बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 4 Dr.Swati More द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 4

"याना केवज् " बघून मन एकदम मंत्रमुग्ध होऊन गेलं होतं.. अद्वितिय, अध्दभुत अनुभव!!

पण तिथेच घुटमळून चालणार नव्हतं.. आजच्या दिवसातील शेवटचं आकर्षण "मिर्जन किल्ला" अजून बाकी होता.. साधारण चार वाजता याना केवज् हून निघालो आणि अर्धा पाऊण तास लागतो मिर्जन किल्ल्याजवळ पोहचायला.. पण हा अर्धा पाऊण तास आमच्या साथीदारांनी त्यांच्या नृत्य अविष्कारांनी अविस्मरणीय केला..

बेभान, भन्नाट, लई भारी!! कोणत्या उपमा देऊ ?
शब्द नाहीत माझ्याकडे..😍😍

तुमच्या सगळ्यांच्या जिंदादिलीला सलाम मित्रांनो!!

नृत्याच्या जादुई दुलईवर तरंगत तरंगत कधी किल्ल्याजवळ पोहचलो समजलेच नाही..

अगदी गाडीतून उतरल्या उतरल्या प्रथम दर्शनीच हा भुईकोट किल्ला आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतो ..

सुंदर स्थापत्यकलेसाठी ओळखला जाणारा दुहेरी तटबंदीचा हा किल्ला "लॅटराइट दगड "वापरून बांधला गेला
असून तो उंच आणि मजबूत भिंतींनी संरक्षित आहे.

असे मानले जाते की हा किल्ला विविध लढायांचा साक्षीदार आहे आणि त्याच्याशी संबंधित अनेक कथा आपल्याला वाचायला मिळतील..

किल्ल्याला एक मुख्य आणि तीन अतिरिक्त प्रवेशद्वार आहेत.
किल्ल्यात अनेक एकमेकांशी जोडलेल्या विहिरी आहेत, या विहिरींमध्ये गोलाकार खंदकाकडे जाणाऱ्या वाहिन्या आहेत ज्याचा वापर बहुतेक खंदकामध्ये पाणी सोडण्यासाठी केला जात असावा..

किल्ला १६व्या शतकात स्थानिक राणी चेन्नईभैरवीने बांधला होता.
किल्ला संपूर्णपणे टेहळणी बुरूज, तोफा, गुप्त मार्ग इत्यादींनी सज्ज असावा. त्यात कदाचित काही इमारती आणि राजवाडे देखील असावेत, जे सध्या पहावयास मिळत नाहीत ..

राणी चेन्नईभैरवीनंतर मिर्जन किल्ला विजयनगर साम्राज्य, मराठे, विजापूरचे (आताचे विजयपुरा) सुलतान आणि इतरांच्या अधिपत्याखाली होता.

आम्ही भेट दिली तेंव्हा सप्टेंबर अखेर असल्याने पाऊस नव्हता.. वातावरण अतिशय आल्हाददायक होते..

किल्ल्याच्या भिंती हिरव्या वस्त्रांनी सजलेल्या होत्या.. जमिनीवर हिरवेगार गालिचे पसरले होते.

किल्ल्याचा एकूण परिसर आणि त्याच्या लालसर दगडी पायऱ्या तर , एखाद्या सवाष्ण बाईने हिरवा शालू नेसून भाळी लालभडक कुंकवाचा टिळा लावावा अशा भासत होत्या जणू !!

सगळीकडे विविधरंगी रानफुलांच रान माजलं होतं.. हा रंगांचा उत्सव बघता बघता वेळ कसा जातो कळतही नाही..

साडेपाच वाजता किल्ला बंद होत असल्याने नाईलाजाने आम्हाला इथून निघावं लागलं.

किल्ल्याविषयी मुलभूत माहिती...

स्थान: कुमता, NH66 पासून सुमारे एक किमी अंतरावर.

प्रवेश शुल्क: काहीही नाही, विनामूल्य प्रवेश

प्रवेश वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ५:३०

किल्ला बघण्यासाठी लागणारा वेळ: सुमारे 45 मिनिटे ते 1 तास, अधिक आपल्या वेळ आणि विवेकबुद्धीनुसार

उपलब्ध सुविधा: फक्त रस्त्याच्या कडेला काही दुकाने

पाहण्यासारख्या गोष्टी: किल्ल्याच्या भिंती, पायऱ्या, विहीर, आजूबाजूला नारळाच्या लागवडीचे दृश्य, वॉच टॉवर इ.

आजचा दिवस पूर्णपणे सार्थकी लागला.. सुरवात नयनरम्य जोग फॉल पासून होऊन तर शेवट भव्य मिर्जन किल्ल्याने झाला..

आता आम्हाला मुरुडेश्वरला रात्री राहण्यासाठी जायचं होतं..
मिर्जन वरून दीड दोन तासाचा प्रवास होता..

प्रवास हायवे वरून असल्याने थकवा अजिबात जाणवला नाही..

राहण्याची सोय "आर्यान गेस्ट हाऊस' मध्ये केली होती.. रुमही स्वच्छ आणि प्रशस्त होत्या..
अतिशय सुंदर अशा ठिकाणी हे गेस्ट हाऊस आहे.. अगदी समोरच फेसाळता समुद्र आणि उजव्या बाजूला भगवान शंकराची प्रसिद्ध उंचच उंच मूर्ती, त्या मूर्तीच्या पायथ्याशी श्री मुरुडेश्वराचे मंदिर...

रात्रीची वेळ असल्याने संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता..
अहाहा!! काय मनमोहक दृष्य होतं ते!!

मी आणि अनिल फ्रेश होऊन हॉटेलच्या बाहेर पडलो..
मनात आलं, नशिबात असेल तर आत्ताही देवाचं दर्शन होईल.. आणि समजा नाही झालं तर आजूबाजूचा परिसर तरी फिरून घेऊ..

रात्रीचे आठ वाजले होते.. आम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश केला तर चप्पल स्टँड वर असलेल्या इसम म्हणाला, "जलदी जलदी जाव, अब दर्शन बंद होने वाला हैं ."

मंदिरात प्रवेश केला.. बंद करायची वेळ असल्यानं खूप कमी भाविक होते..
अगदी शांतपणे देवाचे दर्शन झालं..
देवाचं आजचं शेवटचं दर्शन घेणारे आम्ही दोघं!!

मंदिराच्या आवारात येऊन रोषणाईचे फोटो काढले आणि प्रसन्न मनाने बाहेर पडलो..

रात्रीच्या जेवणाची सोय "नाईक फिशलँड " या तिथल्या चवीसाठी नावाजलेल्या हॉटेलमध्ये केली होती..
अगदी ऐकलं होतं तसचं रुचकर आणि स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी जेवण आहे इथलं..

पोटभर खाल्ल्यावर डोळ्यावर गुंगी यायला लागली होती.. गेस्ट हाऊस पर्यंत कोणी अलगद उचलून नेलं तर किती बरं होईल 😀😀

आता तुम्ही असं म्हणू नका, अनिल होता ना.. सांगायचं होतंस की त्याला 😁😁
नेलं असतही त्याने जर माझं वजन त्याच्यापेक्षा कमी असतं तर 🤪🤪..