Ramayan - Chapter 7- Part 70 books and stories free download online pdf in Marathi

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 70

अध्याय 70

कैकेयीला लंकादर्शन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

जानकीसहित श्रीरघुपती । सुखस्वानंदें अयोध्येप्रती ।
राज्य करितां स्वधर्मस्थिती । पापवदंती राज्यीं नाहीं ॥१॥
देशींचे लोक पुण्यशील । स्वधर्मीं रत द्विज सकळ ।
अग्निहोत्रें करोनियां काळ । श्रीरामनामीं कंठिती ॥२॥
घरोघरीं तुळसीवृंदावनें । नित्य करिती हरिकीर्तनें ।
ठायीं ठायीं होती पुराणें । शास्त्रव्याख्यानें घरोघरीं ॥३॥
आणिक जे इतर लोक । तेही नगरीं स्वधर्मरक्षक ।
भूतदयासुत दीनपाळक । उपकारीं अत्यंत पुढिलांसी ॥४॥
भरतशत्रुघ्न कैकेयीनंदन । सुमित्रेचा लक्ष्मण ।
श्रीरामसेवे अनुदिन आसक्त । जाण मन त्यांचें ॥५॥
प्रधानवर्ग सकळिक । नगरींचे नगरलोक ।
बंदिजन सर्व सेवक । श्रीराम‍उपासक अनुदिनीं ॥६॥
अष्टदळकमळकळिकेमाझारीं । जनकीसमवेत कनकमृगारी ।
नीळवर्ण छत्र शोभे शिरीं । बंधु परिवारी उभे तेथें ॥७॥
ऐसा सुंदर राजीवलोचन । श्यामसुंदर धनुष्यबाण ।
ठाण मांडोनि विराजमान । त्याचें ध्यान करिताती ॥८॥
योगी दिगंबर तापसी । सिद्ध साधक महंत ऋषी ।
आश्रयोनी श्रीरामासी । अयोध्येसी राहिले ॥९॥
ऐसिये अयोध्याभवनीं । दुःख दारिद्र्य न देखिजे स्वप्नीं ।
पाप कैसे तें नेणेती मनीं । समाधानी चित्सुखें ॥१०॥
कित्येक काळपर्यंत । राज्य करी श्रीरघुनाथ ।
पुढें कथा वर्तली अद्‍भूत । सावधानचित्त अवधारा ॥११॥

लंका पहावयाची कैकेयीला इच्छा, विमानातून ती लंकेला निघाली :

कैकेयी म्हणे श्रीरामासी । रावणाची लंका आहे कैसी ।
ते मज सांगावी परियेसीं । समुद्राचा जिसी परिघ असे ॥१२॥
लंका कैसी सुवर्णाची । कैसा त्रिकूट किती उंची ।
लांब रुंद गृहें राक्षसांची । कोणेपरीचीं आहेत कैसीं ॥१३॥
निकुंभिळा शोभायमान । जेथें वसे रावणनंदन ।
जेणें विबुध केले दीन । शचीपति इंद्रपदाहून उतरविला ॥१४॥
सुवेळेसी कैसी रचना । जेथें होतासि रघुनंदना ।
जेथोनि पहातां लंकाभवना । सर्व रचना दिसे स्पष्ट ॥१५॥
कैसें तें संग्रामस्थळ । जेथें रावणादि राक्षस प्रबळ ।
दीर्घ विकटमुखाचे विशाळ । कुंभकर्णादि थोर थोर ॥१६॥
अशोकवनाची रचना । जेथें होती पद्मनयना ।
परिवारित राक्षससेना । त्रिजटा आदिकरोनि ॥१७॥
ते लंका पाहों निजदृष्टीं । ऐसी कैकेयीस उत्कंठा मोठी ।
हें श्रीरामें जाणोनिया पोटीं । मातेप्रति बोलता झाला ॥१८॥
अवो जननीये अवधारीं । लंका पहावया उत्कंठा थोरी ।
वर्ततसे तुमचे जिव्हारीं । तरी प्रधानासमवेत जाइजे ॥१९॥
पाहोनियां लंकाभवन । शीघ्रवत यावें आपण ।
ऐसें श्रीरामें आज्ञापून । पुष्पकावरी बैसविली ॥२०॥
सवें देवोनि नाना मंत्री । लंके निघाली कैकेयीपुत्री ।
घेतली मंथरा अपवित्री । कलहकारिणी पुनरपि ।
मायेसवें पूर्ण अविद्या । तेंवी कैकेयीपासीं मंथरा कुविद्या ।
जेंवी अधमा आवडे अविद्या । परापवादालागूनी ॥२२॥
तेंवी कैकेयी निजविमानी । पाहें चालली लंका भवनीं ।
मार्गी आकाशा पाहे नयनीं । दश दिशा अवलोकित ॥२३॥
ऐसें चलत विमान । नाना देश दुर्गे लंघून ।
पुढे देखिलें लंकाभवन । कनककळशीं विराजित ॥२४॥
देखोनियां लंकाभवना । पारणें झालें कैकेयीनयनां ।
म्हणे धन्य धन्य दशानना । नांदणूक ये ठायीं ॥२५॥
प्रसन्न करोनि उमापती । शिरीं पूजिला कैलासपती ।
धन्य धन्य रावणाची भक्ती । उपमा त्रिजगतीं असेना ॥२६॥
धन्य पौलस्तीचें तप । धन्य पौलस्तीचा जप ।
धन्य पौलस्तीचा प्रताप । बंदी सुरवर जयाचे ॥२७॥
धन्य रावणाची संपत्ती । धन्य रावणाची संतती ।
जेणें समरांगणीं शचीपती । जिंतोनि कामारा पैं केला ॥२८॥

