अकल्पित - भाग ३ Dilip Bhide द्वारा विज्ञान-कल्पनारम्य मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अकल्पित - भाग ३

अकल्पित   भाग   ३

भाग २  वरुन  पुढे वाचा ........

 

“हॅलो साहेब मी PSI धनशेखर बोलतो आहे. एक मुलगा परेश मेहता, तीन दिवसांपूर्वी  हरवला आहे, तुम्हाला अपडेट दिलं होतं काल, त्यांचे where abouts मिळाले आहेत. सूरत च्या आसपास त्यांची लोकेशन मिळाली आहे. सूरत च्या पोलिसांना कळवून त्यांची मदत घ्यावी लागणार आहे साहेब.”

“खबर पक्की आहे?” – साहेब.

“हो साहेब.” – धनशेखर.  

“मग तातडीने हालचाल करा. सूरत पोलिसांशी बोला आणि तुम्ही पण लगेच सूरतला निघा.” – साहेब.  

“होय साहेब. आज रात्रीच निघतो.” – धनशेखर.  

“ओके. मला अपडेट देत रहा.” – साहेब.  

“ओके साहेब.” – धनशेखर म्हणाले, आणि फोन ठेवला.

“मेहता साहेब, मोठ्या साहेबांनी तर परवानगी दिली. आता जे काही करायचं ते आपणच. आता प्रथम रामभाऊंनी जर आताची लोकेशन दिली तर सूरत पोलिसांना ती लोकेशन कळवता येईल. कारण तुम्ही जेंव्हा प्रथम पाहिलं त्यानंतर दोन तास उलटून गेले आहेत. आणि आता तो सूरतला पोचला देखील असेल, किंवा पुढे निघाला असेल. पण आपल्याला exact location समजली पाहिजे.” अस म्हणून त्यांनी रांमभाऊं कडे पाहिले.

“मला त्या साठी सूरत आणि त्याच्या आसपासचा नकाशा लागेल.” – रामभाऊ.  

वेळेकरांनी त्यांना सूरत च्या नकाशाचं printout आणून दिलं.

रामभाऊंनी प्रोसीजर करायला घेतली. डाव्या हाताचा तळवा परेशच्या फोटोवर आणि उजव्या हातात पेन. या वेळी पेन सूरत शहरातल्या एका इंडस्ट्रियल इस्टेट वर टेकली. तो स्पॉट जरा झूम करून त्यांचे printout वेळेकरांनी काढून आणले.

या वेळेला पेन टेकली ती सिटि इंडस्ट्रियल इस्टेट मध्येच स्वामिनारायण मंदिराच्या पासून थोड दूर, एका शेड वर.

धनशेखरांनी त्या बिंदु भोवती लाल शाईने गोल काढला आणि त्याचा फोटो काढला. मग त्यांनी सूरत च्या SP साहेबांना फोन लावला, आणि त्यांना पूर्ण कल्पना दिली. मग त्यांना परेश चा फोटो आणि नकाशा चा फोटो पाठवून दिला. मग त्रिलोक कडे वळून म्हणाले की “तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकता. आम्ही आज रात्रीच सूरतला निघतो आहोत. उद्या दुपारी बारा वाजे पर्यन्त आपण पोहोचू सूरतला. तोपर्यन्त जर सूरत पोलिसांना यश मिळालं असेल तर परेश आपल्याला भेटेल सुद्धा.”

त्रिलोक लगेच तयार झाला. “साहेब तुम्ही सांगा केंव्हा आणि कुठे जमायचं ते, आम्ही पोचतो.”

सचिन म्हणाला “इंस्पेक्टर साहेब मी थोडं बोलू का?”

“बोला” – धनशेखर

“मला अस वाटत की मी आणि बाबा सुद्धा येतो कारण जर अपहरण करणाऱ्यांना काही शंका आली आणि त्यांनी परेशला कुठे दुसरीकडे हलवलं तर त्या वेळेस बाबा ते शोधून काढू शकतील.”

धनशेखरांनी मान हलवली, पण म्हणाले की, “बरोबर आहे तुमचं म्हणण, पण जर ते इथे असतील तर त्यांना हवा तो नकाशा चटकन मिळू शकेल. आपण प्रवासात असतांना ही सोय असणार नाही. तेंव्हा त्यांनी इथेच असणं सोयीस्कर आहे. फक्त रात्री फोन चालू ठेवा  म्हणजे झालं. सचिन साहेब तुमच्याकडे प्रिंटर आहे ना.’

“हो साहेब आहे.” सचिन उत्तरला. “आम्ही तयारीत राहू.”

“आणि मेहता साहेब फक्त तुम्हीच या. बाकी कोणी नको. कारण गांठ बादमाशांशी आहे वेळ प्रसंग कसा येईल ते सांगता येत नाही म्हणून ही खबरदारी घेणं आवश्यक आहे.” – धनशेखर म्हणाले.

