मृण्मयीची डायरी - भाग ५ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मृण्मयीची डायरी - भाग ५

मृण्मयीची डायरी भाग ५वा

मागील भागावरून पुढे…


वैजू आत आली तर तिला सारंग रडताना दिसला.त्याला रडताना बघून वैजूच्या डोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागले.


सारंग दोन्ही हातांनी डोकं पकडून जमीनीकडे बघत मुसमुसत होता.वैजूने सारंगजवळ जाउन त्याच्या पाठीवरून हात फिरवला.सारंगने वैजूकडे वर बघितलं तसं वैजू त्याला म्हणाली,


"सारंग मला वाटतं आपण त्या काऊन्सलरला भेटाव.."


" आता काय उपयोग भेटून?"


"नेमकं तिला काय झालं होतं हे तरी कळेल. तिला आई घेऊन गेली होती पण नंतर आपण कुठे काही विचारलं आईला? ऊलट मृण्मयीला काऊंन्सलरची गरज पडली यावरच आपण हसलो. खरच हसण्यासारखं होतं का काही? सारंग आपण असताना तिला काऊंन्सलरची गरज पडायला नको होती."


"हो...खरय तुझं म्हणणं. आपण तिच्या प्रश्नांना किती सहजपणे टाळायचो वरून म्हणायचो बावळटासारखं काहीतरी विचारु नकोस. आपण हे नेहमीच म्हणायचो."एक उसासा सोडून सारंग पुन्हा म्हणतो.


"आपण कायमच ती विचीत्र बोलते ,वागते असं धरुनच चाललो. देवानं आपल्याला तेव्हा का बुद्धी दिली नाही.?" सारंग रडतच म्हणाला.


"आता त्यावर विचार करून उपयोग नाही.आपण त्या काऊंन्सलरला भेटू.मला वाटतं मृण्मयीच्या वेळी काही करू शकलो नाही पण जगात अनेक मृण्मयी असतील. त्यांच्यासाठी काही करता येतं का बघू." वैजूच्या या बोलण्यावर सारंगनी होकारार्थी मान डोलावली..


दोघं त्या काऊन्सलरला भेटायचं ठरवतात


वैजू आईला म्हणते…


"आई त्या काऊंन्सलरचा पत्ता दे. जिच्याकडे तू मृण्मयीला घेऊन गेली होतीस.आम्ही जाऊन त्यांना भेटुन येतो."


"आता कशाला जायचय?जिला दुखणं होतं तीतर गेली." आई निर्विकार पणे म्हणाली.


"आई तुला असं बोलवतो कसं? तिची डायरी वाच मग तुला कळेल की आपण किती तिच्याशी वाईट वागलो.आपण तिला कधीच समजून घेतलं नाही."


"ऐ काहीतरी बोलू नकोस. समजून काय घेतलं नाही? नेलं होतं न त्या डोक्याच्या डाॅक्टरकडे." आई त्रयस्थपणे म्हणाली.


"आई मृण्मयी वेडी नव्हती. डोक्याच्या डाॅक्टरकडे हा काय शब्द वापरते?"


"डोक्याची नाही मनाची डाॅक्टर होती."


' डाॅक्टर तर होती नं? तुम्हाला नाही न्यावं लागलं कोणाकडे." आईने वैतागून विचारलं.


आता सारंग पण चिडला,


"आई खरंतर तुम्हा दोघांकडून तिच्याकडे दुर्लक्ष झालं आहे आम्ही दोघं तर लहानच होतो.तू आणि बाबा यांना मी कधीच तिच्याशी प्रेमानी बोलताना बघीतलं नाही. सांग नं असं का केलं तुम्ही?तुमचं बघून आम्ही पण तसच वागलो."


"तुम्ही काय वकील पत्र घेतलंय तिचं ? ती गेल्यावर मला जाब विचारता? मी तिला म्हटलं होतं का आत्महत्या कर." आई रागानी फणफणत बाहेरच्या खोलीत निघून गेली.


"अरे हे काय आईचं विचीत्र वागणं आहे. मृण्मयी गेल्या बरोबर हिचा संबंध संपला तिच्याशी?आई -मुलगी हे नातंही संपलं? वैजू मला आईचं काही कळत नाही. ती नक्की कुणा काऊंन्सलरकडे मृण्मयीला घेऊन गेली होती का? की उगीच सारखं सांगत होती."


