पिल्लं उडाली Prabodh Kumar Govil द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पिल्लं उडाली

"गौरा, ए गौरा" अक्कांनी जरा जास्तच चढ्या आवाजात हाक मारली, “कुठे उलथली, कोण जाणे... बघावं तेव्हा हिला बाहेर पळायला हवं. जरा कामातून उसंत मिळाली की गेलीच बाहेर. आता छोट्या छोट्या कामासाठी तिच्या नावाचा घोष करीत राहायचं मी. हिला सुद्धा स्वर्ग चार बोटे उरला आहे आताशा, कोणाचं ऐकतच नाही अजिबात.”

“काय झालं अक्का?” धापा टाकत गौरा ने अंगणात येत विचारलं.

“कुठे बसली होतीस चकाट्या पिटत? जरा बघ बरं, या कबुतरांनी अगदी भंडावून सोडलं आहे. बहुतेक घरटे बनवीत आहेत तिथे. आधीच घर धुळीपासून स्वच्छ ठेवता ठेवता नाकी नऊ येतात आणि आता हे काड्या-काड्या आणून सगळीकडे पसरवून ठेवताहेत. जरा झाडून घे तर.”

गौरा झाडू आणण्यासाठी आत गेली. अक्कांनी तिथेच कॉटवर पाय लांब पसरले आणि मटार च्या शेंगा घेऊन सोलायला सुरुवात केली. बाहेर अगदी रणरणतं ऊन होतं, कडक उन्हाळ्या सारखं वातावरण होतं. उन्हाच्या हळा लागू नयेत म्हणून अक्कांनी खाट जरा आतल्या बाजूला सरकवली होती.

… बघा, रुपयाला पाव किलो मटार आणि दाणे चार सुद्धा नाहीत त्यात. जिथे बघावं तिथे आज-काल फक्त लुच्चेपणा. म्हणे अगदी ताज्या, भरलेल्या शेंगा आणल्या आहेत. आक्कांचे स्वतःचे स्वतःशी पुटपुटणे चालू होते.

“अगं, असा खालून हात पोहोचेलच कसा तुझा? ते बाहेरचं स्टूल उचलून आण आणि त्यावर चढून साफ कर. आणि हो, जरा दूर जाऊन कचरा फेक, इथेच कुठे टाकून देशील तर तिथूनच परत उचलून आणतील.”

गौरा स्टुलावर चढून जोर-जोरात केरसुणी हलवून कबुतरांनी आजवर केलेल्या कष्टांवर पाणी फिरवत

राहिली. कबूतरांची जोडी गूटरगू-गूटरगू करत दूर विजेच्या तारे वर जाऊन बसली आणि भकास नजरेने आपलं घरकुल छिन्न-विच्छिन्न होताना बघू लागली.

यावेळी घरी कोणी नव्हतं. तीनही धाकटी मुलं शाळा-कॉलेजमध्ये गेली होती. अनंत ऑफिसला गेला होता. मुलांचे वडील ऑफिसच्या कामानिमित्त कुठल्या दौऱ्यावर गेले होते. दुपारचं जेवण आटपून पाटलीण बाई शेजारणी कडे गेल्या होत्या, रिसबुडांच्या घरी. मयंकच्या स्वेटरसाठी नवीन विण शिकायला. अनंतची बायको गीता सध्या इथे नव्हतीच, माहेरी गेली होती आणि त्यामुळे या साम्राज्यात अक्कांचा एकछत्री अंमल चालेल अशी एक मोलकरीण गौरा होती किंवा ही भयाण शांतता.

