होल्ड अप - प्रकरण 11 Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

होल्ड अप - प्रकरण 11


होल्ड अप प्रकरण ११
पाणिनी ऑफिसात आला तेव्हा कनक त्याचीच वाट बघत होता.
“ काय झालं सिया माथूर चं?” पाणिनी ने विचारलं.
“ ती कुठे राहत्ये ते शोधलंय आम्ही. तुझी कालची भेट कशी झाली तिच्या बरोबरची?”
पाणिनी ने त्याला सर्व सविस्तर हकीगत कथन केली.
“ कनक, मरुशिका मतकरी चे तीन क्लब आहेत. ज्याला ती व्हिला म्हणते. तिन्ही क्लब हे छोट्याशा उपनगरात आहेत. तिन्ही ठिकाणची जागेची निवड मरुशिका ने फारच काळजी पूर्वक केल्ये.”
कनक ने मान डोलावली.
“तुझा जो माणूस माझ्यावर लक्ष ठेऊन होता, मी क्लब मधे गेल्या पासून, त्याने आम्ही बाहेर पडल्यावर आमचा पाठलाग केला असेल ना? ” पाणिनी ने विचारलं.
“ त्या गाडीने तुम्हाला गोल गोल फिरवून पुन्हा त्याच क्लब च्या मागच्या दारात आणून सोडलं.” कनक म्हणाला.
“ मला ते लक्षात आलंच होत.” पाणिनी म्हणाला. “ कनक तू त्या सिया माथूर वर समन्स बजाव.कामोद कुमठेकर ची सगळी माहिती काढ. विशेषतः त्याच्या आयुष्यात अशी एखादी स्त्री आहे का , जिला होल्ड अप च्या दिवशी आपण कामोद बरोबर असल्याचं सिध्द होणे अडचणीच होतं ”
“ ठीक आहे. पाणिनी मला त्या सिया माथूर बद्दल काहीतरी खटकतंय. मी तिला विलासपूर हून ताब्यात घेतलं. मला टिप होती की गेले तीन चार महिने ती विलासपूर ला होती.ती ही तसं म्हणाली. आम्ही काल रात्री जेव्हा तिच्यावर पाळत ठेवली तेव्हा आमच्या लक्षात आलं की तिच या शहरात पण एक घर आहे. नुसत घर असण समजू शकतो पण मला संशय आहे की ती दोन आयुष्य जगत्ये. एक विलासपूर ला कोणा बरोबर तरी आणि एक इथे.” –कनक
“ कुठे राहते ती?”
“ धनुष्य अपार्टमेंट, १३४७, शिवाजीनगर ”
”समन्स सर्व कर तिच्यावर, आपण कोर्टात ते सगळ बाहेर काढू. तिच्या अपार्टमेंट वर नजर ठेवता आली का तुला?” पाणिनी ने विचारलं.
“ तीन माणसं नेमल्येत मी पाणिनी.दोन गाडीत बसल्येत.तरीही तिच्या घरात नेमकं कोण जातंय ते समजायला मार्ग नाही कारण त्या इमारतीत तेहेतीस फ्लॅट आहेत.त्यातल्या त्यात नशिबाचा भाग असा की तिच्या इमारतीत जातांना गेट वरची फ्लॅट नंबरची बेल दाबायला लागते. आत येणारा माणूस कोणाच्या फ्लॅट ची बेल दाबतो आहे ते आम्हाला कळेल अशी व्यवस्था केली आहे.” –कनक
“ कसं काय?” पाणिनी ने विचारलं.
“ त्या इमारती समोरच्या हॉटेल मधे माझा तिसरा माणूस रहायला गेलंय.तो दुर्भिणीतून सतत धनुष्य इमारतीच्या गेट वर नजर ठेऊन आहे.”
