होल्ड अप
प्रकरण १
गेली पंधरा मिनिटे, हे सर्वांच्याच लक्षात येत होतं की सरकारी वकील आरुष काणेकर सतत कोर्टातल्या घड्याळाकडे बघत , मनात अत्यंत काटेकोर पणे वेळेची नोंद करत साक्षीदाराला प्रश्न विचारत होता.वेळकाढू पणा करण्यासाठी अधून मधून उगाचच आपल्या नोट्स चाळत होता, तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होता.
अचानक तो ताठ उभा राहिला आणि म्हणाला, “ दॅट्स ऑल युवर ऑनर.”
नंतर पाणिनी कडे वळला आणि म्हणाला, “ यू मे क्रॉस. पटवर्धन, तुम्हाला काही विचारायचं आहे?”
पाणिनी उठून उभा राहिला. आरुष काणेकर ने आपल्या पुढे टाकलेला सापळा त्याने ओळखला.
“ युअर ऑनर, कोर्टाचं कामकाज संपायला फक्त वीस मिनिटं बाकी आहेत.” पाणिनी म्हणाला.
“ मग? त्याचा काय संबंध? ” न्यायाधीश एरंडे त्रासिक स्वरात म्हणाले.
पाणिनी हसला, “ मला एवढंच म्हणायचं होतं, की माझ्या उलट तपासणीत कोर्टाचे कामकाज वेळ संपल्यामुळे थांबवलेले तुम्हाला आवडणार नाही.माझी उलट तपासणी ही जरा विस्ताराने घेणारे मी.आपण जर ती सोमवारी सकाळ पासून चालू केली तर सलग घेता येईल.”
जेव्हा कोर्टात बघ्यांची गर्दी नसायची किंवा इतर वकील नसत, तेव्हा न्या.एरंडे सहकार्य करत.म्हणजे थोडे औदार्य दाखवत.वकीलांच्या विनंत्या मान्य करत,पण जेव्हा मोठा खटला असे आणि गर्दी असेल तेव्हा आपलं रुबाब दाखवायची सवय त्यांना होती.म्हणजे आपण वकीलांच्या प्रभावाखाली नसतो, मी म्हणेन तेच कोर्टात होईल असं दाखवायचा त्यांचा प्रयत्न असे.
“ मिस्टर पटवर्धन, हे कोर्ट वकीलांच्या लहरीवर चालत नाही. ते ठरलेल्या वेळीच आपले कामकाज संपवेल.अजून तब्बल अठरा मिनिटं आहेत आपल्या हातात.क्रॉस चालू करा.” त्यांनी पाणिनी ला वाजवलं.
“ ठीक आहे ” पाणिनी म्हणाला. उठून त्याने आपल्या कडील कागद पत्र चाळण्याचे नाटकं केलं,तेवढया वेळेत पुढची रणनीती ठरवली.त्याला ज्या साक्षीदाराची उलट तपासणी घ्यायची होती, ती अत्यंत चतुर स्त्री होती. सहज सहजी त्याच्या जाळ्यात अडकणारी नव्हती.तिला जर उलट तपासणीत आडवं केलं नाही तर आरोपी वर शंभर टक्के आरोप सिध्द होणार अशी स्थिती होती.तिला हादरवू शकेल असा एकच हुकमी पत्ता त्याच्या हातात होता.पण एकच होता.आज कोर्टाचं कामकाज संपण्यापूर्वी ते हुकुमाचं पान खेळायची वेळ योग्य नव्हती.पण ते सोमवारी कोर्ट सुरु झाल्यावर खेळायचं ठरवलं तर अत्ता उरलेली पंधरा –वीस मिनिटं ही फालतू प्रश्न विचारण्यात घालवावी लागणार होती आणि तसं झालं तर न्यायाधीश घरी जातांना ती बाई जे बोलेल त्यावर विश्वास ठेऊन घरी जाणार होते आणि तसं झालं तर त्यांचं मत ती बाई बोलते ते खरंच आहे असं बनणार होतं.
पाणिनी ने निर्णय घेतला.तो, साक्षीदाराच्या पिंजऱ्या जवळ गेला.
“ मिसेस मरुशिका मतकरी ! ” तो सहज संवाद सुरु करत म्हणाला, “ वेगळंच नाव आहे तुमचं ! पहिल्यांदाच ऐकतोय मी. काय अर्थ आहे त्याचा?”
“ शंकराचा आशीर्वाद लाभलेली.” ती म्हणाली. “ मिस्टर पटवर्धन, तुम्ही माझ्या नावाचा अर्थ विचारायला नक्कीच इथे कोर्टात आला नाहीत.”
तिच्या देहबोलीवरून वाटत होतंच की पाणिनी च्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्याची तिची तयारी होती.
“ तर मग मरुशिका ,तुमचा दावा आहे की होल्ड अप करणारी, म्हणजे तुमच्या गाडी वर डाका घालणारी व्यक्ती ही आरोपी होता?”
“ हो मिस्टर पटवर्धन ”
“ तुम्ही पहिल्यांदा कधी पाहिलंत आरोपीला? म्हणजे तुमच्या आयुष्यात प्रथम तुम्ही आरोपीला कधी बघितलंत?” पाणिनी ने विचारलं.
