बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 3 Dr.Swati More द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 3

सकाळचे नऊ साडेनऊ वाजले होते.. आज पावसानेही उघडीप दिल्याने निसर्ग सकाळच्या उन्हात न्हाऊन निघाला होता ..
अंदाजे तीन तासांचा प्रवास असल्याने आम्ही मस्तपैकी गाणी लावून बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेत होतो..
हाही प्रवास बऱ्यापैकी जंगलामधूनच चालू होता.. मध्ये मध्ये छोटी छोटी गावं आमचं स्वागत करत होती.. स्थानिक लोकांचे रोजचे दिनक्रम चालू झाले होते..

मी सहज अनीलकडे बघितलं तर आमचे राजे गुडूप झाले होते 😀😀

संगीत आणि निसर्गाच्या सानिध्यात तास दोन तास कसे मोडले हे समजलेच नाही..

मध्येच एका ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि मयुरेशला सांगितले की तुम्हाला जेवायचे असेल तर बाजूला जे छोटेसे हॉटेल आहे तिथं काहीतरी खाऊन घ्या नाहीतर अजून तास दोन तास तरी कुठेही जेवण्यायोग्य हॉटेल नाहीये..

आम्ही हे ऐकूनच पटापट खाली उतरलो.. एवढी भूक लागली नव्हती पण तास दोन तास नक्कीच तग धरू शकलो नसतो 😅😅

हॉटेलमध्ये गेलो आणि काय आहे जेवणासाठी विचारलं तर..
"इडली, मिसळ आणि कांदा भजी.."

बरं, मिसळ होती पण तिच्याबरोबर पाव नव्हता.. पाव तिथं मिळत नाही म्हणे त्याऐवजी बन नावाचा गोल पावासारखा पदार्थ होता.. आम्ही सगळे एकमेकांकडे पाहू लागलो..

आलिया भोगासी असावे सादर!!😁
जे होतं त्यावर क्षुधा शांती केली..

पोटपूजा करून थोडं अंतर गेलो नी पुढं बघितलं तर ट्रॅफिक जॅम होतं.. रस्त्यावर पोलीसही उभे होते.. माहिती काढल्यावर समजलं की रस्ता रुंदीकरणासाठी जे. सी. बी. ने रस्त्याकडेची दोन तीन झाडे पाडण्याचे काम चालू आहे..

आता आली का पंचाईत!! दुष्काळात तेरावा महिना!!
आधीच उशीर झाला होता.. "याना केवज् "बघून चार पर्यंत तरी "मिर्जान" किल्ल्याच्या इथं पोहचायचं होतं ..
इथं जर उशीर झाला तर नक्कीच धावपळ होणार होती..
पण अस्वस्थ होऊन चालणार नव्हतं.. गपगुमान थांबण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता..
अनिल खाली उतरून प्रसाद उभा होता तिथं गेला.. मी मनातल्या मनात म्हटलं, आता हा काय स्वतः जाऊन रस्त्यातील झाडं बाजूला करणार आहे की काय??

करेल पण बायकोसाठी, त्याचा काय भरोसा नाय!! 😁😁

अर्धा तास सहज मोडला आणि एकदाचे आम्ही तिथून निघालो.. ड्रायव्हरने गाडी एकदम सुसाट सोडली..

"आनेगुंडी" इथून आम्ही मुख्य रस्ता सोडून आतमध्ये वळलो.. इथून साधारण १०/१२ किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात या केवज् आहेत.. मध्ये एकही वस्ती दिसत नाही..
माझ्या मनात आलं इथ जर एखादी गाडी बंद पडली तर काय होईल?? विचार न केलेलाच बरा!!

एक भव्य प्रवेशद्वार आपले लक्ष वेधून घेते.. तिथेच बाजूला अजून काही गाड्या पार्क होत्या.. इथून आपल्याला पायीच साधारण पाऊण तासाचा छोटा ट्रेक करून केवज् पर्यंत जायचे असते..

प्रसादने सगळ्यांना दीड तासाचा कालावधी दिला.. साडेतीनला सगळ्यांनी गाडीजवळ यायचेच नाहीतर किल्ला बघायला मिळणार नाही..
"येस सर "म्हणत.. आम्ही केवज् कडे जाणारी पायवाट पकडली..
सुरवातीला थोडासा चढ आहे नंतर नंतर सपाट रस्ता, मध्येच थोडी उतरण आहे..
मी आणि अनिल जेवढं शक्य होईल तेवढं भरभर पण फोटो काढत काढत चालत होतो..
फोटो तर काढलेच पाहिजेत ना, परत थोडीच आपण या ठिकाणाला भेट देणार आहोत..

Untouched nature !! याची जागोजागी प्रचिती येत होती.. पर्यटक येत असले तरी स्वच्छता चांगली होती.. कुठेही प्लास्टिक दिसलं नाही..

