Rakhumai (Short Stories Collection) books and stories free download online pdf in Marathi

रखुमाई (कथा-संग्रह)


रखुमाई

लघुकथासंग्रह

लेखक: वैभव तांबटकर

****

लेखक परिचय

नमस्कार, मी वैभव.

लोक काय म्हणतील इथपासून लोकांनी काहीतरी म्हटलंच

पाहिजे इथवर आज हे लिहिणं पोचत आहे. आनंद आहेच

पण हाच मूळ धागा पकडत लेखकाचा प्रवास सुरु असतो

असं मला वाटतं. लिहितांना चालढकल करणं हे भीतीतून

येतं तर आलेली भीती टाळाटाळ करण्याला कारण बनत जाते. हा अनुभव नव्या विषयाला हात घालतांना ठरलेला. कुठेतरी सुरुवात होते, एक ओळ- एक पान- एक लघुकथा- लघुकथांचा संग्रह. आता नवीन पेच! पुस्तकावर माझं नाव- मी लेखक? फसलं तर टीका ठरलेली. जुळून आलं तर कौतुक. मला झेपणार नाही असं नाही. त्यात अडकलो तर? लिहिणं थांबलं तर? अशा अनेक शंकांनी वर्षांपूर्वीचं लेखन कधी म्हणावं तसं कुणासमोर आलं नव्हतं. टीम ई-साहित्यच्या माध्यमातून आणि सामंत सरांच्या मार्गदर्शनाने आज पुस्तकाला लेखक म्हणून माझं नाव देण्याचं धाडस करत आहे.

छंद म्हणावं असं जवळ काहीच नव्हतं. नाहीये. भरपूर पुस्तकं वाचायला मिळाली ती स्वभावतः असलेल्या ओढीने. शाळेत असतांना ‘सदू आणि पाऊस’ हा दुसरीतला धडा माझं पहिलं वाचन. त्यानंतर चौथीतला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नंतरही कैकवेळा वाचला असेल. पहिली कविता तेव्हाच कधीतरी लिहिली-फाडली. मग जगणं सुरु झालं. वाचनाची पद्धत बदलली. माणसं वाचतांना खूप सारं साठवत गेलो. तोवर मला लिहिता येईल असं काहीही घडलेलं नव्हतं. निरीक्षण मात्र वाट्याला आलं.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्राकरवी शिवाजी सावंतांचं मृत्युंजय हातात पडलं. हरवलेलं काही सापडावं अशा आवेशात पाच दिवसांत संपवलं. कर्णाचं जीवन वाचतांनाच ‘छावा’ विकत घेतलं; सोबत वि. स. खांडेकरांचं ‘अमृतवेल’सुद्धा.

नकळत वाचनाची एक सिम्फनी बांधली गेली होती. ठराविक भावनांची पगडी घट्ट बांधली जात असतांना प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचं ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ आणि पुलंची ‘बटाट्याची चाळ’ पाहिलं. विरोधाभास म्हणजे सावंत-खांडेकरांचं लेखन उलगडलं ते या हसण्यातून! अजूनही लिहिणं वाट्याला नाही. मग वपुंचा ‘पार्टनर’ वाचनात आला. तिथून ओळी कागदावर उमटण्याची सुरुवात. कलामांचं ‘अग्निपंख’, नेमाडेंचं ‘हिंदू’ यांचे आठ-आठ पानी सार लिहून काढले.

मुंबई-पुणे प्रवासावर आधारित वडापाव ते मिसळ ही माझी पहिली लघुकथा. हे खरं तर प्रवासवर्णन असायला हवं होतं. इथेही माणूस सुटलेला नाही ही जाणीव झाली आणि अनोळखी माणसे निरीक्षणाने उभी करण्याचा प्रयत्न आज ‘रखुमाई’ नावाने प्रकाशित होतो आहे. हीच सवय मला प्रसंगांपेक्षा माणसाच्या स्वभाव आधारित लिहिण्याकडे घेऊन जात होती. माझ्या ड्रीम प्रोजेक्टची अलिखित सुरुवात केव्हांच झाली होती. जुळून आलं तर लवकरच कादंबरीरूपाने प्रकाशित होईल. त्याशिवाय कविता रचतांना प्रसंग महत्वाचे वाटत होते. आजवर लिहिलेली प्रत्येक कविता ही वेगळ्या धाटणीची झाली. लिहिणं आलं कुठून हा प्रश्न आता पडत नाही.

‘तोकड्या अनुभवात जरि का येता गर्व गृही, जळोनिया त्यासवें राख माझी होऊनि जावो.’

- वैभव तांबटकर

****

अर्पणपत्रिका

जितक्या गोष्टी शब्दांत पकडता येतील तीच लेखकाची मिळकत! अशाच शब्दांची कथा गुंफताना तिच्या खुणा समाजात कुठेतरी असतातच. त्या शोधणं, अनुभव गाठीशी बांधणं आणि शब्दफुलांचा हार वाचकांच्या हाती ठेवणं हेच लेखकाचं काम. गोष्ट रंगवताना व्यक्तिमत्वं उभी राहतात, भले मग ती काल्पनिक असेनात. समाजमनावर त्यांचा परिणाम तुमची ओळख ठरवणार असते. हा लघुकथासंग्रह माणसातल्या ‘माणसाचा’ ठाव घेण्याचा प्रयत्न.

पाच वर्षांआधी लिहिण्याला सुरुवात झाली. असेच लहान-मोठे प्रसंग शब्दांत मांडण्याचा छंद जडला. प्रस्तुत लघुकथासंग्रह ई-साहित्यवर प्रकाशित करावासा वाटतो कारण कधीतरीच माझ्या मराठी वाचनाची हौस पूर्ण करण्यात ‘ई-साहित्य प्रतिष्ठान’चा महत्वाचा वाटा आहे. नवोदितांना मंच उपलब्ध करून देणाऱ्या आपल्या या मंचास सादर अर्पण.

*****

दोन शब्द

माणसाला शब्द उमटवता आले तो पहिला प्रसंग कसा असेल? गतकाल उलगडून दाखवणारे शब्द. लेखन ही कला आहेच, मला त्याहून जास्त माणसाची गरज वाटते. लिहिणं सुचतं कसं असं कुणी विचारलं की मला माझं पहिलं लिहिणं आठवतं. लेखक म्हणून खुपदा फसलेलो असतो आपण आणि तेच लिहिणं बऱ्याच हो-नाही नंतर ह्या लघुकथा एकत्र करत आपल्यासमोर मांडतो आहे.