अक्कांचा राग कबुतरं आणि भाजीवाल्या वरून उडून अनंत वर केव्हा येऊन पोचला, कळलंच नाही. याला बघा, लाड साहेबांना म्हणे आता ऑफिस दूर पडतं. तू काय नवा आला आहेस आज या घरात? निदान वीस वर्ष तर होऊन गेली. शिकत होतास तेव्हा काय जवळ होतं तुझं कॉलेज, सायकलने तिथे पोहोचायला निदान अर्धा तास लागायचा. पण आता इंजिनियर झाला आहेस ना, त्यामुळे लाज वाटत असेल आता सायकल चालवायला. मग म्हंटलं, घेऊन टाक स्कूटर. तर महाराणी गीता मधे तोंड घालून म्हणते कशी – रोज इतकं दूर जायचं म्हणजे अर्धा पगार तर पेट्रोल मध्येच खर्च होऊन जाईल.

घ्या, आता तूच एक राहिली आहेस बाई या घरात, पगार-पाणी आणि आवक-जावक याचा हिशोब ठेवणारी. जेमतेम वर्ष तर होतंय तुला या घरात येऊन, त्याआधी तर आमचे आम्हीच रहात होतो ना इथे? आम्ही सगळे काय मठ्ठ लोकांसारखे रहात होतो की आता तू आम्हाला चालीरीति शिकवशील! अगं बाई, शिकून-सवरून इतकी अक्कल आली असेल तर थोडा निलाजरेपणा पण शिकून घेतला असतास! सरळ सरळ का सांगत नाहीस की अशा भरल्या घरात आपल्या मनमानीने राहता येत नाही. वेगळं घर हवय यांना, जिथे यांना कोणी काही म्हणणार नाही, आरामात तासंतास बघत बसा मग एकमेकांकडे, डोळ्यात डोळे घालून. आणि काय गं, इथे तुला कोणी काही म्हणतं तरी का? आणि काही सांगून कोण कशाला उगाच तोंड खराब करून घेईल? तू ऐकते आहेस कुठे कोणाचं काही? साडी काय अशी नेसतात घरंदाज स्त्रिया? काय ते एकेका ब्लाऊजचे गळे आणि पदर तर असा घेते, जणूकाही डोक्यावर रुमालाची घडी धरली आहे. शालीनता, नम्रपणा थोडाच आजकालच्या शाळेत शिकवला जातो. जळलं मेलं असलं शिक्षण.

अक्कांच्या कल्पनेच्या भात्यातून अजून कितीतरी बाण सुनेवर येऊन पडलेच असते की तेवढ्यात त्यांच्या हातातल्या एका शेंगेतून एक चांगली जाडजूड हिरवी अळी बाहेर येऊन बोटावर चढली. वैतागून अक्कांनी हात झटकला आणि पुटपुटल्या, “बघा, अर्ध्या शेंगा तर मेल्याने कीडक्याच दिल्या , काय उसळ बनवणाऱ् याची? कप्पाळ..”

“गौरा, परत कुठे उलथलीस? जा, जरा ही सालं कचऱ्याच्या डब्यात टाक आणि दाणे आत ठेवून दे. आज संध्याकाळीच उसळ करून टाकते आणि जरा बघ तर, गच्चीवरचे पापड वाळत आले की नाही? वाळले असतील तर घेऊनच ये खाली. अर्धे तर पक्षांनीच खाल्ले असतील इथे-तिथे चोची मारून मारून. काय त्रास आहे मेला.” गौरा वर काम सोपवून अक्का खाटेवरून उठल्या आणि त्यांनी जयंतच्या शर्टाला बटण लावायला घेतलं.

कबुतरांना जणूकाही त्यांचा पराजय अमान्य होता. त्यांनी मोठ्या हिमतीनं पुन्हा एकेक काडी उचलून परत त्याच जागी ठेवायला सुरुवात केली होती. जणू काही त्यांनी सुद्धा जाणून बुजून अक्कांना त्रास देण्याचा पण केला होता.

चारच्या सुमारास पाटलीणबाई घरी परतल्या त्या स्वेटर विणतच आणि त्यांच्यासोबत होत्या रिसबूड वाहिनी.

“गौरा, अक्का कुठे आहेत? लेटल्या आहेत का जरा? ठीक आहे, ठीक आहे. आराम करू दे त्यांना. मुलं आली शाळेतून? येतीलच इतक्यात आता, तू आत जाऊन जरा चहाकरीता आधण ठेव बरं.”

