Eka Zadachi Gochi - 1 books and stories free download online pdf in Marathi

एका झाडाची गोची - भाग १

मकाजी महानगरपालिकेत गेला होता त्यांने तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितले की आमच्या गल्लीमध्ये जे झाड आहे त्या झाडामुळे आम्हाला यायला जायला खूप त्रास होतो. ते झाड तुम्ही पाडून टाका असा त्यांने अर्जही दिला. अथवा आम्हाला तुम्ही तसे करण्याची परवानगी द्या. असे आर्जव ही त्यांने केले.
महानगरपालिकेत अर्ज देऊन मकाजी घरी आला तेव्हा त्याच्या आईने आणि पत्नीने विचारले काय झालं मिळाली कां परवानगी,?
परवानगी काय अशी लगेच मिळतेय. ते म्हणाले आठ दिवस लागतील साहेब त्याच्यावर विचार करतील आणि मग तुम्हाला सांगतील.
बरं आता आठ दिवस वाट बघू या. त्याची आई म्हणाली.
आणि या झाडामुळे आपल्याला घरी काय वस्तू सुद्धा आणता येत नाहीत. म्हणजे वॉशिंग मशीन... कपाट.... किती अडचण होतेय. जागा कमी आहे. तिथे अरुंद गल्ली आहे. करायचं काय.
तरी आई मी तुला सांगत होतो हे झाड जेव्हा लहान होते. तेव्हाच तोडून टाकूया तोडून टाकूया तर तू म्हणालीस नको तुझ्या बापाने लावले. आता काय बघ ते झाड किती अवाढव्य वाढलेय.
तेही खरंच म्हणा मकाजीची आई म्हणाली.

आणि ही सुनबाई आपल्या घरात आली. तेव्हा पासून ती त्या झाडाला पाणी घालतेय. आतापर्यंत ते झाड किती वाढलेय..
अहो,सासुबाई माझं नाव घेऊ नका .तुम्हीच मला सांगितलं की सुनबाई तु त्या झाडाला अधून मधून पाणी घालतत रहा म्हणून... ते खरंय ग पण त्या झाडाला पाणी घातलेस आणि तेच झाड आता आपल्या मुळावर उठलेय त्याचं काय करायचं.
पण झाड कापून आणि झाड मारणं पर्यावरणाच्या विरुद्ध आहे त्यांची नात म्हणाली.
ही आली मोठी शहाणी शिकवायला मकाजीची बायको बोलली

ए आई मी काय असंच म्हणत नाही आम्हाला शाळेत शिकवतात झाडे म्हणजे देवा घरची संपत्ती...
बरं बाई माझं चुकलं. तुझं बरोबर आहे. तिची आई तिला म्हणाली.
मकाजीची आई विचार करत होती.
हे झाड तिच्या नवऱ्याने लावले. तेव्हा किती गोंडस होतं.
लहानस रोपट होतं. त्यांच्या संसाराप्रमाणे मोठे गेले .
आता त्या झाडाला पन्नास वर्षे झाली असतील. जेवढं ते वसाहतीचं वय होतं तेवढं त्या झाडाचं वय आहे. अशी लोकं म्हणतात.

मात्र आता त्या झाडानेच त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा केला होता. आणि त्याहीपेक्षा झाडाच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला होता.

झाडाच्या लहान मोठ्या फांद्या मकाजीने दरवर्षी कापल्या होत्या त्यामुळे त्या झाडाचा असा मोठा प्रचंड उभा सुळका तयार झाला होता .जो आकाशाकडे झेप घेत उभा राहिला होता .
त्या झाडाच्या सालीचा रंग काळा पडला होता. अनेक पावसाळे झाडाने पाहिले होते. प्रसंगी मकाजीच्या घरावर त्यांच्या फांद्यांनी छाया सुद्धा धरली होती .त्यामुळे उन्हाळ्यात मकाजीच्या घरामध्ये थंडगार वाटायचं .पण आता त्या झाडामुळे त्यांची वाट अडली होती. गल्लीमध्ये त्यांना जायला यायला खूपच अडचण होत होती. झाडाच्या पलीकडे पाय टाकायचा म्हणजे पाऊल तिरकं पडत होते. त्यामुळे तोल जाऊन डोकं आपटत होतं. मात्र आपणच केलेल्या करणीला आपणच जबाबदार आहोत असं त्याची आई त्याला सांगत होती.

