अध्याय 26
हनुमंतप्रतापवर्णन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
ब्रह्मदेवलिखित हनुमंताचा लंकेतील पराक्रम
स्वमुखें निजकीर्ती । सर्वथा न सांगे मारूती ।
हें जाणोनि श्रीरघुपती । स्वयें प्रश्नोक्तीं चालवित ॥ १ ॥
आदरें पुसें श्रीरामचंद्र । हनुमंता तूं वनचर ।
कैसेनि तरलासी सागर । सत्य साचार मज सांगें ॥ २ ॥
ऐकोनि श्रीरामांचे वचन । हनुमान घाली लोटांगण ।
श्रीरामप्रतापमहिमान । सनुद्रतरण वानरा ॥ ३ ॥
श्रीरामनामाच्या उच्चारें । जड मूढ तरती भवसागर ।
राममुद्रांकित वानर । तेणें परपार पावलों ॥ ४ ॥
रामनामाचा कडकडाट । भवसमुद्रीं पायवाट ।
पायरी करोनि वैकुंठ । होती प्रविष्ठ परब्रह्मीं ॥ ५ ॥
जे रामनामांकित नर । त्यांतें बुडवूं न शके सागर ।
श्रीराममुद्रांकित वानर । परपार पावलों ॥ ६ ॥
श्रीरामें मुद्रा दिधली हातीं । तेव्हांचि मजला विजयवृत्ती ।
श्रीराममुद्रेची ख्याती । श्रुति बोलती पुराणें ॥ ७ ॥
श्रीराममुद्रा समुद्रतरण । श्रीराममुद्रा सीतादर्शन ।
श्रीराममुद्रा रणकंदन । लंकादहन श्रीराममुद्रा ॥ ८ ॥
श्रीराममुद्रा विजयप्राप्ती । लंकाभुवनीं केली ख्याती ।
आडनांव मी मारूती । अगाध करणी मुद्रेची ॥ ९ ॥
नित्य श्रीरामनाम स्मरण । तेथें वीर्य धैर्य कीर्ति कल्याण ।
ब्रह्म पावती सनातन । तें महिमान स्मरणाचें ॥ १० ॥
जेथें नाहीं श्रीरामस्मरण । अकीर्ति अपयश अकल्याण ।
नित्य निंद्ध्यत्व पापी पूर्ण । अधःपतन महानरकीं ॥ ११ ॥
यालागीं साक्षेपें आपण । समूळ सांडावें विस्मरण ।
नित्य करितां श्रीरामस्मरण । कीर्ति कल्याण निजविजयी ॥ १२ ॥
श्रीराममुद्रानिजप्राप्ती । म्हणती हनुमंताची ख्याती ।
जें जें केलें लंकेप्रती । तें तें कीर्ति मुद्रेची ॥ १३ ॥
हनुमंताची निजस्थिती । स्वमुखें न सांगे निजकीर्ति ।
करोनि मुद्रिकेची स्तुती । सांगितली ख्याती श्रीरामा ॥ १४ ॥
हनुमंताचें मनोगत । अंतर्यामीं जाणे रघुनाथ ।
ह्रदयीं धरिला आनंदयुक्त । स्वामी सद्भक्त आल्हादी ॥ १५ ॥
हनुमंताची युद्धख्याती । ऐकावया वानरें तळमळती ।
हें जाणोनि श्रीरघुपती । पुसे पुढती हनुमंता ॥ १६ ॥
श्रीराम म्हणे गा मारूती । समुद्रलंघन लंकाख्याती ।
तुवां सांगितली कथा निगुती । संकळितीं अति गौण ॥ १७ ॥
सीता ऐकोनि अक्षता । संतोष जाला श्रीरघुनाथा ।
राक्षसांसीं युद्धकंदनार्था । घडला किमर्थ तें सांगें ॥ १८ ॥
तेचि आतां विशदस्थिती । तुवां सांगावी लंकाख्याती ।
ऐसें बोलतां श्रीरघुपती । वंदी मारूती श्रीचरण ॥ १९ ॥
स्वमुखें सांगो नयें स्वकीर्ती । वचूं नये स्वामीप्रती ।
हनुमंतें येचि अर्थी । प्रजापति प्रार्थिला ॥ २० ॥
माझें समुद्रलंघन । लंकेमाजी सीताशोधन ।
स्वामीनें कृपा करोन । पत्र लिहून मज द्यावें ॥ २१ ॥
तुझें हातींचें ब्रह्मलिखित । देखोनि सीता शुद्ध्यर्थ ।
सत्य मानील श्रीरघुनाथ । शीघ्र कार्यार्थ साधेल ॥ २२ ॥
ऐकोनि कपीचें वचन । संतोषला चतुरानन ।
हनुमंताचें कीर्तिकथन । दिधलें लिहून साद्यंत ॥ २३ ॥
संतोषोनी प्रजापती । पत्र देवोनि हनुमंताहातीं ।
आलिंगिला अति प्रीतीं । विजयो सर्वार्थीं पावसी ॥ २४ ॥
तें पत्र घेवोनि हनुमंत । स्वयें श्रीरामा विनवित ।
हें ब्रह्मयाचें लिखित । वाचूनि कार्यार्थ जाणावा ॥ २५ ॥
पत्र घेवोनि श्रीरघुपती । वंदोनियां अति प्रती ।
दिधलें लक्ष्मणाचें हातीं । वाचावया श्रीरामें ॥ २६ ॥
पत्र लिहिता प्रजापति । श्रोता सादर श्रीरघुपती ।
वाचिता सौमित्र शेषमूर्ती । पत्रप्रयुक्तीं अवधारा ॥ २७ ॥
ऐकावया हनुमंताची ख्याती । सुग्रीवादि जुत्पती ।
सादरें बैसल्या वानरपंक्ती । हनुमत्कीर्तिचातक ॥ २८ ॥
ॐ नमो जी श्रीरामचंद्रा । क्षराक्षरातीत परा ।
त्रिगुणातीत चिदचिन्मात्रा । परात्परा परब्रह्मा ॥ २९ ॥
जेथें नाहीं मीतूंपण । ब्रह्मीं नाठवे ब्रह्मस्फुरण ।
तो तूं श्रीराम सगुण । पूर्णत्व पूर्ण परब्रह्मा ॥ ३० ॥
ब्रह्मया तुझेनि ब्रह्मत्व । धर्मा तुझेनि धर्मत्व ।
कर्मा तुझेनि कर्मत्व । तूं स्वयमेव चिन्मात्र ॥ ३१ ॥
तुज निर्विकार श्रुति म्हणती । तो तूं भाससी विश्वमूर्ती ।
विश्व तूं मानितां निश्चितीं । तंव ते श्रीपति तुझी माया ॥ ३२ ॥
तूं साकार ना निराकार । तूं विश्वनाथ विश्वंभर ।
तुझ्या स्वरूपाचा निर्धार । न कळे साचार श्रुतिशास्त्रां ॥ ३३ ॥
श्रुति म्हणती नेति नेति । शास्त्रें थोटावली चित्तीं ।
चारी वाचा मौनावती । तो तूं रघुपति परमात्मा ॥ ३४ ॥
आतां जैसा आहेसी तैसिया । नमो तुज श्रीरामराया ।
तुझिया कृपें श्रीरघुवर्या । स्तुति वदावया सामर्थ्य ॥ ३५ ॥
तो तूं अपरंपार अनंत । अवतारा अवतारी तूं रघुनाथ ।
तुझा सेवक हनुमंत । त्याच अद्भुत पवाडा ॥ ३६ ॥
लंघोनियां अपांपती । येवोनियां लंकेप्रती ।
हनुमंते केली जे जे ख्याती । तें तूं रघुपति अवधारीं ॥ ३७ ॥
तूं अवतार श्रीरामचंद्र । तुझें अगम्यचरित्र ।
तुझा रंक पालेखाईर । हनुमान वानर अगम्य ॥ ३८ ॥
अगम्य हनुमंताची गती । अगम्य हनुमंताची ख्याती ।
अगम्य हनुमंताची कीर्ती । ऐकें रघुपती पुरूषार्थ ॥ ३९ ॥
समुद्र लंघोनि हनुमान बळी । महेंद्रगिरि चेपिला तळीं ।
सर्प दडपले पाताळीं । तोंडें तेकाळीं वासिलीं ॥ ४० ॥
अंगवाताचेनि झडाडें । समुद्रीं खचले पर्वतकडे ।
शिखरें उडालीं पैं पुढें । जेंवी घुंगुरडे आकाशीं ॥ ४१ ॥
उड्डानवाताचेनि घर्घरें । बैसली मेघांची दांतारे ।
दिग्गज कांपती थरारें । आले शहारे कळीकाळा ॥ ४२ ॥
उड्डान काळींचा कल्लोळ । उंचबळलें समुद्रजळ ।
सत्यलोकीं पर्जन्यकाळ । ध्रुवमंडळ तिमिन्नलें ॥ ४३ ॥
उड्डाणकाळ दुर्धर मोठा । उमा झोंबली नीळकंठा ।
रमा थापटी वैकुंठा । भयें संकटीं संरक्षीं ॥ ४४ ॥
उड्डाणकाळीं कपि दुर्धर । सुर धाकती खेचर ।
सिद्ध गंधर्व विद्याधर । नर किन्नर कांपती ॥ ४५ ॥
जैसा श्रीरामाचा बाण । तैसें सवेग उड्डाण ।
कपीस आलें पैं स्फुरण । दुर्धर कोण आंवरी ॥ ४६ ॥
सुरसा – हनुमंत संघर्ष व हनुमंताच्या हुशारीने त्याची मुक्तता
पहावया हनुमंताची शक्ती । मिळोनियां देव समस्तीं ।
सुरसा धाडिली छळणोक्ती । मार्गरोधार्थी हनुमंता ॥ ४७ ॥
दनु जे कां दानवजननी । सुरसा नामें कश्यपपत्नी ।
विक्राळ मुख योजनमानीं । कपीलागोनी गिळावया ॥ ४८ ॥
हनुमान जाला वीस योजन । सुरसा तीस योजन ।
हनुमान वाढला शत योजन । तत्समान मुख पसरी ॥ ४९ ॥
हनुमान अणुमात्र होउनी । प्रवेशला तिचे वदनीं ।
न मारोनियां कश्यपपत्नी । गेला निघोनि कर्णद्वारे ॥ ५० ॥
सुरसा आवळी चाटित । देव दानव शिव विस्मित ।
हनुमान गेला हातोहात । बळान्वित श्रीरामें ॥ ५१ ॥
सुरसा कश्यपाची पत्नी । पित्या वायूची सापत्नजननी ।
कपि न मारीच विवेकसज्ञानी । गेला निघोनी रामनामें ॥ ५२ ॥
हनुमान गेला न मारून । सुरसा तेणें संतोषोन ।
कपीस दिधलें आशीर्वचन । विजयी पूर्ण तिहीं लोकीं ॥ ५३ ॥
मैनाक पर्वताला अंगुलीने स्पर्श केला
विसांवा घ्यावया मारूती । जल स्थळ पाहे संभोवतीं ।
तो मैनाक वाढला ऊर्ध्वगती । द्यावया विश्रांती हनुमंता ॥ ५४ ॥
कपि गिरिवरा नातळत । ऊर्ध्वगती निघे हनुमंत ।
मार्गरोधें वाढे पर्वत । योजनशत अति दीर्घ ॥ ५५ ॥
पर्वत देखोनि योजनें शत । हनुमान वाढला पंचशत ।
गिरी थोरावला सप्तशत । सहस्त्रशत कपि जाला ॥ ५६ ॥
हनुमान जाता उल्लंघून । पर्वतासी आलें रूदन ।
हरिभक्ताचे पादस्पर्शन । अभाग्य पूर्ण मी न पवेंचि ॥ ५७ ॥
पर्वताची सप्रेम बोली । तंव हनुमंतासीं कृपा आली ।
मस्तकीं ठेवितां आंगोळीं । गिरि पाताळीं बैसला ॥ ५८ ॥
आंगोळीसाठीं गेला पाताळीं । कपि बैसतां रांगोळी ।
सुरासुरी पिटिली टाळी । आतुर्बळी हनुमंत ॥ ५९ ॥
सिंहिका -विदारण व पडलंकेचा पाडाव व विध्वंस
सिंहिका राक्षसी रूदण । छायाग्रहणें ग्रासी पूर्ण ।
तिचें करोनि विदारण । केलें उड्डाण हनुमंतें ॥ ६० ॥
जीवें मारोनि सिंहिका । उड्डाण करितां अति तवका ।
मागें सांडोनियां लंका । पडलंका पावला ॥ ६१ ॥
तेथें क्रौंचा निशाचरी । हनुमान तीस जीवें मारी ।
चौदा सहस्त्र निशाचरी । घातल्या सागरीं पुच्छाग्रें ॥ ६२ ॥
लंकेतील दिवे विझवून, सर्वत्र हाहाकार
तेथोनि आला लंकेआंत । सीताशुद्धीच्या कार्यार्थ ।
घरें शोधिलीं समस्त । साक्षेपयुक्त वानरे ॥ ६३ ॥
साधावया सीताशुद्ध्यर्थ । कलहो लाविला नगरांत ।
सभा नागविली समस्त । हळहळिती नागवे ॥ ६४ ॥
अनेक दीपिका लक्षांतरीं । वानरें विझविल्या पुच्छेंकरीं ।
रावणा टोले दिधले शिरीं । सभा अंधारीं नागविलीं ॥ ६५ ॥
इंद्रजित, कुंभकर्ण, बिभीषणादिंची घरें शोधिली
प्रधानवर्ग थोरथोरी । घेतली घरोघर धांडोळी वानरीं ।
इंद्रजिताचे निजमंदिरीं । जाली परी ते ऐका ॥ ६६ ॥
देखोनि सुलोचना नारी । हेचि होय म्हणे सीता सुंदरी ।
अनुसरली रावणपुत्रीं । दोघांतें मारीन मी आंता ॥ ६७ ॥
तंव सुलोचना वदे कथा । रावणें चोरोनि आणिली सीता ।
तीस सोडवावें इंद्रजितां । येरी कुळघाता करील ॥ ६८ ॥
इंद्रजित म्हणे ऐक आतां । सोडीं म्हणों जातां सीता ।
रावण करूं धांवे घाता । सुह्रदता सांडोनी ॥ ६९ ॥
रावणा सीतासन्निपात । बुद्धि सांगतां करील घात ।
आपण न वदावी हे मात । कुळक्षयार्थ ते सीता ॥ ७० ॥
ऐसें इंद्रजित सांगतां । सुलोचना हे नव्हे सीता ।
खूण पावली हनुमंता । होय निघता तेथूनी ॥ ७१ ॥
वेगीं उडोनि मारूती । गेला कुंभकर्णगृहाप्रती ।
घोर गर्जें त्रिजगती । श्वासावर्तीं गज म्हैसें ॥ ७२ ॥
नासिकेच्या केशांतरीं । ओरडती गुंतलीं कर्हीं ।
मातले हस्ती घेती झुंजारी । घशामाझारी जाती सिंह ॥ ७३ ॥
प्रबळ देखोनि कुंभकर्णार्थ । हनुमान म्हणे जीवाआंत ।
याचा पहावया पुरूषार्थ । प्रथम युद्धार्थ मी करीन ॥ ७४ ॥
नाहीं दांतवण पाणी । वेखंडल्या दंतश्रेणीं ।
मुखीं उठिली पोहाणी घाणी । कंटाळोनी कपि गेला ॥ ७५ ॥
बिभीषणाचे मंदिरीं । शोधूं जातां सीता सुंदरीं ।
कीर्तनाचे निजगजरीं । सुख वानरीं उलथलें ॥ ७६ ॥
ताल छंद गीत नृत्य । ऐकतां श्रीरामचरित्र ।
हनुमान स्वानंदे डुल्लत । रंगी नाचत गुप्तत्वें ॥ ७७ ॥
लंका घेतलिया रघुपति । बिभीषणा लंकाधिपती ।
करणें निश्चयो हा हनुमंतीं । निश्चितार्थीं निश्चयो ॥ ७८ ॥
परम पावोनि विश्रांती । रावणगृहीं सीताशुद्ध्यर्थीं ।
शोधावयालागीं मारूती । शीघ्रगती निघाला ॥ ७९ ॥
रावणशयनभवनातील वृत्तांत, रावण व मंदोदरी यांच्यात झालेला संवाद
रावणाचे भवनोभवनीं । कपीनें पाहिलें शोधोनी ।
लंकेशाचे निद्रास्थानीं । सीताशोधनीं करूं आला ॥ ८० ॥
रावणासहित सेजेवरी । हनुमान देखे मंदोदरी ।
हेचि मानोनि सीता सुंदरी । अभ्यंतरी क्षोभला ॥ ८१ ॥
मी काय करूं नाट आतां । रडत सांगों श्रीरघुनाथा ।
रावणा अनुसरली सीता । दोघांच्या घाता मी करीन ॥ ८२ ॥
करकरां दांत खात दाढा । वळिला पुच्छाचा आंकोडा ।
दोहींचा करावया नितोडा । हनुमान गाढा क्षोभला ॥ ८३ ॥
दाही शिरें रावणातें । सीतेंचें अकरावें तेथें ।
हें खुडूनियां वामहस्तें । नेईन भेटीतें श्रीरामा ॥ ८४ ॥
नातरी बांधोनि पुच्छासी । दोन्ही नेईन श्रीरामापासीं ।
श्रीराम दंडील दोघांसी । अधर्मासी देखोनी ॥ ८५ ॥
ऐसें चिंतितां हनुमंता । मंदोदरी लंकानाथा ।
स्वयें सांगे स्वप्नावस्था । दुःखावार्ता अति दुःख ॥ ८६ ॥
आतांचि देखिलें म्या स्वप्नीं । सीता ठेविली अशोकवनीं ।
तिचे कैवारालागोनी । आला क्षोभोनि महारूद्र ॥ ८७ ॥
क्रौंचा प्रियभगिनी तुम्हांसीं । ते मारोनि पडलंकेसी ।
सवेंचि आला तो लंकेसीं । सीताशुद्धीसी साधावया ॥ ८८ ॥
माझें तुम्हांसी विज्ञापन । समूळ ऐका माझें स्वप्न ।
सीतारक्षणीं अशोकवन । दूर धांवोन तेथें गेला ॥ ८९ ॥
घेवोनि सीतेसीं तेणें भेटी । अशोकवनाची उत्पाटी ।
स्वप्न देखिले म्यां दृष्टी । राक्षस कोटी मारिले ॥ ९० ॥
चवदा सहस्त्र वनकर । ऐशीं सहस्त्र किंकर ।
जंबुमाळी प्रधानपुत्र । अखयाकुमर मारिला ॥ ९१ ॥
अखया आपटिला शिळीं । त्याचा कैवारी सवंदळी ।
इंद्रजित गांजोनि महाबळी । लंकाहोळी तेणें केली ॥ ९२ ॥
ऐसें देखोनि कंदन । जागी जालें गजबजोन ।
शिवस्मरणें शुद्धाचमन । केलें शयन वामभागीं ॥ ९३ ॥
तंव देखिलें दुर्धर स्वप्न । शिळीं सागर बुजोन ।
लंके आलें वानरसैन्य । राक्षसदळण करीतचि ॥ ९४ ॥
रामें मारिला कुंभकर्ण । लक्ष्मणें वधिला इंद्रजित आपण ।
तुम्हांवरी ओखटें स्वप्न । म्या संपूर्ण देखिलें ॥ ९५ ॥
दाही शिरें भूमीवरी । लोळती श्रीरामबाणधारीं ।
सांगतां भुलली मंदोदरी । शंख करी पतिशोकें ॥ ९६ ॥
रावणासंमुख बैसोन । म्हणे चुडियांसी पडिले खान ।
पुढती करितां शंखस्फुरण । धरी रावण धावोनी ॥ ९७ ॥
रावण म्हणे मज जितां । तूं कां खेद करसि वृथा ।
शिर न देखें तुमचें माथां । मिथ्या वार्ता जिण्याची ॥ ९८ ॥
रावणें पोटासीं धरोन । प्रियेसी करी समाधान ।
येरी म्हणे मिथ्या नव्हे स्वप्न । आलें विघ्न अनिवार ॥ ९९ ॥
चरणीं ठेवोनियां माथा । मंदोदरी म्हणे लंकानाथा ।
अशोकवनीं ठेवितां सीता । कुळाचे घाता ते करी ॥ १०० ॥
स्वयें अर्पोनियां सीता । शरण रिघावें श्रीरघुनाथा ।
निवारे जन्ममरणकथा । अक्षयता सुखरूप ॥ १०१ ॥
श्रीरामा जालिया अनन्यशरण । कदा बाधेन जन्ममरण ।
रावणा पावसी कृतकल्याण । सत्य भाषण हें माझें ॥ १०२ ॥
माझें न करसील वचन । तैं इंद्रजित कुंभकर्ण ।
पाचारोनि दोघे जण । रामार्पण करीन सीता ॥ १०३ ॥
रावणा हितकुळार्था । रामार्पण करीं सीता ।
ऐसें रावणें ऐकतां । उद्वेगता पावला ॥ १०४ ॥
मंदोदरीचें वचन । सर्वस्वें मानी कुंभकर्ण ।
इंद्रजित वचनाधीन । रामार्पण करितील सीता ॥ १०५ ॥
रावण सांगे मंदोदरीसी । निवारावया स्वप्नविघ्नासीं ।
आधीं पूजूं सदाशिवासी । उपचारांसी तूं आणीं ॥ १०६ ॥
कार्यी गोवोनि निजांगना । विश्वासी राक्षसी दुर्मना ।
रावण धाडी अशोकवना । सीतेच्या यत्ना करावया ॥ १०७ ॥
इंद्रजित अथवा कुंभकर्ण । मंदोदरी का बिभीषण ।
यांचेनि बोले सीता आपण । सर्वथा जाण न सोडावी ॥ १०८ ॥
अशोकवना निघे राक्षसी । हनुमान लागला तिचें मागेंसीं ।
श्रीरामें कृपा केली कैसी । सीता अनन्यासीं भेटेल ॥ १०९ ॥
सीता देखिलिया दृष्टीं । हनुमान घेवों न शके भेटी ।
राक्षसी रक्षण कोट्यनुकोटी । वृक्षसंपुटी राहे गुप्त ॥ ११० ॥
एकांती भेटावया सीतेंसी । हनुमान गुप्त वृक्षवासी ।
तेथें सीतेची स्थिति कैसी । वृक्षवल्लींसीं रामस्मरण ॥ १११ ॥
अशोकवनींचे पाषाण । गुल्मलता पक्षी तृण ।
अवघीं करिती श्रीरामस्मरण । प्रभाव पूर्ण सीतेचा ॥ ११२ ॥
जागृतीं स्वप्नीं तुर्यासुषुप्तीं । हनुमान शोधितां सीता सती ।
मीतूंपणाही परती । सहजस्थिती शोधित ॥ ११३ ॥
वृत्तांत ऐकून श्रीरामांना आनंद :
परिसोनि सीतास्वरूपस्थिती । ऐकोनि हनुमंतशोधकशक्ती ।
सुखावोनि श्रीरघुपती । नयना स्त्रवती स्वानंदबिंदु ॥ ११४ ॥
नव्हेती नयनां अश्रुजीवन । पूर्णानंदे अभिषिंचन ।
हनुमंतासी रघुनंदन । संतोषोनि करितसे ॥ ११५ ॥
धन्य सीतेचें मनोगत । नित्य श्रीरामीं अनुरक्त ।
धन्य हनुमंताचे जीवित । सेवानुरक्त श्रीरामीं ॥ ११६ ॥
धन्य ब्रह्मयाचें लिक्जित । अर्थी ओसंडे परमार्थ ।
श्रवणमात्रें श्रीरघुनाथ । स्वयें डुल्लत स्वानंदें ॥ ११७ ॥
परिसोनि सीतास्वरूपस्थिती । ऐकतां हनुमंताची ख्याती ।
संतोषोनि श्रीरघुपती । हर्षे मारूती आलिंगी ॥ ११८ ॥
दोघां पडिलें आलिंगन । खुंटला बोल तुटलें मौन ।
एकाजनार्दना शरण । रामायण रम्य रामें ॥ ११९ ॥
श्रीरामा विश्रांति हनुमंतीं । हनुमंता श्रीरामीं विश्रांती ।
एकीं पडाती अनन्य प्रीतीं । अगम्यस्थिती श्रुतिशास्त्रां ॥ १२० ॥
भक्तभावार्थाचें प्रेम । स्वयें जाणें पै श्रीराम ।
भजनव्युत्पत्तीचें वर्म । प्लवंगम स्वयें जाणे ॥ १२१ ॥
करितां बहुसाल व्युत्पत्तीं । भक्तभावार्थ प्रेमप्रीती ।
सहसा नये अभिव्यक्ती । कथासंगती अवधारा ॥ १२२ ॥
एकाजनार्दना शरण । हनुमान पावला अशोकवन ।
पुढील ब्रह्मपत्रलेखन । आवधान अवधारा ॥ १२३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
ब्रह्मपत्रहनुमंत्प्रतापवर्णनं नाम षड्विंशतितमोऽध्यायः ॥ २६ ॥
॥ ओव्यां १२३ ॥ श्लोक ३ ॥ एवं संख्या १२६ ॥