“ होल्ड अप च्या दिवशीच.म्हणजे त्या रात्री.मिस्टर कामोद कुमठेकर हा सिग्नल ला गाडी थांबवून उभा होता.अचानक कुठून तरी आरोपी तिथे अवतीर्ण झाला आणि त्याने कामोद च्या डोक्याला बंदूक लावून शांतपणे त्याचे पाकीट, हिऱ्याची टाय पिन आणि माझी पर्स हिसकावून घेतली.हे सगळ काय चाललाय ते माझ्या लक्षात यायच्या आत तो माणूस कोपऱ्यावर ठेवलेल्या त्याच्या गाडीत जाऊन बसला आणि निघूनही गेला.” मरुशिका म्हणाली
“ आणि मग कामोद ने त्याचा पाठलाग केला?” पाणिनी ने विचारलं.
“ असला वेडेपणा त्याने केला नाही पटवर्धन.”मरुशिका म्हणाली. “ अहो त्याच्या हातात बंदूक होती. कामोद गाडीतून उतरला चौकातल्या दुकानात जाऊन त्याने पोलिसांना फोन लावला.”
“ बाहेर जाऊन का केला फोन?” पाणिनी ने विचारलं.
“ गाडीतून लागला नाही.”
“ तुम्ही काय केलंत?”
“ मी थोडावेळ गाडीत बसून राहिले.पण मला फार वेळ थांबता येणार नव्हतं.”
“ किती वेळ थांबून होतात तुम्ही गाडीत?”
“ पाच मिनिटं.तेवढ्यात वायरलेस गाडी आली.”
“ पुढे?” पाणिनी ने विचारलं.
“ कामोद पोलिसांशी बोलायला गेला तेव्हाच एक तरुणी गाडीतून आली आणि मला पाहून तिने तिची गाडी माझ्या पुढे जाऊन पार्क केली.तिला मी ओळखत होते.हा सगळा प्रसंग बघणाऱ्या रस्त्यावरच्या एका माणसाला मी विनंती केली की मिस्टर कुमठेकर येई पर्यंत मला थांबणे शक्य नाही ,मी माझ्या घरी म्हणजे मरुशिका-व्हिला या माझ्या बंगल्यावर जाते आहे. कामोद आला तर त्याला तुम्ही सांगा की मी गेले म्हणून आणि पोलिसांना काही लागलं तर मी उपलब्ध आहे. ”
“ पण तुम्ही पोलिसांशी बोलायला थांबला का नाहीत?” पाणिनी ने विचारलं.
“ कामोद ला सगळ माहीत होतंच की ! मग पुन्हा मी कशाला हवी असणार होते त्यांना? पोलीस आपले नोकर आहेत. आपल्या इन्कम टॅक्स मधून त्यांना पगार मिळतो पटवर्धन. त्यांना हवं तेव्हा ते माझ्या घरी येऊन माहिती घेऊ शकत होते.”
“ डाका पडला त्या वेळी तुम्ही कामोद बरोबर होतात?”
“ किती वेळा उत्तर द्यायचं या प्रश्नाचं मिस्टर पटवर्धन? मी होते.”
“ तिथून कुठे गेलात तुम्ही कामोद ना सोडून?”
“ मरुशिका व्हिला नंबर २ या माझ्या घरी.”
“ तुमच्या मालकीची आहे ही मिळकत?” पाणिनी ने विचारलं.
“ भाड्याची आहे पण मी वापरते.”
“ होल्ड अप च्या वेळी, तुम्ही कामोद सह तुमच्या या घराकडेच निघाला होतात? ”
“ हो.”
“ आणि तुम्हाला बघून थांबलेली तरुणी कोण होती?” पाणिनी ने विचारलं.
“ मिस सिया माथूर.”
“ तुमची परिचित?” पाणिनी ने विचारलं.
“ परिचित, मैत्रीण आणि नोकर.” मरुशिका म्हणाली.
“ तुमच्या कडे काम करते ती? ” पाणिनी ने विचारलं.
“ तुम्हाला त्यापेक्षा असं विचारायचं आहे का पटवर्धन, की होल्ड अप च्या दिवशी ती माझ्याकडे कामाला होती का ? असं ”
“ हो ”
“ ती मॅनेजर होती.”
“ आणि तिने तुम्हाला होल्ड अप च्या ठिकाणी पाहिलं आणि बरोबर घेतलं?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही.”
“ तुम्ही तसं म्हटल्याचं मला समजलंय.”
“ तुम्ही मला अडकवायला बघताय पटवर्धन, पण मी तुम्हाला सांगितलं की होल्ड अप नंतर कामोद ने चौकात गाडी नेली आणि तिथल्या दुकानातून फोन केला.मला सिया माथूर ने तिच्या गाडीत घेतलं ते अंतर होल्ड अप च्या जागे पासून शंभर ते दीडशे फुटावर होतं” मरुशिका म्हणाली.
“ तुम्हाला कशात अडकवायचं हेतू नव्हता माझा, मी जनरल बोलत होतो. ” पाणिनी म्हणाला.
