रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 50 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 50

अध्याय 50

हनुमंत पर्वत पूर्वस्थळी ठेवतो

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लक्ष्मणाचे श्रीरामांना आणि सर्वाना वंदन :

रामस्मरणें लक्ष्मण । सवेग उठोनियां जाण ।
नमियेला रघुनंदन । बिभीषण नमियेला ॥ १ ॥
नमस्कारिलें सुग्रीवासी । नमन केलें अंगदासी ।
नमन सकळ वानरांसी । सौ‍मित्रें सकळांसी नमियेलें ॥ २ ॥

साधु साध्विति सुप्रीतः सुषेणं प्रत्यपूजयत् ।
उत्थितं भ्रातरं दृष्टवा रामो हर्षसमन्वितः ॥१॥
परिष्वज्य च सौ‍मित्रिं सबाष्पस्वेदमब्रवीत् ॥२॥

श्रीरामानां आनंद :

उठिला देखोनि लक्ष्मण । उल्लासे रघुनंदन ।
आलिंगोन सुषेण । काय आपण बोलत ॥ ३ ॥
तुझिया उपकारा उत्तीर्ण । सर्वथा न होईजे गा आपण ।
सौ‍मित्रासी जीवदान । दाता तूं सुषेण झालासी ॥ ४ ॥
ऐसा विनवोनि सुषेण । आलिंगिला आपण ।
सवेंचि धरोनि लक्ष्मण । हृदयीं जाण आलिंगी ॥ ५ ॥
कुरवाळितां अमृतहस्तीं । अंगी घायवण न दिसती ।
अस्थि सांधल्या यथास्थितीं । श्रीरघुपति स्पर्शतां ॥ ६ ॥
करोनि ओषधींचें मिष । वांचविलें सौ‍मित्रास ।
स्वसामर्थ्य पूर्ण परेश । परी कोणास कळेना ॥ ७ ॥
घेवोनि मोहाची बुंथी । बोलतसे सौ‍मित्राप्रती ।
भेटलासी ऊर्मिलापती । त्रिजगतीं सभाग्य ॥ ८ ॥
तुझे आंगींचा घावो । देखतांचि महाबाहो ।
मज प्राणांत झाला पहाहो । आठवितां देहो पुरेना ॥ ९ ॥
निजरुप देखोनि लक्ष्मणा । अति सुख झालें रघुनंदना ।
पौर्णिमेचा चंद्र जाणा । जेंवी पूर्ण सोळा कळीं ॥ १० ॥

सुषेण व हनुमंताबद्दल श्रीरामांची कृतज्ञता :

सुषेणा तूं महाचतुर । आणि हनुमान वीर कपींद्र ।
झाला दोघांचा कृतोपकार । बंधु सौ‍मित्र मज दिधला ॥ १२ ॥
वांचविला लक्ष्मण । मी वांचलो रघुनंदन ।
वांचले भरतशत्रुघ्न । सीता चिद्रत्‍न वांचली ॥ १२ ॥
बिभीषण शरणागत । अंगद सुग्रीव वानरनाथ ।
तिघी माता निश्चित । जन समस्त अयोध्येचे ॥ १३ ॥
हनुमान आणि सुषेण । याचि रीती आपण ।
स्तविता झाला लक्ष्मण । जीवदान तुम्हीं दिधलें ॥ १४ ॥

एवमुक्त्वा तु सौ‍मित्रिं राघवस्तं महायशाः
परिष्वजत सौ‍मित्रिं सुग्रीवः पवनात्मजः॥३॥

हनुमंताचे रामांना उत्तर :

ऐसें बोलतां रघुनंदन । आणि बंधु लक्ष्मण ।
येरीं लागोनियां चरणां । दोघां जणां आलिंगिलें ॥ १५ ॥
ऐकें स्वामी रघुनाथा । झणें उपकार घेसी माथां ।
आम्हीं मशकें तत्वतां । महिमा सर्वथा तीर्थाचा ॥ १६ ॥
तुझें चरणतीर्थ न घेतां । प्रयत्‍नचि झाला वृथा ।
घेतां तुझ्या चरणतीर्था । सावधानता सौ‍मित्रासीं ॥ १७ ॥
सामर्थ्य आपुलें लोपविसी । आणि उपकार माथां घेसी ।
महत्व वानरां देसी । निजमानसी कृपाळु ॥ १८ ॥
लोपवोनि स्वसामर्थ्या । महत्व देणें निजभक्तां ।
हें साजे एका रघुनाथा । दीन अनाथा कळे केंवी ॥ १९ ॥
ऐसें करोनियां स्तवन । घालोनियां लोटांगण ।
तंव सुग्रीव राजा आपण । रघुनंदना विनवीत ॥ २० ॥

सुग्रीवाची पर्वत पाहाण्याची इच्छा व रामाची आज्ञा :

चरणीं ठेवोनिया माथां । विनवीतसे रघुनाथा ।
अपूर्व देखोनि पर्वता । वानरां समस्तां उल्लास ॥ २१ ॥