साध्या सोप्या स्वभावाची माणसे या लघुकथांतून मांडली आहेत. टोकाच्या भावनांशिवाय लिहिण्याचा हा प्रयत्न, शक्यतो जिवंतपणा येईल असा प्रयत्न करत तीन वर्षांआधीचा. मराठीत एक म्हण आहे ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे’. काल्पनिक कथांमधला आशय मांडतांना एकरुप होण्यासाठी माझं त्यात मी म्हणून असणं गरजेचं होतं. या कथा सहजच आपल्या आसपास घडतांना दिसतात. नावापेक्षा त्यांचं अस्तित्व दर्शवण्याचा हा प्रयत्न म्हणून यातील मुख्य पात्रांना नावे नाहीत. लहानग्या ‘रखुमै’ची काळजी घेणारे आजोबा, भेजा फ्राय करणारा एमपीवाला, मुंबई लोकलमधला रोजचा प्रवास करणारा नोकरदार वर्ग, परिस्थितीमुळे व्यवसाय करू बघणारी प्रौढा आणि अगदीच नास्तिक नसतांना यंत्रवत हात जोडणारा तरुण अशी या कथांची मुख्य पात्रे. क्षण जाणिवांचे मधील कथा तशा ओळीच. कथावस्तू मांडणी एकच असल्याने परंतु वेगवेगळ्या कालावधीत कागदावर उमटलेल्या असल्याने पुस्तकातील लघुकथांची लांबी समान नाही. यात सुधारणा होईलच. दरवेळी नवीन काहीतरी शोधत त्या विषयावर लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. या कथा आपल्याला भावतील अशी आशा करतो.

- वैभव तांबटकर

****




कोल्ह्याला द्राक्षे गोड लागतील

त्या दिवशी जग समाधानाने

सुखी होईल.




****

अनुक्रमणिका

१. रखुमाई

२. वडापाव ते मिसळ: एक प्रवास

३. चारावर चार पूज्ये

४. गरज

५. क्षण जाणिवांचे

६. आळंदी देवाची

****

१. रखुमाई

वय वर्षे २१! कुणीतरी भूतलावर काम पूर्ण झाल्याच्या जाणीवेत समाधिस्थ होतं.

स्पृश्यास्पृश्यतेच्या समाजात एकतेचा वारकरी वसवतं!

त्याच पावलांची धूळ माथी घेत एक पासष्टी पार तरुण- होय तरुणच!

म्युनिसिपालिटीच्या बसमध्ये चढतो.

आभाळाला हात घालणारी उंची- उंचीला समर्पक असा बांधा, अंगावर सफेद सदरा धोतर- डोईवर फेटा, जिव्हेवर सावळा देव आणि निराळं तेज चर्येवर घेऊन विठामाईचा 'अवघा ल्योक' एकत्र

करणारा बुक्का; जणू अष्टगन्धाला नाथांच्या वारीतलं रिंगणच!

सोबतीला तीन प्रौढ आणि दोघी तरण्या विवाहित बायका. अशा पाच जणी.

त्यातली जेमतेम विशी पार 'स्त्री' पदराचा बोळा तोंडात खूपसुन दुःखावेग लपवण्याचा निरर्थक

आटापिटा करीत नुकतंच मान धरलेल्या लेकराला कमरेवर घेऊन !

पैकी दोन म्हाताऱ्या गर्दीला पुढे होत, "चला जी म्होरं... काय बा जागा अडुन धर्त्यात!!"

"आवो ताई, सरका कि जरा..."

"कसं सरकायचं माझं मूल आहे जवळ.."

"व्हय गं माय, ऱ्हामुंदी तू..विठ्ठल विठ्ठल..."

त्या पुढे सरकल्या असतील नसतील एवढ्यात एक वजनदार आवाज,

“सखुबाई ओ सखुबाई,हिकडं या हिकडं हाय जागा.”

“नगं माय ते खुर्चीचं अन माह जमतच न्हाई. मी आपली बसत्ये कशी.” म्हणत असतानाच आजीबाईंनी बैठक मांडली! पाठोपाठ सोबतीच्या बायाबापड्यांनीसुद्धा. गाडी 'म्होरं धकली.

आता त्यापैकी कोणी कोणाशी बोलत नव्हतं. माझ्या बाजूला एक पोरगा उतरणार होता. त्याने आपली जागा त्या वृद्धाला मोकळी करून दिली.

मी वार्ताहर. सध्या बातम्या जमा करणारा म्हटलं तरी चालेल. हाहा. यात एक फायदा असा की खूप माणसं भेटतात. पेशा असा जनसामान्यांच्या सम्पर्क कक्षेशी जुळत असल्यानं त्यांना जवळून अनुभवायला मिळणं हाच काय तो लाभ. आज गाडीतले हे खेडूत त्यापैकीच!

एरवी आपण आपल्या कामात असतो, आपल्या विश्वात नेहमीची माणसं; तेच ते कामाचे '' 'कॉल,कव्हर,कस्टमर,क्वालिटी,कॉम्पिटीशन' मी मी म्हणत डोक्याचा भुगा करत असतात. वाटतं '' केरोसीनचा ऍड करून फुकून द्यावं सारं. पण तिथंही '' कुटुंबकर्तव्याचा आलाच! शाळेत मास्तरांनी सांगितलं होतं सर्व प्रश्न '' ने उद्भवतात. साहेबांची 'प्रतिक्रिया' आणि त्यासंदर्भातली जादाची माहिती मी ऑफिसला पुरवणार होतो आणि काही बातम्या.

“एक नंबर स्टॉपला जाती का गाडी?”

“हो. शेवटचा स्टॉप तोच.”

“आम्ही आलतो मांडव्याहून. नातू माझा ऍडमिट आहे 'धूत'ला; धा रोज झाले. येताना हितंच उतरलो पर आता जायला गाडी थांबना.

“सिडकोला जा तुम्ही. मिळेल जालना गाडी.”

“हं, नवं शेहर; आमची दुनिया म्हंजी पंढरी अन पंचक्रोशी; लईच लई जालना- मंठा! काही कळंना बाबा हितं-

'जळाचा जलबिंदू जळींच तो विरे। तैसें हें विधरे पांचाठायीं ।।

पातकें करिता पुढें आहें पुसता। काय उत्तर देतां होशिल तूं ।।".

अधून मधून त्यांचं 'हरी मुखे म्हणा'सुरु होतं.

“ऐय शारदे, रडू नगं माय. झालं की समदं नीट. आता तर डाक्टर पण म्हणले काळजी करायचं काम नाही आता. असा ईठ्ठल हायेच कि पाठीशी.”

किती वेळाची कोंडी फोडून काढत बाई; बहुधा त्या अश्रू अनावर झालेल्या मुलीची आई म्हणाली.

“काय बाय इपरित झालं माय...न्हाई त काय! ह्ये काळी कार्टी जल्मली..आन बाबाचा पार इस्कोट झाला. कापूस मातीला लागला झालती तवा. म्हैन्याभरात दारचा बैल गेला. आन आता तं...”

“सखुबाई, जिभंला आवर घाला. एक सबुद् वंगाळ काढायचा न्हाय पोरीसाठी.

विठ्ठल विठ्ठल... 'दया क्षमा शांती। तेथ देवाची वसती।।“

इतका वेळ सौम्य वाटणारा तो वृद्ध अचानक खवळला. हातपाय लटलटू लागले. डोळे विलक्षण दिसू लागले आणि दुसऱ्याच क्षणी आपसूकच ओलावले गेले.

माझ्याकडे पाहत चिरक्या आवाजात म्हणाला,

“काई न्हाई हो, या आजकालच्या पोरांला दारू पिऊन नाल्या तुंबवायला सांगा. उमर गुदरली हामची. हामी काय इकतचं मूत प्याया न्हाई गेलतो कधी. कस्ट करायची ताकद न्हाई आन

फटफटी फायजी गाव हुंडराया.”

