डिकीतला सस्पेन्स भाग १
रात्रीचे अकरा वाजले होते. लातूर सोलापूर मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा काळ होता, आणि एका लाल रंगाच्या कार मध्ये कॅश घेऊन चालले आहेत अशी खबर होती. आता पर्यन्त पांच कार चेक करून झाल्या होत्या. रहदारी चालूच होती पण लाल कार नव्हती त्यामुळे पोलिस जरा आळसावून बसले होते. अशातच एक लाल कार येतांना दिसली. पोलिसांनी कार थांबवली.
“साहेब, कार चेक करायची आहे. आपण जरा बाहेर येता का ?” – पोलिस.
“का काय झालं ?” दिनेश ने विचारलं.
“चेकिंग होऊ द्या मग सांगतो आम्ही.” – पोलिस.
“ओके. करा चेक.” – दिनेश म्हणाला आणि गाडीतून खाली उतरला.
कारचं चेकिंग झालं.
“बॅग मध्ये काय आहे. उघडा ती.” – पोलिस.
दिनेश नि बॅग उघडली.
“आता डिकी उघडा. डिकी उघडल्या गेली.” – पोलिस.
दिकी उघडल्यावर पोलिसांनी जे पाहिलं त्यांनी ते हादरून गेले. हे दृश्य त्यांना अपेक्षित नव्हतं. त्यांनी ताबडतोब आवाज दिला. “साहेब, लवकर इकडे या. डिकीत लाश आहे.”
“अं ? काय म्हणतोस काय ? लाश आहे ?” – इंस्पेक्टर धनशेखर
“हो साहेब, एका मुलीची आहे.” – पोलिस.
साहेब आणि दिनेश दोघेही धावले. डिकीत एका मुलीचा मृतदेह कोंबला होता. पाहून दिनेशला भोवळच आली. कसा बसा कारच्या आधाराने तो उभा राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण शेवटी खाली पडलाच, आणि त्यांची शुद्धच हरपली. वेळेकरांनी जवळच्या बाटलीतलं पाणी शिंपडलं. दिनेश ला शुद्ध आली. तो सावरून बसला. म्हणाला -
“साहेब, ही मुलगी, हा काय प्रकार आहे ?”
“ते तुम्ही सांगायचं.” इंस्पेक्टर बोलले. “कोण आहे ही मुलगी, आणि हिला का मारलं ? अजूनही डिकीत बॉडी दिसतेय, म्हणजे विल्हेवाट लावायला मोका मिळालेला दिसत नाहीये.”
“साहेब मी ह्या मुलीला ओळखत पण नाही. मी एकटाच नागपुरहून सोलापूरला जातो आहे. हा काय प्रकार आहे, काही काळात नाही.” दिनेश आता घाबरला होता.
“हूं, वेळेकर अजून दोघांना बोलवा आणि मुलीला बाहेर काढा. बॉडी identify करता येण्या सारखं काही मिळतंय का बघा.” – इंस्पेक्टर.
“साहेब, ओळख पटण्या साठी काहीही मिळालं नाही. पण साहेब बॉडीवर जखमेच्या कुठल्याही खुणा नाहीयेत.” – पोलिस.
“ठीक आहे बॉडी पोस्ट माऱ्टेम ला पाठवा.” आणि नाकाबंदीचं काम PSI कडे सोपवून इंस्पेक्टर धनशेखर दिनेशला घेऊन पोलिस स्टेशनला निघाले. पोचल्यावर दिनेशची चौकशी सुरू झाली.
“हं आता बोला साहेब, तुम्ही कोण, कुठे राहता, कुठून कुठे जात होता, काय काम होतं ? सगळं नीट सांगा.” – इंस्पेक्टर धनशेखर
“साहेब मी दिनेश घारपुरे. राहणार पुणे. एका खाजगी कंपनीत सीनियर मॅनेजर आहे. नागपूरला मित्रांच्या मुलाचं लग्न होतं म्हणून नागपूर गेलो होतो. इथे सोलापूरला माझ्या दुसऱ्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे म्हणून नागपूर वरून डायरेक्ट सोलापूरला चाललो होतो. मध्येच ही भानगड झाली.” – दिनेश.
“नागपूरला कोणाकडे गेला होता ?” – धनशेखर
“माझा कॉलेजचा मित्र आहे. सुधाकर केळापुरे, त्यांच्या मुलाचं लग्न होतं.” – दिनेश
“इथे सोलापूरला कोणाकडे ?” – धनशेखर.
“इथे माझा बालमित्र आहे वैशाख साठे, त्यांच्या मुलीचं लग्न आहे त्या साठी सोलापूरला चाललो आहे.” दिनेश म्हणाला.
“वैशाख साठे म्हणजे साठे वकील ?” – धनशेखर.
“हो.” – दिनेश.
“त्यांचा फोन नंबर असेलच तुमच्याकडे. बोलणं होतं का त्यांच्याशी ?” – धनशेखर.