अपूर्व तं गिरीं दृष्ट्वा कौतुहलसमन्वितः ।
विज्ञापयति सुग्रीवो राघवं स च लक्ष्मणः ॥४॥
कौतुहलसमाविष्टाः पर्वतारोहणं प्रति ।
दत्तानुज्ञा राघवेण सुग्रीवेणांगदेन च ॥५॥

पहावया पर्वतेंद्र । वानरां आल्हाद थोर ।
आज्ञा देणें सत्वर । श्रीरामाचंद्रा कृपाळुवा ॥ २२ ॥
ऐकोनि सुग्रीवाचें वचन । राम झाला हास्यवदन ।
तुझें आज्ञाउल्लंघन । शके कोण करावया ॥ २३ ॥
पर्वतावरी सुखें जावें । शिखरें शिखर पहावें ।
फळ जळ स्वीकारावें । तृप्त करावें वानरां ॥ २४ ॥
ऐसें रामें आज्ञापिलें । तंव सुग्रीवें मागुती विनविलें ।
देवें तेथें पाहिजे आलें । वचन मानिलें श्रीरामें ॥ २५ ॥

तं समारुरुहः शैलं नानारत्‍नोपशेभितम् ॥६॥

श्रीरामचंद्रासमवेत । वानर वळंघले पर्वत ।
नाना रत्‍नीं शोभत । जैसा दिसत रत्‍नाकर ॥ २६ ॥
विचित्र धातु शोभत । विचित्र दिसे जाळस्त्रोत ।
विचित्र सरोवर तेथ । कमळें शोभत विचित्र ॥ २७ ॥
विचित्र द्रुमवल्ली तेथ । विचित्र ओषधी अनंत ।
देखतां सौ‍मित्र विस्मित । आश्चर्य मानित श्रीराम ॥२८ ॥

सुषेणाचे वनस्पतीच्या उत्पत्तींचे कथन :

शोभा देखोनि पर्वतीं । सुग्रीव पुसे सुषेणाप्रती ।
दिव्यौषधी पर्वतीं । काय निमित्तीं राहिल्या ॥ २९ ॥
साद्यंत हा वृत्तांत । सुषेणा सांगे इत्थंभूत ।
पुसता जाळा वानरनाथ । ऐकोनि सांगत सुषेण ॥ ३० ॥

सुषेणोऽभ्यवदत्तांस्तु पूर्ववृत्तानि सूचयन् ।
इह विष्णुश्च ब्रह्मा च शक्रोऽग्निर्वरुणो यमः ॥७॥
लोकपालाश्च भगवान्कुबेरः सह राक्षसैः ।
एतद्रम्यं महास्थानं यत्र देवाः समागताः ॥८॥
संप्रीतैश्चप्सरोभिश्च ऋषिभिश्च महाव्रतैः ।
अत्र राहोःशिरश्छिन्नं विष्णुना प्रभाविष्णुना ॥९॥
जाता तत्रौषधिर्दिव्या विशल्यकरणी शुभा ।
इयं सा चेति दृष्ट्वा तां ददर्श परमौषधिम् ॥१०॥

