Ramayan - Chapter 4 - Part 1 books and stories free download online pdf in Marathi

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 1

किष्किंधाकांड

अध्याय 1

श्रीराम-हनुमंत भेट

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीराम-हनुमंत भेट

आदित्यान्वयसागरे दशरथः स्वातीजलं निर्मलं
कौसल्याजठराख्यशुक्तिपुटके श्रीराममुक्ताफलम् ।
तन्नीलं हृदाये हरेण पदकं सम्यग्धृतं सुज्ज्वलं
सच्छत्रं स्मरणेन शंकरसमं प्राप्तोति भाग्यं जनः ॥१॥
सच्चिदानंदरुपाय जनार्दनस्वरुपिणे ।
स्वप्रकाशाय शुद्धाय आचार्याय नमो नमः ॥२॥
मायातीताय नित्याय मायागुणप्रकाशिने ।
व्यक्ताव्यक्तस्वरुपाय आचार्याय नमो नमः ॥३॥

श्री एकनाथांचे आत्मनिवेदन :

अरण्यकांडा झाले निरुपण । श्रीरामें केलें संपुर्ण ।
आता किष्किंधाकांडकथन । श्रीरघुनंदन स्वयें वदवी ॥१॥
माझ्या अंगीं मुर्खपण । त्या मजकरवीं रामायण ।
श्रीराम वदवी आपण । निग्रहूनि निजबळें ॥२॥
सांडोनि रामकथालेखन । मजकरितां गमनागमन ।
मार्गी श्रीराम रामायाण । स्वयें संपूर्ण प्रकाशी ॥३॥
करूं बैसतां भोजन । ग्रासोग्रासीं स्मरे रघुनंदन ।
मागें घालूनि जेवन । राम रामायण स्वयें वदवी ॥४॥
पाहों जातां निस्वभावीं । श्रीराम रामायण स्वयें वदवी ।
ओंवीचढीत दाउनी ओंवी । कथा वदवी श्रीराम ॥५॥
बोलों जातां फुकट काहणी । तेचि रामकथा होय वाणी ।
वाचा खिळिली रामायणी । वचनावचनीं श्रीराम ॥६॥
निजलों असतां स्वप्नीं पूर्ण । श्रीराम दाखवी रामायण ।
आपुलें गुह्यनिरुपण । सांगे आपण बोलोनी ॥७॥
केले असता सुषुप्तिशयन । श्रीराम थापटी पाठी आपण ।
म्हणें लिहीं वेगीं रामायण । वृथा निजोन लाभ कायी ॥८॥
रामायण लिहावयासाठीं । श्रीरामें पुरविली पाठी  ।
श्रीराम संचरोनि पोटीं । दाटोदाटीं लिहवीत ॥९॥
मी तंव निजनिद्रा डुल्लत । ग्रंथ लिहविता श्रीरघुनाथ ।
माझ्या कवित्वाचा इत्यर्थ । कर्ता समर्थ श्रीराम ॥१०॥
काय नेणों श्रीरघुनाथा । माझी आवडे मर्हाठीं कथा ।
बळात्कारें होया वदविता ।  न करितां राहों नेदी ॥११॥

पुर्वींचे कथानुसंधान, शबरीचा उद्धार करुन श्रीराम-लक्ष्मण किष्किंधेकडे निघाले :

तें पूर्वकथानुसंधान । करूनि शबरीउद्धरण ।
किष्किंधेसी राम लक्ष्मण । दोघे जण चालिले ॥१२॥

तौ तु द्दष्ट्वा महात्मानौ भ्रातरा रामलक्ष्मणौ ।
वरायुधधरौ वीरौ सुग्रीवः शंकितोऽभवत् ॥४॥
उद्विग्नहृदयः सर्वा दिशासमवलोकयन् ।
न व्यतिष्ठत कस्मिंश्चिद्देशे वानरपुंगवः ॥५॥
नैव चक्रे मनः स्थातुं वीक्ष्यमनौ महावलौ ।
कपेः परमभीतस्य चित्तं व्यवससात ह ॥६॥

रामलक्ष्मणांना सशस्र आलेले पाहून, त्याना आपल्याला मारण्यासाठी
वालीनेच पाठविले असावे असा सुग्रीवाचा गैसमज, त्यामुळे घाबरुन तो गुहेत लपतो :