मकाजीच्या आईला मात्र झाड तोडू नये असं वाटत होतं .मात्र मुलापुढे आणि सुनेपुढे तीचं काय पण चालत नव्हतं.
कशाला पाहिजे कपाट आणि फ्रिज आणि इतर वस्तू.
आहे तसंच चालवायचं .आम्ही नाही का इतकी वर्ष संसार केला. असं ती म्हणत असे.
मात्र नोकरीला जाणारी तिची सून सांगायची ...
आई ...अहो तेव्हा काळ वेगळा होता. आता काळ वेगळा आहे. आता बायकांना घराच्या बाहेर पडायचं म्हणजे जेवण किंवा भाज्या किंवा इतर वस्तू फ्रीजमध्ये ठेवायला बऱ्या पडतात. त्यामुळे त्या आयत्या वेळी वापरता सुद्धा येतात.
मला पण कळतं ग तुझं दुःख. पण आता परिस्थितीच अशी आली आहे तर आपण काय करणार.
तरी मी मामंजींना मागे एकदा म्हटले होते मामंजी हे झाड तुम्ही तोडून टाका तर मामंजी माझ्यावरच रागावले... म्हणाले....
हे झाड म्हणजे माझ्या जगण्याची आठवण आहे. माझ्या वडिलांनी हे झाड आणून मला दिले होते.
त्यामुळे माझ्या वडिलांची सुद्धा त्यामध्ये एक आठवण दडलेली आहे.
हो पण आता ती जुनी आठवण किती मोठी जखम झालीये कळलं ना तुम्हाला...
सुनबाई तु. बरोबर म्हणतेस . पण आता त्याला काही पर्याय नाही.

मामंजी गेले तेव्हा झाड थोडंसं बारीक होतं. तेव्हा सुद्धा मकाजी आईला म्हणाला होता की आई मी झाड तोडतो. पण आता काय झालं घराची आणि जागेची कोंडी झाली. वाट लहान झाली. इतरांनी त्यांची घर मागे मागे आणली आणि मग वाट खूपच निमुळती झाली.
हो ना तसं पाहायला गेलं तर माझं बालपण सुद्धा या झाडावर चढण्यात उतरण्यात गेलं .त्याला मिठी मारण्यात गेलं . त्याच्या मागे लपण्यात गेलं.त्याच्या फांद्या पाहण्यात गेलं. परंतु आता हे भलतच होऊन बसलंय मकाजी कसंबसं म्हणाला
तसं बघायला गेलं तर सर्वांच्याच वाटेमध्ये झाड आडवे आलेले आहे आणि त्याचा बुंधा सुद्धा मोठा झालेला आहे .त्यामुळे आपली मुलं खेळताना सुद्धा त्या झाडाला अडखळतात. पाहुणेरावने येताना सुद्धा खूपच गैरसोय होते. मकाजीची बायको म्हणाली

आठ दिवसांनी मकाजी पुन्हा महानगरपालिकेत गेला तेव्हा तिथल्या अधिकाऱ्याने त्यांला सांगितलं तुम्हाला झाड काय पाडता येणार नाही .कारण ते पर्यावरणाचा भाग आहे काहीतरी मोठं कारण असेल तरच ते झाड पाडता येईल. किंवा त्याबद्दल काहीतरी करता येईल.
असं कोणतं मोठं कारण आहे किंवा असेल. मकाजीने त्या अधिकाऱ्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला मला सुद्धा माहित नाही. तेव्हा मग चेहऱ्याने मकाची त्याच्याकडे बघितच बसला.
हताश होऊन मकाजी घरी आला. तो घरी आल्यावर त्याच्या आईने त्याला विचारलं काय झालं.
तेव्हा मकाजी आई वरच भडकला .म्हणाला तुझ्या कर्माची फळ आहेत ‌‌सगळी.... झाडावर प्रेम करतेय कुठची.
तू आणि बाबाने या झाडाला जर तेव्हाच कापला असता तर आज ही वेळ आली नसती . महानगरपालिकेत फेरी मारण्यासाठी. सारखे सारखे जावे लागले नसते.

