माझे नाव आयुश. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी पिझ्झा डिलिव्हरी ची रात्रपाळी करायचो. रात्रपाळी केल्यावर अतिरिक्त भत्ता मिळत असे तसेच ग्राहक थोडी जास्त टीप पण द्यायचे. आणि रात्री १० नंतर च्या डिलिव्हरी साठी डिलिव्हरी साठी कार मिळत असे नाहीतर दिवसाच्या डिलिव्हरी साठी बाईक वापरावी लागायची. या सर्व कारणांमुळे मला रात्रपाळी आवडायची.
आमचे पिझ्झा शॉप शहराच्या बाहेरील भागात असल्याने आम्हाला शहराच्या बाहेरून जवळच्याच गावातून पण ऑर्डर्स येत असत. अशीच ती ऑर्डर त्यादिवशी रात्री ११:३० च्या सुमारास आली होती. दोन पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड आणि काही ड्रिंक्स अशी ती ऑर्डर होती. एका बाईने मधुर आवाजात ती ऑर्डर दिली होती मला आठवतेय कारण त्या बाईचा आवाज खरंच मधुर होता आणि मला तिला बघायला मिळेल या आनंदात मी होतो. मी किचन मध्ये असलेल्या मित्राला ऑर्डर चा तपशील दिला. त्याने १५ मिनटात सर्व गोष्टी तयार केल्या आणि मी त्या घेऊन डिलिव्हरी साठी निघालो.
मी नॅव्हिगेटवर पत्ता टाकला. पत्ता शहराच्या बाहेरचा होता आणि १९ मिनिटे पोचण्यासाठी दाखवत होता. माझाकडे त्यावेळी आणखी एक जवळचीच ऑर्डर होती तो स्टॉप पण मी टाकला आणि आता २५ मिनिटे लागणार होती. लांबची ऑर्डर असल्याने उशीर होणार आणि डिलिव्हरी चे एक्सट्रा चार्जेस लागतील हे मी त्या बाई ला फोनवर सांगितले होते आणि तिने ते मान्य पण केले होते. मी जवळची ऑर्डर डिलिव्हरी करून त्या दुसऱ्या ऑर्डर डिलिव्हरी साठी निघालो. काही मिनिटातच मी मुख्य रस्त्यावरून शहराच्या बाहेर आलो होतो शहराच्या बाहेरचा भाग असल्याने रास्ता सामसूम होता पण मुख्य रास्ता असल्याने रस्त्यावर दिवे होते तरीपण त्या पिवळ्या उजेडातला सामसूम रास्ता थोडा घाबरावणारा वाटत होता. पण मी कार मध्ये असल्याने मला तशी काही जास्त भीती वाटत नव्हती आणि निर्मनुष्य रास्ता असल्याने माझी आवडती जुनी गाणी लावून मी ड्रायविंग एन्जॉय करत होतो.
काही मिनिटातच एक डावं वळण घेऊन नॅव्हिगेटवर दाखवल्याप्रमाणे मला मुख्य रस्ता सोडून एका छोट्या रस्त्यावर जावे लागले. त्या रस्त्यावर दिवे नव्हते आणि आजूबाजूला फक्त अंधार दिसत होता. गाडीच्या हेडलाईट्स मध्ये फक्त समोरचा अरुंद रास्ता आणि आजूबाजूची झाडे दिसत होती. आजून १० मिनिटांचा रास्ता बाकी होता. आता मात्र माझी थोडी टरकली होती. त्या भयावह रस्त्यावर असतानाच मधेच माझ्या गाण्यांच्या लिस्ट मधून "गुमनाम है कोई... " हे गाणं चालू झालं. मला थोडे हसू आले पण भीती पण वाटत होती. मधेच एखाद्या रस्त्याकडेच्या छोट्याश्या दुकानाबाहेरील लाईट वगैरे दिसत होती पण त्यावेळी सर्व काही बंद होते.