घरी आल्यावर सचिनने साधनाबाईंना आणि वर्षाला पूर्ण अपडेट दिलं. वर्षांनी एक नवीनच मुद्दा काढला म्हणाली, “आपल्याकडे लॅपटॉप आहे, इंटरनेटचं राऊटर पण आहे. आपलं प्रिंटर इनव्हरटर वर चालतं. लॅपटॉप पण चालतो. जर हे सगळं इनोवा गाडीत घालून तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात तर माझ्यामते जास्त सय्युक्तिक होईल. बाकी तुम्ही ठरवा. प्रश्न परेशच्या जिवाच्या आहे. एवढा सगळं तुम्ही करता आहात तर अर्ध्यावर सोडू नये अस मला वाटत.”

सचिन तिच्याकडे पहातच राहिला. वर्षांचा मुद्दा बरोबरच होता. सर्वांनाच तो पटला. त्रिलोक कडे इनोवा गाडी होती, त्यामुळे हे सामान न्यायला  काहीच अडचण येणार नव्हती. त्यांनी लगेच त्रिलोकला फोन लावला आणि त्याला वर्षांची कल्पना सांगितली. त्याला आनंदच झाला. तो म्हणाला “अरे वा हे तर बेस्टच होईल. तुम्ही तयार व्हा. मी गाडी घेऊन येतो.”

रात्री साडे दहा वाजता सर्वजण पोलिस स्टेशन मध्ये पोचले. त्रिलोक,रितेश, सचिन आणि रामभाऊ या सर्वांना पाहून धनशेखर साहेब थोडे नाराज झाले, पण त्रिलोकने  त्यांना नीट समजावून सांगितल्यावर त्यांनाही पटलं. पोलिसांची सुमो आणि यांची इनोवा लगेचच सूरत च्या दिशेने धावू लागली.

सकाळी साडे पांच वाजता धनशेखर साहेबांचा फोन वाजला. जवळ जवळ पंधरा मिनिटे बोलणं चालू होतं. फोन झाल्यावर साहेबांनी ड्रायवर ला सांगितलं की एखादी चहाची टपरी दिसली तर थांबव.

चहाच्या टपरीवर सगळे जण थांबले. सर्वांना ब्रेक हवाच होता. मग चहा पिता पिता धनशेखर साहेबांनी सांगितलं की, “परेश सापडला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे  आणि त्याला हॉस्पिटलला हलवलं आहे. त्यांची प्रकृती चांगली नाहीये पण डॉक्टर म्हणाले की काळजीच काही कारण नाही. उपचार चालू आहेत. बाकी डिटेल्स तिथे पोचल्यावरच कळतील.”

“केंव्हा कळलं तुम्हाला साहेब” –त्रिलोक

“आत्ताच पाच मिनिटांपूर्वी फोन आला, मग मी लगेच गाडी थांबवायला सांगितलं.” – धनशेखर.

“आपण जी लोकेशन दिली होती तिथेच सापडला?” – त्रिलोकने विचारले.  

“नाही त्याला तिथून दुसरीकडे नेत होते. पण पोलिसांनी तिथून जाणाऱ्या, येणाऱ्या प्रत्येक गाडीचं चेकिंग केलं. पहाटे साडे तीनची विचित्र वेळ होती, आणि अश्या वेळी ही गाडी सुसाट वेगाने जात होती. पोलिसांनी पाठलाग करून गाडी थांबवली. एक छोटसं encounter झालं. एक बादमांश मारल्या गेला, बाकी तीन पकडल्या गेलेत. एकंदर तीन मूल सापडली. Human trafficking ची केस आहे. पण सगळी  मुलं सुखरूप आहेत. मेहता साहेब तुमचं अभिनंदन.  रामभाऊ, तुमच्यात अपघातानंतर दैवी शक्ति आली आहे, तुम्हाला नमस्कार करतो. आणि प्रथम जो अविश्वास दाखवला होता, त्या बद्दल मी तुमची क्षमा मागतो. Sorry.” धनशेखर साहेबांनी हात जोडले.

रामभाऊ म्हणाले “धनशेखर साहेब, तुमचाच काय माझाच, माझ्यावर विश्वास नव्हता. पण का कोण जाणे मनातून कसलीतरी जबरदस्त प्रेरणा होत होती. आणि परेशच्या जीवाचा प्रश्न होता, म्हणून मी हे धाडस केलं. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ.”

त्रिलोकने आणि सचिनने आपापल्या घरी  फोन करून updates दिले. आता सर्व रीलॅक्स होते.

