मनोगत एका सासूचे... Manjusha Deshpande द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मनोगत एका सासूचे...

म्हणता म्हणता आज माझ्या मुलाच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झालीत. आणि दोन वर्षांपूर्वीचा काळ माझ्या डोळ्यांसमोर आला. वास्तविक तेव्हा कोणतेही त्याच्या लग्नाचे प्रयोजन नव्हते. पण अचानक त्याने मुलगी आमच्या समोर उभी केली आणि पाच सहा महिन्यात तो बोहल्यावर चढला. खरंतर मला बाई एवढ्यात सासुबाई व्हावयाचे नव्हते . सारखे वाटत होते की आपण मस्त संपूर्ण घरावर स्वतंत्रपणे राज्य करत आहोत, आता मुलाच्या लग्नानंतर लुडबूड करायला कोणी तरी येणार!!!
बरं मुलाला म्हटले की तुम्हाला वेगळा फ्लॅट घेऊन देतो तिथे तुम्ही संसार थाटा. पण छे! मुलगाही या गोष्टीला तयार झाला नाही आणि त्यापेक्षा जास्त सून ही तयार नव्हती.
शेवटी मनाची तयारी केली आणि सासूच्या भूमिकेत शिरले. ठरवले होते की मी सुनेला मुलीसारखीच समजेल म्हणजे ती आपोआप सर्वांमध्ये सामावली जाईल.
पण हळूहळू लक्षात आले की सासू होणे म्हणजे देखील एक प्रकारचे प्रशिक्षण असते. आतासुनेल लेक मानणे म्हणजे काय हे मी प्रथम शिकले. शिकले म्हणण्यापेक्षा अजूनही शिकतेच आहे.
कारण होते काय की सुनेला मुलीसारखे वागतो याचा एक वेगळा अभिमान जागृत होतो आणि त्याप्रमाणे आपल्या अपेक्षा वाढतात. आपण इतर सासूंपेक्षा किंवा आपल्या सासूपेक्षा किती चांगले आहोत ही जाणीव मनात चांगली सासू असण्याचा अभिमान निर्माण करत असते. मग आपण किती चांगले आहोत या विचारांनी आपल्या अपेक्षा वाढू लागतात.

लेकीने काम नाही केले, उशीरा उठली, मूडप्रमाणे वागली तर आपण नरमाईचे धोरण घेतो किंवा तिला समजावून सांगतो.
पण सुनेने असे काही कधी केले तर???

आपण ते मनापासून स्वीकारतो का?? कारण लगेच मनात
भराभर आपल्या चांगुलपणाची यादी सुरू होते. मी तिला मुलीसारखे मानले पण तिला माझी जाणीव नाही, घराविषयी, माझ्याविषयी काहीच वाटत नाही वगैरे वगैरे....
कारण सुनेने हे केलेच पाहिजे असे कुठेतरी रुजलेली असते. आपण 'सुन' या विषयाची एक चौकट बांधलेली असते. त्यातच तिला बसवायचा प्रयत्न करतो. त्यात ती फिट झाली तर ती खूप चांगली आणि थोडीफार चौकटीबाहेर जाऊ लागली की लगेच आपण ती अशीच आहे म्हणून लेबल लावायला मोकळे!!!
पण ती चौकट आपण जोपर्यंत आपल्या लेकीच्या ( किंवा लेकाच्या ही बरं का... नाहीतर मला बाई मुलगीच नाही असे म्हणून सुटून जाल ) चौकटीसारखी बनवत नाही, तोपर्यंत आपण तिला लेक मानतो आहोत असा आपला गैरसमज असतो.
पण आपला मुलगा आणि सून दोघांविषयी आपण समान दृष्टिकोन ठेवतो का हे वारंवार तपासले पाहिजे.
ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हापासून मी माझ्या सुनेविषयीच्या चौकटीची तयारी सुरू केली आहे. अर्थात यामध्ये मला माझ्या लेकाची खूप मदत होतेय. कारण त्याच्या बायकोने त्याला काहीही सांगू दे किंवा मी त्याला काहीही सांगू दे, तो सरळ आम्हाला दोघींना एकमेकींपुढे उभे करतो आणि म्हणतो बोला आता काय बोलायचे ते. त्यामुळे नकळत आमच्यात मोकळेपणा येत आहे. पण दोन वर्ष झाली तरीही अजूनही ती चौकट पूर्णतहा लेकीसारखी बनत नाहीये.
पण खरं सांगते सूनेने मात्र खरोखर मला तिच्या आई सारखे मानले आहे. कारण आमचे विचार खूप एक सारखे आहेत, स्वभाव खूप जुळतात असे अजिबात नाही. पण कोणत्याही गोष्टीत आम्ही टोक गाठत नाही. कधीकधी मी तिच्यावर लेकी वर चिडते तसे चिडली ही आहे. पण तिने कधीच राग धरला नाही किंवा उलटून बोलली देखील नाही. विशेषतः तिच्या माहेरच्यांनीही कधीही आमच्यात काय चालले आहे यात लक्ष घातले नाही. अगदी पूर्णपणे मोठ्या मनाने आमच्यावर विश्वास ठेवून सर्वार्थाने आमच्या स्वाधीन केले हे देखील विशेष आहे. आजच्या काळात खूप महत्वाचे आहे.
खरंच खूप अभिमान आहे मला माझ्या सुनेचा आणि अर्थातच लेकाचा!!!
असेच कायम आम्हाला सांभाळून घ्या आणि सुखाचा संसार करा हीच सदिच्छा!!!

- मंजुषा देशपांडे, पुणे.