"गेली होती आई मृण्मयीला घेऊन. मृण्मयीनं लिहलय डायरीत. ती काऊंन्सलर मृण्मयीला फार आवडली होती.पण पुन्हा गेली होती याचा उल्लेख नाही केला मृण्मयीनी."


"वैजू जे व्हायचं ते होऊन गेलं.आता पुन्हा त्यांचं मुद्द्यावर कशाला चर्चा हवी? तिच्यासाठी आम्ही काहीच केलं नाही असं नाही."


बाबांचा बोलतानाचा सूर विचीत्र. होता.त्यांना फारसा रस नव्हता त्या काऊंन्सलरला भेटण्यात.


आई वडील दोघंही आता हे सगळं करण्याची काय गरज म्हणून वाद घालतात याचंच वैजू आणि सारंग यांना आश्चर्य वाटतं. वैजू आणि सारंग यावर काही उत्तर न देता काऊन्सलरला भेटण्याची वेळ घ्यायचं ठरवतात.



"आई तू नंबर दे त्यांचा. तुम्हा दोघांना यात रस नसेल आणि आमच्याबरोबर यायचं नसेल तर नका येऊ."


आईनी भुणभुण करतच वैजूला नंबर दिला.


आई बाबांना वैजू आणि सारंग असं का करताहेत हेच कळत नाही.बाबा जरा वरच्या आवाजात बोलतात.


"तुम्हा दोघांना असं वाटतंय का की आम्ही मृण्मयीची हयगय केली. तिच्याकडे लक्ष दिलं नाही. तिला कोणतीही गोष्ट किती वेळा समजावून सांगावी लागायची हे तुम्हालापण माहिती आहे."


"बाबा हे आम्हाला माहीत असलं तरी तेव्हा आम्ही लहान होतो.तिला कसं सांगीतलं म्हणजे समजेल हे आम्हाला त्या वयात थोडी कळत होतं.पण तुम्हाला कळत होतं नं? तुम्ही आणखी प्रयत्न का केला नाही?" वैजू नी चिडून विचारलं.


"सारंग आत्ता तुम्ही दोघं आम्हाला जाब विचारताय पण जेव्हा तिला काही समजावून सांगायचं असायचं तेव्हा आमचच रक्तं आटायचं.तुम्ही घेतलं तिला कधी समजून. स्वत:बरोबर खेळायला नेलं कधी? आत्ता तोंड वर करून प्रश्नं विचारताय?" आईनी पण तोफगोळा सोडला.


"आई आम्ही असं वागलो पण त्यात आमची काय चूक? आमची पण बालबुद्धीच होती नं? तुम्ही सांगीतलं कधी आम्हाला की तिला जरा उशीरा समजतं तिला समजून घ्या. तुम्ही तिचे दादा ताई आहात. हे तर कधी तुम्ही आम्हाला शिकवलं नाही. तुमच्याकडूनही तिला खूप प्रेम मिळतंय असंही कधी आम्हाला दिसलं नाही. ती डायरी लिहीते हेही आत्ता कळलं.ती गेल्यावर पंधरा दिवसांनी." सारंग पुढे बोलू शकला नाही.


"आई तुला तर माहितीच असायला हवं होतं की मृण्मयी डायरी लिहीते. तिला त्या काऊंन्सलरनी डायरी घेऊन बोलावलं होतं. गेली होतीस तिला घेऊन?"


आई काहीच बोलली नाही.


"तू काही उत्तर देत नाहीस म्हणजे तू नंतर गेलीच नाहीस तिला घेऊन. धन्य आहे तुझी."


"तुम्हा दोघांना मृण्मयी आपली वाटली नाही कधी? तिच्यातला दोष काढून टाकण्याची गरज वाटली नाही कधी? अगं आई आमच्यासारखी तीही तुझ्याच कुशीतून जन्माला आली होती. असं कसं वागले तुम्ही दोघं?"वैजूनी पोटतिडकीने विचारलं.


आई बाबा काहीच उत्तर देत नाही हे बघून वैजूनी तणतणत पुन्हा तोच प्रश्न केला तेव्हा आई जे बोलली ते शब्द म्हणजे वैजू आणि सारंग दोघांवर झालेला बाॅम्ब हल्लाच होता.


"अरे बघताय काय असे दोघं ?खरं तेच सांगते.मला हे तिसरं मूल नको होतं. एवढी काळजी घेऊनही मृण्मयी झाली. तुमच्या दोघांच्या वेळी तरूण होते. तिसरं बाळंतपण माझ्यावर जबरदस्तीने लादल्यासारखं वाटत होतं."


