नातं भूतकाळाशी Ajay Marathe द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

नातं भूतकाळाशी

                                                                                            नातं भूतकाळाशी 

  आई स्वैपाकघरात आवरत होती. भांड्यांच्या येणाऱ्या आवाजावरून सुर बिघडलेला वाटत होता. गेले एक दोन आठवडे ती बेचैन वाटत होती. आयुष्याच्या चाकोरीतून प्रत्येकालाच सुटका हवीशी वाटते. तसच तिलाही वेगळं वातावरण हवं असेल का ? स्मिता विचार करत होती. जर्नलचं काम पुर्ण करून स्मिता स्वैपाकघरात गेली. आई भांडे लावत होती. “ आई कॉफी घेतेस थोडी ?” स्मिताने विचारले. “ दे बाई करत असलीस तर.” दोघी कॉफी घेत हॉलमधे बसल्या. आईला मूडमधे आणण्यासाठी स्मिता म्हणाली “ आई कॉलेज मधल्या ऍक्टीव्हिटी सांग ना.”

   “ अगं आम्ही कॉलेजमधे फार धिंगाणा घालायचो. एक तर आजकालच्या मानाने तेव्हा मुली कमी असायच्या त्यामुळे आम्हाला जास्त मान मिळायचा. मुलं जे प्रोग्राम आखतील त्यात आम्हाला महत्वाचे स्थान असायचे. मग तो प्रोग्राम कुठलाही असो. गॅदरिंग, सोशल वर्क, मासिकं काढणं अशी सगळी मजा आम्ही करायचो. तेव्हा तुमच्या आतासारखं फॅशनेबल सोशल वर्क करायची पध्दत नव्हती.”

 “ तुम्ही सोशल वर्क म्हणजे नेमकं काय करायचे ?” स्मिता

 “ स्मिता, आम्ही मानसशास्त्राचे विद्यार्थी होतो. जरा वेगळ्या प्रकारचं काम आम्ही करायचो. कौटुंबिक अडचणी सोडवणं, मानसिक आधार देणं, यावर आमचा भर होता. त्यावेळी विभक्त कुटुंब पद्धती नुकतीच येऊ घातली होती. ज्या मुली वेगळा संसार करत त्या प्रत्येकीला संसारज्ञान होतं असं नाही त्यांच्या पालकांचे अनुभव विभक्त कुटुंबात उपयोगी पडतीलच असे नव्हते. काहीना एकटं वाटणं, मुलांवरून अडचणी, लैंगिक समस्या, अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागे. अशयावेळेस त्या आमच्याकडे येत असत. आम्ही सर्वजण मिळून त्यावर तोडगा काढत असू किंवा तिचे समाधान करत असू.”    

 “त्यावेळचा एखादा प्रॉब्लेम सांग ना.” स्मिता आईला बोलकं करू पहात होती.

“ एक दिवस एक बाई आमच्याकडे आली आणि सांगू लागली. मॅडम माझा नवरा अगदी विक्षिप्त वागतो. त्याच्या वागण्यामुळे मी अगदी कंटाळून गेले आहे. अर्थात आम्हाला हे वाक्य नवीन नव्हतं. पण तिच्याकडून नीट सगळं काढून घेण्यासाठी तिला सहानुभूती दाखवत म्हटल, अगं नीट सगळं सांग. सविस्तर संगितलस तरच आम्हाला कळेल ना. घाबरू नको. आपण तुझ्या समस्येवर नक्की तोडगा काढू. तसा तिला धीर आला. ती सांगू लागली. मॅडम माझा नवरा सकाळी अगदी व्यवस्थित असतो. तेव्हा एखाद्या प्रेमळ कुटुंबासारखं कुटुंब असतं आमचं. मुलांशी नीट बोलणं, लाड, थोडी अभ्यासाच्या बाबतीत शिस्त, माझ्याशी लाडीगोडी, सगळं छान चालू असतं. सगळं आवरून घराबाहेर पडलं की संध्याकाळी आल्यावर त्याचा मूड थोडा बिघडलेला असतो. मग जसजशी रात्र पडत जाते, तसतसं त्याचं वागणं बेताल होऊ लागतं. मुलांवर रागराग, घरात आदळापट, कधी कधी तो मला मारायलाही कमी करत नाही. असं एक दोन दिवस नाही तर सहा महिने हेच चालू आहे. एका दिवसात या पोर्णिमा अमावस्या अनुभवायच्या म्हणजे अगदी जीव नकोसा झाला आहे. मुलं तर इतकी भेदरली आहेत की वर्गातही मागे पडत चालली आहेत. काय करावं कळत नाही. रात्री आपण काय केलं याची जाणिव त्यांना सकाळी होते मग ते अजूनच चांगलं वागायचा प्रयत्न करतात.