बिभीषणाला भेटीस येण्यास कळविले; त्याचे आगमन :

ऐसें आश्चर्य करी श्रीराममाता । संज्ञेनें पाठविलें दूता ।
मात जाणविली लंकानाथा । दशरथवनिता आलीसे ॥२९॥
भ्रूलतासंज्ञेनें सेवक । प्रवेशले जेथें लंकानायक ।
भोवतें राक्षसांचे कटक । रत्नसिंहासनीं बिभीषण ॥३०॥
दूतीं बिभीषण कैसा देखिला । जैशा शशी गगनीं मिरविला ।
कीं उत्तानचरणाचा तान्हुला । अढळ पदीं शोभतसे ॥३१॥
कीं पातलिया वसंत । वनश्रीमाजी विराजत ।
श्रीरामाचा शरणागत । सिंहासनीं शोभतसे ॥३२॥
कीं गगनामध्ये दिनकरु । कीं कुळाचळांमध्यें मेरु ।
कीं पक्षियांमाजी खगेश्वरु । तैसा लंकेश्वरु राजसांमध्ये ॥३३॥
कीं तारागणामाजी धुरु । अब्धिमाजी क्षीरसागरु ।
कीं दैत्यांमाजी कश्यपकुमरु । तैसा नैऋतेश्वरु तयांमाजी ॥३४॥
ऐसा बिभीषण धर्ममूर्तीं । दूतीं देखोनि प्रणिपात विनंती ।
कर जोडोनि आदरें स्तुतीं । करिती झाला मुखकमळें ॥३५॥
म्हणे राजाधिराजा लंकापती । अति श्रेष्ठ धर्ममूर्ती ।
कैकेयीनें पठविलें तुम्हांप्रती । आशीर्वाद देवोनी ॥३६॥
कैकेयी म्हणाल आहे कोण स्थळीं । तरी प्रधानांसहित नगराचे पाळीं ।
तेणें पाठविलें तुम्हांजवळी । बोलवावाया तुम्हांतें ॥३७॥
दूतमुखींचें ऐकोनि वचन । बिभीषणाचें उल्हासे मन ।
सेना सेवक राक्षसजन । कैकेयीभेटी निघाला ॥३८॥
सहपरिवारें शरणागत । भरतमातेच्या भेटी उल्हासत ।
चालिला जैसा आनंदभरित । चकोर चंद्राचियें प्रीतीं ॥३९॥
ऐसियापरी बिभीषण । श्रीराममातेस भेटोन ।
करोनि साष्टांग नमन । आनंदें पूर्ण निवाला ॥४०॥
बिभीषण जोडल्या करीं । कैकेयीस प्रणिपात करी ।
म्हणे स्वामिनी मज दीनावरी । येवोनि कृपा थोर केली ॥४१॥
आतां चलावें मंदिरा । मज दीनावरी कृपा करा ।
ऐसी प्रार्थोनि नृपसुंदरा । परिवारेंसीं गृहा नेली ॥४२॥
दीर्घ उपचार करोनी । पूजिली ते भरतजननी ।
समस्तें भोजन सारोनी । विडे दिधले सकर्पूर ॥४३॥
कैकेयीस देवोनि दिव्यांबरें । मग प्रार्थिली मधुरोत्तरें ।
म्हणे माते कोण कार्यार्थ श्रीरघुवीरें । तुम्हां येथें पाठविलें ॥४४॥
किन्निमित्त आगमन । तें मजप्रति कृपा करोन ।
विदित करावें स्वामिनीनें । शरणागत म्हणोनी ॥४५॥
ऐकोनि बिभीषणाची विनंती । कैकेयी बोले तयाप्रती ।
म्हणे समस्त लंका पहावयार्थीं । येथें येणें राजेंद्रा ॥४६॥
मारोनि रावण कुंभकर्ण । लंक तुज दीधली दान ।
ऐसें ऐकोनि उत्कंठित मन । पहावया आलें लंकेतें ॥४७॥