"आई अग काय बोलतेस तू? म्हणून मृण्मयीकडे तू लक्षच दिलं नाही. यात मृण्मयीचा काय दोष.सगळी काळजी घेऊनही मृण्मयीचा जन्म तुझ्या पोटी व्हायचाच होता असं का नाही तुझ्या मनात आलं?"


"मी इतकीही बावळट नाही.देवानं दिलं म्हणून आपलं म्हणायचं?"


" मलातरी यावर काय बोलावं कळत नाही वैजु!"


"आपण काय बोलणार सारंग.आई आपल्या मनातला संताप मृण्मयी वर काढत होती आणि बाबा तिला साथ देत होते हे आता कळतय.आई बोलल्यावर.त्या वयात आपल्याला कुठे कळणार होतं?"


"तुम्हाला वाढवण्यात काही हयगय केली का आम्ही? दोघं चांगले शिकलात.सारंगला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आहे.वैजु तुलाही चांगलं घर मिळालंय.बॅंकेत नोकरी करतेस. आणखी काय हवं?"


"मुलांनो ऊगीच आम्हाला दुषणे देऊ नका. ती लहान असताना किती अपमान सहन करावे लागले आम्हाला हे तुम्हाला काय माहिती?" बाबा तिरीमीरीत बोलले.


"आई बाबा ही गोष्ट दुस-यांच्या घरातील नाही बोलतंय. आपल्या घरातली ही गोष्ट आहे.आमची सख्खी बहिण होती मृण्मयी." सारंग कळवळून बोलला.


"आई तो नानू ठार वेडा आहे तरी त्याचे आई-वडील कुठेही गेले तरी त्याला आनंदानी बरोबर नेतात.आपली मृण्मयी नानू सारखी वेडी नव्हती तरी तिच्याबरोबर आपण सगळेच इतके विचीत्र वागलो.का?" वैजूने टीपेच्या स्वरात प्रश्न केला.


"त्या नानूच्या बापाजवळ बक्कळ पैसा आहे. नंबर दोनचा. म्हणून तो आनंदीत असतो."बाबांनी बोलताना चेहरा विचीत्र केला.


"बाबा पैशाचा तेही दोन नंबरचा आणि नानूचं वेड याचा काय संबंध?" वैजूनी विचारलं.


"नाही कसा? त्या पैशामुळेच तर तर त्याला कोणी तोंडावर बोलून दाखवत नाही नानूच्या वेडाबद्दल. पैसा काहीही करू शकतो. वेड्याला शहाणंसुद्धा ठरवू शकतो.आम्हाला चार जण बोलायचे मृण्मयीवरून." बाबा सुस्कारा सोडत बोलले.


"तुम्ही त्यांना सांगू शकत होतात मृण्मयी वेडी नाही.ती कमी बोलते."


"मंद तर होतीच नं. सारंगच तर सारखा येताजाता तिला मंद म्हणायचा.विसरलास का सारंग?" आईनी सारंगची उलट तपासणी सुरू केली.


"नाही विसरलो.त्याचीच तर खंत वाटते आता.तू किंवा बाबांनी मला तेव्हाच रागावलं असतं तर मी तिला मंद कसा म्हणालो असतो?" सारंग कळवळून बोलला.


"छान. सगळ्याचं खापर आई बाबांवर फोडा.एरवी काही करतांना तुम्ही दोघं विचारायचे आई बाबांना?" आई तडकून बोलली.


"आई गल्लत करु नको इतर गोष्टी आणि मृण्मयीशी जसं वागायचो त्याची."


" होका.आता तुम्ही दोघं शिकवा आम्हा दोघांना आम्ही कसं वागायचं ते. पूर्वी वागलो ते चूक होतं हेही सांगा."


"आई मृण्मयी झाली तेव्हा मी खूप मोठी नव्हते. सातच वर्षांची होते.पण मला आठवतंय मृण्मयी रडली, तिनी शू केली,शी केली की तुझा चेहरा रागातच असायचा. तोडांनी काहीतरी बडबडत किती हिडीसफिडीस करायची तिला.पण नेमकं तू का करते असं हे समजण्याचं वय नव्हतं तेव्हा."


"ते लहान बाळ म्हणजे तुमचं खेळणं होतं पण केवढी मोठी जबाबदारी होती आमच्यावर हे तुम्हाला कसं कळणार?"