हॉस्पिटल मध्ये परेश भेटला तेंव्हा पर्यन्त तो बराच सावरला होता. बाबांना बघून त्यानी जी घट्ट मिठी मारली, ते पाहून इतरांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. धनशेखरांनी सर्व फॉरमॅलिटीज पूर्ण करून परेशला ताब्यात घेतलं. बाकीच्या तीन मुलांच्या आई वडिलांचा शोध घ्यायला सूरत पोलिसांनी सुरवात केली होती. 

दुपारचे चार वाजले होते कोणाच्याही पोटात अन्नाचा कां नव्हता. वेळेकर म्हणाले “साहेब आधी कुठे तेरी जेवून घेऊ आणि मग नॉनस्टॉप लातूर ला जाऊ.” सगळ्यांना ते पटलं, मग  एका धाब्यावर सगळे थांबले.

धनशेखर म्हणाले की, “रामभाऊ तुमच्या या ज्ञानाचा आमच्या डिपार्टमेंटला चांगला उपयोग होऊ शकतो. आता पळवलेली सगळी मुलं सापडतील. गुन्हेगारांचा सुद्धा पत्ता लागेल, तुम्ही सहकार्य करणार ना?”

“नि:संशय साहेब, हे तर समाज कार्य आहे. जरूर सहकार्य करीन.” – रामभाऊ.

जेवण झाल्यावर धनशेखर, वेळेकर आणि रामभाऊ पान खायला टपरीवर गेले. आपसात बोलत बोलत वापस येतांना अचानक एक ट्रक धाब्यावर येता येता, ड्रायव्हर चा कंट्रोल सुटला आणि त्या ट्रकनी सरळ रामभाऊं आणि वेळेकरांना  उडवलं. क्षणभर कोणालाच काही कळलं नाही, आणि जेंव्हा लक्षात आलं तेंव्हा सर्वांचाच थरकाप उडाला. सचिन जोरात ओरडला आणि धावला. धाब्यावरही बरेच लोकं होते, ते ही जमा झाले. अॅम्ब्युलन्स बोलवायला वेळ नव्हता. दोघांनाही रक्तबंबाळ अवस्थेत गाडीत घातलं आणि जवळच्याच हॉस्पिटल मध्ये नेलं. धनशेखरांनी सूरत पोलिसांना फोन केला ते ही येऊन पोचले. दोघांचीही प्रकृती क्रिटिकल होती, त्यांच्यावर उपचार चालू होते.

त्रिलोक म्हणाला “सचिन हे काय झालं रे, आत्ता पर्यन्त किती आनंदात होतो आपण आणि अचानक हे काय होऊन बसलं.” सचिन काहीच बोलला नाही. शून्य मनाने तो बघत राहिला. त्रिलोकनीच मग त्यांच्या आणि सचिनच्या घरी फोन केला आणि अपघाताची बातमी दिली. दोघांचीही प्रकृती out of danger आहे असंही सांगितलं. या घटने मुळे इथेच दोन दिवस थांबाव लागेल असंही सांगितलं.

सकाळपर्यंत दोघंही शुद्धीवर आले होते आणि बरेच रिकव्हर पण झाले होते. डॉक्टरांनी तपासल्यावर सांगितलं की आता काळजीच काही कारण नाहीये. रामभाऊंचा हात तुटला होता आणि डोक्याला मार बसला होता. Internal injuries होत्या त्यांच्या वर ट्रीटमेंट करावी लागणार होती. आठवडा तरी राहावं लागेल अस डॉक्टरांनी सांगितलं. दोन दिवसांनी वेळेकरांची सुट्टी झाली. धनशेखर आणि वेळेकर लातूरला निघून गेले. त्यांनी परेशला बरोबर नेण्याची तयारी दाखवली पण त्रिलोक तयार झाला नाही. शेवटी रीतेश आणि परेश पोलिसांबरोबर लातूरला परतले. त्रिलोक आणि सचिन रामभाऊंसाठी थांबले. आठ दिवसांनंतर ते ही परतले.

महिन्याभरा नंतर धनशेखर रामभाऊंकडे आले म्हणाले की, “आता कसं वाटतंय? त्यांनी ठीक आहे म्हंटल्यांवर त्यांनी खिशातून दोन फोटो काढले म्हणाले ही दोन मुलं बेपत्ता आहेत. पंधरा दिवस झालेत पण काहीही सुगावा लागत नाहीये. तुम्ही मदत करता का?”

रामभाऊ बसले आणि त्यांनी प्रोसीजर सुरू केली.

दोन मिनिटा नंतर म्हणाले की मला काहीच प्रेरणा मिळत नाहीये. साहेब मला वाटत नाही की मी काही करू शकेन. अस दिसतंय की एका अपघाताने शक्ति दिली पण दुसऱ्या अपघाताने ती हिरावून घेतली. सॉरी.

***** समाप्त *******

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com