बिभीषणाचा, कैकेयीला संपूर्ण लंका दाखविण्याचा प्रधानांना आदेश :

कैकेयीची ऐकोनि वचनावळी । बिभीषण सांगे प्रधानांजवळी ।
भरतमातेतें लंका समूळीं । दाखवा सकळ भवनादिक ॥४८॥
निकुंभळा सुवेळा पडलंका । त्रिकूटादिकरोनि दावा लंका ।
जेथें मारिलें रावणादि सैनिकां । तींही स्थळें दावावीं ॥४९॥
समस्त प्रधानांची भवनें । आणि निद्रा केली कुंभकर्णे ।
तीं स्थळें आणि नाना उपवनें । अशोकवनें दाखवावीं ॥५०॥
बिभीषण‍आज्ञा वंदोनि शिरीं । बैसे विमानीं जिचा पुत्र लवणारी ।
लंकादि स्थळें पहावया ते अवसरीं । निघती झाली ते काळीं ॥५१॥
प्रधान म्हणती राजमाते । पडलंका पाहें जाण निरुतें ।
प्रथम क्रौंचा हनुमंतें । ये स्थळीं मारिली ॥५२॥
तेथोनि प्रवेशला लंकापुरीं । वळंघला गृहावरी ।
तें हें राजभवन निर्धारीं । राघवारी वसे येथें ॥५३॥
हें रावणाचें होमस्थान । तेथें करीत होता शयन ।
हें सभास्थळ हें सिंहासन । विराजमान येथ राक्षसेंसीं ॥५४॥
हीं प्रहस्तादि प्रधानांची मंदिरें । येथें नाना जोशी भट वेव्हारें ।
हीं अग्निहोत्र्यांचीं होमस्थळें अपारें । हे हाटबाजार लंकेचे ॥५५॥
दाखविली शक्रजिताची पुरी । जेथें होम करित होता सुरारी ।
सौ‍मित्रें साधोनि रणचत्वरीं । मारिला पशूसारिखा ॥५६॥
तेथोन पुढें चालिलें विमान । देखिलें सुवेळेचें वन ।
कैकेयी म्हणे शिखर मनोरमण । याचें नाम काय असे ॥५७॥
प्रधान म्हणती राजमातें । वानरांसहित श्रीराम येथें ।
राहोनियां राक्षसांतें । निर्दाळिलें समरांगणीं ॥५८॥
पैल रुद्रकूटपर्वत । येथोनि उडाला वायुसुत ।
लंका जाळोनि अशोकवनांत । पादप उपडोनि पैं गेला ॥५९॥
ऐसीं पाहोनी स्थळांतरें । मागुतीं प्रवेशला लंकापुर ।
तंव देखिले मंदिर । कुंभकर्णवीराचें ॥६०॥
प्रधान म्हणती राजबाळें । येथें शयन केले कुंभकर्णे विशाळें ।
हें तयाचें अंतःपुर स्त्रिया बाळें । ये भवनी वसती माते ॥६१॥
मग ते दशरथसुंदरी । प्रवेशली कुंभकर्णमंदरीं ।
तंव त्या कुंभकर्णाची अंतुरी । कैकेयीदर्शना पैं आली ॥६२॥
भेटोनियां कैकेयीतें । अति सन्मानिलें आदरें बहुतें ।
भरतमात म्हणे वज्रसारेतें । कैसा काळ प्रवर्तला ॥६३॥
विपरीत समयो पातला । तैं जंबुकीं सिंह साधिला ।
पिपीलिकीं मिळोनि वेढिला । कद्रुतनयो ॥६४॥
तैसें झाले लंकेआंत । श्रीरामें वेधिला तुझा कांत ।
इतकियास मूळ शरणागत । राक्षसां अंत त्याचेनि ॥६५॥
श्रीरामा भेदोनि बिभीषण । मारविलें राक्षस दारुण ।
बंधुपुत्रासहित दशानन । समरांगणीं पाडिला ॥६६॥
आपण झाला राज्याधिकारी । निराक्षस केली पुरी ।
तंव बोलता ते अवसरीं । अष्टशतवर्षी कुमार आला ॥६७॥

मूळकासुराची माहिती :

