गुंतागुंत भाग १ Dilip Bhide द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुंतागुंत भाग १

गुंतागुंत  भाग  १

 

नारायण रघुनाथ मोकाशी. पुण्यातल्या एका सहकारी बँकेत ऑफिसर. नेहमी प्रमाणे सकाळची धावपळ सुरू होती. बँकेत वेळेवर जायची घाई होती. अशातच डबा भरता, भरता करुणाला, म्हणजे नारायणच्या  बायकोला जरा अस्वस्थ वाटायला लागलं. छातीची धडधड खूप वाढून गेली. शरीराला घाम सुटला होता. तशातच तिने  कसाबसा डबा भरून नारायणला दिला. नारायणने तिच्याकडे पाहीलं आणि त्याला धक्काच बसला.

“अग काय होतयं तुला ? चेहरा कसा विचित्र झालाय. घाम पण खूप आलाय. तू ताबडतोब आडवी पड.” तिला झोपवल्यावर त्यांनी बँकेत फोन केला, वरिष्ठांना परिस्थिती सांगून आज येत नाही अस म्हणाला. मग त्यांच्या नेहमीच्या रिक्षावाल्याला फोन करून बोलावून घेतलं आणि दवाखान्यात पोचले. तिथे BP चेक केल्यावर ECG काढला. पल्स रेट खूप वाढून गेला होता.  तिला डॉक्टरांनी लगेच ICU मध्ये शिफ्ट केलं.

“मोकाशी, ECG बघितल्यावर अस दिसतंय की तुमच्या बायकोला हार्ट अटॅक येऊन गेला आहे. पण आता काळजी करू नका. तुम्ही अगदी वेळेवर इथे आणलंत. थोडा उशीर केला असता तर मात्र कठीण होत. त्या आता ICU मध्ये आहेत. आम्ही सर्व काळजी घेऊ. She will be fine.” डॉक्टर म्हणाले.

ऑफिस मधून फोन आला. साहेबच बोलत होते.

“मोकाशी, आता कशी आहे तब्येत ? डॉक्टर काय म्हणालेत ?”

मोकाशींनी सर्व सांगितलं आणि म्हणाला

“साहेब, किमान आठ दिवस तरी रजा लागेल. आत्ता तर व्यवस्था आहे पण कदाचित नंतर पैसे लागू शकतील. तेंव्हा थोडं लोन मिळेल का ?”

“मोकाशी तुम्ही काळजी करू नका. सर्व व्यवस्था होऊन जाईल.”– साहेब.  

नारायणला बरं वाटलं. तो पुन्हा ICU मध्ये जायला निघाला पण नर्सनी त्याला अडवलं. म्हणाली “ICU मध्ये इतरांना जायची परवानगी नाही. पेशंटला जरूर पडली तर आम्ही तुम्हाला बोलावू. तुम्ही आता इथेच बाहेर बसा.”

नारायणनी घरी फोन केला घरी मुलं आणि आई होती. आईला परिस्थितीची कल्पना दिली आणि बहि‍णीला म्हणजे सुलभाला बोलाऊन घे. मी इथेच थांबणार आहे. अस सांगितलं.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी करूणाची तब्येत खूपच बिघडली. ऑक्सिजन लावूनही श्वास घ्यायला प्रचंड कष्ट पडत होते. नाडी मंदावत चालली होती. ऑक्सिजन लेवल झपाट्याने खाली येत होती. आणि शेवटी मॉनिटर वर कुठलीही हालचाल दिसेना. डॉक्टरांनी तपासलं आणि मान हलवली. त्यांनी ताबडतोब हार्ट मध्ये इंजेक्शन  दिलं पण काही उपयोग झाला नाही. नारायणला  बोलावण्यात आलं. सर्व संपलं होतं.