डोळ्यातलं पाणी डोळ्यांत घेतं करत,सांगता कोणाला?” म्हणत त्यांनी आवंढा गिळला.

“तुमि सांगा माउली, ह्या पोरीची काय चूकी हाय. आक्षी रखुमाईवानी दिसती.” म्हणत त्यांनी बाळाला जवळ घेतलं. “विठ्ठल विठ्ठल... विठ्ठल विठ्ठल...” करत त्या लेकराचं कोड-कौतुक करण्यात रममाण झाले. त्यांच्या बोलण्याच्या ओघात कळालं की, दारू पिऊन गाडी चालवणारा त्यांचा नातू जीवघेण्या अपघातातून वाचला होता. घरी नेण्याइतपत सुधारणा दिसून येत असल्याचं सांगण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्याला दक्षता विभागातून सामान्य वॉर्डात हलवल्यामुळं घरची मंडळी त्याच्या वडीलांनी परतीला लावली. सोबतीला मोठा मुलगा ठेवला.

“आबा, मांडव्याला शेती होती काय हो तांब्यांची?”

अं..काय म्हणलासा....तांबे? त्ये... खान्देशी का?”

“हो, हो. तेच.”

“हुती बगा, चांगली ४० एकरात! पार वर्स गुदरली. लोकांनी वाटून घेतली जमीन पार ७०-८० साला अदुगर. आन आता काय ह्यांला मिळतंय. दिवसच पालटले जणू! हाय ते विकत्येत; न्हाई ते... विठ्ठल विठ्ठल...

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणें मुक्ति चारीं साधियेल्या।।

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा...”

“तू रखमै बरं का" जरावेळाने लहानगीच्या मुठीत बोट देत ते बोलू लागले,

"आपण मोठ्या शाळांत जायाचं... बाप न्हाई शिकला... पर तुझ्या आत्यावानी कालेजात जायाचं... ह्यो तुझ्या आबाचा बा शिकवंल हरिबोल तुला... विठ्ठल विठ्ठल...”

माझ्याकडे नजर टाकत ते बोलतच राहिले,

"कीर्तन करतो माझा ल्योक. काय पण आसतं बघा. साऱ्या पंचक्रोशीला हरीबोल सांगणाऱ्या

बापाच्या हातून सोताचा पोरगा कौतिकापायी नाही घडला. विठ्ठल विठ्ठल..

मंथुनि नवनीता तैसें घे अनंता। वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु।।“

वाईट गोष्टींना पाठीशी घातलं की उगवत्या काळात त्यांचं नागडं रूप पाहण्याशिवाय

पर्याय नसतो! काय प्रतिक्रिया द्यावी हे न कळल्याने आणि त्यांना सूचित करावं म्हणून मी

म्हणालो,

सिडको आलं आबा, उतरायचं ना?

आ... व्हय राजा. चला पोरींनो; आटपा, उतरायचं हितंच.. संगीता घि रखमैला."

सगळी मंडळी उठून उभी राहिली. बस थांबली तशी माणसं मागोमाग उतरू लागली.

एक प्रसन्न मुद्रा माझ्याकडे पाहत म्हणाली,

"मागती होय आयगमन। सर्वं जीवांचें।।“

असाच एक दिवस. जालना शाखेच्या वृत्तपत्र कार्यालयात जाण्याचा योग आला; पुरवणीच्या 'क्लासीफाइड'संबंधी चर्चा आणि नेहमीचं काम. कार्यालयाचे साहेब येण्यास अवकाश असल्याने

मी वृत्तपत्र हातात घेतलं

जालना पुरवणी हाती घेताच धक्का बसला. 'मांडव्याचे प्रसिद्ध कीर्तनकार बाळाजी पाथर्डीकर यांना पितृशोक' हा मथळा आणि त्याखाली चौकटीत म्युनिसिपालिटीच्या गाडीत भेटलेल्या आबांचे छायाचित्र! अचानक आलेल्या एका बातमीमुळं मनाची दशाच बदलून गेली. न जाणो का सगळं विसरून त्यांचं त्या दिवशीचं 'रखमै'शी झालेलं खलबत डोळ्यांत पाणी आणून गेलं.

तू रखमै बरं का, मोठ्या शाळांत जायाचं. तुझ्या आत्यावानी कालेजात जायाचं. ह्यो तुझ्या आबाचा बा शिकवंल हरिबोल तुला...'

शाखेचे साहेब आले. योग्य ती कागदपत्रं त्यांच्या हाती सुपूर्द केली. नेहमीसारखं ओघवतं न घेता मोजके शब्द त्यांच्याशी बोललो.चहापान केलं आणि रीतसर निरोप घेतला.

विचारचक्र फिरू लागलं.

‘काही माणसं सुरु कुठं होतात आणि संपतात कुठं ते आपद्मस्तक न्याहाळलं, मेंदूचे सर्व कप्पे धुंडाळले तरी त्यांचा ठाव लागत नाही! काही असेही असतात ज्यांचा अंत नसावाच इतपत खात्री होऊन जाते! अर्थात पूर्वजांनी अशा महात्म्यांना देवादिकांच्या रांगेत का बसवलं? मनुष्याने देव निर्मिला की देवाने मनुष्य? ही चिकीत्सा करण्यापेक्षा आहे त्या महात्म्यांना देव बनवून आपण काय करतो आहोत हा विचार अधिक प्रमाणात जाणवतो... आणि बरंच... असंबद्ध... विस्कळीत.’

कार्यालयातून निघतांना-जालना सोडतांना-बसमधून उतरेपर्यंत आणि त्याहीनन्तर बरेच दिवस एक आणि एकच वाक्य कानांत ऐकू घुमणार होतं.

मागती होय आयगमन । सर्वं जीवांचें।।

******

२. वडापाव ते मिसळ

मुंबईत आल्यावर थोड्याच दिवसात नोकरी मिळाली. बऱ्यापैकी जम बसला होता. एक दिवस पुण्याला येण्याचा हुकूम ला आणि हुक्म की तामिलका काय म्हणतात त्यासाठी आम्ही दोन दिवसांनी पुण्याला जायचं ठरवलं. नोकरी जरी मुंबईत कुर्ल्याला असली तरी आम्ही बदलापुरात; मुंबई-कुर्ल्यापासून दोन-तीन मनपा दूर! मुंबईत नोकरी

करतो याहून अधिक अप्रूप लोकांना मुंबईत राहत असल्याचं असतं.

दोन दिवसांनी कर्जतहुन सकाळी ७:१५ च्या इंद्रायणी एक्सप्रेसनं जायला बदलापूरहून लवकरच निघालो. लोकलमधून जातांना सकाळचा हवेतला गारवा मन प्रफुल्लित करत होता. कामावर जात असताना रोज वातावरणातलं आणि गर्दीतलं निसर्गसौन्दर्य न्याहाळण्याची सवय. आज पाहत होतो ती पानाफुलातली सुंदरता काही औरच! हा वेळेचा परिणाम होता की तिला भेटण्याची उत्सुकता आणि त्यामुळं हर्षोल्हासित झालेलं मन? कधी नव्हे ती हुरहुर आज लागली होती. कारणही तसंच होतं. कधीकाळी रोज डोळ्यांसमोर असणारी ती दोन महिन्यानं प्रत्यक्ष दिसणार होती.