ब्रह्मशाप इंद्रासी झाला । रत्‍नसमूह सागरीं पडला ।
म्हणोनि मंथनादर मांडिला । देवदैत्य मेळा मिळोनी ॥३१ ॥
लोकपाळ समस्त । यक्ष किन्नर समस्त ।
राक्षस पातले तेथ । ऋषि बहुत पाहूं आले ॥ ३२ ॥
देवांगना निजगजरीं । नृत्य करिती नानापरी ।
गंधर्व गाती सप्तस्वरीं । मंथन सागरीं पाहूं आले ॥ ३३ ॥
मंदर करोनियां रवी । वासुकी बीरडी वरवी ।
पुच्छ धरियेलें देवीं । मुख दैत्यीं धरियेलें ॥ ३४ ॥
मंदराद्रि जाईल रसातळा । म्हणोनि कूर्म तळीं राहिला ।
मंथनारंभ केला । अत्यादरेंकरोनि ॥ ३५ ॥
आरंभींच हालाहल । जाळीत जगतीतळ ।
उठिलें तत्काळ लोक । सकळ तळमळती ॥ ३६ ॥
जाळितां सकळ जनांसी । मग प्रार्थीलें शंकरासी ।
तेणें गिळिलें विषासी । जाळी त्यासी अनिवार ॥ ३७ ॥
शिव झाला कासाविसी । तो स्मरे भगवंतासी ।
येतां रामनाम मुखासीं । झाली विषाची उपशांती ॥ ३८ ॥
पुढें मंथन आरंभिलें । रत्‍नांचे संमूह निघाले ।
विभाग करुं आदरिलें । तेथें लागलें भांडण ॥ ३९ ॥
मद्य दिधलें दैत्यांसी । लक्ष्मीकौस्तुभ विष्णुसी ।
येर पाठवी स्वर्गासी । आला दैत्यांसीं अति क्रोध ॥ ४० ॥
मंथन करितां कष्टलों आम्ही । अमृत घेवोनि जाल तुम्ही ।
म्हणोनि उठिले संग्रामीं । रणभूमीं रणमारें ॥ ४१ ॥
सहज दैत्य बळवंत । वरी मद्यपानें उन्मत्त ।
युद्धा मिसळले अद्‍भुत । चेवांचा घात करतचि ॥ ४२ ॥
मंथन करितां श्रमले । देव क्षीणशक्ति झाले ।
दैत्य झोडीत उठिले । पळते झाले दश दिशा ॥ ४३ ॥
एक आरडती ओरडती । भेणें दश दिशा धांवती ।
धांव पाव गा श्रीपती । या आकांतीं संरक्षीं ॥ ४४ ॥
देखोनि देवांची करुणा । विष्णु कळवळिला ।
मना करिता झाला सूचना । दैत्य हननालागोनी ॥ ४५ ॥
रुपें जाहला तो मोहिनी । अति सुंदर त्रिभुवनीं ।
विश्व लाविलें ध्यनीं । दैत्य भुलवोनी मोहिले ॥ ४६ ॥
मिळोनि मोहिनीपासीं । वेढियेलें तियेसी ।
लागती वेळोवेळां पायांसी । तूं आम्हांसी अंगिकारीं ॥ ४७ ॥
ते न पाहे कोणाकडे । दैत्यसमूळ देखोनि रडे ।
फुंदफुंदो पायां पडे । आम्हांकडे पाहें पां ॥ ४८ ॥
अंगीकारीं आम्हांसी । करुं जें जें तूं सांगसी ।
नुल्लंघूं तुझिया वचनासी । घे भाकेसी आमुच्या ॥ ४९ ॥
ऐकोनि दैत्यांचे वचन । मोहिनी बोलिली आपण ।
परस्परें काय म्हणोन । तुम्हां भांडण लागलें ॥ ५० ॥
तो समूळ वृतांत । मज सांगावा साद्यंत ।
तुमचा कलह समस्ता । मी त्वरित छेदीन ॥ ५१ ॥
ऐकतां तें वचन । अवघे गेले भुलोन ।
सांगते झाले आपण । अपूर्व कथन युद्धाचें ॥ ५२ ॥
मंथनीं निघालें अमृत । अवघें देव नेवों पाहत ।
म्हणोनि आम्ही भांडत । हिरोन अमृत घ्यावया ॥ ५३ ॥
देखोनियां तुझी मूर्ती । अति उल्हास झाला चित्तीं ।
जें सांगसी ते निश्चितीं । आम्हीं चित्तीं मानिलें ॥ ५४ ॥
नुल्लंघूं तुझे वचन । घे आमुचें भाष्य प्रमाण ।
तुझ्या वचनालागीं जाण । जीव प्राण वेंचूं पैं ॥ ५५ ॥
अनुसरलेती वचनासीं । तरी बुझावीन दोघांसी ।
मद्यामृत समरसीं । उभय सेनेसी वाढीन ॥ ५६ ॥
वेगळालिया पंक्ती । उभयसेना बैसावी निगुती ।
गेलिया येरा पंक्तीं । दंड निश्चितीं मी करीन ॥ ५७ ॥
वचन मानलें सकळां । पंक्ती बैसल्या दोही पाळां ।
घट मायाकृत निर्मिला । लोकां सकळां अलक्ष ॥ ५८ ॥
भीतरीं केला पडदरा । उभय रस ओतिले सैरां ।
दैत्यां वाढिली सुरा । अमृतधारा देवांसी ॥ ५९ ॥
दैत्य सेविती कठरा वृत्ती । येर गोडिया मिटक्या देती ।
राहु धूर्त जाणे चित्तीं । आला गुप्तगतीं देवांमाजी ॥ ६० ॥
अमृत पडतां मुखांतरीं । चंद्रें दाविलें झडकरी ।
येरी सुदर्शन प्रेरी । कंठनाळ झडकरी छेदिलें ॥ ६१ ॥
चंद्रें दाखविले राहूसी । राहु झोंबला चंद्रासीं ।
अद्यापिवरी आकाशी । राहुपर्व पौर्णिमेसीं होत असे ॥ ६२ ॥
धड पडिले धरेवरी । वाढत निगालें धरित्रीं ।
मोहिनी बैसूनि उरावरी । वास करी नेवासीं ॥ ६३ ॥
धड पडोनियां तळीं । वाढियेलें महीतळीं ।
घनवट ऐसी आख्या झाली । तये काळीं तये देशीं ॥ ६४ ॥
शिर उसळलें गगना । तें ग्रहचक्रीं बैसोनि जाणा ।
लागे शशिसुभानां । करी ग्रहणा वेळोवेळां ॥ ६५ ॥
अमृतें देव तुष्ट पुष्ट झाले । दैत्य मद्यमदें मातले ।
निजयुद्धातें मिसळले । देवीं मारिले क्षणमात्रें ॥ ६६ ॥
पूर्वविभागाचे स्थितीं । रत्‍नें नेमिली शीघ्रगतीं ।
राहूचें अमृत क्षितीं । मारितां निश्चितीं सांडलें ॥ ६७ ॥
तेथें ओषधिसंभार । होवोनि व्यापिला डोंगर ।
ऐकतां विस्मित सौ‍मित्र । सुग्रीव वीर विस्मित ॥ ६८ ॥