***

संजय विश्वासराव मोकाशी. अमरावती मध्ये M.R. होता. त्या दिवशी संध्याकाळी त्यांची बायको करुणा स्वयंपाक घरात ब्लेंडर लावून ताक करत असतांना काहीतरी गडबड झाली आणि तिला जबरदस्त शॉक बसला. ब्लेंडर हातातच असल्याने तिला काहीच करता आलं नाही. तोंडाने चित्र विचित्र आवाज करत ती धाडकन जमिनीवर पडली. आणि बेशुद्ध झाली. तिचा विचित्र आवाज ऐकून तिचा नवरा संजय धावतच किचन मध्ये आला पण तो पर्यन्त करुणा खाली पडली होती आणि हात पाय झाडत होती. ब्लेंडर बाजूला पडलं होतं आणि करुणाचा हात अजूनही त्याच्यावरच होता. अजून करंट चालूच होता. संजयने ब्लेंडर उचलण्यासाठी हात लावला आणि त्याला पण शॉक बसला. त्याच्या लक्षात सर्व आलं . त्यांनी बटन बंद केलं आणि करुणाला उचलून बाहेर सोफ्यावर झोपवलं. बाहेर आला शेजार्‍यांकडे कार होती, त्यांना सांगितलं आणि करुणाला हॉस्पिटलला नेलं. डॉक्टरांनी तपासलं आणि लगेच ICU मध्ये अॅडमिट करून घेतलं. उपचार सुरू केले. पण उपयोग झाला नाही थोड्याच वेळात तिची प्राण ज्योत मालवली.

***

चित्रगुप्ताच्या कार्यालयात एक अधिकारी कोण आलंय, कोणाला कुठे नेले यांची माहिती घेत होता.

“हं तुझं काय ?” – अधिकारी.

“महाराज पुण्याच्या करुणा मोकाशीला आणलंय. चेतना ज्योत तात्पुरत्या कुंभ पेटीका मध्ये ठेवली आहे.” – पहिला यमदूत.

करुणा मोकाशी पुणे, तो अधिकारी करूणाची माहिती बघत होता.

“मूर्खा हे काय केलस ? या स्त्री च आयुष्य ८० वर्षांचं आहे. तू तिला आत्ता का आणलस ? बापरे यमराज महाराजांना कळलं तर ते माझ्या डोक्यात गदाच हाणतील.” – अधिकारी.

दूसरा यमदूत उभाच होता त्यांच्याकडे पाहून अधिकारी म्हणाला “तू कोणाला आणलस बाबा ?”

“अमरावतीच्या करुणा मोकाशीला आणलंय.” – दूसरा यमदूत.

त्यांनी माहिती बघितली आणि तो कोसळलाच.

“गाढवा, हीच आयुष्य ७५ वर्षांचं आहे आणि आत्ता ती केवळ २५ वर्षांची आहे. तुम्ही दोघांनी काय घोळ घातला आहे ? बरं मला सांगा प्राणज्योत आणून किती वेळ झाला आहे ?” – अधिकारी.

“आताच येतो आहे महाराज.” - दूसरा यमदूत.

“म्हणजे अर्धा तास तरी झाला असेल.” – अधिकारी.  

दोघांनी मन डोलावल्या.

“प्राणज्योती कुठे ठेवल्या आहेत ?” – अधिकारी.

“तात्पुरत्या कुंभ पेटीका मध्ये.” – पहिला यमदूत.  

“ताबडतोब, त्यांच्यावर अग्नि संस्कार व्हायच्या आत, त्यांच्यात प्राणज्योती घाला आणि जीवंत करा. पळा. आणि हो, येतांना इंदूर च्या करुणा मोकाशीची प्राणज्योत घेऊन या. ती ९० वर्षांची बाई आहे आणि मरणासन्न स्थितीत घटका मोजत आहे. तिला आता जास्ती त्रास देऊ नका. लगेच आणा.” अधिकाऱ्याने तातडीचे निर्देश दिले.

***

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com