अध्याय 32
श्रीराम-लक्ष्मणांना शरबंधन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
अतिकाय वधामुळे वानरसैन्यांत हर्षकल्लोळ व रावणाचा शोक :
अतिकाय तो अतिरथी । सौमित्र केवळ पदाती ।
तेणें त्यासी पाडिले क्षितीं । वानर गर्जती हरिनामें ॥ १ ॥
प्रहर्षयुक्ता बहवश्च वानराः प्रबुद्धपद्मप्रतिमाननास्तदा ।
अपूजयन्लक्ष्मणमिष्टभागिनं हते रिपौ भीमबले दुरासदे ॥१॥
जैसीं उत्फुल्लित पद्मकमळें । तैसीं वानरांचीं मुखकमळें ।
स्वानंदें शोभती प्रांजळें । अतिकाय बळें मारलिया ॥ २ ॥
अतिकाय तो अतिरथी । लक्ष्मणें मारिला पदाती ।
तें देखोनि श्रीरघुपती । सौमित्रा पूजित स्वानंदे ॥ ३ ॥
स्वर्गी गर्जतीं सुरवर । नामें गर्जती वानर ।
ऋषी करिती जयजयकार । विजयी सौमित्र संग्रामीं ॥ ४ ॥
रणीं मारितां राक्षसभार । शेष उरले निशाचर ।
भेणें ठाकून लंकापुर । सांगती सत्वर लंकेशा ॥ ५ ॥
रडत पडत कुंथत । घायीं आले जर्जरित ।
येवोनियां सभेआंत । वृत्तांत सांगत लंकेशा ॥ ६ ॥
मागिल्या वीरांच्या कथा । त्वां ऐकिल्या लंकानाथा ।
अतिकाय मारिला आतां । आम्हांदेखता सौमित्रें ॥ ७ ॥
अतिकाय मारिला सौमित्रें । हें ऐकोनि लंकेश्वरें ।
अति दुःखी दुःखभारें । काय उत्तर बोलत ॥ ८ ॥
मागिलें दुःख आठवून । स्वयें अनुवादे रावण ।
समस्त वीर रणप्रवीण । मारिले स्वजन संग्रामीं ॥ ९ ॥
धूम्राक्ष वज्रदंष्ट्र । अकंपन प्रहस्त धुर ।
कुंभकर्ण सहोदर । महोदर महापार्श्व ॥ १० ॥
माझिया कुमरां महावीरां । ज्यांचा धाक सुरावरां ।
जे नाटोपती इंद्रादि अमरां । त्या महाशूरां मारिलें ॥ ११ ॥
देवांतक आणि त्रिशिरा । मारिलें नरांतक वीरा ।
आक्रंदत रुदनद्वारा । दशशिरा अति दुःख ॥ १२ ॥
भरंवशाचा कुंभकर्ण । कुमर मारिले प्रधान ।
आतां त्या रामासीं रण । करिल कोण संग्रामीं ॥ १३ ॥
सुग्रीवें मेळविलें दळ । श्रीरामें आश्वासिलें सकळ ।
वानरीं करोनि रणकल्लोळ । धुराचि प्रबळ मारिल्या ॥ १४ ॥
आमच्या वर्मीचे आघात । सांगावया बिभीषण तेथ ।
तेणें मांडिला कुळक्षयार्थ । अतिकायघात तेणें केला ॥ १५ ॥
ब्रह्मास्त्रें अतिकाया मरण । हें वर्म सांगे बिभीषण ।
तेणें संग्रामी लक्ष्मण । झाला संपूर्ण निजविजयी ॥ १६ ॥
श्रीराम आणि लक्ष्मण । अंगद सुग्रीव हनुमान जाण ।
यांसी कोण करील रण । रडे रावण आक्रोशें ॥ १७ ॥
इंद्रजिताचे रावणाला आश्वासन :
ऐकोनि रावणाचे रुदन । इंद्रजित आला धांवोन ।
आपला पुरुषार्थ आपण । बोले गर्जोन तें ऐका ॥ १८ ॥
इंद्रजित जीत असतां । तुज दुःख कोण लंकानाथा ।
