UNTOLD STORY OF LOVE PART 4 books and stories free download online pdf in Marathi

अव्यक्त प्रेमाची कथा. भाग ४

अव्यक्त प्रेमाची कथा.

पात्र रचना

संदीप आपल्या कथेचा नायक.

सुशीलाबाई संदीपची आई.

केशवराव संदीपचे वडील.

अभय संदीपचा मोठा भाऊ.

अश्विनी अभयची बायको.

रामलिंगम संदीपचे सहकारी.

रमेशकुमार संदीपचे सहकारी.

प्रसाद संदीपचे सहकारी.

विश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष

शलाका आपल्या कथेची नायिका

भाग ४

भाग ३ वरून पुढे वाचा ......

लाऊड स्पीकर वर करफ्यू ची घोषणा करत एक पोलिस व्हॅन त्या रस्त्यावर आली आणि त्यांना संदीप आणि शलाका दिसले, त्यांनी ताबडतोब अॅम्ब्युलन्स बोलावली. दोघा जणांना उचलून घेऊन गेले आणि हॉस्पिटल मधे अॅडमिट केलं. हॉस्पिटल मधे इतकी गर्दी होती, की दोघांना वेग वेगळ्या हॉस्पिटल मधे अॅडमिट करावं लागलं.

त्या गुंडांनी संदीपला लोखंडी कांबीने अमानुष पणे इतकी मार हाण केली होती की, संदीपचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तुटले होते, डोक्याला भली मोठी जखम झाली होती आणि हॉस्पिटल मधे येई पर्यन्त प्रचंड रक्त स्त्राव झाला होता. संदीप बेशुद्ध होता, आणि डॉक्टर म्हणाले की केस फारच गंभीर आहे, आणि वाचण्याची शक्यता फारच कमी आहे, यांच्या नातलगांना बोलावून घ्या. संदीप बद्दल कोणालाच माहिती नव्हती त्यामुळे तो शुद्धीवर यायची वाट पाहण्या व्यतिरिक्त काहीच करणं शक्य नव्हतं. उपचार तर लगेच सुरू झाले. हात पाय आणि डोक्यावर अशी पांच मोठी ऑपरेशन झाली. या सगळ्यात २० दिवस गेले. अजून संदीपला शुद्ध आली नव्हती पण प्रकृती सुधारत होती.

केंव्हा तरी संदीपला शुद्ध आली. त्याच्या लक्षात आलं की तो ICU मधे होता. त्याने कुशीवर वळण्याचा प्रयत्न केला पण प्रचंड वेदना झाल्या आणि त्यांनी पुन्हा डोळे मिटून घेतले. थोड्या वेळाने वेदना कमी झाल्यावर त्यांनी “पानी पानी” असं म्हंटलं. एक नर्स जवळ आली. तिने पाहीले, की पेशंट शुद्धीवर आला आहे, आणि पाणी मागतो आहे. तिने दोन चमचे पाणी दिलं. संदीपच्या घशाची कोरड शमली आणि त्यांनी पहिला प्रश्न केला की त्याच्या बरोबर एक मुलगी होती, ती कशी आहे? नर्सला काहीच माहीत नव्हतं, पण त्याला त्रास होऊ नये म्हणून ती म्हणाली की “अच्छी हैं, दूसरे वॉर्ड मे हैं। फीमैल वॉर्ड” संदीपचं समाधान झालं, पण तेवढ्याने सुद्धा त्याला थकवा आला आणि त्यांनी परत डोळे मिटले.

संदीपची प्रकृती आता झपाट्याने सुधारत होती, त्याला रूम मधे शिफ्ट केलं होतं. पण त्यांचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात प्लॅस्टर मधे होते आणि डोक्याला भलं मोठं बँडेज होतं. नाशिकहून त्याचा भाऊ, अभय त्याची काळजी घ्यायला आला होता. संदीपची अवस्था पाहून त्याला धक्काच बसला. पण तो आल्यामुळे संदीपला पण हुरूप आला. संदीपची मानसिक अवस्था चांगली झाल्यावर पोलिस आले, नेमकं काय घडलं ते विचारायला. संदीपने सविस्तर पणे घटना कशी घडली ते सांगितलं, आणि मुली बद्दल चौकशी केली. पोलिसांनी सांगितलं की ज्या टीम ने संदीपला आणलं, त्यांच्याकडे चौकशी करून सांगतो की ती कोण मुलगी आहे आणि आता कशी आहे.