रविवार असल्यानं वर्दळ तशी कमी पण बसायला जागा नसणार हे आपण गृहीत धरायचं. मुंबापुरीत घड्याळाच्या काट्यावर लोक जगतात. त्यात कर्जतवासी निश्चितच वरच्या क्रमांकावर असावेत. ७:१५ वाजताची रेल्वे सवयीप्रमाणे दहा मिनिटं उशीराच आली. मधल्या कालावधीत आजूबाजूला न्याहाळत उदर-दाह शांत करण्यासाठी बिस्किटे आणि वाफाळत्या चहाचा आधार घेतला. गाडी आली. मी गाडीत.

पासधारकांचा राखीव डबा असल्यानं उभं राहण्याच्या तयारीनेच आसनारूढ झालो.खिडकीजवळची जागा काही मिळाली नाही. इंद्रायणी पुण्याच्या दिशेने गतिमान झाली. आताशा कुठं सोनेरी ऊन पडायला लागलेलं. खिडकीतून तिरीप आत येत पायांना उबदार स्पर्श करत होती. बोचरा वारा अंगावर शहारे उमटवत ये जा करत होता. शिवाय तिच्या भेटीची ओढ!


एकंदर प्रसन्न वातावरण होतं.
मोबाईलला रेंज नसल्यानं नित्यनेमाने बोलणं किंवा आधी सांगितलं तशी खिडकीजवळ जागा मिळाली नसल्यानं हिरवळीने सजलेला सह्याद्री हवा तसा पाहता येणं शक्य नव्हतं. प्रवास म्हटला की तो असाच असायला हवा नाही का? नाईलाजानं पुस्तक काढून वाचत बसलो. स्पर्धा परीक्षा! अधून मधून मोबाईल मध्ये नोट्स सेव्ह करत होतो. दरम्यान शेजारी बसलेल्या सज्जनांचं वागणं आता मला खटकायला लागलं होतं.

काळा जाडा चष्मा- त्यातून डोकावणारी नजर, मानेसकट भिरभिरणारे डोळे आणि डोक्यावर तुळतुळीत टक्कल यावरून त्या सज्जनांचं गंतव्य आणि वास्तव्य एकमात्र पुणे हे समजायला फारसा वेळ लागला असता तर नवल! अर्थात वर वर वाटतं आपल्याला ही अशी माणसं चौकस वगैरे बुद्धीची असता वगैरे. असेलही. हा मात्र वाढीव पुणेरी नग वाटतोय. सामान्य पुणेकर 'वाढीव' एवढाच संदर्भ घेतील.

तसं भयानक हं बाबा पुणे. हे जाणं तिसऱ्यांदा.
माणूस कुठलाही असो, पुण्यात आलं की पुणेकर व्हायला स्पेशल ट्रेनिंग माफ करा हं,विशेष प्रशिक्षण म्हणायचं मला; तर असलं काही लागत नाहीच. पण याबाबतीतही पुणेकर उद्यमी दिसतो. कुठल्यातरी कुलकर्ण्यांनी म्हणे दुपारच्या वामकुक्षीला तिलांजली देत पुण्यात कसे वागावे या नावाने वर्ग सुरु केलेत!
आता पुण्यात कसे वागावे यासाठी पैसे मोजण्याची काय गरज ना?
पदोपदी तुम्हाला जागृत करणारी सिद्धी घेऊन इथला प्रत्येक मनुष्य हिंडत असतो. साध्या भाषेत सांगायचंच तर कुणाचं नवीन शब्द ऐकून न घेता किंवा ऐकूनही...
ऐकूनही गरज नसताना अपमान कसा करायचा हे!

तर कुलकर्ण्यांना त्यांच्या वर्गावर परत सोडून आम्ही इंद्रायणीत परतलो.

मोबाइलवर नोट्स टाइप करत असताना ती वल्ली मला तीन बोटांच्या अंतरावरून मान काटकोनात वळवून- हिणवल्यासारखं नसेल कदाचित

पण कुणालाही राग यावा अशा पद्धतीनं बघत होती. दुर्लक्ष केलं. एकवार कटाक्ष टाकला असता तर ठीक होतं पण पुन्हा तेच!

चेहरा काही वेगळा तर नाही ना दिसत? खात्री करण्यासाठी फ्रंट कॅमेरा चालू केला.सर्व ठीक आहे. मला बरं तर वाटलं पण त्याच बरोबर भयंकर मनस्ताप वाटू लागला. त्याचं वेडंवाकडं वागणं मला एकवचनावर यायला भाग पाडतंय. तरीदेखील राग करायचा नाही-शांत राहायचं- चिडचिड नको वगैरे वगैरे वगैरे’ स्वतःलाच मनाशी सांगत मी मोबाइल खिशात ठेवला. महाशयांनी त्यांच्या मोबाईलवर लुडो चालू करून माझ्या डोळ्यांसमोर एकवार आणला; परत त्याच विक्षिप्तपणे बघितलं आणि खेळू लागला.

थोडावेळाने बघत,

“कहा जा रहे हो?”

अरे हा तर भय्या! अंदाज चुकला! पुणेरी भय्या?

“कोंढवा कहा को पडता बतायेंगे?”

एवढ्या जवळ येऊन कोंढवा कहा को पडता बतायेंगे?

एकतर मला नाही आवडत असं कोणी तोंडासमोर येऊन बोललेलं. हिंदी राष्ट्रभाषा म्हणून किमान धकवण्याइतपत ज्याला आपण ‘जुजबी’ म्हणतो अशी आपल्या प्रत्येकाला ठाऊक असतेच. एवढ्यावर समाधान होईल की काय आणि गप्प बसेल म्हणून मीही सौजन्य दाखवत त्या गृहस्थाशी नजर न मिळवता मी दूर होत उत्तरलो,

“खराडी.”

“हा वहा भी जाएंगे। लेकीन बाद में। कोंढवा जाते तो साथ जाते। हमे तो भाई अच्छा लगता है अजनबियों से दोस्ती करना...”

कशाला? रस्ते विसरलो म्हणजे कॉल करत विचारायला? लोकेशन on केलं की चार्जिंग लवकर संपते म्हणून दोस्ती! उगाच चिडचिड होते आहे.

एव्हाना गाडी खंडाळ्याच्या स्टेशनावर येऊन पोचली आणि रेंज आली. मोबाइल हातात घेत तिला कॉल-

“गुड मॉर्निंग.”

“निघाला नाहीस ना?”

@ Khandala.”

“आताच जाग आली अरे! उशीर होईल.”

“मग मी आधी खराडीला जाईन.”

“कशाला?”

“सांगीन. बाय.”

निघाला नाहीस ना? वेळ सांगून पण असं कसं बोलते ही मंदावती. पण कोणाचा राग कोणावर निघेल; म्हणून मी मोजकंच बोलून मोबाईलमध्ये डोकं घातलं ते त्या गृहस्थाला टाळायचं म्हणून त्याच्या परोक्ष- काहीच दिसणार नाही असा धरून.

आणि इतका वेळ काटकोनात वळणारी मान सबंध शरीराला घेऊन माझ्या मोबाईलवर लक्ष द्यायला लागली. आता मी काय करतो याला काय करायचंय? खेळ ना तुझा तू लुडो. नाईलाजानं मी आधी होता तसाच मोबाईल धरला.

