रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 68 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 68

अध्याय 68

सीतेचे दिव्य

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ततो वैश्रवणे राजा यमश्च पितृभिः सह ।
सहस्त्राक्षश्च देवेशो वरुणश्च जलेश्वरः ॥१॥
त्रिशूलपाणिर्विश्वेशो महादेवो वृषध्वजः ।
कर्ता सर्वस्य लोकस्य ब्रह्मा च भगवान्प्रभुः ॥२॥
स च राजा दशरथो विमानेनांतरिक्षगः ।
अभ्याजगाम तं देशं देवराजसमद्युतिः ॥३॥
एते सर्वे समागम्य विमानैः सूर्यसंनिभैः ।
अभ्यभाषंत काकुत्स्थं मधुरं वाक्यगौरवात ॥४॥

कुबेर, यम, वरुणादि देवांसह दशरथांचे त्या ठिकाणी आगमन :

वैश्रवण जो कुबेर । धनवंताचा राजा सधर ।
भगवंताचा भांडारघर । तेथें सत्वर पातला ॥ १ ॥
अर्यमा पितरसमवेत । यम पातला प्रेतनाथ ।
सहस्राक्ष देवनाथ । मरुद्‌गणेंसहित पातला ॥ २ ॥
अपांपती अति वोजा । वरुण आला अमृतराजा ।
विनवावया रघुराजा । सीताकाजा पैं आले ॥ ३ ॥
त्रिशूळपाणी वृषभध्वज । गोक्षीरधाम धवळ सहज ।
पिनाकयुक्त गणसमाज । साठीं सहस्रांसमवेत ॥ ४ ॥
त्रिनेत्र पंचवक्त्र । दशभुजा अति परिकर ।
अर्धांगी गिरिजा सुंदर । अति मनोहर तेथें आला ॥ ५ ॥
जो स्रजिता सकळांसी । पितामह म्हणती ज्यासी ।
तो सत्यलोकनिवासी । जानकीकाजासी ब्रह्मा आला ॥ ६ ॥
रावण पार्षद वैकुंठींचा । श्रीरामें वध केला त्याचा ।
अधिकार पावोनि निजाचा । गेला जेथींचा पैं तेथें ॥ ७ ॥

रावणाने वैकुंठात असलेल्या दशरथाला राम प्रताप निवेदन केला :

तंव तेथें दशरथ । वैकुठीं देखिला नांदत ।
तेणें रावण आनंदभरित । ख्याति वानित रामाची ॥ ८ ॥
सीताव्याजेंकरोनी । सागरीं शिळा तारोनी ।
रामें वधिला दशाननी । अभिनव करणी पैं केली ॥ ९ ॥
लंके अभिषेकिला बिभीषण । सोडविले सीतानिधान ।
अतुलकीर्ती रघुनंदन । दाता समान अरिमित्रा ॥ ११ ॥
रावणमुखें श्रीरामकथा । ऐकोनि आनंद दशरथा ।
पहावया श्रीरघुनाथा । सत्वर तो तेथें आला ॥ १२ ॥
शंकरादि देवांसमवेत । श्रीरामजनक दशरथ ।
ब्रह्मा इंद्र आले तेथ । जानकीचरित्र पहावया ॥ १३ ॥
सूर्यप्रभा समसमान । विमानें विमानीं पैं देदिप्यमान ।
अंतरिक्ष व्यापिलें गगन । श्रीराम आपण जेथें असे ॥ १४ ॥
ककुत्स्थकुळीं उत्पत्ती । म्हणोनि काकुत्स्थ रघुपती ।
नामनिर्देश निश्चिती । वेदश्रुतिपुराणें ॥ १५ ॥

सीतेसाठी ब्रह्मदेवाची श्रीरामांना विनंती :

ब्रह्मा जो कां लोकपती । मस्तकांजली विनयवृत्ती ।
सकळ देवेंसी विनंती । सीताउद्देशें करीतसे ॥ १६ ॥
अति अक्षोभ्य सागर । शिळांनीं बुजोनि सत्वर ।
पराक्रमें वानरभार । क्षणें परपार पावविला ॥ १७ ॥
करोनियां महारण । इंद्रजित आणि कुंभकर्ण ।
रणीं निवटिला रावण । सकुळप्रधानसमवेत ॥ १८ ॥
बिभीषण लंकापती । जियेलागीं केला रघुपती ।
ते भेटलिया सीता सती । उपेक्षावृत्ती कां केली ॥ १९ ॥
राम भक्तजनवत्सल । ऐसा ब्रीदाचा कल्लोळ ।
तुझें अर्धांग जनकबाळ । उपेक्षाशीळ केंवी रामा ॥ २० ॥
क्षमा करीं रघुनाथा । कृपाहस्त ठेंवी माथां ।
वेगीं उठवावी सीता । विचार अन्यथा न करावा ॥ २१ ॥

श्रीरामांनी देवांच्या विनंतीलाही प्रतिवचन न दिल्यामुळें वानरमंडळी खवळली :

ऐसें ऐकोनियां वचन । उगाचि पाहत रघुनंदन ।
कांही नेदी प्रतिवचन । तेणें वानरगण खवळले ॥ २२ ॥
आधींच मर्कटें आळुकी । वरी संधि साधिली नेटकी ।
कोल्लाळ मांडिला सकळिकीं । कां हो जानकी उपेक्षिली ॥ २३ ॥
सुग्रीव राजा वानरनाथ । अंगद आणि जांबवंत ।
नळनीळादि बहुत । वानर समस्त बोलती ॥ २४ ॥
जिचेनि धर्मे श्रीरामा । स्वामी जोडला आम्हां ।
श्रीरामभक्ति प्लंवगमा । अगाध महिमा त्रैलोक्यीं ॥ २५ ॥
ते मुख्य सीता सती । जवळी असल्या रघुपती ।
उपेक्षिली निमेषगती । देवीं विनंती पैं करितां ॥ २६ ॥
तेणें वानरां भय संभवे । केंवी करावें रामसेवे ।
जीव गेलियाहीं जीवें । धीर नव्हे भजनासी ॥ २७ ॥
उपेक्षिलें निजवधूसी । तो सेव्य केंवी वानरांसी ।
श्रीरामसेवा करुं कैसी । वानरांसी भय भारी ॥ २८ ॥

अशा निर्वाणसमयीं बिभीषणाची रामांना प्रार्थना :

थोर मांडिलें निर्वाण । हडबडिले वानरगण ।
तें देखोनि बिभीषण । करोनि नमन विनवित ॥ २९ ॥
उपेक्षितां जानकीसी । भय सुटलें सकळांसी ।
राम कृपाळु विश्वासी । हें पुराणांसी मंडण ॥ ३० ॥
उभारोनियां निजहस्त । गर्जताती शास्त्रार्थ ।
राम कृपाळु निश्चित । वेदसंमत हे बोली ॥ ३१ ॥
तीं ब्रीदें अंगीकारीं । जानकीतें कृपा करीं ।
तंव सौ‍मित्र ते संधीमाझारीं । विनंती करी मधुरवाणी ॥ ३२ ॥

लक्ष्मणाची प्रार्थना :

विनविताहे शरणागत । तो मानावा वचनार्थ ।
तूं कृपाळु रघुनाथ । मनोगत रक्षावें ॥ ३३ ॥
ऐसें विनवितां समस्त । श्रीराम उगाचि तटस्थ ।
मग विनवी कपिनाथ । काय निवांत पाहसी ॥ ३४ ॥
आकांत होतसे सकळांसी । आणि तूं निवांत मानसीं ।
निष्ठुर ऐसा कैसा होसी । जानकीसी प्राणांत ॥ ३५ ॥
ऊठ चाल पाहसी काये । सीता मूर्च्छित पडली आहे ।
झणें तिचा प्राण जाये । करावें काय मग तेव्हां ॥ ३६ ॥
ऐकोनि त्याचा वचनार्थ । हनुमान उल्लासें असे बोलत ।
स्त्रीपुरुषांचा जो एकांत । त्याचा इत्यर्थ तुम्हीं केंवी जाणां ॥ ३७ ॥
ऐसे बोलोनियां जाण । उठता झाला वायुनंदन ।
ज्याचें ऐकता वचन । श्रीरघुनंदन संतुष्ट ॥ ३८ ॥
जो भक्तिसुखाचा सागरू । भजनधर्मासी सद्‌गुरु ।
निश्चयाचा महामेरु । धैर्य निर्धारु त्याचेनी ॥ ३९ ॥
अबलांचें तरी जीवन । साधकांसी साधन ।
सिद्धासी समाधान । अमृता जीवन वचन ज्याचें ॥ ४० ॥

सीतेची बाजू घेऊन मारुतीचे श्रीरामांना सांगणे :

प्रेमाचे उभाडे देखा । देखोनो जानकीच्या दुःखा ।
जवळी येवोनि रगुकुळटिळका । सकळ लोकां देखतां ॥ ४१ ॥
प्रीतिप्रेमाचे आवेशीं । तिक्ष्ण उत्तरें श्रीरामासी ।
बोलता जाला कुशळतेसी । जानकीपक्षासी घेवोनी ॥ ४२ ॥
स्वामिसेवकांचे वचन । प्रीतिरोषयुक्त पूर्ण ।
प्रेमकलहाचें लक्षण । वदावया वदन मज कैचें ॥ ४३ ॥
दोहींच्या अंतरीं प्रवेशवे । तैं दोहींचें हरिद्र जाणवे ।
हें असंभाव्य केवी संभवे । अंतर वदवे स्वामिसेवकांचे ॥ ४४ ॥
परि सत्कुळाचें कुळवंत । पंचायतनींचे आदिदैवत ।
त्या सद्‍गुरुचें मनोगत । विचरे निश्चित मनामाजी ॥ ४५ ॥
त्याची कृपा उपायदानें । असंभाव्य ही ये भावने ।
अचिंत्य आकळे चित्तचिंतनें । निर्विकल्प मनें कल्पवे ॥ ४६ ॥
अलक्ष्य लक्षेंवीण दिसे । अमृर्तीची मुर्ति भासे ।
अवाच्याही शब्दासारिसें । सावकाशें बोलवे ॥ ४७ ॥
शंखासुर श्रीअनंतें । निवटिला स्वसामर्थ्ये ।
कलेवर पिळूनि तेथें । निजहस्तें काढिलें ॥ ४८ ॥
सवेंचि प्रीतिपुरःसर । प्रसन्न होवोनि वेगवत्तर ।
हातीं घेऊनि कलेवर । ध्वनि विचित्र वाजवी ॥ ४९ ॥
तोचि मजलागीं पूर्ण । अवतरला एकाजनार्दन ।
निवटोनि ममभिमान । कलेवर जाण अंगीकारिलें ॥ ५० ॥
मन बुद्धी चित्ताभिमान । स्वयेंचि होवोनि आपण ।
गिरेमाजी प्रवेशोन । निजगुणवर्णन करीतसे ॥ ५१ ॥
जेंवी शंखाचा उत्तम ध्वनी । संबंध नाही पांचजन्यीं ।
निगालिया कर्कश ध्वनी । लाज मनीं नाहीं शंका ॥ ५२ ॥
तेंवी ग्रंथ सुरसविरसता । एकाजनार्दनाचे माथां ।
जैसे जैसे आवडे चित्ता । तैसी कथा वदतसे ॥ ५३ ॥
य़ालागीं श्रोते जन । न ठेवावें भूषण दूषण ।
वक्ता एकाजनारदन । कथाकीर्तन करीतसे ॥ ५४ ॥
असो आतां परिहार । परिहार तोचि अहंकार ।
वक्ता एक एकांगवीर । वाग्व्यापार चाळित ॥ ५५ ॥
पुढें श्रीराममारुती । बोलते जाले कवणे स्थिती ।
श्रोतीं अवधान द्यावें चित्तीं । दोघांची स्थिती अनुपम ॥ ५६ ॥

जानकीविषयी श्रीरामांची उदासस्थिती पाहून
मारुतीचे परखड विचार त्याने रामांना ऐकविले :

उदास देखोनि रघूत्तम । खवळला तो प्लवंगम ।
बोलावया उपक्रम । स्वयें सुवर्म चाळित ॥ ५७ ॥
इंद्र शंकर ब्रह्मादिक । नर वानर सकळिक ।
मस्तकांजाळि देख । करिती आवश्यक प्रार्थना ॥ ५८ ॥
अव्हेरुन विनंतीसी । उपेक्षितां जानकीसी ।
बोल लागेल स्वधर्मासी । कठिणता अंगासी येईल ॥ ५९ ॥
सर्वांतर्यामी श्रीराम । अरि मित्र सदा सम ।
तेणें सांडिला स्वधर्म । परम अधर्म मांडिला ॥ ६० ॥
सती पतिव्रता जानकी । निष्पाप एक तिहीं लोकीं ।
श्रीरामें ते उपेक्षिली कीं । जघन्य लौकिकीं वाढेल ॥ ६१ ॥
जीलागीं होवोनियां वेडें । सैरा वनोवन हिंडे ।
स्वयें वेंटाळून झाडें । वाडेकोडें सीताभावें ॥ ६२ ॥
जीलागीं वनांत । सैरा धांवे रघुनाथ ।
पाषाणातें आलिंगित । आतां होत उदास ॥ ६३ ॥
जियेचेनि वियोगबळें । चंद्रकिराणीं श्रीराम पोळे ।
सुमनमाळा अंगीं सळे । जैसें रुपलें सूचिकाग्र ॥ ६४ ॥
चंदनाचें उद्वर्तन । अग्निस्फुलिंगवत् जाण ।
वियोंगें पूर्ण व्यापिलें मन । अवस्था दारुण जीलागीं ॥ ६५ ॥
सखा बंधु लक्ष्मण । त्यासीं मारुं धांवे आपण ।
सीतामय झालें मन । वियोगें पूर्ण व्यापिला ॥ ६६ ॥
दुर्जन अपवाद देख । जगीं बोलती अनेक ।
ऐसें जघन्य अलौकिक । माथां निःशंक वाजेल ॥ ६७ ॥
आणीकही अपूर्व श्रीरामा । विनवितां या प्लवंगमा ।
त्यांसी उत्तर न दैसी रामा । तेणें आम्हां भय भारी ॥ ६८ ॥
श्रीराम कृपेचा सागर । ऐसा ब्रीदाचा गजर ।
त्यावरी आला तमाचा पूर । कृपा समग्र वाहवली ॥ ६९ ॥
तरी हें आजि कळलें देखा । राम प्राकृत आम्हांसारिखा ।
राम आतुडला विकल्पादिकां । ऐसें लोकां मानेल ॥ ७० ॥
निरसावया संसार । सेवावा श्रीरघुवीर ।
तो राहिला पैं विचार । ऐसें समग्र मानिती ॥ ७१ ॥
सर्वस्व त्यागून वहिले । पोटीं पाले बांधिले ।
रामसेवे जीवित्व वेंचिलें । तें फळा आलें रोकडेंची ॥ ७२ ॥
सीताप्राप्तीलागीं येथ । बहुत कष्टला रघुनाथ ।
सैन्यासीं आहार पुरवित । भांतें घालित मोजमोजूं ॥ ७३ ॥
आपण मेळवावें फळ । सेवूनि भजावें अविकळ ।
अथवा सेवूनि असावें जळ । राम केवळ साधावया ॥ ७४ ॥
एकें बापुडीं वारियावरी । राहोनियां निर्धारीं ।
राम पाहती चराचरी । भेटी तरी पैं नेदी ॥ ७५ ॥

श्रीराम निष्टुर आहेत असे चराचर मानील म्हणून तसे न करिता
जानकीची उपेक्षा करु नये म्हणून रामांना मारुतीने लोटांगण घातले :

श्रीराम ऐसा निष्ठुर । म्हणोनियां चराचर ।
भयातीत पैं समग्र । केंवी रघुवीर् सेवावा ॥ ७६ ॥
यालागीं सकळ जना । भय संचलें रघुनंदना ।
जेणें उपेक्षिली निजांगना । तो अबळा जना केंवी सेव्य ॥ ७७ ॥
ऐसें न करावें स्वामिनाथा । म्हणोनि चरणीं ठेविला माथा ।
आश्वासावी जनकदुहिता । निर्वाण आतां न पहावें ॥ ७८ ॥
ऐकोनि त्याच्या वचनार्था । आश्चर्य जालें रघुनाथा ।
निस्पृहें वरी तत्वता । नचले सत्ता कोणाची ॥ ७९ ॥
जे उदास देहावरी । स्वामित्वाची आज्ञा करी ।
उत्तर नेदी सुरासुरीं । तो कपिकेसरी विनवित ॥ ८० ॥

स्त्रिया या कधीही विश्वासार्ह मानू नयेत असे श्रीराम मारुतीला सांगतात :

झणें कोपसी हनुमंता । म्हणोनि नमन होय करितां ।
आठवावें पूर्ववृत्तांता । कोप तत्वता साडूनी ॥ ८१ ॥
तुवां सांगितली होती जैसी । आम्ही देखत नाहीं तैसी ।
विश्वासों नये गा स्त्रियांसी । जरी मार्दवेंसी बोलत ॥ ८२ ॥
जो स्त्रियांचा विश्वास धरी । सद्यः अनर्थ त्याचे शिरीं ।
वाजोनियां क्षणाभीतरी । करी बोहरी व्रताची ॥ ८३ ॥
भगिनी अथवा दुहिता । एकांती न भेटावी सर्वथा ।
विपायें पैं भेटी होतां । तेथेंही सर्वथा विकल्प वाढे ॥ ८४ ॥
जवळीं असतां पतीसी । रिगोनि त्याच्या मानसीं ।
केव्हांचि विचरे आणिकासी । हें कोणासी लक्षेना ॥ ८५ ॥
मार्गी जाता पैं स्वभावें । व्यंकटकटाक्षासवें ।
क्षणें पुरुषातें लोळवावें । कामभावें क्षोभवोनी ॥ ८६ ॥

यांदृष्ट्वाचित्तवैकल्पं स्पष्ट्वा सत्यांशसक्षयः ।
संभोगे मरणं याति सा स्त्री प्रत्यक्षराक्षसी ॥५॥

स्त्रीकटाक्षाचे दुष्परिणामः

दृष्टि पडतां अवचिती । सुरासुर मोह पावती ।
ते भेटलिया एकांतीं । कवणा विरक्ती उपजेल ॥ ८७ ॥
उभयवर्गामाझारीं । कामक्षोभ एका तर्‍हीं ।
येरयेरांची वृत्ती हरी । निंद्यसंचारीं प्रवृत्ते ॥ ८८ ॥
स्वभावें जरी दृष्टि पडे । तरी विरक्तीही क्षोभा चढे ।
कामफांसा स्वयेचि पडे । पडे सांकडें अनर्थी ॥ ८९ ॥
हें प्रत्यक्ष घडलें चंद्रचूडा । भिल्लणी आली दृष्टीपुढां ।
महादेव झाला वेडा । केला उगाडा विरक्तीचा ॥ ९० ॥
पराशरे नावे भीतरी । देखोनि निषादकुमारी ।
दिवसा करोनि अंधारी । तपसामग्री वेंचिली ॥ ९१ ॥
आणीक ऐसें सांगो किती । नागवळे तपस्थिती ।
स्त्री भेटल्या एकांती । नव्हे विरक्ती पैं कोणा ॥ ९२ ॥

कामभावनेने रावणाने सीतेला नेली
असल्याने तिला मी पवित्र कशी मानू ? श्रीराम :

ही तंव केवळ कामभावें । नेली होती दशग्रीवें ।
ती निःसंग केंवी मानावें । रुपभावें मनोरम ॥ ९३ ॥
अति सुकुमार सुंदर । तरुणांगी लावण्यकर ।
कळा विन्यास परिकर । मनोहर पैं रुप ॥ ९४ ॥
आणीकही ऐक कपिनाथा । पूर्वी तुवांचि सांगितली कथा ।
अस्थिमात्र जनकदुहिता । असे तत्वता पैं उरली ॥ ९५ ॥
रुधिर शोषिलें पैं समस्त । मांस आटलें जेथीचें तेथ ।
नामें वांचलेंसे जीवित । हर्षयुक्त सांगसी तूं ॥ ९६ ॥
तें न दिसे येथें कांहीं । अति विकसित दिसे पाहीं ।
रचिली असे ठायीच्याठायीं । अपूर्व कायी मी सांगों ॥ ९७ ॥
म्हणोनियां संदेहासी । कारण हनुमंता परियेसी ।
तंव कोप तुझे मानसीं । अति आवेशीं पैं आला ॥ ९८ ॥
तुज माझें लोटांगण । करुन कोपाचें उपशमन ।
सावध ऐकें माझें वचन । म्हणोनि विनवण करितसें ॥ ९९ ॥

“जनापवाद लागू नये म्हणून सीतेने दिव्य
करुन आपले पावित्र्य निरपवाद सिद्ध करावे.” श्रीराम :

जनापवाद कठिण भारी । दुर्नाम वाजेल माझे शिरीं ।
म्हणतील राम अविचारी । घातली घरीं कामलोभें ॥ १०० ॥
तें चुकवावया हनुमंता । उपेक्षिली जनकदुहिता ।
तुम्ही सर्वज्ञ तत्वता । निजचित्ता विवंचा ॥ १ ॥
मुख्य सीता अग्निमुखीं । ऐसें जाणोनि रघुकुळटिळकीं ।
ते भेटावया जानकीं । युक्ती निकी मांडिली ॥ २ ॥
केंवी अपवाद चुकविजे । कोण योगें लोक समजे ।
हें विचारोनि कपिसमाजें । मग सांगिजे मजलागीं ॥ ३ ॥
अत्यंत कृपा सकळांसी । जें अंगीकारावें जानकीसी ।
तरी दिव्य सीतेपासी । सकळ समतेसी पैं मागा ॥ ४ ॥
सकळ लोकांदेखतां । दिव्य उतरलिया सीता ।
तरी मी अंगीकारीन तत्वता । विचार अन्यथा असेना ॥ ५ ॥

श्रीरामांच्या कठोर परंतु निश्चियी वाणीने सर्वांना अतीव दुःख :

ऐकोनियां तें वचन । आंदोळिले त्रिभुवन ।
कठिण गिरा रघुनंदन । वाग्वज्रबाण मोकलिले ॥ ६ ॥
ऐकतां चळकांप चित्ता । भय सुटलें समस्तां ।
उपाय खुंटला सर्वथा । जनकदुहिता वांचेना ॥ ७ ॥
ऐसें मानोनि सकळिकीं । आशा सांडिली निःशेखीं ।
होवोनियां अधोमुखीं । दुःखपंकीं निमग्न ॥ ८ ॥
कठिण ऐसें वाग्वज्र । ऐकोनियां हनुमान वीर ।
बोलों आदरिलें उत्तर । श्रीरघुवीर लक्षोनी ॥ ९ ॥

धीरवीर मारुतीने श्रीरामांना सीतेचे महिमान विशद केले :

ऐकें स्वामी रघुनाथा । झणीं उपेक्षिसी सीता ।
पतिव्रतेचा विकल्प धरितां । निजव्रता बोल लागे ॥ ११० ॥
सीतेचेनि तेजानलें सहरावण पैं वहिलें । कटक अवघेंचि अहाळलें ।
प्रेतरुप आलें युद्धासी ॥ ११ ॥
ससैन्य लंकानाथा । आपण वधिलें तत्वतां ।
ऐसें न मानावें रघुनाथा । वाल्गोनि वृथा कार्य नाहीं ॥ १२ ॥
सीतेने मारिले नसतां । तुज न मरते रघुनाथा ।
मारीलेचि मारोनि तत्वता । जय सर्वथा तुम्हां दिधला ॥ १३ ॥
रावणवधाचिये ख्याती । त्रैलोक्यीं पावन कीर्ती ।
जिजेनि प्रतापें त्रिजगतीं । तुमचें तुम्हांप्रती लक्षेना ॥ १४ ॥
जिचेनि तुझी शौर्यशक्ती । जिचेनि तुझी शौर्यकीर्ती ।
ते समूळ जानकी चिच्छक्ती । जाण निश्चितीं श्रीरामा ॥ १५ ॥
जिचेनि तुज नामरुप । जिचेनि प्रौढ प्रताप ।
जिचेनि रणीं साटोप धैर्य अमूप जिचेनी ॥ १६ ॥
ते तुझी निजशक्ति सीता । तुवां उपेक्षिली निजकांता ।
तेथें इतरांची कोण कथा । दीननाथा भजनमार्गी ॥ १७ ॥
पूर्विल्याहूनि अनारिसी । तुवां देखिली सुंदरवेषीं ।
अनोळख भक्ति चिन्हासीं । काय स्वामीसीं म्हणावें ॥ १८ ॥
सूर्याचें सामर्थ्य गगनीं । स्वयें नेणे दिनमणी ।
तें जाणतसे कमळिणी । सुखविकासिनी पैं झाली ॥ १९ ॥
चुंबकाची चाळकशक्ती । स्वतां नेणे निजस्थिती ।
जडें लोहें सुखेंचि जाणती । ते चळण पावती दर्शनें ॥ १२० ॥
चंद्रकिरणींची अमृतधार । स्वतां नेणें हिमकर ।
सेवून जाणती चकोर । दर्शनें अपार नांदत ॥ २१ ॥
तैसी देखतां श्रीराममूर्ती । जरी उल्लास न बाणे चित्तीं ।
ते वज्राहूनि कठिण जाती । श्रीराममूर्ती अनोळख ॥ २२ ॥
स्वस्वरुपीं आराम । त्यातें बोलिजे श्रीराम ।
तें अंतरीचें निजप्रेम । सुखें परम ओतलें ॥ २३ ॥
अद्वैतीं सुखसंबध । इंद्रियांवीण अगाध ।
विषयावीण परमानंद । तें स्वरुप शुद्ध तुझें स्वामी ॥ २४ ॥
त्या निजरुपातें देखतां । जरी उल्लास न बाणे चित्ता ।
इंदियें नव्हे पुष्टता । तरी ते वृथा पाषाणवत ॥ २५ ॥
तुझिया दर्शनाचें सुख । श्रीरामा तुज अनोळख ।
भक्त जाणती सात्विक । जे नैष्ठिक व्रतधारी ॥ २६ ॥
तुज देखतां रघुनाथा । अष्टौभाव सात्विकता ।
गुढी उभविली स्वानंदता । बाहेरी तत्वता ते आली ॥ २७ ॥
तेणें पुष्ट झाली सीता । ते देखातांचि रघुनाथा ।
विकल्प गमला तुझ्या चित्ता । अंतरव्रता नेणोनी ॥ २८ ॥
वेदपुराणसंमत । अंतर्यामी रघुनाथ ।
तें कांही न दिसे येथ । अंतरव्रत का न कळे ॥ २९ ॥
तरी भाग्य आपुलेंचि हीन । जे अंतर नेणे रघुनंदन ।
सकळांला मी जो सर्वज्ञ । वेद वचन काय झालें ॥ १३० ॥
आतां असोत या कथा । वर्म बोलतां रघुनाथा ।
प्रब्ळ शीण वाटेल चित्ता । आम्हा सीता काय होय ॥ ३१ ॥
जेणें सुख स्वामीसी । तेंचि करणें आम्हांसी ।
सीतेची भीड ते कायसी । दिव्य जानकीसी पैं मागूं ॥ ३२ ॥

केवळ रामांच्या संतोषासाठी मारुतीने
सीतेजवळ येऊन तिला दिव्य करण्यास सांगितले :

दिव्य उतरल्या सीता सती । जरी अंगीकारीना रघुपती ।
तरी देहपात करणें समस्तीं । आणीक युक्ती असेना ॥ ३३ ॥
म्हणोनियां क्रोधावेषीं । आला जानकियेपासीं ।
ऊठ हो काय पडळीसी । दिव्य रामासी पैं देई ॥ ३४ ॥

दिव्य करण्यास सीता तत्काळ तयार :

ऐकतां हनुमानाचें वचन । जानकी झाली आनंदघन ।
मज वोळला रघुनंदन । दिव्य आपण मागितलें ॥ ३५ ॥
दिव्य न घेतां पैं येथ । मज अंगीकारीना रघुनाथ ।
लौकिकीं होतें विपरीत । जे विषयलुब्ध श्रीराम ॥ ३६ ॥
अहंरावणाच्या घरी । श्रीरामशक्ति सीता सुंदरी ।
राखिली होती षण्मासवरी । ते ये काळीं घरी घातली ॥ ३७ ॥
ऐसा जनापवाद होता । तो चुकविला हनुमंता ।
श्रीरामाची निर्विषयता । प्रकट तत्वता तुझेनि आजी ॥ ३८ ॥
जानकीची निष्पापता । तुझेनि झाली वायुसुता ।
दिव्य मागतां रघुनाथा । देईन तत्वता सर्वांगें ॥ ३९ ॥
दिव्य मागतां रघुनंदन । जेणै अंगें देईन जाण ।
तैंचि होईन पावन । निंद्य जाण पैं येर ॥ १४० ॥
या कारणें सर्वांगेसी । दिव्य देईन श्रीरामासी ।
ऐसें बोलतां वेगेंसी । हनुमंत चरणांसी लागली ॥ ४१ ॥
तुझेनि धर्मे हनुमंता । आजि माझ उजळला माथा ।
विलंब न करीं सर्वथा । होई योजिता सामग्री ॥ ४२ ॥

सीतेची आज्ञा ऐकून मारुतीने तिला वंदन
करुन प्रचंड असे अग्निकुंड प्रज्वलित केले :

ऐकोनियां तें वचन । आलें हनुमंतासी स्फुरण ।
करोनि सर्वांगें निंबलोण । वंदिले चरण जानकीचे ॥ ४३ ॥
दिव्य मागतां रघुनाथ । जानकीचें हर्षित चित्त ।
तेणें सुखमय हनुमंत । सामग्री योजित दिव्याची ॥ ४४ ॥
श्रीरामआज्ञा तत्वता । सर्वांगें दिव्य देवों पाहे सीता ।
तो संपादावया हनुमंता । विचार चित्ता आठवला ॥ ४५ ॥
विश्वाकारविषम कुंड । हनुमंतें पेटविलें प्रचंड ।
देखोनि खळबळिलें ब्रह्मांड । अकांड तांडव मांडिलें ॥ ४६ ॥
ज्वाळा लागती अंतराळीं । आकाश व्यापिलें ज्वाळीं ।
जवळी येवोनि जनकबाळी । कुंड न्याहाळी अति प्रीती ॥ ४७ ॥

सीतेला ते अग्निकुंड संपूर्ण अंतर्बाह्य राममयच भासले :

तंव अपूर्व तेथें जालें । सबाह्य कुंड रामें व्यापिलें ।
ते देखोनि जनकबाळे । आश्चर्य वर्तलें निजचित्तीं ॥ ४८ ॥
अभिनव लीला रघुपती । दिव्य घेतां मजप्रती ।
कुंडामाजीं निजस्थिती । अंतर वृत्ती पाहूं आला ॥ ४९ ॥
येथें कायसा विचार आन । शुद्धभावार्थाचें प्रमाण ।
करोनियां अग्नीमाजी स्नान । श्रीरामचरण सेवावे ॥ १५० ॥
ऐसा निश्चिय करोनि चित्तीं । रामांगना महास्ती ।
स्वयें प्रतिज्ञा झाली बोलती । सावध श्रोतीं परिसावें ॥ ५१ ॥

मानसि वचसि काय जागरे स्वप्रमार्गे ।
नहि वसति मनो मे राघवादन्यंपुसि ।
सपदि दह ममांगं पाककृत् पावकेदं ।
सुकृतदुरितभाजां त्वं हि नः कर्मसाक्षी ॥६॥

अग्निकुंडासमोर उभी राहून सीतेचे प्रतिज्ञेचे सहजोद्‌गार :

राहोनि कुंडासमीप । श्रीरामभजनप्रताप ।
बोलती झाली आपोआप । सुखरुप श्रीराम ॥ ५२ ॥
निजभजनमहिमान । निजस्थितीचें वर्णन ।
स्वयें बोलो नये आपण । परी न बोलतां जाण सरेना ॥ ५३ ॥
पुसतां श्रीरघुनंदन । वंचूंही नये आपण ।
दिव्यसमयीं उच्चारण । केल्याविण सरेना ॥ ५४ ॥
म्हणोनियां निजस्थिती । बोलती झाली सीतासती ।
अत्यंत नम्र अति प्रीती । अग्नीसी विनंती करीतसे ॥ ५५ ॥
स्वामि परियेसीं तेजोराशी । तूं साक्षी सर्वकर्मांसी ।
अंतर सकळ जाण्सी । जठरनिवासी जठराग्नी ॥ ५६ ॥
अत्यंत चपळ शीघ्रगती । जेथें जेथें जाय मनोवृत्ती ।
तेथें तेथें रघुपती । चाळक स्थिती सांगातें ॥ ५७ ॥
कल्पनेंचेनि योगें । मन जेथें जाय वेगें ।
राम सरसा पुढें मागें । परतोनि निघे तेथेंची ॥ ५८ ॥

“रामांवांचून अन्य विषय माझ्या मनात क्षणभर
जरी आला असेल तर हे अग्ने ! मला तू दहन कर.” :

राम सांडोनियां मना । विषय जरी ये ध्याना ।
तरी देह हुताशना । करीं दहन क्षणमात्रें ॥ ५९ ॥
व्यापार जे कां वाचिक । स्वर वर्ण उच्चारादिक ।
श्रीराम त्यांचाही चाळक । नुच्चारे देख रामेंवीण ॥ १६० ॥
वाचेंसी वदविता राम । नित्य कथेसी मेघश्याम ।
रामेंवीण नाहीं उपशम । वाग्विश्राम श्रीराम ॥ ६१ ॥
वाचा भलतें अति वावडे । परी रामेंवीण नवचे पुढें ।
श्रीरामेवीण उघडें । निजनिवाडें वचन नाहीं ॥ ६२ ॥
तेथें सैराट देतां हांका । हांकेमाजी राम नेटका ।
अनारिसें होतां देखा । देवमुखा करी भस्म ॥ ६३ ॥
हे काया जेथें आतळे । तेथेंचि श्रीराम मिळे ।
श्रीरामाहूनि वेगळें । नाहीं उरलें सर्वथा ॥ ६४ ॥
दिसाताहे हा दिसे देहो । ऐसा बहुतांसी संदेहो ।
ते देहीं श्रीरामरावो । प्रकट पाहों दिसतसे ॥ ६५ ॥
रम अवघे श्वासोच्छ्वास । राम पळ निमेषोन्मेष ।
श्रीरामीं पैं सावकाश । निजवास् रामपणें ॥ ६६ ॥
रामेंवीण शरीर । क्षणही जाये आन मोहरा ।
ती देह वैश्वानर । क्षणमात्रें भस्म करीं ॥ ६७ ॥
शरीर वाचा मानस । त्रिविध प्राण सावकाश ।
तुजपुढें केला हुताश । श्रीराघवेश पावावया ॥ ६८ ॥
कायिक वाचिक मानसिक । त्रिविध व्यवहार संसारिक ।
यांचें प्रमाण केलें देख । ऐक आणीक सांगेन ॥ ६९ ॥
जागृति सुषुप्ति आणि स्वप्न । त्यांची ते स्थिती संपूर्ण ।
याचा साक्षी तो रघुनंदन् । ऐकें लक्षण पैं तेंही ॥ १७० ॥
जागृती जें जें भासत । त्याचा प्रकाशक रघुनाथ ।
दृश्य द्रष्टा दर्शन तेथ । सहजचि होत श्रीराम ॥ ७१ ॥
मावळोनियां जागृती । कल्पना वसे स्वप्नस्थिती ।
त्यातें भासविता रघुपती । जाण निश्चिती जठरेशा ॥ ७२ ॥
निरसोनियां जागृती । उदैजतां स्वप्नस्थिती ।
मध्येंचि जे कां सुषुप्ती । जियेतें म्हणती गाढ मूढ ॥ ७३ ॥
परी मूढता नाहीं ऐसी । केवळ सुखमय सर्वांसी ।
जागृतीच्याज्या श्रमरासी । त्या सुषुप्तीसी निरसिती ॥ ७४ ॥
नलगतां पैं सुषुप्ती । केवळ जे स्वप्नजागृती ।
ज्ञाते त्यातें दुखणे म्हणती । सुखसंवित्ती तेथें नाहीं ॥ ७५ ॥
म्हणोनि सुषुप्ति सुखमय देख । श्रीराम त्याचेंही सोलींव सुख ।
श्रीरामाहूनि आणिक । नाहीं निःशेख पैं उरलें ॥ ७६ ॥

श्रीराम, देवब्राह्मण यांना वंदन व प्रदक्षिणा करुन सीतेने अग्नीत प्रवेश केला :

श्रीरामासी प्रदक्षिण । करोनि नमिले देवब्राह्मण ।
करावया अग्नीमाजी स्त्रान । रघुनंदन विश्वमूर्ति ॥ ७७ ॥
ऐसें परम प्रमाण सीता । बोलतांचि पैं तत्वता ।
सकळां झाली आश्चर्यता । परमावस्था हुताशीं ॥ ७८ ॥
सीता बोलतां प्रमाणासी । न साहवे जठराग्नींसीं ।
साक्षी सांगावें सकळांसी । भेदोनि देहासी बाहेर आला ॥ ७९ ॥
मंत्रबळें आहुती । जेंवी प्रवेश कुंडाप्रती ।
तेंवी निजसामर्थ्ये सीता सती । उडी घालिती पैं जाली ॥ १८० ॥
सीता स्मरोनि रघुनाथ । उडी घातली अग्नीआंत ।
आकांतले सुर समस्त । केला निजघात जानकियें ॥ ८१ ॥

त्यामुळे एकच आकांत :

तेथें बुजालीं वानरें । भ्यालीं सकळ निशाचरें ।
सुरवरादि खेचरें । झालीं समग्रें भयभीत ॥ ८२ ॥
कृपाळु श्रीरघुनंदन । सकळां निश्चिय होता पूर्ण ।
येव्हढें केलें निर्वाण । जीवावरी पूर्ण उठावला ॥ ८३ ॥

तेथे अग्नीच शांत झाला व सीता अग्नीप्रमाणे अति तेजस्वी भासली :

तंव आश्चर्य झालें तेथ । धगधगीत ज्वाळा समस्त ।
इंगळ जे लखलखित । लोपोनि शोभत जानकी ॥ ८४ ॥
तेथें तम धूमाचे घोळ । आणि रजरक्त कल्लोळ ।
ते लोपोनि सकळ । जनकबाळ देदीप्य ॥ ८५ ॥
तेथें दहनदीप्तिरुखा । मूळ ते जानकी देखा ।
अग्नीचिया निजशिखा । त्याचि शाखा तया वृक्षा ॥ ८६ ॥
सीता निजतेज कल्लोळें । पावकपाप निःशेष पळे ।
रावणबंदी जें घडलें । होते चैलें पैं धुतां ॥ ८७ ॥

निर्दोष सीतेचा मोठा जयजयकार :

सीता पतिव्रता निर्दोष । अग्नि जाला पैं चोख ।
जयजयकारें करिती घोष । गर्जती अशेष हरिनामें ॥ ८८ ॥
तें देखोनि श्रीराघवा । आकळिलें अति कणवा ।
अवघेपणेंचि अघवा । आला खेंवा स्वानंदें ॥ ८९ ॥

श्रीराम-सीता यांचे मिलन :

ऐसी प्रकृति पुरुषां भेटी । खेंवा पडोनि पडली मिठी ।
हरपली उठाउठी । जिराली पोटीं येरयेरां ॥ १९० ॥
तेथें योग वियोग कांही । स्मरणास्मरण तें नांहीं ।
बुझावण झालें दोहीं । लवलहीं दोन्हीपणा ॥ ९१ ॥
श्रीरामरुपीं तत्वतां । मिळोनि गेली जनकदुहिता ।
न निवडे पैं सर्वथा । युक्ति विवरितां बहुविध ॥ ९२ ॥
तेथें अशोकाचा शोक । वियोगभावनेचें दुःख ।
हरवोनि जंव म्हणे सुख । तंव म्हणते निःशेख हारपलें ॥ ९३ ॥
ऐसा जीवशक्तिसंयोग । अभ्यासेंवीण महायोग ।
निःशेष कल्पनेवीण भोग । अति अव्यंग भोगिती ॥ ९४ ॥
एकपणाचेनि आळें । सर्वथा नुरेचि वेगळें ।
श्रीरामरुपें सगळें । समावलें एकाएकीं ॥ ९५ ॥
एकाएकीं जनार्दनीं । सहजीं सहजचि मिळणी ।
प्रकृतिसहित जनक नंदिनी । रामचरणीं सरती झाली ॥ १९६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सीतादिव्यनिरुपणं नाम अष्टषष्टितमोऽध्यायः ॥ ६८ ॥
ओंव्या ॥ १९६ ॥ श्लोक ॥ ६ ॥ एवं ॥ २०२ ॥