“ मस्तच ! ” पाणिनी खुष झाला. “ तिला समन्स गेल्यावर मी तिथे जायचा विचार करतोय. तुझा हॉटेलातला हेर मला कसा भेटेल कनक?”
“ सरळ १०२ नंबर च्या खोलीत जा. एकदा दार वाजव. तीन सेकंदानी पुन्हा दोन वेळा वाजव. पुन्हा तीन सेकंद झाल्यावर तीन वेळा वाजव. हा आमचा कोड नॉक आहे. तो तुला आत घेईल. तुला ओळखतो तो.”
“ कामोद कुमठेकर बद्दल काय माहिती?” पाणिनी म्हणाला.
“ बांधकाम क्षेत्रातला तो नावाजलेला माणूस आहे. स्वतःचे नावाला जपणारा आहे फार. मोठा गुंतवणूकदार म्हणूनही ओळखला जातो. आश्चर्य म्हणजे मरुशिका मतकरी ला तिच्या क्लब साठी, म्हणजे व्हिला साठी त्यानेच जागा खरेदी करून तिला भाडयाने दिल्या.”
“ अरे, म्हणजे ज्या उपनगरात त्याने त्या मिळवून दिल्या तिथले पोलीस सुध्दा त्याच्या हातातले असावेत, त्यामुळेच त्या चौकीतला पोलीस कामोद शी तडजोड करायला सुचवतोय मृद्गंधा ला.” पाणिनी म्हणाला.
“ याचाच अर्थ तो कामोद म्हणजे तयार माणूस दिसतोय.” –कनक
“ त्यांची सगळी माहिती पिंजून काढ कनक. सगळा भूतकाळ.”
“ फार खर्चिक पडणार आहे हे पाणिनी.”—कनक
“ तू हे फुकट करशील असं मला अपेक्षितच नाहीये.”
“ अरे पण तू स्वतः हे पदरच्या खर्चाने करतो आहेस.”—कनक
“ न्यायासाठी.” पाणिनी म्हणाला.
“ पाणिनी, तुला एकदा तरी असं मनात आलं का, की कोणीतरी जरी आरोपी अडकेल असा प्रयत्न करत असेल आणि मरुशिका आणि कामोद एकमेकांना सांभाळून घेत असतील तरी सुध्दा आरोपी म्हणजे, इनामदार, हा खरोखरच दोषी असावा? ” कनक ने विचारलं.
“ बिलकुल नाही, आणि कधीच नाही.” पाणिनी पटवर्धन म्हणाला आणि निघून गेला.
कनक चा हेर ज्या हॉटेलात उतरला होता,त्या हॉटेलात पाणिनी पटवर्धन पोचला.कनक ने सांगितलेला कोड नॉक त्याने दारावर वाजवला. थोडया वेळाने आत मधे पावले वाजल्याचा आवाज आला.नंतर दाराला आतून सेफ्टी चेन अडकवल्याचा आवाज आला.आतील माणसाने दाराला फट पाडून पाणिनी पटवर्धन कडे पाहिले.त्याची खात्री पटल्यावर मान डोलावली, पण पाणिनी ला आत घेऊन पुन्हा दार बंद करे पर्यंत तो पाणिनी शी काही बोललं नाही.
“ अरे ! पटवर्धन , तुम्ही येणार मला माहीत नव्हतं. ” तो म्हणाला.
“ मी सहज आलो, म्हंटलं इथली तुमची व्यवस्था नजरे खालून घालावी. कसं चाललाय?” पाणिनी म्हणाला.
“ व्यवस्थित चाललंय. मी इथल्या दुर्भिणीतून नीट नजर ठेवल्ये. काळजी नका करू. ”
पाणिनी पटवर्धन ने दुर्भिणी जवळ जाऊन त्यातून पाहिलं.
“ माझ्या डोळ्याच्या आकारा नुसार ती जुळवून ठवली होती. तुम्ही ती तुम्हाला हवी तशी अॅडजस्ट करून घ्या.” तो हेर म्हणाला.