   तिच्या बरोबर सगळ्यांनीच सुस्कारा सोडला. ही केस जरा अजबच वाटत होती. राहुल तिला म्हणाला घाबरू नका. तुम्ही फक्त एव्हढं करा, तुमचे मिस्टर यायच्या आधी मुलांचे आवरून त्यांना झोपवत जा किवा थोडे दिवस आजोळी पाठवून द्या. बाकी बघू आपण काय करता येईल ते. बरं म्हणून ती निघून गेली. आमचा विचार विनिमय सुरू झाला. एकजण म्हणे त्याला दारूची सवय असेल. सध्या सोडली असेल म्हणून त्याचं वागणं रात्री जास्त वेगळं होत असेल. दूसरा म्हणाला दिवसभर ऑफिसमधे काही मानसिक त्रास होत असेल. शेवटी एकमताने त्याची पुर्ण चौकशी करायची ठरली. दुसऱ्या दिवशी आम्ही ऑफिस गाठलं. ऑफिसमधे अगदी खेळीमेळीच वातावरण होतं. बॉसही त्याच्या कामावर खुष होते. दारुचं काय त्याला चहाचही व्यसन नव्हतं. मग पाणी कुठे मुरतय कळत नव्हतं. बाहेर कुठल्या बाईशी संधान आहे का ? याचाही माग काढला. पण माणूस अगदी निष्कलंक. याचा अर्थ लहानपणात एखादी घटना दडली असण्याची शक्यता होती. स्वतःहून मोकळेपणे ती गोष्ट सांगितल्याशिवाय या आजारावर इलाज संभवत नव्हता. तेव्हढ्यात निताने एक तोडगा काढला. तिचे काका मानसोपचारतज्ञ होते. तेव्हा आतासारखे मानसोपचारचे विचारही फारसे अस्तित्वात नव्हते. अगदी एखाद दुसरे डॉक्टर असायचे आणि त्यातूनही त्यांच्याकडे जाणारा म्हणजे वेडा ही भावन आतापेक्षाही प्रबळ होती. त्यांचा सल्ला घ्यायचं ठरला.

  दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांच्याकडे गेलो. सगळा प्रकार सविस्तर सांगितला. तसा काकांनी थोडावेळ विचार केला.

 “ ज्याअर्थी सध्या त्याची घडी व्यवस्थित आहे, त्याअर्थी लहानपणीच्या कुठल्यातरी कारणामुळे ही सुरवात झाली असणार.”

 “ पण काका, इतकी वर्ष काही नाही आणि एकदम हे कसं सुरू झालं असेल ?”

 “ मला वाटतं लहानपणी त्याच्या मनात कुठली तरी भीती बसली असणार. मोठं होत गेल्यावर त्या भीतीचा विसर पडत गेला असावा. मी काय म्हणतोय ते नीट एका. भीती नाहीशी झाली नाही. आपल्या मनामध्ये अनंत आठवणी साठवलेल्या असतात. त्यातल्या काही कायम लक्षात रहातात, तर काही कालांतराने बाजूला पडत जातात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सहा महिन्यापूर्वी अशी एखादी घटना घडली असावी की त्याची विसरलेली भीती परत निर्माण झाली. लहानपणीसारखं हे वय, दुसऱ्याला भीती बोलून न दाखवता येणारं असल्यामुळे त्या भीतीची तीव्रता वाढत गेली. आता त्याचा पुर्णपणे अमल बसला असावा. ह्यासाठी त्या माणसालाच बोलतं करावं लागेल. मला वाटतं ते सुशिक्षित असतील तर येतील. त्यांना तुम्ही माझा पत्ता द्या. ते स्वतः येतील कारण त्यांनाही यातुन सुटायचं असेल म्हणून रात्रीच्या वागण्याची भरपाई ते सकाळी करत असावे.”

  आम्हालाही हे पटत गेलं. दुसऱ्या दिवशी ती बाई आमच्याकडे आली तेव्हा तिला सगळं समजावून सांगून, पटवून डॉक्टरकाकांचा पत्ता दिला. सकाळी नवऱ्याला पटवून द्यायला ती तयार झाली. न तयार होऊन काय करणार होती ? परिस्थितीपुढे तिलाही जगाची पर्वा वाटत नव्हती. फक्त नवरा व्यवस्थित व्हावा एव्हढीच तिची इछा होती.

 रविवारी दुपारी नीताचा सगळ्यांना फोन आला. केसचा निकाल लागला. काकांनी पाच वाजता बोलवलं आहे. त्यासरशी सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं. आमच्या अड्ड्यावर एकत्र जमून काकांकडे जायचं ठरलं. पाच वाजेपर्यंत काकांकडे जमा झालो. आमच्या चेहेऱ्यावरची उत्सुकता पाहून काका हसले आणि बोलायला लागले.