हो ना आपण आता किती निरनिराळ्या ठिकाणी अर्ज दिले असतील. पण त्याचा जराही उपयोग झाला नाही. पन्नास अर्ज तरी झाले असतील. आतापर्यंत मकाजीची बायको बोलली..
त्या नगरसेवकाला तरी मी किती वेळा भेटले पण त्याचाही काही उपयोग झाला नाही .आमदार खासदार झाले .अधिकारी झाले, समाजकार्य करणारे समाजसेवक झाले. आपल्या येथील वसाहतीच्या कमिटीने सुद्धा अर्ज दिले. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही मकाजीची आई रडका चेहरा करीत म्हणाली.

मकाजीची आईच सध्या आता पुढाकार घ्यायला लागली होती झाड तोडण्यासाठी. परंतु तिच्याही प्रयत्नाला काही यश येताना दिसत नव्हते.
आपल्या रूमची किंमत सुद्धा कमी होत होती. त्या झाडाच्या अडसरामुळे .कोणी रूम सुद्धा विकत घ्यायला तयार नव्हते. नाही तर ही रूम विकून आपण कुठेतरी गेलो तरी असतो दुसरीकडे राहायला मकाजीची आई स्वतःचीच समजूत घालीत म्हणाली.
मात्र या झाडामुळे आपल्या घराच्या किमतीला काही अर्थ नाही. असे लोक म्हणतात.
मकाजीला खरं म्हणजे ते झाड पाडून त्या जागी शौचालय बांधायचे होते .परंतु जागाच नव्हती दुसरी शौचालय बांधायला त्यामुळे तो ही झाड कधी पडते किंवा मरते अशी वाट बघत होता. सध्या सार्वजनिक शौचालयात त्यांना जावे लागत होते. त्या झाडायला मरायची औषध सुद्धा टाकले होते. पाण्यातून अनेक वेळा सुद्धा वेगवेगळी मारण्याची औषध दिली होती. पण झाड काय मला तयार नव्हते.

मात्र मकाजीची आई म्हणाली .झाड मारून काय उपयोग नाही कारण झाड तर ते मेले तर आपल्या घरावरच पडेल त्यामुळे त्याला महानगरपालिकेकडून कापायला पाहिजे.
हो ना आपण झाड कापण्याचा खर्च सुद्धा द्यायला तयार आहोत पालिकेला .परंतु त्याचाही काही उपयोग होताना दिसत नाही मकाजी म्हणाला.

मकाजीच्या आईची बहीण म्हणजे मकाजीची मावशी सुद्धा कधी त्यांच्याकडे आली तर त्या झाडाकडे बघून शिव्या द्यायची. ती तिच्या बहिणीला म्हणजे मकाजीच्या आईला म्हणायची.
हा तुझा प्रियकर असावा म्हणून हा तुझी वाट अडून असा उभा आहे .तेव्हा तिची बहीण म्हणायची. हा माझा प्रियकर नाही. हा एखादा मवाली असावा. जो जातच नाही इथून. त्यावर त्या दोघी हसायच्या. त्यामध्ये त्यांची सून सुद्धा सहभागी व्हायची. मात्र मकाजी काही न सूचून गप्प ठोंब्यासारखा उभा राहायचा. खाली मान करून बसायचा. त्याला झाडाबद्दल असं प्रेमाने बोललेलं आवडायचं नाही.
मात्र मकाजीची बायको म्हणायची हा जो कोण तुमचा आहे. प्रियकर किंवा मवाली तो कचरा किती करतो. त्याची पान किती गळतात .मलाच ती झाडून लोटावी लागतात. अग तो आता म्हातारा झाला आहे. त्यामुळे केस जसे गळतात तशी त्याची पाने गळतात मकाजीची मावशी म्हणायची.
त्यांचे शेजारी पाजारी सुद्धा म्हणायचे. एवढे एक झाड गेलं असतं ना तर तुमची गल्ली कशी एकदम मोठी झाली असती. मुलांना खेळायला जागा झाली असती .इकडे काही तुम्हाला संडास बांधायचं होतं ते काम झाल्यास किंवा बाहेर खुर्च्या टाकून सुद्धा बसता आलं असतं .परंतु या झाडाने तुमची गोची केलेली आहे.

