रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 21 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 21

अध्याय 21

सहस्रार्जुनाने रावणाला बांधून नेले

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रम्य नर्मदेचा तीरीं । राक्षसेंद्र पंचद्वयशिरी ।
पूष्पोपहारें अर्चिता त्रिपुरारी । काय तेथें वर्तलें ॥ १ ॥
येरीकडे सहस्रार्जुन भूपाळ । महिष्मतीचा नृपशार्दूळ ।
श्रीरेवेमाजि स्त्रियांसहित केवळ । क्रीडा जळीं करीत होता ॥ २ ॥
स्त्रियांसहित अर्जुन । क्रीडतसे आनंदें पूर्ण ।
सहस्रहस्तीनींसीं एकला जाण । ऐरावती खेळे जैसा ॥ ३ ॥

सहस्राजुनाने क्रीडेच्या वेळी आपल्या बाहूंनी नर्मदा
अडविल्यामुळे तिचे पाणी सर्वत्र पसरून रावणाची शिवपूजा मोडली :

जाणावया भुजबळाची थोरी । स्वभुजा पसरोनि भीतरीं ।
अवरोधूनि रेवातीरीं । स्तब्धता झाली ते काळीं ॥४॥
सहस्त्रबाहूंच्या बळीं । नर्मदा रोधन झालें ।
समुद्रासारिखी ते काळीं । चढती झाली उदकेसीं ॥५॥
देखोनियां आत्मजातें । उदधीसि दाटे भरितें ।
जाणोनि अर्जुनाचे विक्रमातें । नर्मदा तेथें वाढली ॥६॥
कार्तवीर्यभुजींकरोन । सेतूसारिखें दिसे जीवन ।
अवलोकितां दिशांचे भान । अणुप्रमाण लक्षेना ॥७॥
वैश्रवणारि पूजा करीत होता । तयासि वाटली अपूर्वता ।
म्हणे अवकाळीं सरिता । माधव नसतां दाटली ॥८॥
होते पूजचें संभार । वाहों लागले दाटलें नीर ।
तेणें गजबजिला लंकेश्वर । म्हणे विघ्न थोर ओढविलें ॥९॥
मीन नक्र मगर दुर्धर । आणीकही जळचरें अपार ।
दाटलीं तेणें दशशिर । कासावीस पैं झाला ॥१०॥
नाकीं तोंडी भरलें पाणी । प्रधान गजबजिले देखोनि ।
म्हणती समुद्र मर्यादा टाकूनी । आजिंचे दिनीं वाढला ॥११॥
विसर्जून शिवपूजेतें । नित्यनेम कैंचा तेथें ।
हृदयीं दाटलें भयातें भरतें । कांही त्यातें स्मरेना ॥१२॥
जेंवि रुसली योषिता पतीसी । अवरोध करी गृहकृत्यासी ।
तैसें झालें रावणासी । चहूंकडेसी पाहतसे ॥१३॥
तंव देखें जैसा सागर । तैसें दाटलें नर्मदानीर ।
रावण प्रधानांप्रति सत्वर । बोलत झाला ते समयीं ॥१४॥
नर्मदेचा उगम पूर्वेहून । तेथें वर्षला नाहीं घन ।
पाणी चढलें पश्चिमेकडून । काय कारण पहावें ॥१५॥
ऐकोनि रावणाची गोष्टी । प्रधानीं आकाशीं उठाउठीं ।
अर्ध योजनें क्रमूनि सृष्टी । पुढें आश्चर्य दृष्टीं देखिलें ॥१६॥

प्रधानांकडून रावणाला सहस्त्रार्जुनाची माहिती :