“ नाही,नाही, ठीक आहे. मला खात्री पटली , चांगली आहे ती. ” पाणिनी म्हणाला.
“ आम्हाला हीच काळजी घ्यायची होती की ज्या ठिकाणाहून समोरच्या इमारतीचे गेट दिसेल आणि गेट वरचा माणूस कोणत्या फ्लॅट समोरचे बेल चे बटण दाबतो ते दिसेल अशी जागा निवडणे. ” तो हेर म्हणाला. “ अरे ! कोणीतरी येतंय गेट जवळ. पटवर्धन, तुम्हाला बघायचंय की मी बघू?”
पटवर्धन पटवर्धन पुढे झाला.त्याने दुर्भिणी ला डोळे लावले.एक छान पोषाख केलेली तरुणी गेट जवळ आली होती.पाणिनी ने पाहिले, तर तिने ४०९-१ क्रमांकाचे बटण दाबले होते. पण त्याला नाव नाही वाचता आले.
“ मी तिथल्या सगळ्या फ्लॅट वाल्यांची नावे टिपून घेतली आहेत. ४०९-१ मधला माणूस म्हणजे सुरेल कंपन नावाचा माणूस आहे. त्याच्याकडे सारख्या अशाच बायका येताहेत.त्या येतात, साधारण अर्धा तास बसतात आणि जातात.ही बाई आजच्या दिवसातली पाचवी बाई आहे. ”
“ सुरेल कंपन ! वेगळंच नाव आहे. चौथा मजला असेल ना हा?”
“ बरोबर.”
“ अरे, तिने ज्या फ्लॅट ची बेल वाजवली, त्याने वरूनच तिला आत यायची परवानगी दिलेली दिसत्ये. आणि ती चालल्ये आत.” पाणिनी म्हणाला.
ती इमारतीच्या आतल्या भागात जाताना दिसली.
“ आमचा माणूस सिया माथूर वर समन्स बजावण्यासाठी येईल आता.तो येऊन गेला की एक तरुणी तिथे येईल, येईल, पुढच्या पाठपुराव्यासाठी.ती तरुणी म्हणजे या खटल्यातला आरोपी, इनामदार याची पुतणी आहे. मृद्गंधा इनामदार नाव आहे तिचं. एकदम छान आणि सरळसोट मुलगी आहे.धाडसी आहे.ती सिया माथूर कडून कौशल्याने नेमकं काय घडलं हे काढून घेईल.” पाणिनी म्हणाला.
“ ठीक आहे, आणखी काय?”
“ मृद्गंधा भेटून गेल्यावर तिला काही ठोस असं सिया माथूर कडून कळलं की ती कनक ओजस ला फोन करून कळवेल आणि तो मला कळवेल. ” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही इथे आहात हे कनक ओजस ला माहित्ये?”
“ हो, येताना मी सांगून आलोय. ” पाणिनी म्हणाला.
“ समजा मृद्गंधा ला ठोस असं नाही काही हाताला लागलं तर?”
“ तसं घडलं तर दोन गोष्टी घडतील, एकतर सिया बाहेर पडेल किंवा कोणाला तरी भेटून पुढे काय करायचं याच्या सूचना घेईल किंवा फोन करून कोणाला तरी बोलावून घेईल ” पाणिनी म्हणाला.
“ संबंधित माणसाला प्रत्यक्ष न भेटता फक्त फोनवर बोलून ती सूचना नाही घेणार?”
“ होवू शकेल , पण शक्यता कमी वाटते. अशा प्रकारच्या प्रसंगात समक्ष भेटूनच शक्यतो कामे उरकली जातात.” पाणिनी म्हणाला.
“ याचाच अर्थ पाठलाग करायचे काम वाढणार.” कनक चा हेर म्हणाला.
“ कदाचित दोन दोन जणांचा पाठलाग.” पाणिनी म्हणाला.