“पुना क्या काम है?

“क्या पता?”

ऐकल्याबरोबर मोठ्याने हसत तो म्हणाला,

“हमारा नही आपका. हम तो साईट भिजिट करेंगे.”

“दोस्त से मिलने...”

उत्तर देतांना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला जे वाटलं. त्याची खात्री मला पुढच्याच शब्दांत महाशयांनी करून दिली.

“लेडीज दोस्त? हा? हाहाहा। हमको पता है...”

व्हाट्स-अँपच्या दुनियेतल्या ह्या ययातीला उधारीचा पंचेंद्रिये तृप्त करवणारा पुरु हवा होता. हा नग माझ्याच नशिबात? आजच? का?

लोकांच्या राग व्यक्त करण्याच्या माझ्या माहितीतल्या दोनच पद्धती आहेत; एक तर समोरासमोर ठसन द्यायची नाहीतर सरळ सरळ पुणेरी टोमणे झिंदाबाद! पण आता तसलं काही करण्याचा माझा विचार ओसरत चालला होता. लवकरच स्टेशन येईल. मग कोण तू कोण मी. आताचं वागणं खटकतंय ते सहन करण्याशिवाय पर्याय नाही. इथलं वारं तिथं लागू देणं बरोबर नाही.

“कुछ हुआ? हा?”

म्हणत डोळे मिचकावत स्वारी खाणाखुणा करू लागली. भलताच अतरंगी दिसतोय. ह्याला काय करायचं? ह्याचे अर्धे लाकडं गेल्यासारखे.

पट्टा आवळूनसुद्धा पॅण्ट घसरणाऱ्या आणि चर्यावृत्तावरून कर्कवृत्ताकडे झुकलेल्या तरुणाला- चाळीशी म्हणजे तरुणच नाही का?

कसं कटू बोलावं हे सुचेना. टाळणं अशक्य होतं.

‘गाडीत मिळालेली जागा सोडायची नसते. एकमात्र अपवाद मुंबई लोकल. तिथं एका विशिष्ट स्टेशननंतरही तुम्ही बसूनच आहात असं दिसलं की युपीवाला भय्या पण म्हणतो- पता नहीं कहा कहा से चले आते है?’

आजही इथे जागा सोडण्याचा प्रश्न नव्हता. गाडीने तळेगाव पार केलं असेल एव्हाना. हे सर्व घडत असतांना समोरच्या बाकावरल्या तरुणीकडे लक्ष जात होतंच. डोळ्यांत पाणी आलं असावं. तिच्याकडं बघत असतांना उगाच चुकचुकल्यासारखं वाटून गेलं.

करवाचौथ! आता हा गृहस्थ चक्क करवाचौथचा व्हिडीओ कानांत प्राण ओतून ऐकत बसलाय. आधी सांगितलं तसं मला नाक खुपसलेलं आवडत नाही. पण फुल्ल आवाज करत बोगी दणाणून सोडणारा तो व्हिडिओ-

‘वैसे उपहार हमेशा खुशियोंको दोगुना कर देते हैं लेकिन करवा चौथ के मौके पर मिले उपहार का इंतजार पत्निया काफी समय पहले से करती है। इस गिफ्ट में उनके प्रति आपका प्यार जो मिला हुआ होता है। इसी वजह से पतियों के ऊपर बेस्ट गिफ्ट देने का प्रेशर बना रहता है...’

आज आवाज कमी करा असं न बोलता हसणारे चेहरे जास्त होते. बाजूच्या बाकड्यावरील काकूबाई नवरोजींकडे पाहत गालातल्या गालात स्मित करू लागल्या. एकंदर ते दृश्य बघतांना तारक मेहता मधल्या पोपटलाल की छविडोळ्यासमोर येऊन गेली आणि त्याच्या एकूण व्यक्तित्वाच्या छटांची मोजदाद करण्यात मी गढून गेलो. राग होता हेही विसरायला झालं.

काही काळ तसाच गेला. शिवाजी नगर येणार म्हणून उतारूंची घाईगर्दी दाराकडे जाऊ लागली. ह्या माणसाचं काही औरच सुरु. साधारणतः

अशा गोष्टी जगजाहीर करण्याची आपल्याकडे पद्धत नसावी असा माझा समज आहे. म्हणून सर्वसामान्य माणूस आत जातांना वाच्यता करणं टाळतो. आवराआवर करून- बाहेर पडतो. ही असामी मला सांगत आत जात- बाहेर येत-
सचिन कसा एखादेवेळी चेंडू खेळण्याआधी इकडे तिकडे बघतो आणि गुडघ्यात वाकतो
. मी जास्ती खोलात जाणार नाही. क्रिकेटवेड भारताचं असा त्यावर जास्तीचा मथळा वगैरे लिहावा लागेल!

असो. आपल्या अफाट कल्पनाशक्तीला आवर घालून सचिनला मैदानावर खेळू द्या आता नसेल आठवत तर. मी सांगतो-
बघा हा त्या वल्लीच्या ऐवजी तुम्ही आहात असं आपण समजू
यात. तुमच्या आजूबाजूला चार पाच माणसं आहेत. तुम्ही असंच मुखप्रक्षालन किंवा अजून काही काही करून येता. अंगावरला झब्बा असा एका हाताने वर करत तुमची अर्धी आत अर्धी बाहेर असलेली बनियन. हो बनियनच- बाहेरची आत, साध्या भाषेत 'इन करणे' ज्याला म्हणतात असा तुमचा एकपात्री प्रयोग सुरु असंतो. मध्येच अजून एक adjustment होते. आजूबाजूचे लोक तुमचा तो बिनतिकिटाचा शो डोळाभर बघत नेत्रसुख घेतात आणि कसंनुसंच हसू आवरतात. कसं वाटेल?

एकदाचं शिवाजीनगर आलं. हसत माझ्या जवळ येत तो म्हणाला,

“चलो फिर मिलते है... या फिर सोच रहा हु पहले खराडी जाऊ
“हा? मिलते बादमें...” आता गळ्यात पडायला नकोच- मनाशीच म्हणत मी बाहेर.

बाईसाहेबांनी मेसेज करत मला ‘तूच ये’ सांगितलेलं.

रिक्षा येत जात होत्या. अखेर एक मिळाली.

“कोंढवा.”

“बसा.”

रिक्षा पुढे निघाली न निघाली तोच पाठीवर थाप आणि एक आवाज,

“अगर दोस्ती होनी नसीब में हो तो हो ही जाती है क्या समझे दोस्त? पहले कह देते कोंढवा जा रहे हो हाहाहा
आणि मी अक्षरशः कपाळावर हात मारून घेतला.

******

३. चारावर चार पूज्ये

. रामायण-महाभारतानंतर आजकाल नवीन महाकाव्य रचल्या जातंय की काय?

.

आपला देश एवढ्या अरब खरब डॉलरच्या कर्जात बुडालेला आहे. तरी या देशाला तेवढ्याच डॉलर्सची मदत कशी काय द्यायला जमतं? आणि घरच्यांना हात दाखवून ठरवायचं तेव्हा ठरवू देत,बाकी एका गोष्टीसाठी कौतुक व्हायलाच हवं.