“हो आहे. पण तुम्ही असं का विचारता आहात ?” – दिनेशनी विचारलं.
“त्यांना विचारून खात्री करायला.” – धनशेखर.
“नको साहेब आज नको.” दिनेशनी अगदी आजिजीने विनंती केली “मला इथे रात्रभर अडकवा, पण त्यांना फोन नका करू.”
“का ? ते ओळख देणार नाही अशी भीती वाटते ?” – धनशेखर खोचकपणे म्हणाले.
“नाही. उद्या त्यांच्या मुलीचं लग्न आहे.” दिनेश आपला मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. “आत्ता रात्रीचे दोन वाजले आहेत, अश्या वेळेला जर त्यांना फोन गेला तर तिथे फार विचित्र परिस्थिति निर्माण होईल. कदाचित मुलाकडचे लोक लग्न कॅन्सल पण करतील. मुलीच्या बापाच्या मित्राच्या, कार मध्ये एका मुलीचा मृतदेह सापडतो ही गोष्ट, परिस्थितीला काय वळण देईल हे सांगता येणार नाही. साहेब, साठे वकिलांना तुम्हीपण ओळखता, त्यांच्यावर असा दुर्धर प्रसंग यावा असं तुम्हाला वाटतं का ? साहेब, बिदाई झाल्यावर मुलगी सासरी गेल्यावर उद्या संध्याकाळी फोन करा. तो पर्यन्त मला इथे अडकवा. मला चालेल.”
“हूं. तुम्ही म्हणता ते पटतंय. ओके. आपण थांबू. पण तुम्हाला कुठेही जाता येणार नाही ही लक्षात घ्या.” धानशेखरांनी निकाल दिला.
“चालेल.” – दिनेश.
धनशेखर वेळेकरांना म्हणाले “या माणसाला त्रास देऊ नका हा माणूस विनाकारण अडकलेला दिसतोय. तुम्हाला काय वाटतं ?”
“बरोबर आहे साहेब,” वेळेकर म्हणाले. “माणूस तसा सज्जन दिसतो आहे. पण साहेब सज्जन दिसणारी माणसं सुद्धा अतिशय हुषारीने गुन्हा करतात असा आपला अनुभव आहे.”
“बरोबर आहे तुमचं म्हणण, उद्या सकाळी त्याला बोलतं करायचा प्रयत्न करू. चला बराच उशीर झाला आहे.” – धनशेखर.
दुसऱ्या दिवशी सकाळीच धनशेखर वेळेकरांना म्हणाले की “हॉस्पिटल मध्ये जा आणि हाताचे ठसे घेतले आहेत का बघा. त्या पोरीनी आधार कार्ड घेतलं असेल तर ओळख पटेल. In the meantime मी दिनेशशी बोलतो.”
“हूं. घारपुरे तुम्ही नागपूरहून सोलापूरला स्वत:च ड्राइव करत आलात.? इतका लांबचा पल्ला होता तर ड्रायव्हर का नाही घेतला ?”
“मला long drive ची सवय आहे आणि आवड पण आहे.” – दिनेश.
“रूट काय घेतला ?” – धनशेखर.
“नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि मग लातूर करून सोलापूर.” – दिनेश.
“कुठे कुठे थांबला होता ?” – धनशेखर.
वर्ध्याला चहा, यवतमाळला जेवण, नांदेडला चहा नाश्ता आणि लातूरच्या बाहेर धाब्यावर जेवण बस.” – दिनेशनी डिटेल्स सांगितले.
“ह्या सगळ्या प्रवासात, काही संशयास्पद हालचाल तुमच्या मोटारीच्या आसपास दिसली होती का ?” – धनशेखर.
“काही कल्पना नाही साहेब, एवढ कोण लक्ष ठेवतो ? माझं पण नव्हतं.” – दिनेश.
“ठीक आहे. जरा शांतपणे एकेक ठिकाण आठवा जिथे तुम्ही थांबला होता. विचार करा.” आणि साहेब आपल्या टेबल वर आले. बाकीची कामं हातावेगळी करत असतांना वेळेकर आले.
“साहेब, आधार वरून मुलीची ओळख पटली. नीलाक्षी माने नाव आहे. मुलगी पुसदची आहे. तिचा फोन नंबर पण मिळाला. फोन केला पण कोणी उचलत नाहीये. पुसद पोलिसांना कळवलं आहे.”
“गुड.” धनशेखर म्हणाले. मुलीची ओळख पटल्यामुळे त्यांना जरा समाधान वाटलं. आता शोध घेणं सोपं होणार होतं. “सर्विस प्रोवायडरला लोकेशन विचारा. बघूया कोणाजवळ आहे तिचा फोन.”
दुसऱ्या दिवशी सकाळी धनशेखरांनी साठे वकिलांना फोन लावला. आणि लगेच पोलिस स्टेशनला येऊ शकाल का म्हणून विचारणा केली.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com