“ हा पहा, समन्स बजावणी करणारा माणूस आला ! ” हेर म्हणाला.
“ येणाऱ्या जाणाऱ्या माणसाचं रेकोर्ड ठेवतो आहेस ना तू? ” पाणिनी ने विचारलं.
“ हो.अगदी व्यवस्थित. मला एक सांगा पटवर्धन सर, समन्स बजावणाऱ्या माणसा समोरच ती पाकीट उघडेल?”
“ नाही.म्हणजे तसं होवू नये म्हणून मी त्याला सूचनाच अशी दिल्ये की त्याने फक्त तिथे जायचं, तिला पत्र द्यायचं आणि तिची सही घेऊन लगेच निघायच.तो निघतानाच मृद्गंधा येईल . ती असे भासवेल की तिला या समन्स बद्दल तिला काहीच कल्पना नाही. ती सांगेल की तिच्या निरपराध असलेल्या काकाला विनाकारण अटक झाल्ये.ती स्वतः नोकरी करून पैसे कमावते आहे.काकाने तिला लहान पणा पासून सांभाळले आहे.त्याला मदत व्हावी म्हणून कोर्टात सिया माथूर ने सत्य काय ते सांगावे.”
“ तो माणूस वर जायला निघालाय पटवर्धन.” दुर्भिणीतून बघत तो म्हणाला.
“ आता कुठल्याही क्षणी मृद्गंधा इनामदार इथे येईल.” पाणिनी म्हणाला.
त्या हेराने आपले निरीक्षण चालूच ठेवलं.
“ पटवर्धन, तुमची मृद्गंधा इनामदार ही पंजाबी ड्रेस वर फेंट रंगाचे एक जाकीट घातलेली, दिसायला छान अशी आहे? ”
“ हो . बरोबर.” पाणिनी म्हणाला.
“ तर मग त्याच वर्णनाची एक मुलगी, खाली , इमारतीच्या बाहेर वाट बघत थांबली आहे.” हेर म्हणाला.
“ खालून ते तुला बघू शकत नाहीत ना?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही.इथे आत अंधार आहे खोलीत.माझी ही दुर्भीण आहे ना ती खूप शक्तिमान आहे.म्हणजे जवळपास थोडा जरी उजेड असला तरी त्यातून आपल्याला फार चांगलं दिसतं. म्हणजे आपल्याला वाटत की आपण ३-४ फूट अंतरावरून माणसाला बघतोय की काय ! पण त्या माणसाला कळत नाही की आपल्याला कोणी बघतंय, याचं एक कारण अजून आहे, आम्ही इथे अंधार करतोच शिवाय खिडक्यांचे पडदे एवढे ओढून घेतलेत की फक्त ”
दुर्भीणी पुरते उघडलेत.म्हणजे समोरून सुद्धा कोणी दुर्भीण घेऊन आपल्याला बघत असेल तरच त्याला आपण दिसू. पण ती शक्यता कमी आहे.”
पाणिनी ने आपली सिगारेट विझवली. “ आपण एवढा वेळ बोलतोय, तुझं नावंच नाही विचारलं.”
“ सर्वेश निंबाळकर” हेर म्हणाला.

“ सर्वेश, अशा प्रकारच्या कामात एक जुगार खेळायला लागतो, तुम्ही दबाव टाकला नाहीत तर काम होत नाही पण फार दबाव टाकलात तर पलीकडचा लढतो.अनपेक्षित पणे.” पाणिनी म्हणाला.
“ तुमचे समन्स मुळे एकतर मासा गळाला लागेल किंवा मासा आमिष खाऊन टाकेल.” सर्वेश म्हणाला.
“ तुमचा माणूस बाहेर पडतोय पटवर्धन.आणि त्याच वेळी मृद्गंधा दारावरची बेल वाजवत्ये.”
( प्रकरण ११ समाप्त)