क्रमोनियां दुर्धर वन । वीर धीर ते दोघे जण ।
घेवोनियां धनुष्यबाण । श्रीराम लक्ष्मण पातले ॥१३॥
इंद्रादि देवां हें दुर्गम वन । येथें पायीं आले दोघे जण ।
सुग्रीव म्हणे आपण । योद्धे दारुण हे दोघे॥१४॥
आम्हां कपींतें देखती । मनुष्यें चळाचळां कांपती ।
हे निःशंक आम्हांसन्मुख येती । दुर्धर शक्ती या दोघां ॥१५॥
मज मारावया जाण । वाळीनें आणिले दोघे जाण ।
तापसवेषें दोघे जण । मारेकरी पुर्ण हे माझे ॥१६॥
ऐसें बोलोनि प्रधानांप्रती । सुग्रीव भयभीत चित्तीं ।
येथील सांडावी शीघ्र वस्ती । शीघ्रगतीं पळावें ॥१७॥

ततः सुग्रीवसचिवा द्दष्टवा परमधन्विनौ ।
जग्मुर्गिरितटात्तस्मादन्यच्छिखरमुत्तमम् ॥७॥
ते क्षिप्रमभिगम्याथ यूथपा यूथपर्षभम् ।
हरयो वानरश्रेष्ठं परिवार्योपतस्थिरे ॥८॥
एबमेकायनगताः प्लवमाना गिरेर्गिरिम् ।
प्रकंपयंतो वेगेन गिरीणां शिखराणि च ॥९॥

ऐसें सुग्रीव बोलोन । दृष्टीं देखतां राम लक्ष्मण ।
वेगीं करोनि उड्डाण । पळे आपण गिरिगव्हरी ॥१८॥
सुग्रवासवें चौघे प्रधान । आणिक वानर लहानसान ।
अवघें सवेग पलायमान । वनें उपवनें लंघिती ॥१९॥
एक रिघाले गिरिकंदरीं । एक पळाले पर्वतशिखरीं ।
श्रीराम देखोनि धनुर्धारी । आनाना परी वानरां ॥२०॥
सबळ वानरांच्या उड्डाणीं । वृक्ष पडती उन्मळोनी ।
पर्वतकडे पडती धरणीं । महापळणी वानरां ॥२१॥
सुग्रीव राजा पैं आपण । गुहेंसी रामभयें बैसोन ।
तेथे आले चौघे प्रधान । कोण कोण ते ऐका ॥२२॥
नळ नीळ जांबवंत । चौथा प्रधान हनुमंत ।
जो कां सबळ बळें विख्यात । तो स्वयें पुसत सुग्रीवा ॥२३॥
तूं राजा सबळ सृष्टीं । दोघे मनुष्य दोखोनि दृष्टीं ।
कां पळालासी उठाउठीं । त्या भयाची गोष्टी मज सांगे ॥२४॥
सुग्रीवस म्हणें हें वन दुर्धर । रिघों न शकती सुरासुर ।
येथें पायीं आले दोघे वीर । धनुर्धर महाबळी ॥२५॥
वेढिलें चीरकृष्णाजिनांबर । तापसवेषी अति सुंदर ।
त्यांपासीं कैसे चाप शर । मारेकर वाळीचे ॥२६॥
मज मारावयासाठीं । वाळीनें आणिले हे कपटी ।
तें भय घेवोनियां पोटीं । उठाउठीं पळालों ॥२७॥
त्यांची होतां आठवण । माझे जावों पाहती प्राण ।
तेणें भयें पलायमान । हें सत्य जाण हनुमंता ॥२८॥
आणिक एक हनुमंता जाण । वाळीस असे शापवचन ।
ऋष्यमुकपर्वंतीं करितां गमन । पावसी मरण निश्चयेंसीं ॥२९॥
दोघे वीर देखतां दृष्टीं । धैर्य न धरवे माझ्या पोटीं ।
बळें सांडवली सृष्टी । उठाउठीं पळालों ॥३०॥
म्हणोनि हे साहाकारी । दोघे आणिले धनुर्धारी ।
निर्भय येताती देखोनि उदरीं । भय निर्धारीं वाटत ॥३१॥