“अं, या ना, आत या. बसा ना. बाहेरच का बरं उभ्या आहात?” रिसबूड वहिनींनी घराच्या आत नजर टाकत सहज आवाजात विचारलं,”गीता घरी नाहीये वाटतं?”

“नाही, ती तर परवाच माहेरी गेली. बरेच दिवस झाले होते, म्हणत होती, घरी भाऊ-वहिनी, सगळे जण आले आहेत. थोडे दिवस तिथे राहून येते. म्हटलं, जाऊन ये. बरोबरच आहे. बिचारीचे भाऊ-वहिनी वर्षातून मोठ्या मुश्किलीने एक-दोन वेळा येतात. ही पण राहील त्यांच्यासोबत चार-आठ दिवस.”

“अच्छा. ते खाली राहतात ते भाडेकरू, कसे आहेत ते? तुमची झाली का ओळख त्यांच्याशी? चांगली लोकं वाटली, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी.”

“म्हणजे तुमच्याशी ओळख झाली म्हणायची त्यांची. हो, तशी स्वभावानं चांगली वाटली मंडळी.”

“परवा आली होती आमच्याकडे. एक विचारू? ती म्हणत होती की अनंत कुठेतरी वेगळं घर घेण्याचा विचार करतो आहे. खरं आहे का हे?”

पाटलीणबाईं आवंढा गिळत म्हणाल्या,”नाही नाही,तसं काहीच नाही. असंच एक दिवस बोलणं चालू होतं की मुलांना कॉलेज थोडं दूर पडतय आणि त्याला सुद्धा खूप लांब जावं लागतं ऑफिस करता. वेळही खूप वाया जातो जाण्या-येण्यात. त्यामुळे ऑफीसच्या जवळच एखादं घर घ्यावं का.. पण ते तर असंच बोलणं होतं. त्याला काय यांनी जिकडेतिकडे पसरवायला सुरुवात पण केली?”

“नाही, तसं काही नाही. आपला काहीतरी गैरसमज होतो आहे. मी तर सहजच तिला विचारलं होतं. तिने विशेष असं काही सांगितलं नाही मला.” रिसबूड वाहिनी सारवा-सारव करत म्हणाल्या.

कबूतरं आता अगदी हट्टाला पेटली होती. त्यांनी गौरा आणि अक्कांच्या नाकावर टिच्चून बरोबर तिथेच आपलं घरटं बनविलं. अक्का कितीही चिडो, संतापो पण आता काय अंडी फेकून देईल ती? राम राम! हे पाप कसं बरं करेल ती? बिचारे जीव, आणि तसा कितीसा फरक पडतो? आणि आता तर ते जास्त आवाजही करत नाहीत. घरटे बनविण्याकरता इथून तिथून काड्या घेऊन खोलीभर उडत राहायचे तेव्हा सगळा कचरा व्हायचा आणि घरभर फक्त गुटर्रगू चा गुंजारव. आता बघा कशी फतकल मारून दिवसभर अंड्यांवर बसून राहते, डोळे मिचकावत.

कधी गौरा ने त्यांना तिथून उडवायचा प्रयत्न केलाच तर अक्का तिलाच रागवायच्या. “जरा एक-दोन वेळा जास्त केर काढावा लागला तर काय हात तुटतील तुझे? का मागे लागली आहेस त्यांच्या? सोड बरं त्यांना.” खरंतर दुपारी जेव्हा अक्का घरात एकट्याच असायच्या तेव्हा त्यांना आता याच ‘गूटरगू’ ची सोबत वाटू लागली होती.

