रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 25 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 25

अध्याय 25

कुंभकर्णाचा युद्धाला प्रारंभ

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावण मंदोदरीला गुप्तरहस्य सांगून परत पाठवितो :

पूर्वप्रसंगामाझारीं । सभेसीं आली मंदोदरी ।
तिसी एकांत गुह्योत्तरीं । धाडी अंतःपुरीं रावण ॥ १ ॥

अंतःपुराय गच्छ त्वं सुखिनी भव सस्नुषा ।
एवमुक्त्वा परित्यज्य भार्यां प्रीतमना इव ॥१॥
रावणस्तु ततो वाक्यं राक्षसानिदमब्रवीत ।
कल्प्यतां मे रतः शीघ्रं क्षिप्रमानीयतां धनुः ॥२॥
अथादाय शितं शूलं शत्रुशोणितरंजितम् ।
कुंभकर्णो महातेजा रावणं वाक्यमब्रवीत् ॥३॥
अहमेको गमिष्यामि रणं रणविशारद ॥४॥

मंदोदरीचे निर्गमन :

रावणें मंदोदरीप्रती । सांगोनि एकांत गुह्योक्ती ।
समाधानसुखनुवृत्तीं । अंतःपुराप्रती पाठवी ॥ २ ॥
सपुत्रस्नुषेंसीं आपण । सांडोनि चिंता अनुद्विग्न ।
सुखी राहावेंस समाधान । सुप्रसन्न सुखरुप ॥ ३ ॥
ऐकोन रावणाचें वचन । मंदोदरी सुखसंपन्न ।
करोनियां साष्टांग नमन । आली आपण निजधामा ॥ ४ ॥

रावण युद्धासाठी सैन्य व रथ आणवितो :

येरीकडे दशानन । पाचारोनि सैन्य प्रधान ।
रथ आणवी गर्जोन । रणकंदन करुं आजीं ॥ ५ ॥
ऐकोनि रावणाचे गर्जन । काळकृतांतासमान ।
स्वयें उठला कुंभकर्ण । शूळ घेवोनि साटोपें ॥ ६ ॥
शत्रुरुधिरें पैं रंजला । मेदोमांसें माखला ।
धगधगीत शूळ घेतला । मग गर्जला कुंभकर्ण ॥ ७ ॥
मी जवळी असतां जाण । युद्धा कां रिघे रावण ।
एकाला एक मी आपण । करीन कंदन शत्रुंचें ॥ ८ ॥
शत्रु बापुडे ते किती । मज संमुख केंवी राहती ।
एकला एक मी निश्चितीं । करीन समाप्ती शत्रूंची ॥ ९ ॥

कुंभकर्णस्य वचनं श्रुत्वोवाच महोदरः ।
कुंभकर्ण कुले जातो वृथा प्राकृतदर्शनः ॥५॥
येन पूर्व जनस्थाने बहवो राक्षसा हताः ।
तं शूरं राघवं संख्ये कथमेको हनिष्यसि ॥६॥
एवमुक्तस्तु संकुद्धः कुंभकर्णो महोदरम् ।
उवाच रक्षसां मध्ये राक्षसं रावणोपमम् ॥७॥
स तथोक्तो विविर्भर्त्स्य कुंभकर्णो महोदरम् ।
आददे निशितं शूलं शत्रुशोणितरंजितम् ॥८॥
खड्गं कालयसं दीप्तं तप्तकांचनभूषितम् ।
इंद्राशनिसम घोरं वज्रप्रतिमभैरवम् ॥९॥

महोदराचा कुंभकर्णाला सल्ला :

एकाला एक रणव्युत्पत्ती । करीन शत्रूची समाप्ती ।
महोदरें ऐकोनि युक्ती । कुंभकर्णाप्रती वर्म बोले ॥ १० ॥
कुंभकर्णा तूं सुकुळीन । तुज सन्मानी दशानन ।
तुझ्या अंगी बळ संपूर्ण । परी मूर्खपण विशेष ॥ ११ ॥
राम राक्षसां कंदकुदळ । राम राक्षसां केवळ काळ ।
त्यासीं एकला रणकल्लोळ । करिसी केवळ मुर्खत्वें ॥ १२ ॥
एकला एक पदाती रामचंद्र । चौदा सहस्र निशाचर ।
त्रिशिरा दूषण आणि खर । विंधोनि शर मारिले ॥ १३ ॥
एकेंचि बाणें वाळी । लोळविला आतुर्बळी ।
तुज मारितां रणकल्लोळीं । करील होळी बाणें एकें ॥ १४ ॥
आति स्थूळ तुझें शरीर । तेणें दिसतोसि दुर्धर ।
परी लागतां श्रीरामाचे शर । न मागतां नीर मरशील ॥ १५ ॥

महोदराच्या सल्ल्यामुळे कुंभकर्ण क्रोधाविष्ट होऊन युद्धाला निघतो :

ऐकोनि महोदरवचन । कोपा चढला कुंभकर्ण ।
महोदरातें निर्भर्त्सून । काय आपण अनुवादे ॥ १६ ॥
तूं तंव केवळ हीन दीन । युद्धापासीं पलायमान ।
एकल्या न करवे रण । नपुंसकपण तुजपासीं ॥ १७ ॥
युद्धा जातां येईल मरण । हें तुजपासीं भेडपण ।
युद्धापासीं पलायमान । नपुंसकपण तुजपासीं ॥ १८ ॥
युद्धा जातां ज्यासीं जाण । नाठवे देह गेह मरण ।
तोचि शूर पैं संपूर्ण । विजय पूर्ण त्यापासीं ॥ १९ ॥
नपुंसक जो हीन दीन । तो तूं रावणाचा प्रधान ।
सभेंसीं पावसी सन्मान । काळें वंदन पैं तुझें ॥ २० ॥
तुझे बुद्धीचें प्राधान्य । अधर्मी केला दशानन ।
जळो तुझें काळें वदन । निंद्य रावण तुझेनि ॥ २१ ॥
तुज जरी असती सुबुद्धी । तरी सीता देवोनि रामीं संधी ।
कां न करिसी तूं कुबुद्धी । तुझेनि दुर्बुद्धि रावण ॥ २२ ॥
आम्हां सांगतोसी बुद्धी । सर्वथा न रिघावें युद्धीं ।
हगीर भ्याड तूं त्रिशुद्धी । सभेमर्धी नसावासी ॥ २३ ॥
ऊठ वेगें नीघ सभेबाहेरी । नाहीं तरी हाणीन तोंडावरी ।
महोदरातें नानापरी । कुंभकर्ण भारी निंदीतसे ॥ २४ ॥
ऐसें बोलोनि आपण । शूळ घेवोनियां जाण ।
स्वयें उठिला कुंभकर्ण । अति गर्जोन युद्धार्थी ॥ २५ ॥
केवळ तिख्याचा दारुण । शतधार शूळ पूर्ण ।
सुवर्णबंदी शोभायमान । विद्युत्समान निजतेज ॥ २६ ॥
शत्रुरुधिरें न्हाणिला । मेदें मांसें दिसे माखला ।
कुंभकर्णे शूळ घेतला । स्वयें चालिला युद्धासीं ॥ २७ ॥
कुंभकर्ण अति आवेशी । स्वयें निघतां युद्धासीं ।
अति उल्लास रावणासीं । सवें त्यासी सन्मानी ॥ २८ ॥

अथासनात्समुत्पत्य मणिं सूर्यसमप्रभम् ।
आबबंध महातेजाः कुंभकर्णस्य मस्तके ॥१०॥
अंगदे ह्यंगुलीयानि कवचं च महाधनुः ।
हारं च शशिसंकाश स बबंध महामनाः ॥११॥
दिव्यान्सुगंधमाल्याश्च रत्‍नानि विविधानि च ।
गात्रेष योजयामास कुंडले च महाभुजः ॥१२॥
कांचनांगदकेयूरनिष्कप्रवरभूषणः ।
कुंभकर्णो महाबहुर्हुतोऽनल इवाबभौ ॥१३॥

हर्षभरित रावणाकडून कुंभकर्णाचा बहुमान :

उठोनियां अति आवेशीं । त्यागोनियां सिंहासनासी ।
स्वयें रावण कुंभकर्णासी । अति उल्लासीं पूजित ॥ २९ ॥
मुगुट कुंभकर्णालागूनी । त्याच्या मस्तकी महामणी ।
दिव्यतेजें लोपतो तरणी । ऐसा आणोनी बाणिला ॥ ३० ॥
बाही बाहुवटें रत्‍न भूषणें । करमुद्रिका करकंकणें ।
अनर्घ्य कुंडलें रावणें । प्रीतीं पूजिला कुंभकर्ण ॥ ३१ ॥
कवचादि दिधलें अमोलिक । माळा दिधल्या अलोलिक ।
श्वेत रक्त अति सुटंक । चंदन चोख चर्चिलें ॥ ३२ ॥
दिव्य चंदनाचा टिळा । तेणें शोभत वीरमर्गळा ।
त्यावरी दिव्य सुमनमाळा । घातल्या गळां रावणें ॥ ३३ ॥
कंठी पदक एकावळी । जडितरत्‍न प्रभावळी ।
दोहीं भागीं मुक्ताफळीं । इंद्रनीळीं महाशोभा ॥ ३४ ॥
रत्‍नखचित अलंकार । रावणें अर्पिले अपार ।
होमीं हविला वैश्वानर । तैसा दुर्धर आभासे ॥ ३५ ॥

श्रोणीसूत्रेण महता कांचनेन विराजितः ।
अमृतोत्पादने नद्धो भुजगेनैव मंदरः ॥१४॥
सर्वाभरणजुष्टांगः शूलपाणिः स राक्षसः ।
स रावणं परिष्वज्य कृत्वा चापि प्रदक्षिणम् ॥१५॥
प्रणम्य शिरसा चैनं संप्रतस्थे महाबलः ।
तस्य सूतो रथं दिव्यं पंचनल्वप्रमाणतः ॥१६॥
युक्तं खरसहस्त्रेण युद्धध्वजविभूषितम् ॥१७॥

कुंभकर्णासी कटिसूत्र । देता जाला दशशिर ।
कैसा बाणला । अलंकार । तोही चमत्कार अवधारा ॥ ३६ ॥
समुद्रमंथनी जेंवी मंदर । शेषें वेष्टिला सपरिकर ।
तेंवी कुंभकर्णा कटिसूत्र । मनोहर आभासे ॥ ३७ ॥
सर्वाभरणीं शोभायमान । युद्धा निघतां कुंभकर्ण ।
आलिंगोनि दशानन । मस्तकीं चरण वंदिले ॥ ३८ ॥

कुंभकर्णाचें रावणास वंदन व रथावर आरोहण :

करोनियां प्रदक्षिणा । पुढती लागला चरणा ।
येथोनि आतां रावणा । भेटी दोघां जणां खुंटली ॥ ३९ ॥
रणीं भिडोनि रघुनाथा । परतोनियां येईन मागुता ।
ही तंव सहसा न घडे कथा । लंकानाथा सत्यत्वें ॥ ४० ॥
तुझिया निजकार्यार्था । युद्ध करोनियां दुर्धरता ।
तुजलागोनि वेंचीन जीविता । सत्यवार्ता हे माझी ॥ ४१ ॥
ऐकोनी कुंभकर्ण वचन । दोघां बंधूसीं आलें रुदन ।
तेव्हां कुंभकर्णे आपण । केले गर्जन साटोपें ॥ ४२ ॥
सारथियें आणिला शीघ्र रथ । सहस्र खरीं सयोजित ।
युद्धध्वजें अति शोभित । प्रमाण तेथ पंच पंच ॥ ४३ ॥
कुंभकर्णाचे पंच पंच हस्त । तेचि प्रमाणें रथीं रथस्थ ।
तेथें बैसोनियां त्वरित । निघे युद्धार्थ कुंभकर्ण ॥ ४४ ॥

महाजलधिनिर्घोषं कैलासशिखरोपमम् ।
अष्टचक्रं महावेगमुपनीतं महारथम् ॥१८॥
स तं समारुह्य ययौ मेघगंभीरनिस्वनः ।
सोऽतिकायो महातेजा राक्षसैः परिवारितः ॥१९॥
तमाशीर्भिः प्रशस्ताभिः प्रेषयामास रावणः ।
शंखदुंदुभिनिर्धोषैः सैनिकैश्च वरायुधैः ॥२०॥
तं गजैश्च चतुर्दंतैः स्यंदनैश्चांबंदस्वनैः ।
अन्वगच्छन्महात्मानो रथिनं रथिनां वरम् ॥२१॥
स पुरद्वारमासाद्य राक्षसो घोरदर्शनः ।
निपपात महातेजाः कुंभकर्णः प्रतापवान् ॥२२॥

सैन्यासह कुंभकर्णाचे रणभूमीकडे प्रयाण :

प्रळयमेघाचा कडकडाट । तैसा रथाचा घडघडाट ।
कैलासशिखरासम श्रेष्ठ । रथचक्रे घडघडती ॥ ४५ ॥
कुंभकर्ण बैसोनि येथ । रथ प्रेरिला गर्जत ।
रावणें संतोषोनि तेथ । सैन्य समस्त सवें धाडी ॥ ४६ ॥
पुरस्कारोनियां विशद । रावणें देवोनि आशीर्वाद ।
कुंभकर्ण वीर प्रसिद्ध । करावया युद्ध धाडिला ॥ ४७ ॥
चतुर्दंत गजसंभारी । सवेंचालती सालंकारी ।
अश्वगजरथांची हारी । केला घोरीं गडगर्ज ॥ ४८ ॥
शंख भेरी मृदंग गहन । त्राहाटिलें रणनिशाण ।
कुंभकर्णा आलें स्फुरण । स्वयें गर्जोन चालिला ॥ ४९ ॥
कुंभकर्णाचे पाठीसीं । सैन्य दाटलें चौपासीं ।
अनुलक्षोनियां त्यासीं । संग्रामासीं निघाले ॥ ५० ॥
कुंभकर्ण महावीर । रथ प्रेरिला सत्वर ।
ठाकोनि आला नगरद्वार । छत्रातपत्र क्षोभत ॥ ५१ ॥

सपुष्पपर्णैखकीर्यमाणो धृतातपत्रः शितशूलपाणिः ।
मदोत्कटः शोणितपानमत्तो विनिर्ययौ राक्षसयोधमुख्यः ॥२३॥
कुंभकर्णो महावक्त्रः प्रहसन्वाक्यमब्रवीत ।
अद्य वानरमुख्यान तानि यूथानि भागशः ॥२४॥
निर्दहिष्यामि संक्रुद्धः शलभानिव पावकः ।
स वै रामसहायश्च ये चान्ये मम शत्रवः ॥२५॥
नापराध्यंति मे कामं वानरां वनचारिणः ।
हते यस्मिन्हताः सर्वे तं हनिष्यामि संयुगे ॥२६॥
एवं तस्य ब्रुवाणस्य कुंभकर्णस्य रक्षसः ।
बभूवुर्घोररुपाणि निमित्तानि समंततः ॥२७॥

कुंभकर्णाची रणगर्जना :

युद्धा निघतां कुंभकर्ण । पुष्पवृष्टि करी रावण ।
छत्रचामरीं शोभायमान। उल्हास पूर्ण युद्धाचा ॥ ५२ ॥
रुधिरपानें रुधिरोन्मत्त । मद्यपानें मदोन्मत्त ।
युद्ध करावया बळोन्मत्त । सैन्यसमवेत निघाला ॥ ५३ ॥
विक्राळवदन कुंभकर्ण । करावया रणकंदन ।
स्वयें बोंलताहे गर्जोन । आंगवण युद्धाची ॥ ५४ ॥
वानरयुथप बहुत । रणकर्कश रणोन्मत्त ।
ते मी मारीन समस्त । जेंवी वणव्यांत पतंग ॥ ५५ ॥
अंगद सुग्रीव जांबवंत । नळनीळादि हनुमंत ।
यूथपें यूथप समस्त । मारीन येथ शोधशोधूं ॥ ५६ ॥
वानर बापूडें वनचर । त्यांसी मज नाही वैर ।
मुख्य वैरी श्रीरामचंद्र । त्यासीं वानर रणीं साह्य ॥ ५७ ॥
लक्ष्मणासीं समवेत । रणीं मारिल्या रघुनाथ ।
वानर निमाले समस्त । ऐसा युद्धार्थ साधीन ॥ ५८ ॥
श्रीराम आणि सुमित्र । दोघे बंधु मनुष्यमात्र ।
आधीं गिळीन ते स्वातंत्र । मग वानर भक्षीन ॥ ५९ ॥
कुंभकर्णाचा गिरागजर । तेणें कांपती गिरिसागर ।
त्यामाजी गर्जती निशाचर । युद्धा सत्वर निघाले ॥ ६० ॥
ऐसेनि अति उल्लासीं । युद्धा जातां कुंभकर्णासीं ।
अपशकुन जाले त्यासी । चहूं भागांसीं दुश्चिन्ह ॥ ६१ ॥

निपपात च गृघ्रोऽस्य रथस्योपरि गच्छतः ।
प्रास्फुरन्नयनं चास्य सव्यो बाहुरकंपत ॥२८॥
गगनान्निपपातोल्का ज्वलंती भीमनिःस्वना ।
आदित्यो निष्प्रभश्चासीन्न वाति च् सखोऽनिलः ॥२९॥
अचिंतयन्महोत्पातानुत्थिताज्जीवितांतकान् ।
निर्ययौ कुंभकर्णस्तु कृतांतबलनोदितः ॥३०॥

कुंभकर्णाला मार्गामध्ये अपशकुन :

कुंभकर्ण निघतां गगरीं । उलक बैसला ध्वजावरी ।
गीध बैसला त्याचे शिरीं । शिवा श्वास खरी भुंकती ॥ ६२ ॥
भूस्फोट नगरद्वारीं । भूकंप होत नगरीं ।
विजू पडली निरभ्री । प्राणसंहारी कडकडाट ॥ ६३ ॥
अशुभ पक्षी किलकित । अपसव्य परिभ्रमत ।
क्रूर उल्कापात होत । जीवितांत राक्षसां ॥ ६४ ॥
कुंभकर्णाचा स्वयें आपण । अशुभें लवे वामलोचन ।
वामबाहूचें अशुभ स्फुरण । जय संपूर्ण लाभेना ॥ ६५ ॥
सूर्य जाला प्रभाहीन । प्रतिकूळ वायूचा सणाण ।
आजिच्या युद्धीं न वाचति प्राण । अचुक मरण राक्षसा ॥ ६६ ॥
कुंभकर्ण अते अवसरीं । अपशकुनांतें अव्हेरी ।
अंतका अंतक बळाची थोरी । आला संभारीं रणरंगीं ॥ ६७ ॥

स निष्क्रप्य पुरीद्वारात्कुम्भकर्णो महाबलः ।
ननाद च महानादं समुद्र सव पर्वणि ॥३१॥
तं दृष्ट्वा राक्षसश्रेष्ठं वानराः पर्वतोपमम् ।
वायुक्षिप्ता यथा मेघा ययुः सर्वा दिशस्तदा ॥३२॥
तद्वानरानीकमतिप्रचंडं दिशो द्रवद्‌भिन्नमिवाभ्रजालम् ।
स कुम्भकर्णः समवेक्ष्य हर्षान्ननादनादं घनवंद्वनाभः ॥३३॥
ते तस्य घोरं निनदं निशम्य यथा निनादं दिवि वारिदस्य ।
पेतुर्धरण्यां बहवः प्लवंगाः।निकृत्तमूला इव शालवृक्षाः ॥३४॥

कुभकर्णाच्या गर्जनेमुळे वानरसैन्याची पळापळ :

येवोनि नगराबाहेरी । सेना देखोनि वानरी ।
कुंभकर्ण गिरागजरीं । घर्घरस्वरीं गर्जिन्नला ॥ ६८ ॥
ज्याच्या ऐकतांचि रव । मूर्च्छित पडती देवदानव ।
तेणे नादें वानर सर्व । घेवोनि जीव पळाले ॥ ६९ ॥
नाद ऐकता कडकडाटीं । लहान सान वानरथाटी ।
धाकें पडती पटपटीं । मूर्च्छित सढष्टीं कपिकुळ ॥ ७० ॥
कुंभकर्ण क्रूराभासा । वानरीं सांडिला युद्धधिंवसा ।
स्वयें पळती दश दिशा । एक आकाशा लंघिती ॥ ७१ ॥
पळतां देखोनि वानर । कुंभकर्णा हर्ष थोर ।
पुढती गर्जे दीर्घस्वर । तेणे वनचरें विव्हळत ॥ ७२ ॥
एक पळाले समुद्रतीरीं । एक रिघाले गिरिकंदरीं ।
एक लपाले वृक्षांवरी । एक ते विवरीं दडाले ॥ ७३ ॥
एक ते जाले पिसीं । एक ते पळती चौपासीं ।
अंगद अभय देत वानरांसी । दशा ऐसी देखोनी ॥ ७४ ॥
छेदिल्या वृक्षांचें पैं मूळ । उलंडती शाल ताल ।
तैसें वानरांचें दळ । अति विव्हळ देखोनी ॥ ७५ ॥

तांस्तु विद्रवतो दृष्ट्वा राजपुत्रोंऽगदोऽब्रवीत्।
आत्मनस्तानि विस्मृत्य वीर्याण्यभिजनानि च॥३५॥
साधु सौ‍म्या निवर्तध्वं किं प्राणान्परिरक्षय।
नालं युद्धाय वै रक्षो महतीयं बिभीषिका॥३६॥
विक्रमाद्विधमिष्यामो निवर्तध्वं प्लवंगमाः।
कृच्छ्रेण महाताश्वास्य संस्तभ्य च ततस्ततः॥३७॥
शिलापादपहस्तास्ते तस्थुः संग्राममूर्धनि।
निर्जग्मुः परमक्रुद्धाः समदा इव कुंजराः॥३८॥

अंगदाच्या निर्भत्सनेमुळे वानरसैन्य परत येते :

पळतां देखोनि वानर । अंगद जो कां राज कुमर ।
परतावया कपि समग्र । काय उत्तर बोलत ॥ ७६ ॥
रणीं मारुं दशानन । श्रीरामापासीं बोलां गर्जोन ।
ते तुम्ही न करितां रण । केंवी पळोन जातसां ॥ ७७ ॥
पळोनि जातां गांवासी । स्त्रिया निर्भर्त्सिती तुम्हांसी ।
पाठी दिधली संग्रामासी । श्याममुखेंसीं आलेती ॥ ७८ ॥
स्त्रिया म्हणती काळतोंडें । पळोनि आलीं माकडें ।
मरणाहूनियां गाढें । दुःख रोकडें पावाल ॥ ७९ ॥
जळो तुमचें काळें वदन । नपुंसकांहुनि हीन दीन ।
रणीं सांडोनि रघुनंदन । केंवी पळोनि आलेती ॥ ८० ॥
पळोनि गेलिया वानर । तुम्ही काय व्हाल अजरामर ।
पळणें हीन दीन विचार । सांडोनि शीघ्र परतावें ॥ ८१ ॥
आम्ही सुकुळींचे वानर । जन्मोनियां वीर शूर ।
करितां पळण्याचा विचार । ब्रीदें समग्र हरविलीं ॥ ८२ ॥
पूर्वजांसी आणोनि उणें । पळोनि जातां नरका जाणें ।
यालागीं धरोनि आंगवणें । स्वयें परतणें संग्रामा ॥ ८३ ॥
धरोनि देहलोभाचा स्वार्थ । रणीं सांडितां रघुनाथ ।
पदोपदीं नरकपात । आकल्पांत पावाल ॥ ८४ ॥
कुंभकर्णाची पैं गोष्टी । पोंचट तन मांसमोठी ।
तेणें भेणें तुम्ही करंटी । उठाउठीं पळतसां ॥ ८५ ॥
करितां श्रीरामस्मरण । आम्हां बाधूं न शके मरण ।
विभांडीन मी कुंभकर्ण । आंगवण पहा माझी ॥ ८६ ॥
ऐकोनि अंगदाचें वचन । परस्परें आश्वासून ।
परतले वानरगण । आंगवणसाशंक ॥ ८७ ॥
अंगद सांगे जीवींची खूण । सांडून देहलोभ विस्मरण ।
करितां रामनामस्मरण । आंगवण पावाल ॥ ८८ ॥
करितां रामनामस्मरण । वानरां आलें अति स्फुरण ।
शतधा वाढली आंगवण । कुंभकर्णसंग्रामा ॥ ८९ ॥
करितां रामनामगजर । मदोन्मत्त जेंवी कुंजर ।
तैसे परतले वानर । निशाचर रणमारा ॥ ९० ॥
शिळा शिखरें तरुवर । वानरीं सज्जून हातियेर ।
युद्धीं परतले दुर्धर । करीत गजर नामाचा ॥ ९१ ॥
अंगदाचें गोष्टीसाठीं । वानरवीरांचियां कोटी ।
धैर्य धरोनियां पोटीं । उठाउठीं परतले ॥ ९२ ॥

निजघ्नुः परमक्रुद्धाः कुंभकर्ण वनौकसः ।
पांसुभिर्वालतालैश्च शिलाभिश्च महाबलाः ॥३९॥
पादपैः पुष्पिताग्रैश्च वध्यमानो न चुक्षुभे ।
वानरास्तु सुसंक्रुद्धा गिरिशृंगैर्महाबलाः ॥४०॥
राक्षसानामनीकानि विनिर्जघ्नुः सहस्त्रशः ।
तच्छैलवेगाभिहतं हत्वा स्वरथवारणम् ॥४१॥

कुंभकर्णावर शिलावृक्ष वर्षाव आणि राक्षसांचा संहार :

वानरीं धरोनियां आंगवण । पाचारोनि कुंभकर्ण ।
शिळा पर्वत पाषाण । संमुख गर्जोन हाणिती ॥ ९३ ॥
शतसहस्र कोट्यनुकोटी । वानर भिडती जगजेठी ।
शिळापर्वतवृक्षवृष्टीं । कडकडाटीं हाणती ॥ ९४ ॥
वानरीं व्यापिलें भूतळ । वानरीं व्यापलें नभोमंडळ ।
कुंभकर्णातें कपि सकळ । शाल ताल हाणिती ॥ ९५ ॥
जैशा माशा मोहळासी । तैसे वानर चौपासीं ।
वेढूनियां कुंभकर्णासी । अति आवेशीं हाणिती ॥ ९६ ॥
वानर हाणिती जे जे घाय । कुंभकर्णासीं तृणप्राय ।
वानर बापुडे ते काय । अलक्ष पाहें लक्षेना ॥ ९७ ॥
कुंभकर्णासीं पर्वत । लागूनि शतचूर्ण होत ।
शिळा होती शकलिभूत । वृक्ष मोडत शाल ताल ॥ ९८ ॥
जैसे कां ढेंकुण सेजेसीं । तैसें वानर चौपासीं ।
झोंबती कुंभकर्णासीं । परीं तो त्यांसी गणीना ॥ ९९ ॥
न डंडळी कुंभकर्ण । वानरीं जाणोनि आपण ।
त्याच्या सैन्यासीं केलें कंदन । रणविंदान अवधारा ॥ १०० ॥
रणीं क्षोभोनि वानर । करोनि पर्वतांचा मार ।
सैन्य मारिलें शतसहस्र । गज खरोष्ट्र रथाचे ॥ १ ॥
अश्व सारथी रहंवर । गजपती निशाचर ।
रणीं मारिले अपार । अवनीं रुधिर प्रहावे ॥ २ ॥
रणीं क्षोभोनी प्लवंगम । दुर्धर केला पैं संग्राम ।
मांसशोणितकर्दम । रण दुर्गम राक्षसां ॥ ३ ॥
मारोनियां निशाचर । रणीं गर्जती वानर ।
अवघीं केला जयजयकार । करीत गजर हरिनामें ॥ ४ ॥
मारिली देखोनि निजसेना । कोप आला कुंभकर्णा ।
मारावया वानरगणा । आंगवणा ऊठिला ॥ ५ ॥
थोर थोर वानरगण । कुंभकर्णासीं करितां रण ।
एका जनार्दना शरण । सावधान अवधारा ॥ ६ ॥
सावध ऐकतां रामायण । चारी मुक्ती येती शरण ।
करितां नित्य नामस्मरण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥ १०७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धांडे एकाकारटीकायां
कुंभकर्णयुद्धप्रारंभो नाम पंचविंशतितमोऽध्यायऽ ॥ २५ ॥
ओंव्या ॥ १०७ ॥ श्लोक ॥ ४१ ॥ एवं ॥ १४८ ॥