रामलक्ष्मणांच्या करीन घाता । आणि समस्तां वानरां ॥ १९ ॥
तूं राजा सर्वांर्थी प्रबळ । दुःखशोकाचा नव्हे काळ ।
आजि माझें पाहें बळ । रणकल्लोळ संग्रामीं ॥ २० ॥
सुटल्या माझे निर्वाणबाण । सर्वांग बाणीं खिळोन ।
मारीन रामलक्ष्मण । प्रतिज्ञा प्रमाण हे माझी ॥ २१ ॥
वानरें कायसीं बापुडीं । बाणीं विंधोनि निर्वडीं ।
पाडीन कपींचिया कोडी । रणधांदडीं संग्रामीं ॥ २२ ॥
ऐसी बोलोनि आंगवण । घेवोनियां अज्ञापन ।
करुन रावणासी नमन । रथारोहण केलें ॥ २३ ॥
इंद्रजिताचे रथामधून प्रयाण :
रथीं जुंपोनि महाखर । वरी बैसला निशाचर ।
ध्वज पताका छत्र चामर । शस्त्रसंभार संयोगें ॥ २४ ॥
वायुवेगें अत्यद्भुत । सबळ संजोगोनि रथ ।
इंद्रजित बैसोनियां तेथ । निघाला गर्जत संग्रामा ॥ २५ ॥
जे रथीं बैसला देख । समाधिसुखाहून अधिक ।
संग्रामीं जयाचे वाढे सुख । तेणें संमुख युद्धा आला ॥ २६ ॥
युद्धा निघतां इंद्रजित । सैन्य निघालें अत्यद्भुत ।
रथस्थ गजस्थ अश्वस्थ । निघाले समस्त गडगर्जे ॥ २७ ॥
फरश पट्टिश तोमर । शूळ त्रिशूळ मुग्दर ।
अचुकसंधान धनुर्धर । सैन्यसंभार चालला ॥ २८ ॥
जेंवी तमाबाहेर भास्कर । स्वयें निघे तेजाकार ।
तेंवी इंद्रजित महावीर । निघे सत्वर लंकेआंतोनी ॥ २९ ॥
शंख भेरी निशाण । वाजंत्रांचा नाद गहन ।
इंद्रजित निजतेंजें विराजमान । अपरभार रणरंगीं ॥ ३० ॥
सूर्यतेज फांके गगनीं । ह्याचें तेज संग्रामस्थानीं ।
इंद्र आणिला बांधोनी । रणांगणी जिणोनियां ॥ ३१ ॥
रावणाचा इंद्रजिताला आदेश :
सन्नद्ध सेनासंभार । युद्धा निघतां रावणकुमर ।
संतोषोनि दशशिर । काय उत्तर बोलत ॥ ३२ ॥
रणीं जिणोनि इंद्रासी । बांधोनि आणिलें मजपासीं ।
तैसेंचि रामलक्ष्मणासी । आणीं मजपासीं बांधोनी ॥ ३३ ॥
रणीं न बाधवे रघुपती । दोघे मारावे रणव्युत्पत्तीं ।
तूं तंव योद्धा महारथी । करावी ख्याती संग्रामी ॥ ३४ ॥
ऐकोनि पित्याचें वचन । करोनि प्रदक्षिणा नमन ।
इंद्रजित निघे आपण । घेवोनि सैन्यसंभारा ॥ ३५ ॥
दोघे निधडे राम सौमित्र । भेणें कांपे इंद्रजितवीर ।
त्यांसीं करावया अभिचार । गेला सत्वर निकुंबे ॥ ३६ ॥
निकुंबळा अटकगिरी । तेथें अभिचारसामग्री ।
इंद्रजित दुष्ट दुराचारी । करवी ती परी अवधारा ॥ ३७ ॥
इंद्रजित नव्हे निधडा वीर । कपटें करोनि अभिचार ।
रणीं जिंतिलें सुरासुर । तैसा रघुवीर न जिंकवे ॥ ३८ ॥
स्थापयामास रक्षांसि रथं प्रति समंतत ।
सर्वतोऽग्निं समास्तीर्य शस्त्रापात्रैः सतोमरैः ॥२॥
जुहाव रक्तं कृष्णस्य कंठाच्छागरय जीवतः ।
सकृदेव समिद्धस्य विधूम्रस्य महार्चिषः ॥३॥