“ पण मी नाही ना जनरल बोलू शकत.मी शप्पथ घेतल्ये.” –मरुशिका म्हणाली.कोर्टात तिच्या या उत्तरामुळे हास्याची लकेर उठली.
पाणिनी नाटकी पणाने आपली नजर साक्षीदारा वरून कनक ओजस कडे वळवत म्हणाला, “ मिस्टर कनक ओजस, माझ्या ऑफिसात लायब्ररी रूम मधे बसलेल्या सिया माथूर ला इकडे घेऊन येशील का?”
त्याने मरुशिका च्या चेहेऱ्याकडे पाहिलं...भावनाहीन.....
“ तर मग मरुशिका मॅडम, तुमची खात्री आहे की होल्ड अप च्या ठिकाणी आलेली आणि तुम्हाला गाडीतून घेऊन जाऊन मदत करणारी स्त्री म्हणजे सिया माथूर हीच होती? ”
मरुशिका ने अत्यंत प्रयत्न पूर्वक आपले भाव लपवले.अगदी गिळलेला आवंढा सुद्धा कोणाला दिसणार नाही याची तिने काळजी घेतली.पण बोलली नाही.
“ उत्तर दयाल माझ्या प्रश्नाचं?” पाणिनी ने विचारलं.
ती भानावर आली.सावरली....
“ अर्थात मिस्टर पटवर्धन.ती माथूरच होती.” पण तिने पाणिनी च्या नजरेला नजर न देता उत्तर दिलं
“ सिया ला तुम्ही कधी पासून ओळखताय?”
“ गेल्या आठ महिन्यापासून ”
“ होल्ड अप होण्यापूर्वी किती महिने?” पाणिनी ने विचारलं.
“ दोन महिने.” मरुशिका म्हणाली.
“मरुशिका व्हिला या नावाने प्रसिद्ध असलेल्या नाईट क्लब च्या चेन च्या तुम्ही मालकीण आहात?”
“ चेन अशी नाही.फक्त तीनच क्लब आहेत.” –-मरुशिका
“ ठीक आहे.तुम्ही चालवता ते क्लब?”
“ हो”
“आणि तुम्ही, बार गर्ल म्हणून स्त्रियांची नेमणूक केली आहे?”
“ हो. पण बार गर्ल म्हंटल्यावर जे चित्र डोळ्यासमोर येतं तशी पद्धत आमचेकडे नाही. आम्ही त्यांना मॅनेजर चा दर्जा देतो.”
“ एकूण किती जणी आहेत?”
“ अठरा”
“ तुम्ही चांगल्या व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाता?”-- पाणिनी ने विचारलं.
“ माझा प्रयत्न असतो तसा.”
“ तुमच्या सर्व म्हणजे तिन्ही नाईट क्लब्ज शी रोज रात्री संपर्कात असता?”
“ हो”
“ तिथे जाऊन तुम्ही रोज आढावा घेता, सगळ्यांच्या कामाचा?”
“ हो.तसा प्रयत्न करते मी.”—मरुशिका
“ होल्ड अप होण्यापूर्वी दोन महिने आधी पासून तुम्ही सिया माथूर ला ओळखत होता?”
“ मगाशी उत्तर दिलंय मी.”-मरुशिका
“ मी पुन्हा विचारतोय.” पाणिनी म्हणाला.
“ हो ”
“आणि या दोन महिन्यात तुम्हाला ती रोज भेटत होती? ”
“ अगदी रोजच असे नाही.”—मरुशिका
“ जवळ जवळ रोज?”
“ हो ”
“ त्या वेळे पर्यंत तुम्ही आरोपीला पाहिलं नव्हत?” पाणिनी म्हणाला.
“ नव्हतं”
“ आयुष्यात कधीही पाहिलं नव्हतं?”
“ नव्हतं पाहिलं” –मरुशिका
“ तरी सुध्दा एक कटाक्ष टाकून तुम्ही आरोपीला पाहिलं, एक क्षण.....” पाणिनी म्हणाला.
“ कटाक्ष वगैरे काही नाही पटवर्धन, मी थेट त्याच्या चेहेऱ्याकडे बघत होते.”
“ होल्ड अप फार पटकन घडला?” पाणिनी ने विचारलं.
“ फार पटकन.एखाद्या अनुभवी माणसाने करावा तसा ” –मरुशिका
न्यायाधीशांनी हातोडा आपटला.
“अनुभवी माणसाने करावा तसा हे शब्द काढून टाका. तो साक्षीदाराचा अंदाज आहे.”
पाणिनी नाराज झाला. आधीच साक्षीदाराच्या उत्तराने न्यायाधीश काणेकरांच मत प्रदूषित झालं होतं.
प्रकरण १ समाप्त
(सदर कथेतील या भागातील आणि यापुढे प्रसिद्ध होणाऱ्या सर्व भागातील पात्रे, कथा ,प्रसंग ,काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी संबंध नाही तसेच अन्य कोणत्याही भाषेतील कथा, कादंबरी यामधील पात्रे, प्रसंग कथानक, यांच्याशी त्याचा संबंध नाही)
©अभय बापट