आसाम मेघालय भ्रमंती - 3 Pralhad K Dudhal द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

आसाम मेघालय भ्रमंती - 3

#आसाम_मेघालय भ्रमंती ३

आमचे टूर गाईड केशव आणि तेजस यांनी सकाळी लवकर उठून नाश्ता उरकून आठ वाजता तयार रहायला सांगितले होते परंतु शिलाँगची सकाळ पाच सव्वापाचलाच होते हे लक्षात नव्हते.पहाटे साडेपाचला हॉटेलच्या खोलीत आलेल्या सूर्यकिरणांनी आम्हाला जागे केले.इथे ईशान्य राज्यांत सूर्योदय असाच पाच साडेपाचला होत असतो.लवकर जाग आल्याने लवकर तयार झालों आणि संपूर्ण हॉटेल पाहून घेतले.एम.क्राऊन हॉटेल खरंच सुरेख होते.सकाळच्या नाश्त्यात विविध पदार्थांची रेलचेल होती.प्रवासात झेपेल रुचेल आणि पचेल असा भरपेट नाश्ता करून आम्ही आठ वाजता तयार झालो.आज आम्ही तीनेक तासाचा प्रवास करून लिव्हिंग रुट ब्रीज अर्थात झाडांच्या मुळात झाडांचा आधार घेऊन बनवलेला पूल बघायला निघालो होतो.मेघालयात घनदाट जंगलात नदी नाले ओलांडण्यासाठी असे रबराच्या झाडांच्या मुळ्यात बनवलेले अनेक पूल वापरात आहेत.यातील घनदाट जंगलातील अशा बऱ्याच पुलांपर्यंत पर्यटक पोहोचू शकत नाहीत.हे ब्रीज स्थानिक खासी आणि जेंतिया आदिवासी जमाती झाडांच्या मुळात विणतात आजूबाजूची झाडे डोंगराच्या कपारी अशा नैसर्गिक आधाराने हे ब्रीज बनवले जातात. अशा पुलाची रुंदी साधारणपणे दीड मीटर असते आणि एका वेळी पन्नासपेक्षा जास्त लोक हा ब्रीज ओलांडू शकतात.असे ब्रीज बनवण्यात या जमातींचा पारंपरिक हातखंडा आहे.अशा अनेक पुलांपैकी एक पूल आज आम्ही बघणार होतो. प्रवासात दुतर्फा डोंगरदऱ्या आणि धबधब्यांच्या खुणा दिसत होत्या.पावसाळ्यात इथे किती नयनरम्य धबधबे कोसळत असतील याचा अंदाज सहज बांधता येत होता.इकडे सध्या केंद्र सरकारच्या विशेष धोरणानुसार रस्ते उभारणीचे काम जोरात चालू आहे त्यामुळे जिकडे तिकडे धुळीचे साम्राज्य होते.तीन तासांचा प्रवास करून आम्ही नोहवेट या गावात पोहोचलो.लिव्हिंग रुट ब्रीज बघण्यासाठी पार्किंग पासून पायऱ्या उतरत बरेच चालत जावे लागणार होते. बाजूला बांधलेल्या बांबुंचा आधार घेत आम्ही खाली गेलो. एका ओढ्यावर विणलेला हा रुट ब्रीज बघून इथल्या आदिवासी जमातींची कला दृष्टी आणि कौशल्याला दाद द्यावीशी वाटते....केवळ अप्रतिम!
नंतर आमच्या गाड्या maulinong कडे निघाल्या बाजूला हिरव्यागार झाडांनी नटलेला नयनरम्य घाटमार्ग नजरेला सुखावत होता....
मौलिनोंग हे आशियातील सर्वात स्वच्छ खेडे अशी त्याची ख्याती आहे. त्यामुळेच त्याला “God’s own Garden”असेही म्हटले जाते.सुंदर टुमदार घरे, स्वच्छ आखीव रेखीव रस्ते.रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडांची लयलूट असे हे खेडे आपली छाप मनावर ठेऊन जाते.तेथील एका स्थानिक हॉटेलात लंचची व्यवस्था केली होती.होळी जवळ आली होती हे लक्षात ठेऊन आमच्या टूर गाईड ने लंच बरोबर पुरणपोळीची व्यवस्था केली होती. लंच नंतर नितळ स्वच्छ पारदर्शक पाण्यासाठी प्रसिध्द असलेल्या डावकी नदीमध्ये बोटिंगसाठी आम्ही गेलो.चार पाच जणात एक होडी याप्रमाणे होड्यात बसून अंदाजे तीनचार किलोमिटर अंतराचे बोटिंग एन्जॉय केले. विशेष म्हणजे या नदीचा 15ते 20 फुटाचा तळ दिसण्याइतपत स्वच्छ पाणी इथे आहे.डावकी नदीवर इंग्रज राजवटीत 1932 साली बांधलेला संस्पेंशन ब्रीज म्हणजे अभियांत्रिकीची कमाल आहे. डावकी नदीला उमनघोट रिव्हर असेही म्हटले जाते.
नंतर आम्ही भारत आणि बांगला देश यांच्या सीमेवरच्या मैत्री गेट ला भेट दिली.उत्सुकतेने भारत आणि बांगलादेश मैत्रीद्वारातून बांगला देशाच्या सीमेत पाऊल ठेवले.प्रथमच आपल्या देशाच्या सीमेबाहेर पाऊल ठेवणे नक्कीच थ्रीलिंग होते.बांगला देश हद्दीतून Welcome to India हा फलक पाहिला आणि का कुणास ठाऊक पटकन भारताच्या हद्दीत परतलो.मातृभूमीची ओढ काय असते ते त्या पाच मिनिटात अनुभवले.इथे बराच वेळ फोटो सेशन रंगले.या द्वारातून शेकडो ट्रक मोठे मोठे दगड घेऊन भारताच्या हद्दीतून बांगला देशात जात होते.कदाचित एखाद्या करारा प्रमाणे ही वाहतूक चालू असेल,असो.
आयुष्यात प्रथमच एखाद्या परदेशाच्या भूमीवर पाय ठेऊन परत आलो होतो.आजकाल परदेशात जाण्याचे अप्रूप फारसे राहिलेले नाही पण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या संवेदनशील माणसासाठी हा अनुभव नक्कीच अंगावर रोमांच उभा करणारा होता!
रस्त्यात धबधब्याच्या खुणा पाहून पावसाळ्यातील त्यांच्या सृष्टी सौंदर्याची केवळ कल्पना करत आम्ही शिलाँगकडे परत निघालो...
अशा प्रकारे आमच्या भ्रमंतीचा दुसरा दिवस संपला ...
(क्रमशः)
©प्रल्हाद दुधाळ.