हें कारण समजल्यावर हनुमंताला आश्चर्य :

त्यांची होतां आठवण । जाऊं पाहे माझा प्राण ।
तेणें भयें पलायमान । सत्यवचन हनुमंता ॥३२॥
ऐकोनि सुग्रीवाचें वचन । हनुमंत हांसिन्नला आपण ।
मी मंत्री असतां बळवान । भय कोण तुज राया ॥३३॥
जरी तूं मज आज्ञा देसी । तरी मी जाईन त्या दोघांपासीं ।
समूळ आणीन वृत्तांतासी । कोणे कार्यासी येथे आले ॥३४॥

त्यांचे वृत्त आणण्यासाठी हनुमंताला सुग्रीवाची संमती :

ऐसें बोलतां हनुमंत । संतोषला वानरनाथ ।
त्या दोघांचा निजवृत्तांत । मज साद्यंत सांगावा ॥३५॥
दोघे धनुर्वाडे संपूर्ण । तुज मारितील विंधोन बाण ।
आपला वांचवोनिया प्राण । वृत्तांत संपूर्ण आणावा ॥३६॥
ते तूं म्हणसी साधारण । महायोद्धे अति निपुण ।
त्यांची ऐकिली म्यां आंगवण । सावधान अवधारीं ॥३७॥
ताटका सुबाहु मरिले पुर्ण । मरिच मारिला विंधोनि बाण ।
त्रिशिरा आणि खर दूषण । घेतला प्राण विरोधाचा ॥३८॥
तिहीं मिळोनि दोघीं जणीं । कबंध मारिला अर्धक्षणीं ।
मी पळालों त्यांसी देखोनि । दुर्धर दोनी महावीर ॥३९॥

फार सावधपणे राहून माहिती आण, हनुमंताचे प्रयाण :

यालागीं त्यांपासी जातां । सावधान असावे हनुमंता ।
वांचवोनियां निजजीविता । त्यांच्या वृत्तांता आणावें ॥४०॥
आज्ञा देता सुग्रीव वीर । हनुमंत निघाला सत्वर ।
पुढे देखतां श्रीरामचंद्र । झाले विचित्र तें ऐका ॥४१॥
जन्मता अंजनीच्या पोटीं । हनुमंताची सबळ पुष्टी ।
नव्हता श्रीरामासीं भेटी । करील सृष्टीं अनन्य ॥४२॥
हनुमंताची सबळता । देखोनि ब्रह्मया अति चिंता ।
तेणें युक्ती केली स्वतां । तेही व्यवस्था अवधारा ॥४३॥
वानरभ्रमाचियें भ्रातीं । ब्रह्मा लोपी हनुमंतशक्ती ।
भेटतां श्रीरामाची मूर्ती । निजबळप्राप्ती पावेल हा ॥४४॥

आईच्या सांगण्याचे मारूतीला स्मरण :

ऐसें ब्रह्मयाचें वचन । मिथ्या नव्हे अणुप्रमाण ।
देखतांचि श्रीरघुनंदन । बळवाहन हनुमंत ॥४५॥
देखतांचि श्रीराममूर्ती । हनुमान पावला सबळ शक्ती ।
एकला नाटोपे त्रिजगतीं । हे प्रतीति पावला ॥४६॥
करितां सुग्रीवाचा कार्यार्थ । दृष्टी देखतां श्रीरघुनाथ ।
हनुमान पावला पुरुषार्थ । समर्थता निजशक्ती ॥४७॥
स्वामी मानूं सुग्रीव वीर । तंव तो भ्याड पालेखाइर ।
माझा स्वामी कोण साचार । पुसे निर्धार अंजनीसी॥४८॥
तुझे गर्भीची निजलंगोटी । नैष्ठीक ब्रह्मचर्यासी कांसोटी ।
जो देखेल निजदृष्टीं । तो तुज सृष्टीं निजस्वामी ॥४९॥

मातुर्वाक्यं तु विज्ञाय हनुमान्मारुतात्मजः ।
पर्वतान्मलयात्तूर्णं पुप्लुवे यत्र राघवौ ॥१०॥