यानाची जंगले ही वनस्पती आणि प्राण्यांचा खजिनाच आहे. ग्रेट इंडियन हॉर्नबिल, सायक्लोन फोर्गमाउथ या पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजाती या भागातील मूळ रहिवासी आहेत. हा प्रदेश डुक्कर, बिबट्या, वाघ, बरगडीचे हरण, अस्वल, सांबर, हरण, आणि किंग कोब्रा यांसारख्या अनेक वन्य प्राण्यांसाठी आश्रयस्थान आहे.

साधारण पाऊण तास चालल्या नंतर आपण दगडी पायऱ्या जवळ येऊन पोहचलो.. पायऱ्या सुरू होतात तिथंच बाजूला गणपतीचे सुंदर मंदिर आहे..

पांच मिनिटे पायऱ्या चढलो असेन, सामोर एका शिखराने जे भव्य दर्शन दिलं , अहाहा!!
मान वर करून पाहताना त्याची भव्यता लक्षात आली.. मानव कितीही प्रगत झाला तरी निसर्गापुढं खुजाच वाटतो..
समोर जे उभ होतं ते मोहिनी शिखर.. त्याच्या थोडंसं पुढं भैरवेश्वर शिखर आहे..

यानाबद्दल सर्वात आकर्षक आणि मंत्रमुग्ध करणारी गोष्ट म्हणजे ही दोन काळया रंगाची आकाशाला गवसणी घालणारी शिखरे ,अनुक्रमे 120 मीटर आणि 90 मीटर उंच आहेत..
काळ्या स्फटिकासारखे भासणारे यातील खडक बहुतेक चुनखडीचे बनलेले आहेत.. खडकांची रचना खूपच अनोखी आहे. ते शीर्षस्थानी तीक्ष्ण आहेत आणि शिखराच्या खाली गुहा तयार झाली आहे..
हवा आणि पाण्याच्या सतत संपर्कामुळे खडकांचा पृष्ठभाग खडबडीत बनलेला आहे .

भौगोलिकदृष्ट्या ते सुमारे दोन हजार दशलक्ष वर्षे जुने आहेत.

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जन्माला आलेले हे ठिकाण त्याच्या सभोवतालच्या ठिकाणांपेक्षा भौगोलिकदृष्ट्या वेगळे असल्यामुळे तिथं गेलं की कुठल्या तरी गूढ आणि रहस्यमयी ठिकाणी आल्यासारखं वाटतं..

भैरवेश्वर शिखर स्वतःच जवळपास अर्धा किलोमीटर मध्ये पसरलेले आहे..
शिखराच्या पायथ्याशी भैरवेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.. मंदिराचा काही भाग अलीकडच्या काळात बांधला असल्यासारखा वाटतो..
मंदिरात प्रवेश केल्यावर मनाला एक प्रकारची शांती लाभते..

मंदिरातून डाव्या बाजूस असणाऱ्या दगडी पायऱ्यांचा मार्ग विशाल खडकाच्या बाजूने आपल्याला वर एका गुहेकडे घेऊन जातो.. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी याठिकाणी प्रकाश आणि सावलीचा अदभुत खेळ दृश्य आश्चर्य निर्माण करतो.

आतमध्ये एक खडक आहे त्यावर तुम्ही उभे राहिलात तर वरून येणारा सूर्य प्रकाश तुमच्या भोवती निळसर पिवळसर रंगाचे वलय तयार करतो.. निसर्गाचा हा चमत्कार बघण्यासारखा आहे.. आम्ही तो आमच्या कॅमेऱ्यातही कैद केला आहे..

याना केवज् बद्दल इतिहासात हिंदू पौराणिक कथांचे संदर्भ आहेत. कथा सांगते की भस्मासुर नावाच्या राक्षस राजाला भगवान शिवाने वरदान दिले होते की तो कोणाच्याही डोक्यावर हात ठेवून त्याला भस्म करू शकतो. या वरदानाचा उलटसुलट परिणाम झाला आणि देवतांना भस्मासुराच्या शक्तीची चिंता वाटू लागली. भगवान विष्णूने मग एक योजना बनवली, त्यांनी मोहिनी रूप धारण केले.. भस्मासुरासमोर अवतीर्ण होऊन त्याला नृत्याने भुरळ घातली..विष्णू रुपी मोहिनी सोबत नृत्य करताना दंग झालेल्या भस्मासुराला नृत्य करता करता मोहिनी शेवटी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला लावते आणि तल्लीन झालेला भस्मासुर असं करून स्वतः लाच राख करून घेतो.. या संपूर्ण घटनेमुळे गुफा भस्मासुराच्या राखेने काळवंडली. अशी अख्यायिका आहे..

आम्ही मनसोक्त फोटो काढले.. निसर्गाचा हा भव्य अदभुत चमत्कार डोळ्यात साठवत परतीच्या प्रवासाला लागलो..

आयुष्यात एकदा तरी आवर्जून या ठिकाणाला भेट दिलीच पाहिजे..
यानासारखी जागा भारतात अस्तित्वात आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
गेम ऑफ़ थ्रोन्स किंवा हॅरी पॉटरसारख्या स्पेशल इफेक्ट्स असलेल्या हॉलिवूड चित्रपटांमध्येच अशी दृश्ये पाहायला मिळतात.