श्रीरामांच्या अनुज्ञेने वानरांकडून फळे भक्षण :

वानरवीर समस्त । सुग्रीवासी प्रार्थित ।
अमृतसंजीवनी येथ । फळें त्वरित भक्षावीं ॥ ६९ ॥
प्रार्थोनियां हनुमंता । आज्ञा पुसावी रघुनाथा ।
वानर श्रमले युद्ध करितां । त्यांसी तृप्त्यर्था आज्ञापीं ॥ ७० ॥
सुग्रीवें प्रार्थिला हनुमंत । तेणें विनविला रघुनाथ ।
फळभोजनीं कपि समस्त । सोडी रघुनाथ सन्मानें ॥ ७१ ॥
पर्वताचें शिखर शिखर । वानर हिंडती सैर ।
वृक्ष आसुडिती सत्वर । फळसंभार भक्षिती ॥ ७२ ॥
सकाम हिवें पीडलीं एकें । क्रोधाग्नीनें जाळिलीं अनेकें ।
लोभवल्लीं गुंडाळलीं एकें । त्यांची वाढी देखे खुंटली ॥ ७३ ॥
सोहंसांदी एक पडलीं । एक तृष्णाजळीं बुडालीं ।
आशाघारीं जीं टोंचिलीं । तीं किवनली झाडींचि ॥ ७४ ॥
विकल्पपक्षीं खादलीं एकें । अंतरत्वचे कोरलीं देखें ।
अभाववातें उडालीं एकें । आकल्प एकें भ्रमताती ॥ ७५ ॥
विषयझाडें झाडिलीं । कामिनीकुचकर्दमीं पडली ।
त्यांची निर्गति नव्हे वहिली । अधोद्वारा गेलीं अधोगती ॥ ७६ ॥
एकीं कर्मकांडीं पडलीं । तीं स्वर्गीचे दरडीं गुंतलीं ।
एकीं संधीं निष्टलीं । सवेंचि पडलीं भगमुखीं ॥ ७७ ॥
ऐसिया फळांचिया जाती । वानर हातीं न शिवती ।
कृपा वोळला रघुपती । वानरपंक्ती विवेकी ॥ ७८ ॥
जीं स्नेहदेंठीचीं सुटलीं । वनिताहातींची निष्टलीं ।
जी शांतितेजें मुरालीं । जीं निराशे मघमघिलीं ॥ ७९ ॥
शांती दांती अरुवारलीं । सुखरुपें साकारलीं ।
फळें सेविलीं वानरीं ॥ ८० ॥
निजात्मबोधें मघमघित । नित्यनैराश्य रस गळत ।
जेतें हंसशुक झेंपावत । तीं फळें सेवित वानर ॥ ८१ ॥
अहंकोहंसोहंविहीन । ब्रह्मी ब्रह्मत्व जेथें लीन ।
जेथें नाहीं मीतूंपण । ऐसी स्थिती पूर्ण सेविती ॥ ८२ ॥
बहुत दिवस आवरिले । श्रीरामें पर्वतीं सोडिले ।
नाना रस सेविते झाले । विटावूं लागले सुरसिद्धां ॥ ८३ ॥
विचित्र फळें सेवित । विचित्र जळें प्राशित ।
श्रीरामप्रेमें डुल्लत । विसरत देहभाव ॥ ८४ ॥
हरिखें विटाविती देवांसी । वांकुल्या दाविती ऋषींसी ।
वेगीं भजा श्रीरामासी । अच्युतफळासी पावाल ॥ ८५ ॥
न भजतां श्रीरामचंद्रा । कदा न चुकती येराझारा ।
उकल नव्हे संसारा । दुःखसमुद्रामाजी पडे ॥ ८६ ॥
नाना ओषधींचे रस । कपींनीं सेविले बहुवस ।
तृप्ति पावोनि मानस । अवघे तळास उतरले ॥ ८७ ॥

अथोवाच हनूमंतं रामः सुग्रीवसन्निधौ ।
पर्वतो नीयतां वीर मर्यादा चार्णवस्य तु ॥११॥
एवमुक्तस्तु हनुमान्कृतवेगो महकपिः ।
दौर्भ्यां समुह्य तं शैलं प्रयातुमुपचक्रमे ॥१२॥

श्रीरामांच्या आज्ञेने हनुमंत पर्वत परत नेतो :