मॅप वर दाखवल्या प्रमाणे मी गाडी घेऊन जात दिल्या गेलेल्या पत्त्यावर पोचलो. तो एका २ माळ्याच्या घराचा पत्ता होता. घराबाहेर दिवाबत्ती वगैरे काही नव्हती. घरात पण खालच्या भागात थोडीशी खिडकीतून लाईट दिसत होती. एवढ्या अंधारात मला कारमधून बाहेर पडायला भीती वाटत होती त्यात त्या घराबद्दल काहीतरी गूढ अगम्य अशी भावना माझ्या मनात येत होती. त्या परिसरात ते एकच घर दिसत होते. रस्त्याच्या एका बाजूला झाडे तर घराच्या मागे लांबपर्यंत उघडे मैदान किंवा शेत आहे असे वाटत होते. अंधारात ठीक काही दिसत नव्हते. गाडीचा आवाज ऐकून नाहीतर हेडलाईट चा प्रकाश पाहून कोणीतरी बाहेरची लाईट चालू करेल या आशेने मी गाडीत थोडावेळ बसून राहिलो. पण कोणीच आले नाही. धीर एकवटून मी ती ऑर्डर घेऊन कारमधून बाहेर पडलो. पटकन डिलिव्हरी करून तिथून लवकरात लवकर तिथून निघून जावे या विचाराने मी गाडी चालूच ठेवली. रातकिड्यांचा किर्रर्र असा आवाज येत होता. तो आवाज आणि गाडीचा आवाज तेवढाच काय तो आवाज बाकी शांतता होती. दूरवर एखादा कुत्रा भुंकण्याचा आवाज पण येत होता. घराच्या दाराकडे जाऊन मी दाराची कडी वाजवली कारण घंटी वाजवण्यासाठी बटण कुठे दिसत नव्हते. थोड्यावेळासाठी कोणीच नाही आले. एकदा मनात आले कि तिथून निघून जावे पण मी पुन्हा एकदा ठकठक केले आणि "कोणी आहे का?" असे मोठयाने विचारले. थोड्याच वेळात दार कोणीतरी हळूच उघडले.
खोलीत एकदमच अंधुक प्रकाश होता म्हणून चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. पण ती एक बाई होती एवढे समजले कारण तिने साडी घातली होती आणि डोक्यावरून पदर घेतला होता. ते मला जरा विचित्र वाटले. या वेळी अशी साडी घालुन कोण असते? पण मी माझ्या हातातील ऑर्डर त्यांच्याकडे देऊ केली आणि बिलाची रक्कम सांगितली. त्यावर ती बाई म्हणाली कि "पिझ्झा त्या टेबलावर ठेवा .. मी वर जाऊन पैसे घेऊन येते." तिचा आवाज ऐकून मला समजले कि फोनवर बोलणारी बाई तीच होती. मी पिझ्झा टेबलावर ठेवण्यासाठी आत गेलो आणि ती बाई पैसे आणण्यासाठी हळुवार जिना चढून वर गेली. खोलीत एकच टेबल-लॅम्प चालू होता आणि त्याचा प्रकाश फारच अंधुक होता. सगळंच वातावरण थोडं विचित्र वाटत होत. तिथे एका सोफ्यावर माणूस बसलेला दिसत होता किव्वा तो कदाचित बसून झोपला असावा कारण काळोखात त्याची फक्त आकृती दिसत होती आणि मन एका बाजूला झुकली होती. मी थोडा घाबरलो आणि कोण आहे हे बघण्यासाठी "हॅलो" असे हलक्या आवाजात म्हणालो पण उत्तर आले नाही. मला भीती वाटत होती म्हणून मी मोबाइल चा फ्लॅश-लाईट पेटवली आणि जे काई बघितलं ते बघून तर माझा थरकापच उडाला. तिथे एक सूट घातलेला माणूस बसला होता पण तो कदाचित जिवंत नव्हता. त्याच्या डोके फुटले होते आणि भरपूर रक्त सोफ्यावर वाहून गेलेले