नेटची स्वस्त दर आकारणी असो किंवा स्टेशनवर वायफाय उपलब्ध करून देणं

डिजिटल इंडियाला कोणी 'नाही' म्हटलं नाही.

'अडवणार कसे, स्वस्त अन फ्री म्हटल्यावर तुम्हांला तरी ?काहीतरीच आपलं...

इंटरनेट मूलभूत गरज नसेल एकवेळ, आजकाल नेटशिवाय चैन नाही जीवाला.

असो.


कुंपण राजकीय तशीच आंदोलनंही राजकीय अशी शंका सामान्य माणसाला येते. पुढच्याच वेळेत चारावर चार पूज्य पगार असणारा तो सामान्य माणूस'०५:०५ ची बदलापूर हुकेल म्हणत 'परप्रांतीय' पानपट्टीवाल्याकडून बार्गेनिंग न करता पान. स्वच्छ भारत अभियानांतर्गत उद्योगांना चालना मिळते. होळी नसतांना पिचकाऱ्यांनी रंग उडवले जातातमाणूस आणि त्याच्या व्यक्तिगत संपत्तीला सोडून जे जे काही रंगवण्यासारखं दिसतं ते ते सारं रंगवलं जातं. एरवी रंगवायचं राहून जाणाऱ्या कोपऱ्यांचीच प्राथमिक सरभराई केली जाते. स्टेशनाच्या रुळांवर परीक्षेच्या शेवटच्या मिनिटांत सगळं आपोआप सुचावं आणि पेपर खरडला जावा त्यावेळी जे काही वळणदार हस्ताक्षर निघतं तशी गाडी येण्ण्याधी फायनल सेकंदाला नेम धरून पिचकारी मारलेला चारावर चार पूज्य पगार असलेला सामान्य माणूस वाऱ्यांमुळे थोडेफार अंगावर - आपल्याला कोणी कोणीही बघत नाही अशा आवेशात!

आता तो ०५:०५ ची बदलापूर लोकल पकडतो.

नेट वायफाय कनेक्टकरतांना तोंड धुवायच्या पेष्टाची जाहिरातसंपेपर्यंत गाडी पुढं निघालेली असते. त्याला कोणीतरी विचारतं,

सध्या कोणत्या फॉरेनला परदेस वारी?’

तो नुसताच बघतो कारण बार्गेनिंग न करता घेतलेल्या परप्रांतीय'

पानपट्टीवाल्याने दिलेला मसाला पुन्हा तोंडात विलसतो.

आता मात्र गाडीच्या दाराशी रेलत वाऱ्याचा अंदाज घेत त्याचं बोबडं गाणंही सुरू झालेलं असतं.

'ही इईई -नं धुन-धी ...’

गाडी अंबरनाथला येताच ०४:४१ ला येऊन ०४:५० हुकलेले प्रवाशातले कुणीतरी तरुण तडफदार,

उतर रे बेवड्या, लोकांना घाई पडलेली *** किंवा अजून कुणा-कुणावरला राग काढतात. चारावर चार पूज्य पगार असलेला सामान्य माणूस अवाक्षरही न बोलताउतरून चष्मा सावरत गर्दीत मिसळतो.


बाहेर बाजारात भाजी खरेदी करणं नित्याचीच कसोटी!

, . आज मात्र संपानं भाव जास्त चढलेला.

दोघांनाही!

पगारी भाजीचा चढलेला-चारचौघात आपला उतरलेला भाव मनांत घोळवत तो घरी पोचतो. बातम्या पाहत असतांना

सहारणपूर कांड, रावण वगैरे, सोबतीनेच बघतांना मात्र त्याची चतुरस्त्र वैचारिकता फळते.

राव, इथं भाज्या बघा काय महाग, त्यात यांनी संप केला तर आम्ही काय खायचं?’

त्याची अर्धांगिनी अर्ध्या मेंदूने सूर मिसळते.


जेवणात रस्सा भाजी, कोरडी भाजी,कोशिंबीर, ,पराठे वगैरे खाऊन क्षुधाशांती झाल्यावर 'अन्नदाता सुखी भव असा नित्याचा कृतज्ञ-भाव त्याच्या तोंडातून आपसूक बाहेर पडतो.रात्री स्वस्त नेट वाचल्यावर चारावर चार पूज्य पगारी शतपावलीकरता जातांना उरलेली भाजी तो प्लास्टिकच्या पिशवीत भरतो आणि सवयीनेच कचऱ्यामध्ये भिरकावून देतो. येतांना व्हाट्सअप्प ग्रुपमध्ये समाजोपयोगी माहिती पाठवावी या शुद्ध हेतूने वाचलेला तोच मथळा जसाच्या तसा फॉरवर्ड करतो. तशी सोय असते. . असतांना कुणीतरी धीन्चक बाईंची टोपी फॉरवर्ड करतो.

चारावर चार पूज्य पगार असलेल्या सामान्य माणसाला हसू आवरत नाही आणि

तो सुख होतो.

******

४. गरज

तिच्या हातांची चलबिचल स्पष्ट सांगत होती की आज कायमस्वरूपी गिऱ्हाईक मिळणार, अशी आशा आहे. बोलण्यात अगदीच लाचारी नसली तरी गरज माणसाला किती मजबूर करते याचं मूर्तिमंत रूप माझ्यासमोर उभं होतं. वय साधारण पन्नाशी पार; सलवार सूट! सवय नसावी बहुधा. तोच एकूण परिणाम त्यांच्या हालचालींमधून दिसत होता.काहीसा संकोच करीतच ती प्रौढा हॉटेलात शिरली.

हॉटेल तसं बेताचंच, पण इतर वेळीचा अनुभव गाठीशी म्हणा किंवा अजून काही, ती खुर्चीचा आधार घेत बोलावं की बोलू नये अशा द्विधा मनःस्थितीत उभी राहिली. नजर, हॉटेलचा मालक कोण हे शोधण्याच्या प्रयत्नात घोळक्यावर. सवयीनेच हॉटेल-मालकाने तिला हटकलं,

"काय पाहिजे मॅडम?"

अचानक आलेल्या आवाजाने ती चरकली. पण आज ज्या कामासाठी ती आली होती ते करणंच तिला योग्य होतं. तसला भारदस्त आणि खोचक आवाज तिने काही प्रथमच ऐकला नसावा; पण ती नवखी मात्र जरुर वाटत होती. पाठीवरली बॅग टेबलावर ठेवत त्यामधून मसाल्याची पाकिटं काढत तिने बोलायला सुरुवात केली.

"हे मसाले विकते मी. हे कांदा-लसूण मिक्स आहे. तसं तिखटही बनवते मी, तुम्हाला हवं तसं प्रमाण करून देऊ शकते."

"काय भाव?"

"१४०."

"जास्त आहे."

"१३०, त्याहून कमी मला परवडणार नाही. इकडे नणंद असते माझी. तिच्याकडे राहते मी, मिरची कोल्हापूरहुन मागवावी लागते; त्याचाही खर्च वेगळाच."