लक्ष्मणाचे मांडीवर श्रीराम विश्रांती घेत होते त्याच झाडावर मारूती बसला :

ऐकोनि मातेचें वचन । हनुमंतें करोनि उड्डाण ।
शीघ्र आला आपण । राम लक्ष्मण जे ठायीं ॥ ५०॥
दोघे बंधु धनुर्धारी । शीतळ छाया तरुवरीं ।
श्रीराम लक्ष्मणाचें मांडीवरी । निद्रा करी स्वभावें ॥५१॥
त्याचि वृक्षावरी हनुमंत । येवोनि बैसलासे गुप्त ।
दोघांचें पहावया चरिञ । दिसे अतर्क्य तिष्ठत॥५२॥

श्रीरामांचे लक्ष्य झाडावर जाताच वरील वानराला
जन्मजात ब्रह्मचर्य-कौपीन असल्याचे त्यांनी बोलून दाखविले :

श्रीराम  आश्चर्यें सांगे गोष्टी । लक्ष्मणा पाहें ऊर्ध्वदृष्टीं ।
वानरा ब्रह्मचर्यकांसोटी ।सगर्भ पोटीं आभासे ॥५३॥
ऐकोनि श्रीरामवचन । हनुमान जाला हास्यवदन ।
दोघे मानव दुःखी दीन । स्वामी संपूर्ण केंवी मानूं ॥५४॥
सेवक सबळ स्वामी निर्मळ । तें स्वामित्व समुळ विकळ ।
तरी त्यांचे आंगी किती बळ । पाहों परीक्षा अनुमाने ॥५५॥

श्रीराम आपली माहिती थोडक्यात मारुतीला सांगतात :

माझ्या स्वामित्वाचा अर्था । पाहों याचिया पुरुषार्था ।
शालवृक्ष घेवोनि हाता । आला रघुनाथसन्मुख ॥५६॥
देखतां श्रीरामाचे चरण । अजरामर मी आपण ।
आठवलें पूर्वस्मरण । जन्ममरण मज नाहीं ॥५७॥
श्रीराम देखतांचि दृष्टीं । हनुमंतासीं आनंदकोटी ।
पुसावया वृत्तांतगोष्टी । हर्ष पोटीं न समाये ॥५८॥
तुम्ही दोघे कैंचे कोण । येथें यावया काय कारण ।
समूळ न सांगतां जाण । घायें प्राण घेईन ॥५९॥
हनमंतप्रश्नाचा आक्रम । वरीवरी कोप अंतरी प्रेम ।
हें जाणोनि रघुत्तम । निजानुक्रम सांगत ॥६०॥
मी दाशरथी रघुनंदन । धाकटा बंधु हा लक्ष्मण ।
सीता माझी भार्या जाण । वनाभिगमन पितृवाक्यें ॥६१॥

त्यांचे करर्तृत्वाची कसोटी हनुमंत पाहातो :

शून्याश्रमीं पंचवटीं । रावणें हरिली सीता गोरटी।
त्या सीतेच्या शुद्धीसाठीं । उठाउठीं येथ आलों ॥६२॥
ऐसें बोलतां श्रीरघुनाथ । सर्वांगीं उल्लासें हनुमंत ।
दोहींचा कळला वृत्तांत । यांचा पुरुषार्थ पाहों पां ॥६३॥
वीर्य धैर्य शौर्य बळ । कोण वाटीव कैसें शीळ ।
हेंही शोधावया सकळ । कलहो प्रबळ मांडिला ॥६४॥
लक्षोनियां रघुकुळटिकळ । वानरें देवोनियां विकट हांक ।
शालवृक्ष सोडिला देख । अति सन्मुख सक्रोध ॥६५॥

श्रीराम पडल्या पडल्याच शांतपणे मारुतीच्या शस्त्रास्त्राचे निवारण करतात :