मुलांच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या होत्या. सगळे आपापला अभ्यास करण्यात मग्न होते. त्यादिवशी जेवण झाल्यावर अभ्यास करण्याकरता जयंत आपली पुस्तकं शोधत शोधत वहिनीच्या खोलीत आला. बघतो तर तिथे पुस्तके नाहीत. वहिनीला विचारलं तर तिने तुटकपणे उत्तर दिलं,”पडली आहेत बाहेरच्या खोलीत, मीच ठेवून आले सगळी. आधीच किती पसारा आहे इथे? जेमतेम एक पलंग मावेल इतकीच जागा आहे या खोलीत आणि त्या पलंगावरही अशी अडगळ ठेवत राहिलो तर उठ-बस करायची तरी कुठे?”

“पण वहिनी, मला सांगितलं असतंस तर मी उचलली असती ना. मी तर ही खोली रिकामी आहे असं बघून अभ्यास करायला आलो होतो. तिकडे मयंकचा मित्र त्याच्याबरोबर अभ्यास करायला आला आहे, त्या दोघांचं जोरजोरात पाठांतर करणं चालू होतं, म्हणून थोड्या वेळा करता मी इथे आलो.”

“सगळ्या जगाला इथेच बोलवा अभ्यासाला. आधीच इथे खूप जागा आहे ना! ती तिकडे आपल्या खोलीत कडी लावून अभ्यास करत बसली आहे, कोणास ठाऊक खरंच अभ्यासाची पुस्तकं वाचते आहे का अजून ...?” गीता, नणंदेवर आग पाखडत म्हणाली.

“बस वहिनी. हे सगळं ऐकवायचं असेल तर दादाला ऐकवा. जागा नाही पुरेशी तर त्याला सांगा, तो देईल घेऊन कुठेतरी राजवाडा.”

गीता अवाक झाली. आता ही लहान लहान मुलं सुद्धा उलट उत्तर देऊ लागली? हे सगळं अनंतमुळेच आहे. ती रागाने थरथर कापू लागली. येऊ दे, आता आज तर सोक्षमोक्ष लावावाच लागेल. ज्या घरामध्ये तिचा मान राखला जात नाही, अशा ठिकाणी एक क्षण सुद्धा ती राहणार नाही. तिच्या बाबांनी तर सांगितलं होतं की फॅक्टरी च्या जवळच ते अनंत करता छोटासा फ्लॅट भाड्याने घेऊन देऊ शकतात. मग हरकत ती काय आहे ? पण यांना तरी माझी पर्वा असेल तर ना! स्वतः तर दिवसभर ऑफिस मध्ये असतात आरामात आणि इथे मी बिचारी एकटीच सहन करत राहते. सगळ्यांची बोलणी ऐका आणि घरकामाचे गाडे ओढत रहा. माझ्या मर्जीने ना मी कुठे जाऊ शकते, ना कोणाला बोलावू शकते. याकरताच का लग्न केलं होतं तिने?

तिला वाटलं होतं-- छोटसं घर असेल, जे ती आपल्या इच्छेप्रमाणे सजवून तिथे आपल्या नवऱ्या बरोबर राहील. संध्याकाळी ऑफिस मधून नवरा घरी आला की ती त्याला घट्ट मिठी मारून त्याची दिवसभरातली दमणूक दूर करून टाकेल.

पण इथे तर काहीतरी वेगळंच घडत होतं.

संध्याकाळी अनंत घरी आला आणि तिच्याकडे एक कटाक्ष टाकताच समजून चुकला की काहीतरी गडबड आहे. काय झालं असं नुसतं विचारयचा अवकाश, गीताने फटकारले, "तुला काय त्याचं? तू तर तुझा अर्धा वेळ ऑफिसमध्ये राहूनच घालवितोस, पण मला इथे काय काय सोसावं लागतं याचं तुला काही आहे का? माझ्यासाठी इतकंसं सुद्धा तू करू शकत नाहीस? माझ्या बाबांनी तुला चांगला भरपूर पगार मिळविणारा इंजिनियर म्हणूनच पसंत केलं होतं, पण त्यांना काय माहित की सगळ्या परिवाराचा गाडा तुझ्या एकट्याच्या मिळकतीत हाकावा लागणार आहे." अनंतने वरवर शांत होऊन सगळं ऐकलं पण त्याच्या मनामध्ये मात्र खळबळ उडाली होती. तरीही त्याने हळूच गीताचा हात आपल्या हातामध्ये घेऊन हळुवारपणाने दाबला.