गरज. गरज माणसाला किती स्पष्टवक्ता बनवते ना? आपला सच्चेपणा दिसला की समोरचा पटेलच, ही भाबडी आशा माणूस बाळगून असतो. परंतु, आपलं पटवणं कितीही कळकळीचं असलं, तरी ते पोचण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या मनःस्थिती आणि समजशक्ती यांचाच भरवसा करावा लागतो.

कोल्हापूरचं नाव काढताच हॉटेल-मालकाची चिकित्सक वृत्ती चाळवली. इतरांच्या आयुष्यातील खाच-खळगे बनण्याचं माणसाला विलक्षण कौतुक! त्यामधून चारचौघांत मिळवण्याचा समजूतदारपणा, हजरजबाबीपणा वगैरे वगैरे गुण आपल्यात कसे उपजतच आहेत, हेच का सांगायचं असतं त्याला?

"ते पांढरा रश्शाचं काही आहे का तुमच्याकडं सध्या?"

"पांढरा रस्सा म्हणजे तुमचा चिकन स्टॉकच असतो आणि खोबऱ्यात तेल असतं तेव्हा जपून करावं लागतं."

"असं असं अजून नव्हतं थाळीचं काही डोक्यात. बघू जमलं तं. बरं मिरच्या कोल्हापूरहून मागवता म्हणलासा, ते कसं? म्हंजी ऑर्डर देता की कसं?"

"सध्यातरी मलाच जावं लागतं. स्वतःच बघायला हवं."

"देऊ का?" एव्हाना होती नव्हती आशा पणाला लावित टीपं नजरेआड आणि सवयीचे झालेले खोचक बोल मनाआड करीत ती प्रौढा विचारती झाली.

"नको सध्या, नंतर घेऊ."

"वापरून तर बघा. नक्की आवडेल क्वालिटी तुम्हांला."

"तेच त हे मॅडम, आमाला क्वालिटीच लागती. तुम्ही एकट्या बाई दोन हातांनी सारखी चव कशी द्येणार आ? मशीन हाय का घरी?"

"अं... नाही. येते मी." म्हणत तिने बॅग भरली.

"थांब किशा, बाई, एक किलो द्या- वापरू- पटलं तर बघू पुढं."

"नक्की आवडेल. हा माझा नंबर असू द्या." म्हणत मसाल्याच्या पाकिटासोबतच तिने चिठोरं पुढे केलं.

हॉटेल-मालकाने आतल्या खोलीतून आचाऱ्याला बोलावून घेत ते पुडकं फोडलं. आचाऱ्याने मसाला हातावर घेत निरखला.त्याचा गंध घेत मालकाला काहीतरी सांग- आला तसा निघून गेला. मालकाने कुत्सित नजरेने तिच्याकडे पाहत खिशात हात घातला.

"हे घ्या, एकशे तीस रुपये!"

पैसे घेऊन पुटपुटत-हसत ती प्रौढ स्त्री हॉटेलबाहेर पडली. मला मात्र त्या हास्यात स्वतःची कष्ट करण्याची तयारी असूनही बहुधा इतरांवरच अवलंबून असण्याच्या विधात्याच्या करणीवरच जणू काय ते हास्य असल्याचं वाटलं. आणि तरीही माणूस जगतोच आहे. इतरांसाठी? स्वतःसाठी? की त्या विधात्याने चालवलेल्या पोरखेळात आपल्या हरवलेल्या ओळखीसाठी?

कुणी सांगू शकेल?

******

५. क्षण जाणिवांचे

अ. आय लव्ह यु

रात्रपाळी करून आठला घरी पोचलो.

वर्षभराआधी लव्ह मॅरेज झालेलं. आज वर्षपुर्ती.

आज सुटी म्हणत मित्र-मैत्रिणी यायचे होते.

इतक्या जणांचा स्वयंपाक म्हणजे तिच्यासाठी दिव्यच!

मेसवाल्या काकूंकडे गेलो. आताची ऑर्डर दिली तसा रात्रीचा चमचमीत

बेतही आगाऊ सांगितला.

वाट पाहत थांबलो.

‘ताई भात-वरण द्या. बांधून नको, असंच द्या ताटात आणि तीन पोहे पार्सल.’

पार्सल बांधून होण्याआधी उभ्यानेच पाहता पाहता तिने भात संपवला. हे काय होतं? पार्सल घेऊन परतलो.

दिवसभर लग्नाच्या आठवणी, व्हिडीओ-फोटो पाहणं, गप्पा- आता कोण?

संध्याकाळचा बेत सकाळीच आखलेला.

तेच दुकान. तोच आवाज. तीच तरुणी.

‘काकू, तीन पार्सल. भात-वरण इथंच द्या.’

सकाळच्या सलवारसूटऐवजी लालभडक काठापदराची साडी नेसलेली!

पाहता पाहता भात संपवला गेला. ती जाण्यासाठी वळली.

गोऱ्यापान चेहऱ्यावर डाव्या डोळ्याखाली चंद्राला ग्रहण लागावं असा हिरवा-निळा डाग ओझरता दिसला.

डोळ्यांची पापणी न लवता यंत्रवत शून्यात नजर देत ती निघून गेली.

ऑर्डर घेतली. घरी आलो. मित्रांनी आणलेला केक कापला.

त्यांच्यासाठी म्हणून तिनं भरवलेला घास घेतला.

पानं लावली.

मनच लागेना; भरल्या ताटावरून उठून जावंसं वाटतंय.

याचा काही भलताच अर्थ निघाला तर?

म्हणून जेवलो.

जल्लोषात दिवस साजरा केला गेला.

मित्रमंडळी निघून गेल्यावर आवराआवर करणाऱ्या तिच्यावरच माझी नजर खिळून.

डोक्यात मात्र भलतंच काहूर.

तिने दोनदा पाहिलं.

जवळ येत म्हणाली,

“नीट जेवला का नाहीस?”

डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देत तिला घट्ट मिठी मारत म्हणालो,

“आय लव्ह यु.”

******

आ. लगीनगाठ

कमरेवर भरला हंडा ठेवून जातांना दिसलेली ती.

तिला मी अगदी तिसऱ्या वर्गापासून पाहत आलोय. पुढे शाळाही सारखीच.

सातवीनंतर तिने शाळा सोडली. सोडावी लागली असं म्हणूयात.

पुढे तिचं आणि माझं साधं वेगळेपण मांडतो म्हणजे नेमकं काय म्हणायचंय मला ते समजेल.

बाप दारू पितो की बाकीचे करतातच या एका सबबीखाली तिचं लग्न उरकलं तेव्हा मी दहावी बोर्डाची परीक्षा दिली.

मुल होत नाही म्हणून जेव्हा ती अडगळ झाली तेव्हा मी मला न मिळणाऱ्या गोष्टींसाठी उदो करत होतो.

पदरात मुलगी आहे हे कामापुरता कधीतरीच फिरकणाऱ्या नवऱ्याला समजताच तिला सासर कायमचं सुटलं तेव्हा साहेब बसचे धक्के खात शिकतच होते.

शिक्षण झालं. चार वर्षानंतर काल ती दिसली. चरकलो.

वाटलं की मी अजूनही तोच शाळेतला मेंदू घेऊन फिरतोय आणि ती-

ती साताज्न्माची तप्तपदी चालतेय पायातल्या कधीही

न वाजलेल्या पैंजणांसकट!