कोणि एक पुरूषपंचानन । क्रीडे स्त्रियांसह-वर्तमान ।
सहस्त्रभुजाचें बळेंकरुन । नदी तेणें अवरोधिली ॥१७॥
साळईच्या वृक्षासमान । अंगकांति तैसा जाण ।
पर्वतमाथा शिखर पूर्ण । स्कंधावरी शिर तैसें शोभे ॥१८॥
नेत्र अग्नीसारिखे आरक्त । मुखीं जिव्हा लळलळित ।
उदकीं सहत्र पसरोनि हात । ओघ कोंडिला भुजबळें ॥१९॥
ऐसें देखोनि शुकसारण । रावणाप्रति बोलती वचन ।
म्हणे राया अपूर्व कथन । सांगता आश्चर्य वाटतें ॥२०॥
साळईच्या वृक्षासमान । कोणी एक पुरूष बळवान ।
पिंगट केस आरक्त नयन । जिव्हा जाण विद्युल्लतासी ॥२१॥
समवेत योषितासि नाहीं मिती । त्यांसह क्रीडतो जळाप्रती ।
हस्तिनिंमध्ये जैसा हस्ती । तैसा नृपती खेळतसे ॥२२॥
सहस्त्रभुजांचा भूपती । तेणें अवरोधली नदी निश्चितीं ।
ऐसें ऐकोनि मंदोदरीपती । क्रोध चित्तीं उद्भवला ॥२३॥

रावण युद्धार्थ ससैन्य निघाला :

ऐकोनि प्रधानमुखींचें वचन । क्रोधें खवळला रावण ।
म्हणे न लागतां अर्ध क्षण । निर्दाळीन अर्जुनातें ॥२४॥
इतकें बोलोनि लंकापती । सवें प्रधान शस्त्रें हातीं ।
संग्रामोत्कंठा धरोनि चित्ती । प्रयाण करिती लवलाहें ॥२५॥
ते समयीं अर्जुनासन्मुख । प्रयाण करी दशमुख ।
राक्षस देते झाले हाक । जैसे मेघ गर्जत अंबरीं ॥२६॥
महोदर शुक सारण । महापार्श्व धूम्राक्ष जाण ।
परिवेष्टीत पौलस्तिनंदन । जेथ अर्जुन तेथें आले ॥२७॥
अति शिघ्र तये काळीं । राक्षसेंद्र महाबळी ।
येता झाला अर्जुनाजवळी । जो भयानक डोहीं क्रीडतसे ॥२८॥
जिया डोहींचें शाश्वत जीवन । श्यामवर्ण माजि मगर मीन ।
शोभे तीरीं रम्य वन । फळपुष्प पूर्ण तया ठायीं ॥२९॥
तया डोहाभीतरीं । रावो क्रीडत परिवेष्टीत नारी ।
गीत नृत्य नानापरी । मृंदंगझल्लरी रुणझुणती ॥३०॥
नरेंद्र क्रीडता ऐसियापरी । तें देखोनि वैश्रवणारी ।
आरक्तनयन ते अवसरीं । बळें उन्मत्त डुल्लत ॥३१॥
ऐसा तो लंकानाथ । गंभीर वाणीनें गर्जत ।
कार्तवीर्याचे प्रधानां म्हणत । भय अद्भुत दावोनी ॥३२॥
प्रधान हो त्वरेंकरुन । राय करा जाणवण ।
युद्धार्थी आलासे रावण । शीघ्र आपण पैं यावें ॥३३॥

अर्जुनाची जलक्रीडा संपेपर्यंत थांबण्याची रावणाला विनंती :

ऐकोनि दशग्रीवाचें वचन । अर्जुनप्रधान सन्नद्ध होऊन ।
म्हणती रावणा अर्ध क्षण । सावधान अवधारीं ॥३४॥
दुश्चित उन्मत्त स्त्रीसीं रत । अथवा मारूं नये निद्रिस्त ।
ऐशियातें वधिता दोष अद्भुत । स्वर्गीं क्षोभत पितृगण ॥३५॥
म्हणतीं वंशीं झाला दुराचारी । स्वधर्म सांडूनि अधर्म करी ।
तयासि विमुख त्रिपुरारी । नाना अघोरीं पडेल ॥३६॥
जंव होय सावधान । अर्जुन जळीं क्रीडतां आपण ।
तंववरी क्षमा करोनि मनें । धैर्य धरोन रहावें ॥३७॥
सावध होईल नृपती । मग तुमची पुरवील मनोवृत्ती ।
तंवपरियंत लंकापती । स्वस्थ चित्तीं रहावें ॥३८॥

रावणाच्या प्रधानांकडून अर्जुनाच्या मंडळींचा संहार :

रावणप्रधानीं काय केलें । रायाच्या प्रधानांसीं त्रासिलें ।
क्षुधित होते तिहीं कित्येक भक्षिले । कित्येक पळाले जीव घेउनी ॥३९॥
सिंहनाद करिती निशाचर । संग्राम करिते झाले दुर्धर ।
बाण तोमर आणि वज्र । शूळ दुर्धर टाकिती ॥४०॥
कित्येक रावणें मारिले संग्रामीं । कित्येक पळाले सांडोनि रणभूमी ।
कित्येक रायापाशीं येऊनी । मात जाणविते जाहले ॥४१॥
समुद्र सांडोनि क्षोभे वेळ । मीनमगरां प्रयळकाळ ।
तैसे रावणाचे प्रधान सकळ । मिळोनि दळ त्रासिलें आमुचें ॥४२॥
दूतमुखींचें ऐकोनि वचन । कार्तवीर्य कोपायमान ।
क्रोधें नेत्र आरक्त करुन । काय वचन बोलिला ॥४३॥

ते ऐकल्यावर खवळलेला अर्जुन युद्धासाठी निघाला. रावणसैन्याचा विध्वंस :

कार्तवीर्य दूतांप्रती । बोले तुम्हीं न भिणें कोणे अर्थीं ।
जळाबाहेर निघाला हस्ती । तैसा राजा चालिला ॥४४॥
क्रोधें नेत्र आरक्त करुन । अग्नीसारिखा देदीप्यमान ।
जैसा कुंडीं हुताशन । तैसा राजा भासला ॥४५॥
धडधडित अग्नि प्रळयकाळीं । संहारीं भूतसृष्टिं ज्वालामाळीं ।
तैसा रावो तये वेळीं । थोर आवेशा पेटला ॥४६॥
वेगीं सुवर्णमय गदा घेऊन । जियेतें कांपें कां भान ।
सोडिली राक्षसा निर्दळण । करावया ते काळीं ॥४७॥
जैसें रवीच्या प्रकाशीं । अंधकारेंसीं जाय निशी ।
तैसें रायें राक्षसांसी । गदेकरोनि त्रासिलें ॥४८॥
होतां खगेश्वराचें आगमन । उरग पळती धाकेंकरुन ।
तैसें नृपनाथें राक्षससैन्य । रणांगणीं निवटिलें ॥४९॥
सहस्त्रार्जुनाचे गदेकरोनी । राक्षस त्रासिले रणमेदिनी ।
हें प्रहस्त देखोनि नयनीं । मार्ग रोधूनी राहिला ॥५०॥
जैसा विंध्याद्रि वाढे अचळ । तेणें मार्गरोधें न चले भानुमंडळ ।
तैसें प्रहस्त घेवोनि मुसळ । पर्वतापरी उभा ठेला ॥५१॥

प्रहस्ताच्या पराभवाने इतरांची धांवपळ :

तदनंतरें तो भूपति जाण । गदा फिरवोनि दारुण ।
प्रहस्ताचें मस्तकीं न लागता क्षण । घाव सुबद्ध हाणिला ॥५२॥
गदाघातें तत्क्षणीं । प्रहस्त पाडिला रणमेदिनीं ।
देखोनि रावण मनीं । विचारी पुढे काय कीजे ॥५३॥
प्रहस्त रणसागरीं पडिला । देखोनि शुकसारणां पळ सुटला ।
राक्षसांचा मोड झाला । पुढील कथा अवधारा ॥५४॥

रावण व अर्जुनाचे तुंबळ द्वंद्वयुद्ध :

रावणें धनुष्या वाहिला मेढा । उभा राहिला सहस्त्रार्जुनापुढां ।
कीर्तवीर्य वीर गाढा । रावणासी युद्धा मिसळला ॥५५॥
एक राक्षसेंद्र एक नृपवर । संग्राम करिती दुर्धर ।
जैसा प्रळयीं क्षोभे सागर । तैसे वीर मिसळले ॥५६॥
दोघे पर्वतासमान । उन्मत्त दोघे गज जाण ।
भिडती जयो इच्छून । सावधान पुरूषार्थीं ॥५७॥
जैसे दोनी सूर्य आकाशीं । भिडती आपले स्वशक्तीसीं ।
किंवा दोन अग्नि आपले तेजेंसीं । एकमेकांसी भस्म करिती ॥५८॥
दोघे मेघासारिखें करिती गर्जन । पराक्रमे दोघे सिंहचि जाण ।
दोघे उद्र व्याळांसमान । कार्तवीर्य रावण पैं देखा ॥५९॥
शचीसहित सुरपती । शंकरें घेवोनि पार्वती ।
सावित्रीसहित प्रजापती । युद्ध पाहती दोघांचें ॥६०॥
गरुडपृष्ठीसीं भगवान । अर्धांगीं अब्धीचें कन्यारत्न ।
आणीकही सकळ देवगण । युद्ध पाहती दोघांचें ॥६२॥
परस्पर गदा हाणिती । एकमेकां निखंदिती ।
एकमेकांसीं निंदिती । समान शक्ती दोघांची ॥६३॥
एकमेकांवरी गदा टाकित । एकमेकांतें हांसत ।
एकमेकांतें म्हणत । शस्त्रीं सामर्थ्य पैं नाहीं ॥६४॥
प्रळयमेघ करिती गर्जन । तयांपरी दोघे जण ।
हाक देतीं तेणें गगन । अत्यंत गर्जनें गर्जत ॥६५॥
सिंहावरी सिंह जैसे । लोटताति बळें आवेशें ।
तैसे नरराक्षसाधीश । करिते झाले युद्धासी ॥६६॥
काळासारिखे दोघे उग्र । नरपति आणि दशशिर ।
परस्परें गदामार । करिते झाले शीघ्रवत ॥६७॥
गदा मारितां एकमेकांसीं । तेणें पडसाद उठे आकाशीं ।
युद्ध करितीं एकमेकांसी । जयो कोणासी पैं नाहीं ॥६८॥
अर्जुनाची गदा सुटली । ते राक्षसा उरीं बैसली ।
तेणें नाहीं पावला भुली । पराक्रमी राक्षस ॥६९॥
राक्षसाच्या गदाघातें । खेद न होय अर्जुनातें ।
दोघे समान वीर तेथें । कोणी कोणातें गणी ना ॥७०॥
पूर्वी बळी आणि सुरेंद्रातें । युद्ध झालें आवेशें बहुतें ।
कोण न पवेचि जयातें । विजय दोघांतें पैं नाहीं ॥७१॥
जैसे वृषभ शृंगेकरीं । भिडताति परस्परीं ।
गज जैसे दंतकरीं । मारिती एकमेकांतें ॥७२॥
एक राक्षस लंकेश्वर । दुजा तो हैहयाधीश वीर ।
युद्ध करिती घोरांदर । स्वर्गी सुरवर पाहती ॥७३॥
तंव अर्जुनें काय केलें । हेममय गदेतें मोकलिलें ।
रावणाचें मस्तक भेदिलें । वरदबळें भुली न पवे ॥७४॥
वज्रापरीस कठिण भारी । लागली रावणाचें शिरीं ।
गदा चूर्ण होवोनि पृथ्वीवरी । पडोनि शतभग्न जहली ॥७५॥
अर्जुनाचे गदेकरुन । किंचित विव्हळ झाला दशानन ।
मागें सरला धनुष्यप्रमाण । तंव नृपराजें जाणीतलें ॥७६॥

अर्जुनाने रावणाला हजार हातांनी पकडले :

सहस्त्रभुजांचे बळेंकरीं । अर्जुनें धरिला विबुधारी ।
जैसा विनतातनयो आपुले वैरी । निजसामर्थ्ये कवळीतसे ॥७७॥
पंचद्वयशतभुज । ऐसा तो हैहयाधिराज ।
गळां बांधी पौलस्त्यात्मज । जेविं बळीनें नारायण ॥७८॥
दशग्रीवा गळां बांधोन । स्वर्गीं देखोनि सुरगण ।
म्हणति भला भला ह अर्जुन । मंगळ शब्द बोलती ॥७९॥
मद करोनि पुष्पवृष्टी । स्वर्गीं देव आनंदकोटी ।
म्हणती धन्य धन्य हा क्षत्रिय सृष्टीं । क्षात्रधर्मे आगळा ॥८०॥
अर्जुनें रावण कैसा धरिला । जैसा बळींने विष्णु द्वारपाळ केला ।
तैसा गळां बांधोनि परतला । आला आपुलिया नगरीसीं ॥८१॥
गर्जना करोनि अर्जुन । रावणातें गळां बांधोन ।
जैसा पारधियानें श्वान । तैसा दशानन पैं नेला ॥८२॥
प्रहस्त रणीं पडिला होता । तो पावोनि स्वस्थता ।
चहूंकडे अवलोकी लंकानाथा । तंव अर्जुनें गळां बांधिलासे ॥८३॥

प्रहस्तादि राक्षसांचा पराभव करुन अर्जुन
रावणाला आपल्या नगरी घेऊन आला :

देखोनि रावणा गळबंधन । प्रहस्तादि राक्षस मिळोन ।
क्रोधें संग्राम दारुण । करिते झाले रायासीं ॥८४॥
म्हणती अर्जुना भूपती । रावण गळां बांधिला हे सुख चितीं ।
न धरावें जाण युद्धाप्रती । धीर धरोनि रहावें ॥८५॥
राक्षस म्हणती मुसळ साहें । पळों नको उभा राहें ।
आता तुज कोण राखेल माये । वल्गोनियां गर्जती ॥८६॥
तव अर्जुनें काय केलें । रणीं राक्षसां मारिलें ।
कित्येक ते पळोनि गेले । घायवट होवोनी ॥८७॥
रणीं राक्षसमोड झाला । कार्तवीर्य जयो पावला ।
देवीं पुष्पवर्षाव केला । भाट गर्जती पवाडे ॥८८॥
मारुनियां दैत्यांसी । इंद्र पावे जयासी ।
तैसे राजेंद्रें त्या समयासी । राक्षसांतें जिंतिलें ॥८९॥
अर्जुन झाला जयवंत । गळां बांधोनि लंकानाथ ।
सवें घेवोनि प्रधान समस्त । पुरीं प्रवेशला आपले ॥९०॥
बळीस जिंतोनि शचीपती । नगर प्रवेशे अमरावती ।
तैसे रायें जिणोनि लंकापती । आपले नगरीं प्रवेशला ॥९१॥
पुढिलें प्रसंगीं निरुपण । पौलस्ति येवोनि सोडवील रावण ।
श्रोतीं होवोनि सावधान । श्रवण कीजे कथेतें ॥९२॥
एका जनार्दनीं करीं विनंती । पुढील कथा परिसिजे संतीं ।
जिचेनि श्रवणें अघें नसती । स्वानंदस्थिती पाविजे ॥९३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणबंधन नाम एकविंशतितमोऽध्यायः ॥२१॥ ओंव्या ॥९३॥