"अरे अरे अरे, कुठे वर चढतोस? उतर खाली आधी. बघ, पडतील ना! अजून अगदी इवलेसे मांसाचे गोळे तर आहेत ते, हात लावू नको त्यांना. आधी खाली उतर पाहू." अक्का मयंकला रागवत म्हणाल्या, जो वर चढून कबुतरांच्या पिल्लांना हात लावून बघत होता. किती छोटिशी आहेत ही! अगदी गोंडस! अजून तर पिसं पण उगवली नव्हती त्यांच्या अंगावर. दिवसभर घरट्यात फक्त पडून असायची. हळूहळू चालायचा प्रयत्न करायला लागली पण थोडं अंतर गेल्यावर कलंडून पडायची. मग त्यांची आई त्यांना पंखाने आणि चोचीने ढकलत ढकलत परत आत आणायची.

"अक्का, काय खातात ग ही?"

"अरे काय खाणार दुसरं? बघत नाहीस का दिवसभर यांचे आई-बाबा उन्हातान्हात इकडे तिकडे कसे उडत असतात. संध्याकाळी यांच्यासाठी चोचीत खाणं घेऊन येतात. तेच खातात हे."

"मग हे जेव्हा थोडं थोडं उडायला लागतील तेव्हा तर हे त्यांच्या सोबतच बाहेर जातील. कशी उडू शकतील गं ही इतकी छोटी पिल्लं?"

"आता गप्पा नंतर, आधी खाली उतर बरं. चुकून जरी खाली पडली तरी मरतील बिचारी." असं म्हणत अक्का बाहेर गेल्या.

"काय रे, ही काय वेळ आहे पेपर टाकायची? सगळीजणं शाळा-ऑफिसमध्ये गेली, आता कोण वाचेल हा पेपर?" पेपर वाल्या बरोबर हुज्जत घालून अक्का आत येतच होत्या की समोरच ते खाली पडून पंख फडफडविताना दिसलं. कोणास ठाऊक कसं खाली पडलं होतं. कदाचित उडायचा प्रयत्न करत असेल आणि प्रयत्न करता करता खाली पडलं असेल.

"गौरा, जरा ह्याला उचलून परत वर ठेवून दे बरं. काय माहित कसं खाली पडलं बिचारं" गौराच्या कानावर हे पडताक्षणी ती पळतच आली आणि त्या छोट्याशा पिल्लाला हातात उचलून घेऊन त्याच्या छोट्याशा चोचीला पकडून खेळू लागली.

आज जेवणाच्या वेळी अप्पा आणि अनंत दोघेही या विचारात होते की सुरुवात दुसरा करेल तर बरं. घरात घडलेल्या त्या प्रसंगाबद्दल वडिलांच्या कानावर नक्की काय आणि किती पडलं आहे, याचा अंदाज अनंत मनोमन करत होता. तो शांतपणे वडिलांना नीट समजावून सांगणार होता की तो काही घर सोडून चाललेला नाही. फक्त ऑफिसच्या जवळ असल्या कारणाने तो हा फ्लॅट घेतो आहे. आणि तसंही काय, रोज नाही पण आठवड्यातून एकदा तर तो येऊन भेटतच जाईल ना, एका गावात तर आहेत. आणि इथे पण तर सगळ्यांना त्रास होतो. भावंडं लहान होती तेव्हा निभवून गेलं. एक ना एक दिवस तर काहीतरी करायलाच हवं होतं. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना जर अभ्यासाकरता घरी जागाच नसेल तर अभ्यास होईल तरी कसा? गीता पण पूर्ण दिवस घरामध्ये एकटी राहून कंटाळते, त्या फ्लॅटच्या जवळ युनिव्हर्सिटी पण आहे, इच्छा झाली तर तिथे एखादी छोटी नोकरी पण बघेल कदाचित. कंटाळणार पण नाही आणि थोडी पैशाची आवक झाली तर नुकसान का आहे ? शेवटी याकरताच तर मुलींना शिकवतात आजकाल.