रामासमवेत सुग्रीव वीर । सकळ वानरांचा भार ।
उतरोनि पर्वतशिखर । काय रघुवीर बोलिला ॥ ८८ ॥
महावीरा हनुमंता । पर्वत नेई मागुता ।
स्थापोनियां स्वस्थता । अति शीघ्रतां परतावें ॥ ८९ ॥
येथें ठेवितां । शिष्टाचारा विरुद्ध होत ।
यालागीं नेवोनियां त्वरित । यथास्थित स्थापावा ॥ ९० ॥
ब्रह्मयानें सृष्टि निर्मिली जैसी । आपण संरक्षावी तैसी ।
करुं जाता अनारिसी । शिष्टाचारासीं मिळेना ॥ ९१ ॥
सागर नुल्लंघी । तेंवी आम्हीं ब्रह्मसृष्टीसी ।
प्रतिपाळावें अति यत्‍नेंसीं । मर्यादेसीं रक्षूनी ॥ ९२ ॥
ऐसें बोलतांचि रघुवीर । कपीनें केला नमस्कार ।
नामें करोनि भुभःकार । शैल सत्वर उचलिला ॥ ९३ ॥

दिशश्च विमलाः सर्वा जाताश्च हिमपाडुराः ।
हनुमंतं सविक्रांतमुत्पत्य गगने स्थितम् ॥१३॥

धरोनियां दोहीं बाहीं । उचलिला लवलाहीं ।
श्रीराम स्मरोनि हृदयीं । गगनीं पाहीं उसळला ॥ ९४ ॥
जैसा श्रीरामाचा बाण । धनुष्यींहूनि सुटतां गुण ।
गगनीं उसळेल संपूर्ण । रिपुदळण करिताचि ॥ ९५ ॥
मेळवोनि द्रव्य तीव्र । जेंवी सोडिजे अग्नियंत्र ।
तेंवी उडाला कपींद्र । दुष्टसंहार करितचि ॥ ९६ ॥
तेजें उजळलें उखामंडळ । झाला अरुणोदय तत्काळ ।
नयन झाले जी निर्मळ । गोळांगूळ देखिला ॥ ९७ ॥

राक्षसांचा आकांत व रावणाची तळमळ :

राक्षसां झाला आकांत । तळमळी लंकानाथ ।
अनावर हा कपि समर्थ । नाहीं भीत कळिकाळा ॥ ९८ ॥
आम्हीं काळनेमि पाठविला । तोही तेणें मारिला ।
पर्वत घेवोनि आला । येणें उठविला सौ‍मित्र ॥ ९९ ॥
सवेंचि पर्वत मागुता । घेवोनि जातो आतां ।
धरा मारा काय पाहतां । हिरोनि पर्वता घ्या वेगीं ॥ १०० ॥

अपश्यन्‍राक्षसाः सर्वे ब्रजंतं सागरोपरि ।
रावणस्त्वव्रवीद्‍दृष्ट्वा समीपस्थान्निशाचरान् ॥१४॥
हस्तिकर्णं शुंकुकर्णं मेघचित्रं च राक्षसम ।
एते चान्येऽपि बहव आज्ञाप्ता रावणेन तु ॥१५॥
स्थूलजंघं महानादं महावक्त्रं महोरसम् ।
उल्कामुखं महावीर्यं चतुर्वक्त्रं च राक्षसम् ॥१६॥
शीघ्रं मायाप्रभावेण हनूमान्गृह्यतामिति ।
यो निगृह्यानयेत्तूर्णं तस्य राज्यं ददाम्यहम् ॥१७॥

स्थूळजंघा सावधान । महानादा ऐकें वचन ।
महावक्त्रा तुवां आपर । कपिनंदन आणावा ॥ १ ॥
महारेसा उल्कामुखा । महावीर्या चतुर्मुखा ।
हस्तिकर्णा सुरेखा । कपिनायका आणा वेगीं ॥ २ ॥
शंकुकर्णा विचित्रा । महाविरा मेघचित्रा ।
सावधान माझिया उत्तरा । ऐका समग्र सुचित ॥ ३ ॥
पर्वतेंसहित कपींद्र । धरोनि आणील मजसमोर ।
त्यासी करीन राज्यधर । जैसा दशशिर तैसा तो ॥ ४ ॥
येथें आणिल्या पर्वत । राक्षस वांचती समस्त ।
घाय कोणाही न बाधित । औषधि अद्‍भुत तेथें असती ॥ ५ ॥
राज्यदानाचें उत्तर । ऐकतांचि सत्वर ।
उठावला राक्षसभार । वानरेंद्र धरावया ॥ ६ ॥
मरण देखतांही दृष्टीं । उठावले कोट्यनुकोटी ।
धनलोभाची ममता मोठी । मरणांत कष्टी सोडीना ॥ ७ ॥
उरीं आदळतां मरण । सर्वथा नव्हे उदासीन ।
मरेन कीं हें साधीन । प्रतिज्ञापण स्वयें करिती ॥ ८ ॥
जो मनोरथ करों बैसे । तो सावध असतांचि पिसें ।
देह विसरोनि आपैसें । नाचौं बैसे मनोरथीं ॥ ९ ॥
राज्य देईन ऐसी गोष्टी । ऐकतांचि उठाउठीं ।
उठल्या कोटींच्या कोटी । मरणसन्निष्टीं सन्नद्ध ॥ ११० ॥

श्रुत्वा तु राक्षसेन्द्रस्य वचस्ते त्वरयान्विताः ।
विचित्रकवचाः सर्वे नानाप्रहरणोद्यताः ॥१८॥