"आम्ही नव्हतो तुमची जबाबदारी? मग मृण्मयी ची जबाबदारी तुम्ही का नाकारली?' सारंगनी विचारलं.


" हे बघा आता बास्स करा.मी जे वागले ते चूक नव्हतं.तुम्हाला पटत नसेल तर ते तुमचं मत आहे.मला आता या विषयावर चर्चा नको." आई आपल्या पायात चपला घालून घराबाहेर गेली.थोड्या वेळानी बाबाही तिच्या मागोमाग गेले.


वैजू आणि सारंग दोघंही आई बाबांच्या या वागण्यानी थक्क झाले होते.त्यांना आईबाबांकडून अश्या प्रकारच्या वागणूकीची अपेक्षाच नव्हती.


आई वरून कोरडी असली तरी आतून तिच्या मनात मृण्मयी वरची मायाच असेल असं या दोघांना आत्तापर्यंत वाटत होतं. पण इथे दोघांचे सगळेच आडाखे चुकले होते.


आई बाबा दोघांनाही माहिती होतं की ते चुकीचं वागताहेत मृण्मयी बरोबर तरीही ते मान्य करत नाहीत आपली चूक. आईबाबांच्या या विचीत्र वागण्यामुळे वैजू आणि सारंगचं तर डोकंच काम करेनासं झालं.


किती तरी वेळ ते नुसतेच बसले होते.


"सारंग आतातर आपण जायचच त्या काऊंन्सलरकडे. आपल्या हातून अजाणतेपणी जी चूक झाली आहे तिचं प्रायश्चित्त आपण घ्यायचं.आईबाबांनी जाणून बुजून चूक केली आहे पण त्यांना मान्य नाही आपण चूक केली ते.त्यांचं त्यांच्यावर सोडू."


"हो वैजू मलाही असंच वाटतं. मृण्मयी जीवंत असताना जे आपण केलं नाही हे आपल्याला आत्ता कळतंय जर आत्ताही आपण काही केलं नाही तर मग आपण मृण्मयीचे गुन्हेगार ठरू." सारंग म्हणाला.


"हो.खर बोलतोस तू.सारंग आपण जे करणार आहोत ते फक्त आपली जबाबदारी म्हणून करायचं.त्यात आता आई बाबांकडून काहीही अपेक्षा करायची नाही.त्या काऊन्सलरला भेटलो की आपल्याला कळू शकेल आपण काय करू शकू?"


" हो.आपल्याला कोणाची मदत घ्यायची असेल किंवा मदत लागणार असेल तर त्या मॅडमनाच विचारू.कोण आहे या क्षेत्रातील जे मनापासून आम्हाला मदत करू शकतील."


"मला वाटतं सांगतील त्या. त्यांच्या ओळखीपण खूप असतील. आपल्याला मदत करणारा योग्य माणूस त्याच सुचवू शकतील.सारंग जी कोणी व्यक्ती आपण या कामात मदत म्हणून घेऊ तिचं मानधन आपण देऊ."


"हो नक्कीच देऊ.माझ्याजवळ पैसे आहेत.गरज पडली तर कर्ज काढीन.तुझं काय?तू तर बॅंकेत आहेस.हा हा हा."हे बोलून सारंग हसला.


"किती वेळाने सारंग हसलास तू. खूप बरं वाटलं.आहे रे माझ्याजवळ पैसा. आता मृण्मयीसाठी आहेच." वैदू ठामपणे म्हणाली.


" नवरा हिशोब मागतो का?" सारंगनी विचारलं.


"नाही. बराच दिलदार आहे. मुख्य खूप पुढारलेल्या विचारांचा आहे. समाजसेवा तर त्याच्या अंगात भिनली आहे. ऊलट तो मदतच करेल."


"अरे मग फारच छान होईल. मी ठरवलय कितीही अडथळे येऊ दे मृण्मयीसाठी हे करायचच. तिला या कामातून श्रद्धांजली वाहिल्या सारखं होईल."


"उशीरा का होईना पण आपल्याला जाग आली. आपली चूक कळली. आता मागे हटायचं नाही हे ठरलं" वैजू हात पुढे करते.तिच्या हातावर टाळी देत सारंग म्हणतो"ठरलं."

-----------------------------------------------------------

क्रमशः

लेखिका... मीनाक्षी वैद्य.