दिसत होते. मोबाईल च्या उजेडात मला त्या माणसाच्या पायापाशी पण एक बाई आडवी पडलेली दिसली. आधी ती अंधुक प्रकाश आणि सोफ्याच्या सावलीमुळे अजिबात दिसली नव्हती. मी पाहिलं तर ती बाई पण जिवंत नसल्या सारखी वाटत होती आणि तिच्या तोंडातून रक्त वाहत होते. तिच्या चेहऱ्यावरील व्रणांवरुन तिला कोणीतरी मारहाण केल्यासारखी वाटत होती. आणखी एक गोष्ट मी नमूद केली ती म्हणजे त्या पडलेल्या बाईने पण तशीच साडी घातली होती जशी त्या दरवाजा उघडणाऱ्या बाईने घातली होती. मी घाबरून लाईट जिन्याच्या दिशेने मारली तर ती पदर घेतलेली बाई खाली येताना दिसली. तिच्या तोंडातून सुद्धा रक्त येत होते आणि तिच्या चेहऱ्यावर कोणीतरी मारहाण केल्याचे निशाण दिसत होते. त्या परिस्थितीतही तिच्या तोंडावर एक गूढ स्मित होते आणि ती माझाकडे बघताच खाली येत होती. मी ओळखले कि ती तीच बाई आहे जी खाली मरून पडली आहे. पण हे कसं शक्य आहे? मी फारच घाबरलो होतो. भीतीपोटी मी तिथून निघालो आणि घराबाहेर धावत सुटलो. नशीब मी गाडी चालू ठेवली होती. पटकन गाडीत बसून मागे नं पाहता रस्त्यावर गाडी भरधाव वेगाने घेऊन निघालो.
भरधाव वेगाने मी पिझ्झा शॉप पर्यंत पोचलो आणि आतमध्ये जाऊन दरवाजा लावून घेतला. माझी अवस्था पाहून किचन मधला माझा मित्र बाहेर आला आणि विचारपूस करू लागला. मी घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. ते ऐकून तो पण भयभीत झाला. नंतर आम्ही पिझ्झा शॉप च्या मालकाला फोनवरून घडलेला प्रकार सांगितला. त्याने आम्हाला पोलिसांना सर्व प्रकार सांगायला सांगितला आणि मला घरी जाऊन आराम करायची सूचना केली. त्या रात्रीच्या बाकीच्या सर्व ऑर्डर्स माझ्या दुसऱ्या मित्राने येऊन पूर्ण केल्या.
पोलिसांनी रात्रीच त्या घरी जाऊन त्या घराची पाहणी केली आणि त्या घरात त्यांना नवरा बायकोच्या डेड बॉडीज सापडल्या. असे समजले कि त्या रात्री त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि कोणत्या तरी कारणाने त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि नवऱ्याने बायकोची मारहाण केली. बायकोने रागाच्या भरात नवऱ्याच्या डोक्यात लोखंडी दांड्याने वार केला ज्यात त्याचा मृत्यू झाला आणि नंतर बायकोने उंदराचे विष पिऊन आत्महत्या केली.
शल्य चिकित्सेनुसार दोघांचा मृत्यू रात्री ९ ते १० च्या मध्ये झाला होता. पिझ्झा च्या ऑर्डर चा कॉल रात्री ११:३० च्या सुमारास कसा आला? आणि ती मला भेटलेली बाई त्या मेलेल्या बाईचं भूत होतं का? तिला त्यातून काही सूचित करायचे होते का? कि तिची लग्नाच्या वाढदिवशी पार्टी करायची इच्छा अपूर्ण राहिली ती पूर्ण करत होती का? हे सर्व प्रश्ण अनुत्तरीतच राहिले. झाले ते सगळे खूपच दुःखदायक आणि भयभीत करणारे होते जे मी कधीच विसरू शकत नाही.