रावणाज्ञेने राक्षसांचा हनुमंताला प्रतिरोध :

रावणाज्ञा होतांचि पाहीं । वीर सिद्ध झाले ठायीं ।
कंगलटोप लवलाहीं । कवचें तिहीं बाणलीं ॥ ११ ॥
नाना परींचीं अंगत्राणें । विचित्रालंकार आभरणें ।
मायावेगें केलें धांवणें । कपिआंगवण लक्षूनी ॥ १२ ॥
सकळीं वेढिला कपींद्र । जेंवी मेघी दिवाकर ।
आच्छादिजे प्रकाशकर । तेंवी वानर कवळिला ॥ १३ ॥
कैंचा रे तूं कोण वानर । वेंगी कवळोनि डोंगर ।
गगनीं जासी सत्वर । परत निष्ठुर युद्धासीं ॥ १४ ॥
न भीसी तूं देवांसी । दानवांतें दृष्टी न आणिसी ।
राक्षसांतें न गणिसी । स्वस्थ जातोसी आकाशीं ॥ १५ ॥

न त्वं बिभेषि देवानां दैत्यानां च महात्मनाम् ।
एवं तैर्निगृहीतस्तु विचिंत्येदं वचो‍ब्रवीत् ॥१९॥
यदि प्राप्ताश्रया लोकाभवद्‌भिः सहिताः सुरा ।
ब्रह्माणमग्रतः कृत्वा न साम्यं मम केनचित् ॥२०॥

कोणातेंही दृष्टीं नाणिसी । गगनीं जातोसी वेगेंसीं ।
सांडी सांडी पवर्तासी । नाहीं तरी मरसी वानरा ॥ १६ ॥
ऐकोनियां राक्षसोत्तर । खवळला तो वानर ।
आलियाही चरचर । तरी कपींद्र नाटोपे ॥ १७ ॥
त्रैलोक्यींचे वीर समग्र । आलियाही सुरासुर ।
दानव मानव समग्र । तरी मी कपींद्र नाटोपें ॥ १८ ॥
सृष्टिकर्ते समग्र । ब्रह्मा आणि हरिहर ।
येऊं न शकती मजसमोर । दूत साचार रामाचा ॥ १९ ॥
तेथें तुम्ही कायसीं बापुडीं । धांवतसां लवडसवडीं ।
वृथा मराल रोकडीं । अर्ध घडी न लागतां ॥ १२० ॥

राक्षसांचा संहार करुन हनुमंत पर्वत पूर्वस्थळी ठेवतो :

ऐसें बोलोनि कपिनाथ । पुच्छ वाढविलें अद्‍भुत ।
जैसा काळपाश अकस्मात । धांवे कवळित जीवांसी ॥ २१ ॥
हातीं कवळोनि पर्वत । पुच्छ युद्धासीं मोकलीक ।
तेणें कंदन केलें तेथ । राक्षसांत मांडिला ॥ २२ ॥
अरे हा वायुसुत महाबळी । यासीं न चले अहाच कळीच ।
सत्वर मिळोनियां सकळीं । हातफळी मेळवावी ॥ २३ ॥
वेगळालें जुंझ करितां । रणीं नाटोपे सर्वथा ।
सकळ मिळोनियां तत्वतां । मारुं आतां कपीसी ॥ २४ ॥
ऐसें विचारोनि मनीं । मिसळले युद्धालागोनी ।
तंव पुच्छ आलें जी ठाकोनी । ख्याती रणीं लावित ॥ २५ ॥
राक्षस करित झुंजारी । वर्षते झाले शस्त्रास्त्रीं ।
तितकीं निवटीत पुच्छाग्रीं । कपिकेसरी बळवंत ॥ २६ ॥
जैसें अलक्ष काळचक्र । करी जीवांचा संहार ।
तैसें पुच्छ वेगवत्तर । राक्षसभार निवटित ॥ २७ ॥
एक शिळा ताकित । एक शस्त्रें वर्षत ।
एक अस्त्रें प्रेरित । दारुण मंत्र मंत्रोनी ॥ २८ ॥
मंत्रोनियां महाशक्ती । हनुमंतावरी सोडिती ।
एक निधडा निश्चितीं । केली शांती सकळांची ॥ २९ ॥
शक्तीची निजशक्ती । श्रीराम स्वयें चिच्छक्ती ।
तो राम स्मरतां कपिपती । झाली प्रतिहती शक्तीची ॥ १३० ॥
मुखीं श्रीरामाचें नाम । हृदयीं श्रीरामाचें प्रेम ।
इंद्रियीं श्रीरामाचें कर्म । तया दुर्गम कोण अर्थ ॥ ३१ ॥
स्मरतां श्रीरघुनंदन । आलें सर्वांगीं स्फुरण ।
पुच्छें आदरिलें कंदन । राक्षसगण मारिले ॥ ३२ ॥
शक्ति केलिया प्रतिहत । पुच्छे शस्त्रें पीठ करित ।
शिळा स्वयेंचि चूर होत । लागतां क्षय होय शस्त्रांचा ॥ ३३ ॥

