Ramayan - Chapter 7- Part 7 books and stories free download online pdf in Marathi

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 7

अध्याय 7

माळी राक्षसाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पूर्वसंगीं रजनीचरीं । वेढियला तो श्रीहरी ।
पुढें वर्तलें तें चतुरीं । सावधान ऐकावें ॥१॥
श्रीहरि पर्वतासमान । राक्षस तेथें मेहुडे जाण ।
श्रीहरी सुटलिया प्रभंजन । दणादाण राक्षसमेघां ॥२॥
अवकाळींचा पर्जन्य । बळेंविण करी गर्जन ।
तैसे राक्षस बळहीन । संग्रामा जाण प्रवर्तले ॥३॥
जैसे टोळ आकाशीं । पसरती दशदिशीं ।
ते टोळ वृक्ष देखोनि मानसीं । उल्लासेंसी वेढिती ॥४॥
जेंवी मशक पर्वतमाथां । असंख्य बैसती तत्वतां ।
परी तो भार पर्वतचित्ता । अणुमात्र उपजेना ॥५॥
जैसे मत्स्य सागरीं । क्रीडताती सहपरिवारीं ।
ते पारधी आकळी जाळियाभीतरीं । तैसें श्रीहरि करूं पाहे ॥६॥

परस्परांचे तुंबळ युद्ध :

त्या राक्षसांचे अमोघ बाण । वज्राऐसे अति कठिण ।
जैसा प्रळयींच प्रभंजन । भूतगण पैं व्यापी ॥७॥
राक्षसबाणांचा शिरावा । वेढिता झाला त्या माधवा ।
पुढें जें वर्तलें श्रीराघवा । सांगेन मी अवधारीं ॥८॥
वैष्णवी माया अकळ । घातलें भ्रांतीचें पटळ ।
रणीं मांडिला कोल्हाळ । वीरीं सकळीं परस्परें ॥९॥
रथ लोटिती रथावरी । कुंजर आदळले कुंजरीं ।
असिवार असिवारीं । सैन्यसागरीं आवर्त ॥१०॥
ते राक्षस पर्वताकार । हाणिते झाले शस्त्रसंभार ।
जैसा वर्णांमाजी द्विजवर । प्राणायामबळेंकरीं ॥११॥
शरदाटले भूमंडळीं । तेणें दशदिशां अंधारीं पडली ।
वीरां वीर तये काळीं । हाणिते झाले आपआपणियांतें ॥१२॥
आपले सैन्य आपण । मारिते झाले राक्षस गण ।
सवेंचि करिती गाढ गर्जन । आपणा आपण मानवती ॥१३॥
शस्त्रे सणसणां वाजत । जैसा प्रळयकाळींचा वात ।
दोन्हीं दळां संघाट होत । वीर गर्जत वाढिवा ॥१४॥

श्रीविष्णूंकडून राक्षसांचा संहार :

मग निशाचरांवरी । रागें क्षोभला श्रीहरी ।
शार्ड्.ग धनुष्य टणत्कारी । नाद अंबरीं न समाये ॥१५॥
राक्षसांच्या शिरांतें । तोडिता झाला क्रोधें बहुतें ।
जैसा योगेश्वर मायेतें । आत्मज्ञानें निरसी पैं ॥१६॥
सर्वांतक बाण घेउनी करीं । क्रोधें सोडिला दैत्यांवरी ।
तेणें क्षणमात्राभीतरी । केली बोहरी राक्षसांची ॥१७॥
निशाचर पाडोनि भूमंडळीं । बाण भेदोनि गेला पातळीं ।
शेष कांपतसे चळचळीं । कूर्म कळकळीं पैं धाकें ॥१८॥
सवेंचि पांचजन्य त्राहटिला । नेणों नादें काळ कांपला ।
दिग्गजांच्या श्रवणबिळां । बधिरता पैं आली ॥१९॥
शशिसूर्य कंपायमान । नक्षत्रें पडती गळोन ।
मेरुमस्तक आंदोळून । समुद्रजीवन उचंबळलें ॥२०॥
नांदें राक्षसें झालीं वेडीं । समरांगणीं पडली उभडीं ।
एकां झालीं हडबडी गाढी । एक रोकडीं निमालीं ॥२१॥
सेन्य मारिलें समसकट । रथचक्राचें झालें पीठ ।
घुरघुरितसे कंठ । प्राण त्यागित रणरंगी ॥२२॥
जैसें सिंहाचें गर्जन । कुंजरांचा पळे प्राण ।
तैसें प्राणाहत राक्षससैन्य । पांचजन्यनादेंकरीं ॥२३॥
रणनदी वाहे अशुद्धगाढी । राक्षसकरवडें यांची दरडी ।
समरांगणीं जुंझती कडोविकडीं । तेचि परथडी पावले ॥२४॥
रणवसंत माजला । वीरें वीर रुधिरें न्हाला ।
तोचि पळस फुलावला । आरक्ततेकरोनी ॥२५॥
रण पडिलें असंख्यात । वीर घायाळ झाले बहुत ।
तोचि कोकिळांचा रव होत । आलापीत पंचमस्वरीं ॥२६॥
रवि रजनी खंडित । अति वातें समुद्र हेलावत ।
तैसा श्रीहरि मर्दित । अरिवीरसैन्यातें ॥२७॥

शरभेण यथा सिंहः सिंहेन द्विरदो यथा ।
द्विरदेन यथा व्याघ्रो व्याघ्रेण द्वीपिनो यथा ॥१॥
द्वीपिना च यथा श्वानः शुना मार्जारका यथा ।
मार्जारेण यथा सर्पाः सर्पेण च यथा प्लवाः ॥२॥
तथा ते राक्षसाः सर्वे विष्णुना प्रभविष्णुना ॥३॥

शार्ङ्‌गधनुष्यापासूनि शर । मनोवेगापरीस थोर ।
सुटले तेणें निशाचर । रणभूमीवर पाडिले हो ॥२८॥
शरभ जैसा सिंह विदारी । सिंह गजातें विदारी ।
गज व्याघ्र देखोनि दूरी । व्याघ्रा भय चित्याचें ॥२९॥
चित्या श्वाना वैर थोर । एकमेकांचा करिती संहार ।
श्वानास भीतसे मार्जार । सर्पा मांजर पैं भक्षी ॥३०॥
उरगें भेकातें गिळी जाण । तैसे श्रीहरीचे शर दारुण ।
राक्षससैन्य करोन भग्न । वीर दारुण पाडियेले ॥३१॥
वीर पाडिले रणमंडळीं । जैसा प्राणी सुषुप्तिकाळीं ।
नाकीं तोंडीं पडे धुळी । त्याचे तया स्मरण नाहीं ॥३२॥

तीनही राक्षस भयभीत :

कोट्यानुकोटी राक्षस । मारोनि विष्णु पावला यश ।
उरले तिहीं घेतला त्रास । लंकाप्रवेश तिहीं केला ॥३३॥
शंखराजाची ध्वनि भारी । तेणें राक्षसें घाबिरीं ।
पळोनि प्रवेशलीं पुरी । एकीं मार्गी प्राण सांडिले ॥३४॥
राक्षससैन्य भंगलें । कित्येक रणीं पडिलें ।
हें सुमाळिनें देखिलें । क्रोधाचें आले भरतें तया ॥३५॥
मग तो सुमाळी रजनीचर । विष्णूस येवोनि समोर ।
बोलता झाला साहें माझे शर । तरी मी वीर तुज म्हणेन ॥३६॥

सुमाळी , माल्यवंत याम्ना पराभूत केले :

विष्णूतें हाणित शर । विष्णू निवारी योद्धा चतुर ।
मग म्हणे तूं राक्षस थोर । संग्रामी धीर धरीं आतां ॥३७॥
श्रीविष्णूनें चाप सज्जिलें । गुणीं शर लाविले ।
जयां बाणंवरी खेळे । पुट तेजाळ अग्नीचें ॥३८॥
विष्णूचें येतां अग्निमय बाण । राक्षसें केलें खंडण ।
सोडोनियां आपुले बाण । रवि विष्णू आच्छादिला ॥३९॥
मांडलें रण अति कठिण । राक्षसें सोडिले निर्वाणबाण ।
रणरंगीं विष्णूस आंवरुन । आपण गर्जन करिता झाला ॥४०॥
सुमाळियें दिधली आरोळी । जेंवि विजु तडके मेघमंडळीं ।
श्रीहरीनें देखोनि ते काळीं । बाण तयावरी सोडिले ॥४१॥
बाण आदळले रथेसीं । छेदिलें रथांच्या वारुवांसी ।
वाहटुळीमाजि पत्रें जैसीं । आकाशपोंकळीं भोंवत ॥४२॥
सुमाळी होवोनियां भ्रात । रणामाजि परिभ्रमत ।
जैसा अटवीं अंध फिरत । जाजावत प्राणी पैं ॥४३॥
रणीं सारथि भंगला । सुमाळी विरथ झाला ।
श्रीविष्णू यश पावला । देवीं केली पुष्पवृष्टि ॥४४॥
सुमाळी रणीं विमुख । देखोनि माल्यवंत कोपला अधिक ।
बाण घेतला काळांतक । क्रोधें सोडिता झाला ॥४५॥
तो बाण अति तेजाळ । सूर्यतेजाहूनि सोज्ज्वळ ।
माळी संधान करी सबळ । तये काळीं अवधारा ॥४६॥
वैरियाचे अमित बाण । विष्णू मध्यें करी खंडण ।
जैसा पंदित छेदी पाखांडकथन । तेंवी ते बाण तोडिले ॥४७॥
तदनंतरें श्रीहरी । काय करिता झाला ते अवसरीं ।
संधान सरी राक्षसांवरी । जेंवी अंबरीं घन वर्षे ॥४८॥
कीं ते काळाचेचि दूत । प्रेरिलिया स्थळासी जात ।
तैसे चालिले गर्जत । राक्षसअंत करावया ॥४९॥
माल्यवंता देहीं भेदले । रुधिरातें प्राशन करिते झाले ।
सर्पसुधापानीं बैसले । चाटूं निघाले सुरासुरा ॥५०॥
माल्यवंत झाला मूर्च्छाभूत । रथ सार्थि अश्व तेथ ।
न लागतांचि क्षणमात्र । हतोहत पैं झाले ॥५१॥
चाप बाण पडिले रणीं । सैन्या झाली भंगणी ।
रजनीचर मूर्च्छा सावरोनी । तत्क्षणीं उठिला ॥५२॥

माळीच्या गदाप्रहारने गरुड मूर्च्छित :

हातीं वसवोनियां गदा । करिता झाला महाशब्दा ।
जैसा सिंह कांपे क्रोधें गदागदां । तेंवी गोविंदा हाणित ॥५३॥
ते गदा गरुडाचे ललाटीं । बैसे जैसा दरिद्री कपाळ पिटी ।
रुद्रप्रळयकाळीं घोंटी । मायामय सृष्टिरुपातें ॥५४॥
राक्षसगदा अति कठिण । लागतां गरुड मूर्च्छापन्न ।
रणीं विमुख नारायण । राक्षसगण हरिखले ॥५५॥
देव रणीं पराभविले । श्रीविष्णूस विमुख केलें ।
गरुडा गदेनें हाणितलें । राक्षसां झालें महासुख ॥५६॥
एक आनंदें नाचती । एक माळीसी वर्णिती ।
एक भला भला म्हणती । थोर ख्याती त्वां केली ॥५७॥
बंधूचें उसनें घेतलें । विष्णूतें विमुख केलें ।
समरांगणीं यश आलें । पराभविलें देवांतें ॥५८॥
राक्षस समस्त एकवटूनी । आनंदें गर्जती मेघध्वनी ।
हें ऐकोनि विष्णूनें कानीं । कृपावलोकनीं उठविलें गरुडा ॥५९॥
श्रीहरीची कृपा जयावरी । तयाचें कोण काय करी ।
हात उतरितां श्रीहरी । बळ शरीरीं बाणलें ॥६०॥

विष्णूंनी सुदर्शनचक्रानें माळीचा शिरच्छेद केला :

गरुडावरी वळंघोनि जाण । हातीं सुदर्शन चक्र दारुण ।
जयाचें तेज कोटिसूर्यगण । खद्योत होवोन राहिले ॥६१॥
चक्राभेणें कळिकाळ । चळचळां कापे होवोनि निर्बळ ।
चक्रातें देखोनि समुद्राजवळ । मर्यादेतें नुलंघी ॥६२॥
ऐसें चक्र अति दुर्धर । राक्षसाचें छेदोनि शिर ।
गगनीं भोवें चक्राकार । देखोनि भास्कर कोपला ॥६३॥
पर्वणी सांडोनि अवकाळीं । राहु येतो आम्हांजवळी ।
तैसें राक्षसशिर अंतराळीं । भोंवोनि खाली पडिलें ॥६४॥
स्वर्गी देव आनंदले । पुष्पवर्षाव करिते झाले ।
एक आनंदें नाचूं लागले । एक गाते झाले हरिनाम ॥६५॥

राक्षसांचा आक्रोश आणि पळापळ :

येरीकडे रजनीचर । निमाला देखोनि माळी वीर ।
दुःखें पिटिती करें शिर । पाषाणें उदर पीटिती ॥६६॥
म्हणती अपशकुनाचें झाले फळ । मारिलें आमचें असंख्य दळ ।
बंधु निर्दळिला सबळ । सेना सकळ पळाली ॥६७॥
आमचें कांहीं न चले येथ । म्हणोनि सुमाळी माल्यवंत ।
विमुख होवोनि रणाआंत । पुरीं प्रवेशते पैं झाले ॥६८॥
कित्येक सैन्य पळालें । किंचित जें काहीं उरलें ।
तें पक्षवातें गरुडें संहारिलें । चक्रे तोडिलें शिरातें ॥६९॥
गदेनें कित्येक निमाले । तोमरें कित्येक निवटिले ।
कांही थोडेबहुत उरले । ते मारिले शस्त्रेंकरीं ॥७०॥
कित्येक बणें निर्दळून । रणीं पाडिले असंख्य जाण ।
तेथें भूतावळी मिळोन । मांसभक्षण करिती ॥७१॥
आनंदें नाचती क्षेत्रपाळ । वाद्यें वाजविती वेताळ ।
शाकिनी डाकिनी करिती गोंधळ । मांसाचा सुकाळ पैं तेथें ॥७२॥
पात्रें भरोनि रुधिर पिती । एकमेकांस प्रीतीनें देती ।
एकमेकांस हांसती । तिरस्कारिती एकमेकां ॥७३॥
ऐसा संग्राम अत्यद्भुत । श्रीहरि झाला विजयान्वित ।
पुढें परिसावें सावचित्त । वाल्मीक वाग्रत्नातें ॥७४॥
वाल्मीककृत रामायण । एकैक अक्षर पावन ।
श्रवणें ब्रह्महत्यादि दोष दहन । कलिमलनाशन रामकथां ॥७५॥
एका जनर्दना शरण । म्हणतां कैंचें दुजेपण ।
श्रीरामप्रिय रामायण । नाम तारण भवदोषां ॥७६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां माळीराक्षसवधो नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥
ओंव्या ॥७६॥ श्लोक ॥३॥ एवं ॥७९॥

इतर रसदार पर्याय