तंव लक्ष्मण सवेग उठी । धनुष्यबाण सज्जोनी मुष्टीं ।
वानर देखतां सबळ सृष्टीं । कडकडाटीं लोटला ॥६६॥
शयनींचा नुठेचि रघुनंदन । उठों नेदितांचि लक्ष्मण ।
निजलिया विंधोनि बाण । केला शतचूर्ण शालवृक्ष ॥६७॥
मग हनुमंत कोपेंकरीं । हाणी शतानुशत तरुवरीं ।
निजल्या विंधोनि शरधारीं । क्षणामाझारी छेदिले ॥६८॥
मग क्रोधें चालला पंचपर्वती । एक पुच्छीं दोनी दो हातीं ।
दोनी दोहीं स्कंधांप्रती । बळें मारुती हाणित ॥६९॥
बाप धनुर्वाडा रघुनंदन । निद्रा न सांडी विंधिता बाण ।
पांचही पर्वत केले चूर्ण । बळिया संपूर्ण श्रीराम ॥७०॥
श्रीराम मारील बाणेंसी । हा धाक नाहीं हनुमंतासी ।
हनुमंत मारील आम्हींसी । हेंही श्रीरामासी भय नाहीं ॥७१॥
छेदोनि पांचही गिरिवरां । बाणपिसार्याचा सुटला वारा ।
हनुमंत उडविला अंबरा। गरगरां परिभ्रमें ॥७२॥

मारुतीची धावपळ व वायूचा उपदेश :

वाहाटुळी माजी भ्रमे तृण । तैसा परिभ्रमें हनुमान जाण ।
कांहीं न चले आंगवण । जाल्या क्षीण सर्व सक्ती ॥७३॥
वेंगडे वळले पाय हात । पुच्छ घातले पायांआत ।
वानरें विचकिले दांत । तंव पिता वायु तेथ पावला ॥७४॥
म्हणे सावधान पाहें हनुमंता । तुझिया संग्रामआघाता ।
निद्रा न मोडोनी श्रीरघुनाथा। वृक्षपर्वतां छेदिलें ॥७५॥
त्रैलोक्यराजा श्रीरघुनाथ । याचा नको पाहों पुरुषार्थ ।
त्रैलोक्याचा करुं शके घात । निमेषार्धांत क्षोभोनी ॥७६॥
त्यासी तुवां सर्वस्वें आपण । अनन्यभावों रिघावें शरण।
श्रीरामसेवेसीं विकावा प्राण। स्वामी संपूर्ण श्रीराम ॥७७॥

श्रीरामास मारुतीचा साष्टांग प्रणिपात :

ऐकोनि पित्या वायुचें वचन । हनुमंत घाली लोटांगण ।
श्रीरामासी अनन्य शरण । दास संपूर्ण मी तुझा ॥७८॥
अंतर्यामीं रघुनाथा । जाणसी माझे मनोगता ।
तुझें स्वामित्व पहावया तत्त्वतां । केला अनुचित संग्राम ॥७९॥
ऐसी माझी अपराधता । क्षमा करावी श्रीरघुनाथा ।
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । शरणागता नुपेक्षीं ॥८०॥

लक्ष्मणाचा संशय :

सौमित्र म्हणे रघुनाथा । वीर धीर झुंजार पुरता ।
सवेंचि चरणीं ठेवितो माथा । नये सर्वथा विश्वासें ॥८१॥
रावणें दावोनि विश्वासासी । जैसें छेदिलें जटायूसीं।
तैसेंचि हा करील आम्हांसी । नये वानरासीं विश्वासों ॥८२॥
निधडा प्रतापी तूं रघुवीरा। छेदिले पंच पर्वत तरुवरां ।
एर्हवीं हा आमुचा करिता चुरा । नये वानरा विश्वासों॥८३॥

श्रीरामांचे लक्ष्मणास आश्वासन व मारुतीचे एक पिंडत्वाचे वृत्तकथन :

