अध्याय 8
भीतीने राक्षसांचे पातालगमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
अवनिजापति रघुनंदन । जोडून पाणी करी प्रश्न ।
अग्स्ति तुझेनि मुखें आपण । माळीमरण आयकिलें ॥१॥
पुढें उरले दोघे बंधु । त्यांचा कैसा जाहला वधु ।
त्यांतें वधिता गोविंदु । किंवा आणिक पैं असे ॥२॥
अगस्ति म्हण श्रीरघुपती । तयां राक्षसां मृत्यु विष्णुहातीं ।
विष्णुहातें ते मरती । आणिकाप्रती नाटोपती ॥३॥
माळी मारिला ऐकोन । राक्षस मोडले देखोन ।
माल्यवंत क्रोधायमान । गिरा गर्जोन चालिला ॥४॥
अग्निकुंडासारिखे नेत्र । रागें धनुष्या गुण चढवित ।
जैसा समुद्र वेळी लंघित । तैसा धांवत राक्षस ॥५॥
माल्यवंताकडून विष्णूंचा उपहास :
दूरी देखोनि विष्णूसी । रागें फोडी आरोळीसी ।
जेवीं कां मेघ आकाशीं । वर्षाकाळीं पैं गर्जे ॥६॥
अगा पद्मनाभा परियेसीं । नीति सांगतों तिजपासीं ।
तूं धर्मयोद्धा नव्हेसी । ठकवोनि मारिसी वीरांतें ॥७॥
तू नेणसी शूर धर्म । तुज नाहीं कर्माकर्म ।
तुज कैंचा संग्रामधर्म । विमुख वीर मारिसी ॥८॥
विमुख मारितां वीर । तेणें तयासी पाप अपार ।
तया दोषांचें होती डोंगर । अपेश थोर तो जोडी ॥९॥
स्वर्गीं पितृगण कोपती । द्विज देव विमुख होती ।
कीर्ति होय अपकीर्ती । जाण निश्चितीं गोविंदा ॥१०॥
अपेशें नव्हे स्वर्गगमन । अपेशें होय अधःपतन ।
अपेश तेंचि पाप दारुण । अपेशें कल्याण न पवेच ॥११॥
तें अपेश तुज आलें । तुवां पळतां राक्षस वधिले ।
जे रणापासोन चेवले । त्यातें मारिलें संग्रामीं ॥१२॥
गरुड पळतां तूं पाठीं । बैसला होतासी वळंघोनि पृष्टी ।
फिरोनि चक्र हाणिलें क्रोधदृष्टीं । हे कामाठी तुझी नव्हे ॥१३॥
त्याची गर्वोक्ती :
तुज युद्धाचे असे आर्त । तरी तूं साहे माझा शरसंपात ।
आतां धीर धरीं युद्धांत । सावचित्त राहे उभा ॥१४॥
मी माल्यवंत कैसा । पाहें उभा गिरि जैसा ।
माझे दृष्टीसंमुख सहसा । काळ उभा राहेना ॥१५॥
मी ऊर्ध्व अवलोकीं व्योम । तंव भयभीत रविसोम ।
मज चळीं कांपतसे यम । माझा पराक्रम अद् भुत ॥१६॥
अगा ये शैलरिअनुजा । आतां पुरूषार्थ पाहें माझा ।
मी माल्यवंत भेटल्या जुंझा । गर्व तुझा राहेना ॥१७॥
शेईविष्णूंचे त्याला प्रत्युत्तर :
ऐसें ऐकोनिया वचन । काय बोलिला नारयण ।
म्यां अवतार धरिला याचि कारण । तुमचें दमन करावें ॥१८॥
तुम्ही दुष्ट दुराचारी । तुम्ही नोळखां परनारी ।
तुम्हीं पीडिले देव भारी । त्याची उसणवारी मी घेतों ॥१९॥
तुम्ही वरदें झालेति उन्मत्त । नोळखां साधु संत महंत ।
तुम्ही पाप आचरलेति बहुत । मी प्रायश्चित देतसें ॥२०॥
संग्राम तेंचि सुक्षेत्र । शरधारा तेंचि महातीर्थ ।
येथें माधव मी दानपात्र । तुम्हीं जीव देतां न सरावें ॥२१॥
मी देवांचा आज्ञाधारी । त्यांचें वचन माझे शिरीं ।
मी त्यांचेनि बोले राक्षस मारीं । मी सुखी करीं तयांतें ॥२२॥
मज नाहीं विमुखपण । सकळां संमुख मी जाण ।
विन्मुखा विन्मुख पूर्ण । मजपासीं मीतूंपण असेना ॥२३॥
माझ्या साधूंचा करिती द्वेष । तयांतें मी निर्दाळीं परेश ।
यालागीं तुम्ही राक्षस । परम क्लेश पावाल ॥२४॥
माल्यवंताचा हल्ला :
ऐकोनि विष्णूचें वचन । माल्यवंत झाला क्रोधायमान ।
अग्निकुंडासारिखे नयन । शक्ति दारुण घेतली ॥२५॥
ते शक्ति अत्यंत दारुण । काढितां कडकडली कडाडून ।
घंटावळी तेंचि आभरण । नादें गगन कोंदलें ॥२६॥
ते राक्षसें मंत्रोनि टाकिली । ते विष्णूच्या हृदयीं भेदली ।
जैसी पर्वतीं वीज खडतरली । तैसी लागली हरिअंगीं ॥२७॥
तये शक्तीचेनि घायें । देव मूर्च्छित होऊं पाहे ।
परी आवरोनि धैर्ये । उसणें घेवों आदरिले ॥२८॥
तयाउपरी श्रीहरी । शक्ति आव्हानी बीजाक्षरीं ।
जियेचे आंतबाहेरी । सहस्त्रनामें विष्णूचीं ॥२९॥
ऐसी शक्ति अति दारुण । सुटली घोषें गर्जे गगन ।
निधडे वीर कंपायमान । देवगण भयभीत ॥३०॥
ते शक्ति राक्षसांवरी । टाकिली अति क्रोधेंकरीं ।
राक्षसे शक्रीतें तोडून अंबरीं । धरणीवरी पाडिली ॥३१॥
कित्येक शक्तिघावें निमाले । कित्येक वीरीं प्राण सांडिले ।
कित्येक जीव घेवोनि पळाले । लंकापुरी लक्षोनी ॥३२॥
पुनरपि माल्यवंतें । काळतुल्य शूळातें ।
हाणिता झाला विष्णूतें । तो शूळ जनर्दनातें लागला ॥३३॥
हरिहृदयीं शूळ भेदला । तयावरी मुष्टिघाव झाला ।
महाशब्द करुं लागला । समरांगणीं राक्षस ॥३४॥
गरुडाच्या पक्षवाताने राक्षससैन्याचा विध्वंस :
अरुणानुजास शूळ । राक्षस मारिता झाला तत्काळ ।
ते वेळीं कोपला विनताबाळ । पक्षवात प्रबळ सोडिला ॥३५॥
गरुडपक्षवातेंकरीं । कित्येक गतप्राण झाले अरी ।
कित्येक पडले रणसागरीं । कित्येकीं बोहरी पैं झाली ॥३६॥
सैन्य देखोनि भंगलें । थोर थोर वीर पडिले ।
माल्यवंत सुमाळी काय करिते झाले । तये काळीं अवधारा ॥३७॥
मागें पुढें रण पाहती । तंव नाहीं रथ सारथी ।
सर्वांची झाली शांती । पक्षवातीं निवारिलें ॥३८॥
विष्णूंच्या धाकाने राक्षसांचे पाताळांत गमन :
माल्यवंत सुमाळी रणभ्रष्ट झाले । संग्राम सोडून पळों लागले ।
धाक धरोनि प्रवेशले । लंकापुरीभीतरीं ॥ ३९॥
ऐसे ते नक्तंचर । रणीं पाडिले थोर थोर ।
जयातें धाकती सुरवर । चरणांतें शरण येती ॥४०॥
अगस्ति म्हणे श्रीरामा । राक्षस मारावया पुरूषोत्तमा ।
तूं अवतरलासी आम्हां । अत्यंत सुख द्यावया ॥४१॥
विष्णुधाकें ते निशाचर । लंका सांडोनि पाताळविवर ।
प्रवेशले सहपरिवार । माल्यवंत सुमाळी राक्षस ॥४२॥
पौलस्तीचा वंश राक्षस । झालें रण अतिकर्कश ।
तेच कुळीं रावण दशशीर्ष । बळनिधि जन्मला ॥४३॥
ऐसी राक्षसांची उत्पत्ती । ऐकें स्वामी श्रीरघुपती ।
यांच्या वधाकरणें रमापती । आपण अवतार धारिता झाला ॥४४॥
पुढें कथा अति रसाळ । वाल्मीकमुखींचें नाम केवळ ।
श्रोते हो तुम्ही परिसा सकळ । सावधान हो उन ॥४५॥
एका जनार्दनासी विनवित । श्रोतीं व्हावें दत्तचित्त ।
पुढील कथानामामृत । सेविजे निर्मुक्त होवोनी ॥४६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
राक्षसपातालगमनं नाम अष्टमोध्यायः ॥८॥ ओंव्या ॥४६॥