दोन अडीच महिन्यांनंतर संदीपला सुट्टी मिळाली. संदीप आणि त्याचा भाऊ नाशिकला आले. नाशिकला आल्यावर महिन्या भरातच संदीप परत नोकरीवर रूजू झाला. आता रुटीन आयुष्य सुरू झालं होतं. पोलिसांना त्या मुलीचा काहीच पत्ता लागला नाही, किंवा संदीपची ती कोणीच नसल्याने त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. तो विषय त्यामुळे तिथेच संपला.

अशीच पांच वर्ष निघून गेली. या पांच वर्षात संदीपने खूप भोगलं होतं. पुरुषा सारखा पुरुष असून, त्या मुलीला गुंडांच्या तावडीतून सोडवू शकला नाही, ही सल त्याला त्रास देत होती. कित्येक रात्री झोपेविना जायच्या, संदीपची फार घुसमट होत होती, ती खंत आता त्याच्या शरीरावर परिणाम करायला लागली होती. एक मन म्हणायचं की जे जे शक्य होतं ते ते सर्व केलं, तरी सुद्धा ती मुलगी बळी पडली, त्याला काय करणार? पण लगेच दुसरं मन म्हणायचं की असला स्वार्थी विचार शोभत नाही. एक दिवस प्रसाद चेन्नई हून एका कॉनफरन्स ला आला होता, तो रात्रभर संदीपच्या घरीच राहिला होता. संदीपची अवस्था त्याला बघवली नाही. त्यांनी संदीपला खूप समजावलं, म्हणाला की तो त्याचं करियर खराब करतो आहे, त्याचं कामात लक्ष नाहीये, आणि हे साहेब, लोकांच्या लक्षात आलं आहे. काही काळ ते ढील देतील, पण नंतर संदीप नोकरी गमावून बसेल. त्यामुळे, आता कामात जास्त लक्ष दे. कामात व्यस्त राहिलास, तर बऱ्याच गोष्टी मागे पडतील. संदीपला ते पटलं आणि संदीपने आता कामामधे आणि कंपनीमधे चांगलंच गुंतवून घेतलं होतं. स्वप्न पडतच होती पण आता हळू हळू त्यांची धार जरा बोथट होत होती. काळ हे उत्तम औषध असतं म्हणतात हे खोटं नाही. त्याची मुंबईला बदली झाली. मुंबई ला जनरल मॅनेजर लॉजीस्टीक म्हणून त्यानी सूत्र हातात घेतली. आता नाशिकला फॅक्टरी असल्याने, महिन्यातून एक दोनदा त्याच्या नाशिकच्या फेऱ्या व्हायला लागल्या.

असाच एकदा नाशिकला गेला असतांना आईने त्यांच्या लग्नाचा विषय काढला. संदीपला दिल्लीचा तो भयंकर दिवस आठवला. शलाकावर गुदरलेला तो प्रसंग आणि तिची झालेली विटंबना, आठवल्याने त्याच्या सर्व संवेदनाच जळून गेल्या होत्या. त्याने ठाम पणे नकार दिला.

त्यांच्या घरच्या लोकांनी खोदून खोदून विचारलं पण संदीपचा नकार कायम होता. चर्चा काही थांबेना, तेंव्हा त्याने निक्षून सांगितलं की, हा विषय काढायचा नाही. मी नाशिकला येणार नाही, जर पुन्हा हा विषय काढला तर. मग सर्वांचाच नाईलाज झाला. आई तर खूपच निराश झाली होती. पण बिचारी गप्प बसली.

*********

शलाकाला वेगळ्याच हॉस्पिटल मधे अॅडमिट केलं होतं. दोन तासांतच ती शुद्धीवर आली, पण थकवा इतका होता की ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. दुसऱ्या दिवशी पोलिस आले. शलाकाने अडखळत काय घडलं ते सांगितलं. तिचं मग मेडिकल चेकअप करण्यात आलं. तिच्यावर गॅंग रेप झाल्याचं स्पष्ट झालं. त्या काळात अनेक मुलींवर बलात्कार झाले होते, त्यांची चौकशी चालू होती, कोणीही गुन्हेगारांना ओळखण्याच्या परिस्थितीत नव्हतं. दोन दिवसांनी तिला सुट्टी देण्यात आली. शलाकाला तिच्या मैत्रिणीचा पत्ता माहीतच नव्हता. मैत्रिणीच्या घरच्यांच्या बरोबर आल्यामुळे, माहीत करून घ्यायची आवश्यकताच भासली नव्हती. आता सुट्टी मिळाली, आता काय करायचं? तिला प्रश्न पडला. तिच्या जवळ तिची पर्स पण नव्हती, त्यामुळे पैसे पण नव्हते.