ततस्तं हुतभोक्तांरं हुतभुक्सदृशप्रभः ।
जुहुवे राक्षसश्रेष्ठो विधिवन्मंत्रसत्तमैः ॥४॥
जहविर्लाजसत्कारैर्माल्यगंधसुसंयुतैः ।
जुहुवे पावकं तत्र राक्षसेद्रः प्रतापवान् ॥५॥
निकुंबिळेत इंद्रजिताचा अभिचार प्रयोग :
करावया अभिचारासी । इंद्रजित आला निकुंबळेसीं ।
तरी धाकत मानसीं । कळल्या रामासी येईल धाडीं ॥ ३९ ॥
यालागीं निकुंबळेपासीं । द्वारद्वार मार्गमार्गासीं ।
राखण ठेविले राक्षसांसी । ससैन्यासीं सावध ॥ ४० ॥
श्रीरामाच्या कर्णपुटीं । बिभीषण हे सांगतां गोष्टी ।
वानरधाड येईल लाठी । हेंही पोटीं धाकत ॥ ४१ ॥
वारयासी न फटे वाट । ऐसीं राखणें ठेवोनि स्पष्ट ।
आपण सेविलें यज्ञवाट । हव्यवाटप्रतिष्ठा ॥ ४२ ॥
नागबाण शिववरदोक्त । मागां बांधिले राजसुत ।
ते तैंच जाले भस्मांत । श्रीरघुनाथप्रतापें ॥ ४३ ॥
श्रीरामीं मिनली शस्त्रदेवता । ते परतोन न येचि हाता ।
इंद्रजित होय कुसुमुसिता । गेले वृथा नागपाश ॥ ४४ ॥
वृथा गेले नागबंधन । आतां उरले ब्रह्मवरदान ।
त्या ब्रह्मपाशाचें बंधन । सावधान अवधारा ॥ ४५ ॥
ब्रह्मवरदान इंद्रजितासी । होम करितां अभिचारासीं ।
होमदेवता तत्काळेसीं । होईल तुम्हांसी सुप्रसन्न ॥ ४६ ॥
मागां शरबंध – परिपाटीं । बंदी घातल्या देवकोटी ।
ते न चले श्रीरामीं गोष्टी । सावधानदृष्टी शरबंधी ॥ ४७ ॥
श्रीरामीं न चले अभिचारिक । येतां देखे शरबंधासंमुख ।
इंद्रजित हो दशमुख । छेदील मस्तक राक्षसाचें ॥ ४८ ॥
यालागीं शरबंधासमोर । येतांचि निशाचर ।
श्रीराम त्याचें छेदील वक्त्र । अतर्क्य शर वर्षोनी ॥ ४९ ॥
शस्त्रदेवतेसी देवोनि मान । शरबंधीं पडिले आपण ।
त्यांसी न लागे शरबंधन । नित्यसावधान श्रीराम ॥ ५० ॥
हे ब्रह्मयाची ब्रह्मवरदोक्ती । पूर्वीच सांगितली होती ।
तोचि अभिचारस्थिती । आरंभी पुढती इंद्रजित ॥ ५१ ॥
रिघोनियां यज्ञवाटा । प्रतिष्ठोनि हव्यवाटा ।
होमसामग्रीची निष्ठा । निंद्य पापिष्ठा ते ऐका ॥ ५२ ॥
द्विजकपाळीची जाण । प्रणितापात्रें संपूर्ण ।
असितोमरादि धनुष्यबाण । परिस्तरण शस्त्रांचें ॥ ५३ ॥
मद्याचें परिसमूहन । मातंगमज्जाआघारण ।
अशुद्धाचा होम जाण । तोही सावधान अवधारा ॥ ५४ ॥
निखळकृष्णच्छाग खरा । तोही जीवंत असतां पुरा ।
त्याचे कंठी देवोनि सुरा । धरिळें रुधिरा नरशिरीं ॥ ५५ ॥
स्त्रुक्स्त्रुवापात्रविचार । घडविलेसे अश्मसार ।
तेणें स्त्रुवेनें निशाचार । होमी रुधिर हुताशीं ॥ ५६ ॥
अस्त्रदेवता आव्हानून । मंत्रतंत्रक्रियाविधान ।
सर्व साधून सावधान । करी हवन इंद्रजित ॥ ५७ ॥
मातंगीचे आणून दर्शन । त्यांच्या लाह्या केल्या भाजून ।
गोरोचनाचें गंधविधान । सुमनें संपूर्ण करवीर ॥ ५८ ॥
सर्षपभल्लातकमद्येंसीं । काळीचिडी दिवाभीतांसी ।
जीतचि खिळणीं करोनि त्यांसी । होमिजे राक्षसीं अभिचारिक ॥ ५९ ॥
इंद्रजिताला होम – समाप्तिनंतर ब्रह्मवरदानाची अदृश्य रथप्राप्ती :
होम करितां प्रधान । यज्ञभोक्ता जो हुताशन ।
संतोषोनि आपण । ब्रह्मवरदान देता जाला ॥ ६० ॥
सोऽस्त्रमाहारयामास ब्राह्ममस्त्रविदां वरः ।
धनुः शरान्रथं चैव सर्वं तत्राभ्यमंत्रयत् ॥६॥
तस्मिन्नाहूयमानेऽस्त्रे हूयमाने च पावके ।
सार्कं ग्रहेंदुनक्षत्रं वितत्रास नभ स्थलम् ॥७॥
स पावकं पावकदीप्ततेजा । हत्वा महेंद्रप्रतिमप्रभावः ।
स चापबाणासिरथाश्वशूलः । खेंऽतर्दधेऽत्मानमचिंत्यरुपः ॥८॥
ब्रह्मवरदाचें वरदान । करितां ब्रह्मास्त्रआवाहन ।
स्वयें शस्त्रदेवता येऊन । सुप्रसन्न होसरली ॥ ६१ ॥
त्याचेनि मंत्रोदकें जाण । रथखड्गादि धनुष्यबाण ।
अवघीं अभिमंत्री आपण । इंद्रजित जाण मंत्रोक्त ॥ ६२ ॥
होम करितां प्रधान । मंत्रोदकें अभिषिंचन ।
रथाश्व सारथि चाप बाण । अंतर्धान पावलीं ॥ ६३ ॥
देवता अंतर्धानगती । इंद्रजित हरिखला चित्तीं ।
सांडून सैन्यभारसंपत्ती । बैसला रथीं साटोपें ॥ ६४ ॥
अंतर्धानाचें लक्षण । रथाश्व सारथि चापबाण ।
स्वयें इंद्रजित आपण । कोणासीं जाण न दिसती ॥ ६५ ॥
इंद्रजिताला वरदान मिळाल्यानें देवादिकाना चिंता :
ऐसिये अदृश्यगतीं । देखोनि इंद्र चंद्र बृहस्पती ।
सूर्य वरुण ग्रहपंक्ती । धरा कांपती सपर्वत ॥ ६६ ॥
इंद्रजिताची अदृश्य गती । कैसेनि वांचे रघुपती ।
स्वर्गीं सुरवर गजबजिती । ऋषी धाकती ससिद्ध ॥ ६७ ॥
इंद्रजिताचे अदृश्यगतीने आक्रमण :
ऐसिये अदृश्यगतीं । इंद्रजित बैसोनियां रथीं ।
धनुष्य वाहोनियां हातीं । वानरांप्रती शर वर्षे ॥ ६८ ॥
ततः सरक्षोऽधिपतिर्महात्मा । सर्वा दिशो बाणगणैः शिताग्रैः।
प्रच्छादयामास रविप्रकाशैर्विद्रावयामास च वानरेंद्रान् ॥९॥
सशूलनिस्त्रिंशपरश्वधानि । दीप्तानलार्कद्युतिसन्निभानि ।
सविस्फुलिंगोज्ज्वलपावकानि । ववर्ष तस्मिन्प्लवगेंद्रसैन्ये ॥१०॥
अदृश्यगतीं निशाचर । बाण वर्षे शरधार ।
आच्छादोनि रवि चंद्र । दिशा समग्र बाणाकुळित ॥ ६९ ॥
बाण येतां न दिसती । अवचितें अंगीं आदळती ।
तेणें वानरां खडतरती । रणीं पडती आक्रंद्रें ॥ ७० ॥
वानरांची जाति व्यक्ती । रणीं खिळले शरसंपाती ।
अदृश्य गतीची व्युत्पत्ती । वानरां ख्याती लाविली ॥ ७१ ॥
संमुख योद्धा न दिसे जाण । कोणासी हाणूं द्रुमपाषाण ।
कोणासीं करुं आंगवण । म्हणतांचि बाण खडतरती ॥ ७२ ॥
ऐसें वर्षोनि शरजाळ । वानरांचें प्रबळ दळ ।
रणीं खिळोनियां ते सकळ । पाडिलें विकळ रणभूमीं ॥ ७३ ॥
अदृश्यगति सस्त्रसंभार । परशु पट्टिश गदा मुद्गर ।
शूळ परिघ तोमर । रणीं वानर खोंचले ॥ ७४ ॥
अदृश्य विंधी वानरवीरां । लाविला मेघनादें दरारा ।
विंधिल्या मुख्य धुरा । त्याही अवधारा सांगेन ॥ ७५ ॥
अदृश्य विंधी इंद्रजित । खवळोनि अत्यद्भुत ।
मुख्य धुरांचा करित घात । अकस्मात अतर्क्य ॥ ७६ ॥
अदृश्य रथाश्वसारथी । अदृश्य इंद्रजित महारथी ।
बाण येतां न दिसती । अंगी वाजती अतर्क्य ॥ ७७ ॥
सुग्रीव राजा हनुमंत । अंगद नळ नीळ जांबवंत ।
रणी पाडिले मूर्च्छित । अतर्क्य घात महावीरां ॥ ७८ ॥
येतां न दिसती बाण । जरी करावें निवारण ।
योद्धा संमुख न दिसे जाण । आंगवण करावया ॥ ७९ ॥
मैंद द्विविद गंधमादन । केसरी दधिमुख सुषेण ।
कुमुद कुमुदाक्ष जाण । मूर्च्छापन्न पाडिले ॥ ८० ॥
गज गवय गवाक्ष । हरिलोमा पावकाक्ष ।
विद्युज्जिव्ह उल्कामुख । पाडिले असंख्य मूर्च्छित ॥ ८१ ॥
असंग वेगवंत पनस । धूम्र शतबली ज्योतिर्मुख ।
सूर्यानळ आणि सुमुख । बाणीं असंख्य पाडिले ॥ ८२ ॥
करावया इंद्रजितसंहार । तार तरळ हरि वानर ।
गगना उसळले सत्वर । रावणकुमर वधावया ॥ ८३ ॥
अतर्क्य बाणांचा आघात । शर भेदले हृदयांत ।
तेंही घायीं विव्हळत । मूर्च्छान्वित पाडिले ॥ ८४ ॥
अतर्क्य शरांचा महामार । आणिकही वानरवीर ।
पाडून शरबंधी समग्र । हर्षे निर्भर इंद्रजित ॥ ८५ ॥
शरबंधी वानरमात्र । रणीं पाडिले समग्र ।
आतां वधावया रामसौमित्र । निशाचर खवळला ॥ ८६ ॥
संमुख देखतां रघुनाथ । निमिषार्धे करील घात ।
अतर्क्य ब्रह्मवरदांत । भोगी पुरुषार्थ इंद्रजित ॥ ८७ ॥
इंद्रजिताचे श्रीरामांवर शरसंधान :
ब्रह्मवरदाचें ब्रह्मास्त्र । होमीं साधून अभिचार ।
तेणें बळें इंद्रजितवीर । रणीं वानर पाडिले ॥ ८८ ॥
होमीं तोषवोनि हुताशन । लावोनियां वरद बाण ।
घेवोनि ब्रह्मास्त्राचें वरदान । वानरसैन्य पाडिलें ॥ ८९ ॥
सौमित्रा सांगे रघुनंदन । पूर्विलाऐसे शरबंन ।
कराया इंद्रजित आपण । वरदबाण वर्षत ॥ ९० ॥
वानर माझेनि वीर्यवंत । माझेनि धैर्ये धैर्यवंत ।
माझेनि प्रतापें प्रतापवंत । ब्रह्मवरदें समस्त पडले ॥ ९१ ॥
वरदबाण अति गुप्त । अंगी लागती अकस्मात ।
तेणें घायें कपि समस्त । रणीं हुंबत पाडिले ॥ ९२ ॥
अतर्क्य ब्रह्मवरदविंदान । न दिसे योद्धा न दिसती बाण ।
अदृश्य शस्त्रीं वानरगण । शरबंधनी जाण बांधिले ॥ ९३ ॥
श्रीरामांच्या सूचनेप्रमाणे इंद्रजिताच्या बाणांचे निवारणार्थ धरणीवर पडले :
मंत्र अस्त्र ब्रह्मास्त्रदेवो । मिळोनि तिहींचा समुदावो ।
कपि शरबंधी बांधिले पहाहो । सांगे रघुरावो सौमित्रा ॥ ९४ ॥
ब्रह्मवरदबाणधारा । शरबंधीं बांधल्या वानरा ।
मुख्य उरल्या दोन धुरा । बांधावया शरां वषर्त ॥ ९५ ॥
आम्हां उभे असतां दोन्ही । इंद्रजित विंधील विकट बाणी ।
ते निवरावया धरणीं । शरबंधनी पहुडावें ॥ ९६ ॥
मागां सहिलें शिववरदान । तैसेंच सहावें ब्रह्मवरदान ।
मिथ्या करितां ब्रह्मवचन । दोष दारुण सौमित्रा ॥ ९७ ॥
मिथ्या करितां नये ब्रह्मवचन । दोष ब्रह्महत्येसमान ।
यालागीं ब्रह्मवरदान । स्वयें आपण पाळावें ॥ ९८ ॥
अवमानितां ब्राह्मणासी । क्षोभ उपजेल भगवंतासीं ।
मिथ्या करितां ब्रह्मवरदासी । परम दोषी होइजें ॥ ९९ ॥
समूळ मूळीचें लक्षण । आम्हां दोघांसी नाहीं मरण ।
साहतां ब्रह्मशरबंधन । संदेह कोण सौमित्रा ॥ १०० ॥
ऐकतां श्रीरामाचें वचन । शरबंधी पहुडे लक्ष्मण ।
त्याची सवे रघुनंदन । शरबंधी जाण पहुडला ॥ १ ॥
रामलक्ष्मण शरबंधनात पडलेले पाहून इंद्रजिताचे लंकेत आगमन :
सव्यहस्तें धनुष्यबाण । दोघे देखोनि विसंज्ञ ।
इंद्रजित हरिखला संपूर्ण । भेरी निशाण त्राहाटिलें ॥ २ ॥
करोनियां वाजंत्राचा गजर । पुढें नाचती निशाचर ।
रणीं जिंतिले रामसौमित्र । सांगे समग्र लंकेशा ॥ ३ ॥
संस्तूयमानः स तु यातुधानै पित्रे च सर्वं हृषितोऽभ्युवाच ।
तयोस्तदासादितयो रणाग्रे मुमोह सैन्यं हरियूथपानाम् ॥११॥
सरामसौमित्रिमथाप्रमेयं विव्याध सर्वं सहसा रणाग्रे ।
सर्वे विषण्णा विगतप्रभाश्च न चापि किंचित्प्रतिपेदिरे स्म ॥१२॥
शरबंधेंसीं बांधोनी वैरी । इंद्रजित प्रवेशतां नगरीं ।
भाट गर्जाती कैंवारी । निशाचरीं स्तुतिवाद ॥ ४ ॥
शरबंधी रामसौमित्र । बांधिले वानर समग्र ।
इंद्रजित हर्षे निर्भेर । सांगे सत्वर लंकेशा ॥ ५ ॥
शरबंधी बांधितां जाण । वीर्यधैर्यक्षीण ।
मुख्य करोनी रामलक्ष्मण । आंगवण न करवे ॥ ६ ॥
शरबंधाचें लक्षण । लागतांचि सूर्यकिरण ।
अवघियांचें जातील प्राण । कोणासी कोण सोडवील ॥ ७ ॥
श्रीरामकटकीं शरपंजर । शरबंधी बांधले वानर ।
इंद्रजित विजयी महावीर । वर्षे निर्भर लंकेश ॥ ८ ॥
एका जनार्दना शरण । मिथ्या शरबंधी रामलक्ष्मण ।
स्वयें पडोनि आपण । ब्रह्मवरदान प्रतिपाळिती ॥ १०९ ॥
स्वति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे । एकाकारटीकायां
रामलक्ष्मणशरबंधनं नाम द्वात्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३२ ॥
ओंव्या ॥ १०९ ॥ श्लोक ॥ १२ ॥ एवं ॥ १२१ ॥