रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 37 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 37

अध्याय 37

श्रीरामगुण संकीर्तन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सुखनिद्रित भास्करवंशभूषण । जेंवी शेषशयनीं नाराय़ण ।
तृतीयभाग निशी क्रमोनि भृगुनंदन । पूर्वे आगमन पैं केलें ॥१॥
सद्गुरु मावळला । तृतीयभाग रात्रीचा क्रमिला ।
पुण्यपुरुषां चेवो झाल ।प्रातःस्मरामि करिते झाले ॥२॥
सकळ जनां चेडरें झालें । रतिसुखांपासोनि सुटले ।
मार्गस्थ मार्गीं लागले । तीर्थयात्रा करावया ॥३॥
विप्रवेदाध्ययन करिती । गाई घरोघरीं दुभती ।
एकी त्या दधिमथनीं प्रवर्तती । सारासार निवडोनि ॥४॥
कागपक्षी चेडरे झाले । तमेंसी निशीणें प्रयाण केलें ।
ऐसें जाणॊनि गंधर्व आले । श्रीरामांतें उठवावया ॥५॥
करिती सुस्वरें गायन । वीणा वेणु वाद्यें गहन ।
आलाप मूर्च्चना तान मान । सुरस गायन मांडिलें ॥६॥
सर्व किन्नरांची गायनध्वनी । ऐकिली श्रीरामें शयनस्थानीं ।
अति आनंदला मनीं । श्रीराम कीर्तनीं तुष्टला ॥७॥
पर्यकींहूनी श्रीरघुपती । उठलियावरी समस्ती ।
आपुलाले प्रयोजनीं सावधान चित्तीं । होते झाले ते काळीं ॥८॥
एक पादुका पुढें ठेवोन | एक परिमळ मिश्रित जीवन ।
सुवर्णपात्रीं भरोन पूर्ण । समीप तिष्ठत राहिले ॥९॥
एकें दंतकाष्ठ आणिलें । श्रीरामें मुख प्रक्षाळिलें ।
सवेंचि स्नानतर्पण सारोनि तये वेळे । सेवकंसहित बाहेर आला ॥१०॥
आधींच तो श्रीरघुनंदन । कोटि मदनांचा गाभा पूर्ण ।
पूर्णावतार गुणनिधान । भक्तजीवन श्रीराम ॥११॥
कौसल्यानंदवर्धन । नगरजनां सुखवर्धन ।
भक्तचकोरां चंद्र पूर्ण । षोडझ कळां शोभला ॥१२॥
पराक्रमें विष्णुसमान । रूप अश्विनौदेवांसम जाण ।
बुद्धि ब्हुहस्पतीहूनि गहन । श्रेष्ठपण स्रष्ट्याऐसें ॥१३॥
पृथ्वीसारिखी क्षमा पूर्णा । तेजें दुसरा सूर्य जाणा ।
वेगे पाहतां मागें पवन । ठाके कोण त्यापुढें ॥१४॥
समुद्रासारिखा गंभीरू । धैर्य जैसा पर्वत मेरू ।
कांति चंद्राहूनि अपारू । नृपति किंकरू जयाचे ॥१५॥
ऐसा तो अवनिजापति । सवें ऋषिमुनि जयांची अगाध कीर्ति ।
भद्रासनीं येवोन श्रीरघुपती । समस्तेंसी बैसला ॥१६॥
दोहींकडे उभे प्रधान । आणि नगरनागरिक जन ।
बैसले असती गुणसंपन्न । सभा सधन घनटवली ॥१७॥
इक्ष्वाकुकुळींचा भूपती । क्षत्रियांमध्ये अगाध कीर्ति ।
ऐशा श्रीरामभवंत्या ऋषिपंक्ती । तपोधनांच्या बैसल्या ॥१८॥
जैसा स्वर्गीं सुरवर । सुधापानियांमध्ये इंद्र ।
तैसाचि श्रीरामचंद्र । शेष शत्रुघ्न भरत उभे समीप ॥१९॥
शत्रुघ्न भरत लक्ष्मण । सेवा करिती संमुख उभे ठाकोन ।
जैसा अध्वरीं हुताशन । नाना अवदानें घेतसे ॥२०॥
किंकर सुभट सेवक । सेवा करिती प्रफ़ुल्लितमुख ।
हात जोडोनि संमुख । भाट ब्रीदें वर्णिती ॥२१॥
श्रीरामाचे पार्श्वभागीं । बैसले महानुभव योगी ।
वानर बळियाढे वीर ते प्रसंगीं । सुग्रीवादि अनुसरले ॥२२॥
चौघां प्रधानसहवर्तमान । सेवेसी तिष्ठत बिभीषण ।
जैसे कुबेरासी गुह्यक जाण । नाना पदार्थे सेविती ॥२४॥
ऐसा तो श्रीरामचंद्र । सेविताती ऋषिवृंद ।
एक नाना करिती वाद । एक प्रबंध पैं गाती ॥२५॥
एक करिती हरिकीर्तन । एक मंजुळ गाती गायन ।
एक सांगती पुराण । रामायणादिकथा हो ॥२६॥
ऐसा भक्तजनमनोरंजन । लीलाविग्रही श्रीरघुनंदन ।
अवतारनाट्य जनार्दन । स्वयें आपण दावीतसे ॥२७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
श्रीरामगुणवर्णनं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः ॥३७॥ ओव्यां ॥२७॥