दंगलीची धामधूमच इतकी होती, की तिच्या मैत्रिणीचा शोध घेण्यासाठी पोलीसांच्या जवळ वेळ नव्हता. शेवटी पोलीसांनीच तिला नागपूरचं तिकीट काढून गाडीत बसवून दिलं.

शलाका घरी पोचली, तेंव्हा तिची अवस्था अजिबात बघवत नव्हती. सगळ्यांनाच धक्का बसला. शलाका घरात गेली, सोफ्यावर बसली आणि बेशुद्ध झाली. कोणाला काहीच कळेना की काय झालं आहे ते. तिला ताबडतोब जवळच्या हॉस्पिटल मधे अॅडमिट केलं. डॉक्टरांनी विचारलं की काय झालंय तर कोणालाच काही कल्पना नव्हती. डॉक्टरांनी अंदाजाने उपचार सुरू केले. संध्याकाळ पर्यन्त तिला शुद्ध आली, डॉक्टरांनी सांगितलं, की कोणीही कसलेही प्रश्न विचारू नका, तिला कसला तरी धक्का बसलेला दिसतो आहे, तिला जरा सावरू द्या मग तीच सगळं सांगेल.

तो पर्यन्त, रेडियो वरुन आणि संध्याकाळच्या टीव्ही वरच्या बातम्या पाहून सर्वांनाच कळलं होतं की दिल्लीला प्रचंड दंगा उसळला आहे. आता सर्वांना ही शंका भेडसावत होती की शलाका त्या दंग्यात तर सापडली नसेल ना? त्या शंकेने सर्वांचाचं थरकांप उडाला. शलाकांच्या वडीलांनी तिच्या मैत्रिणीच्या घरी फोन लावला, पण कोणीच उचलला नाही. तिच्या भावाने शलाकाला विचारलं, “दिल्लीचा नंबर माहीत आहे का, तुला?”

“नाही, पण कशाला?” – शलाका.

“तू काहीच बोलत नाहीयेस, तेंव्हा म्हंटलं की त्यांना विचारू.” – भाऊ.

“काही जरूर नाही, आणि पुन्हा विचारू नकोस, मला त्रास होतो.” – शलाका असं म्हणाली आणि डोळे मिटून घेतले.

भाऊ हताश, आई, बाबांकडे बघून त्याने खांदे उडवले आणि ऑफिसला चालला गेला.

दिवस असेच जात होते, शलाकाला झोप लागत नव्हती म्हणून डॉक्टरांनी झोपेची गोली दिली होती, पण शलाका झोपेतून किंचाळत उठायची. तिची आई तिच्या जवळच झोपायची, पण तिच्याही हातात काहीच नव्हतं.

एका रात्री शलाका अशीच किंचाळत उठली, शेजारच्या खोलीतून तिची वहिनी पण धावत आली, आई आणि वहिनीनी मिळून तिला शांत केलं. पण आता आईला राहवेना. ती म्हणाली “शलाका, अग एक महिना झाला, रोजच तू अशी दचकून उठते आहेस, दिवस भर अशी काही न बोलता, गुपचुप बसून राहतेस, आमचाच जीव तीळ तीळ तुटतो, खूप काळजी वाटते तुझी. अग तुझं आयुष्य पडलंय पुढे. आपल्या मना वरचं ओझं उतरवून टाक, आम्हाला नीट सगळं सांग, तुझं मन हलक होईल. आणि जीवाला जरा स्वस्थता लाभेल. ऐक बाळा माझं.” आईच्या बोलण्यावर शलाकाने काहीच प्रतिसाद दिला नाही, पण तिलाही जाणवलं की काहीतरी, कुठे तरी आपलं चुकतंय. हळू हळू सगळे आपापल्या व्यापात गुंततील आणि आपण असेच एकटे पडू. आयुष्यभर काही कोणी कोणाची वाट पाहत नाही. जे काही घडायचं होतं ते घडून गेलं आहे, अंधारामुळे कोणाचीही ओळख पटवणं शक्य नव्हतं त्यामुळे ते एक वाईट स्वप्न पडलं होतं असं धरून पुढे जाण्यातच शहाणपण आहे. एवढा विचार केल्यावर तिचा चेहरा उजळला.