अप्पा विचार करत होते की त्यांची चूक नक्की कुठे झाली. मोठ्या एकत्र कुटुंबातील सून शोधून काढली, ती सुद्धा सगळ्यांबरोबर ॲडजस्ट नाही होऊ शकली. तिथे पण तर ती आपल्या भाऊ बहिणींच्या बरोबर रहात आली आहे. शेवटी अंथरूण पाहूनच तर पाय पसरावे लागतात. सगळ्यांबरोबर एकत्र राहायची खूप इच्छा होती. मुलं आपल्या नजरे समोर राहिली तर चांगलंच. अनंतला याच शहरामध्ये नोकरी मिळाली तेव्हा किती खुश झाले होते ते! असो, त्याची मर्जी, एकत्र राहायचं नाही तिला तर जबरदस्तीनं कसं काय थांबविता येईल? तिची इथे राहायची इच्छा नसताना घरात डांबून थोडच ठेवायचं आहे आणि बाकीचे लहानगे पण तर आहेत घरात, त्यांच्या मनात मोठ्या भाऊ-वहिनी विषयी कटुता नाही का निर्माण होणार? आणि अर्थातच मी ते कसं होऊ देईन?

अनंतच्या ऑफिसचा ट्रक आला. त्यात सामान ठेवलं जाऊ लागलं. खोलीतून त्यांच्या लग्नात मिळालेलं सामान एकेक करुन बाहेर यायला सुरुवात झाली. गीता आपल्या खोलीतली एकं एक वस्तू नीट पारखून घेत होती, कुठली इथली आहे आणि कोणती बरोबर घेऊन जायची आहे.

अप्पांचा चेहरा भावनाशून्य होता, ते रोजच्याप्रमाणे आरामखुर्चीत वर्तमानपत्रावर डोळे भिडवून बसले होते, जणू काही या सर्वांशी त्यांचा काही संबंधच नव्हता.

धूळ उडवत ट्रक निघून गेला. ट्रक बरोबरच टॅक्सी मध्ये बसून अनंत आणि गीता सुद्धा गेले. आई म्हणाली पण,"अगं, आम्ही पण सोबत येतो, म्हणजे आजच्या आज सामान लावायला मदत पण होईल." पण गीताने विचार केला की कशाला उगीच कोणाला त्रास द्यायचा. आणि परत तिथे ताई तर येणारच आहे आणि आईला पण फोन केला होता, ती पण पोचतच असेल.

उन्हाळा अजूनही आहेच. पदराने घाम पुसत पुसत अक्का गौरावर डाफरात होत्या," कुठे उंडारायला गेली कोणास ठाऊक! हिला तर एका जागी बसायचच नसतं, जेव्हा बघावं तेव्हा बाहेर पसार. सुट्टीचा दिवस आहे, इतकी सारी कामं तशीच पडली आहेत आणि हिला तर काही पर्वाच नाही कशाची."

"गौरा, अगं ए गौरा...!"

गौरा समोर येऊन उभी रहात म्हणाली,"काय झालं अक्का, तुम्हीच तर मला शेजारी पाठवलं होतंत. येतच होते मी! बोला काय काम आहे?"

"अगं पोरी, जरा तिथून तो खराटा आणून कबुतराचं हे घरटं इथून हटव बरं, उगीचच खाली नुसता कचरा होतो आहे, हा बघ"

"पण पिल्लं ना आहेत त्यात?"

"आता कुठली पिल्लं राहायला त्यात? ती पण तर केव्हाच उडून गेली आपल्या जगात. आता कुठली परततात ती?”

आणि डोळ्यांच्या कडा पुसणाऱ्या अक्कांना एकटक बघत गौरा खराटा आणण्यासाठी वळते, घरटं साफ करून टाकायला.

********