सासर सुटलं म्हणजे वाजणारे छुन चारित्र्याचे धिंडवडे काढायला मोकळे.

का?

तिने पैंजण जसे स्वखुशीने घातले नाहीत तसे ते कधी

आपसूक वाजलेही नसावेत.

तशी त्यांची ओढ लागण्यासाठी जोडीदार शुद्धीत असावा लागतो.

त्यादिवशी ओळखताच तिचे डोळे झर्रकन खाली गेले पण त्यात अनेक वर्षांचा कणखरपणाच दिसला.

आणि माझे डोळे भकास.

ना उमेद ना जिवंतपणाच्या खुणा.

का?

सारं मनासारखं होऊनही मी मात्र जिथल्या तिथे आणि सारं असूनही नसल्यात जमा आयुष्य जगणारी ती-

उत्तरेकडच्या धृवाहूनही अढळ की नुसतीच निश्चल?

आयुष्य अशा प्रसंगांत जगलं की त्याच्या सुरस कथा होतात नाही का?

मग भले तिच्या डोळ्यांतलं पाणी आटेतोवर तिची तप्तपदी संपेना.

अगदी शेवटच्या श्वासापर्यंत...

******

६. आळंदी देवाची

पुण्यात येणं तसं दुसऱ्यांदा. मित्राच्या रूमवर तीन दिवसाची सोय झालेली. देवाच्या आळंदीत रूम काही मिळाली नाही पण त्याहून महत्वाची गोष्ट मला सापडली. कार्तिक वद्य एकादशीदिनी संत नामदेवांच्या काळात सुरु झालेली वारी आजतागायत सुरूच आहे. वारी परंपरा- तुळशीमाळा अजूनही टिकून आहे ती कशी याचं उत्तर म्हणा किंवा झुकण्याचा मंत्र देत अहंपणाचा लोप करवणारी ही आळंदी देवाची!

चंपाषष्ठीचा दिवस. योग जुळून आले म्हणून दर्शनास जाण्याचं ठरवलं. मंदिर रूमपासून एक-दीड किलोमीटर अंतरावर. वेळ संध्याकाळची. घाटावर पोचताच समोरच्या दुकानांची माळ इंद्रायणीच्या पात्रात बिम्बित होत सुखद देखावा निर्माण करत असल्याचं दिसलं. वाहनांच्या कर्कश आवाजातही शांतता म्हणजे काय हे इथे आल्यावर समजतं. देवदर्शन याचसाठी असावं, नाही का? मानसिक स्थैर्य, शांततेचा अनुभव आणि स्वतःसोबत इतरांचाही उत्कर्ष पाहू शकण्याची दृष्टी लाभणं सारं एका हात जोडण्यात सामावलेलं! अर्थात हे विचार मंदिरात घडला त्या प्रसंगानंतरचे. कष्टदायक जीवनातही श्रद्धेचं महत्व का? हे आत मंदिरात समजलं.

घाटातून मंदिराच्या दिशेने जातांना बूट कुठं ठेवणार हा सर्वसामान्य-यक्षप्रश्न मलाही होताच. एका प्रसादपुडीच्या बदल्यात सोय झाली. आधी घाटावरली शांती आणि आत मंडपात टाळ-मृदुंगाच्या जोडीने बुवांचं कीर्तन यांनी वातावरण भक्तिमय केलं होतं. कीर्तनाचे रंगी रंगण्यास वेळ तो कितीसा लागणार? कुठल्याशा ओवीचं निरुपण बुवा करत होते. गर्दी होती- असणारच. दर्शनबारीस उभा राहिलो.

समोर एक माणूस उभा. ऑफिसातलं काम संपताच आल्याचं दिसतंय. गळ्यात टाय, पाठीवरल्या bagमुळे अंगातला फिकट गुलाबी शर्ट घामाने चिंब झालेला. बारी पुढे सरकतांना दरवेळी तो नाकावरला चष्मा ठीक करत पुन्हा डाव्या बाजूला रेलत होता. रांग पुढेच पुढे जात गाभाऱ्यापर्यंत आली. आत शिरताच पाठीवरली bag बाजूला ठेवत त्याने लोटांगण घातलं. इतर काहींनीसुद्धा. रांग शिस्तीत पुढे सरकते आहे. मनात पुन्हा सर्वसामान्य-यक्षप्रश्न.

‘आपण घालावं का लोटांगण?- नको- इस्त्रीचा नवाच शर्ट आहे. डोकं टेकवू पादुकांवर. काय उगाच देखावा करायचा?’ ह्या विचारांत त्या साहेबाचं वागणं उगाचंच खजील करवून गेलं. दर्शन झालं. खरंच?

गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर मागच्या बाजूस एक मोठी शिल्पचित्राकृती आहे. त्याखालचं ओझरतं वाचत- भिंतीवरल्या ओळी वाचत मी पुढेच पुढे जात होतो. दिसेल तिथं झुकायचं- हा क्वचितच मंदिरात जाण्याऱ्या माझा अनुभव- आजही तेच. रांगेतून यंत्रवत चालणं- हात जोडत. मान लवत.

मंडपात कीर्तन सुरु. माणसं, बाया-बापड्या भोवताली बसून ऐकत- प्रतिसाद देत एकाच रंगात- हरिनामात दंग. एक रुखरुख मनात. मी मात्र कोरडाच! गाभाऱ्यात जात असतांना वाटणारी मनशांती एकाएकी गेली कुठे? रांगेत असतांना एक डेरेदार झाड दिसलं होतं. यंत्रवत तिकडे वळलो. पाण्यावरली नौका वादळवाऱ्यात हेलकावते आहे. वादळ सरत नाही- नौका बुडत नाही अशा अधल्यामधल्या अवस्थेत मी. एक प्रसंग आणि ही अवस्था. पायऱ्या चढत आत पोचलो आणि वादळ एकाएकी शांत झालं. कसं?

पांढऱ्याशुभ्र कपड्यांतली मंडळी ओळीने ओसरीवर आणि मोकळ्या जागेत बसली होती. प्रत्येकाच्या हातात ज्ञानेश्वरी! चेहऱ्यावर प्रसन्न भाव- थकण्याचा नामलेश न दिसणारे ते वृद्ध-प्रौढ. चित्त एक झालं म्हणजे बाहेरच्या गोष्टींवर लक्ष जात नाही हेच जणू प्रत्येकजण सांगत आहे. बाहेर रंगलेलं परिसर भारावून सोडणारं कीर्तन आणि शांतचित्ताने ज्ञानेश्वरी पठण करणारी ही मंडळी. क्षणात हात जुळले. यावेळी मात्र ते यंत्रवत नव्हते. तो नमस्कार कुणाला?

रांगेत ओघवती वाचलेली ती ओळ! झरझर पावले टाकत पोचलो. वाचलं. मुख्य दारातून तो मनुष्य बाहेर पडतांना दिसला. क्षणाचा विलंब न करता माऊलींच्या समाधीकडे तोंड करत लोटांगण घातलं. तो नमस्कार कुणाला हे भिंतीवरली ओळ आणि साहेब मला सांगून गेला होता-

‘नामा म्हणे आता, लोपला दिनकर

बाप ज्ञानेश्वर, समाधिस्थ’

इतर रसदार पर्याय