त्यावर इतर शेजारणी म्हणत हे ना झाड म्हणजे एखाद्या साधू सारखे असावे. नाहीतर त्या महाभारता मधल्या भीष्मा सारखे इच्छा मरण असणारे असावे. याला तेव्हाच मरण येईल जेव्हा याचं स्वतःचं इथून निघून जाण्याचं ठरेल. अशी काहीतरी शेरेबाजी होत राहायची. मात्र झाड वाऱ्याने हल्ला की लोकांना वाटायचं की हे झाड सुद्धा ऐकते आहे त्यांचं बोलणं..

ते झाड कसलं होतं . तिथल्या लोकांना फारसं माहीत नव्हतं .
मात्र ते रानटी झाड असावं असं वाटायचं .कुणी म्हणायचं की रानटी कडुलिंबाचे झाड आहे. पण ते असे कसे दिसते.
कडूलिंब असता तर आरोग्याला फायदाच होता. कारण कडुलिंबातून प्राणवायू सतत निघत असतो.
परंतु कडुलिंबाचे झाड नसावं ते. असाच सगळ्या लोकांचा सूर होता .
हे कसले वेगळेच रानटी झाड आहे .त्याच्या फांद्या सुद्धा सुकल्या की घराच्या छपरावर पडायच्या आणि पत्रा फुटायचा. कौले फुटायची श.त्यामुळे अनेक जणांनी घरावर लोखंडी पत्रे टाकले होते .झाडाचा फांदी तुटून खाली पडली की लोक त्या झाडाला कधी मरतोयस म्हणून असं शिव्या द्यायचे. मात्र झाड ताठपणे उभे होते.

वसाहतीमधील लोकं म्हणायची कधी इथे बिल्डिंग होतेय आणि ती बिल्डिंग लवकरात लवकर झाली की या झाडाच्या त्रासापासून आपण सुटू. खाजगी जागा असल्यामुळे तिथे बिल्डिंग होईल होईल असं लोकांना वाटत होतं .परंतु पंधरा वर्षे झाले तरी तिथलं काहीही डेव्हलपमेंट होताना दिसत नव्हतं. एकदा डेव्हलपमेंट झाली की या झाडापासून वीस फूट अंतर किंवा दहा फूट अंतर ठेवून बिल्डर बिल्डिंग बांधणार होता त्यामुळे झाडाचेही आयुष्य वाचणार होतं परंतु तसंही होताना दिसत नव्हतं .

कडुलिंबासारख्या दिसणाऱ्या त्या झाडाची मुळे अनेक घरांच्या खाली दबा धरून होती .जर हे झाड पावसात मुळापासून तुटून पडलं तर अनेक घरांचे नुकसान होणार होते. म्हणून पावसाळ्यात लोक जागरूक आणि सावध राहात होते. हे झाड पावसात किती गदा गदा हालतं वाऱ्याने ... वादळाने
तेव्हा त्यांचा जीव मुठीत यायचा हे झाड आत्ताच पडते की मरते की राहते की जाते.. असं त्यांना वाटायचं. पण झाड काही मरत नव्हतं की तुटत सुद्धा नव्हतं अथवा पडत सुद्धा नव्हतं... भक्कमपणे दर पावसाळ्यात उभे राहायचं आणि त्यांना चकवा द्यायचं. अनेकांची दुषणे खात झाड अभिमानात उभे होते.





इतर रसदार पर्याय