एकद्वित्रिचतुर्विशच्चत्वारिंशत्तथा शतम् ।
लांगूलाग्रेण तान्वेष्ट्य भ्रामयित्वा व्यचिक्षिपत् ॥२१॥
अन्यांस्तु बलिनः शूरान्‍राक्षसान्भीमविक्रमान् ।
बध्वा लांगूलपाशेन पद्‌भ्‍यां संप्राहरत्कपिः ॥२२॥

एक दोन तीन चारी । पांच सात शतवरी ।
मारिल्या राक्षसांच्या हारी । कपिकेसरिनिजपुच्छें ॥ ३४ ॥
महाभयानक क्रूर । रणयोद्धा महावीर ।
रामदूत महाशूर । केलें चरित्र तें ऐका ॥ ३५ ॥
एक बांधोनियां पुच्छांसीं । आदळिले गिरिपृष्ठेंसीं ।
पीठ करोनि अस्थींसीं । एक यमसदनासी पाठविले ॥ ३६ ॥
एक पायीं कवळिले । एक लातातळीं रगडिलें ।
एक धाकेंचि निमाले । वीर पडिले असंख्य ॥ ३७ ॥
एकां पाहतां क्रूरदृष्टीं । धाकें करिती मूत्रवृष्टी ।
विकळ हो‍उनियां उठाउठीं । प्राण शेवटीं सांडिती ॥ ३८ ॥
एक भुभुःकारें भ्यालीं । निःशेष देहातें विसरलीं ।
एक दिग्पुटीं लागलीं । एक मुकली सर्वस्वा ॥ ३९ ॥

एवं सकंदनं कुर्वन्‍रक्षसां मेघवर्चसाम् ।
दिवाकर इव व्योम्नि सो‍ऽगच्छद्वायुनंदनः ॥२३॥
अति देवकृतं कर्म दृष्ट्वा तस्य तु देवताः ।
साधु साध्विति भाषंतः पुष्पवर्षैरवाकिरन् ॥२४॥
हत्वा रक्षःसहस्त्राणि लांगूलचरणायुधैः ।
स्वस्थाने पर्वतं स्थाप्य रामस्याग्रे समागतः ॥२५॥
प्रणिपत्य ततो रामं सुग्रीवं सहलक्ष्‍मणम् ।
आचचक्षे तथा वृत्तं यावत्पूर्वं च सांप्रतम् ॥२६॥

जेंवी गगनीं रविमंडळ । मेघ आच्छदी सकळ ।
तेंवी येवोनि राक्षसदळ । गोळांगूळ आच्छादिला ॥ १४० ॥
तो रवि आपल्या निजकिरणीं । मेघांचें अंतर भेदूनी ।
स्वप्रकाशेंकरोनी । अवनी गगन प्रकाशी ॥ ४१ ॥
श्रीरामदळीं हनुमान वीर । जेंवी मूर्तिमंत दिवाकर ।
महामेघ राक्षसवीर । पाहती कपींद्र आच्छादूं ॥ ४२ ॥
बाप कपिकुळीं दिनमणी । पुच्छरुप निजकिरणीं ।
अंतरें सकळांची भेदूनीं । ठेला करोनी वाताहत ॥ ४३ ॥
जेंवी सरोवरीं गज रिघे । कमळिणी निवटी वेगें ।
तेंवी कपीनें लागवेगें । राक्षस रागें मर्दिले ॥ ४४ ॥
पर्वतेंसहित युद्ध करित । देखता देव समस्त ।
होवोनि सकळ विस्मित । स्तुति करीत कपीची ॥ ४५ ॥
मानवोनि सुरासुरीं । पुष्पवृष्टि कपिशिरीं ।
करिते झाले निजगजरीं । जयजयकारीं हर्षित ॥ ४६ ॥
सुर जयजयकार करित । विजयी झाला कपिनाथ ।
ठेवोनी स्वस्थानीं पर्वत । आला रघुनाथवंदना ॥ ४७ ॥
लोटांगण श्रीरामचरणां । नमन केलें लक्ष्मणा ।
सुग्रीवासी केलें नमना । अंगदही जाणा नमियेला ॥ ४८ ॥
बिभीषण शरणागत । त्यासीही नमी हनुमंत ।
येरें वानर समस्त । नमी कपिनाथ अति प्रितीं ॥ ४९ ॥
श्रीरामें दिधलें आलिंगन । हृदयीं धरिला कवळून ।
सौ‍मित्राचें जीवदान । तुवां जाण मज दिधलें ॥ १५० ॥

लक्ष्मणाची हनुमंताविषयी कृतज्ञता :

सौ‍मित्रें आलिंगिलें हनुमंता । तूं आमचा जीवदाता ।
सुखी केलें श्रीरघुनाथा । बहु आतां काय बोलूं ॥ ५१ ॥
आम्ही बंधु ते कुबंधु । तूं कांही नसोनि सुबंधु ।
आमचेनि रामा दुःखावबोधु । सुखावबोधु तुझेनि ॥ ५२ ॥
तुझ्या एक एक कर्मा । आठवितां प्लवंगमा ।
मन विसरें मनोधर्मा । वरोत्तमा हनुमंता ॥ ५३ ॥
सीताशुद्धीची मात । स्मरतां चित्त चकित ।
वधूं जातां इंद्रजित । जाहलों प्रतिहत आम्ही तेथें ॥ ५४ ॥
एकलेनि वीरें आपण । जुत्पती आणि वानरगण ।
शरणागत बिभीषण । तुवां आपण वांचविला ॥ ५५ ॥
जो अदट त्रैलोक्यासी । त्या मारविलें इंद्रजितासी ।
यश दिधलें मज सौ‍मित्रासीं । काय तुजपासीं तुझें सांगूं ॥ ५६ ॥
शोक करितां रामासीं । तुवां पावोनि वेगेंसीं ।
सावध करोनि स्वामीसी । स्वस्वरुपासी प्रबोधिलें ॥ ५७ ॥
राम सकळ स्वरुपस्थिती । तो राम प्रबोधिला मारुती ।
दास्य करिसी अहोरातीं । ख्याती त्रिजगतीं रामदूता ॥ ५६ ॥
श्रीरामसुख प्रकाशक । हनुमान झाला सत्य एक ।
सुखाचेही सोलींव सुख । कपिनायक मारुती ॥ ५९ ॥

लक्ष्मणाच्या स्तुतीला हनुमंताचे समर्पक उत्तर :

ऐसा स्तवोनियां हनुमंत । सौ‍मित्र चरणां लागत ।
येरें सुखावोनि त्वरित । चरण वंदित सौ‍मित्राचे ॥ १६० ॥
म्हणे सौ‍मित्रा ऐक विनंती । जितुकी कपीची शक्ती ।
तितुकी रामनामाची ख्याती । नामेंवीण मारुति कांहीं नेणे ॥ ६१ ॥
जेव्हां संकट कांही पडत । तेव्हांचि रामनाम स्मरत ।
नामें विघ्न भस्म होत । विजयी कपिनाथ लटिकाचि ॥ ६२ ॥
श्रीरामनाम स्मरतां । द्वंद्वें नुधविती माथा ।
विघ्नें हाणोनियां लाता । कपि तत्वतां निजविजयी ॥ ६३ ॥
जितुकें कपीचें बळ । तितुकें नामचि केवळ ।
हें तूं जाणसी सकळ । अति अविकळ रामभजनें ॥ ६४ ॥
ऐसें विनवोनि सौमित्रासी । आलिंगिलें सुग्रीवासी ।
बिभीषणादि अंगदासी । वानरांसी आलिंगी ॥ ६५ ॥
सांगितलें सकळ वृत्त । जाहली युद्धे बहुत ।
रामें निवारलीं समस्त । कपिनाथ रक्षिला ॥ ६६ ॥
पूर्वीं येथून जातेवेळां । रावणें राक्षस पाठविला ।
कपटाश्र्म निर्मिला । गोवूं लागला कपीसी ॥ ६७ ॥
श्रीराम स्मरतां चित्तीं । झाली कपटाची उपहती ।
राक्षस मारिला निश्चितीं । प्रतापशक्ती नामाची ॥ ६८ ॥
जळसरोवराभीतरीं । सापदग्ध निशाचरी ।
गिळावया कपिकेसरी । पायीं झडकरी झोंबली ॥ ६९ ॥
पायीं झोंबतां कपीसीं । राम स्मरोनि आवेशीं ।
मारूं आदरिलें राक्षसीसी । रामें तिसी उद्धरिलें ॥ १७० ॥
तिणें राक्षसाची मात । मज सांगितला वृत्तांत ।
कपटी म्हणोनियां घात । करितां मुक्त रामें केला ॥ ७१ ॥
ओषधींतें राखिते । चौदा सहस्र गंधर्व तेथें ।
रणीं मिसळले युद्धातें । ते श्रीरामें निवटिले ॥ ७२ ॥
पुढें भरताची भेटी । ते सांगितली सकळ गोष्टी ।
पर्वत नेतां संकटीं । राक्षस कोटी उठावले ॥ ७३ ॥
हातीं असतां गिरिवर । युद्ध झालें घोरांदर ।
नामें निवटिले समग्र । क्षणमात्र न लागतां ॥ ७४ ॥
स्वस्थ ठेवोनि पर्वत । परतोनि आलों येथ ।
ऐकतां कपीचा वृत्तांत । वानर समस्त सुखावले ॥ ७५ ॥
माथां वाहोनि पुच्छाटी । घालिती कोल्हाटें उफराटीं ।
हरिखल्या वानरकोटी । बाप जगजेठी हनुमंत ॥ ७६ ॥
एका जनार्दना शरण । राक्षस निर्दळूनि जाण ।
पर्वत स्वस्थानीं स्थापून । कपिनंदन निजविजयी ॥ १७७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
हनुमग्दिरिस्थापनं नाम पंचाशत्तमो‍ऽध्यायः ॥ ५० ॥
ओंव्या ॥ १७७ ॥ श्लोक ॥ २६ ॥ एवं ॥ २०३ ॥