रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 38 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 38

अध्याय 38

राजांचे रामदर्शनार्थ आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

याप्रकारें अयोनिजारमण । भरत आणि शत्रुघ्न लक्ष्मण ।
सद्गुरु वसिष्ठाचें करोनि सेवन । राज्यकार्य चालविती ॥१॥
करितां श्रीरघुनाथा । कोणा नाहीं दैन्यवार्ता ।
कोणा नाहीं दैन्य चिंता । राज्यीं असतां श्रीराम ॥२॥

जनकांचे श्रीरामांकडे आगमन :

राज्यकार्य प्रजापाळण । रात्रंदिवस करी रघुनंदन ।
तंव कोणें काळीं विदेह पूर्ण । श्रीरामदर्शना पैं आला ॥३॥
नामविदेही रूपविदेही । देहीं पाहतां तोही विदेही ।
विदेहासि देहचि नाहीं । विअदेहीं पाहीं कन्या ज्याची ॥४॥
ऐसा तो विदेही जनक । आला ऐकोनि वैदेहीनायक ।
पुढे येवोनि नमस्कार सम्यक । अति आदरें श्रीरामें केला ॥५॥
श्रीराम म्हणॆ जी विदेहनृपती । तुमचेनि आम्हां यश कीर्ति ।
तुमचेनि उप्रतेजें क्षितिपती । रावणादिक मारिले म्यां ॥६॥
तुमचेनि कृपेकरून । अलभ्य लाभ पावती जन ।
मी तरी तुमचा स्थापित दीन । परी एक वचन अवधारिजे ॥७॥
मी करीन तुमची पूजा । ते अंगीकारावी जनकराजा ।
रत्नाभरणें सुवर्ण वोजा । मम प्रीतीं घेईंजे ॥८॥
तंव जनक म्हणॆ देवाधिदेवा । आम्हीं करावी तुझी सेवा ।
तो तूं पूजितोसि मूळींच्या भावा । लक्षोनियां राजेंद्रा ॥९॥
तुझे दर्शनें तृप्त झालों । अकल्पित फ़ळ पावलों ।
येथवरी येवोनि कृतार्थ झालों । सकळ लधलों पूजेंतें ॥१०॥
तुवां केली आभरणीं पूजा । ते म्यां दोघी कन्येंसी वोजा ।
देतसें गा गरूडध्वजा । ऐकोनि श्रीरामराजा संतोषला ॥११॥

रामांकडून सात्कार स्वीकारून जनकाचे मिथिलेला गमन :

विदेहांचे करोनि पूजन । कित्येक दिवस अयोध्येस राहवून ।
मग विदेह निघाला मिथिलेसि जाण । आज्ञा घेवोन चालिला ॥१२॥
श्रीराम म्हणॆ विदेहासी । प्रयाण करावें आपुले नगरासी ।
सवें भरत बोळवील तुम्हांसी । नगरापर्यंत दिधला ॥१३॥
ऐकोनि श्रीरामाचे वचना । जनकें श्रीरामासि करोनि प्रदक्षिणा ।
चालिला अपुल्या मिथिलाभवना । अति आनंदें गर्जनेसीं ॥१४॥

कैकय देशाच्या राजाचे आगमन व त्याचा सत्कार :

तंव येरीकडे कैकयीचा ज्येष्ठ बंधु । कैकयदेशाचा प्रभु प्रसिद्धु ।
श्रीरामासी मातुलसंबंधु । श्रीरामदर्शना पैं आला ॥१५॥
मातुळ आला ऐकोन । श्रीराम सामोरा होऊन ।
करोनि साष्टांग नमन आलिंगन । दिशलें क्षेम परस्परें पुसती ॥१६॥
श्रीराम म्हणॆ अहो जी नृपती । आम्ही चौघे बंधु सहितीं ।
हें राज्य आणि संपत्ती । तुमचेनि प्रसादें भोगितसों ॥१७॥
इतुकें बोलोनि रघुराजे । मग आरंभिलें तयाचे पूजे ।
रत्नाभरणीं उपचार जे जे । ते मातुलासी समर्पिले ॥१८॥
धूप दीप चंदन । नाना परिमळॆं पूजोन ।
सवेंचि म्हणॆ श्रीरघुनंदन । आपुल्या नगरा प्रयाण कीजे ॥१९॥
वृद्ध असे नगरीं पिता । क्षोभ होईल त्याच्या चित्त ।
रत्नाभरणें लक्ष्मणेंसीं त्वरिता । आपुले राज्या चालिला ॥२०॥
केकयेश्वरें करोनि प्रदक्षिणा । नमस्कार करोनि सवेंचि प्रयाण ।
सांगातें घेवोनि लक्ष्मणा । आपुले नगरा निघाला ॥२१॥

काशीपतीचे आगमन व त्याचा सत्कार :

येरीकडे प्रतर्दन काशीपती । दिवोदासाचा कुमर निश्चितीं ।
आला ऐकोनि सीतापती । गेला चारी पाउलें सामोरा ॥२२॥
काशीपतीस देवोनि सन्मान । करोनि आलिंगन नमन ।
नाना उपचारीं पूजोन । श्रीरघुनंदन बोलतेसे ॥२३॥
श्रीराम म्हणे काशीपती । तुझेनि दर्शनें आम्हां परम प्रीती ।
तुवां येवोनि सांभाळिले हे प्रीती । मोठी आम्हां तुज वाढली ॥२४॥
आतां एक करावें । रत्नाभरणां सवें घ्यावें ।
तुवांआपुल्या नगरा जावें । जें अमरादिकां दुर्लभ ॥२५॥
सुवर्णकलशांचिया हारी । महादेवें धरिली शूळावरी ।
अति रमणीय माणिकार्णिकातीरीं । गिरीश करी राज्य जींचे ॥२६॥
ऐसी वरुणामाझारी । शिवें वसविली ते पुरी ।
म्हणोनि वाराणसी चतुरीं । तिये नांव बोलिजे ॥२७॥
ऐसी रमणीय काशीपुरी । तेथें जावें नृपकेसरी ।
येरें आज्ञा वंदोनि शिरीं । स्वसैन्येसीं निघाला ॥२८॥

इतर आलेल्या राजांचा सत्कार :

मागिलीकडे श्रीरघुनंदन । तीन शत राजे आले ऐकोन ।
करोनि यथाविधी पूजन । वस्त्राभरणें अर्पिलीं ॥२९॥
रायांसी म्हणे श्रीरघुपती । तुमचे कृपेनें पापमूर्तीं ।
मरण पावला लंकापती । माझी कीर्ती करून ॥३०॥
तुमचे कटाक्षें रावण । मरण पावला सत्य वचन ।
परी मजवरी निमित्त ठेवून । लोक म्हणती श्रीरामें वधिला ॥३१॥
रावण मारिला रणसागरीं । सहकुटुंबप्रधानपुत्रीं ।
अराक्षसी लंकापुरी । बिभीषणावेगळीं पैं केली ॥३२॥
जानकीचें हरण केलें । तियेनिमित्त इतुकें करणॆं पडिलें ।
ऐकोनि राजे बोलते झाले । श्रीरामेंसीं ते समयीं ॥३३॥

राजांकडून श्रीरामस्तुती :

राजे म्हणती श्रीरघुनंदन । तुवां मारिलें रावणा ।
राज्यीं स्थापिलें बिभीषणा । जानकी घेवोनि आलासी ॥३४॥
तुवां देवकार्य सिद्धीस नेलें । अवतारचरित्र प्रकटिलें ।
तुझिये कीर्तीनें भरले । भूमंडळ उचंबळत ॥३५॥
विजयो हो तुझ्या भुजांसी । विजयी झालासी सूर्यवंशीं ।
वैदेहवीरा आतां दे आज्ञेसी । निजदेशाशी जावया ॥३६॥
इतुकें ऐकोनि रायांचे वचन । बरवें म्हणोनि श्रीरघुनंदन ।
पुनरपी नृपातें पूजोन । वस्त्राभरणें दिधलिं ॥३७॥
हस्ती घोडे रथ संपत्ती । पृथक् पृथक् देवोनि रायांप्रती ।
बोळविता झाला तयांप्रती । आदरें अति करोनि ॥३८॥
ऐसा तो श्रीरामचंद्र । पुढे काय करिता झाला नरेंद्र ।
नृप बोलावून गुणसमुद्र । तें सावध श्रोतीं परिसावें ॥३९॥
आधीच रम्य रामायण । त्यावरी श्रीरामचरित्र गहन ।
परिसतां भवबंधखंडन । पुण्य पावन पैं करी ॥४०॥
एकाजनार्दनी विनती । विनवीतसें संतांप्रती ।
मी नेणॆं संस्कृतव्युत्पत्ती । कथासंगतिवांचोनि ॥४१॥
जेंवीं अंध अंधारीं जाय । तयासी न कळॆ मार्गासी सोय ।
तैसी मा तुम्हांमाजी पाहें । तुमचे सोयी चालतों ॥४२॥
अबद्ध सुबद्ध रामायण । भवरोगसी करी छेदन ।
जेंवी पुरिला हुताशन । नाना वनें पैं जाळीं ॥४३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
रामनृपदर्शनोत्सवो नाम अष्टत्रिंशो॓ऽध्यायः ॥३८॥ ओंव्या ॥४३॥