श्रीराम म्हणे सौमित्रासी । तूं तंव यासी नोळखिसी ।
एकपिंडत्व यासी आम्हांसी । हा अति विश्वासी निजसखा ॥८४॥
एकपिंडत्व हनुमंता । तेचि विषयीं पूर्वकथा ।
तुज सांगेन मी आतां । सावधानता अवधारी ॥८५॥
मज चित्रकूटीं असतां । तुज भरतासीं युद्ध करितां ।
म्यां सांगितली होती कथा । ऐक मागुती सांगेन ॥८६॥
पुत्रेष्टीयागीं यज्ञपुरुषीं । प्रसादताट दिधलें रायासी ।
त्रिविध भाग करितां त्यासी । तिघी राणियांसी दीधले ॥८७॥
पूर्वशापाचे उद्धरीं । कैकेयीचा भाग नेला घारीं ।
तेणें ते तळमळी भारी । उरले उरी दोन भाग ॥८८॥
कौसल्या येवोनि कैकयीपासीं । सुमित्राही निजकृपेसीं ।
अर्ध विभाग दिधला तिसी । तेणें तियेसी सुख झालें ॥८९॥
ते हे आम्ही चौघे जण । एकपिंडी पैं संपूर्ण ।
श्रीराम भरत लक्ष्मण । आणि शत्रुघ्न समवेत ॥९०॥
कैकेयीभाग घारी प्राशित । तीस अंजनीजन्म प्राप्त ।
यज्ञविभाग तिच्या उदरांत । राहिला निश्चित यज्ञपुरुष ॥९१॥
यज्ञपुरुषाचा निजप्राण । तिशीं विचरला संपूर्ण ।
तेंचि तिसी गर्भधारण। वायुनंदन हनुमंत ॥९२॥
विचारितां पैं तरीं। अंजनीभ्रतार केसरी ।
यज्ञपुरुषप्राणेंकरीं । जन्म धरी हनुमंत ॥९३॥
राम लक्ष्मण शत्रुघ्न भरत । अर्धार्धपिंड आम्हा समस्त ।
सगळ्या पिंडाचा हनुमंत। बळें समर्थ आतुर्बळी ॥९४॥
आम्हांसी आणि हनुमंता । समूळ मूळीं एकात्मता ।
नाहीं भिन्नत्वाची कथा । जाण तत्वतां सौमित्रा ॥९५॥

हनुमंताला आनंद व सर्वांचे ऐक्य :

ऐकताचिं श्रीरामवचन । हनुमंतासी आल्हाद पूर्ण ।
स्वेद रोमांचे आलें रुदन । श्रीरामचरण वंदिलें ॥९६॥
तुटली भिन्नत्वाची गोष्टी । सुटलें मौन पडली मिठी ।
ऐक्याची पडली गांठी । घडली दाटी क्षेमाची ॥९७॥
गंगा यमुना सरस्वती । तिन्ही मिळोनि एक भागीरथी ।
श्रीराम लक्ष्मण आणि मारुती । ऐक्यानुवृत्ती चिन्मात्रें ॥९८॥
नाना सरितांचे संभार । मिळणी मिळतां होती समुद्र ।
तेंवी मारुती आणि सौमित्र । जाले चिन्मात्र श्रीरामें ॥९९॥
एका विनवी जनार्दन । तिघां जालें समाधान ।
स्वामी समर्थ श्रीरघुनंदन ।  दोघे जण सेवक ॥१००॥
गूळ गोडी नांवाची भिन्नता । पाहतां स्वरुप एक एकात्माता ।
तेंवी लक्ष्मणा हनुमंता । सेवकता श्रीरामीं ॥१०१॥
पिंडभागव्यवस्था । हे शिवरामायणींची कथा ।
वृथानुवाद न म्हणिजे श्रोतां । पहावें त्या ग्रंथा विचारुनी ॥१०२॥
ऐकोनि खुणाविलें श्रोतां । वदीनी श्रीराम वदवी कथा ।
झाडा चुकूं नको आतां । पुढील कथानुवादें ॥१०३॥
आधींच रम्य रामायण कथा । त्याहीवरी तूं रसाळ वक्ता ।
भाग्य आलें श्रवणाच्या पंथा । कथा ऐकतां स्वानंद ॥१०४॥
शतकोटी रामायण । त्या ग्रंथाचें जालें खंडन ।
त्याचीं जालीं दहा रामायणें । युगभेंद जाण ग्रंथाचें ॥१०५॥
एकाजनार्दन शरण । जालें हनुमंतदर्शन ।
विरोधबोधें समाधान । सुख संपूर्ण तिघांसी ॥१०६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधकांडे एकाकारटीकायां
हनुमद्दर्शनं नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
॥ ओव्यां १०६ ॥ श्लोक १० ॥ एवं संख्या ११६ ॥

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED