रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 39 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 39

अध्याय 39

इंद्रजिताचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लक्ष्मण व वानरसैन्यासह हनुमंत मेघपृष्ठी गेला :

इंद्रजित जातां मेघपृष्ठी । हनुमान त्याची न सांडी पाठी ।
निर्दळावया महाकपटी । उठाउठी पावला ॥ १ ॥
करावया इंद्रजिताचा घात । लक्ष्मण घेवोनियां हातांत ।
वेगें वाढला हनुमंत । मेघापर्यंत साटोपें ॥ २ ॥
वानरसैन्यासमवेत । तळीं असतां शरणागत ।
छळणें इंद्रजित करी घात । रक्षणार्थ कपि योजी ॥ ३ ॥
बिभीषण लक्ष्मण । आणि समस्त वानरगण ।
लोम तुटों नेदीं जाण । आंगवण पहा माझी ॥ ४ ॥
पुच्छाचिया आंकोड्याआंत । वानर आणि शरणागत ।
बैसवोनियां समस्त । वज्रकवचात राखिले ॥ ५ ॥
येरीकडे हनुमंत । करावया इंद्रजिताचा घात ।
खवळला रणाआंत । तोही वृत्तांत अवधारा ॥ ६ ॥
ठाणमाण धनुष्यबाण । कपिकराग्रीं लक्ष्मण ।
अंगी आदळतां जाण । इंद्रजित पूर्ण हडबडिला ॥ ७ ॥
कैसेनि आला पैं हा येथ । घेवोनि आला हनुमंत ।
तें देखोनि इंद्रजित । चळी कांपत अति धाकें ॥ ८ ॥
कायसें बापुडें लक्ष्मण । निधडी कपीची आंगवण ।
मजसीं करावया रण । आणिला आपण सौ‍मित्र ॥ ९ ॥
सुरनरां अगम्य पूर्ण । तें हें माझें गुप्तस्थान ।
तेथेंही आणिला लक्ष्मण । वौरी पूर्ण हनुमंत ॥ १० ॥
इंद्रजितासी म्हणे लक्ष्मण । सांडून पळालासी रण ।
कपटें करावें छळण । हेचि आंगवण तुजपासीं ॥ ११ ॥
इंद्र जिंतिला म्हणविसी । शेखीं संग्रामी पळसी ।
लाज नाहीं तुजसी । येवोनि लपसीं दुर्गमीं ॥ १२ ॥
हनुमंताचा निजधर्म । दुर्गम तें तें आम्हां सुगम ।
ऊठ वरता करीं संग्राम । इंद्रजित परम निखंदिला ॥ १३ ॥
वर्मीं खोंचला निशाचर । कांही न देववे उत्तर ।
सज्जोनियां चाप शर । युद्धा सत्वर मिसळला ॥ १४ ॥
त्यासीं करावया रण । संमुख चालिला लक्ष्मण ।
धनष्या वाहोनयां गुण । निर्वाणबाण सज्जिले ॥ १५ ॥
एक गज एक केसरी । एक नर एक नरहरी ।
एक मुरु एक मुरारी । ऐसियापरी मिसळले ॥ १६ ॥
एक सर्प एक सर्पारी । एक त्रिपुरी एका त्रिपुरारी ।
एक शंबर एक शंबरारी । ऐसियापरी मिसळले ॥ १७ ॥
दोघांचेंही शरजाळ । सुटतां व्यापिलें अंतराळ ।
बाणीं खिळलें भूरळ दोघे चपळ लघुहस्तें ॥ १८ ॥
येरयेरांचा प्राणांत । करावया खवळले अत्यद्‍भुत ।
वर्में कर्में घात पात । घाय हाणित लघुवेगें ॥ १९ ॥
दोघे वीर संग्रामश्रेष्ठ । शस्त्रास्त्रवेत्ते अति वरिष्ठ ।
दोघे वीर सुभट । रणसंनिष्ठ साटोंपें ॥ २० ॥
इंद्रजिताचे दुर्धर बाण । लक्ष्मणें केले तृणासमान ।
सौ‍मित्राचे शर दारुण । सर्वांगीं पूर्ण खडतरले ॥ २१ ॥
जेंवी तृणांकुर गिरीवर । तेंवी बाणीं खिळिला निशाचर ।
सर्वांगीं वाहे रुधिर । इंद्रजित थोर हडबडिला ॥ २२ ॥
इंद्रजिताची शौर्यशक्ती । शस्त्रास्त्ररणव्युत्पत्ती ।
लक्ष्मणें नेली भस्मांतीं । संग्रामी ख्याती लावोनी ॥ २३ ॥
सौ‍मित्र योद्धा अति दारुण । संमुख भिडतां घेईल प्राण ।
त्यासीं करावया छळण । मांडिलें विंदान कपटाचें ॥ २४ ॥
रथ सारथी नभोगत । स्वयें संग्रामीं करोनि गुप्त ।
अदृश्यगतीं बाण विंधित । अतर्क्यघात संग्रामीं ॥ २५ ॥

हनुमंतापुढे इंद्रजिताचे कपट निष्कळ ठरते :

मारावया बिभीषण । गुप्तगतीं विंधी बाण ।
हनुमान नित्य सावधान । सांडिले छेदून पुच्छाग्रीं ॥ २६ ॥
लांगूलवज्रकवचाआंत । हनुमंते राखिले स्वस्थ ।
न चले बिभीषणासीं घात । तळमळित इंद्रजित ॥ २७ ॥
मुख्य वैरी हनुमंत । त्याचा करावया निःपात ।
सारथी धांविन्नला गुप्त । गदाघात हाणावया ॥ २८ ॥
गदा हाणितां आतुर्बळी । घायें गदा जाली रांगोळी ।
सारथी आदळला भूतळीं । अति तळमळी आघातें ॥ २९ ॥
हनुमंतें हाणितां लाथ । सवेग सारथी जाला गुप्त ।
पळोनि गेला रथाआंत । भाग्यें प्राणांत चुकला ॥ ३० ॥
मारावया हनुमंत । सारथी होवोनि गेला गुप्त ।
लक्ष्मण झोंबला संग्रामांत । करावया घात सारथ्याचा ॥ ३१ ॥
लक्ष्मण आणि हनुमंत । दोघे क्षोभले रणांत ।
इंद्रजितानें केला छळणार्थ । तोही वृत्तात अवधारा ॥ ३२ ॥
रथ घडाघडी पश्चिमेसीं । वारु हिंसती उत्तरेसीं ।
बाण विंधित दक्षिणेसीं । करी पूर्वेसीं सिंहनाद ॥ ३३ ॥
कपटी इंद्रजित संग्रामांत । कांही केल्या नव्हे अभिव्य्क्त ।
लक्ष्मण होता चिंताग्रस्त । तेणें हनुमंत क्षोभला ॥ ३४ ॥
पुच्छ तळपतां आकाशीं । रथ आकळिला वारुवेंसीं ।
छळणें पळणें सिंतरावयासी । कपिपुच्छेंसीं चालेना ॥ ३५ ॥
अति गुप्तत्वें गगनाआंत । विद्युत्प्राय जो तळेपे रथ ।
तो पुच्छाग्रें बांधोनि हनुमंत । केला अभिव्यक्त संग्रामीं ॥ ३६ ॥
खुंटलें इंद्रजिताचें छळणें । खुंटलें रथाचें पळणें ।
खुंटले आभिचारिक करणे । खुंटलें जाणें यज्ञवाटा ॥ ३७ ॥
खुंटलें दशमुख देखणें । खुटलें लंकेमाजी जाणें ।
खुंटले जीवितेंसीं जिणें । ऐसें करणें कपिपुच्छें ॥ ३८ ॥
मुख्य वैरी हनुमंत । इंद्रजित वज्रघाय हाणित ।
वज्र भंगोनि लचके हात । मग कुंथत संग्रामीं ॥ ३९ ॥
माझ्या निजवज्राचा घात । करिता मुख्य हनुमंत ।
त्यासी न चले घातपात । इंद्रजित अति दुःखी ॥ ४० ॥
येथून खुंटली यज्ञवाट । खुंटली लंकेची निजवाट ।
देखणें ठेलें दशकंठ । पुच्छाग्रें स्पष्ट बांधलों ॥ ४१ ॥
मोकळा असता माझा रथ । तरी मी जातों हातोहात ।
हनुमंतें बांधिलो येथ । रणप्राणांत कपिपुच्छें ॥ ४२ ॥
इंद्रजित होतां चिंतामग्न । येरीकडे लक्ष्मण ।
सज्जोनियां धनुष्यबाण । आला आपण संग्रामा ॥ ४३ ॥
अनुलक्षोनि निशाचर । उपहासें बोले सौ‍मित्र ।
संग्रामशीळ अति गंभीर । वाक्य खडतर अनुवादे ॥ ४४ ॥
वीर शूर मिरविसी ख्याती । शेखीं लपसी अव्यक्तीं ।
संग्रामशीळ तें छळणोक्ती । कपटमूर्ति महापापी ॥ ४५ ॥
ऐसें बोलोनि आपण । रथ छेदावया जाण ।
बाण घेतला अति कठिण । अति दारुण अनिवार्य ॥ ४६ ॥

अथ राक्षससिंहस्य कालान्कनकभूषणान् ।
शरैश्चतुर्भिः सौ‍मित्रिर्विव्याध चतुरो हयान् ॥१॥
धनुर्मेघप्रसूतेन यंतुर्जीवितमाददे ।
सयंतरि महातेजा निहते रावणात्मजे ॥२॥
प्रजहौ च स्मुद्धर्ष विवर्णश्च बभूव ह ।
विषण्नवदनं दृष्ट्वा रावणिं हरियूथपाः ॥३॥
प्रहर्षमतुलं गत्वा रथमस्य व्यपोथयन् ॥४॥

इंद्रजिताच्या अश्वसारथ्यांचे लक्ष्मणाकडून वध :

छेदावया इंद्रजिताचा रथ । बाण कनकपत्री सुशोभित ।
प्रतापतेजें झगझगित । स्वयें विंधित सौ‍मित्र ॥ ४७ ॥
त्याचे करावया निवारण । इंद्रजित विंधी अमित बाण ।
परी तो अनिवार दारुण । अणुप्रमाण ढळेना ॥ ४८ ॥
चहूं बाणांचा मार । देखोनियां अनिवार ।
इंद्रजित सांडितां रहंवर । चार्‍ही वारु मारिले ॥ ४९ ॥
वारु पडतांचि क्षितीं । सवेग मारावया सारथी ।
सौ‍मित्रें बाण सज्जिला सीती । साटोपवृत्ति सन्नद्ध ॥ ५० ॥
इंद्रचापासमान चाप । बाण सज्जिला काळकल्प ।
देखोनि सारथ्या महाकंप । कपटानुरुप छळच्छद्मी ॥ ५१ ॥
सारथी मायालघुलाघवें । सवेग जंव पळून जावें ।
तंव कपिपुच्छें बांधिला पाहें ढळो न लाहे सर्वथा ॥ ५२ ॥
कपिपुच्छें हातपायीं । बांधलेहे दिसत नाहीं ।
ढळों नेदी ठायींच्या ठायीं । केले कायी लक्षेना ॥ ५३ ॥
सारथी पाताळीं रिघतां । कपिपुच्छें ओढिजे वरता ।
सवेग आकाशीं गुप्त होतां । वाजती माथां पुच्छाग्रटोले ॥ ५४ ॥
तंव लक्ष्मणाचा बाण । घेऊं सरला त्याचा प्राण ।
सारथी पडतांचि जाण । करी रुदन इंद्रजित ॥ ५५ ॥
होतां सारथ्याचा घात । माझा बुडाला पुरुषार्थ ।
ऐसा इंद्रजित तळमळित । दुःखभिभूत अति दुःखी ॥ ५६ ॥
गेली वाढीव गेलें वीर्य । गेली शक्ति गेलें शौर्य ।
गेलें संग्रामऔदार्य । रणीं धैर्य न धरवे ॥ ५७ ॥
दुःख दाटलें दारुण । अश्रुधारा स्रवती नयन ।
इंद्रजित होतां दीनवदन । वानरगण उल्लासती ॥ ५८ ॥
इंद्रजिता होतां दुःखाभिभूत । वानरवीर जे समस्त ।
तिहीं भांगिला त्याचा रथ । नामे गर्जत स्वानंदें ॥ ५९ ॥

इंद्रजित – लक्ष्मण बाणवर्षावाचे युद्ध :

गर्जतां देखोनि थोर वानर । क्षोभला इंद्रजित दुर्धर ।
रणीं मारावया सौ‍मित्र । दुर्धर शर वर्षत ॥ ६० ॥
त्याचपरी सौ‍मित्र क्रूर । बाण वर्षे घोरांदर ।
दोघे वीर अति दुर्धर । येरं येर नाटोपती ॥ ६१ ॥

अन्योन्यं निशितैबाणैर्जघ्नतुर्भीमविक्रमौ ।
परस्परवधे वीरौ निविष्टौ तौ महाबलौ ॥५॥
चक्रतुर्घोरमन्योन्यं शरजालाकुलं रणम् ।
ललाटे लक्ष्मणं बाणैः सुघेरैस्त्रिभिरिंद्रजित् ॥६॥
अमेद्यं कवचं मत्वा विव्याध लघुहस्तवित् ।
अर्दितस्त्वथ बाणौघैस्तेनामित्रेण लक्षणः ॥७॥

येरयेरांचा घ्यावा प्राण । धगधगीत विंधिती बाण ।
बाणासवें धांव घेऊन । हाणिती जाणवज्रमुष्टी ॥ ६२ ॥
हाणितांचि वज्रमुष्टी । दुजा ओपी कोंपाराटी ।
घायें मूर्च्छित पाडी सृष्टीं । वीर जगजेठी संग्रामीं ॥ ६३ ॥
दोघे उसळतीं महाबळी । दोघे भिडती अंतराळी ।
दोघे उतरोनि भूतळीं । शरजाळीं वर्षत ॥ ६४ ॥
दोघे विंधितां बाण । बाणीं संपूर्ण केलें रण ।
रणीं नाटोपे लक्ष्मण । इंद्रजित आपण विचारी ॥ ६५ ॥
वज्‍रकवची लक्ष्मण । त्यासीं न भेदती बाण ।
लल्लाटदेश वर्मस्थान । विंधी आपण तीं बाणीं ॥ ६६ ॥
ब्रह्मांडीं भेदतांचि बाण । मूर्च्छित पाडिला लक्ष्मण ।
कांही नाठवे पैं स्फुरण । आपणां आपण विसरला ॥ ६७ ॥
विकळ देखोनि लक्ष्मण । त्याचा सवेग घ्यावा प्राण ।
इंद्रजित वर्षे अमित बाण । अति दारुण साटोपें ॥ ६८ ॥
सौ‍मित्र वीर महाबळी । औटकोटी रोमावळी ।
ऐसा खिळितां बाणजाळीं । पडे धरातळीं मूर्च्छित ॥ ६९ ॥
सर्वांग भेदतांचि शरीं । हनुमंताच्या हातावरी ।
मूर्च्छा दाटली सौ‍मित्रीं । निशाचरीं देखिजे ॥ ७० ॥
इंद्रजित गर्जत आपण । रणीं पाडिला लक्ष्मण ।
आतां मारितां बिभीषण । याचा प्राण कोण राखे ॥ ७१ ॥
बिभीषणाचा निजप्राण । इंद्रजित घेवों पाहे आपण ।
ऐसें ऐकतां वचन । आलें स्फुरण सौ‍मित्रा ॥ ७२ ॥
देहीं देहाची विकळता । ते दवडोनि सत्वावस्था ।
राखावया शरणागता । होय उठता सौ‍मित्र ॥ ७३ ॥
श्रीरामाचें नाम स्मरतां । पळाली देहाची विकळता ।
राखावया शरणागता । होय उठता सौ‍मित्र ॥ ७४ ॥
सावध श्रीराम आठवितां । देही असोन विदेहता ।
तरी राखावया शरणागता । होय उठता सौ‍मित्र ॥ ७५ ॥
शरणागता वज्‍रपंजर । तो हा सत्य सौ‍मित्र ।
चापबाणेंसीं सत्वर । महावीर उठिला ॥ ७६ ॥
माझी देखोनि विकळवृत्ती । भय न धरावें चित्तीं ।
मागें न सरावें मारुती । हें मी तुजप्रती मागतों ॥ ७७ ॥
मागें सरतां युद्धस्थिती । सूर्यवंशा अपकीर्ती ।
माझी बुडाली शौर्यवृत्ती । यश कीर्ति रामाची ॥ ७८ ॥
तिळभरी मागें सरणें । हेंचि आम्हांसी गा उणें ।
मागें सरोनि जीवें जिणें । त्याहून मरणे वरिष्ठ ॥ ७९ ॥
ऐकोनि सौ‍मित्राचें बोलणें । हनुमंत जीवें प्राणें ।
त्यासीं करितसें निंबलोणें । शौर्यगुणें संतोष ॥ ८० ॥
घायीं झाल्याही जर्जर । धैर्य न सांडी सौ‍मित्र ।
तेणें विस्मित वानर । विस्मित वीर हनुमंत ॥ ८१ ॥
पाठींसीं घालोनि शरणागत् । करावया इंद्रजिताचा घात ।
खवळला काळकृतांत । रणप्राणांत सौ‍मित्र ॥ ८२ ॥
ललाटीं लागतां तीन बाण । सौ‍मित्र पडिला मूर्च्छापन्न ।
सवेंचि होतां सावधान । कैसें चिन्ह शोभत ॥ ८३ ॥

शरैस्त्रिभिरदीनात्मा ललाटस्थैः शरोत्तमैः ।
लक्ष्मणः शुशुभे वीरस्त्रिशृंग इव पर्वतः ॥८॥
उद्धवर्ष शरान्घोरान्‍रावणात्मजवारणान् ।
तमाशु प्रतिविव्याध लक्ष्मणः पंचभिः शरैः ॥९॥
ततः शोणितदिग्धांगौ लक्ष्मणेंद्रजितावुभौ ।
रणे विरेजतुर्वीरौ पुष्पिताविव किंशुकौ ॥१०॥

मस्तकीं लागतां तिन्ही बाण । व्यथा न मानी लक्ष्मण ।
रणीं दिसे शोभायमान । त्रिशुंगी जाण पर्वत ॥ ८४ ॥
रावणसुत रणोन्मत्त । रणीं खवळला मदोन्मत्त ।
त्यासीं मयूरपिच्छांकित । बाण विंधित सौ‍मित्र ॥ ८५ ॥
पुष्पित तरु पर्वतावरी । तैसे बाण सुवर्णपत्री ।
शोभती लक्ष्मणाच्या शिरीं । संग्रामगिरी डुल्लत ॥ ८६ ॥
मयूरपिच्छांकित शर । अंगी रुतले अपार ।
पिच्छ पसरोनि नाचे मयूर । तेंवी निशाचर शोभत ॥ ८७ ॥
लागतां सौ‍मित्राचें बाण । इंद्रजित क्षोभला दारुण ।
घेवोनि पांचही निर्वाणबाण । रणीं लक्ष्मण विंधिला ॥ ८८ ॥
घातपात वर्मस्थ । लघुलाघवें घाय देत ।
घायें घाय निवारित । दोघे उन्मत्त रणरंगी ॥ ८९ ॥
परस्परें घाय देत । दोघे जाले रुधिरोक्षित ।
जैसे किंशुक वसंतांत । तैसे शोभत रणरंगीं ॥ ९० ॥
येरयेरां मारणें आपण । निर्वाणयुद्ध अति दारुण ।
काढून वरदाचे बाण । घ्यावया प्राण विंधिती ॥ ९१ ॥

स लक्ष्मणाय संक्रुद्धः शक्रजिच्छरमाददे ।
उत्तमं रक्षसां मध्ये यमदत्तं महाबलः ॥११॥
तं समीक्ष्य महातेजा महेषुस्तेन सन्धितुम् ।
लक्ष्मणौ व्याददे बाणमन्यं भीमपराक्रमः ॥१२॥
कुबेरेण स्वयं दत्तं स्वप्ने बाणं महात्मना ।
दुर्जयं दुर्विषंह्य च सेंद्रैरपि सुरासुरैः ॥१३॥
ताभ्यां तु धनुषि श्रेष्ठे संहितौ सायकोत्तमौ ।
विकृष्यमाणौ वीराभ्यां भृशं जज्वलतुः श्रियम् ॥१४॥
तौ भासयन्तावन्योन्यं धनुर्भ्यां विशिखौ च्युतौ ॥१५॥

इंद्रजिताच्या यमदत्त वरदबाणां आधीच लक्ष्मण इंद्रजिताचा हात तोडतो :

घ्यावया लक्ष्मणाचा प्राण । यमदत्त वरदबाण ।
इंद्रजित सज्जी आपण । अति निर्वाण संग्राम ॥ ९२ ॥
इंद्रजितें देखोनि निजप्राणांत । मग निर्वाणा घातला हात ।
वरदबाण यमदत्त । स्वयें सज्जित संग्रामीं ॥ ९३ ॥
यमदत्त वरदबाण । रणीं शत्रूचा घ्यावा प्राण ।
ऐसें त्यांचे वरदान । निवारण असेना ॥ ९४ ॥
इंद्रजित सज्जितां दुर्धर बाण । स्वयें सावध लक्ष्मण ।
स्वप्नदत्त कुबेरबाण । सज्जी आपण साटोपें ॥ ९५ ॥
लक्ष्मणें नग्न देखतां सीता । विकल्प नुपजे चिता ।
कामकुबेर ये एकात्मता । स्वप्नावस्था वरदोक्ती ॥ ९६ ॥
कामें दिधला निष्काम बाण । छेदक स्थूळलिंगकारण ।
कुबेर वदला वरदान । जय संपूर्ण पावसी ॥ ९७ ॥
ज्यावरी योजिसी हा बाण । त्यांचें करील निर्दळण ।
कुबेर वदे वरदान । जाला लक्ष्मण जागृती ॥ ९८ ॥
वर वदला स्वप्नस्थितीं । तो बाण उरलासें ।
जागृतीं । इंद्रजितासीं लावावया ख्याती । तोचि सीती योजिला ॥ ९९ ॥
दोघे वीर पडिपाडी । धनुष्य ओढितां कानाडी ।
लक्ष्मण न वांचे निर्वडी । हडबड गाढी सुरवरां ॥ १०० ॥
यमवरदाचा बाण । अवश्य याचा घेईल प्राण ।
कैसेनि वांचेल लक्ष्मण । चिंता गहन स्वर्गस्थां ॥ १ ॥
भूतळींचे ऋषीश्वर । सिद्ध चारण विद्याधर ।
अवघे करिती हाहाकार । रणीं सौ‍मित्र केंवी वांचे ॥ २ ॥
इंद्रजित बाण सोडी । तंव सौ‍मित्र रणनिर्वडीं ।
समूळ त्याचा बाहु खुडी । पाडिला बुडीं सचाप ॥ ३ ॥
बाहु छेदितां सत्वर । आक्रंदला निशाचर ।
सुरवर करिती जयजयकार । धन्य सौ‍मित्र धनुर्वाडा ॥ ४ ॥
त्याचा येतां शर दारुण । बाणामागें विंधी बाण ।
बाहु पाडिला छेदून । धन्य लक्ष्मण धनुर्वाडा ॥ ५ ॥
यमदत्त वरदबाण । मूळ गुह्य वदे आपण ।
इंद्रजितहस्तें पापाचरण । पुरश्चरण सौ‍मित्रें ॥ ६ ॥
श्रीरामाचा सहोदर । तो तंव आमुचाही सुमित्र ।
बाणें करोनि नमस्कार । रिघे सत्वर तूणीरीं ॥ ७ ॥
जय द्यावया सुमित्रासुता । सेवा घडावया श्रीरघुनाथा ।
बाण निघाला लक्ष्मणभातां । करावया घाता इंद्रजिताच्या ॥ ८ ॥
बाहू छेदिला सचापशर । रणीं खवळला निशाचर ।
खडगहस्तीं अति दुर्धर । मारुं सौ‍मित्र धांविन्नला ॥ ९ ॥
रुधिर वाहत धरधरां । बाण तोडित खड्गधारा ।
मारावया सौ‍मित्रा । निशाचर साटोप ॥ ११० ॥
माझा झाल्या भुजपात । मी नाहीं झालो शंकित ।
झणीं श्लाघसी तूं येथ । करीत घात निमेषार्धें ॥ ११ ॥
बाहु तुटला तें नाठवत । खड्ग घेवोनि तळपत ।
उल्लाळ देवोनि उसळा । करावया घाअ सौ‍मित्रा ॥ १२ ॥
थरक सरक चवक । दावित शौर्याची आगळिक ।
आला सौ‍मित्रा संमुख। खड्गें मस्तक छेदावया ॥ १३ ॥
सौ‍मित्र सोडी जे जे बाण । खड्धारा तोडी आपण ।
रणीं मारावया लक्ष्मण । आला गर्जोन खडगेंसीं ॥ १४ ॥
इंद्रजित देखोनि दुर्धर । रणी खवळला सौ‍मित्र ।
दंडावया निशाचर रुद्रास्त्र संयोजी ॥ १५ ॥

सौ‍मित्रिरथ संक्रुद्धः संदधेऽस्त्रं सुदारुणम् ।
रौद्रं स चेंद्रजित्क्रद्धो व्यसृजत्तदनंतरम् ॥१६॥

सबीजमंत्रें समंत्र । अभिमंत्रोनि रुद्रास्त्र ।
सवेग सोडी पैं सौ‍मित्र । निशाचर दंडावया ॥ १६ ॥
येतां देखोनि शस्त्रपात । इंद्रजित खड्गधारा हाणित ।
घायीं ठिणग्या उसळत । लखलखित आकाशीं ॥ १७ ॥
घाव चुकवावया नेहटीं । पलों जातां गुप्त परिपाठीं ।
रुद्रास्त्रें पुरविली पाठी । कपिपुच्छासाठीं पळवेना ॥ १८ ॥
पळों जातां पळवेना । लपों जातां लपवेना ।
घाव वारितां निवारेना । लागली नयना टकमक ॥ १९ ॥
सौ‍मित्राचा शस्त्रघात । खड्गेंसीं छेदून हात ।
पाडिला पैं लंकेआंत । सुर गर्जत स्वानंदें ॥ २० ॥
छेदितां दोन्ही भुजाभार । निःशस्त्री जाला निशाचर ।
शस्त्रें न हाणितां सौ‍मित्र । इंद्रजित थोर क्षोभला ॥ २९ ॥

लक्ष्मणाला ग्रासण्यासाठी इंद्रजिताची धाव :

आम्ही गिळावें मनुष्यासी । मुख्य हातेर हें आम्हांसीं ।
तुज मी गिळीन निमिषेंसीं । अति आवेशीं धांविन्नला ॥ २२ ॥
दोहीं बाहीं वाहतां रुधिर । रणीं खवळला निशाचर ।
गिळावया सौ‍मित्र । पसरोनि वक्त्र चालिला ॥ २३ ॥
अमित विंधितांही बाण । मागें न सरे आपण ।
गिळावया लक्ष्मण । पसरोनि वदन धांविन्नला ॥ २४ ॥
ग्रहणीं राहु गिळी चंद्र । तैसा गिळावया सौ‍मित्र ।
धांविन्नला निशाचर । विशाळ वक्त्र पसरोनी ॥ २५ ॥
साधारण बाणघात । तेणें मरे इंद्रजित ।
त्याचा करावया शिरःपात । निर्वाणशर घेत सौ‍मित्र ॥ २६ ॥

तमिंद्रदत्तं सौ‍मित्रिः समरेष्वपराजितः ।
शरश्रेष्ठं धनुःश्रेष्ठे नरश्रेष्ठोऽभिसंदधे ॥१७॥
संधाय च धनुःश्रेष्ठं विकर्षन्निदमब्रवीत् ।
लक्ष्मीवांल्लक्ष्मणो वाक्यमर्थसाधनमात्मनः ॥१८॥
धर्मात्मा सत्यसंधश्च रामो दाशरथिर्यथा ।
पौरुषे चाप्रतिद्वंद्वस्तथेमं जहि राक्षसम् ॥१९॥
इत्युक्त्वा बाणमांकर्ण विकृष्य तमाजिह्यगम् ।
लक्ष्मणः समरे वीरः ससर्जेन्द्रजितं प्रति ॥२०॥
तच्छिरः सशिरस्त्राणं श्रीमज्ज्वलितकुंडलम् ।
प्रमथेंद्रजितः कायात्पातयामास भूतले ॥२१॥

लक्ष्मणाकडून इंद्रदत्त – वरदबाणाने इंद्रजिताचा शिरच्छेद :

घ्यावया इंद्रजिताचा प्राण । इंद्रदत्त वरदबाण ।
सौ‍मित्रें सज्जिला आपण । ज्यासीं निवारण असेना ॥ २७ ॥
बाणश्रेष्ठ वीरश्रेष्ठ । धनुष्य वाहिलें अतिश्रेष्ठ ।
कानाडी ओढिली यथेष्ट । शत्रुकंठ छेदावया ॥ २८ ॥
हाणितां बहुत सस्त्रघात । नव्हे इंद्रजितशिरःपात ।
यालागीं निर्वाणबाण अद्‍भुत । स्वयें सज्जित सौ‍मित्र ॥ २९ ॥
युद्ध मांडिलें निर्वाण । सज्जोनि निर्वाणींचा बाण ।
घालोनि श्रीरामाची आण । विंधी आपण सौ‍मित्र ॥ १३० ॥
कैसे कैसे रामशपथ । लक्ष्मण घालिता झाला येथ ।
सावधान तो वृत्तांत । श्रोते श्रीमंत परिसोत ॥ ३१ ॥
श्रीराम धर्माधर्मातीत । तोचि धर्मात्मा सुनिश्चित ।
येणें सत्यें शिरःपात । हो रणांत शत्रूचा ॥ ३२ ॥
श्रीराम सत्यासत्यातीत । श्रीराम सत्याचें निजसत्य ।
जरी हें श्रीरामसत्यव्रत । हो शिरःपात शत्रूचा ॥ ३३ ॥
श्रीराम स्त्रीपुरुषातीत । तोचि स्त्रीपुरुष समस्त ।
हेंचि श्रीरामाचें निजव्रत । तरी हो शिरःपात शत्रूचा ॥ ३४ ॥
श्रीराम दशरथाचा सुत । तोचि ब्रह्म सदोदित ।
येणें सत्यें इंद्रजित । पडो रणांत या बाणें ॥ ३५ ॥
श्रीराम स्त्रीपुत्रीं युक्त । सकळ कुटुंबेंसीं नांदत ।
तो राम सत्य द्वैतातीत । हो शिरःपात बाणें येणे ॥ ३६ ॥
रामा नाहीं द्वंद्वभान । तो सर्वांगी चैतन्यघन ।
येणें शपथें शिरःपतन । पावो आपण इंद्रजित ॥ ३७ ॥
सकळ भूतें श्रीरघुनाथ । हें वेदशास्त्रां सत्य संमत ।
तरी इंद्रजिताचा शिरःपात । हो रणांत बाणें येणें ॥ ३८ ॥
माझा आत्मा श्रीरघुनाथ । हेंचि श्रीरामाचें नित्यव्रत ।
येणें इंद्रजिताचा शिरःपात । हो रणांत बाणें येणें ॥ ३९ ॥
घालितां श्रीरामाची आण । इंद्रजिताचा गेला प्राण ।
लक्ष्मणें विंधोनियां बाण । शिर सत्राण छेदिलें ॥ १४० ॥
धन्य निधडा सौ‍मित्र । विंधोनियां बाण दुर्धर ।
गगना उडवोनियां शिर । निशाचर पाडिला ॥ ४१ ॥

ततः स निपपाताशु धरण्यां रावणात्मजः ।
कवची सशिरस्त्राणो विप्रविद्धशरासनः ॥२२॥
चुक्रुशुस्ते ततः सर्वे वानराः सबिभीषणांः ।
प्रादृष्यन्निहते तस्मिन्देवा वृत्रवधे यथा ॥२३॥
यथांतरिक्षे भूतानामृषीणां च महात्मनाम् ।
बभूव जयसन्नादो गंधर्वाप्सरसामपि ॥२४॥

मुकुट कुंडले शिरस्त्राण शिरी । कवची खड्गी धनुर्धारी ।
शिर छेदोनियां बाणाग्रीं । धरेवरी पाडिला ॥ ४२ ॥
इंद्रजित पडतां क्षितीं । वदे सौ‍मित्राची स्तुती ।
तूं परमात्मा ब्रह्ममूर्तीं । मी परम मुक्ती पावलों ॥ ४३ ॥
नमस्कार हनुमंता । नमन वानरां समस्तां ।
नमस्कार श्रीरघुनाथा । परम मुक्तता पावलों ॥ ४४ ॥
इंद्रजित पडतां धरेवरी । वानरवीरां हर्ष भारी ।
श्रीरामनामाच्या गजरीं । जयजयकारी गर्जती ॥ ४५ ॥
विजयी झाला लक्ष्मण । हरिखें नाचे बिभीषण ।
स्वर्गीं उल्लासले सुरगण । भेरी निशाणें त्राहाटिलीं ॥ ४६ ॥
गंधर्व गाणीं गाती । हर्षें अप्सरा नाचती ।
दिव्य सुमनें नेणों किती । सुर वर्षती स्वानंदें ॥ ४७ ॥
इंद्र चंद्र वरुण कुबेर । हरिखें नाचती समग्र ।
वृत्रवधाहूनि फार । हर्ष निर्भर सुरसिद्धां ॥ ४८ ॥
आनंदाच्या सुखनिर्भरीं । स्वर्गीं गिरागजरीं ।
सिद्धचारणऋषीश्वरीं । जयजयकारीं गर्जिजे ॥ ४९ ॥
धन्य सौ‍मित्र रामबंधु । केला इंद्रजिताचा वधु ।
एका जनार्दना स्वानंदु । परमानंद रामायणीं ॥ १५० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकाया
इंद्रजितवधो नाम एकोनचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥ ३९ ॥
ओंव्या ॥ १५० ॥ श्लोक ॥ २४ ॥ एवं ॥ १७४ ॥