. रामभाऊंच्या डोळ्यासमोर वीज चमकली आणि रामभाऊ अचानकच बोलले,

“अरे मला माहीत आहे की परेश कुठे आहे ते.”

“काय ? कुठे आहे ? तुम्हाला कसं माहीत?” त्रिलोक आणि सोमनाथभाई एकदमच ओरडले .

ते माहीत नाही. पण मला हे माहीत आहे की तो कुठे आहे.” – रामभाऊ, त्यांचा चेहरा आता विलक्षण तेजाने चमकत होता.

“कुठे आहे?” - सोमनाथ भाई.

“माहीत नाही.” – रामभाऊ.

सचिन वैतागला त्याला कळेना की बाबा असे का वागताहेत, म्हणाला. “बाबा अहो तुम्ही काय बोलता आहात ते तुम्हाला तरी कळलय का ?”

“नाही, मलाही कळत नाहीये, पण थांब, माझ्या डोक्यात काहीतरी घडतंय. जरा थांब.” रामभाऊ म्हणाले.

हॉल मध्ये विचित्र शांतता पसरली, नर्मदा रडायचं थांबली. सगळेच रामभाऊंकडे पाहू लागले.

क्रमशा:..........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com