इतके दिवस ती जेवायला सुद्धा बाहेर येत नव्हती, तिचं जेवण तिच्या खोलीतच आई किंवा वाहिनीच घेऊन जायच्या. आज सुद्धा रात्रीच्या जेवणाची तयारी वाहिनी करत असतांना शलाका बाहेर आली. तिला पाहून वाहिनीला जरा आश्चर्यच वाटलं, पण आनंदही झाला. “आमच्या बरोबर टेबलावर जेवणार?” – वाहिनी.

“हो, आणि आता रोजच.” – शलाका म्हणाली. तिचा चेहरा एकदम नॉर्मल दिसत होता. जेवण झाल्यावर शलाकाने तिच्यावर जो अत्याचार झाला होता त्याबद्दल सांगितलं. आता शलाकाच्या मनाची इतकी तयारी झाली होती, की अगदी त्रयस्थ माणसाने वर्णन करावं, तश्या प्रकारे तिने सर्व वृत्तांत दिला. तो ऐकल्यावर सर्वांच्याच मनाची बिकट अवस्था झाली. आई आणि वहिनी तर रडायलाच लागल्या. शलाकाने कसं सगळं सहन केलं असेल, यांची कल्पनाच त्यांना करवेना. शलाकांच्या वडीलांनी तिला जवळ घेतलं. म्हणाले, “इतकं सहन तरी कसं केलस पोरी, मी आत्ता तुझ्या मैत्रिणीच्या बाबांना फोन लावून विचारतो, की त्यांनी जबाबदारी घेतली होती, मग माझ्या पोरीला असं वाऱ्यावर कसं सोडलं?”

“नाही बाबा, कोणालाच कल्पना नव्हती, सगळं शांतच होतं, कुठेही गडबड, गोंधळ दिसत नव्हता, म्हणूनच आम्हाला बाहेर पडायची परवानगी मिळाली. धाव पळीत माझा आणि इतरांचा हात सुटला आणि अचानक दिवे पण गेले, त्या मुळे अंधारात कोण कुठे पळतंय हे कळतच नव्हतं. बाकीच्याचं पण हेच झालं, पण त्या मुली बऱ्याच वेळाने का होईना, पण सुखरूप घरी पोचल्या. मीच एकटी भरकटले. नशीब माझं की तो माणूस, फारच सज्जन होता म्हणून रात्रभर मला त्याचाच आधार होता. पण अंधार खूप होता म्हणू त्याचा चेहरा नाही पाहू शकले.”

“अग पण त्याचं नाव पत्ता तरी विचारायचा.” – शलाकाचा भाऊ.

“विचारलं होतं. दादा.” शलाका म्हणाली, “पण तो म्हणाला की नाव गाव विचारू नका, अख्खी रात्र तुम्ही माझ्या बरोबर अश्या अंधारात काढली हे लोकांना कळलं तर तुम्हालाच ते पुढे त्रासदायक होईल. मी विचारत नाही तुमचं नाव, तुम्ही पण विचारू नका. आणि उद्या सकाळी जेंव्हा आपण इथून बाहेर पडू तेंव्हा आजची रात्र तुम्ही विसरून जा.”

आता सगळेच विचारात पडले.

“इतका सज्जन माणूस आणि त्याला साधे धन्यवाद सुद्धा म्हणू शकत नाही, हे ओझं आता आयुष्यभर माझ्या मनावर राहील.” बाबाचा गळा भरून आला होता, त्यांना भावना आवरणं कठीण झालं होतं.

“मला जेंव्हा त्या गुंडांनी फरफटत बाहेर काढले, तेंव्हा तो माणूस त्या लोकांवर तुटून पडला. पण ते पांच सहा होते, आणि हा एकटा, त्यांनी त्या माणसाला लोखंडी कांबीने इतकं मारलं की शेवटी तो बेशुद्ध पडला, आणि मगच गुंडांनी माझ्यावर निश्चिंत होऊन अत्याचार केले. मला सहन झालं नाही आणि मी बेशुद्ध पडले. हॉस्पिटल मधे जेंव्हा मी शुद्धीवर आल्यावर, त्याची पोलीसांजवळ चौकशी केली, तेंव्हा ते काहीच सांगू शकले नाहीत. ती परिस्थितीच खूप विचित्र होती. शेकडो लोकं मेले होते आणि इतके जखमी लोकं भरती होते, की काहीच ठाव ठिकाणा लागू शकला नाही.”

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED