#आसाम_मेघालय भ्रमंती भाग १...
असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, तुम्ही कितीही प्रयत्नवादी असला तरी विशिष्ट वेळ आल्याशिवाय तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत.
काहींचे मत वेगळे असू शकते; पण मी तरी माझ्या आयुष्यात अनेकदा या गोष्टीचा अनुभव घेतला आहे....
मी ऑक्टोंबर २०१९ ला स्वेच्छानिवृत्ती घेतली तेव्हा पुढच्या जीवन प्रवासासाठी मनात काही योजना आखल्या होत्या.
चाळीस वर्षांच्या धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यात प्रथमच आता निवांत वेळ मिळणार होता.मनाप्रमाणे वागता येणार होते वर्षभरापूर्वी ड्रायव्हिंग शिकलो होतो.आता मस्त फिरायचे, देश विदेशात सहली करायच्या.जे जे करायचे राहून गेले आहे असे वाटते ते सर्व करायचे! त्या नियोजनाप्रमाणे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा पहिला हप्ता बँकेत आलेल्या दिवशीच मी घाईघाईने केसरी टुरिस्ट कंपनीशी संपर्क साधला आणि १६ मे २०२० अर्थात आमच्या लग्नाच्या वाढदिवशी प्रस्थान करणाऱ्या युरोप ट्रीपचे आणि माझ्या पहिल्यावहिल्या परदेश ट्रीपचे बुकिंग केले!
कंपनीकडून मिळालेल्या सुचनेप्रमाणे दोघांचे पासपोर्ट व कागदपत्रे केसरीकडे जमा करून व्हिसासाठी वाट पहात असतानाच जगभरातून कोरोणाच्या बातम्या येऊ लागल्या....
मार्चमध्ये संपूर्ण देशात आणि परदेशात लॉकडाऊन लागले.आमचे परदेशवारीचे आणि हो पहिल्या विमान प्रवासाचे मनसुबे कोरोनाच्या लाटेत अक्षरशः वाहून गेले.पैशापरी पैसे अडकले आणि युरोप ट्रीपचे स्वप्न अधुरेच राहिले.
ट्रॅव्हल कंपनीने अडचणीत आल्याने ट्रीपसाठी भरलेल्या रकमेबाबत कानावर हात ठेवले आणि आम्ही भरलेल्या रकमेची एक क्रेडिट नोट मेलवर पाठवली.अर्थात सगळेच अनिश्चित झाले होते त्याला ते तरी काय करणार?
संपूर्ण वीस आणि एकवीस सालात जग जणू एका जागेवर थांबले होते. मी माझे ट्रॅव्हल कंपनीकडे अडकलेले पैसे परत मिळावेत म्हणून मेलबाजी करत होतो;पण काहीच यश येत नव्हते.
खूप प्रयत्नांती उरलेल्या पैशात ट्रीप करण्याच्या लिखित बोलीवर आणि काही रक्कम चार्जेस म्हणून वजा करून भरलेल्या पैशाच्या अर्धी रक्कम ट्रॅव्हल कंपनीने माझ्या बँक खात्यावर जमा केली! कंपनीकडे उरलेल्या पैशाची ट्रीप करण्यासाठी आता निर्बंध उठेपर्यंत गप्प बसणे भाग होते....
माझ्याबरोबर अजून दोन मित्रांनी ही ट्रीप बुक केलेली होती त्यांच्याशी चर्चा करून निर्बंध उठल्याबरोबर भारतातीलच नॉर्थ ईस्टची ट्रीप करायचे ठरले....दरम्यानच्या काळात प्रत्येकाचे वय दोन वर्षानी वाढलेले होते...प्रत्येकाच्या एनर्जी लेवल आणि उत्साहात बराच फरक पडलेला होता. सर्वानुमते पंधरा दिवसाच्या संपूर्ण नॉर्थ ईस्ट ट्रीपऐवजी सात दिवसाच्या आसाम आणि मेघालय अर्थात केसरीच्या Mesmerizing North East ट्रीपला जायचे आम्ही ठरवले....
ही ट्रीप मुंबईहून गौहती अशी निघणार होती; पण त्या ऐवजी आम्ही पुण्याहून हैद्राबाद आणि तेथून कनेक्टेड विमानाने गौहातीला मुख्य ट्रीपला जॉईन व्हायचा पर्याय निवडला.
प्रवासाच्या दिवशी सकाळी सहाच्या फ्लाईटसाठी निदान चार वाजता तरी लोहगावला पोहोचणे आवश्यक होते, म्हणजेच नुकत्याच बदललेल्या माझ्या कोंढव्याच्या घरून पहाटे तीनला तरी निघावे लागणार होते.
आम्हा उभयतासाठी हा आयुष्यातला पहिला विमान प्रवास होता त्यामुळे मनात अनेक शंकाकुशंका डोकावत होत्या.अनामिक दडपण होते. त्यातली पहिली शंका म्हणजे समजा पहाटे आपण ओला किंवा उबर कॅब बुक केली आणि ऐन वेळी कॅब कॅन्सल झाली तर? कारण कॅब सर्व्हिसबद्दलचे आधीचे असे अनुभव गाठीला होते.
शेवटी सेफ साईड म्हणून दोन दिवस आधीच मी एका मित्राच्या ओळखीच्या रिक्षावाल्याशी संपर्क साधला.... माझी अडचण आणि मजबुरी ओळखून त्याने त्याच्या अटींवर मला पहाटे तीन वाजता पिकअप करायचे कबूल केले.खात्रीच्या या सेवेबद्दल मी आमच्या ट्रिपच्या ठरलेल्या दिवशी म्हणजे चौदा मार्चला कोंढवा ते विमानतळ या अंतरासाठी दीड हजार मोजून एकदाचा वेळेआधी विमान तळावर पोहोचलो.ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी विमानतळावर पोहोचल्याने आता बाकी मंडळी वेळेत पोहोचेपर्यंत वेगळ्याच दडपणाखाली होतो.त्यात आमच्यासाठी विमानतळावरच्या सगळ्याच फॉर्मालिटी नवीन होत्या त्यामुळे त्या दोघा मित्रांवरच आम्ही अवलंबून होतो.सिक्युरिटी चेक,बोर्डिंग पास, चेक इन लगेज, केबिन बॅगज इत्यादी गोष्टी वाचल्या होत्या;पण त्या बाबत संपूर्ण अडाणी होतो.या बाबतीत काडीचाही अनुभव गाठीशी नसल्याने मित्र सांगतील तसे ऐकत व सूचनांचे पालन करत एकदाचे आम्ही आमचे विमान सुटणार होते त्या गेटवर पोहोचलो.निर्धारित वेळेत आम्ही एकदाचे आमच्या सीटवर बसलो.एकदाचे टेक ऑफ झाले आणि आमचा पहिलावहिला विमानप्रवास पुणे ते हैद्राबाद सुरू झाला. ...
(क्रमशः)
©प्रल्हाद दुधाळ.