  “ त्या माणसाचं पुर्ण बालपण कोकणातल्या खेडेगावाकडे गेलं. कोकणात भूतखेत, हडळ अश्या गोष्टींवर विश्वास फार मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो. त्याच्या आईने तो खूप धिंगामस्ती करतो हे बघून समोरचं पिंपळचं झाड दाखवत म्हटलं तू आता ऐकलं नाहीस ना तर त्या समोरच्या झाडावरून केस पिंजारत हडळ उतरेल आणि तुला घेऊन जाईल. हे वाक्य ऐकून तो खूप घाबरला. त्या झाडामागे देऊळ होतं. तिथे मशाली लावलेल्या असत. त्याचा वरखाली होणारा प्रकाश झाडामध्ये अजूनच गुढता निर्माण करत असे. भिंतीवर चालणारा तो  रात्रीचा छायाप्रकाशाचा खेळ कुणाच्याही मनात धडकी भरवत असे. तो घाबरतोय हे पाहून आई त्याला वेळोवेळी त्या हडळीची भीती घालू लागली. त्या मुलाच्या मनात जबरदस्त भीतीचा पगडा बसला. काही वर्षानी शिक्षणासाठी, नोकरीसाठी म्हणून ते कुटुंब शहरात आलं. ते पिंपळाचं झाड डोळ्यासमोरून नाहीसं झालं, तशी त्याच्या मनातली भीती कमी होत गेली. त्याचं व्यवस्थित शिक्षण झालं. लग्न झालं. सगळं सुख पाहून आई वडील वारले. हा स्वतःच्या कर्तुत्वावर वर चढत गेला आणि सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी, आता जिथे ते रहात आहेत तो फ्लॅट खरेदी केला. पहिल्यांदा धामधुमीत त्याचं लक्ष तिकडे गेलं नाही, पण सगळं स्थिरस्थावर झाल्यावर एका प्रसन्न संध्याकाळी आजूबाजूचा परिसर न्याहाळत असताना त्यांच्या मनात, डोळ्यात भरलं ते पिंपळाचं झाड. तसच उंच आणि डेरेदार. त्याच्यामागे प्रखर पिवळ्या दिव्याचा खांब. भिंतीवर पडणारा तोच छायाप्रकाशाचा खेळ. त्याच्या भीतीने परत उचल खाली. तेव्हापासून संध्याकाळ नंतर त्याच्यात बदल होऊ लागला. घरातला कर्ता माणूस तोच असल्यामुळे ही भीती कुणाकडे बोलून दाखवता येत नव्हती. बायको जवळ हे बोलणं कमीपणाचं वाटत होतं. माझ्याजवळ सगळं बोलून त्याला हलकं वाटलं. भूतं अशा गोष्टीत फार तथ्य नाही हे त्यालाही पटत होतं, पण वेळ आली की तो काहीच करू शकत नव्हता. कितीही निरर्थक आहे हे मनाला पटवलं तरी भीती कमी होत नाहीये म्हंटल्यावर घर बदलायचाच सल्ला त्याला योग्य वाटला.”

 “ पण काका, एव्हढं मोठं झाल्यावरही एका झाडाची भीती वाटावी ?”

 “ संवेदनशील माणसावर फार लवकर कुठल्याही गोष्टीचा पगडा बसतो. आपल्या इथे भूताला मानणारे लोकं काय कमी आहेत ? माणसाच्या मनाचा कप्पा केव्हा कमकुवत होईल आणि छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करून केव्हा आयुष्याचा खेळखंडोबा करतील काहीच सांगता येत नाही. केवळ माणसाच्या मनाचे हे खेळ असतात.” डॉक्टर

 आमची तर मतीच गुंग झाली. माणूस किती छोट्या गोष्टीनी पीडला जावा आणि आपलं स्वास्थ घालवून बसावं याचा विचारही करवत नव्हता. पंधरा वीस दिवसातच ती बाई हसऱ्या चेहेऱ्यानी आली. डॉक्टरांमुळे हे फारच लवकर बरे झाले. आता आम्ही यापेक्षा मोठा फ्लॅट घेत आहोत. वास्तुशांतीचे निमंत्रण द्यायला आले आहे.”

   आईचं ते भूतकाळात रमलेलं रूप, मन पाहून स्मिता भारावून गेली. तिच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. ती आईला म्हणाली “ असे किती अनुभव असतील तुझ्याकडे. हेच तू लिहून का नाही काढत ? बाकीच्यानंही अश्या अनाकलनीय गोष्टींचा उलगडा होत जाईल. तुलाही भूतकाळाशी नातं जोडून रहाता येईल.”

 “ खरच स्मिता, मला हे सुचलच नाही. भूतकाळाशी नातं तोडायचं नसतं आणि भविष्यकाळाशी नातं जोडायचं असतं. खुपच छान कल्पना आहे.”

आईची उदासी दुर झाली होती स्मिताचं काम पुर्ण झालं ती पण उठली. तिलाही तर सगळ्यांशी नातं जोडून रहायचं होतं.

                    .................................................