तयासी देखोनि कैकेयी । वज्रसारेसि पुसे पाहीं ।
हा कुमार कोणाचा ये समयीं । अतिसुंदर दिसताहे ॥६८॥
रुपें ठाणें अति सुंदर गुण । पराक्रमें दिसे पंचानन ।
याची जननीजनक कोण । मजप्रती संपूर्ण सांगावें ॥६९॥
ऐकोनि कैकेयीच्या वचनासी । वज्रसारा सांगे सर्व वृत्तांतासी ।
सांगों आदरिलें परियेसीं । सावकाशीं अवधारिजे ॥७०॥
वज्रसारा म्हणे कैकेयीमाते । ऐकें याचिया कथनातें ।
मूळकासुर नाम यातें । प्रसिद्ध सर्वांतें विदित असे ॥७१॥
हा पितयाचे मूळीं लागला । म्हणोनि याचा त्याग केला ।
परी बाहेर वाढिन्नला । येरा पोराचिये घरीं ॥७२॥
मूळीं लागोनि पितयातें । ममरण झालें राघवहस्तें ।
क्षयो झाला सर्व राज्यातें । रावणादिकरोनि ॥७३॥
मूळनक्षत्रें शांति केली । राक्षससेना निर्दाळिली ।
रावणाची कुळवल्ली । आहाळली राघवाग्नीनें ॥७४॥
इतुकियासरी कारण हा मूळकासुर । हा जाणिजे माझा कुमर ।
यासि देखतां तप्त शरीर । होत आहे साजणी ॥७५॥
वंशा झाली सर्व शांती । मूळ नक्षत्रासी ऐसी गती ।
हें होणार अनादि निश्चितीं । भविष्य वाल्मीकी वदलासे ॥७६॥

मूळकासुराला तपश्चर्येला पाठविण्याचा कैकेयीचा उपदेश :

भरतमाता म्हणे कुंभकर्णप्रिये । यासी तपा पाठवावें सये ।
तप केलिया फळ प्राप्त होये । लंकेचिया राज्याचें ॥७७॥
प्रसन्न केलिया कैलासपती । लंकाराज्य ऐश्वर्यसंपत्ती ।
बिभीषणाची याप्रती । देईल निश्चितीं साजणी ॥७८॥
नाहीं तरी संतोषोनि विश्वनाथ । सामर्थ्य देईल अद्‍भूत ।
आपुले बळें लंका प्राप्त । होईल निश्चित साजणी ॥७९॥
ऐसें संवादोनि कैकेयी । निघाली बिभीषणमंदिरा पाहीं ।
बिभीषणें भेटोनि ते समयीं । अति आदरें पूजिली ॥८०॥
पूजोनियां श्रीराममाते । समर्पिलीं नाना वस्त्रें ।
कैकेयी म्हणे बिभीषणातें । अशोकवन पाहूं पां ॥८१॥
बिभीषणासमवेत कैकेयी । प्रवेशली अशोकवनाचे ठायीं ।
पाहती झाली ते समयीं । नाना परींच्या वृक्षांतें ॥८२॥
कैलासींच्या संपत्तीतें । रावणें मागोन आणिले येथें ।
इंद्र गांजोनि नंदनवनींच्या वृक्षांतें । बळें लंकानाथें आणिलें ॥८३॥
नाना परींच्या वापी पोखरणी । जेथील अमूप नाटोपे पाणी ।
देवालयें गोपूरें ऊर्ध्व गगनीं । उंच ऐसीं रत्नकळशीं ॥८४॥
बिभीषण म्हणे रावणारिमाते । या वृक्षातळीं रावणें सीतेतें ।
भोवतीं राक्षसी ठेविल्या होत्या येथें । एक वस्त्रेसीं षण्मास ॥८५॥
भोंवत्या राक्षसी दारुण । सीतेसी करिती रक्षण ।
हनुमंत या वृक्षवरुन । जानकीस भेटला ॥८६ ॥
ऐसी विवंचना लंकानाथें । सांगितली कैकेयीतें ।
सुखावोनि अत्यंत चित्तें । परमानंद पावली ॥८७॥
कैकेयी म्हणे बिभीषणा । मी जाईन अयोध्याभवना ।
तुम्हीं क्षेम कल्याण लंकाभवना । राज्य करावें स्वस्थानीं ॥८८॥
आज्ञा घेवोनि बिभीषणाची । अयोध्ये निघाली जननी भरताची ।
पुढील कथा सुरस रुची । वाढावी मनाची करुन सेवा ॥८९॥
एका जनार्दना शरण । अवलोकूनि लंकाभवन ।
कैकेयी प्रवेशली अयोध्ये जाण । श्रीरघुनंदन जेथें वसे ॥९०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
कैकेयीलंकावलोकनं अयोध्यागमनं नाम सप्ततितमोऽध्यायः ॥७०॥ ओंव्या ॥९०॥

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED