पाहिले न मी तुला - 3 Omkar Ashok Zanje द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाहिले न मी तुला - 3

७ रायगड प्रदक्षिणा
१ फेब्रुवारी चा दिवस उजाडला. आज पहिलं काम जाहीर होणार होतं. सगळे गट वेळेवर एलसीडी च्या समोर हजर झाले. रिंगटोन वाजली आणि समोर मेसेज आला..
पहिले टास्क 'रायगड प्रदक्षिणा' दिनांक १९ फेब्रुवारी. सगळ्यांनी एकमेकांकडे भुवया वर करून बघितलं. कारण दर वर्षी एखाद्या जवळपासच्या गावात स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड असे सोपे उपक्रम असायचे .पण या वेळेस जरा वेगळंच होतं. मुलांची परीक्षा जवळ आल्याने मध्ये काही दिवसांचा गॅप ठेवला होता. जो गट प्रदक्षिणा सर्वात आधी पूर्ण करेल तो गट पहिल्या फेरीचा विजेता होणार होता.
पहाटे चार वाजता रायगड प्रदक्षिणेला सुरुवात होणार होती. शिवाय १९ फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती किल्ले रायगडावर मोठा जल्लोष असणार होता. नेने करंडकाचे यावर्षीचे बदललेले नियम पाहून सर्वांना आधीपासूनच आश्चर्याचे धक्के बसत होते. त्यात आता हा आणखी एक. त्यामुळे आता जे आहे ते आहे असं म्हणत सगळे निघाले आणि अभ्यासात मग्न झाले. शेवटी परीक्षा ही तितकीच महत्त्वाची होती
परीक्षेचे दिवस निघून गेले. १९ फेब्रुवारी तारीख आली. दोन्ही टीमा संपूर्ण तयारीनिशी रायगडाच्या पायथ्याशी पहाटे चारच्या आधीच पोहोचल्या .त्यांचं परिक्षण करायला एक शिक्षकांची टीम होती. चार वाजता शिटी वाजली आणि दोन्ही टीमचा प्रवास सुरू झाला.. रक्त गोठवणारी थंडी पडली होती. शिवाय भयानक काळोख होता. सगळे एका रांगेत एकमेकांच्या जवळ जवळ राहून चालत होते. रायगडाच्या पायथ्यापासून चारही बाजूंनी गोल प्रदक्षिणा घालायची होती. दोन्ही गट थांबत-थांबत दरमजल करत एकामागोमाग चालत होते. अधून-मधून चित्रविचित्र प्राण्यांचे आवाज येत होते तेव्हा सगळ्यांना घाबरायला होत होतं. दोन तास उलटून गेले. सूर्याची किरणे दिसू लागली
पाखरांची किलबिल सुरू झाली. तितक्यात कुणीतरी बोललं.. "ए ..तो बघा राजगड किल्ला " अंधुक प्रकाशात दूरवर छोटेसे डोंगराचे टोक दिसत होते. तो राजगड किल्ला होता. सगळ्यांनी तो पाहिला. लगेच टीम राजगड ओरडू लागली.. टीम राजगड जिंदाबाद..
हे ऐकून टीम रायगड पण कशी मागे राहील. तेही घोषणा देऊ लागले. शिवजयंतीनिमित्त रायगडावर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वांनी माना वर करून रायगडाकडे पाहिले. लक्ष्य मशालीने त्याचे कडे उजळून निघाले होते
आणि दूरवर बाहेर निघालेले भयावह टकमक टोक दिसत होते. हळूहळू अंधार नाहीसा झाला. गडावरच्या ढोल ताशांचा आवाज खाली स्पष्ट ऐकू येत होते.
एकेकाचा स्टॅमिना कमी होत चालला होता. कारण सलग एवढे तास चालायची सवय कुणालाच नव्हती. त्यात अक्षय आणि अनु खेळाडू असल्याने थोडे फिट होते. अजून काही तास चालत गेल्यानंतर अखेर ती वेळ आलीच. सर्वांनी सरळ वर पाहिले . आकाशाच्या मध्यभागी टकमक टोक अगदी मध्यभागी दिसत होता. हवेतील गारवा अजून कमी झाला नव्हता. पानांवर दवबिंदू जमा झाले होते. टीम राजगड थांबली. तर दुसरी टीम पुढे निघून गेली चार-पाच तास उलटून गेले.
"बास झाला बाय आता माका काय चालवत नाय" असं म्हणत कविता खाली बसली.
सगळ्यांनी डोक्याला हात लावला. तिला सरबत देण्यात आला. सर्वांनी तिला खूप समजावलं आणि धीर दिला. एवढ्यात खूप मागे असलेला पियुष चा गट राजगड पुढे निघून गेला. वाटेत करवंदांची तसेच फणसाची खूप झाडं होती. सर्वांनी चविष्ठ फळांचा आस्वाद घेत रमत गमत प्रवास केला.
गट रायगडचे एकेक मेंबर कमजोर पडू लागले. साहिलचे पण पाय दुखू लागले. एकटा अक्षयच पुढे चालत होता आणि थोड्या अंतरावर प्रिया होती. दुसरी टीम खूपच पुढे निघून गेली. त्यांनी वाघोली खिंड ओलांडली. अजून पुढे गेल्यानंतर त्यांना रोपवेने लिफ्ट वर जाताना दिसली. जवळजवळ ७५% प्रदक्षिणा पूर्ण झालेली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. तोच अंकिता चक्कर येऊन पडली. हिला काय झालं आता.. सगळे निराश झाले. तिला शुद्ध येई पर्यंत आणि विश्रांती घेईपर्यंत अर्धा तास निघून गेला. आणि दुसऱ्या टीमचा घोषणांचा आवाज दुरुन येत होता. सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
चालत-चालत अखेर पुन्हा ते पहिल्या पॉइंटला आले. समोर बघतात तर काय टीम रायगड त्याच्या समोर!! त्यांची प्रदक्षिणा आधीच झालेली !! पण हे कसं शक्य आहे ? नंतर कळलं की काहीच छोटे रस्ते फक्त साहिललाच माहीत होते आणि त्यामुळेच ते आधी पोहोचले.
अशाप्रकारे पहिले टास्क संपले. प्रिया, अक्षय, कविता, साहिल जल्लोष करू लागले. सगळे खूप आनंदी झाले. राजगड टीम जरा अपसेट झाली पण ग्रुप वर सगळ्यांनी डिसाईड केलं की आता काही झालं तरी आपणच पुढची फेरी जिंकायची.
कॉलेजच्या फलकावर रायगड १ राजगड ० असे नमूद करण्यात आले.
पुढची नोटीस आली की पुढचं काम १ मार्चला देण्यात येईल. एव्हाना कॉलेजची गॅदरिंग सुरू झाली. दरम्यान सलगच्या सुट्ट्या असल्याने सगळे होस्टेलर गावाला जाऊन आले .अगदी अक्षय, कबीर आणि अंकिता सुद्धा घरी गेले.
बऱ्याच दिवसांनी घरी गेल्याने हा महिनाही कसा संपला कळलेच नाही.
८ चिठ्ठी
पियुष लायब्ररीत जाऊन पुन्हा ईटीचं पुस्तक शोधू लागला. त्याला ईटीचं पुस्तक ठेवलेल्या जागी मिळालं. त्यातला मेसेज त्यानं वाचला. तोच जो प्रियाने लिहलेला. त्याने त्याच्या खाली पुन्हा लिहिलं ..
"माझं काम तुझ्याशी नाही तू तुझं काम कर"
आणि अभ्यास झाल्यावर त्याने पुन्हा पुस्तक रॅकमध्ये ठेवलं. प्रिया लायब्ररीत एलआयसीचं पुस्तक परत करायला आली. सहज गंमत म्हणून तिने आपण लिहिलेली चिठ्ठी पाहायला गेली. आणि तिला तो मेसेज दिसला. तिने वाचला. ओव्हरस्मार्ट हा ह्याला बघतेच आता म्हणत तिने खाली पुन्हा काही वाक्य लिहिली..
"ओय मिस्टर अखडू जास्त भाव खाऊ नको नाहीतर पाठविन ढगात"
पुस्तक लपवणारा कोणतरी अखडू मुलगाच असेल म्हणून तिने हवेत तीर मारला आणि तो बरोबर पियुषला लागला. कोणीतरी नाटकी मुलगी दिसते. हिची जिरवतो बघ आता कशी.. बहुतेक सुंदर मुली नखरे करणाऱ्या असतात (सर्वच नाही) असा त्याचा समज.. त्यामुळे त्यानेही हवेत तीर मारला..
"असशील दिसायला खूप सुंदर म्हणून तोरा मिरवु नको
तुला काय वाटलं तु एकटीच स्मार्ट आहेत "
याला कसं कळलं आपण दिसायला सुंदर आहोत प्रिया गोंधळली. पियुषचा बाणही बरोबर लागला. हा मला ओळखतो की काय तिने पुन्हा लिहिलं..
"आय डोंट नो यू सांग आता कोण आहेस तू "
पियुषचा पुन्हा रिप्लाय..
"लागली का तुला घाई एवढी
प्रेमात पडली की काय वेडी"
टाईमपास म्हणून त्याने दिलं ढकलून. सुरुवातीला दोघांनाही या चिठ्ठीत काहीच इंटरेस्ट नव्हता . म्हणून जस्ट गंमत म्हणून एक दोन आठवड्यांतून जसा वेळ मिळेल तसा एकमेकांना ते मेसेज पुस्तकातून करत . त्याच ईटी च्या पुस्तकातून. असे बरेच आठवडे उलटुन गेले. दोघांनाही आपण किती हुशार आहोत ते कळालं. शेवटी त्यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. नक्की इतका रोमॅंटिक, इतकी सुंदर, इतका मस्त लिहिणारा, इतकी भारी अक्षर असणारी आहे तरी कोण याची उत्सुकता दोघांनाही लागली होती. दोघांनीही स्थळ आणि वेळ ठरवलं आणि पुस्तक ठेवलं पुन्हा एकदा त्या कोपर्‍यात !
पियुष आंघोळ करून बाहेर आला. कुणीतरी टिव्ही चालूच ठेवला होता आणि ते पण मोठ्या आवाजात गाणी लावून..
"तबसे दिवाना हुआ
सबसे बेगाना हुआ
रब भी दिवाना लागे रे"
गाण्याच्या या ओळींवर पियुषने ठेका धरला. याआधी पियुषला हि रोमँटिक गाणी अजिबात आवडत नव्हती पण त्या गाण्यावर तो वेड्यासारखा डान्स करत होता
' जबसे तेरे नयना '
इतक्यात त्याचा टॉवेल सुटला पण नशीब घरात कुणीच नव्हतं हुश्श...
९ ट्रेजर हंट
महिन्याचा पहिला दिवस आणि पुन्हा दोन्ही टीमा ऑडिटोरियममध्ये जमा झाल्या .प्रत्येक गोष्ट धक्कादायकच होणार आहे असा समज प्रत्येकानेच आता करून घेतला. त्यामुळे पुढे काहीही झालं तरी आता पर्वा नव्हती. अखेर रिंगटोन वाजली . कबीरने गॉगल काढला आणि वाचू लागला पुढचा उपक्रम..
' ट्रेजर हंट' होय ट्रेजर हंट.. महाड तालुक्यातील काही ठिकाणांशी संबंधित कोडी होती. ती सोडवून शेवटच्या चिठ्ठीपर्यंत पोचायचे होते आणि शेवटच्या क्लू पर्यंत जो आधी जाईल तो गट विनर होणार होता.
गणितात एम वन मध्ये १००पैकी १०० गुण मिळवलेली अंकिता टीम मध्ये असल्याने हि फेरी आपणच जिंकणार याची टीम राजगडला खात्री होती. दहा दिवसांनी पहिलं कोडं प्रदर्शित करण्यात आलं ..
"एक विशाल तलाव त्याच्या तळाशी चौदा विहिरी गोल गोल
स्पर्श करा प्रत्येकाने पाणी माझे गोड गोड "
हे कोडं दिसताच आठही जणांनी पाऊल उचललं आणि पटकन धावत सुटले.
"गाडी काढ पटकन" पियुष साहिलला म्हणाला
"सॉरी यु आर नॉट इन माय टीम" साहिल
"तुझ्या *** **" पियुषच्या तोंडातुन शिवी बाहेर पडली
"पियुष कम हिअर" कबीरची बुलेट तयार होती.
इतर सगळे ही वाऱ्याच्या वेगात पळाले. सगळ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली..
चवदार तळे ..डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्ध झालेले चवदार तळे..
सगळे शोधाशोध करू लागले. तळ्याच्या मधोमध असणाऱ्या पुतळ्याखाली दोन चिठ्ठ्या होत्या. दोन्ही टीमला त्या सोबतच मिळाल्या आणि त्यासोबत पुढचा क्लू मिळाला ..
"सूर्यास्ताच्या वेळी उजळून निघतो मी एरवी असतो नुसता अंधार
सांगतो मी पुराणकथा नाव माझे ' _ _ र' "
कवी असलेला कबीर यमक जुळवू लागला... अंधार कंधार मंदार केदार गद्दार गांधार.. हे ऐकताच अनु जोरात ओरडली.. गांधार- 'गांधार पाले'
"अग ओरडलीस कशाला त्यांनापण क्लू कळला ना" पियुष तिच्या अंगावर खेकसला. उंच डोंगरावर असलेल्या आणि विविध पुराणकथा कोरलेल्या बौद्धकालीन लेण्या म्हणजेच 'गांधार पाले' अंकिताच्या डोक्यात उशिराने ट्यूब पेटली.
एव्हाना दुसरी टीम म्हणजेच रायगड कधीच निघून गेली.
"ओय कसला विचार करतेस चल पटकन" कबीर अंकिता वर ओरडला. चौघेही बाईकवर स्वार झाले. खूप कष्टाने सर्वजण डोंगर चढले.
मोबाईलच्या टॉर्चने आत काळोखात चिठ्ठी शोधू लागले. बाराव्या लेणीच्या शिल्पामागे चिठ्ठी भेटली. टीम रायगड चटकन ती घेऊन पळाली. अक्षय गाडीवर बसणार तोच त्याच्या लक्षात आलं की गाडी पंक्चर झाली ती आपोआप झाली की कुणी पंचर केली या विचाराने अक्षय संतापला आणि त्याने दुसऱ्या टीमचा मुलांच्या गाड्यापण पंचर केल्या. दिवस मावळला. आता उद्या शिवाय पर्याय नव्हता.. टीम राजगड सुद्धा चिठ्ठी घेऊन आली. खाली खूप मोठा राडा झाला.. आतापर्यंतचे बिएफएफ एकमेकांच्या विरुद्ध टीममध्ये असल्याने आता भांडू लागले होते.
कॉम्पिटिशन आता तगडी झाली होती. सर्वजण उद्याची वाट बघत होते. एक वाईट घटना म्हणजे ज्या मित्रांनी बाईक दिल्या होत्या त्यांनी पुन्हा बाईक द्यायला नकार दिला आणि गेम अजूनच किचकट झाला.
आपला चष्मा वर कविता पुढची चिट वाचत होती..
" खुलता कळी खुलेना
झुलता पूल झुलेना "
झुलता पूल ..आता झुलता पूल कुठे आहे रायगडात??
" काय हे साहिल तुच सांग आता "प्रिया म्हणाली
"एक मिनिट मला माहितीये कुठे आहे तो. पण प्रॉब्लेम असा आहे की तिथे कसे जातात मला माहित नाही. कुणाला तरी विचारावं लागेल" साहिल
विरुद्ध टीमनेही कंबर कसली त्यांना स्वतःला सिद्ध करायचं होतं
अनुने उत्तर सांगितलं "मला माहिती आहे हे आमच्या इथून जवळ आहे. वाळण कोंडी खूप खोल घळी आहे पाण्याची तिथे. त्यावरून पूल बांधता नाही आला म्हणून लोखंडाचा झुलता पूल बांधला आहे. तोच झुलता पूल आहे.."
"मी लहान असतांना तिथे गेलेलो. चला माझ्या घरी मी विचारतो" अनु
तिसरा कोडं सुटलं. सगळेजण त्या पुलावर हजर झाले.. वाळण या गावी.. तिथल्या पडक्या मंदिरात त्यांना पुढची चिठ्ठी भेटली..
"ऐन थंडीतही मी देतो ऊब
शोधताना मला कष्ट घ्यावे लागतील खूप"
"आता हे काय अजून" साहिलने डोक्याला हात लावला .
"तू नीट विचार कर काय असेल ही गोष्ट" अंकिता विचारू विचार करू लागली.
"वॉटर हिटर, स्वेटर.." कविता बोलली.
तसा टीममध्ये हशा पिकला.
"तसं नाही गं काही नैसर्गिक आहे का जवळपास जे वर्षभर गरम असतं असं" अक्षय थोड्या वेळानं बोलला.
" ह आहे एक" प्रिया मध्येच म्हणाली
"कोणता" साहिल कंटाळून म्हणाला
"सव.. तिथे गरम पाण्याचे झरे आहेत" प्रिया
" काहीही काय.. मी इतक्या वर्ष इथं राहतोय. मला माहित नाही अजून " साहिल
" खर आहे.. मी एकदा पेपरमध्ये वाचले आहे" प्रिया
"असा असल तर मग शोधुक व्हया " कविता
टीम राजगड पण गहन विचार करत होती. कारण तिथल्या जवळपासच्या लोकांनाही ते फारसं माहीत नव्हतं. त्या दिवशी अचानक पाऊस पडल्याने सर्व नेटवर्क जाम झाले. आणि नेटचा ऑप्शनही बंद झाला. म्हणजे तो दिवसही गेलाच म्हणायचा. तिसरा दिवसपण असाच गेला.
चौथ्या दिवशी सर्वांनी गुगल बाबांना विचारलं ..
डायरेक्षन टू सव..
टिंग वाजले आणि पुन्हा झाला प्रवास सुरु. यावेळी मात्र खूप अडथळे आले. कारण जायला नीट सुविधा नव्हती. दिवस मावळतीला आला. त्यांना नेक्स्ट क्लू मिळाला. पियुषने तो वाचून दाखवला ..
"एका बाजूला आध्यात्मिक शांतता
दुसऱ्या बाजूला कर्णकर्कश आवाज
एका बाजूला भक्तीचा सुवास
आणि दुसरीकडे हिंस्त्र प्राण्यांचा वावर
विचार कराल मनाने
तर होईल याचा बोध"
खूप विचार केल्यानंतर त्यांना उत्तर मिळाले. बैठकीला जात असल्याने अनुच्या डोक्यात ट्यूब पेटली.
'शिवथरघळ' - समर्थ रामदास स्वामी यांचं तिथं आठ वर्षे वास्तव्य होतं. तिथेच त्यांनी पवित्र दासबोध ग्रंथ लिहिला.
टीम राजगडचं उद्या सकाळी जायचं हे फिक्स झालं. कुठून तरी माहिती लीक झाली आणि विरुद्ध पार्टीला कळाली आणि तेही तयार झाले. भल्या पहाटे एसटी पकडून सर्वजण शिवथरघळीकडे निघाले. त्या कोड्यात सांगितल्याप्रमाणेच अतिशय शांत वातावरण होते .एका बाजूला आत गुहेत नीरव शांतता आणि बाहेर विशाल धबधब्याचा प्रचंड आवाज..
व्हॉट्सअप वर मेसेज आला.. उद्या इलेक्ट्रिकलची पॅरेंट मीटिंग आहे आणि परवा महत्वाचे लेक्चर ठेवले आहे त्यामुळे पुढचे दोन दिवस व्यस्त होते.
त्यांना एक चिठ्ठी मिळाली आणि आणखी एक पझल .अक्षय वाचू लागला आणि मटकन खाली बसला ते बघून सगळ्यांनाच टेंशन आले. त्याच्या हातातून प्रियाने ती घेतली आणि कपाळाला आठ्या आणल्या .सारे मुसळ केरात इकडे... अनुही नाराज झाली. त्यांचे सारे प्रयत्न वाया गेले होते. तसं त्या चिठ्ठीतच लिहिलेलं.
"घालवले तुम्ही इतके दिवस व्यर्थ
कळेल का कधी तुम्हाला याचा अर्थ
कारण एकाच ठिकाणी होते हे सर्व
म्हणतात ना काखेत कळसा
आणि गावाला वळसा "
सगळेजण उदास मग काय शेवटची एसटी पकडली. सर्वांनी कानात आपापले इअरफोन टाकले आणि सर्व गाणी ऐकत बसले . पुढचे दोन दिवस कॉलेज सुरू होते. दरम्यान विशेष परीक्षक शिक्षक टीमचं त्याच्यावर बारीक लक्ष होतं. सगळे नाराज होते. दिवस बोरिंग वाटू लागले. क्लू भेटला नव्हता. त्याचा दुःख होतंच. पण त्यापेक्षा जास्त सगळी धावपळ केली अगदी फुकट गेली होती. त्याचं वाईट वाटत होतं.